ड्रिमगर्ल !

Submitted by तुमचा अभिषेक on 21 January, 2014 - 12:11

गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी. त्यावर तसेच दुर्लक्ष करण्याची तिची सवय असावी. पण यामुळेच माझ्यासारख्यांचा एक फायदा मात्र व्हायचा. तिला बिनधास्तपणे बघता यायचे. अन्यथा तिच्या पहिल्या कटाक्षानंतरच कधी मान वाकडी करायची हिंमत झाली नसती.

तिच्याशी पहिली नजरानजर होण्याचा योग आला तो अपघातानेच. मी ट्रेनने प्रवास करायचो तर ती ऑफिसच्या बसने. ती वेळेवरच निघायची तर मी बरेचदा उशीरा. त्या संध्याकाळी मात्र तिलाही उशीर झाला असावा. ऑफिसची बस सुटल्याने ती देखील ट्रेनसाठी स्टेशनला आली होती. तिथेच प्लॅटफॉर्मवर मोजून पंधरा फूटांच्या अंतरावर गाठ पडली. नजर पडताच तिने त्वरीत फिरवली. मात्र नजर फिरवतानाही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीपासूनच फिरवतोय असेच भाव त्यात होते. इथेच मला आकाश ठेंगणे झाले. गेले तीन महिन्यांची आमची ओळख, एकतर्फी बघण्याचीच आहे की काय असे जे वाटत होते, ते तसे नव्हते तर. तिच्या ठायी माझे काहीतरी अस्तित्व होते. भले एका य:कश्चित सहकर्मचार्‍याचे का असेना... अस्तित्व होते तर !

हातातली भेळ खाऊ की नको, की कुठे लपवू असे झाले होते. मात्र ते वाटणे उगाचच होते. तिने काही शेवटपर्यंत पलटून पाहिले नाही. पाचच मिनिटांत ट्रेन आली आणि ती निघून गेली. समोरच्या प्लॅटफॉर्मवरून ऑफिसमधल्या एकाने हात दाखवला तेव्हाही उगाचच, अगदी उगाचच मनात आलेली पकडले गेल्याची भावना लपवताना तारांबळ उडाली होती. पुढे त्या तश्याच संध्याकाळची वाट पाहण्यात आणिक पुढचे तीन महिने गेले पण ती काही आली नाही...

..............पण त्या वाट पाहण्यातही ती संध्याकाळ छान कटायची. ती होतीच तशी. वर्णन तरी काय करू तिचे, शब्दांत तिचे सौंदर्य बांधायचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्यासाठीचे तिचे अस्तित्व भूतलावर आणने. कोणी तिला ऑफिसची हिरोईन म्हणायचे तर कोणी माधुरी दिक्षित. प्रत्येकाचे आपापले कोडवर्ड होते. कित्येकांचे तेच पासवर्ड होते. काही नावे चारचौघांत सांगण्यासारखीही नव्हती. पण प्रत्येकाला ती आपल्या टाईपची वाटायची, आणि हेच तिचे वैशिष्ट्य होते. माझ्यासाठी मात्र ती ऑफिसातली स्वप्नसुंदरी होती. हो, ऑफिसातलीच. ऑफिसला पोहोचताच, ती नजरेला पडताच, तिचा विषय निघताच, तिच्याबद्दलचे स्वप्नरंजन सुरू व्हायचे. मात्र ऑफिस सुटल्यावर तिचे आणि आपले विश्व दोन असमांतर दिशांना. भले ती माझे ऑफिसला जाण्याचे कारण नव्हती, मात्र ऑफिसच्या कामातून मिळणारा फार मोठा विरंगुळा होती. किंबहुना त्यापेक्षाही जास्त, जे आज ती नसताना जाणवत होते.

आमच्या नजरांची दुसरी भेट घडायला अजून एक मोठा कालखंड जावा लागला. पण यावेळची भेट मात्र ठसठशीत घडली. ऑफिसतर्फे छोटीशी पार्टी होती. दुपारच्या जेवणाची, ऑफिसच्याच वेळेत आणि ऑफिसच्याच आवारात. पुन्हा एकदा उशीरच मदतीला धाऊन आला. एकावेळेस चाळीस लोकांची बसायची सोय, मात्र मोजून आम्ही चार जणं तिथे होतो. दोन तिच्याच मैत्रिणी. आणि मी इथे एकटाच. यापेक्षा आदर्श स्थिती दुसरी नसावी.. तिला संकोच वाटू नये अशी.. मला लाज वाटू नये अशी..

ताट घ्यायला मुद्दामच विलंब केला जेणे करून सोयीची जागा पकडता येईल. अन तशीच पकडली. अगदी तिच्या सामोरी. आज जी नजरांची शाळा भरणार होती त्यातला अभ्यास मला पुर्ण सेमीस्टर पुरणार होता.

घास अगदीच नाकात जाणार नाही इतकेच लक्ष माझे जेवणावर होते. तिच्या नैसर्गिक हालचाली इतक्या जवळून अन निरखून टिपण्याची हि पहिलीच संधी होती. खास दिवसाचा खास पोशाख, प्रत्येक घासागणिक होणारा अलंकारांचा किलकिलाट, त्यात मिसळलेले तिचे मंजूळ शब्द, अधूनमधून टिश्यू पेपरने सावरले जाणारे ओठ, डोळ्यांवर आलेली केसांची बट सावरायचे मात्र नसलेले भान.. पुढची पंधरावीस मिनिटे एखाद्या चित्रफितीप्रमाणे मनावर कोरूनच मी उठलो.

या भेटीने मला स्वत:ला तिच्या आणखी जवळ नेऊन ठेवले. यापुढे स्टेशनवर कधी भेटल्यास ती पलटून बघेल याची खात्री नव्हतीच. पण तरीही, पुन्हा कोणी समोरच्या प्लॅटफॉर्मवरून हात दाखवल्यास मी बावरून जाणार नव्हतो. तिलाच बघत होतो हे कबूल करायचा आत्मविश्वास आता माझ्या ठायी नक्कीच जमा झाला होता.

आमच्या तिसर्‍या भेटीचा क्षण मात्र कोणताही अपघात नव्हता. ना अचानक घडले होते. त्या भेटीची कल्पना मला आदल्या दिवशीच आली होती. पहिल्यांदा तिला कामानिमित्त थेट भेटायचे होते. तिच्या डिपार्टमेंटमध्ये तिच्या हाती एक कागद सुपुर्त करून एका प्रतीवर तिचे हस्ताक्षर मिळवायचे होते. खास दिवसाचा खास पोशाख, करायची पाळी आता माझी होती. ते देखील कोणाच्या नजरेत न भरेल असेच.

प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र छातीतील धडधड असह्य होऊ लागली. एक बरे होते जे हस्ताक्षर करायचे काम तिचे होते. थंड पडलेल्या माझ्या हातांनी पेन तेवढेही चालले नसते. कागद परतवताना ती मला थॅंक्यू म्हणाली. प्रत्युत्तरादाखल मी देखील थॅंक्यू’ च म्हणालो. तसे ती हसली.

औपचारीकपणेच हसली, मात्र आपण औपचारीकपणेच हसतोय हे समोरच्याला समजण्याची पुरेपूर काळजी घेणारा तिचा स्वभाव आवडून गेला. कुठलेही गैरसमज न सोडणारा..

नाही म्हणायला आमच्या भेटी अजूनही कैक घडल्या. संवाद अजूनही कैक रंगले. काहीच प्रत्यक्षात उतरलेले तर कित्येक कल्पनाविलास. सारेच लिहायचे म्हटल्यास सुरेखशी कादंबरी चितारली जाईल, अन तरीही काहीतरी शिल्लक आहे हिच भावना राहील.

पण आज चार ओळी खरडवाव्याश्या वाटल्या. तिच्या आठवणी जागवाव्याश्या वाटल्या. तिचे म्हणे लग्न झाले होते, गळ्यात मंगळसूत्र घालायची. कसे कळणार, कधी नजर तिथे गेलीच नाही. कश्याला जावी, इथे तरी कोण तिच्याशी लग्न व्हावे या अपेक्षा ठेऊन होते, इथे तरी कोण स्वत: अविवाहीत होते. आज तीन महिने झालेत तिला शेवटचे बघून. अमेरिका खंडातल्या कुठल्याश्या शहरात स्थायिक झालीय असे कानावर आहे. तिथेही तिचे इतकेच चाहते असतील? माहीत नाही.. पण इथे मात्र तिची जागा अजूनही खालीच आहे.. ऑफिसातली आणि आमच्या हृदयातलीही...

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यापेक्षा आदर्श स्थिती दुसरी नसावी.. तिला संकोच वाटू नये अशी.. मला लाज वाटू नये अशी..
पण इथे मात्र तिची जागा अजूनही खालीच आहे.. ऑफिसातली आणि आमच्या हृदयातलीही... >>>अगदी समर्पक शब्द वापरले आहेत.

लेख आवडला...छानच लिहील आहे... Happy
पण का हो तुमच्या घरच्या वहिदाला तुमच्या हृदयात बसवू शकता कि? ती हि असू शकते न कोणाची तरी ड्रीमगर्ल...बाकी ह घ्या ... Happy

@दिव्यश्री
पण का हो तुमच्या घरच्या वहिदाला तुमच्या हृदयात बसवू शकता कि?>>>>>>>>>>>>>ती तर आहेच हो.... हृदयाच्या एका कप्प्यात.. Wink
आणि तिच्या सोबतीने तर आतापर्यंत सुखाची ८ भागांची मालिका लिहून झालीय.. त्याचेच बक्षीस म्हणून हा लेख लिहायची अन प्रकाशित करायची परवानगी समजा..
प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@ खरीखुरी ड्रिमगर्ल _ Proud

अभिषेक...भावनेला शब्दात पकडणे, तुला बरं जमतं! मस्तच लेख... जुन्या आठवणी (म्हणजे..ड्रिमगर्ल्स :फिदी:) आठवल्या!

नाही म्हणायला आमच्या भेटी अजूनही कैक घडल्या. संवाद अजूनही कैक रंगले. काहीच प्रत्यक्षात उतरलेले तर कित्येक कल्पनाविलास. सारेच लिहायचे म्हटल्यास सुरेखशी कादंबरी चितारली जाईल, >>>>>>> आम्हाला वाचायला आवडेल......(त्याचेच बक्षीस म्हणून हा लेख लिहायची अन प्रकाशित करायची परवानगी समजा.. ) अशी बक्षीसे मिळत राहोत. पु. ले शु.

अभिषेक,

मस्त, तशी प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये अशी ड्रिमगर्ल असते Wink