गूढ नजर - एक वेगळी‌ रहस्यकथा

Submitted by प्रथमेश काटे on 22 January, 2025 - 07:03

गूढ नजर - एक आगळी रहस्यकथा

रात्रीचे साडेसात वाजलेले. मृणाल हॉलमधल्या सोफ्यावर बसून तिची आवडती सिरीयल बघत होती. तिचा नवरा अमित आज सकाळीच ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. आता पुढचे काही दिवस, मृणाल घरात एकटीच होती. पण, खरंच ती एकटी होती का ?
नाही. तो होताच की तिच्यासोबत. तो, आणि त्याची ती नजर. सतावणारी, सारखी अस्वस्थ करत राहणारी. आताही, तो सोफ्यावर तिच्या शेजारीच बसला होता. टीव्ही बघत होता, आणि अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. मृणाल सिरीयलवर मन एकाग्र करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. पण तिचंही सगळं लक्ष त्याच्याकडेच लागलेल. बिचारीला अगदी जखडून टाकल्यासारख वाटत होतं.
हे सर्व केव्हापासून सुरू होत, हे तिलाही नीट सांगता आलं नसतं. पण आता एवढ्यातच या सगळ्याला सुरुवात झाली होती, एवढ नक्की. तो कोण आहे ? त्यांच्या घरात कसा शिरला ? ते कळायला काहीच मार्ग नव्हता. अमित घरी असतानाही ' तो ' सतत तिच्या आजूबाजूला असायचाच, पण अमितच्या नजरेस कधीच पडला नाही. कधी अमित हॉलमध्ये बसला असेल, आणि ती किचनमध्ये असेन अशावेळी अचानकपणे तो तिच्या जवळ प्रकट व्हायचा. ती अमितला हाक मारायची, पण अमित किचनमध्ये पोहोचण्याआधीच तो गायब.
‌मृणालने हलकेच मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या कडेच पाहत मिष्कीलपणे हसत होता. त्यामुळे तर ती अजूनच घाबरली. नाही, त्याच हसणं भेसूर वैगेरे नव्हतं. उलट तिला त्याच्या हसण्याची, भुरळच पडली होती. स्वत: मृणाललाही त्याबद्दल आश्चर्य वाटायचं. एकदा अमितशी बोलताना ती म्हणाली होती - ' त्याची भीती वाटत असली, तरी तो हसताना मात्र खूप क्यूट दिसतो. तेव्हा त्याच्याकडे पाहत राहावंसं वाटत.' ते ऐकून अमितचा चेहराही ' पाहण्यासारखा ' झाला होता. पण जेव्हा ' तो ' असा हसतो, तेव्हा त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिजत असतं, हे तिला नंतर अनुभवाने समजू लागल होतं. कारण हसल्यावर तो असं काहीतरी करायचा, ज्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. ती दचकायची, किंचाळायची. त्यामुळे नंतर नंतर त्याच्या हसण्यानं मोहवून जाण्याऐवजी ती सावध राहू लागली. पण त्याचा फायदा व्हायचा नाही. त्याला जे अपेक्षित होतं तेच व्हायचं. ती घाबरायची. तसं अजून तरी त्याने फार भयंकर असं काही केलं नव्हतं, पण त्याचा काय भरवसा.
हाताची मुठ घट्ट आवळून, सावध होऊन मृणाल शांतपणे बसली होती. मघाशी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होती, पण आता डोळ्यांच्या कडांनी अधूनमधून त्याच्यावर नजर टाकत होती. कान त्याच्या हालचाली ऐकण्यासाठी टवकारले होते. इतक्यात लाईट गेली आणि तिच्या मनावरचा तोल ढळू लागला. तिने मूठ अजूनच जोरात दाबली. बाजूला हालचाल झाल्यासारखं तिला वाटलं. पाठोपाठ ' त्या ' च्या खुसखुसत हसण्याचा आवाज. इतक्यात तिच्या खांद्यावर काहीतरी पडले. मृणालने घाबरून ओरडत खांदा झटकला. अर्ध्या मिनिटात लाईट आली. तिने वाकून खाली जमिनीकडे पाहिलं. एक कोळीण लादीवर पडली होती. काळीकुळकुळीत, अनेक पायांची, भयानक ; पण नकली. तिने कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा त्याच्या हसण्याचा आवाज आला. तिने त्याच्याकडे बघितलं. आता तो मोकळेपणाने, खळखळून हसत होता. मृणाल सावरून बसली. आणि मख्खपणे त्याच्याकडे बघू लागली. तिचा चेहरा.. पूर्ण कोरा होता. तो अजूनही हसतच होता. अचानक -
मृणालने त्याचे दोन्ही दंड पकडून, त्याला जवळ ओढले. आणि आवेगाने त्याच्या कपाळ, गाल, हनुवटीचे मुके घेऊ लागली. चिंटू आईच्या प्रेमाच्या अनपेक्षित वर्षावाने सुखावला.

" बदमाश झालायेस अगदी. मी किती घाबरले होते, माहिती आहे ? " त्याचा गालगुच्चा घेत ती म्हणाली.

" ममा, मी तुझ्या खांद्यावर खरा स्पायडर टाकेन का कधी ? माझी लाडकी ममा आहेस ना तू." तो आपल्या गोड आवाजात, लाडाने म्हणाला.‌ त्याचे ते शब्द ऐकताच तिने आवेगाने त्याला अजूनच जवळ ओढलं. आणि छातीशी कवटाळून धरलं.

समाप्त
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नक्की चिंटू का पिंटू (मुलगा) अमितचाच होता ना कि मृणाल च्या आधीच्या प्रियकरापासूनचे अपत्यं .>> हे भगवान! Lol
ही गंमतीदार रहस्य कथा आहे की गमतीदार विबासं रहस्य कथा आहे?

मुलगा आपल्या बापाला आयुष्यात कधीच दिसला नाही असे नाहीये ते...
तर खोड्या केल्यावर तों पळून जातो त्यामुळे त्यावेळी तो कधी दिसला नाही..

काही मुले खरीच अशी असतात की ठराविक लोकांसोबत खोड्या करतात आणि ठराविक लोकांसमोर शांत असतात.. त्यामुळे त्यांना पटतच नाही हे की हा मुलगा किती खोडकर आहे ते..

असो, मी आजारांची नावे गमतीने घेतली होती.
हलकी फुलकी शेवटी गमतीशीर ट्विस्ट असलेली कथा आहे.
एखाद्याला आवडली नाही तर काही हरकत नाही पण एखाद्या मर्डरमिस्ट्री सारखे लूप होल शोधत प्रत्येक शब्दाला पकडायची गरज नाही असे वाटते.

हे माझे प्रामाणिक मत आहे. लेखकाची बाजू घ्यावी म्हणून म्हणत नाहीये. त्याचे मला पैसे मिळत नाहीत.

0436b10ea5501b2022140b797333a406.jpg

मला आवडली आता. वेगळाच प्रयत्न आहे. वाचकाला भीतीच्या भावभावनांतून नेउन मग शेवटी धक्का देणे. फक्त भेसूर या शब्दाला माझा आक्षेप आहे.

कथा एक नवीन प्रयत्न म्हणून ठीक.
आवडली नाही किंवा आवडली हे वेगळे...
पण कोणाचाही एकेरी उल्लेख हे नक्कीच नाही आवडले. पुवाशु !!

मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे. ज्याचे उत्तर Admin यांनी दिले तरी आवडेल.

ती पोस्टरवरची बाई कोण आहे?
तो फोटो कॉपी राईट मुक्त आणि पब्लिक फोरम वर कथेत वापरू शकतो असा आहे का?

@ऋन्मेssष - सर जर कथेच्या कव्हर फोटोविषयी विचारत असाल, तर तो मी ai website वरून जनरेट केला आहे. त्याबद्दल ॲडमिशन कसं सांगू शकतील ?

•••••••

पण कोणाचाही एकेरी उल्लेख हे नक्कीच नाही आवडले. >> कुणाबद्दल बोलताय ? त्या डिफरंस विषयी म्हणत असाल तर तुम्ही प्रतिक्रिया वाचल्या असल्यास ध्यानात येईल कि त्याने थेट उद्धटपणा करायला सुरुवात केली. तरी सुरूवातीला मी थोडं सभ्य रीतीने माझी मते मांडत होतो ; पण त्याचा आगाऊपणा वाढतच गेला. आणि ही कथा जरी मी लिहीली असली तरी प्रत्येक प्रतिक्रियेला लेखकाने व्यवस्थितच प्रतिसाद द्यावा असा कुठे नियम नाही. मलाही अरे ला कारे करता येतं.

पुवाशु !!>> धन्यवाद

तर तो मी ai website वरून जनरेट केला आहे
>>
हे बेस्ट..
याची कल्पना नव्हती.
शंका मिटली Happy

Submitted by फार्स विथ द डिफरंस on 23 January, 2025 - 17:57>>> इमोजी टाकायची राहून गेली आणि प्रतिसाद संपादायची वेळ टळून गेली. ---> Rofl

>>>>>>>>>तो कोण आहे ? त्यांच्या घरात कसा शिरला ? ते कळायला काहीच मार्ग नव्हता.
असे का लिहीलेले आहे? हे वाक्य कळले नाही.

कमाल आहे
लोक बॉलिवूड आणि साऊथ चे बिनडोक सिनेमे पैसे देऊन किंवा झोप मारून बघतात
इथे हलक्या फुलक्या कथा मोफत वाचायला मिळाल्या तर लगेच त्याचा किस पडायचा....?

काटे तुम्ही कथेवर लक्ष ठेवा
प्रतिक्रिया फार मनावर घेऊ नका

असे का लिहीलेले आहे? हे वाक्य कळले नाही. >> वाचकाने काहीतरी तिसराच निष्कर्ष काढावा म्हणून तसे लिहिले आहे. अर्थात लेखकाने आपल्याच कथेतल्या गोष्टी इतक्या उलगडून सांगणं कदाचित उचित होणार नाही ; पण वाचकांनाही नीट समजणे आवश्यक आहे. असो, थॅंक्यू Bw

इथे हलक्या फुलक्या कथा मोफत वाचायला मिळाल्या तर लगेच त्याचा किस पडायचा....? >> तेच तर. अर्थात माझी कथा रहस्यकथा म्हणून परिपूर्ण नाही हे मी मान्य करतो. वाचकांनी आवडली नाही तर तसं थेट सांगूच शकतात. काय नाही आवडलं हे सांगितल्यास आधिकच उत्तम ; पण एक तर गंडलीच आहे असा निर्णय देऊन समीक्षक बनायला जाऊ नये. त्यासाठी निराळीच बुद्धिमत्ता अन् योग्यता लागते. आणि लूपहोल्स असतील, तर तेही दाखवून द्यावेत. त्या डिफरेन्स का रेफरन्स सारखी खिल्ली उडवू नये.

>>>>>>तो कोण आहे ? त्यांच्या घरात कसा शिरला ? ते कळायला काहीच मार्ग नव्हता.
तीसर्‍यांदा विचारते आहे.
या वाक्याचा अर्थ काय?

कथेत लूप होल्स आहेत पण कथेचा प्लॉट चांगला आहे.Ai ने चित्र टाकायची आयडिया चांगली आहे. प्रताधिकाराचा प्रश्न येणार नाही बहुतेक.
तुम्ही कथेवर लक्ष ठेवा
प्रतिक्रिया फार मनावर घेऊ नका+1

तीसर्‍यांदा विचारते आहे.
या वाक्याचा अर्थ काय?>> तेच तर सांगतोय. वाचकाने काहीतरी तिसराच निष्कर्ष काढावा म्हणून तसे लिहिले आहे.

@सिमरन - थॅंक्यू. आणि तसा प्रयत्न करीन Bw

Pages