आनंदवनातल्या रहिवाशांसाठी पुस्तकांची आवश्यकता आहे.
आनंदवनात 'स्नेहसावली' हा कुष्ठरुग्णांचा वृद्धाश्रम आहे. इथे साधारण ६५० ज्येष्ठ कुष्ठरुग्ण राहतात. शिवाय आनंदवनात मुकबधिरांसाठी व सुदृढ मुलांसाठी शाळा आहेत. आनंदवनातल्या या रहिवाशांसाठी सुसज्ज ग्रंथालय असावं, अशी इच्छा आहे.
यासाठी घरातली जुनी किंवा नवीन पुस्तकं देणगी म्हणून मिळू शकतील का? पुस्तकांना विषयाचं, किंवा वयोगटाचं बंधन नाही. 'लोकप्रभा', 'सा. सकाळ', 'अनुभव', 'माहेर', 'मेनका', 'तनिष्का', 'चित्रलेखा' अशा मासिकांची वर्गणी आनंदवनासाठी भरून ही मासिकं तिथे नियमितपणे मिळण्याची व्यवस्थाही करता येईल.
बाबा आणि साधनाताईंनी आनंदवनाची स्थापना केली, त्याला आता बासष्ट वर्षं पूर्ण झाली. चौदा रुपये, सहा कुष्ठरुग्ण, एक लंगडी गाय आणि दुर्दम्य इच्छाशक्ती एवढीच संपत्ती या दोघांकडे तेव्हा होती. ’येथे सेवेचे रामायण लिहिले जाईल’ असा आशीर्वाद विनोबा भाव्यांनी बाबांना आणि साधनाताईंना आनंदवनाच्या पायाभरणीच्या वेळी दिला होता. आज सहा दशकांनंतर विनोबांचं आशीर्वचन किती खरं ठरलं, याचा प्रत्यय येतो.
१९४९ साली बाबांनी आनंदवनाची स्थापना केली. आज आनंदवनात उपचार सुरू असलेले व बरे झालेले ३००० कुष्ठरुग्ण व २००० अपंग, मूकबधिर, अंध व आदिवासी राहतात. मूकबधिर, अंध यांसाठी निवासी शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रुग्णालयं, कृत्रिम अवयव केंद्र आनंदवनात आहेत. आनंदवनातला प्रत्येकजण स्वत: श्रम करून आपली उपजीविका करतो. आनंदवनात पॉवरलुम्स, छापखाने आहेत. सुतारकाम, फॅब्रिकेशन, हस्तव्यवसाय यांत पारंगत असलेले अनेकजण इथे कपडे, स्टेशनरी, कपाटं तयार करतात. मीठ, साखर, अमृत अशा काही गोष्टी सोडता बहुतेक सर्व वस्तू आनंदवनातच निर्माण केल्या जातात. आनंदवनातली प्रत्येक इमारत तिथल्या रहिवाशांनीच बांधली आहे.