तस्वीर तरही गझल

(तस्वीर तरही) निष्पर्ण जाहले तुझ्याविना

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 18 February, 2013 - 17:54

तस्वीर तरही बद्दल मी आज वाचले. खरं तर माझी रचना टाकायला उशीर झालाय पण जमल्यास ह्या रचनेचाही विचार व्हावा.......धन्यवाद.

निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही
मी जगत राहिले पुन्हा पुन्हा, ऊन्मळले नाही

आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी
त्याचे कधीच मूक रुदन कोणा दिसले नाही

वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही
मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही

शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी
का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही

का पौर्णिमेस तारका नभी, येण्या आतुरती
रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही

जयश्री अंबासकर

(तस्वीर - तरही) खोळंबुनी सागरकिनारी

Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2013 - 05:43

या चित्रांनुसार ही गझल आहे.

खोळंबुनी सागरकिनारी वृक्षसुद्धा वाळतो
पण मी तुला भेटायचो ती वेळ अजुनी पाळतो

थोडेतरी पाणी दिसो विहिरीत यासाठी म्हणे
डोकावुनी तो आतमध्ये दोन अश्रू ढाळतो

सुटणार आता हात अन् होणार वाटा वेगळ्या
सांभाळ तू आता तुला मीही मला सांभाळतो

निर्व्याजतेवरती किती जमलेत थर कळते तिथे
शाळा बघितली की कुणी माझ्यातला ओशाळतो

घनगर्द आभाळात हे पैसे कुणाचे सांडले
रात्री भिकार्‍यासारखा मी चांदण्या न्याहाळतो

Subscribe to RSS - तस्वीर तरही गझल