चित्रपट "छावा" च्या निमित्ताने .... !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2025 - 10:31

नवा आहे.. पण छावा आहे.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. बॉयफ्रेंडचा समानार्थी शब्द छावा आणि गर्लफ्रेंड असेल तर छावी..
पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल.

निमित्त चित्रपट छावा - बघायला सात दिवस उशीरच झाला. पण या सात दिवसात जवळपास सत्तर परीक्षणे अधाश्यासारखी वाचून काढली. आणि या चित्रपटावर आधारीत सातशे रील्स बघितल्या. चित्रपटाची कथा ही ईतिहासाची जितकी आवड आहे त्यानुसार माहीत होतीच. पण ते दाखवणार कसे याची उत्सुकता होती.

गेले काही वर्षात जे काही मोठ्या बॅनरचे वीएफएक्सयुक्त ऐतिहासिक चित्रपट आले ते पाहता अपेक्षा फार नव्हत्या. ट्रेलर देखील तितका भारी वाटला नव्हता. विकी कौशलचे नाचणे सुद्धा रुचले नव्हते. त्यामुळे चित्रपट आल्यावर, चार लोकांचे रिव्ह्यू वाचल्यावर थिएटरला जावे की ओटीटी रीलीजची वाट बघावी हा निर्णय घ्यावा असे ठरवले होते. कारण वेळ आणि पैसा खर्च करताना विचार करावा लागतोच. पण वैयक्तिक आवड काहीही असली तरी आपल्या मातीतील पराक्रमी वीरांवर चित्रपट येत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा ईतिहास पोहोचत आहे हे चांगलेच घडतेय असे वाटत होते.

देर आये दुरुस्त आये. गाणे चित्रपटातून उडवले गेले. वीएफएक्सचे पराक्रम कमीत कमी होते. संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या अभिनयाच्या आणि दमदार संवादांच्या ताकदीवर उभे करायचे शिवधनुष्य विकी कौशलने लीलया पेलले. अन्यथा ट्रेलरमध्ये ओरडतानाच फार दाखवले होते. खरे क्षण आणि संवाद थिएटरसाठी राखून ठेवले होते.

येसूबाई म्हणून रश्मिका ऐवजी दुसरी कोणीतरी (श्रद्धा, शर्वरी, मृणाल) हवी होती अशी बरीच मते ऐकली. त्यात तथ्यही वाटले. पण असो, ते जर तर झाले. रश्मिका फार कमी पडली असे वाटले नाही. तिच्या ईतर दुसर्‍या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती यात छान दिसली.

औरंगजेब साकारणार्‍या अक्षय खन्नाने व्हिलन कॅटेगरीतील अभिनय वेगळ्याच उंचीला नेला. ना त्याने थयथयाट केला, ना तो निव्वळ थंड डोक्याचा खूनशी वाटला, ना तो विकी कौशलशी अभिनयाची जुगलबंदी करायला गेला. पण यापुढे औरंगजेब म्हटले की अक्षय खन्नाचे ते रुपच आठवावे असे काम करून गेला.

चित्रपटाची पटकथा प्रामुख्याने संभाजी राजे विरुद्ध औरंगजेब यावरच फोकस ठेवून लिहीली गेली होती. त्यामुळे या दोघातील एक अभिनेता जरी कमी पडला असता तर पुर्ण चित्रपट सपक झाला असता. पण तसे व्हावे ही श्रींची ईच्छा नव्हती.

या दोघांनी संवाद छान म्हटले पण मुळात ते होतेही तितकेच दमदार. कवी कलश यांनाही छान संवाद मिळाले जे गरजेचे होते. चित्रपटाच्या शेवटी कथानायक संभाजीराजे हे जग सोडतात आणि खलनायक औरंगजेब जिवंत राहतो. पण तरीही विजय संभाजीराजे यांचाच होतो आणि औरंगजेब हरतो हे प्रेक्षकांपर्यंत त्या संवादातूनच परीणामकारक पोहोचते.

पण, चित्रपट परीपुर्ण नाहीये. अडीच तासाच्या चित्रपटात संभाजी राजेंचा ईतिहास बसवणे तसे अवघडच होते. कदाचित म्हणून सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून केली. पण त्यानंतरही पुढच्या दोन अडीच तासात जे दाखवले त्यातले बरेच काही कमी करून ईतर बरेच काही दाखवता आले असते. ज्यातून संभाजी राजेंचे व्यक्तीमत्व आणखी चांगल्या प्रकारे खुलून आले असते. तसेच ईतिहासाची अजून चार पाने लोकांपर्यंत पोहोचली असती. त्यामुळे एकंदरीत विचार करता काही इन्डिविज्युअल पर्फॉर्मन्सेस एकत्र आले आहेत, पण एक चित्रपट म्हणून बरेच काही कमी पडले असेही वाटले.

पण, हे ही नसे थोडके. चित्रपट संपल्यावर भले लोकं साश्रू नयनांनी मूकपणे बाहेर पडली असतील, पण घरी जाऊन प्रत्येक कुटुंबात यावर चर्चा झाली असेल. मोठ्यांनी आपल्याकडील ईतिहासाच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली असेल. तर लहानग्यांनी ते ऐकले असेल. या चित्रपटाचा प्रभाव तितका नक्कीच पडला आहे आणि हे सुद्धा महत्वाचे आहे. अन्यथा स्वानुभावावरून सांगतो, शाळेत असताना गणित, विज्ञान, भाषा, भूगोल अश्या जीवनोपयोगी विषयांसोबत ईतिहास हा तितकासा महत्वाचा नसलेला विषय दरवर्षी का शिकवला जातो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. ईतिहास शिकण्याचे महत्व कधी कोणी सांगितलेच नाही. पण कालांतराने स्वत:हून समजले की खरे ज्ञान हे पुस्तकी नसून जे आयुष्य आपल्याला शिकवते ते असते, आणि ते आपण ईतिहासातील चुका आणि अनुभवातूनच शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला ईतिहास माहीत हवाच.

पटकथा संकलन वगळता ईतर कमतरता या चित्रपटाच्या प्रभावापुढे मला तरी गौण वाटल्या. पण तरीही ए आर रेहमानच्या संगीताबद्दल मात्र असे का झाले किंवा त्याने असे का केले हा प्रश्न अजूनही सतावत आहे. पार्श्वसंगीताच्या नावावर सतत काही अरेबियन बायका व्हिवळत होत्या. औरंगजेबाच्या द्रुश्यांना ते चालून गेले. त्याकडे बघून चीड यावी म्हणून असे चीड आणनारे संगीत वाजवले गेले असावे. पण आपल्याकडच्या दृश्यांना का हे आचरट प्रयोग केले? लढाईच्या दृश्यांना सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून असाच आरडाओरडा चालू होता. ऊपकार एकच केले ते म्हणजे क्लायमॅक्स दृश्यात कुठले प्रयोग न करता संयम बाळगला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अपवाद वगळता संगीत कुठे मराठमोळे, आपल्या मातीतील वाटलेच नाही आणि हा अक्षम्य अपराध ठरावा. ज्याला जबाबदार केवळ ए आर रेहमानच नाही तर दिग्दर्शक सुद्धा तितकाच ठरतो. आणि म्हणूनच छावाचे परीक्षण अजय-अतुल यांची आठवण काढल्याशिवाय अपुर्णच!

असो,
कित्येक चित्रपटगृहात लोकं महाराजांचा जयघोष करत आहेत, तर चित्रपट संपल्यावर खणखणीत आवाजात महाराजांची गारद म्हटली जात आहे. याचे विडिओ सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. यामागे काही प्रमाणात फॅड सुद्धा असावे पण महाराजांप्रती तितकेच प्रेम आणि आदर असलेल्या लोकांची या महाराष्ट्रात वानवा नाही. राष्ट्रगीत संपताच जसे उत्स्फुर्तपणे भारतमाता की जय म्हणावेसे वाटते, कोणी गणपती बाप्पा म्हटले की आपसूक तोंडातून मोरया बाहेर पडते, तीच ताकद "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणेत आहे. त्यामुळे हे निव्वळ फॅड नसून कित्येकांना खरेच हे एका उत्सवासारखे वाटत असावे.

कित्येक दिवसांनी सकाळचा पहिला शो पहिल्या रांगेपासून हाऊसफुल झालेला पाहिला. तिकीट बूक करताना आदल्या रात्रीचा साडे अकरा वाजताचा शो जो मध्यरात्री अडीच वाजता संपला असता तो सुद्धा हाऊसफुल झालेला पाहिला. राष्ट्रगीत संपल्यावर भारतमाता की जय पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लोकांनी चित्रपट बघायला सुरुवात केली. संभाजी राजेंनी सिंहाचा जबडा फाडताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजून काही मोजक्या प्रसंगी त्या आल्या पण त्यात कुठेही नेहमीच्या टपोरी शिट्ट्या नव्हत्या. आपण जवान चित्रपट नाही तर छावा बघत आहोत याचे भान लोकांना कायम होते.

क्लायमॅक्सला मात्र एकाही संवादावर टाळी आली नाही. टाळी तर दूर कोणी एक शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कारण पुढे आपण काय बघणार आहोत आणि याचा शेवट काय होणार आहे हे लोकांना माहीत होते. चित्रपट अगदी योग्य फ्रेमवर थांबला. जरी लोकं मूक झाले असले तरी ती प्रत्येकाला स्वराज्य अभिमानाची गाथा वाटावी असाच शेवट होता. आणि मग जे आपल्या थिएटरमध्ये देखील घडावे अशी ईच्छा होती ते घडले. एका लहान मुलाने गारद म्हणायला सुरुवात केली आणि ती पुर्ण होईपर्यंत लोकं शांतपणे आपल्या जागी ऊभे राहिले. ज्या संभाजी राजेंवर शालेय ईतिहासाच्या पुस्तकाने देखील अन्याय केला त्यांच्या छावा चित्रपटानिमित्त हे दृश्य बघणे आणि अनुभवणे नशिबी आले...

धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा धन्यवाद, वाक्य करेक्ट केले. मी त्या शब्दाचा अर्थ वेगळा समजत होतो. आता मला शोधायला हवे मी आधी कुठे तो वापरला आहे का Happy

मी अजूनही हा चित्रपट पाहिलेला नाही. पण थोरातांची कमळा हा चित्रपट पदवी मिळाल्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. अजूनही तो क्षण आठवतो.

चांगले परीक्षण.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. >> छावा कादंबरी खूप लहानपणीच हातात पडल्यामुळे छावा म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर संभाजी महाराजच येतात.
एके ठिकाणी चुकून 'वाणवा' शब्द टायपलेला दिसतोय, तो 'वानवा' हवाय.

शर्मिला चामुंडराय धन्यवाद
चुका दुरुस्त केल्या..
दृश्य शब्द टायपो झाला ते काल काम करताना लॅपटॉपवर लिहित होतो. त्यात ते बरोबर उमटत नव्हते. आता मोबाईल वापरून बदलले.

छावा कादंबरी कुठे वाचायला मिळते का हे बघावे लागेल. सध्या वाचनाची आवड बिलकुल राहिली नाहीये पण प्रकर्षाने तसे वाटत आहेत.

थोरातांची कमळा हा चित्रपट पदवी मिळाल्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता.
>>>>
हा किती सालचा चित्रपट होता? मला खूपच लहानपणी आईच्या कुशीत झोपून चित्रपट बघायचो तेव्हा दूरदर्शनवर बघितल्याचे आठवतेय..

संजय भावे जरूर
सध्या जितकी हवा झाली आहे ते पाहता अपेक्षा खूप वाढवून कोणी जाऊ नये इतकेच म्हणेन.
या आधी मी अजय देवगणचा तान्हाजी पाहिला होता आणि ऐतिहासिक चित्रपट बघायचा मूड ऑफ झाला होता. त्यापेक्षा नक्कीच हा उजवा आहे.

>> "सध्या जितकी हवा झाली आहे ते पाहता अपेक्षा खूप वाढवून कोणी जाऊ नये इतकेच म्हणेन." <<
अर्थातच... अपेक्षाभंगाचे दुःख फार मोठे असते 😀 त्यामुळे कुठल्याही अपेक्षा न बाळगता आज 'छावा' बघणार आहे!

>> "या आधी मी अजय देवगणचा तान्हाजी पाहिला होता आणि ऐतिहासिक चित्रपट बघायचा मूड ऑफ झाला होता." >>
मी 'डंकर्क' हा अत्यंत सुमार चित्रपट पाहिल्यापासून ऐतिहासिक सत्यघटना/व्यक्तिमत्वे वगैरेंवरचे कुठल्याही भाषेतले चित्रपट, चित्रपटगृहांत जाऊन पाहण्याचा धसकाच घेतला आहे, पण ह्या चित्रपटाबद्दल बरेचकाही चांगले ऐकल्यामुळे आज पुन्हा एकदा ते धाडस करणार आहे 😀

विकीच्या जागी अमोल कोल्हे असते तर अजून वास्तवदर्शी वाटला असता
>>>
आमच्याकडे टीव्ही नसल्याने कधी पाहिली नाही ती मालिका.
पण हिंदी चित्रपट म्हटले की तसाच लोकप्रिय कलाकार हवा. विकी कौशल लढाई दृश्यात देखील तितकाच विश्वासार्ह वाटला. शेवटच्या अटकेच्या लढाईत तो एकटा मुघल सैन्याला आवरत नव्हता तो सीन सुद्धा छान जमून आला आहे. विकी कौशलची कास्टिंग अचूक आहे. तसेच उरी चित्रपटामुळे त्याची तशीच देशभक्त इमेज लोकांच्या मनात ठसली आहे त्याचा देखील फायदा होतो.

शेवटच्या अटकेच्या लढाईत तो एकटा मुघल सैन्याला आवरत नव्हता तो सीन सुद्धा छान जमून आला आहे.>>>>> खरे आहे, सनी देओल नंतर अशा हाणामारीत विकिच कन्व्हिन्सिंग वाटतो

शेवटी पायाचे साखळदंड तुटणार आणि औरंग्याच्या सणसणीत पेकाटात लाथ बसून औरंग्या पंधरा वीस फूट उडत जाणार हे असतं तर अजून हिट झाला असता.

जो इतिहास रक्तरंजीत आहे तो मुलांना दाखवावा का असा प्रश्न बरेच ठिकाणी उपस्थित होत आहे.

पण माझ्यामते अंगावर येणारी हिंसा नाहीये या चित्रपटात.
अर्थात प्रत्येकाची मते आणि निकष वेगळे असू शकतात.
पण हिंसा कशी दाखवली आहे आणि ती दाखवतानाचा तसेच होतानाचा उद्देश्य काय आहे हे मॅटर करते असे वाटते.
अन्यथा रामायण महाभारतात सुद्धा युद्ध आणि हिंसाचार होतेच, स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा होते, भारत पाकिस्तान युद्धावरील चित्रपटात सुद्धा आहेच.

पेकाटात लाथ बसून औरंग्या पंधरा वीस फूट उडत जाणार हे असतं तर अजून हिट झाला असता>>> Happy
खरंच तस असत तर त्यापेक्षा जास्त बरच काही बदललं असतं

अन्यथा रामायण महाभारतात सुद्धा युद्ध आणि हिंसाचार होतेच, स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा होते, भारत पाकिस्तान युद्धावरील चित्रपटात सुद्धा आहेच. > >
चित्रपटाला १६+ रेटींग असेल तरी वरचा युक्तीवाद करावा का?

चित्रपटाला १६+ रेटींग असेल तरी
>>
ऍक्च्युली मला नक्की कल्पना नाहीये हे १६+ रेटिंग काय असते. कारण थिएटरमध्ये आठ दहा वर्षाच्या मुलांना सुद्धा सोडतात..

कारण थिएटरमध्ये आठ दहा वर्षाच्या मुलांना सुद्धा सोडतात..>> आधी त्यावर धागा काढायचा सोडुन चित्रपट परिक्षणाचा काढलास.
आता कुणावरच विश्वास राहिला नाही. सब मिले हुए है। Sad

खरं तर मला वाटत होतं की १६ + रेटींग म्हणजे १६ वर्षां पेक्षा अधिक वय असलेल्यांना च परवानगी. पण विकीवर बघता ते तसे नाहीये. चित्रपटाला U/A १६ + असं रेटिंग आहे. म्हणजे १६ पेक्षा कमी वय असलेल्यांना पॅरेंटल गायडंस मधे बघता येईल. म्हणूनच थेटरवाले सोडत असावे लहान मुलांना..

UA 16+ – Unrestricted public exhibition, but with parental guidance for children below the age of 16 years.

but with parental guidance for children below the age of 16 years.
>>>>

मग ओके आहे हे. लोकं आपल्या मुलाना सोबत घेऊन जाऊ शकतात. एकटे पाठवू नये.

सरांचं एक बरं असतं. अंगाशी आलं कि त्यांना इंग्लिशमधले काही शब्द कळत नाहीत. सेन्सॉर बोर्डाची सर्टिफिकेट्स कळत नाहीत. मराठीतले, एरव्ही सगळ्यांना माहित असलेले संदर्भ कळत नाहीत. पण बाकी जगात कुठेही काहीही घडलेलं असलं कि ते ह्यांच्या बाबतीत, पर्सनल आयुष्यात, घरात, चाळीत ऑलरेडी घडून गेलेलं असतं. सर लिहितात आणि दर वेळी कुणीतरी ह्या जाळ्यात अलगद सापडतं. मज्जानू लाईफ!! Happy

इथे नक्की काय कळत नाही म्हणालो आहे?

एक मात्र कळत नाही.
त्या अश्लील विनोदाच्या धाग्यावर असे व्हिडिओ मुलाना सहज बघायला मिळतील अश्या जागी नको म्हटले तर मुले काय कुठूनही बघतात असे युक्तीवाद सुरू होते.

पण तेच इतिहास रक्तरंजीत आहे. त्यात नॉर्मल युद्ध हत्या दाखवले आहे जे कुठल्याही ॲक्शन मूवी मध्ये हल्ली असतेच तर ते दाखवल्याने मात्र बालमनावर काय परिणाम होईल याची चिंता आहे.

अर्थात एकच व्यक्ती हे दोन्ही करत आहे असे नसेल, पण बहुतांश सूर असा उमटत असेल तर नक्कीच आपण समाज म्हणून आत्मपरीक्षण करायला हवे.

अश्लील विनोदाच्या धाग्यावरही अगदी सुरुवातीलाच लोकांनी लिहिलं आहे, की तुमची मुलं फोनवर , नेटवर काय बघतात ही तुमची जबाबदारी.
म्हणजे छावा बघताना जसा जो parental guidance आहे, तो तिथेही आलाच.

एके ठिकाणी मुलं असं बघतील, म्हणून असलं काही असूच नये आणि दुसरीकडे हत्या नॉर्मल युद्ध असं म्हणून ते लहान मुलांनी बघणं नॉर्मलाइज करणारी व्यक्ती एकच आहे. याचे परिणाम आपल्याला याच जन्मात बघायला मिळतील.

मी गेलो होतो सहा वर्षाच्या पोरीला घेऊन. पोरगी त्यांना शिवाजी महाराजच समजत होती आणि अधूनमधून छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत होती. काय विपरीत परिणाम वैगरे नाही झाला.

या परीक्षणात काही विशेष नाही. मायबोलीवरच जे अभिप्राय आले आहेत, त्यापेक्षा वेगळं काही नाही. त्यातून चित्र पट प्रदर्शित होऊन आठ दिवस झाल्यावर पाहून आलेले परीक्षण म्हणजे आता त्याची उपयुक्तताही तशी नाही.

छावा बघितला. क्लायमॅक्स येई तोवर युद्ध आणि मारामारीची रँडम दृष्ट्ये आहेत आणि मधेमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातील त्रोटक संवाद. ऐतिहासिक सिनेमा असून अत्यंत कमी ऐतिहासिक तपशील आहेत सिनेमात. शेवटच काय तो एनव्हिजन करून स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय दाखवायचे असा प्रश्न दिग्दर्शकाला पडलाय आणि हि पोकळी अचाट युद्ध मारामाऱ्यांच्या सिन्सनी भरून काढलीये.

>> "शेवटच काय तो एनव्हिजन करून स्क्रिप्ट लिहिली आहे." >>
+१
अगदी वाह... वा, छान... छान वगैरे म्हणण्यासारखा नाही, पण मला एकंदरीत बरा वाटला हा चित्रपट! म्हणजे निदान वेळ आणि पैसे वाया गेल्यासारखा तरी नक्कीच नाही वाटला 😀

@ भरत
तुम्ही छावा चित्रपट पाहिला आहे का?
तसेच तो अश्लील विनोदाचा शो पाहिला आहे का?
त्यानंतरच दोघांची तुलना करा. उगाच मला विरोधाला विरोध म्हणून दोन्ही एका पारड्यात तोलू नका.

Pages