उल्का, अशनी, डायनोसॉर्स आणि 'प्रिय अमुचा …'*
रात्री झोपताना छताकडे डोळे लावून झोपण्याची माझी सवय. आजही तसाच पडलो. नेहेमीप्रमाणे अंधारात छत कोठे अाहे हे पाहण्याच्या प्रयत्नात पापण्या जड होउन झोप लागेल ही अपेक्षा. पण अाज काही वेगळाच अनुभव येतोय. मी जे पाहातोय ते छत नाही, अथांग अंतराळ आहे. त्या काळ्या अवकाशात छोटे छोटे ठिपके; सोनेरी, लालसर, पांढुरके, निळसर. त्यातच एक फिकट ठिपका अगदी दिसेल न दिसेल असा. पण अाज तो मला अगदी स्पष्ट दिसतोय. इतर ताऱ्यांप्रमाणे हा ही एका जागी स्थिर नाही. प्रचंड वेगाने तो ठिपका अगदी थेट माझ्याकडेच धाव घेत अाहे हे मला ठाऊक अाहे.