
रक्तपिपासू
भाग ९
वाड्याचं उंच, लोखंडी फाटक फक्त लोटून घेतलेलं होतं. जराशी विचित्रच गोष्ट ; पण तिला हेच तर अपेक्षित होतं. तिने पूर्ण ताकदीने फाटकाची पालं पुढे ढकलली. ते गंजलेलं फाटक मोठ्याने करकरत आत लोटलं गेलं. रूपालीच्या समोर वाड्याचा उंच, काळपट आकार उभा होता. क्षणभर जागीच थांबून ती वाड्याकडे पाहू लागली. वाड्याचं आताचं खरं रूप येताजाता, अनेकदा तिच्या नजरेस पडत होतं. अंगणात सगळीकडे तण माजलेलं. बाहेरच्या भिंतींचा रंग, पार विटलेला. भिंतीला जागोजागी चिरे पडले होते. खिडक्यांची काचेची तावदाने फुटली होती ; पण रात्रीच्या काळोखात आपलं विद्रूप ध्यान लपवून वाडा रूबाबात, ताठ उभा होता. जणू तो आता याक्षणीही पूर्वी इतकाच सुंदर आणि भक्कम असावा. रूपाली हळूवार पावलं टाकत अंगणात आली, तर तळपायाला दगडी फरशीचा गारेगार स्पर्श झाला. ती आश्चर्याने थबकली. अन् त्यामुळेच एका बाजूने थोड्या अंतरावरून येणारा चाफा, गुलाब, जाई इत्यादी फुलांचा संमिश्र सुवासही तिला जाणवला. तिच्या आश्चर्यात भरच पडली. या आंधळ्या जाणिवांवरून, असं वाटत होतं की, वाडा पूर्वी जसा असेल, तसाच झाला आहे. अंगणात हिरव्यागार लॉन मधून निघणारी फरसबंद पायवाट आहे. शेजारी निरनिराळ्या, सुवासिक फुलांनी लगडलेली बाग आहे. आणि हा समोरचा वाडाही आधी सारखा...; पण हे कसं शक्य आहे. या प्रश्नाने मनावरची धुंदी जराशी उतरली. ती बावरून इकडे तिकडे पाहू लागली. तिची नजर जरा वर गेली. वरच्या मजल्यावरील, उजव्या बाजूच्या खिडकीत पिवळसर प्रकाश दिसत होता. क्षणात मनाची चलबिचल थांबली. नाही.. हे शक्यही नाही. आणि तिला या साऱ्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. मनातली बेचैनी ओरडून सांगत होती. ती तरातरा चालत पोर्चच्या पायऱ्या चढून दारापाशी आली. आणि सहज दरवाजा ढकलला. जणू हेही तिला माहितीच होतं ; पण कसं...? हे मात्र तिला सांगता आलं नसतं.
आतला भाग पूर्णपणे काळोखात बुडालेला. काहीही दिसत नव्हतं. मात्र इंद्रियांना आसपासचं वातावरण, जणू कशाने तरी भारल्यासारखं वाटत होतं. चार पावलं टाकायची म्हटली, तरी एखादा बिचकला असता ; पण रूपाली क्षणाचाही विचार न करता चालू लागली. थोडं पुढे जाऊन वळली. हात उचलून तिने बाजूचा कठडा पकडला, आणि पायऱ्या चढून वर गेली. आणि एका दरवाजापाशी येऊन थांबली. आता मात्र काय करावं, याबद्दल मनात चलबिचल सुरू झाली. इतक्यात -
" काय झालं ? ये की आत."
आतल्या बाजूने एक पुरूषी आवाज आला. चटकन दरवाजा लोटून तिने आत पाऊल टाकलं. छतावरील झुंबराचा लख्ख उजेड खोलीभर पसरला होता. त्याखालीच, तिच्यासमोर एक मोठा नक्षीदार पलंग होता. खोलीचा एकूण थाटमाट पाहून अचंबित होत असतानाच तिची नजर, पलंगाशेजारी पाठमोऱ्या उभ्या असलेल्या पुरूषाकडे गेली. उंच, दणकट शरीरयष्टी. केस मानेपर्यंत लांब. काळ्या रंगाचा, पायघोळ जाकीट परिधान केलेला. ती जागीच खिळून बघत राहिली. त्याने अलगद आपली मान वळवली, आणि त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले -
"तिथेच का उभी राहिलीस ? ये ना पुढे."
त्याच्या दणकट, घुमावदार आवाजातही किती कोमलता होती. पडत्या फळाची आज्ञा मानून ती लगेच पुढे झाली. त्याच्या मागे थोड्या अंतरावर उभी राहिली. उत्तेजनेने तिची छाती धडधडत होती. काय होईल ? हा विचार मनाला गोड हुरहूर लावत होता. कधी एकदा 'तो' आपल्याकडे वळतो, असं तिला झालं होतं. आणि मग... हलकेच तो मागे वळला. रूपाली त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. दाट काळेभोर केस, धनुष्याकृती, जराशा दाट भुवया, टपोरे डोळे, सरळ, लांब नासिका आणि ओठांवरचं हळूवार हास्य, अशा त्याच्या रूपाने एखाद्या तरूणीची नजरबंदी न केली तरच नवल ! विशेषतः त्याची ती नजर. पाहता पाहता ती त्या नजरेत गुंतली होती ; पण मग ती जराशी भानावर आली. तो संथ पावलांनी तिच्या जवळ येऊ लागला. तिच्या उरातली धडधड अजूनच वाढली..
क्रमशः
© प्रथमेश काटे
खरंतर हा भाग दोन दिवसांपूर्वी पूर्ण करून माझ्या ग्रुप वर अपलोडही केला होता ; पण इथे अपलोड करायला यावेळी विसरलो. क्षमस्व.
छान पटापट येऊ द्या भाग
छान
पटापट येऊ द्या भाग
छान!
छान!
संथ पावलांनी तिच्या जवळ येत होती.
>>>> ईथे जरा अडखळल्यासारखं झालं.
लक्षात आणून दिल्याबद्दल
लक्षात आणून दिल्याबद्दल थॅंक्यू. सुधारणा केली आहे.