नाही जरी ‘सई’ तरी ...
Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2014 - 03:26
गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी.