सूर्योदय शब्द लिहिणे अज्ञानद्योतक नाही का?

Submitted by तुष्कीनागपुरी on 14 March, 2025 - 02:54

विज्ञानाचे शोध लागण्या आधी आसपासच्या गोष्टींचा मानवाने जमेल तसा तार्किक अर्थ लावून ते काय आहे आणि कसे चालत असेल याचा अंदाज आणि ठोकताळा घेतला आणि त्यावेळेस जे तर्काला पटेल आणि उपलब्ध माहितीवरून अधिक बरोबर वाटेल अशी उत्तरे तयार केली.
.
बरेचदा ही उत्तरे ज्यांना सुचली त्यांना ती कशी सुचली सांगता आले नसेल तेव्हा ती मला स्फुरली, किंवा मला स्वप्नात दिसली, किंवा सरळ मला देवाने सांगितली असे सांगणे सर्वात सोपे असेल म्हणून तसे सांगितले गेले. काही ग्रंथांमध्ये देखील ते लिहिले गेले. तेच मग सिद्धांत्त म्हणून सांगतिले जाऊ लागले शिकवले जाऊ लागले असे आपल्याला दिसते.
.
मुद्दा असा की वैज्ञानिक शोध लागण्याच्या आधी एखादी गोष्ट अनेक साहित्यकृतींमधे, कथा कवितांमधे निबंधांमधे उल्लेखली गेली असेल आणि ती वैज्ञानिक शोध लागल्यावर खोटी ठरली तर मग त्या संकल्पनेचे काय करायचे? ती जुन्या पोथ्यांमध्ये आहे तशीच राहू देऊन फक्त आता तसे नाही हे त्यावर लक्षात ठेवायचे की सगळीकडे तिचा वापर होतो तिथे जाऊन ते बदलायचे?
.
हा प्रश्न सोडवायला सोपा नाही. याचे एक उदाहरण मराठी गझल क्षेत्रात पाहायला मिळते. ही विधा मराठीत जन्माला आलेली नाही त्यामुळे तिचे नाव अलेक्झेंडर ला जसे आपल्या काही इतिहासकारांनी अलक्षेंद्र नावाने संबोधित केलेले दिसते तसे मराठी सुलभ मराठीतले एक अक्षर वापरून लिहायला सुरू केले. त्यावर जुन्या जेष्ठ साहित्यिकांनी लिहितांना तेच अक्षर घेऊन लिहिले. मराठीमधे जहाजाचा आणि जगाचा असे दोन सुरवातीचे उच्चार असलेले शब्द कोणत्याच अधिकच्या चिन्हाची मदत न घेता मराठी लोक उच्चार करत आलेले आहेत, पण त्यातला जहाजाचा उच्चार गझलेत लिहिलेल्या अक्षराचा करायचा हे माहित असेल तरच तो उच्चार बरोबर करता येऊ शकतो आणि हा शब्द मराठीत नव्हताच म्हटल्यावर तसे करणे सांगितल्याशिवाय अचूक करणे नेहमीच घडणार नाही याच कारणाने कदाचित जहाजाचा ज न वापरला झ अक्षर वापरून लेखकांनी सुटका करून घेतली असेल आधीच्या काळात.
.
त्याचा परिणाम असा की अनेक साहित्यात आता गझल असेच लिहिलेले दिसते आणि त्यामुळे अनेक नव्या साहित्यिकांना तसे सुरू ठेवले तर काही वावगे वाटत नाही असे दिसते. उर्दू आणि अरबी भाषांचा अभ्यास समजल्यानंतर तसा ज़ उच्चार करायला नुक्ता लावता येतो याचा शोध मराठी माणसाला झाला आणि झ हे अक्षर न लिहिता ज़ असे नुक्तासिद्ध अक्षर लिहून तो उच्चार अधिक मूळ उच्चारा जवळ नेता येतो हा शोध लागल्यावर प्रश्न निर्माण झाला की आता आधी काय झाले ते माहित आहे, तांत्रिक दृष्ट्या काय अधिक सुसंगत वाटते ते माहित झाले पण आता संपूर्ण मराठी साहित्यिक जगाला एकदम ते जुने सगळे सोडून द्या आणि हा नवा नियम किंवा संकेत सुरू करा असे सांगता येईल का? तसे सांगितले तर त्याचा उपयोग होईल का? हा प्रश्न उभा राहिला.
.
आमच्यातलाच एक कवी हा अक्षर सुधार करायची मोहिम हाती घेऊन सगळ्यांना सांगता झाला की असे बरोबर आणि असेच यानंतर करायला हवे. ती संकल्पना चूक नाही तांत्रिक दृष्ट्या ते सगळ्यांना पटलेले देखील आहे, पण हा हट्ट मान्य करायला अनेक साहित्यिक तयार नाहीत किंबहुना तसे करायची त्यांना आवश्यकता वाटत नाही असे दिसून येते. यातून वादासाठी आणि हट्ट आणि अभिमान यांच्या खेळात दोन गट तयार झालेले दिसतात. यांच्या गटातले साहित्यिक त्यांच्या कार्यक्रमात निमंत्रित नसतात, त्यांच्या गटातले साहित्यिक यांच्या गटात निमंत्रित नसतात. सर्वसामान्य मराठी भाषेची आणि वाचकांची ही हानी आहे हे यात दोन्ही बाजूच्या लोकांना कळत असेल तरीही हा तिढा सोडविणे महत्वाचे आहे असे अजून कुणाला वाटलेले दिसत नाही.
.
हे दोन्ही गट माझ्या मित्रयादीतले पण यातल्या कुणाला समजावणे कठीण कारण त्यासाठी एकतर एक बाजू घ्यावी लागेल किंवा यातली एक बाजू माझी असे अनुमान लावून मलाच एका बाजूला करून वाद पुढे सुरू राहील याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयावर लिहायचे कसे आणि काय हे देखील अनेक दिवस मला समजत नव्हते पण नुकत्याच सापडलेल्या एका मुद्यावरून मला हा विषय हाताळायला मदत मिळाली त्यामुळे या दोन्ही गटातल्या लोकांना मी काही माझे विचार सांगणार आहे.
.
मूळ भाषेच्या अभ्यासाने माहित झालेले अक्षर आता यानंतर लिहिले नाही तर ते ‘अज्ञानद्योतक’ आहे आणि आपले अज्ञान आपण सतत जाहिर करणे आहे अश्या तर्काने कुणीतरी नवे अक्षर वापरणे हे मी समजू शकतो. तसे करायचे स्वातंत्र्य ज्याला घ्यायचे आहे त्याला असावेच यात काही वाद नाही. इतरांनीही तसेच करावे हा हट्ट आणि तसे केले नाही तर ते लोक अमुकअमुक अश्या नावाच्या वेगळ्या गटात टाकून केलेली भाषा आणि एकमेकांशी झालेला दुरावा याबद्दल मला बोलायचे आहे.
.
इंग्रजी मधल्या ऍग्री टू डिस्ऍग्री या तत्वानुसार वागून दोन्ही गोष्टी सुरू ठेवायची मुभा असावी हे मी जेव्हा मांडतो, तेव्हा मला त्याच्या तुलनेत अजून एक उदाहरण हवे होते जे दोन्ही बाजूच्या गटांना माहितीचेच असेल आणि ज्यावर विचार करणे शक्य असेल आणि आज तसे उदाहरण माझ्याजवळ आहे.
.
गॅलिलिओ गॅलिली या शास्त्रज्ञाने प्रयोगातून दाखवले की सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, त्याउलट पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हा सिद्धांत जुन्या धार्मिक ग्रंथांना खोटे पाडत असल्याने तसे म्हणणे म्हणजे थेट बाप्पाची प्रतारणा [१] समजून त्याचेवर खटला झाला आणि त्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंततः त्याचा जीव घेतला गेला ही गोष्ट आता आपल्याला विदीत आहे. हे ज्ञान कळल्यावर अजूनही सूर्य उगवला आणि सूर्व मावळला म्हणणे म्हणजे त्या ज्ञानाला डावलून जुनाच समज जोपासणे होत नाही का यावर विचार करावा लागेल. आपण अजूनही सूर्य उगवला आणि मावळला असे म्हणत असू तर आपण एका थोर शास्त्रज्ञाच्या जीव देण्याला काहीच किंमत आणि मान देत नाही असे होते नाही का?
.
कवी म्हणून कितीतरी जागी सूर्योदय, चंद्रोदय, सूर्यास्त आणि चंद्रास्त, उगवणे, मावळणे, बुडणे, असे शब्द वापरलेले कितीतरी साहित्य आता उपलब्ध आहे जे सगळे खोटे ठरते. तसे होतच नाही सूर्य एकाच जागी आहे पृथ्वी फिरते आहे, त्यामुळे तो कधी बुडू शकत नाही मावळू शकत नाही उगवत नाही मग तसे लिहिणे हे फक्त लिहिणाऱ्या व्यक्तीच्या स्थानिक पातळीवर झालेले भास असतात. पण सूर्य ज्याला देव पण मानले जाते त्याला कधीच ग्रहण लागत नाही त्याउलट पृथ्वी तिच्या फिरण्याच्या कुठल्या तरी संरचनेच्या अंतर्गत सूर्याचा प्रकाश मिळवू शकत नाही त्याला सूर्यग्रहण म्हणणे हे ही खोटे आहे.
.
या सगळ्यासाठी नवे शब्द शोधावे लागतील, आपले सगळे जुने साहित्य आणि काव्य अचूक नाही त्यात बदल करावे लागतील. नव्याने लिहिणारे सगळे आता सूर्यास्त आणि उदय लिहिणे अज्ञानदयोतक समजून त्याला वेगळ्या शब्दात लिहू लागतील का? असा प्रश्न विचारला तर आपण मराठी साहित्यिक त्याचे फारच लवकर उत्तर देऊ शकतो.
.
अरे आता नवे विज्ञान माहिती आहे त्यामुळे सूर्व बुडाला हे आता लाक्षणिक मानले जाते आणि अजूनही तसे लिहिणे अज्ञानद्योतक मानले जात नाही. कुणी तसे न करता नवे शब्द शोधले तरी ते मान्य करता येईल पण जुने तयार असलेले रूपक आणि अक्षरे यांना बदलण्याचा हट्ट करता येणार नाही. आपल्याला जे होऊन गेले त्याला घेऊनच पुढे जावे लागेल आणि यानंतरही जे आधी लिहिले गेले त्याचेच उदाहरण घेऊन अजूनही सूर्य उगवला असेच आपण लिहू, पृथ्वी फिरून जेव्हा प्रकाशाच्या भागात आली असे लिहिणे अजूनही गरजेचे वाटत नाही असे मला सहज म्हणता येते. मी एक दोन लोकांना सूर्य उगवला हे म्हणून नका आता पासून तो सूर्याचा अपमान आहे असे सांगून पाहिले, त्या सर्वांनी मला समजावले की अश्या कितीतरी गोष्टी वापरात आहेत आणि त्या तश्याच राहतील.
.
मागे मी बोनसाय शब्दाचा मला सापडलेला अर्थ सांगण्यासाठी एक लेख लिहिला होता तिथे एका गझलकारांनी मला मी मराठी भाषेच्या रूढ असलेल्या अर्थांना बदलण्याची मोहीम हाती घेऊ शकत नाही असा मला दम दिला होता फेसबुकवर त्याची या अनुषंगाने आठवण झाली.
.
सूर्योदयाबाबत जसे आपण मराठी कवी समजून घेऊ शकतो आणि आता सूर्य उगवत नाही मावळतही नाही माहिती असताना देखिल तसेच लिहीत राहणार आहे तेव्हा गझल या शब्दाला कसे लिहायचे हे माहित असतानाही काही लोक गझल आणि काही गज़ल असे लिहितील आणि दोन्ही विकल्पांबरोबर आपल्याला राहावे लागणार आहे हे मान्य करता आले तर मराठी साहित्यात पडलेले दोन गट फक्त एका तांत्रिक संकल्पनेला शरण न जाता मनाने एकत्र येऊ शकतील असे मला वाटते.
.
सूर्योदय लिहिणे हे अज्ञानद्योतक आहे त्यामुळे तसे लिहिणारे हट्टी ठरतात का? अजूनही अनेक लोक सूर्योदय हाच शब्द वापरतील याचा आपण स्वीकार करू शकतो तसेच काही लोक अजूनही गझल असेच लिहितील याचा स्वीकार करता यायला हवा असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. मला या किंवा त्या गटाचा भाग व्हायचे, मला काठावरच राहायला आवडेल. हे दोन्ही विचारप्रवाह एकमेकांना समजून घेऊन एकत्र राहू लागले तर मला एक बाजू घ्यायची आवश्यकता उरणारच नाही त्या दिवसाच्या प्रतिक्षेत...
.
(काठावर राहणारा)
तुषार जोशी
नागपूर, शुक्रवार, १४ मार्च २०२५
.
[१] बाप्पाची प्रतारणा – ब्लास्फेमी

Group content visibility: 
Use group defaults

गझल(गजल)बद्दल फारशी माहिती नाही. पण लेखात, कवितेत सूर्य उगवला, मावळला, नाही लिहिलं तर किती अरसिक वाटेल.

वेगवेगळ्या भासांना वेगवेगळी नावे आहेत. उदा. रात्री पडणारे स्वप्न. दिवसा पडणारे दिवास्वप्न. वाळवंटात होणारा भास मृगजळ. मनात आलेले वेगळे विचार मनाचे खेळ. या सगळ्यांना एकच शब्द नाही.
हे जर तुम्हाला पटत असेल , तर सूर्याचा उदय होतो आहे या भासाला सूर्योदय म्हणायला काय हरकत आहे?

गज॑ल कि गझल या वादावर पडदा पडावा म्हणून सूर्योदय हा शब्द आपण कसा स्विकारला हे उदाहरण समोर ठेवावे हा हेतू असावा.
पण शीर्षक आणि उपोद्घात यामुळे मुख्य मुद्दा हा आहे असा समज होतोय असं वाटतंय.

फ्रेम ऑफ रेफ्रन्स सोडून तुम्ही का लिहिता? मध्यंतरी पण एका लेखात असेच होते.
पृथ्वीवरून अर्थात सूर्य उगवतो आणि मावळतो. कितीही वैचारिक कोलांट्याउड्या मारल्या तरी सूर्य उगवतो हे सत्य आहे. सगळे नियम हे ओब्झरवर वर अवलंबून असतात. सूर्यापासून ते बंदिस्त खोक्यात विषारी अन्न ठेवून कोंडलेली मांजर एकाच वेळी जिवंत आणि मेलेली आहे पर्यंत.

पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी असून संपूर्ण विश्व/ब्रम्हांड पृथ्वीभोवती फिरतंय. त्यामुळे सूर्य उगवतो मावळतो हे बरोबर आहे.

गज॑ल कि गझल या वादावर पडदा पडावा म्हणून सूर्योदय हा शब्द आपण कसा स्विकारला हे उदाहरण समोर ठेवावे हा हेतू असावा.
पण शीर्षक आणि उपोद्घात यामुळे मुख्य मुद्दा हा आहे असा समज होतोय असं वाटतंय.>>> लेखकाचा दृष्टीकोन/ दिलेली उदाहरणे बरोबर आहेत का? याबाबत याबाबत शंकेला वाव आहे....पण तुम्ही या लेखात अभिप्रेत असलेला कळीचा मुद्दा अगदी बरोबर हेरलात यात तिळमात्र ही शंका नाही...

पण शीर्षक आणि उपोद्घात यामुळे मुख्य मुद्दा हा आहे असा समज होतोय असं वाटतंय. >>>आता प्रश्न हा उरतोय की हे असं का व्हावं? नक्कीच यात शिर्षकाचा मोठा वाटा आहेच पण तरीही ६ पैकी ४ प्रतिसाद पुर्णपणे सुर्योदयासंदर्भात आले.... नक्कीच त्यांनीही लेख आणि लेखकाचे युक्तिवाद वाचले असणारच...पण मग लेखाचा समतोल असा कुठे ढासळला‌ की इतर प्रतिसादकर्ते दुसऱ्याच एका स्टेशनला (लेखकाला अपेक्षीत नसलेल्या) पोहचले ?

मला एक कधीच कळले नाही की सूर्याला लोकं देव मानत आलेत. मग जेव्हा सूर्य हा एकाच जागी स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते यात सूर्याचीच महानता सिद्ध होते तर लोकं चिडले का?

तर याचे उत्तर आहे हट्ट आणि अहंकार !

जे लोकं हा सोडायला तयार नसतात त्यांना तुम्ही कितीही समजावा त्याचा काही उपयोग नाही. फक्त शंभर प्रतिसाद होतात हाच काय तो फायदा.

एक शब्द {सूर्योदय) केवढं पोटेन्शिअल बाळगून आहे बघा, केवढं लिहिलात तरी तो शब्द (सूर्योदय) व्यवहारी जगातून जाणार नाही .

छान माहिती. विज्ञान आणि गजल यांच्यातले अंतर कमी झाले असे वाटले.

अमितव यांच्या frame of reference उल्लेखाशी सहमत. रेल्वे फलाटावर गाडी#अ येत आहे. गाडी#अ चा वेग किती आहे हे निरीक्षक observer कुठे उभा ( फलाटावर, गाडी#अमधे, विरुद्ध दिशेने जाणार्‍या गाडी#ब मधे) आहे यावर अवलंबून आहे. तीन वेगळे उत्तरे मिळतील.

सूर्य क्षितिजाच्या वर आल्या नंतरच त्या जागेवर स्थिर निरीक्षकाला तो दिसायला लागतो - म्हणून सूर्योदय योग्य वाटतो.
कोण कोणाभोवती फिरत आहे याने निरीक्षणात बदल होत नाही. सूर्योदयाच्या वेळाही सर्वांसाठी सारख्या नाहीत, निरीक्षक पृथ्वीवर कुठे उभा आहे यानुसार वेळ बदलत आहे.

<< मला एक कधीच कळले नाही की सूर्याला लोकं देव मानत आलेत. मग जेव्हा सूर्य हा एकाच जागी स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते यात सूर्याचीच महानता सिद्ध होते तर लोकं चिडले का? >>

---- लोक का चिडले याचे खरोखरच उत्तर हवे आहे , ऋन्मेSSष ? Happy

सूर्य हा हायड्रोजन - हेलियम पासून बनलेला वायूचा गोळा आहे हे आज सर्वांना माहित आहे. एव्हढ्या लांब असलेल्या या निर्जीव गोळ्यापासून मानवाची उत्पत्ती होणे अशक्य आहे असे आजचे विज्ञान सांगते. धर्मेंद्र शास्त्री याच्या सभेत सूर्यपुत्र कर्णाच्या जन्माच्या कथेला आव्हान दे आणि काय होते ते इथे सविस्तर लिही. Happy

सर्व अभिप्राय दात्यांचे अनेक आभार. तुमच्या वेळ घेऊन इथे मत लिहिण्याने मला माझे शब्द तुमच्या पर्यंत कसे पोचताहेत ते कळायला मदत होते म्हणूनच तुमचे लिहून हे सांगणे लाख मोलाचे आहे याचा उल्लेख करतो आहे.
.
@अजय, @अमितव, @बोकलत, @सुनिल,
या लेखात सूर्योदय ही संकल्पना कोणत्याही मराठी लेखक वाचकाला विचारली तर क्षणात त्याचे उत्तर देता येते हे सांगण्यासाठीच मी वापरलेली आहे. (हा लेख सूर्योदय हा शब्द वापरावा की नाही याची चर्चा करण्यासाठी नाहीच मुळे, उलट तो कसा आपण चटकन समजून घेतो तितका सहज गझल शब्द असाच वापरला जाईल आणि ते पण चालवून घ्यावे काही जणांना कळत नाही त्याची चर्चा हा या लेखाचा उद्देश आहे) तुमच्या अभिप्रायात तुम्ही तोच मुद्दा सिद्ध केलाय की सूर्योदय हा शब्द आपण अजूनही कसा पुढे चालवणार आहोत आणि त्यात हट्टीपणा करायची काहीच गरज नाही.
.
हाच तर्क वापरून गझल हा शब्द देखील बरेच लोकांनी आधीच लिहिलेला वापरलेला आहे त्याला हट्टाने बदलायची मोहीम काढली तरीही अनेक जण तो तसाच वापरतील हे समजून घेणे गरजेचे हा मुद्दा मांडणे हा या लेखाचा महत्वाचा मुद्दा आहे.
.
@फार्स, @रानभुली, @उदय,
.
किमान तुमच्या पर्यंत माझे शब्द मला हवे तसे पोहोचले असे तुमच्या अभिप्रायातून जाणवले. माझे लेखाच्या रचनेत घोटाळे होतात त्यावर मी नोंद घेऊन बदल करेन, पण जे लिहिले आहे ते तसेच सुद्धा काही वाचकांपर्यंत पोहोचले हे समजणे देखील वेगळे समाधान देते. तुम्ही वेळ घेऊन अभिप्राय लिहिलात म्हणून मला हे कळले त्याबद्दल तुमचे पुन्हा आभार.
.
यानंतर देखील इथे येणारी सर्व मंडळी,
.
मी सूर्योदयाबद्दल जी वाक्ये लिहिली आहेत त्या सगळ्या वाक्यांच्या मागे प्रश्नचिन्ह लावलेले आहे. ती माझी विधाने नाहीत तर असे विचारले तर तुम्ही काय उत्तर द्याल असा प्रश्न उभा करणे आणि आपण किती चटकन त्याचे उत्तर देऊन मोकळे होतप त्याचा तुम्हालाही प्रत्यय देणे असा आहे.
.
कदाचित कुणीतरी सूर्योदय या शब्दाला विरोध करतो आहे आणि त्यावर उत्तर देण्यासाठी तुम्हाला काही लिहावे वाटते असेल तर हा लेख पुन्हा वाचावा ही विनंती आहे.

मला एक कधीच कळले नाही की सूर्याला लोकं देव मानत आलेत. मग जेव्हा सूर्य हा एकाच जागी स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते यात सूर्याचीच महानता सिद्ध होते तर लोकं चिडले का?

>>> सूर्याला देव मानणारे लोक चिडले का? ख्रिस्ती लोक सूर्याला देव मानत नाहीत.

आता हा मनुष्य "पायात चप्पल घालून नका" ... "चपलेत पाय घाला" हे सांगत सुटणार.

झुकु झुकु आगिनगाडी ....या गाण्यातली ओळ "पळती झाडे पाहुया...... ही ओळसुद्धा बदलायला लावणार.

माझे लेखाच्या रचनेत घोटाळे होतात त्यावर मी नोंद घेऊन बदल करेन>>> यासाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा......माझा हा मुद्दा उचलण्याचा हेतू वेगळा होता....कोणते घटक पेरले की विषयाला फाटे फुटू शकतात आणि कोणत्या बाबींची काळजी घेतली तर विषय ऑन ट्रॅक राहू शकतो किंवा अर्थाचा अनर्थ टळू शकतो हे परिस्थिती नुसार स्वतः लिहित असलेल्या गोष्टींसाठी, तसेच इतर कुणी काय हेतूने लिहीले आहे याचे आडाखे बांधण्यासाठीही फार उपयोगाचे आहे त्या दृष्टीने एक केस स्टडी म्हणून मला या लेखाचे वेगळेपण जाणवले.

झुकु झुकु आगिनगाडी ....या गाण्यातली ओळ "पळती झाडे पाहुया...... ही ओळसुद्धा बदलायला लावणार.>>> Lol Lol