एव्हाना भरधाव जाणारी गिरीची 'होंडा सिटी' आज मात्र कल्याण-जुन्नरमार्गे काळोख्या रात्री माळशेज घाटातून शांततेचा आस्वाद घेत अगदी आरामात चालली होती.. घाई आजिबात नव्हती तरीसुद्धा त्या डांबरी रस्त्यावरचे पांढरे पट्टे मात्र लगबगीने गाडीखाली येत असल्याचे भासत होते.. आतापर्यंतच्या प्रवासात गरमीयुक्त वाटणार्या हवेत एक प्रकारचा सुखद गारवा आला होता... गाडीत सुरु असलेल्या गुलाम अलीच्या गझलांनी तर वातावरण सुरमय झाले होते.. त्यातही गप्पागोष्टींची मैफल सुरुच होती... सारे काही निवांतपणे चालले होते... अर्थात सका़ळपासून कसे, कुठे, किती वाजता इत्यादी बर्याच गोष्टी चघळून झाल्या होत्या.. इतकेच काय अगदी ' मग नकोच जाउया' या निर्णयापर्यंत जवळपास पोचलो होतो.. पण आता अगदी निवांत... सारी बेचैनी मागे राहिली होती..
आमची 'घाटघर'गावाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली होती..मागच्या सीटवर जो (गिरीश जोशी), ज्यु. गिरीविहार (अथर्व) नि आपल्या मांडीवर पिल्लूला (ज्यु. विनय भीडे - श्रेयस) घेउन खुद्द विनय भीडे.. तर पुढच्या सीटवर अस्मादीक नि गाडीचा मालक, इन चार्ज असलेला 'गिरी' (गिरिविहार - नरेश परब).. निमित्त होते ढगांना आमंत्रण देण्याचे. !! कारण जुन महिना उजाडला होता.. तेव्हा पावसाला फारसा उशीर नको म्हणून ढगांना आमंत्रित करण्यासाठी 'जीवधन ते नाणेघाट' या ट्रेकची वाट पकडलेली..
जुन्नरला जाणार्या मुख्य रस्त्याला बगल देउन आमची गाडी गणेश खिंडीपर्यंत पोहोचली होती... वळणावळणाचा रस्ता आता अगदीच सुनसान बनला होता... शहरी दिव्यांचे काजवे दुरवर मोठया संख्येने लुकलुकत होते... आकाशातील चंद्र आता मावळतीला जात होता.. तरीसुद्धा आजुबाजूच्या अवाढव्य सह्याद्रीकडयांचा अंदाज येत होता.. मग तो लेण्याद्रीचा डोंगर असो वा 'शिवनेरी' असो वा हडसर - निमगिरी असो....
मागेच डिसेंबर महिन्यात 'हडसर-निमगीरी'ट्रेकच्या निमित्ताने या मुलुखात भटकंती झाली असल्याने निर्धास्त होतो.. त्यात गिरी म्हणे 'जीवधन दोनवेळा झालाय'... मग तर बिनधास्तच होतो... काही अवधीतच 'निमगिरी'किल्ला मागे राहीला.. नि एकामागून एक अशी दोन-तीन छोटी गावांची नावे टप्प्याटप्प्याने सामोरी आली.. पण आमचे लक्ष्य 'घाटघर' होते.. 'जीवधन' च्या पायथ्याचे गाव.. एव्हाना बर्यापैंकी मोकळा वाटणारा सभोवताल आता अचानक गर्द झाडीने व्यापला गेला.. रस्त्याची दुरावस्था पदोपदी जाणवू लागली.. त्यातच 'खैरे' नावाच्या गावाची पाटी सामोरी आली.. नि आमची गाडी रस्ता चुकली.. तिथे काळोखातला 'यु' आकारात वळून जाणारा रस्ता दिसलाच नाही नि आम्ही आपले सरळ जाण्याच्या हिशोबाने गाडी चुकुन गावाकडेच नेली.. पुढे रस्ता अगदीच बिघडला.. साहाजिकच गाडीतले झोपी गेलेले खाडकन जागे झाले.. दहाएक मिनीटांतच आम्हाला रस्ता चुकल्याचे कळले.. इथवर खराब रस्त्याने गाडी आणताना जितके कष्ट पडले त्यापेक्षा जास्त कष्ट गाडी पुन्हा त्या 'खैरे' फलकापर्यंत मागे आणताना घ्यावे लागले.. !
इथवर येउनही आम्हाला त्या अंधारात 'यु' आकारात वळून जाणारा रस्ता दिसलाच नाही.. सांगायचे तर तसा रस्ता तिथे असल्याचे वाटलेच नाही.. सो गाडी पुन्हा एक- दोन किमी मागे फिरवून कुठे फाटा दिसतोय का बघत पुन्हा यायचे ठरले.. या गडबडीत मात्र दोन सुखावणार्या गोष्टी सामोर्या आल्या.. एक म्हणजे चमकणार्या काजव्यांना कुशीत घेउन अनोख्या रोषणाईत झगमगणारी झाडे.. उघडया डोळ्यांनी पाहत रहावे असे हे दृश्य 'मे' महिन्याच्या अखेरीस वा 'जुन' महिन्याच्या सुरवातीस हमखास दिसते.. दुसरी गोष्ट म्हणजे या काजव्यांना पाहत जात असताना पुढे वाटेत अचानक अगदी कान टवकारुन मान उंचावून भेटीस आलेले 'ससे'राव... आमच्यासंगे असणार्या दोन लहानग्यांसाठी हा अनुभव म्हणजे गंमतच..
असो आमची गाडी पुन्हा त्या 'खैरे' फलकाजवळच येउन अडकली.. आता रात्र इथेच काढावी का असा विचार येणार तोच त्या दुर्लक्षित वळणाकडे लक्ष गेले.. नि 'येस्स' करत पुन्हा मार्गी लागलो... हा रस्ता अगदी नाणेघाटापर्यंत जातो.. पण आम्ही याअगोदरच्या दिडेक किमी अंतरावर असणार्या 'घाटघर' गावातच गाडी वळवली.. शाळेसमोरच गाडी पार्क करुन तासभर निद्रीस्त झालो.. सकाळचे सहा वाजेस्तोवर जाग आली.. पहाटेची झुंजमुंज सुरु झाली होती.. थंडगार हवा सुटली होती.. समोरचा 'जीवधन'च काय तर अवतीभवतीच्या सार्या डोंगरावर एकच दृश्य पहावयास मिळत होते.. ते म्हणजे रात्रभर माथ्यावर विसावलेले ढग आता कुठे आळस देत उठत होते..
या वातावरणाची नशाच काही वेगळी असते.. पण भुकेचे काय.. अश्या वातावरणात गरमागरम खाण्याची ओढही तितकीच लागते.. वेळीच शाळेच्या अगदी समोरच्या घरातून एक गावकरी आला.. त्यांच्याकडे नाश्त्याला चक्क 'पोहे नि चहा' मिळणार हे ऐकून तर भुकेचा आगडोंब उसळला.. सगळे आटपून त्या घराच्या अंगणातच बसलो.. बच्चाकंपनी तर अगदी सहलीला आल्यागत खुष होते.. घरच्या अंगणातील माउच्या पिल्लाबरोबर खेळत होते.. काही अवधीतच फक्कड नाश्ता झाला..
त्याच घरासमोर गाडी पार्क करून आम्ही 'जीवधन'च्या दिशेने कूच केले.. गावाच्या मागूनच सरळ वाट जाते... तीच पुढे मग उजवीकडच्या जंगलात वळते... सकाळी साडेसातच्या सुमारास सुरवात केली होती.. जरी सुर्यदेव एव्हाना तळपायला लागले असले तरी गर्द झाडीच्या जंगलात कसले लागतेय ऊन.. त्यात उंबराची मोठ-मोठाले वृक्ष इथे तिथे पसरलेले.. अगदी घनदाट जंगलात शिरल्यासारखे वाटत होते..
प्रचि १:
प्रचि २:
गिरीने म्हटल्याप्रमाणे खाचेतून वरती जाण्यास वाट असल्याचे कळले होते.. पहिली खाच दिसली जिथे वरती तटबंदी नजरेस पडत होती.. तेव्हा आम्ही मूळ वाटेला बगल देउन त्याचददिशेने वाट चढू लागलो.. पण वाट चुकल्याचे वेळीच कळले नि पुन्हा मूळ वाटेवर आलो.. मग गिरीला आठवले की पुढच्या खाचेतून मार्ग आहे.. सो आम्ही पुढे जाउ लागलो.. दाट जंगलदेखील आता मागे सरले होते नि उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता.. शेवटी जिथून डोंगरावरची खाच दिसत होती तिथवर आलो.. आम्ही अगदी उतरणीच्या कातळभिंतीजवळ येउन पोचलो होतो...पण वरती जाण्यास वाट मात्र काही कळत नव्हती.. गिरीला नक्की आठवेना.. फक्त वरती पायर्या लागतात मग कातळटप्पा लागतो इतकेच काय ते म्हणत होता.. बच्चाकंपनी सोबत असल्याने 'जो'ला वरती बघण्यासाठी पाठवले नि तो पटापट कातळभिंतीवरुन पुढे चढत गेला पण.. जल्ला इतका पुढे गेला की मारलेली हाक नीट ऐकू येइना.. कातळभिंतीच्या वरती पुन्हा असणार्या झुडूपांच्या जंगलातही तो दिसेना.. बर्याच अवधीनंतर संपर्क झाला नि कळले की त्याला एक गुहा सापडली पण वरती जाण्याचा मार्ग काही सापडला नाही.. नाईलाजास्तव त्याला परतावे लागले.. चुकीचा मार्ग असल्याने उतरताना त्याची थोडी बोंबच झाली होती म्हणा.. ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये तासभर वेळ वाया गेला.. संभ्रमात पडल्याने आम्ही जंगलातून उतरुन अगदी खाली शेतात आलो.. तिथे एक गुराखी भेटला त्याला विचारले तर त्याने जिथून 'जो' उतरला तिथेच हात दाखवला.. झाले ! म्हणजे आमची वाट बरोबरच होती पण थोडक्यात चुकत होतो.. ! पायर्या लागण्यापुर्वी वाटेत एक दिशादर्शक बाणाची खूण असल्याची अधिक माहिती मिळाली.. नि आमचा मोर्चा पुन्हा आलेल्या वाटेनेच माघारी वळवला... !
नशिबाने बच्चाकंपनीचा उत्साह काही कमी झाला नव्हता.. तसेही त्यांना त्या कातळभिंतीला कधी हात घालतोय असे झालेच होते.. 'जो' मात्र तिथे पायर्या दिसल्या नाहीत म्हणून येण्यास काही राजी नव्हता.. म्हटले शेवटचा चान्स नाहीतर सरळ घरी.!! ग्रुपला मागे ठेवून आम्ही दोघांनी चढाईला सुरवात केली.. खरेतर इथे वाट अशी दिसतच नाही.. पावसात ह्या कातळभिंतीवरुन पावसाचे पाणी घरंगळत असल्याच्या खुणा मात्र सगळीकडे दिसत होत्या नि पावसात इथून चढणे जरा अवघडच असल्याचा अंदाज येत होता.. 'जो' अजुनही संभ्रमात होता पण मी मात्र 'वाट मिळेल' या विश्वासावर ठाम होतो.... तेवढ्याचा भागात शोधाशोध करायची होती सो पुढे गेलो.. अर्थात 'जो' जिथून गेला होता त्याच्या दुसर्या बाजूने चढून गेलो.. नि बाणाची खूण दिसली.. ! इथेच मग अर्ध्या चढाईनंतर थांबलेल्या 'जो' ला बाकीच्या ग्रुपला घेउन वरती येण्याचा संकेत दिला.. आता मात्र वाट मिळणार हा आत्मविश्वास दुणावला.. तरी पुढे वरती कुठून कसे चढायचे हे नीटसे कळत नव्हते.. उन वाढत असल्याने आता चुकामूकसुद्धा नको होती.. शेवटी अंदाज बांधत झुडुपांच्या जंगलापर्यंत पोहोचलो नि त्या जंगलातून धबधब्याची एक छोटी खडकाळ वाट दिसली.. ! तिथून अजुन वरती गेलो तर समोर कोरीव पायर्या हजर !! खूपच हायसे वाटले..
प्रचि ३ :
इथवर पोहोचेस्तोवर अकरा वाजत आले होते.. वाट पटकन ओळखता न आल्याने आमचे दिडदोन तास वाया गेले होते... दमछाक झाली ती वेगळी.. पायर्यांपर्यंत येइस्तोवर ग्रुपला त्या उनाचा कडक मारा सहन करावा लागणार होता नि त्यात छोटे मावळे त्रासतील असे वाटत होते.. पण ते दोघे चक्क आपल्या बाबालोकांना मागे टाकून पायर्यांपर्यंत पोहोचलेसुद्धा.. नि वरती चढतसुद्धा आले..!!
प्रचि ४:
पायर्यांचे दोन टप्पे पार केले की एक छोटा कातळटप्पा लागतो.. खोबणीसाठी जागा केली असल्याने फारसे श्रम पडत नाहीत... ह्या कातळटप्प्यानंतर पुन्हा पायर्यांनी आपण वरती गुहेपाशी पोहोचतो.. गुहा बर्यापैंकी मोठी पण सर्वत्र खराब पाणी साचलेले आहे...इथेच बाजूला मोडकळीस आलेली तटबंदी, बुरुज नि इतर अवशेष नजरेस पडतात.. तिथून वरती आलो नि उनाचा तिखट प्रहार सुरु झाला.. त्यात पाण्याचा तुटवडा होउ लागला सो पाण्याच्या टाके लवकरात लवकर गाठायचे ठरवले..
प्रचि ५: कातळटप्पा पार करुन वरती येताना विन्या
प्रचि ६:
प्रचि ७: आमची गँग
एका बाजूस संपुर्णतः उद्ध्वस्त असलेले अवशेष विखुरलेले दिसले... तर दुसर्या बाजूस पाण्याचे रिकामे टाके नि बर्यापैंकी सुस्थितीत असलेले धान्याचे कोठार नजरेस पडले. .हे कोठार अगदी न चुकवण्यासारखे... या कोठाराचा शेवटचा अर्धा भाग हा डोंगरातच घुसवलेला आहे... आत प्रवेश करताच भक्कम अश्या दरवाज्यावरती दोन गजशिल्पे.. आणि पुढे मग एकात एक अशी कोठारे दिसतात.. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळतात असा उल्लेख नेटवर आढळतो.. आम्ही ती राख शोधण्याचा आळस केला कारण दरवाज्यातच आडोश्याला कुणीतरी चुल पेटवल्यानंतरची राख नजरेस पडली..
प्रचि ८: गडावरील तटबंदी
प्रचि ९ : धान्यकोठार
या कोठाराच्या बाजूनेच मग वरती जाणारी वाट पकडली.. इथून ते धान्य कोठार कसे डोंगरात घुसलेले आहे ते कळते..
प्रचि १०:
वरती आल्यावर एका बाजूस पडझडीचे बांधकाम दिसते.. तिथेच जीवाईदेवीचे पडझड झालेले मंदीर व वृंदावन आहे.. जल्ला गिरीची स्मरणशक्ती खुंटली होती का माहित नाही पण त्याला विचारुनसुद्धा त्याला असे काही बघितल्याचे आठवत नाही म्हणत होता.. साहाजिकच आमचे हे बघायचे राहीले
असो.. इथूनच आमचा ट्रेक जिथे संपणार होता त्या नाणेघाटाचे दर्शन झाले... अवाढव्य पठार नि उंचावलेला नानाचा अंगठा !! अप्रतिमच !!
प्रचि ११:
प्रचि १२:
एव्हाना सगळ्यांचे घसे व्याकूळ झाले होते.. तेव्हा पाण्याच्या टाक्या सामोर्या आल्या नि योग्य टाकीची निवड करुन पाणी मनसोक्त पिउन घेतले.. रिकाम्या होत चाललेल्या बाटल्या भरुन घेतल्याने पुन्हा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नि आम्ही अगदी निर्धास्त झालो.. तिथेच मग एका ठिकाणी सावलीची जाग निवडून खादाडीचे सत्र सुरु केले.. बच्चाकंपनी सोबत असल्याने पहिल्यांदाच ट्रेकला 'कुरकुरे' खाल्ले..
खादाडी आटपून आम्ही पश्चिमेकडील भागाकडे खाली उतरणार्या वाटेकडे वळलो.. तिथे एक पाउलवाट 'जीवधन'ची ओळख पटवून देण्यास हातभर लावणार्या 'खडापारसी' (वानरलिंगी) नामक सुळक्याचे दर्शन घडवण्यासाठी घेउन जाते.. एरवी दुरुन करंगळी वाटणारा हा सुळका फक्त बघूनच डोळ्यांची बुबुळे फिरतील असा भारीच रांगडा वाटत होता..
प्रचि १३:
काही हौशीलोक्स या टोकावरून त्या सुळक्याच्या माथ्यापर्यंत अशी व्हॅलीक्रॉसिंगदेखिल करतात !! इथे नुसते उभे राहून त्या सुळक्याकडे कितीही पाहत बसले तरी समाधान होत नव्हते.. इथूनच थेट त्या डोकावणार्या सुळक्यावर उडी मारुन जावे असे राहून राहून वाटत होते.. शेवटी घेतलीच एक उडी..
प्रचि १४:
याच सुळक्याच्या पाठीमागे दुर्ग ढाकोबा, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड अशी भव्यदिव्य डोंगररांगसुद्धा दिसत होती..
आम्ही माघारी फिरलो नि इतरत्र विखुरलेले भग्नावशेष पाहत आम्ही जीवधनच्या पश्चिमेकडून उतरणार्या वाटेवर पोहोचलो.. 'कल्याण दरवाजा'.. इंग्रजांनी अगदी सुरुंग लावून वाट कितीही निखळून टाकली असली वा दरवाजा बुजवण्याचा प्रयत्न केलेला असला तरीही अतिशय भक्कम नि अजुनही सुस्थितीत असणार्या बुरुजांमध्ये लपलेला हा दरवाजा अजुनही आपले अस्तित्व टिकून आहे.. काय कल्पकता असावी.. इथून थेट नाणेघाटाच्या मुख्य व्यापारी मार्गावर नजर रोखली जाते..
प्रचि १५:
प्रचि १६:
प्रचि १७: बुजलेला दरवाजा
दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर इंग्रजांच्या कृपेमुळे छोटा आठ-दहा फुटी कातळटप्पा लागतो.. अगदी धोकादायक नाही पण काळजीपुर्वक उतरणे आवश्यक असा हा टप्पा.. पकडीसाठी इथेही काहीठिकाणी खोबणी केलेल्या आहेत.. तरीसुद्धा कसरत करुन उतरावे लागणार हे पक्के होते.. त्यात ज्युनिअर बच्चाकंपनी होती.. त्यांना तर उतरण्याची घाईच लागलेली होती.. आतापर्यंत प्रत्येक गोष्ट ते उत्सुकतेने घाईघाईतच करत होते.. अगदी त्यांच्या वयाला साजेसे.. पण त्यांच्यावर नजर ठेवण्याची आमची जबाबदारी मात्र तितकीच वाढलेली.. अपेक्षेप्रमाणे कसलीही खरचट अंगावर न घेताच आम्ही हा टप्पा पार केला..
प्रचि १८:
इथेही मग कोरलेल्या पायर्यांची जी वाट लागते तीने उतरुन जीवधनच्या माथ्यावरुन आपण खाली येतो... पुढे हीच वाट डावीकडे वळून त्या खडापारसी/वानरलिंगी सुळक्याच्या दिशेने जाते.. पण गिरिसाहेबांनी नाणेघाटासाठी खालून वाट जाते असे सांगितले नि ग्रुप त्या वाटेला सोडून खाली सरकला.. दुर्दैवाने इथेपण 'जो'च आघाडीवर होता.. नि आम्ही पकडलेली वाट पुढे दरीमध्ये उडी घेत असल्याने पुन्हा पंधरा- वीस फूट वरती चढून यावे लागले.. असे उगाचचे वर-खाली झाले की कसला त्रास होतो हे 'जो'च सांगेल.. त्याच्यापाठोपाठ बच्चाकंपनी नि विन्या पण गेल्याने सगळे वैतागून वरती आले.. फोटो काढण्यासाठी मागे राहिल्याने मी मात्र सुदैवी !
तिथेच मग आलेल्या दोघा-तिघांच्या टोळीला विचारले नि आम्ही त्या सुळक्याच्या दिशेने जाणारी वाट पकडली.. वाट अगदी जीवधनच्या भिंतीच्या कडेकडेने जाते.. त्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा आहे जिथे काहीजण मुक्कामदेखील करतात.... आम्हाला अजुन नाणेघाट बघायचा असल्याने तिथे जाण्याचे टाळून आम्ही त्या वाटेवरुनच एक खाली उतरणारी वाट पकडली.. नि पुन्हा इथेही चक्क कोरलेल्या पायर्या...!! आतापर्यंत पाहिलेले 'जीवधन'च हे रुप खरंच अचंबित करणारं होतं...
प्रचि १९ :
प्रचि २०:
प्रचि २१:
पायर्यांची वाट संपली की पुन्हा जंगलातील सफर चालू होते.. उन्हाळ्यातही या जंगलाचा हरितपटटा अगदी उठून दिसत होता.. या जंगलातून उतरणीची वाट संपवून आम्ही एकदाचे नाणेघाट पठारावर आलो.. आता मात्र आकाशातील सुर्यदेवांना ढगांनी चांगलेच ग्रासले होते.. मागे वळून पाहिले तर जीवधन किल्ला खरच नाणेघाटचा 'बॉडीगार्ड' वाटत होता.. प्राचीन नाणेघाटच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणार्थच ह्या किल्ल्याची निर्मिती झाली होती..हा 'जीवधन' म्हणजे अगदी सुळक्यांची आयुधे जवळ बाळगून हात-पाय पसरुन जणू हिरव्या गालिच्यावर बसल्याचे वाटत होता.. !!
प्रचि २२:
प्रचि २३: 'जीवधन'
ढगाळ वातावरणास सुरवात झाली होती.. ढगांच्या सावलीमध्ये अवतीभवतीचे डोंगर अगदीच आकर्षक वाटू लागले.. हवेचादेखील जोर वाढू लागला.. नि आमची पावले झपाझप नाणेघाटच्या प्राचीन सातवाहनकालिन व्यापारी मार्गाच्या दिशेने पडू लागली... नाणेघाट बघून गाडीने थेट परतीचा रस्ता पत्करावा यासाठी गिरी, विन्या व श्रेयस घाटघरच्या दिशेने गेले जिथे गाडी पार्क केली होती..
प्रचि २४:
त्या पठारावरील विद्युतवाहक टॉवरदेखील वीजप्रवाह वाहून नेताना तारांमधून येणार्या आवाजामुळे लक्ष वेधून घेत होते.. त्यांना पार करुन आम्ही एकदाचे नानाच्या अंगठयाजवळ पोहोचलो.. दुरुन अंगठा दाखवणारा हा भाग प्रत्यक्षात जवळून मात्र भयाण वाटतो.. सरळ आकाशात भिडू पाहणार्या या डोंगराचा कातळ नि तिथून दिसणारी खोली प्रत्यक्षातच अनुभवावी अशी.. ! सुसाट वारा होता हे सांगणे नकोच..
प्रचि २५:
(अस्मादीक अंगठा पाहताना, फोटो by जो)
इथूनच मग आम्ही तो अंगठा न चढता त्या व्यापारी मार्गाजवळ गेलो... हा व्यापारी मार्ग म्हणजे दोन पहाडांमधील अरुंद नळीच.. वाटेच्या सुरवातीला एका बाजूस छोटया गुहेत शेंदुर फासलेली गणेशमुर्ती आहे तर दुसर्या बाजूस दगडी रांजण ज्यात पुर्वी जकात कर म्हणून तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात.. पुढे नळीतून आणखी खाली उतरले की डावीकडे असणारी भव्य दिव्य गुहा नि गुहेतील तिन्ही भिंतीवर असणारे ब्राम्ही लिपीतले लेख... गुहेच्या तोंडाजवळच खोदलेल्या पाण्याच्या तीन- चार टाक्या.. नि ह्या गुहेच्या अगदी समोरच्या कातळातदेखील असणार्या दोन- तीन गुहा... सारे काही अगदी बिनतोडीचे ! अगदी अफाट !
प्रचि २६:
प्रचि २७:
प्रचि २८:
प्रचि २९:
प्रचि ३०:
आता बरीच डागडुजी केलेली आहे.. गुहेला दरवाजे, पाण्याच्या टाक्यांसाठी पायर्या इत्यादी.. पण या भागाचा रौद्रपणा काही कमी होत नाही.. आम्ही गुहेच्या तोंडावरच क्षणभर बसलो.. म्हटले ढगांची भेट झालीच नाही.. थोडा पाउस झाला असता तर बरे झाले असते... नि खरच आम्ही त्या नळीतून बाहेर येइपर्यंत ढगांनी आकाशाचा संपुर्ण ताबा घेतला... सुसाट वारा सैरभैर पळू लागला.. आता सरी कोसळणारच असे चिन्ह दिसू लागले...
प्रचि ३१:
आम्ही मात्र हे सगळे सुरु असताना कलिंगड खाण्यात मग्न होतो... ट्रेकमध्ये खाण्यासाठी फळे घेउन ये असे गिरी म्हणाला होता.. मी सरळ 'कलिंगड'च उचलून आणले होते ! गाडी असेल तर जल्ला काय पण नेता येते, कुठेपण खादाडता येते... नि अश्या जागेवर बसून कलिंगड खाण्याची मजा काही औरच...
प्रचि ३२ :
प्रचि ३३ :
प्रचि ३४: प्राचिनकाली नाणेघाटच्या या मार्गावरून बैल, घोडयांवरुन मालवाहतुक चालायची.. नि आता !
सायंकाळचे पाच साडेपाच वाजत आले होते पण चांगलेच अंधारुन आले होते.. तेव्हा पाउस बरसण्याआधीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो.. एव्हाना गाडीत विन्याचे पिल्लू अगदी डाराडूर झाले होते.. तर ज्युनिअर गिरीविहारचे शेवटी शेवटी पाय गळाले होते.. पण दोघांनी संपुर्ण ट्रेकमध्ये पाय दुखताहेत, कंटाळा आला इत्यादी कुठल्याही नाराजीचा सूर लावला नाही हेच खूप कौतुकास्पद..
एकंदर कातळकडयांवरील कणखर असा 'जीवधन' नि सव्वादोन हजारोवर्षापुर्वीचा व्यापरी मार्ग म्हणून ख्याती असलेला अप्रतिम 'नाणेघाट' यांच्या भेटीने मन तृप्त झाले होतेच.. त्यात परतीच्या वाटेत माळशेज घाटात उत्तुंग पहाडांच्या पार्श्वभुमीवर नभपटलात वीजांनी मांडलेले सुंदर नक्षीकाम नि चिंब धारांचा वर्षाव करत ढगांनी स्विकारलेले आमंत्रण.. आणखी काय हवे..! इति उन्हाळी हंगामाची अखेर 'जीवधन ते नाणेघाट' ह्या सुंदरश्या ट्रेकमुळे 'अविस्मरणीय' ठरली.. आता मात्र वेध पावसाळी भटकंतीचे !!
मस्त फोटोज आणि वर्णन. विन्या
मस्त फोटोज आणि वर्णन.
विन्या आणि गिरीविहारसाठी , तुम्ही तुमच्या मुलांना ट्रेकसाठी घेऊन गेलात ही गोष्ट खरचं कौतुकास्पद आहे, पण मुलांना ट्रेकला नेण्यापुर्वी त्याट्रेकची तुम्हाला पुर्ण माहीती असायला हवी.
मस्त वर्णन आणी फोटो.
मस्त वर्णन आणी फोटो.
वा! नाणेघाटाची स्वाभाविक,
वा! नाणेघाटाची स्वाभाविक, भौगोलिक रौनक साक्षात उभी करणारी फोटोग्राफी.
आवडली हे वेगळ्याने सांगणे जरूर नाही.
मस्त फोटो आणि छान वर्णन.. !
मस्त फोटो आणि छान वर्णन.. !
सह्हीच रे तुझा वृतांत
सह्हीच रे
तुझा वृतांत वाचताना सोबत ट्रेक करत असल्याची जाणीव होते त्यामुळे माझाही जिवधन ट्रेक झाला.
प्रचि १३, १५ आणि १६ विशेष आवडले.
कालच संध्याकाळी कट्ट्यावर या
कालच संध्याकाळी कट्ट्यावर या ट्रेकचा वृ कुठाय म्हणून आरडून आलो नि आत्ता सकाली हा गांवला. मस्त्त प्रचि व मस्त वर्णन!!
मुलांना न्यायला खरंच धम्माल येते. आपण त्यांची काळजी करीत बसतो आणि ती वासरं कानांत वारा शिरल्यागत डोंगरात उनाडतात. वर घरी आल्यावर आपण पाय दाबत बसावे तर ह्यांचे परत क्रिकेट वगैरे धिंगाणा-खेळ सुरु झालेले असतात.
यो मस्त व्रुत्तांत... जल्ला
यो मस्त व्रुत्तांत...
जल्ला गिरीची स्मरणशक्ती खुंटली होती का माहित नाही पण त्याला विचारुनसुद्धा त्याला असे काही बघितल्याचे आठवत नाही म्हणत होता.. >>>> जल्ला तू कधी मला विचारलं... धांन्य कोठाराकडुन तुम्ही सरळ पाण्याच्या टाक्याकडे धावत सुटलात...
मस्त रे योरॉक्स्या...
मस्त रे योरॉक्स्या...
मस्तच रे सरळ खाली उतरला
मस्तच रे
सरळ खाली उतरला असतात , तर मुरबाड कल्याण मार्गे आला असतात .
असो तुला माहित असेलच . असा उलटा नाणेघाट करायला पण मजा येते
सुप्पर
सुप्पर
हेमला अनुमोदन…माबोच्या
हेमला अनुमोदन…माबोच्या पावसाळी लेखनमय सफरीचा शुभारंभ धडाक्यात झाला आहे. फोटोज खासच आहेत. आणि विन्याचा पोरगा खरंच खूप गोड आहे !! एवढी चुकामुक होऊनही ज्युवि आणि ज्युगि आरामात होते हे तू फेसबुकवर टाकलेल्या दोघांच्या फोटोवरून दिसून आलं… बाबा आणि समस्त दादा / काकांच्या वळणावर जाणारेत कार्टी !!!
सरळ खाली उतरला असतात , तर
सरळ खाली उतरला असतात , तर मुरबाड कल्याण मार्गे आला असतात .
असो तुला माहित असेलच . असा उलटा नाणेघाट करायला पण मजा येते
..
आणि त्या होंडा सिटीचं कांय करायचं..?
मस्त प्रचि झकास लेख जल्ला
मस्त प्रचि झकास लेख जल्ला एकच उडीबाबा पोर खय गेलीत
तुझा वृतांत वाचताना सोबत
तुझा वृतांत वाचताना सोबत ट्रेक करत असल्याची जाणीव होते त्यामुळे माझाही जिवधन ट्रेक झाला. > +१
त्या होंडा सिटीचं कांय करायचं..? >> होंडाला टाळं लावायच नी खाली सिटीत यायच... हाकानीका
धन्यवाद ! आणि त्या होंडा
धन्यवाद !
आणि त्या होंडा सिटीचं कांय करायचं..? >> .. आणि प्रसन्ना.. खरे तर या परिसरात फिरायचे तर स्वतःचे वाहन असणे जास्त सोयिस्कर.. तिथून कल्याणसाठी लिफ्ट मागताना खूप थकबाकी होते.. वेळही फुकट जातो..
मुलांना न्यायला खरंच धम्माल येते. आपण त्यांची काळजी करीत बसतो आणि ती वासरं कानांत वारा शिरल्यागत डोंगरात उनाडतात. वर घरी आल्यावर आपण पाय दाबत बसावे तर ह्यांचे परत क्रिकेट वगैरे धिंगाणा-खेळ सुरु झालेले असतात.>> +१
ए गिरी.. तू गपच..
श्री.. अरे माहिती होतीच.. पण वरती चढताना अगदी ठळक वाट नाहीये त्यामुळे पाच सहा वर्षापुर्वी याच वाटेने जाउन आलेला गिरी चाचपला... जाउदे तसेही वय झालेय त्याचे...
मस्त प्रचि आणि लेखनही मस्तच
मस्त प्रचि आणि लेखनही मस्तच नेहमीप्रमाणे
योग्या, मस्त प्रचि, वर्णन!
योग्या, मस्त प्रचि, वर्णन!
नेहमी प्रमाणेच थरारकता!
थरारक !
थरारक !
जिप्सीचा ऋतूबदल तुमच्याही
जिप्सीचा ऋतूबदल तुमच्याही लख्ख उन्हाळ्याशेवटी आलाय.
मस्त लेख अन प्रचि.
नेहेमीप्रमाणेच "कुरकुरीत"
नेहेमीप्रमाणेच "कुरकुरीत" वृत्तांत - सर्व फोटोही भारीचेत.
प्रचि १२ आणि १५ कमाल आलेत!!
प्रचि १२ आणि १५ कमाल आलेत!! जस्ट सुपर्ब!!!
निवांत वाचेन वर्णन..
इकडे मी पावसात गेलो आहे पण
इकडे मी पावसात गेलो आहे पण Yo. Rocks तुमच्या लेखनाच्या अंगाने उडी घेऊन जायला फारच मजा येते .पावसाळी वर्णनाची वाट पाहातोय .
लय भारी !! एवढ्याश्या पोरांनी
लय भारी !!
एवढ्याश्या पोरांनी एतक्या भर उन्हाळ्यात ट्रेक केला म्हणजे कमालच झाली !!
बालमावळ्यांचे अभिनंदन. यो,
बालमावळ्यांचे अभिनंदन. यो, चटकदार वृत्तांत आणि मनमोहक प्र.चि.
धन्यवाद पावसाळी वर्णनाची वाट
धन्यवाद
पावसाळी वर्णनाची वाट पाहातोय .>> आम्ही ट्रेकची
विन्याने त्याच्या पिल्लुला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून ट्रेकला घेउन जाण्याचे प्रॉमिस दिले होते.. विन्याचे पिल्लू - श्रेयोस येतोय तेव्हा मी पण येणार असा ज्यु. गिरीविहारचा हटट.. त्यानिमित्ताने बच्चाकंपनीचा आमच्यासोबत ट्रेक झाला!
मस्तच रे योग्या!! सही चाल्लीय
मस्तच रे योग्या!! सही चाल्लीय भटकंती
मस्त फोटोज आणि वर्णन......
मस्त फोटोज आणि वर्णन......
आणि यो… माबोकरांच्या वतीने
आणि यो… माबोकरांच्या वतीने कळकळीची विनंती आहे….
ज्यूवि आणि ज्युगि चा दादा / काका आधीच झालोय…आता ज्युयो चा दादा / काका व्हायची संधी द्या राव !! किती दिवस वाट बघायची नव्या ट्रेकरची….:-) तथास्तु म्हणा आता...:-)
लई भारी
लई भारी
पावसाळयात या पायऱ्या आणि तो
पावसाळयात या पायऱ्या आणि तो खडक घसरडे होतात अगदी धोकादायक .मुलांना त्यावेळी राजमाचीला न्या .
Pages