नाविन्याची साद

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 19 November, 2012 - 22:48

सुटला पहाट वारा
अंतरात सळसळ
मन सुगंधी सुगंधी
पसरला दरवळ

नको स्वप्नातून जाग
नको जाग इतक्यात
नीज हलके हलके
पुन्हा आली पापण्यात

कसा मुजोर हा वारा
रेंगाळला खिडकीशी
पावा मंजुळ मंजुळ
जणु कृष्णाचा कानाशी

मन सैरभैर झाले
वेडावले, खुळावले
कृष्ण रंगाने रंगाने
चिंब चिंब भिजवले

रेशमाच्या सोनसरी
आला सोबती घेऊन
ओला पाऊस पाऊस
ढगातून उतरून

सतरंगी झाले नभ
धरा पाचूने नटली
ऊन कोवळे कोवळे
पसरली गोड लाली

आज सृष्टी देते हाळी
ऐक नाविन्याची साद
सुख दारात दारात
दे तयाला प्रतिसाद.

जयश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy

अप्रतिम -
...एकामागून एक सुंदर सुंदर कवितांची मेजवानी चालू आहे बहुतेक...... येउदेत, येउदेत...

शशांक Happy