जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट
जीवधन आणि नाणेघाट यांचा इतिहास आणि माहिती सर्वश्रुत आहेच. यावर बरेच धागे आधीच उपस्थित असल्याने अजून एकाची भर न टाकता फक्त माझा अनुभव मांडतो.
कोणाला इंटरेस्ट असेल तर इतिहास, जायचे कसे वैगरे आणि आधीचे लेख या ब्लॉग लिंक वर वाचू शकता.
एव्हाना भरधाव जाणारी गिरीची 'होंडा सिटी' आज मात्र कल्याण-जुन्नरमार्गे काळोख्या रात्री माळशेज घाटातून शांततेचा आस्वाद घेत अगदी आरामात चालली होती.. घाई आजिबात नव्हती तरीसुद्धा त्या डांबरी रस्त्यावरचे पांढरे पट्टे मात्र लगबगीने गाडीखाली येत असल्याचे भासत होते.. आतापर्यंतच्या प्रवासात गरमीयुक्त वाटणार्या हवेत एक प्रकारचा सुखद गारवा आला होता... गाडीत सुरु असलेल्या गुलाम अलीच्या गझलांनी तर वातावरण सुरमय झाले होते.. त्यातही गप्पागोष्टींची मैफल सुरुच होती... सारे काही निवांतपणे चालले होते... अर्थात सका़ळपासून कसे, कुठे, किती वाजता इत्यादी बर्याच गोष्टी चघळून झाल्या होत्या..