अनुवाद क्षेत्रातील संधींचा परिचय करून देणाऱ्या संमेलनाचा वृत्तान्त

Submitted by पराग र. लोणकर on 26 March, 2025 - 01:19

अनुवादकांच्या एका सुंदर संमेलनात प्रकाशक म्हणून सहभागी होण्याची संधी मला नुकतीच मिळाली. त्या संमेलनाचा वृत्तान्त पुढे देत आहे. ज्या मंडळींना या क्षेत्रात काही काम करण्याची इच्छा असेल, त्यांना - कदाचित - काही उपयोग होऊ शकेल.
~

*नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलनाविषयी!*

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल, श्री गुरु गोबिंद सिंगजी अध्यासन संकुल आणि अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत, साहित्य भारती आयोजित तिसरे अखिल भारतीय अनुवादित मराठी साहित्य संमेलन नुकतेच दिनांक २२ व २३ मार्च २०२५ रोजी संपन्न झाले. यापूर्वीची दोन अनुवादक संमेलने पुण्यात संपन्न झाली असून, ‘स्वारातीम’ विद्यापीठात भाषांतरविषयक पदव्युत्तर प्रशिक्षण सुरू केले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हे तिसरे संमेलन विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या पुढाकारातून नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध अनुवादक श्री. रवींद्र गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते दिनांक २२ मार्च रोजी झाले. दोन पूर्ण दिवसांच्या या संमेलनात ‘मी आणि अनुवाद,’ ‘ग्रंथालये, वाचकांची अभिरुची आणि छापील पुस्तकांचे भविष्य,’ ‘भाषांतर संस्कृती,’ ‘अनुवादित साहित्य : वर्तमान आणि भविष्य,’ ‘भाषांतर अभ्यासक्रम : सद्यस्थिती आणि अपेक्षा,’ ‘मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी अपेक्षित कार्य,’ ‘मराठीतून अन्य भाषांत अनुवाद,’ अशा विविध विषयांवर अगदी सविस्तर चर्चा झाली. सर्वच सत्रांमधील वक्त्यांनी आपापल्या विषयावर खूप सुंदर चर्चा आणि मार्गदर्शन केले. त्या त्या वक्त्याचे त्या त्या विषयावरील प्रभुत्व, अनुभव आणि एकूणच अनुवाद क्षेत्राबद्दलचे त्यांचे निरीक्षण यातून श्रोत्यांना खूप काही शिकायला मिळाले.

छापील पुस्तकांच्या म्हणजेच साहित्यविश्वाबरोबरच इतर अनेक क्षेत्रात अनुवाद/भाषांतराच्या अजून कोणकोणत्या संधी आज उपलब्ध आहेत याबाबतही या संमेलनात चर्चा झाली. कोणत्याही एका भाषेवर चांगले प्रभुत्व आणि एखाद्या दुसऱ्या भाषेबद्दल पुरेशी माहिती असलेल्या प्रत्येकाने अशा प्रकारच्या अनुवादक संमेलनांत जरूर सहभाग घ्यायला हवा. एका सुंदर व्यावसायिक व आर्थिक उत्पन्नाच्या संधीचा परिचय यातून होऊ शकेल.

या संमेलनास महाराष्ट्रभरातील अनुवादक, लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल, व ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे मराठी, इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश अशा भाषाविभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक मंडळीही उपस्थित होती.

महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांचा विद्यापीठाच्या वतीने या संमेलनात विशेष सन्मान करण्यात आला. स्वर्गीय सुनील मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री. अनिल मेहता यांच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कारही या संमेलनात अनुवादक श्री. शिरीष सहस्रबुद्धे यांना प्रदान करण्यात आला. मराठी भाषा व अनुवादविषयक महत्त्वाच्या तरतुदी होण्याच्या दृष्टीने संमेलनात अनेक महत्वाचे ठराव संमत करण्यात आले.

आगामी अनुवादक संमेलन येत्या डिसेंबर मध्ये नाशिक येथे होण्याची शक्यता आहे. यापुढील काळात अनुवादाचे महत्त्व हे वाढतच जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची संमेलने ही काळाची गरज आहे.

Group content visibility: 
Use group defaults