बाबा आणि साधनाताईंनी आनंदवनाची स्थापना केली, त्याला आता बासष्ट वर्षं पूर्ण झाली. चौदा रुपये, सहा कुष्ठरुग्ण, एक लंगडी गाय आणि दुर्दम्य इच्छाशक्ती एवढीच संपत्ती या दोघांकडे तेव्हा होती. ’येथे सेवेचे रामायण लिहिले जाईल’ असा आशीर्वाद विनोबा भाव्यांनी बाबांना आणि साधनाताईंना आनंदवनाच्या पायाभरणीच्या वेळी दिला होता. आज सहा दशकांनंतर विनोबांचं आशीर्वचन किती खरं ठरलं, याचा प्रत्यय येतो.
१९४९ साली पडीक जमिनीच्या तुकड्यावर कुष्ठरुग्णांचं हे उपचार-प्रशिक्षण-पुनर्वसन केंद्र सुरू झालं. पुढे अंध, अपंग, मूकबधिर यांनाही आनंदवनानं सामावून घेतलं. इतकंच नव्हे, तर अनाथ, ज्येष्ठ नागरीक, आदिवासी अशा समाजातल्या गरजू, पण दुर्लक्षित घटकांसाठीही अनेक प्रकल्प उभे राहिले. आनंदवनवासीय स्वावलंबी, स्वयंपूर्ण असावेत, यासाठी बाबांनी ’श्रम ही है श्रीराम हमारा’ हा नारा दिला. स्वावलंबी समाजव्यवस्था रूजावी म्हणून बाबांनी, विकासकाकांनी अनेक अभिनव प्रकल्प सुरू केले. आज केवळ आनंदवनच नव्हे, तर सोमनाथ, हेमलकसा आणि इतर अनेक छोटे प्रकल्प सामाजिक आणि रचनात्मक कार्यात नवनवीन मापदंड प्रस्थापित करत आहेत. आनंदवनामुळं प्रेरित होऊन आज अनेक कार्यकर्ते देशाच्या कानाकोपर्यांत दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी प्रयत्नशील आहेत.
’महारोगी सेवा समिती’ अनेक संकटांना तोंड देत कुष्ठरुग्णांच्या, अपंगांच्या सशक्तीकरणासाठी अव्याहतपणे झटत आहे. समाज कुष्ठरुग्णांना, अपंगांना सामावून घेत नाही, ही मुख्य अडचण. शरीराला झालेला कुष्ठरोग बरा करता येतो, मनाला झालेल्या कुष्ठरोगाचं काय? बरे झालेले कुष्ठरोगी, सक्षम झालेले अपंग समाज सामावून घेत नाही, हे दुर्दैव आहे. शिवाय सरकारी आकडेवारीनुसार कुष्ठरोग आता जवळपास नाहीसाच झाला आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरून कुष्ठरुग्णांसाठी संशोधन, पुनर्वसन यांपैकी काहीच होत नाही. नवे कुष्ठरुग्ण मात्र आनंदवनात उपचारांसाठी येतच असतात. शासनाकडून मिळणारं अनुदानही अतिशय अपुरं आहे. उदाहरणार्थ, आनंदवनातल्या १२०० पुनर्वसित कुष्ठरुग्णांसाठी प्रति माणशी दररोज मिळणारं अनुदान आहे रुपये १५ फक्त. या पंधरा रुपयांत दोन वेळचं जेवण, चहा, औषधं, शिवाय कपडे, प्रवासखर्च, घरांची डागडुजी एवढं संस्थेनं करणं अपेक्षित आहे! आज पंधरा रुपयांत एक वेळचं जेवणसुद्धा होऊ शकत नाही. याशिवाय संस्थेतील इतर पुनर्वसित कुष्ठरुग्ण आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या इतर ११०० व्यक्तींना कुठलंच शासकीय अनुदान मिळत नाही. कोणत्याही इतर योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही. हे झालं आनंदवनाबद्दल. सोमनाथ, मूळगव्हाण इथल्या प्रकल्पांचे खर्च वेगळे. 'महारोगी सेवा समितीला' प्रत्येक महिन्याला साधारण सत्तर लाख रुपयांचा निधी लागतो. औषधं, जेवण हे खर्च भागवणं सर्वांत महत्त्वाचं. ही रक्कम दर महिन्याला उभी करणं खूप कठीण असतं. कार्यकर्त्यांचा प्रचंड वेळ हा निधी उभा करण्यातच जातो.
आजवर हा खर्चाचा मोठा डोलारा सांभाळणं हे सामाजिक सद्भावना आणि आनंदवनाच्या उत्पादनानुगामी अर्थव्यवस्थेमुळं बर्याच प्रमाणात शक्य होत गेलं. परंतु आसर्याला येणार्यांचा वाढता ओघ, महागाई, अनुदानातली अनियमितता, सततचा दुष्काळ यांमुळे खर्च भागवणं हे खूपच अवघड होतं. साडेतीन हजार निवासी व्यक्तींचं हे कुटुंब किती आघाड्यांवर रोज लढत असेल, याची कल्पनाही करवत नाही.
संस्थेत अजूनही रोज नव्या सदस्यांची भर पडते. कोणालाही प्रवेश नाकारायचा नाही, हे व्रत संस्थेनं पाळलं आहे. या सततच्या आर्थिक काळजीमुळं अनेक नव्या योजना तयार असूनही त्या कृतीत आणणं शक्य होत नाही. खरं म्हणजे आज अशा संस्थांची, योजनांची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. दुर्बल घटकांना स्वत:च्या पायावर उभं करणं, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणं, गरजेचं आहे. लोकसशक्तीकरण करत असलेल्या या संस्था किती कार्यक्षम, प्रयोगशील आहेत, यावर देशातल्या मोठ्या बदलांचं भवितव्य अवलंबून आहे, आणि त्यासाठी समाजानं हातभार लावणं अत्यावश्यक आहे.
आज 'महारोगी सेवा समिती'च्या कार्यास शाश्वत स्वरूपाचं आर्थिक स्थैर्य लाभावं, यासाठी ५५ कोटी रुपयांचा एक निधी सामूहिक प्रयत्नांतून उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा निधी ३१ मार्च, २०१२ पर्यंतच उभा करता येणार आहे. रोजचे अनेक खर्च या निधीतून मिळणार्या व्याजाद्वारे भागू शकतील, शिवाय संस्थेचं भविष्यातलं आत्मनिर्भरतेचं स्वप्न तर पूर्ण होईलच, आणि केवळ आर्थिक समस्यांमुळं न पेलू शकणारी समाजातली अनेकविध नवी आव्हानं स्वीकारण्यास संस्थेला बळ मिळेल. उदाहरणार्थ, संस्थेत दरवर्षी होणार्या मोफत १५०० मोतिबिंदू शस्त्रक्रियांची संख्या ९०००पर्यंत वाढवता येईल, दरवर्षी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांच्या जमिनींवर होणारं जल आणि मृदसंधारणाचं काम शंभर कुटुंबांपर्यंत मर्यादित न ठेवता बाराशे कुटुंबांपर्यंत विस्तारता येईल, युवाग्राम प्रकल्पामार्फत शंभर बेरोजगार तरुणांना दिला जाणारा व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ पाचपटीनं वाढवता येईल.
आजवर ’महारोगी सेवा समिती’नं समाजाच्या आशीर्वादाच्या पाठिंब्यामुळंच इथवर मजल गाठली आहे. हा निधी उभा करण्याच्या कामीही समाज खंबीरपणे उभा राहील, अशी खात्री आहे. पंचावन्न कोटी रुपयांचा हा निधी ५५,००० व्यक्तींनी प्रत्येकी १०,००० रुपयांची मदत जरी पाठवली तरी उभा करणं सहज शक्य आहे. अर्थात अमुक इतकी रक्कमच आपण द्यावी, अशी काही अट नाही. आपण दिलेला एक रुपयासुद्धा संस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या निधीस दिलेल्या योगदानाला आयकर खात्याकडून कलम ३५ AC अंतर्गत १००% सूट मिळाली आहे. या निधीस दिलेल्या रकमेमुळं तुमचं आनंदवनाशी कायमचं नातं जुळणार आहे. तुम्ही दिलेल्या रकमेच्या व्याजाचा दरवर्षी वापर होणार आहे.
’महारोगी सेवा समिती’च्या पाठीशी आपण उभं राहाल, या विश्वासानं ’समाज प्रगती सहयोग निधी’च्या उभारणीस आपण हातभार लावावा, अशी आपल्याला विनंती करत आहोत.
आपल्या देणगीचे धनादेश ’महारोगी सेवा समिती, वरोरा’ या नावानं आपलं संपूर्ण नाव, पत्ता, ईमेल पत्ता आणि PAN (Permanent Account Number)सह कृपया खालील पत्त्यावर पाठवावेत -
सचिव,
महारोगी सेवा समिती, वरोरा
मु. पो. आनंदवन, ता, वरोरा, जि. चंद्रपूर
महाराष्ट्र
पिन - ४४२ ९१४
दूरध्वनी क्र - (०७१७६) २८२०३४
मोबाइल - ९०११० ९४६२३
ईमेल - vikasamte@anandwan.in
अधिक माहितीसाठी कृपया http://anandwan.in/help-needed.html हा दुवा पाहा.
तसंच धनादेशाचं विवरण आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि PANसहीत वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर / मोबाइल क्रमांकावर कृपया कळवावे. या निधीची पावती धनादेश मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत आपल्याला मिळेल. या निधीचा सदुपयोग कसा होतो आहे, याबद्दल आनंदवन परिवार वेळोवेळी आपल्याला कळवेलच.
धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स.
माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स.
'महारोगी सेवा समितीला'
'महारोगी सेवा समितीला' प्रत्येक महिन्याला साधारण सत्तर लाख रुपयांचा निधी लागतो. औषधं, जेवण हे खर्च भागवणं सर्वांत महत्त्वाचं.
ही रक्कम जास्त वातते आहे. कुष्ठरोगाची औषधे सरकार मोफत पुरवू शकते. आणि तेही आनंदाने पुरवते. जेवणाबद्दल माहीत नाही.
जामोप्या, 'महारोगी सेवा
जामोप्या,
'महारोगी सेवा समिती'चे आनंदवन, सोमनाथ, मूळगव्हाण हे ग्रामीण भागातले तीन महत्त्वाचे प्रकल्प आहेत. कुष्ठरोग्यांशिवाय अंध, अपंग, ज्येष्ठ नागरीक, लहान मुलंही या प्रकल्पांत आहेत. वर दिलेला हा आकडा हा तीनही प्रकल्पांच्या खर्चाचा एकत्रित आकडा आहे. जेवण, औषधोपचार, कपडे, निवारा, प्रवास यांवर बहुतेक सगळी रक्कम खर्च होते.
संस्थेचा सर्व कारभार हा अतिशय पारदर्शक आहे. काही शंका असल्यास तुम्ही अवश्य खातरजमा करू शकता.
चांगली माहिती चिनूक्स.
चांगली माहिती चिनूक्स. धन्यवाद. http://www.anandwan.in/help-needed.html ही त्यांचीच साईट आहे का?
अरुंधती, तू दिलेलं संकेतस्थळ
अरुंधती,
तू दिलेलं संकेतस्थळ हे आनंदवनाचं अधिकृत आहे. आनंदवनाला कशा प्रकारे मदत करता येईल, याची सर्व माहिती तिथे आहे.
हा वरचा मजकूर तू ईमेलीद्वारे प्रसारित केलास तरी हरकत नाही.
हो, हो, म्हणूनच विचारलं! अगदी
हो, हो, म्हणूनच विचारलं! अगदी प्रत्येक वाचकाने आपल्या ब्लॉग/ फेबु/ ट्वीटरवर जरी त्याची लिंक दिली तरी आणखी खूप लोकांपर्यंत पोहोचता येतं... म्हणूनच विचारलं.
थँक्स चिन्मय. फेबुवर देखील वेळोवेळी त्यांची लिंक पोस्ट करून प्रसार करता येतोय, हे चांगले आहे. आता माझ्या सर्व मित्रमंडळींना पाठवते संदेश.
माहितीबद्दल धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद चिनूक्स.
अरुंधतीने दिलेल्या साइटवर NEFT/RTGS द्वारे त्यांच्या खात्यात सरळ पैसे जमा करण्यासाठी लागणारी माहिती उपलब्ध आहे. परदेशातूनही
FCRA खात्यात पैसे जमा करता येतील.
ज्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन थर्ड पार्टी ट्रान्सफरची सुविधा आहे त्यांना हे जास्त सोयीस्कर आहे.
अरुंधती, भरत मयेकर, मनःपूर्वक
अरुंधती, भरत मयेकर,
मनःपूर्वक धन्यवाद.
ऑनलाइन पैसे कसे भरायचे, याची मयेकरांनी लिहिल्याप्रमाणे संकेतस्थळावर माहिती आहे. पैसे भरल्यानंतर तुम्ही दिलेली रक्कम ही शाश्वत निधीसाठी आहे, याची माहिती कृपया समितीला द्यावी.
कुष्ठरुग्णाचा दर महिन्याचा बॅंडेजचा खर्च शंभर रुपये असतो. एका कुष्ठरुग्णाचा वर्षाचा जेवणाचा आणि कपड्यांचा खर्च चौदा हजार रुपये होतो. तुम्ही दिलेल्या देणगीतून अशा प्रकारचे खर्च दरवर्षी भागवता येतील.
या निधीचं वैशिष्ट्य म्हणजे 'महारोगी सेवा समिती' ही संस्था जरी यदाकदाचित बंद झाली, तरी हा निधी वाया जाणार नाही. शासन हा शाश्वत निधी ताब्यात घेऊन इतर सामाजिक कार्यांसाठी त्याचा वापर करेल.
चिनूक्स शीर्षकात आनंदवनाचा
चिनूक्स शीर्षकात आनंदवनाचा उल्लेख केला तर हा धागा जास्त वाचला जाईल.
माहितीबद्दल आभार.
माहितीबद्दल आभार.
६०+ वर्षांचा अनुभव आहे म्हणजे
६०+ वर्षांचा अनुभव आहे म्हणजे तुम्ही नक्कीच आधी प्रयत्न केलाच असेल तरी मला वाटले म्हणुन काही सुचवु इच्छिते
१. दगडुशेठ गणपती ट्रस्ट
२.शिर्डी ट्र्स्ट
३.लालबागचा राजा इत्यादी
४. काही कामे जिल्ह्याधिकार्यांमार्फत खासदार किंवा आमदार निधीतुन करता येतात तो खर्च वाचवता येउ शकेल
५.अनुसुचित जाती,जमाती,भटक्या विमुक्त जाती जमाती,आदीवासी ,अल्प्सम्ख्यांक यांच्या साठी काही funds असतात. जर प्रकल्पात असे लोक असतील तर ते सरकारीनिधी योग्य त्या मार्गाने followup केल्यास मिळु शकतील का हे चाचपुन बघता येइल (थोदे किचकट आहे )
६.बर्याच वेळा रोजगार हमीचा निधी न वापरता परत जातो मुख्यत्वे शेती जलसम्धारणासाठी त्या निधीचा उपयोग तुमच्याशी संलग्न शेतकर्यांना मिळवुन देता आला तर बघा.
थोडा वादग्रस्त प्रश्न विचारत आहे, अनुचित वाटल्यास उडवुन टाका
मागे अविनाश भोसलेंनी आनंदवनाच्या कामाने प्रभावित होउन देणगी दिली होती .काही पत्रकारांनी (पत्रकार स्वतः फार धुतल्या तांदळाचे नसतात) "सो चुहे खाकर बिल्ली हज को चली" अशी त्याची संभावना केली आणि ती मदत नाकरली गेली, हे मला तरी पटले नाही . तो माणुस ज्या व्यवसायात काम करतो त्या व्यवसायाच्या काही अपरिहार्यता असतात, म्हणुन त्या माणसाचा हेतुच वाइट होता असे म्हणने कितपत योग्य आहे?
अनेक builders,CEO, श्रीमंत व्यावसायिक आयुष्याच्या एका टप्प्यावर पुरेसे पैसे मिळाल्यावर समाजसेवेसाठी पैसे देण्यास तयार असतात, ती मदत नाकारु नये.
"आपण दिलेला एक रुपयासुद्धा
"आपण दिलेला एक रुपयासुद्धा संस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे."
~ आवाहनातील ही भावना आवडली. दहा हजाराची रक्कम ज्याना देता येणे शक्य आहे ते देतीलच पण 'दहा हजारच' दिले पाहिजेत असा सूर पत्रकातून निघणे ठीक नव्हते. असो.
मला [यथाशक्ती] जी रक्कम या महान कार्यासाठी देता येईल ती मी देईनच; पण ती धनादेशद्वारेच दिली पाहिजे असे आजच्या 'इलेक्ट्रोनिक' युगाचा विचार केला तर गरजेचे आहे काय असे मनी येत आहे. कारण वरोर्याच्या आयसीआयसीआय बँकेत जर 'आनंदवन' चे खाते असेल तर मी इथून [कोल्हापूर] 'कॅश' भरून एक मिनिटीत पैसे तिकडे ट्रान्स्फर करू शकतो, तेही कुठल्याही जादाच्या बॅन्क चार्जेसशिवाय. फार सोपी आहे ही पद्धत.
श्री.चिनूक्स यानी या संदर्भात आनंदवनच्या अकौंट्सला [श्री.विकास आमटे यांच्यामार्फत] विचारून शक्यता पडताळून पाहावी. ते शक्य नसल्यास मग तो रजिस्टर्ड पोस्टाने चेक पाठविणे ऑप्शन आहेच.
अशोक पाटील
Ashok. , वर प्रतिसादांमध्ये
Ashok. ,
वर प्रतिसादांमध्ये लिहिल्याप्रमाणे धनादेशच द्यायला हवा असं नाही. http://www.anandwan.in/help-needed.html इथे ऑनलाइन मनी ट्रान्स्फरीबद्दल माहिती आहे. आपण पैसे ऑनलाइन पाठवू शकता. फक्त पैसे पाठवल्यानंतर ते पैसे शाश्वत निधीसाठी पाठवले आहेत, याची फोन/इमेल करून संस्थेला कृपया माहिती द्या.
धन्यवाद.
शाश्वत निधी म्हणजे Corpus
शाश्वत निधी म्हणजे Corpus fund का? तिथे shashwat nidhi असं लिहायला लागू नये म्हणून विचारतेय (हसू नये). मी NEFT साठी त्यांना अॅड करतेय. बाकीचे डिटेल्स म्हणजे PAN, फोन नं कसा कळवू त्यांना?
अश्विनी, शाश्वत निधी म्हणजे
अश्विनी,
शाश्वत निधी म्हणजे corpus fund.
वर मसुद्यात मोबाइल क्रमांक आणि इमेल पत्ता दिला आहे. तिथे तू त्यांना कळवू शकशील.
बरं. ट्रान्स्फर झाले की
बरं. ट्रान्स्फर झाले की त्यांना इमेलमधून कळवते. धन्यवाद
NEFT ने पैसे पाठवताना
NEFT ने पैसे पाठवताना द्यायच्या डिटेल्सना ५० characters चे बंधन आहे. त्यामुळे तिथे नाव, पत्ता आणि पॅन इतक्या गोष्टी मावल्या नाहीत. त्यामुळे मी तिथे फक्त माझा इमेल आयडी दिला आणि इमेलने नाव, पत्ता, पॅनसोबत ट्रँझॅक्शन डिटेल्स (जे आपल्या बँक खात्यात दिसतात, किंवा व्यवहार पूर्ण झाल्यावरही मिळतात) ते दिले आहेत.
धन्यवाद भरत
धन्यवाद भरत
चिनुक्स ट्रान्स्फर केला तर
चिनुक्स ट्रान्स्फर केला तर निधीचा घोळ होउ शकतो का ? ऑफिसमधुन ट्रान्फर करता येत नाहीत. घरी गेल्यावर करते.
धन्यवाद चिन्मय, माहितीबद्दल.
धन्यवाद चिन्मय, माहितीबद्दल. जमेल तशी नक्की मदत करणार आहे.
महिती बद्दल आभारी आहे, ऑन
महिती बद्दल आभारी आहे, ऑन लाइन ट्रान्सफर करता येते, साइट वर लिंक आहे.
चिन्मय, छान लेख. आमेरिकेत्लि
चिन्मय,
छान लेख. आमेरिकेत्लि एक सन्स्था (Arpan Foundation) महरोगि सेवा समिति च्या कार्यला गेल्या १५ वर्शापासुन मदत करत आहे. त्याचा सम्पर्क ईथे दिला तर चालेल का? कौस्तुभ आनि विकास भाउ Arpan Foundation च्या सन्चालकाना चागले ओल्ख्तात. तसेच ह्या सन्थेचा अतिरिक्त भार (overhead) शुन्य आहे. आनि करमुक्त प्रमाण पत्र (501 (C)) पण अमेरिच्या देणगीदाराना हि सन्स्था पाथवते, कर भरताना हे US चे प्रमाण पत्र आसेल तर सोयिचे होइल.
माहितीबद्दल धन्यवाद
माहितीबद्दल धन्यवाद चिनुक्स.
माझाही खारीचा वाटा पाठवतोच.
धन्यवाद चिनूक्स, हा लेख ईथे
धन्यवाद चिनूक्स,
हा लेख ईथे लिहिल्याबद्दल... फूल ना फूलाची पाकळी म्हणुन जमेल तशी मदत कक्कीच करेन...
हा लेख अनेकांना फॉरवर्ड केला.
हा लेख अनेकांना फॉरवर्ड केला. एकांनी मला उलट टपाली प्रतिसाद दिलाय के ते स्वतः देणगी देतच आहेत, शिवाय आणखी दहा जणांकडून देणगी जमा करण्याचा त्यांचा संकल्प आहे!
चिन्मय Arpan Foundation किंवा
चिन्मय Arpan Foundation किंवा महाराष्ट्र foundation कडे पैसे पाठ्वताना काय उल्लेख करायचा ? शाश्वत निधीचा का ?
असामी, तिथे पैसे पाठवताना
असामी,
तिथे पैसे पाठवताना 'समाज प्रगती सहयोग निधी, आनंदवन' असा उल्लेख करता येईल.
http://anandwan.in/help-needed.html इथे तपशील आहेत. पैसे पाठवल्यानंतर कृपया इमेल करून तसं कळवशील का?
धन्यवाद.
अरुंधती,
मनःपूर्वक धन्यवाद
LAMarathi,
अर्पण फाउंडेशन मारत पैसे नक्की पाठवता येतील.
वर लेखात आता दुवा दिला आहे. धन्यवाद.
पैसे पाठवल्यानंतर कृपया इमेल
पैसे पाठवल्यानंतर कृपया इमेल करून तसं कळवशील का? >> हो. मी कंपनीचे matching contribution मिळते का ते बघतोय.
माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद.
चिन्मय, Arpan Foundation ला
चिन्मय,
Arpan Foundation ला चेक पाथवला आहे.
Pages