चित्रपट "छावा" च्या निमित्ताने .... !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2025 - 10:31

नवा आहे.. पण छावा आहे.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. बॉयफ्रेंडचा समानार्थी शब्द छावा आणि गर्लफ्रेंड असेल तर छावी..
पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल.

निमित्त चित्रपट छावा - बघायला सात दिवस उशीरच झाला. पण या सात दिवसात जवळपास सत्तर परीक्षणे अधाश्यासारखी वाचून काढली. आणि या चित्रपटावर आधारीत सातशे रील्स बघितल्या. चित्रपटाची कथा ही ईतिहासाची जितकी आवड आहे त्यानुसार माहीत होतीच. पण ते दाखवणार कसे याची उत्सुकता होती.

गेले काही वर्षात जे काही मोठ्या बॅनरचे वीएफएक्सयुक्त ऐतिहासिक चित्रपट आले ते पाहता अपेक्षा फार नव्हत्या. ट्रेलर देखील तितका भारी वाटला नव्हता. विकी कौशलचे नाचणे सुद्धा रुचले नव्हते. त्यामुळे चित्रपट आल्यावर, चार लोकांचे रिव्ह्यू वाचल्यावर थिएटरला जावे की ओटीटी रीलीजची वाट बघावी हा निर्णय घ्यावा असे ठरवले होते. कारण वेळ आणि पैसा खर्च करताना विचार करावा लागतोच. पण वैयक्तिक आवड काहीही असली तरी आपल्या मातीतील पराक्रमी वीरांवर चित्रपट येत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा ईतिहास पोहोचत आहे हे चांगलेच घडतेय असे वाटत होते.

देर आये दुरुस्त आये. गाणे चित्रपटातून उडवले गेले. वीएफएक्सचे पराक्रम कमीत कमी होते. संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या अभिनयाच्या आणि दमदार संवादांच्या ताकदीवर उभे करायचे शिवधनुष्य विकी कौशलने लीलया पेलले. अन्यथा ट्रेलरमध्ये ओरडतानाच फार दाखवले होते. खरे क्षण आणि संवाद थिएटरसाठी राखून ठेवले होते.

येसूबाई म्हणून रश्मिका ऐवजी दुसरी कोणीतरी (श्रद्धा, शर्वरी, मृणाल) हवी होती अशी बरीच मते ऐकली. त्यात तथ्यही वाटले. पण असो, ते जर तर झाले. रश्मिका फार कमी पडली असे वाटले नाही. तिच्या ईतर दुसर्‍या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती यात छान दिसली.

औरंगजेब साकारणार्‍या अक्षय खन्नाने व्हिलन कॅटेगरीतील अभिनय वेगळ्याच उंचीला नेला. ना त्याने थयथयाट केला, ना तो निव्वळ थंड डोक्याचा खूनशी वाटला, ना तो विकी कौशलशी अभिनयाची जुगलबंदी करायला गेला. पण यापुढे औरंगजेब म्हटले की अक्षय खन्नाचे ते रुपच आठवावे असे काम करून गेला.

चित्रपटाची पटकथा प्रामुख्याने संभाजी राजे विरुद्ध औरंगजेब यावरच फोकस ठेवून लिहीली गेली होती. त्यामुळे या दोघातील एक अभिनेता जरी कमी पडला असता तर पुर्ण चित्रपट सपक झाला असता. पण तसे व्हावे ही श्रींची ईच्छा नव्हती.

या दोघांनी संवाद छान म्हटले पण मुळात ते होतेही तितकेच दमदार. कवी कलश यांनाही छान संवाद मिळाले जे गरजेचे होते. चित्रपटाच्या शेवटी कथानायक संभाजीराजे हे जग सोडतात आणि खलनायक औरंगजेब जिवंत राहतो. पण तरीही विजय संभाजीराजे यांचाच होतो आणि औरंगजेब हरतो हे प्रेक्षकांपर्यंत त्या संवादातूनच परीणामकारक पोहोचते.

पण, चित्रपट परीपुर्ण नाहीये. अडीच तासाच्या चित्रपटात संभाजी राजेंचा ईतिहास बसवणे तसे अवघडच होते. कदाचित म्हणून सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून केली. पण त्यानंतरही पुढच्या दोन अडीच तासात जे दाखवले त्यातले बरेच काही कमी करून ईतर बरेच काही दाखवता आले असते. ज्यातून संभाजी राजेंचे व्यक्तीमत्व आणखी चांगल्या प्रकारे खुलून आले असते. तसेच ईतिहासाची अजून चार पाने लोकांपर्यंत पोहोचली असती. त्यामुळे एकंदरीत विचार करता काही इन्डिविज्युअल पर्फॉर्मन्सेस एकत्र आले आहेत, पण एक चित्रपट म्हणून बरेच काही कमी पडले असेही वाटले.

पण, हे ही नसे थोडके. चित्रपट संपल्यावर भले लोकं साश्रू नयनांनी मूकपणे बाहेर पडली असतील, पण घरी जाऊन प्रत्येक कुटुंबात यावर चर्चा झाली असेल. मोठ्यांनी आपल्याकडील ईतिहासाच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली असेल. तर लहानग्यांनी ते ऐकले असेल. या चित्रपटाचा प्रभाव तितका नक्कीच पडला आहे आणि हे सुद्धा महत्वाचे आहे. अन्यथा स्वानुभावावरून सांगतो, शाळेत असताना गणित, विज्ञान, भाषा, भूगोल अश्या जीवनोपयोगी विषयांसोबत ईतिहास हा तितकासा महत्वाचा नसलेला विषय दरवर्षी का शिकवला जातो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. ईतिहास शिकण्याचे महत्व कधी कोणी सांगितलेच नाही. पण कालांतराने स्वत:हून समजले की खरे ज्ञान हे पुस्तकी नसून जे आयुष्य आपल्याला शिकवते ते असते, आणि ते आपण ईतिहासातील चुका आणि अनुभवातूनच शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला ईतिहास माहीत हवाच.

पटकथा संकलन वगळता ईतर कमतरता या चित्रपटाच्या प्रभावापुढे मला तरी गौण वाटल्या. पण तरीही ए आर रेहमानच्या संगीताबद्दल मात्र असे का झाले किंवा त्याने असे का केले हा प्रश्न अजूनही सतावत आहे. पार्श्वसंगीताच्या नावावर सतत काही अरेबियन बायका व्हिवळत होत्या. औरंगजेबाच्या द्रुश्यांना ते चालून गेले. त्याकडे बघून चीड यावी म्हणून असे चीड आणनारे संगीत वाजवले गेले असावे. पण आपल्याकडच्या दृश्यांना का हे आचरट प्रयोग केले? लढाईच्या दृश्यांना सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून असाच आरडाओरडा चालू होता. ऊपकार एकच केले ते म्हणजे क्लायमॅक्स दृश्यात कुठले प्रयोग न करता संयम बाळगला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अपवाद वगळता संगीत कुठे मराठमोळे, आपल्या मातीतील वाटलेच नाही आणि हा अक्षम्य अपराध ठरावा. ज्याला जबाबदार केवळ ए आर रेहमानच नाही तर दिग्दर्शक सुद्धा तितकाच ठरतो. आणि म्हणूनच छावाचे परीक्षण अजय-अतुल यांची आठवण काढल्याशिवाय अपुर्णच!

असो,
कित्येक चित्रपटगृहात लोकं महाराजांचा जयघोष करत आहेत, तर चित्रपट संपल्यावर खणखणीत आवाजात महाराजांची गारद म्हटली जात आहे. याचे विडिओ सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. यामागे काही प्रमाणात फॅड सुद्धा असावे पण महाराजांप्रती तितकेच प्रेम आणि आदर असलेल्या लोकांची या महाराष्ट्रात वानवा नाही. राष्ट्रगीत संपताच जसे उत्स्फुर्तपणे भारतमाता की जय म्हणावेसे वाटते, कोणी गणपती बाप्पा म्हटले की आपसूक तोंडातून मोरया बाहेर पडते, तीच ताकद "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणेत आहे. त्यामुळे हे निव्वळ फॅड नसून कित्येकांना खरेच हे एका उत्सवासारखे वाटत असावे.

कित्येक दिवसांनी सकाळचा पहिला शो पहिल्या रांगेपासून हाऊसफुल झालेला पाहिला. तिकीट बूक करताना आदल्या रात्रीचा साडे अकरा वाजताचा शो जो मध्यरात्री अडीच वाजता संपला असता तो सुद्धा हाऊसफुल झालेला पाहिला. राष्ट्रगीत संपल्यावर भारतमाता की जय पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लोकांनी चित्रपट बघायला सुरुवात केली. संभाजी राजेंनी सिंहाचा जबडा फाडताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजून काही मोजक्या प्रसंगी त्या आल्या पण त्यात कुठेही नेहमीच्या टपोरी शिट्ट्या नव्हत्या. आपण जवान चित्रपट नाही तर छावा बघत आहोत याचे भान लोकांना कायम होते.

क्लायमॅक्सला मात्र एकाही संवादावर टाळी आली नाही. टाळी तर दूर कोणी एक शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कारण पुढे आपण काय बघणार आहोत आणि याचा शेवट काय होणार आहे हे लोकांना माहीत होते. चित्रपट अगदी योग्य फ्रेमवर थांबला. जरी लोकं मूक झाले असले तरी ती प्रत्येकाला स्वराज्य अभिमानाची गाथा वाटावी असाच शेवट होता. आणि मग जे आपल्या थिएटरमध्ये देखील घडावे अशी ईच्छा होती ते घडले. एका लहान मुलाने गारद म्हणायला सुरुवात केली आणि ती पुर्ण होईपर्यंत लोकं शांतपणे आपल्या जागी ऊभे राहिले. ज्या संभाजी राजेंवर शालेय ईतिहासाच्या पुस्तकाने देखील अन्याय केला त्यांच्या छावा चित्रपटानिमित्त हे दृश्य बघणे आणि अनुभवणे नशिबी आले...

धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

हिंदी धार्जिण्या प्रेक्षकांबद्दल मराठी चित्रपट क्षेत्रातील एका दिग्दर्शक, लेखक, अभिनेता, निर्माता, गीतकार, यांचे मत
https://www.loksatta.com/manoranjan/television/shrirang-godbole-on-marat...

चॅट जीपीटीला संत्या आणि औरंग्यावर गोष्ट लिहायला सांगितली.

**संत्या आणि औरंग्या: गप्पांचा धुमाकूळ**

गावात एक संत्या नावाचा माणूस राहत होता. संत्या एकदम शांत स्वभावाचा आणि कुणाशी जास्त बोलणारा नाही असा माणूस होता. त्याचं जग हे त्याच्या गप्पा न करता चालायचं असं होतं. पण गावात एक औरंग्या नावाचा माणूस होता, जो खरंतर संत्याच्या एकदम उलट होता. औरंग्या म्हणजे फुल्ल गप्पा, चेष्टा, धमाल! तो कुणाशीही बोलत असे आणि त्याच्या गप्पांमध्ये गडबड असायची.

पण संत्या आणि औरंग्या यांचं एक विशेष नातं होतं – संत्या आणि औरंग्या कधीच बोलत नव्हते! संत्या नेहमी टाळायचा, आणि औरंग्या नेहमी त्याच्या मागे पळत राहायचा.

एक दिवस, संत्या शेतावर जात असताना, औरंग्या त्याच्या मागे लागला. औरंग्या म्हणाला, “संत्या, आज तर गप्पा मारूच! तुला काय झालं? तुम्ही चहा पित असतानाही फुकट बोलत नाही!”

संत्या गप्प राहिला आणि चालत चालत शेताकडे गेला. औरंग्या त्याच्या मागे मागे धावला. “संत्या, ऐक, काही तरी बोल! आहो! तुझं नाव 'संत्या' असं नाही, 'साइलेंट' असं ठेवायला हवं होतं!”

संत्या अजूनही गप्प राहिला आणि चालत गेला. आणि तरीही, औरंग्या त्याच्या मागे धावत राहिला. "संत्या, तुझ्या गप्पांमध्ये ‘मौन सत्य’ आहे की ‘खूप विचारशील’?" असं ओरडून तो म्हणाला.

शेवटी, संत्या शेताच्या उचलावर जाऊन थांबला. तो थोडा शांतपणे फिरला, आणि आणि नेहमीच्या शांत आवाजात आणि गडबड न करता एक वाक्य त्याने उचललं – “औरंग्या, तुला खूप बोलायला आवडतं, की चहा पिऊन गप्पा मारत थोडं आराम करशील?”

औरंग्याने थोड्या वेळासाठी थांबून आणि एक हसऱ्या चेहऱ्याने विचारले, “तुला समजलं की मी कधी थांबणार नाही!”

संत्या त्याला पाहून म्हणाला, “माझं नातं तुझ्याशी हवं, पण त्या 'चहा'च्या गप्पा नाहीत!”

दोघेही हसले आणि त्याच्या गप्पा शेवटी थांबल्या.

अवधूत गुप्ते आता मैदानात उतरले आहेत संतोष जुवेकरची बाजू घेत

फेसबुक फॉरवर्ड
मित्रांनो!

सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर ह्याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!!

आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं..

"अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही" हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे.

‘झेंडा‘ च्या वेळेस ‘संत्या‘ च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणा दरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘ च्या वेळेस देखील तसंच. ‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांना केवळ ऑब्जर्व करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता. हे माझ्या सोबतच्या चित्रपटांचे झाले. परंतु, इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना, भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे. आता हीच जर त्याची ‘मेथड‘ असेल तर ती आपण सर्वांनी एक्सेप्ट करायलाच हवी.. कारण ‘रिझल्ट‘ आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे!

अभिनयाच्या ह्याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे! त्याचं घर कधीही जाऊन बघा.. एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं! त्यातच, तो जवळ रहाणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांची, अधिक पुतणीची काळजी देखील घेतो. कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेली दुर्दैवी काटकसर त्याच्याही नशिबी आहे. परंतु, आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करून ठेवल्याची तक्रार आजवर कधीही ऐकलेली नाही.

अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडे जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली. पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते, त्याच्या जवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे.. असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर.. त्याचे वेड्यासारखे नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे?

ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतल्या अनेक कलावंतांची आहे. वर्ष भर मेहनत करून एका शुक्रवारी चित्रपट येतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की "बाकी.. नवीन काय करतोयस?" त्यावेळेसचे त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीच कळणार नाही. कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार?

त्यातून, ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरीच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं.

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका.

कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या. एवढंच!

आपला,

अवधूत गुप्ते

अरेरे .. आतापर्यंत लोक जुवेकरला इतका माज का आहे असं म्हणत होते... या अवधूतने तर त्याला पार केविलवाणा, कीव करावी असा, बिचारा वगैरे करून टाकले... हा कसला सपोर्ट..

<<<‘झेंडा‘ च्या वेळेस ‘संत्या‘ च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणा दरम्यान त्या चाळीतच राहिला होता>>>

----- खलनायकाची भूमिका मिळाली तर तो काय करेल?

यातल्या अनेक वाक्यांबद्दल हा स्वतःच ट्रोल होऊ शकतो. खरं तर तशीच किर्ती आहे त्याची.

दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार >> म्हणजे काय? ट्रोल करु नका सांगताना हाच इतरांना ट्रोल करतोय ?? की काहीतरी कवितेसदृष उगाच ओळ फेकायची म्हणून आहे ते?

आधी केलेलं बरं काम कसं अचानक मातीत कसं घालावं, याचं उदाहरण झाला जुवेकर. आता इतक्या उशिरा बाजू घेऊन पुन्हा मजा तर बघत नाही आहात ना? तो आता आज पुन्हा रात्रभर बसला तर त्याचं बिल कोण भरणार?

>>> ‘रिझल्ट‘ आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे!
कुठला रिझल्ट आणि तो निर्विवाद कसा? कित्येकांना याआधी हा नट कशात आला आणि गेला हे माहीतदेखील नव्हतं. विवाद होणार तरी कशावरून?
मला या एवढ्या पोस्टमधलं नक्की काय नक्की कशाचं जस्टिफिकेशन आहे तेच कळलेलं नाही. घर टापटीप असतं, पैसे बुडवत नाही वगैरेंमुळे मूर्खपणे बोलण्याचं लायसन्स मिळतं का?

>>> कबरीवरची बुरशी
हे स्पेशल कॅटेगरीतलं अचाट आहे! Biggrin

ठीक आहे, आपलाच मराठी मुलगा आहे, सांभाळून घेऊयात. इतक्या मोठ्या ऐतिहसिक सिनेमात काम मिळाले म्हणून भारावला असेल.
बच्चे की जान लोगे क्या ?

गुप्तेच्या मेंदूवर दगडफुल उमललेत. झेंडा पिक्चर काढला त्यात दोन मित्र भांडतात शेवटी एकत्र येतात. मोरया पिक्चर काढला त्यात पण सेम स्टोरी नंतर दहीहंडीचा पिक्चर काढला त्यात पण सेम. हा असले टुकार पिक्चर सेम थीमवर काढायला लागला तर कलाकारांवर चाळीतच रहायची वेळ येईल.

जुवेकर म्हणजे दगडावर उमलू पाहणारं फूल! इमोशनल फूल.

बुरशी म्हणजे कोण असावं यावर संशोधन करावं लागेल.

दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार >>> गटणे! >> अगदी अगदी... मला तर हे त्या आवाजात ऐकूही आलं लगेच! Biggrin

कबर, बुरशी - उपमाही सध्याच्या वातावरणाला साजेशा निवडल्यात.

नागपूरला जे झालं त्यावरून या धाग्याचं शीर्षकच आठवलं - चित्रपट छावाच्या निमित्ताने.

अशोक शिंदेंनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. मलाही या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण जाणता राजामध्ये राजांची भूमिका केल्यावर मुघलाची भूमिका करणं पटत नाही , इ.

दिग्दर्शक विकी कौशल गेट अपमध्ये असताना त्याच्यासमोर बसायचा नाही, असं काय काय ऐकलं. तसं तर अक्षयसमोरही बसायला नको ना? त्याला शहेनशहा असल्यासारखं वाटायला नको का?

शोभना समर्थ आज असत्या तर त्यांचं कठीण होतं. अगदी बिनधास्त होत्या त्या. त्यांची एक मुलाखत दूरदर्शनवर पाहिली होती. सह्याद्रीच्या यु ट्यूब चॅनेलवर आली आहे का ते शोधायला हवं.

<लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय>
<पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल. >

हा अर्थ कसा वाटतोय?

बोकलत, सेम स्टोरी लाईनला +७८६
झेंडा, मोरया, कान्हा..

पण चित्रपट म्हणजे एक व्यवसाय म्हणून बघितले तर हरकत नाही.
कॉपी विथ मॉडिफिकेशन्स.. कॉस्ट कमी..
त्याची गाणी सुद्धा अशीच असायची.. (की असतात? अजून गातो का?) जय जय महाराष्ट्र माझा

पण मजेशीर माणूस आहे.. (की होता? बरेच दिवस कुठे लाईव्ह पाहिले नाही त्याला)

नव्वदीच्या दशकातल्या हिंदी पॉप सारखे मराठीत तशी गाणी घेऊन आला.
शाहरुख खान ने आपल्या फॅन चित्रपटाचे टायटल सॉंग चे मराठी वर्जन गाण्याचा बहुमान त्याला दिला.

दिग्दर्शक विकी कौशल गेट अपमध्ये असताना त्याच्यासमोर बसायचा नाही, असं काय काय ऐकलं >> तो सेट सोडून इतरत्रही प्रत्यक्ष आयुष्यात विकीला राजे म्हणून, जणू तोच शंभूराजे असल्याप्रमाणे संबोधत होता. तिथेच म्हटलं आवरा! मग अक्षयला काय औरंग्या म्हणायचं का इतरत्र? काहीही फालतुगिरी.

With all due disrespect to the immature statements,
मला नेमकं लक्षात नाही, पण सैराटच्या शूटिंगच्या वेळी नागराज मंजुळेच्या सूचनेवरून रिंकू राजगुरूला स्पेशल वागणूक दिली जात होती, जेणेकरून तिचं व्यक्तिमत्त्व चित्रपटात जसं आहे, त्याला ते पूरक ठरेल, असं त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं असं आठवतंय. विकी कौशलसारख्या सीझन्ड नटाला याची गरज पडत नसणार. पण दिग्दर्शकाच्या काही भावना असतीलही.
अवधूत गुप्तेची पोस्ट, विशेषतः 'गटणे' वाक्य अतार्किक आहे हे बरोबर आहे, पण जाऊद्या! विकु म्हणतायत त्याला +१

विकी कौशल सोबत महाराज असल्यासारखेच वागणे यामागे,

१) खरेच भावना असू शकतात जसे लोकं राम सीतेच्या पाया पडायचे.
२) अस्सल अभिनय बाहेर यावा म्हणून वातावरण निर्मिती करणे हा हेतू असू शकतो.
३) एक मार्केटिंग फंडा असावा जेणेकरून चित्रपटाची हवा होईल.
आणि कदाचित हीच लाईन पकडून संतोष जुवेकर थोडा वाहावत गेला. त्यात तो मराठी असल्याने ट्रॉलिंगचे प्रमाण आपल्याकडे जरा जास्त आहे.

आम्ही चित्रपट बनवत नव्हतो. संभाजीराजांचं मंदिर बांधत होतो, असं काही म्हणाला ना तो?
मग पैसे घेतले नसतील ना?

संत्या मुद्दामून जवळीक वाढवतोय. जवळीक वाढवून वाढवून एक दिवस विकीच्या घरी जायचं आणि कतरीनाच्या हाताची बिर्याणी चेपायची असा प्लॅन आहे आपल्या संत्या भाऊचा.

देव्हारे माजवण्याच्या आपल्या लाडक्या छंदानुसार मंदिर बांधणं बरोबरच आहे. तसं सगळंच बरोबर आहे म्हणायचं. सुमार कलाकार, सुमार प्रेक्षक, सुमार फॉलोवर्स, सुमार नेते, सुमार समर्थक- सुमारांच्या राज्यात सगळं बरोबरच आहे. 'सुमारांची सद्दी' लेख पुन्हा नव्याने लिहायला पाहिजे.

यावरून आठवलं. नीलमताईंनी पुण्यातल्या शिवाजीनगरचं नाव बदलून 'छत्रपती शिवाजीमहाराज नगर' असं करण्याची मागणी केली आहे. ताईंना हे नवीन नाव २४ तासाच्या आत १०००० वेळा मराठी आणि इंग्रजीत लिहून दाखवण्याची गोड शिक्षा केली पाहिजे.

वावे आणि ऋन्मेष, चित्रीकरण चालू असताना वातावरण निर्मिती, मनाची तयारी वगैरे एक वेळ समजू शकतो, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुलाखती देताना राजे वगैरे म्हणणं अती वाटलं.

असो, विकूंचा मुद्दाही पटतोय. जाऊ द्या, सोडून देऊ आणि पुढे जाऊ.

Pages