डास/मच्छर मारायचे रॅकेट कुठले घ्यावे? घ्यावे की न घ्यावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2024 - 15:33

माझे बालपण मुंबईत गेले. त्यामुळे मुंबई उपनगरात किंवा पुण्यात राहणारे नातेवाईक जेव्हा मच्छरांच्या त्रासाबद्दल बोलायचे तेव्हा असे वाटायचे की राईचा पर्वत करत आहेत. किती तो क्षुद्र जीव. आला समोर, मारला एका टाळीत, आणि टाकला वाळीत.

पण नवी मुंबईत राहायला आलो तसे हळूहळू त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसायला लागला. जेव्हा स्वताला चावायला लागले तेव्हा जाणवायला लागले. त्यामुळे चार वर्षे भाड्याच्या घरात राहून नंतर हक्काचे घर विकत घेताना मच्छरांचा फार त्रास होणार नाही याचा विचार करूनच घेतले. आणि तितका तो झालाही नाही. अर्थात थंडीचा सीजन येता संध्याकाळी जाळीच्या खिडक्या लावायची काळजी घेणे हे तेवढे एक रुटीन झाले. पण ते वगळता विशेष काळजी घ्यावी असा त्रास नाही. त्यामुळे एकूणच या विषयात काही सखोल ज्ञान वा अनुभव नाहीये.
-
पण गेले काही दिवस सोसायटीमध्ये उद्यान सुशोभिकरणाचे काम चालू असल्याने दिवसाढवळ्याच काही मच्छर घरात घुसू लागलेत. जे संध्याकाळ होताच रक्ताच्या शोधात आक्रमण करू लागलेत. त्यांना अटकाव करायला म्हणून संध्याकाळ होण्याआधीच बाल्कन्या बंद करायच्या हे पटत नाही. किंबहुना संध्याकाळीच तर बाल्कन्या उघड्या ठेवत तिथे बसायला मजा येते. पण सध्या ती सजा झाली आहे. असे वाटते जणू ते मच्छर कानापाशी येऊन गुणगुणताहेत "तुम मुझे खून दो.. मैं तुम्हे खिडकी खोलने की आजादी दूंगा..!

असो,
तर याआधी कधी मच्छरांना मारायला किंवा हुकसवायला अघोरी उपाय केले नव्हते. मुले लहान असताना घरात गूडनाईट अध्येमध्ये लावले जायचे ते सवयीनेच. मच्छरांचा विशेष त्रास होतोय म्हणून नाही. पण गेले काही दिवस नवीन गूडनाईट आणून लावले. आणि लक्षात आले की काळ बदलला आहे. हल्लीच्या जेन-अल्फा मच्छरांना गूडनाईटची सवय झाली आहे. काही मच्छरांच्या अंगात तर एवढा किडा आढळला की ते गूडनाईटवरच जाऊन जाऊन बसत होते. कदाचित त्यांच्यात सुद्धा वॅक्सिनचा शोध लागला असावा.

म्हणून मग आपला हात जगन्नाथ म्हणत त्या मच्छरांची एका फटक्यात हत्या करायला सुरुवात केली. पण नंतर सारखे सारखे हात धुवायचा कंटाळा येऊ लागल्याने त्यांचे रक्त हातावरच सुकू लागले. तेच हात घरभर कशाकशाला लागू लागले. जेवायच्याआधी हात धुवायचे लक्षात न आल्यास मच्छरांचे रक्त आपलेच रक्त म्हणून पोटातही जाऊ लागले.

एक छक्के ने वर्ल्डकप नही जिताया था, पर एक मच्छर आदमी को छक्का बना देता है.
सुरुवातीला टाळ्या पिटायला मजा यायची. हात उघडून त्यात मच्छर मेला आहे की आपल्याला चकवून निसटला आहे हे बघण्यात एक गंमत वाटायची. पण आता या हत्याकांडाचाही वीट आलाय. किंबहुना ते असे हाताने मारणे आता नकोसे वाटू लागलेय. सिनेमात देखील एखाद्या व्यक्तीला मारायला बंदूक वापरली तर त्याचे ईतके वाईट वाटत नाही. झाडली गोळी, खेळ खल्लास! पण तेच कोणी हाताने गळा दाबून समोरच्याला मारतेय, वा पोटात सुरा खुपसून कोथळा बाहेर काढत रक्ताची धार लावतेय, डोक्यात दगड घालतेय आणि मस्तकाच्या चिंधड्या उडवतेय असे दाखवले तर ती हिंसक दृश्ये बघणे नकोसे वाटते. मग ईथे दरवेळी आपल्याच हाताने एक जीव चिरडायचा. तो स्पर्श अनुभवायचा, ते रक्त आणि मांसाने लडबडलेले हात..... छे, आता नकोसे वाटू लागलेय.

कर्मसिद्धांतावर विश्वास आहे. खून का बदला खून. आपले रक्त शोषणार्‍याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. पण ती अशी निर्घुनपणे*/निघृनपणे* नको (* यातला योग्य शब्द सांगा)

याचसाठी म्हणून सासूबाईंनी सुचवल्याप्रमाणे एक ईलेक्ट्रीक रॅकेट घ्यायचा विचार करतोय. कळ दाबा. विद्युतप्रवाह त्या रॅकेटमधून वाहायला सुरुवात होईल. ऊडणार्‍या मच्छराला ते हलकेच चिकटवा. उडता मच्छर हवेतच गतप्राण होत खाली जमिनीवर कोसळेल.
ना शस्त्र से ना अस्त्र से, ना आग से ना पाणी से, ना जमीन पे ना आसमान मे, तुम्ही कोई मार नही सकता असे वरदान मिळालेल्या मच्छरांना मारायला हा छान ऊपाय आहे.

पण तसलेच एक रॅकेट गेले काही वर्ष सासुरवाडीच्या घरात धूळ खात पडलेले बघतोय. याचा अर्थ त्यांच्या घरात मच्छरांचा त्रास नाहीये असे नाही. त्यांच्या खिडक्या संध्याकाळी सहसा बंद असतात. तरीही कुठूनतरी मच्छर ऊडत येऊन हुक्की येईल तसे चावतात. पण कोणी मुद्दामहून उठून ते रॅकेट हातात घेऊन बसत नाही. म्हणून म्हटले खर्चा करण्याआधी मायबोलीवर आणखी चार-चौघांकडे चौकशी करूया की ते रॅकेट नक्की वापरले जाते की वापरायच्या आळसामुळे वॅक्युम क्लीनरसारखे घरातल्या कोपर्‍यात पडून राहते?

त्यातून बसणारा करंट मच्छराचा जीव घेतो हे छान. पण चुकून आपल्याला लागला तर कितपत ईजा पोहोचवू शकतो?

तसेच पोराबाळांच्या घरात ते वापरणे सुरक्षित असते का? कारण नुकताच व्हॉटसपवर एक विडिओ पाहिला होता ज्यात एक सहा-सात वर्षांचे नागडे मूल ते रॅकेट नाचवत होते. चुकून त्या रॅकेटचा स्पर्श त्याच्या शेंडीला झाला आणि ओम, फट, स्वाहा.!

असेच एक अतरंगी कार्टे आमच्या घरात आहे. ज्याने प्रयोग म्हणून नुकतेच माझे रेडीशेवर ब्लेड घेऊन आपले ओठ आडवे तिडवे फाडून ठेवले होते. आणि मी त्याच्या ओठांना औषध लावताना मला निरागसपणे विचारत होता की पप्पा मग तू हे वापरून दाढी कशी करतोस.. कप्पाळ!

तर त्यापासून जपायला म्हणून ते कपाटावर टाकले तर मग कधीच वापरले जाणार नाही. समोर मच्छर उडताना दिसतोय आणि आपण रॅकेट काढायला कपाटावर चढलोय. परत येऊन पाहतो तर काय.... आणखी काय, मच्छर गायब! तो थोडी ना आपली वाट बघत एका जागी थांबणार. त्यामुळे याचा किती वापर होतो याबाबत थोडा साशंकच आहे.

जर हि खरेच वापराची गोष्ट असेल, आणि खात्यापित्या घरात एखादे रॅकेट असलेले बरे म्हणत असाल, तर प्लीज कुठच्या ब्रॅण्ड आणि फीचर्सचा घेऊ हे देखील सुचवा. ऑनलाईन पाहिले तर तीनशे-चारशेपासून हजार दिड हजारचे रॅकेट दिसत आहेत. या किंमती रुपयात आहेत, यू एस डॉलरमध्ये नाही याची नोंद घ्यावी. अन्यथा मागे माझ्या हेअर ड्रायर धाग्यावर ३० हजारापर्यंतचे ड्रायर सुचवण्यात आले होते. ईतका मेहंगा नही परवडताय. मच्छर मारायला तरी बिलकुल नाही.

असो, तर यापैकी कुठल्या ब्रांडचा आणि कुठले फंक्शन असलेला चांगला असतो? नाहीतर पुन्हा ते गूडनाईटसारखे नको व्हायला. आपण एकटेच वेड्यासारखे रॅकेट फिरवतोय आणि मच्छर टेनिसचा खेळ बघितल्यासारखे एंजॉय करत आहेत. जाळीवरच बसून जाळी कुरतडत आहेत. जळत्या रिंगमधून उडी मारणार्‍या सर्कशीतल्या माकडाप्रमाणे जाळीच्या या भोकातून त्या भोकात जायचा खेळ करत आहेत.

साधी सरळ मध्यमवर्गीय काटकसरी मानसिकता ठेवून मी जगतो. त्यामुळे मच्छर चावून लातडे आल्याच्या त्रासापेक्षा कष्टाचे पैसे वाया गेल्याचा त्रास जास्त होतो. वॅक्युम क्लीनरबाबत मायबोलीवर धागा काढायला उशीर झाला त्याची किंमत आजही मोजतोय. वर्षाला दोन वेळा पोरांच्या वाढदिवसाला फुगे फुगवायला तेवढा वापरतोय. आणि तेवढ्यासाठी म्हणून घरात हजारो रुपये स्क्वेअर फीटची जागा अडवून पडलेला वॅक्युम क्लीनर आजही छळतोय. पुन्हा तीच चूक करायची नाहीये म्हणून हा प्रपंच.

भले वॅक्युम क्लीनरने गंडवले,
पण फ्रीज , हेअर ड्रायर , आणि ब्रांडेड जेन्टस रुमाल , अरे हो, आणि मेहुणींना बर्थ डे गिफ्ट घ्यायला मायबोलीकरांची फार मदत झाली आहे. ईथेही तशीच अपेक्षा आहे.

अरे हो, धाग्याचा फायदा सर्वांनाच हे राहिले.
आगाऊ धन्यवाद ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज घरी गेल्यावर इथले पर्याय बघून काय ते ठरवून लगेच ऑर्डर करतो.
मच्छरांचा सीजन गेल्यावर घेण्यात अर्थ नाही.

@ पियू, CO STAR नाव असलेली मॉस्कीटो बॅट ॲमेझॉन वरून मागवली होती.. सहा-सात महिने झाले.. चालतेयं नीट अजून..

चार्ज करून रात्री रूममध्ये चालू करून एका कोपऱ्यात ठेवली की, साधारण चार-पाच चालते.. बॅटच्या लाइटवर मच्छर येऊन आदळतात.. बॅट जास्त वेळ चालवायची असेल तर इलेक्ट्रीकल बोर्डला लावून ठेवायची रात्रभर .. मी तसं करते.

Ohhh. माझ्याकडे एव्हरीडेची (हो. तीच पेन्सिल सेल वाली कंपनी) रॅकेट आहे. तिच्यात इलेक्ट्रिक करंट सुरू करण्यासाठी जे बटण आहे ते करंट हवा आहे तेवढा वेळ दाबून ठेवावे लागते. तुम्ही म्हणताय तशी एकदाच खटका दाबून तासनतास चालू करुन ठेवण्याची सोय नाहीये.

अरे वाह असे दोन वेगवेगळे पर्याय असतात.. नवीन माहिती समजली. विश्लेषण करतो.

एका प्रकारात बटण दाबून ठेवले तरच करंट ऑन..
बटण सतत दाबून ठेवायचा त्रास आहे..
पण आपल्याला करंट लागायची रिस्क कमी..
आणि ऊर्जेची सुद्धा बचत.

ऐकावे मायबोलीकराचे. करावे बायकोच्या मनाचे Happy

तसे इथले डिटेल बायकोला शेअर केलेले. तिने ते वाचून ऑनलाईन सर्च रिसर्च करून हे मागवले. एक मच्छर मारून मी याची टेस्टिंग केली. किती ते वाईट. बरोबर चालते की नाही हे चेक करायला सुद्धा एक जीव घ्यावा लागला.

आपणही एकदा हात लाऊन चेक करावे असा विचार मनात आलेला जेणेकरून आपल्याला विजेचा धक्का बसला तर तो किती जोराचा बसेल याचा अंदाज येईल. पण ती हिंमत झाली नाही. बसायचा तेव्हा बसेल म्हटले.

तूर्तास फक्त फोटो टाकत आहे.
किंमत, ब्रँड, मॉडेल, जनरल आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन, ऑनलाईन साईट वगैरे डिटेल तिला नंतर विचारून अपडेटतो.

IMG-20241207-WA0000.jpg

तूर्तास फक्त फोटो टाकत आहे.
किंमत, ब्रँड, मॉडेल, जनरल आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन, ऑनलाईन साईट वगैरे डिटेल तिला नंतर विचारून अपडेटतो.>>>>

https://www.flipkart.com/mortein-advanced-anti-mosquito-racquet-electric-insect-killer-indoor/p/itmbd3341a0e694d

फ्लिपकार्ट/ अमेझॉनवर सर्वात स्वस्त ४७८ ला ॲव्हेलेबल आहे... बहूतेक तिथूनच ऑर्डर केली असेल.

फार्स करेक्ट.. हेच
चांगला अनुभव आला आहे पहिल्या दिवसाचा.. आया मीन रात्रीचा

काल नेमके मच्छर नव्हते घरात.
बहुधा डिलीव्हरी येताना पाहिले असावे त्यामुळे लपले किंवा पळाले असावेत.
पण नवीन रॅकेट वापरायला हात तर शिवशिवत होते..
मग मच्छरांच्या शोधात गार्डनमध्ये गेलो आणि थोडा खूनखराबा केला.
तेवढीच समाजसेवा Happy

@ रघू आचार्य
भिंतीवर शाहरुख खानचा फोटो असेल तर मच्छर येत नाहीत घरात.
>>>>

क्षमस्व रघू आचार्य,
आपला प्रतिसाद आधी इग्नोर केला.

त्याची दोन कारणे.

१) डास हाकलावायचे इतर उपाय तेव्हा नको होते कारण धाग्याचा फोकस रॅकेट खरेदीवरच राहील हे बघायचे होते.

२) धाग्यात शाहरूख आला की तो धागा हायजॅक करतो जे तेव्हा नको होते. आता रॅकेट घेऊन झाले आहे. तर आता चालेल. जब मिल बैठेनंगे तीन यार, आप मी ऑर शाहरूख Happy

पण तुम्ही सुचवलेल्या उपायाचे मला आश्चर्य वाटते. म्हणजे एखादा फोटो बघूनच मच्छर येत नाही हे पटू शकते. पण तो फोटो शाहरूखचा हे अविश्वसनीय वाटते.

म्हणजे बघा ना, इथे शाहरूख हा शब्द जरी दिसला तरी त्यावर कैक मायबोलीकर तुटून पडतात. शंभर पोस्टी कुठे जात नाहीत. मग त्या शाहरूखने मच्छरांचे असे काय घोडे मारले आहे?

बरे नर मच्छरांचे देखील एकवेळ समजू शकतो पण नारी मच्छर सुद्धा घोंघावत नाही हे अदभुत आहे..

की तुम्हाला असे म्हणायचे आहे की सारे मच्छर शाहरूखच्या फोटो भोवती घोंघावत राहतील आणि आपण सेफ राहू.. ब्रिलियांट विचार आहे हा Happy

आमच्या घरात मीच मच्छर आहे.. oops सॉरी.. चुकून खरे कसे निघाले तोंडातून.. तर आमच्या घरात मीच शाहरूख आहे. तर माझाच फोटो लाऊन बघतो काही फरक पडतो का Happy

जे काही निरीक्षण अनुमान निष्कर्ष निघेल ते याच धाग्यावर नक्की कळवेन.

लाडकी बहीण भाऊ योजना काढून फुकट पैसे वाटण्यापेक्षा हे चांगले आहे. खरोखर गरजू यात मच्छर मारून पैसे कमावतील. आणि मच्छर समस्या सुद्धा दूर होईल. ते होताच आपसूक स्वच्छता सुद्धा वाढेल.

मारलेले मच्छर >>> बिचारे जेंट्स मच्छर निरुपद्रवी असूनही तुम्ही त्यांच्याच नावाने बर्न ॲट साईट ऑर्डर काढा..... फेमिनिझमचा निशेध असो!!!

मलाही आधी असेच वाटायचे... पण मग नंतर माझ्या आयुष्यात जुही चावला आली
तरीही मी अपवादाने नियम सिद्ध होतात म्हणत चावला चावली यावरून लिंग ओळखायचा खेळ चालू ठेवला.. पण अगले दिन अपने मोहल्ले मे भूमिका चावला आली Happy

Lol

मलाही एकदा रू सारखे ते रॅकेट बागेत वगैरे नेऊन डोक्यावर घोंघावणारे ५०-१०० डास एकदम मारायचे आहेत रॅकेट ने. पण उपयोग किती होईल माहित नाही आणि डोक्यावर खूप डेड बॉड्या पडतील ते वेगळेच.

डास या प्राण्याचे अन्नसाखळी मध्ये काही योगदान आहे का?

मागे अतरंगी यांच्याशी झालेल्या गहन चर्चेत 'डास, झुरळ, ढेकूण, पिसवा, ऊ वगैरे प्राण्यांना देवाने आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटावे म्हणून पाठवले आहे' असा निष्कर्ष काढण्यात आला होता. ते वगळता त्यांचा काही उपयोग नाही जगाला.

पियु सोसायटीच्या बागेत वापर बिनधास्त.. मात्र सार्वजनिक बागेत नेऊ नकोस. रॅकेट उघडकीस आले तर पोलीस पकडून नेतील..

देवाने आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटावे म्हणून पाठवले
>>>>

यावरून बालपणीचा किस्सा आठवला.
लहानपणी मला मच्छर चावायचेच नाहीत. घरात सर्वाँना चावतील पण मला नाही. म्हणजे आम्ही चार भावंडे रांगेत झोपलो असू ज्यात मी मध्ये तरी ते माझ्या डावी उजवीकडच्या भावंडाना चावायचे पण मला नाही. जसे एखादे विमान समुद्रावरून उडत जाते तसे ते माझ्या अंगावरून उडत जायचे पण लँड नाही व्हायचे.
तेव्हा आई म्हणायची बाकी सारे पालेभाज्या खातात, तू नाही. तुझे रक्त अशुद्ध आहे त्यामुळे डास ते पित नाहीत.

पुढे जाऊन मी पालेभाज्या खाऊ लागलो आणि मला खरेच मच्छर चावायला लागले. मला तेव्हा कसला आनंद झाला होता Happy

पण मग नंतर जरा जास्तच चावू लागले. जणू काही उधार चुकवत होते. जेव्हा आईकडे ही तक्रार घेऊन गेलो तेव्हा आई म्हणाली की तू खेळून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवत नाहीस. आंघोळ करताना अंग नीट चोळत नाहीस. डास आणि मच्छर हे नेहमी घाणीवर बसतात. तू अस्वच्छ राहतोस म्हणून तुला चावतात.

अरे बरेच लोक मराठीत मच्छर म्हणताहेत की डासांना.
माबोवर एवढे छुपे वऱ्हाडी असतील असे वाटले नव्हते.

या धाग्यावर ही बातमी म्हणजे नक्कीच शाखा पूर्ण मन्नतला डास आत येऊ नये म्हणून बारीक जाळ्या बसवून घेणार असावा. त्याचे रॅकेट पोलिसांपासून लपणे अवघड आहे. Lol

छुपे वऱ्हाडी नाही मुंबईकर..
मुंबईची भाषा सर्व भाषांना सामावते.
आमच्याकडे तर सगळेच मच्छर बोलतात.
माझी तर पोरेही जन्मापासून मच्छर बोलायला लागली आहेत.

तो स्वतः तिथेच राहणार असल्याने डास येणारच नाहीत.
>>>>

बरोब्बर!
जर त्याचा फोटो बघून घरात येत नसतील तर खुद्द शाहरूख बघून मेन गेटवरच भोवळ येऊन पडतील.

पण प्लीज इतक्यात शाहरूख फार नको धाग्यावर.

मी ठरवले आहे की इथे रोज आज किती मच्छर मारले याचे आकडे द्यायचे.
अजून कोणाला आपापले रॅकेट घेऊन या उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास होऊ शकता.

आमच्याकडे तर दुसऱ्या दिवशी पासूनच रॅकेट वरून तिघात भांडणे होऊ लागली आहेत. प्रत्येकाला रॅकेट घेऊन मच्छर मारायचा चस्का लागला आहे जणू..

जिवंत नाही खात हो.. ते मारून शिजवून खातो.

बाई दवे,
चार्ज झालेले रॅकेट घेऊन ट्रेन मधून प्रवास करणे अलाऊड आहे का?

Pages