वर्षा तुझे नाव
आकाश तुझे गाव
तुझ्या आगमनासाठी
आतुर सारा गाव
तुझ्या आगमनापूर्वी
आभाळ भरून येतात
गड गड आवाज करीत
सरी वाहू लागतात
मोत्यासारखा थेंब
जमिनीवर पडतो
काळ्या मातीत मग
सुगंध दरवळतो
बघता बघता पाऊस
जोर धरू लागतो
पिसारा फुलवून मग
मोर नाचू लागतो
सरी तुझ्या संपताच
आभाळ खुलून येतो
सोनेरी किरण पडताच
इंद्रधनुष्य दिसू लागतो
पुन्हा आभाळ भरताच
इंद्रधनुष्य नाहीसा होतो
तुझ्या आगमनासाठी सारा गाव
पुन्हा आतुर होतो.
-अनिकेत भांदककर
सुटला पहाट वारा
अंतरात सळसळ
मन सुगंधी सुगंधी
पसरला दरवळ
नको स्वप्नातून जाग
नको जाग इतक्यात
नीज हलके हलके
पुन्हा आली पापण्यात
कसा मुजोर हा वारा
रेंगाळला खिडकीशी
पावा मंजुळ मंजुळ
जणु कृष्णाचा कानाशी
मन सैरभैर झाले
वेडावले, खुळावले
कृष्ण रंगाने रंगाने
चिंब चिंब भिजवले
रेशमाच्या सोनसरी
आला सोबती घेऊन
ओला पाऊस पाऊस
ढगातून उतरून
सतरंगी झाले नभ
धरा पाचूने नटली
ऊन कोवळे कोवळे
पसरली गोड लाली
लाडानं पोसणार्या
मायेच्या सुरकुत्या
आता भेगा झाल्या
आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता
पदराचा ओचा आणि
धोतराचा सोगा
असतोच मुळी साऊंडप्रूफ
नभव्याकुळ डोळे
झालेत आता वॉटरप्रूफ
अँटी व्रिंकल्स अन
मॉईश्चराईजर्स
वापरणार्यांचा दावा
भेगांच काय येवढं?
क्रॅक क्रीम लावा !
तुमच्या व्रिंकल्स येवढ्या
भेगा काही खोल नाहीत
बाटली शिवाय पाण्याला
नी कुंडी शिवाय मातीला
तसंही इथे मोल नाही