डास/मच्छर मारायचे रॅकेट कुठले घ्यावे? घ्यावे की न घ्यावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 December, 2024 - 15:33

माझे बालपण मुंबईत गेले. त्यामुळे मुंबई उपनगरात किंवा पुण्यात राहणारे नातेवाईक जेव्हा मच्छरांच्या त्रासाबद्दल बोलायचे तेव्हा असे वाटायचे की राईचा पर्वत करत आहेत. किती तो क्षुद्र जीव. आला समोर, मारला एका टाळीत, आणि टाकला वाळीत.

पण नवी मुंबईत राहायला आलो तसे हळूहळू त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसायला लागला. जेव्हा स्वताला चावायला लागले तेव्हा जाणवायला लागले. त्यामुळे चार वर्षे भाड्याच्या घरात राहून नंतर हक्काचे घर विकत घेताना मच्छरांचा फार त्रास होणार नाही याचा विचार करूनच घेतले. आणि तितका तो झालाही नाही. अर्थात थंडीचा सीजन येता संध्याकाळी जाळीच्या खिडक्या लावायची काळजी घेणे हे तेवढे एक रुटीन झाले. पण ते वगळता विशेष काळजी घ्यावी असा त्रास नाही. त्यामुळे एकूणच या विषयात काही सखोल ज्ञान वा अनुभव नाहीये.
-
पण गेले काही दिवस सोसायटीमध्ये उद्यान सुशोभिकरणाचे काम चालू असल्याने दिवसाढवळ्याच काही मच्छर घरात घुसू लागलेत. जे संध्याकाळ होताच रक्ताच्या शोधात आक्रमण करू लागलेत. त्यांना अटकाव करायला म्हणून संध्याकाळ होण्याआधीच बाल्कन्या बंद करायच्या हे पटत नाही. किंबहुना संध्याकाळीच तर बाल्कन्या उघड्या ठेवत तिथे बसायला मजा येते. पण सध्या ती सजा झाली आहे. असे वाटते जणू ते मच्छर कानापाशी येऊन गुणगुणताहेत "तुम मुझे खून दो.. मैं तुम्हे खिडकी खोलने की आजादी दूंगा..!

असो,
तर याआधी कधी मच्छरांना मारायला किंवा हुकसवायला अघोरी उपाय केले नव्हते. मुले लहान असताना घरात गूडनाईट अध्येमध्ये लावले जायचे ते सवयीनेच. मच्छरांचा विशेष त्रास होतोय म्हणून नाही. पण गेले काही दिवस नवीन गूडनाईट आणून लावले. आणि लक्षात आले की काळ बदलला आहे. हल्लीच्या जेन-अल्फा मच्छरांना गूडनाईटची सवय झाली आहे. काही मच्छरांच्या अंगात तर एवढा किडा आढळला की ते गूडनाईटवरच जाऊन जाऊन बसत होते. कदाचित त्यांच्यात सुद्धा वॅक्सिनचा शोध लागला असावा.

म्हणून मग आपला हात जगन्नाथ म्हणत त्या मच्छरांची एका फटक्यात हत्या करायला सुरुवात केली. पण नंतर सारखे सारखे हात धुवायचा कंटाळा येऊ लागल्याने त्यांचे रक्त हातावरच सुकू लागले. तेच हात घरभर कशाकशाला लागू लागले. जेवायच्याआधी हात धुवायचे लक्षात न आल्यास मच्छरांचे रक्त आपलेच रक्त म्हणून पोटातही जाऊ लागले.

एक छक्के ने वर्ल्डकप नही जिताया था, पर एक मच्छर आदमी को छक्का बना देता है.
सुरुवातीला टाळ्या पिटायला मजा यायची. हात उघडून त्यात मच्छर मेला आहे की आपल्याला चकवून निसटला आहे हे बघण्यात एक गंमत वाटायची. पण आता या हत्याकांडाचाही वीट आलाय. किंबहुना ते असे हाताने मारणे आता नकोसे वाटू लागलेय. सिनेमात देखील एखाद्या व्यक्तीला मारायला बंदूक वापरली तर त्याचे ईतके वाईट वाटत नाही. झाडली गोळी, खेळ खल्लास! पण तेच कोणी हाताने गळा दाबून समोरच्याला मारतेय, वा पोटात सुरा खुपसून कोथळा बाहेर काढत रक्ताची धार लावतेय, डोक्यात दगड घालतेय आणि मस्तकाच्या चिंधड्या उडवतेय असे दाखवले तर ती हिंसक दृश्ये बघणे नकोसे वाटते. मग ईथे दरवेळी आपल्याच हाताने एक जीव चिरडायचा. तो स्पर्श अनुभवायचा, ते रक्त आणि मांसाने लडबडलेले हात..... छे, आता नकोसे वाटू लागलेय.

कर्मसिद्धांतावर विश्वास आहे. खून का बदला खून. आपले रक्त शोषणार्‍याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. पण ती अशी निर्घुनपणे*/निघृनपणे* नको (* यातला योग्य शब्द सांगा)

याचसाठी म्हणून सासूबाईंनी सुचवल्याप्रमाणे एक ईलेक्ट्रीक रॅकेट घ्यायचा विचार करतोय. कळ दाबा. विद्युतप्रवाह त्या रॅकेटमधून वाहायला सुरुवात होईल. ऊडणार्‍या मच्छराला ते हलकेच चिकटवा. उडता मच्छर हवेतच गतप्राण होत खाली जमिनीवर कोसळेल.
ना शस्त्र से ना अस्त्र से, ना आग से ना पाणी से, ना जमीन पे ना आसमान मे, तुम्ही कोई मार नही सकता असे वरदान मिळालेल्या मच्छरांना मारायला हा छान ऊपाय आहे.

पण तसलेच एक रॅकेट गेले काही वर्ष सासुरवाडीच्या घरात धूळ खात पडलेले बघतोय. याचा अर्थ त्यांच्या घरात मच्छरांचा त्रास नाहीये असे नाही. त्यांच्या खिडक्या संध्याकाळी सहसा बंद असतात. तरीही कुठूनतरी मच्छर ऊडत येऊन हुक्की येईल तसे चावतात. पण कोणी मुद्दामहून उठून ते रॅकेट हातात घेऊन बसत नाही. म्हणून म्हटले खर्चा करण्याआधी मायबोलीवर आणखी चार-चौघांकडे चौकशी करूया की ते रॅकेट नक्की वापरले जाते की वापरायच्या आळसामुळे वॅक्युम क्लीनरसारखे घरातल्या कोपर्‍यात पडून राहते?

त्यातून बसणारा करंट मच्छराचा जीव घेतो हे छान. पण चुकून आपल्याला लागला तर कितपत ईजा पोहोचवू शकतो?

तसेच पोराबाळांच्या घरात ते वापरणे सुरक्षित असते का? कारण नुकताच व्हॉटसपवर एक विडिओ पाहिला होता ज्यात एक सहा-सात वर्षांचे नागडे मूल ते रॅकेट नाचवत होते. चुकून त्या रॅकेटचा स्पर्श त्याच्या शेंडीला झाला आणि ओम, फट, स्वाहा.!

असेच एक अतरंगी कार्टे आमच्या घरात आहे. ज्याने प्रयोग म्हणून नुकतेच माझे रेडीशेवर ब्लेड घेऊन आपले ओठ आडवे तिडवे फाडून ठेवले होते. आणि मी त्याच्या ओठांना औषध लावताना मला निरागसपणे विचारत होता की पप्पा मग तू हे वापरून दाढी कशी करतोस.. कप्पाळ!

तर त्यापासून जपायला म्हणून ते कपाटावर टाकले तर मग कधीच वापरले जाणार नाही. समोर मच्छर उडताना दिसतोय आणि आपण रॅकेट काढायला कपाटावर चढलोय. परत येऊन पाहतो तर काय.... आणखी काय, मच्छर गायब! तो थोडी ना आपली वाट बघत एका जागी थांबणार. त्यामुळे याचा किती वापर होतो याबाबत थोडा साशंकच आहे.

जर हि खरेच वापराची गोष्ट असेल, आणि खात्यापित्या घरात एखादे रॅकेट असलेले बरे म्हणत असाल, तर प्लीज कुठच्या ब्रॅण्ड आणि फीचर्सचा घेऊ हे देखील सुचवा. ऑनलाईन पाहिले तर तीनशे-चारशेपासून हजार दिड हजारचे रॅकेट दिसत आहेत. या किंमती रुपयात आहेत, यू एस डॉलरमध्ये नाही याची नोंद घ्यावी. अन्यथा मागे माझ्या हेअर ड्रायर धाग्यावर ३० हजारापर्यंतचे ड्रायर सुचवण्यात आले होते. ईतका मेहंगा नही परवडताय. मच्छर मारायला तरी बिलकुल नाही.

असो, तर यापैकी कुठल्या ब्रांडचा आणि कुठले फंक्शन असलेला चांगला असतो? नाहीतर पुन्हा ते गूडनाईटसारखे नको व्हायला. आपण एकटेच वेड्यासारखे रॅकेट फिरवतोय आणि मच्छर टेनिसचा खेळ बघितल्यासारखे एंजॉय करत आहेत. जाळीवरच बसून जाळी कुरतडत आहेत. जळत्या रिंगमधून उडी मारणार्‍या सर्कशीतल्या माकडाप्रमाणे जाळीच्या या भोकातून त्या भोकात जायचा खेळ करत आहेत.

साधी सरळ मध्यमवर्गीय काटकसरी मानसिकता ठेवून मी जगतो. त्यामुळे मच्छर चावून लातडे आल्याच्या त्रासापेक्षा कष्टाचे पैसे वाया गेल्याचा त्रास जास्त होतो. वॅक्युम क्लीनरबाबत मायबोलीवर धागा काढायला उशीर झाला त्याची किंमत आजही मोजतोय. वर्षाला दोन वेळा पोरांच्या वाढदिवसाला फुगे फुगवायला तेवढा वापरतोय. आणि तेवढ्यासाठी म्हणून घरात हजारो रुपये स्क्वेअर फीटची जागा अडवून पडलेला वॅक्युम क्लीनर आजही छळतोय. पुन्हा तीच चूक करायची नाहीये म्हणून हा प्रपंच.

भले वॅक्युम क्लीनरने गंडवले,
पण फ्रीज , हेअर ड्रायर , आणि ब्रांडेड जेन्टस रुमाल , अरे हो, आणि मेहुणींना बर्थ डे गिफ्ट घ्यायला मायबोलीकरांची फार मदत झाली आहे. ईथेही तशीच अपेक्षा आहे.

अरे हो, धाग्याचा फायदा सर्वांनाच हे राहिले.
आगाऊ धन्यवाद ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवा! मी ह्यातल्या दोन तीन ओळी वाचल्या. होपफुली रॅकेटच हवी आहे.
स्टेशनच्या बाहेर विकत असतात त्यात एक पन्नासला आणि दुसरी शंभरला मिळते ... का एक सत्तर आणि दुसरी सव्वाशे असेल .. त्यातली शंभरची/ महागातली घे. त्यात बॅटरी जरा चांगली असते आणि ती खाली पडली तर लगेच जीव टाकत नाही. चार्ज करताना आपली सॉकेट इतकी बेकार असतात आणि त्या रॅकेटचं वजन, गुरुत्त्वमध्य गंडलेला असतो की काढघाल करताना हमखास पडते. आमच्या पोरांना भारतात आल्यावर रिक्षा, बाईक वर फिरण्याइतकंच रॅकेटने डास मारायचं आकर्षण आहे.
बाकी शंभर सव्वाशेच्या रस्त्यावरच्या आयटमला रिसर्च केलेला बघुन टडोपा झालं. हॅपी डास मारिंग. Happy

बाकी शंभर सव्वाशेच्या रस्त्यावरच्या आयटमला रिसर्च केलेला बघुन टडोपा झालं. +७८६
शॉक फक्त तेव्हाच बसतो जेव्हा दोन जाड तारांच्या सँडविच मधली बारीक तार टच केली तर. पोरांसाठी सेफ आहे उलट पोरांनाच असली कामं द्यावी.
तोटा एकच फुल चार्जिंग झाल्यावर जर का मच्छर त्यात अडकून राहिले आणि बटण दाबून ठेवलं की थोडा धूर आणि जळका वास येतो त्याला पर्याय नाही तुम किसींकी लाश जलाओगे धुवा और बदबू तो आयेगीही.

डीमार्टमध्ये मिळते ती मस्त असते. पण मला मच्छर मारल्यावर वाईट वाटतं. शेवटी ते पण जीव आहेत अन्नाच्या शोधात भटकणारे. मी त्याना मारल्यावर प्रायश्चित्त म्हणून माझं एक बोट आत टाकून स्वतः ला शॉक लावून घेतो आणि बोलतो मच्छरांनो मला माफ करा.

लेख मोठा आहे म्हणुन फक्त शीर्षक वाचून सांगतोय:
ही घे.
दोन वर्षे वापरतोय. बॅटरी लाईफ जबरी आहे. .
यात एक डासांना आकर्षित करण्याचा मोड आहे, त्यात निळा लाईट लागतो आणि फिल्ड ऑन रहाते त्यात अर्थ नाही. असे डास आकर्षित होत नाहीत. पण रॅकेट फिरवून डास मारण्याचे काम चोख होते.

बाकी शंभर सव्वाशेच्या रस्त्यावरच्या आयटमला रिसर्च केलेला बघुन टडोपा झालं. >>>>+१

एक वर्षभर HIT ची वापरली . चांगली चालली . ती खराब झाल्यावर LEDURE ची आणलीय. ती काही महिने झाले , अजून तरी चालू आहे .
ते निळ्या प्रकाशाने डास आकृष्ट वगैरे होत नाहीत . रात्री मच्छरदाणी वापरतो .

मी वर्षभरापूर्वी पिरामल ची ट्राय ॲक्टिव मॉस्किटो रॅकेट घेतली आहे, छान चालतेय,, दणकट आहे ....दोन तिन वेळा सणसणीत आपटली सुद्धा गेलीय.... ॲक्चुअल किमत ७९९ आहे पिरामलच्याच साईटवरुन डिस्काउंट घेऊन ६७९ ला मिळाली....आफ्टर सेल्स सर्विस एकदम प्रॉम्प्ट आहे. माझ्या पहिल्या आलेल्या रॅकेटची चार्जिंग लाईट दिसत नव्हती....४ दिवसांत रिप्लेस करुन दिली रिप्लेस रिक्वेस्ट टाकल्या नंतर.

ते निळ्या प्रकाशाने डास आकृष्ट वगैरे होत नाहीत .>>> +१

ते निळ्या प्रकाशाने डास आकृष्ट वगैरे होत नाहीत ते निळ्या प्रकाशाने डास आकृष्ट वगैरे होत नाहीत
पन मि तर हतेल मधे सर्रस वापरताना बघित्लि आहे.

सर मि एक सान्गु का? तुम्हि मन्नत चा आजुबाजुला एक जागा घ्या. ह्या अरियात "दास आनि मछर " ह्याना नो यन्त्रि आहे.

भिंतीवर शाहरुख खानचा फोटो असेल तर मच्छर येत नाहीत घरात.

स्वस्तातील उपाय म्हणून झबा, सई, म्हाग्रु यांचे फोटो ट्राय करायला हरकत नाही.

ते निळ्या प्रकाशाने डास आकृष्ट वगैरे होत नाहीत .>>> तो निळा लाईट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी असतो. डासांसाठी असतो कोणी सांगितलं? साधे भोळे माहेरच्या साडीतले अलका कुबल मायबोलीकर.

@ हपा...
चेक करतो. आमच्याकडे फक्त ऑनलाईन शॉपिंगच केली जाते.

@अमितव…
धन्यवाद,
पण गब्बर का ऊसूल है, असे आयटम रस्त्याकडेने घ्यायचे नाहीत. त्यांचे आयुष्य जास्त नसते. कधीतरी इतक्या लवकर बिघडतात की मन मानायला तयारच होत नाही आणि मग त्या बिघडलेल्या गोष्टी सुद्धा आपण खटपट करून वापरत राहतो.

@ मानवमामा...
धन्यवाद. चांगले दिसत तर आहे. अजून एक दोन पर्याय सापडले की कंपेअर करायचा खेळ खेळता येईल.

@ बोकलत,
धन्यवाद. डी मार्ट शेजारीच आहे. त्यामुळे इतके घरचे वाटते की जावेसे वाटतच नाही.

प्रायश्चित म्हणाल तर असे छोटे मोठे शॉक लाऊन घेण्यापेक्षा एक दिवस स्वतःच मरून जायचे ठरवले आहे.

@ कल्की,
दोन जाड तारांच्या सँडविच मधली बारीक तार टच केली तर आणि तरच शॉक लागतो हा फंडा माहीत नव्हता. पण तिथे स्पर्श होणे इतकेही अवघड नसावे.

@ माबो वाचक,
आमच्या सासुरवाडीची रॅकेट सुद्धा काला हिट च आहे. जाड दणकट मोठी आहे. अगदी बॅडमिंटन खेळता येईल अशी आहे. पण त्यामुळेच सेम सेम नको असे वाटते. आणि तिलाच धूळ खात पडलेले बघितल्याने तिच्यावरचे मन उठले आहे. तरी तुम्ही पर्याय सुचवला याबद्दल धन्यवाद Happy मी वापरला नाही तर तो माझ्या विचारांचा दोष.

@ फार्स विथ द डिफरंस
धन्यवाद, चेक करतो
दणकट हवीच आहे. कारण अचानक मच्छर समोर दिसताच तलवारी सारखे सपासप फिरवणार तर इथे तिथे आपटायची शक्यता कायम राहणारच.

@ निळ्या प्रकाशाने डास आकृष्ट होतात हे खरे खोटे जे काही असेल ते मिस्टर इंडिया लाल रंगात दिसतो टाईप्स मजेशीर आहे. मला वाटायचे की अंधारात डास शोधायला ती प्रकाशयोजना असावी. पण त्यामुळे डास सावध होत असतील असेही वाटायचे.

@ धाग्याची, लेखाची लांबी
तर रात्रीची वेळ होती. मच्छर चावत होते, झोप येत नव्हती. आणि लिहिणे हे माझ्यासाठी कधीही स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते. मानसिक शारीरीक सारे ताण विसरले जातात. त्यामुळे लिहीत सुटलो. पण शीर्षक अचूक आणि सुटसुटीत ठेवले त्यामुळे योग्य पर्याय येत आहेत हे महत्त्वाचे Happy

@ हपा...
चेक करतो. >> कर्म माझं!

बाकी सिरियस प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. माझा इग्नोर कर हा वरचा. अगदीच इंटरेस्ट आला तर यॉनेक्स आणि रॅकेट गटिंग हे दोन शब्द चेक केल्यास पुरे.

मधल्या तारेला स्पर्श होणे इतकेही अवघड नसावे.>>>> मुलं सॉकेट मध्ये हात घालण्याच्या वयातली नसतील तर सेफच आहे . तरीही रॅकेट मध्ये बोट न घालण्याची खबरदारी घ्यावी. तसं मुलांना सांगावं .मच्छर मरतो म्हणजे त्याची तिव्रताही तेव्हढीच असते. आता त्यातनही नेमका शॉक किती लागतो हे बघायचच असेल तर जबाबदार पालक म्हणून तुलाच बोट घालून पाहावं लागेल. आजपर्यंत मच्छरच्या रॅकेटने कुणाच्या जीवावर बेतलेल्याच ऐकलं नाही.

रॅकेट ऑनलाइन मागवली होती. रात्री रॅकेट चालू ठेवली की मच्छर स्वतःच तिच्यावर जाऊन आपटून आत्मघात करून घेतात.. त्यांचा आपटल्यावर जो आवाज येतो ना त्याने मला मच्छरांवर सूड उगवल्याचा खूप आसुरी आनंद होतो..

जुन्या काही रॅकेटचा शॉक मी घेतलायं बऱ्याच वेळा चुकून..!

हपा,
यॉनेक्स सर्च केले तर खरेखुरे बॅडमिंटन खेळायचे रॅकेट आले..
आणि गटिंग सर्च केले तर साहेबांच्या देशातील क्रिकेटपटू आला..
पण काय ते समजले Proud

कल्की
आजपर्यंत मच्छरच्या रॅकेटने कुणाच्या जीवावर बेतलेल्याच ऐकलं नाही
>>>>

ते तर आहेच.
पण ते विजेचा धक्का लागला की सोबत मानसिक धक्का सुद्धा बसतो. रॅकेटच कश्याला, आमच्या ऑफिसमध्ये कुठे कुठे दरवाज्याचे हँडल पकडल्यावर, कॅन्टीनमध्ये चमचा उचलताना, लिफ्टचे बटन दाबताना, वगैरे जे करंट लागतात त्याची सुद्धा दहशत आहे Happy

रात्री रॅकेट चालू ठेवली की मच्छर स्वतःच तिच्यावर जाऊन आपटून आत्मघात करून घेतात..
>>>>

ही भारी आयड्या आहे Proud
पण रिस्की सुद्धा..
आणि यात रॅकेटचे आयुष्य सुद्धा कमी होत असेल ना..

कर्मसिद्धांतावर विश्वास आहे. खून का बदला खून. आपले रक्त शोषणार्‍याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. >> शॉक लागून मरणे निघृणच असते रे बाबा तेंव्हा हा खटाटोप नको करूस. एक तर रक्त दे किंवा खिडक्या बंद करत जा.

100 Rs ची रॅकेट घ्यावी. तुटली तरी नवीन घेता येते. मच्छर स्वतःलाच मारावे लागत असल्याने 650 ची घेऊन काहीही फायदा नाही

एक तर रक्त दे किंवा खिडक्या बंद करत जा.
>>>>>

वाह असामी,
तुम मुझे खून दो.. मैं तुम्हे खिडकी खोलने की आजादी दूंगा Happy

लेखात घेतो हे वाक्य आणि फेसबूकवर शेअर करतो

@ भ्रमर,
मच्छर स्वतःलाच मारावे लागत असल्याने 650 ची घेऊन काहीही फायदा नाही
>>>

हा विचार वरकरणी योग्य आहे.
पण वापरायला मजा सुद्धा आली पाहिजे ना.

म्हणजे गाडी विकत घेताना आपण हा विचार करू का की आपल्यालाच चालवायची असेल तर मर्सिडीज कश्याला घ्यावी, एखादी मारूतीच घ्यावी. Happy

रात्री रॅकेट चालू ठेवली की मच्छर स्वतःच तिच्यावर जाऊन आपटून आत्मघात करून घेतात

>> हे कसं करायचं? जरा सविस्तर लिहा ना.

रू.. तू थोडे दिवस सासऱ्यांची रॅकेट उसनी माग. तसेही त्यांच्याकडे पडूनच आहे. तुला पटली तर तू १०-१२ दिवसात तशीच नवीन घे. कितपत वापर होतोय याचा अंदाज पण येईल.

२०१८ मध्ये भारतात गेलेले तेव्हा ओडोमास घेतला होता. चांगला सुगंधी झालाय की. हाऊ अबाऊट ओडोमास किंवा कासवछाप मिळते का अजुन?
लेख फार विनोदी झालाय.
>>>>>काही मच्छरांच्या अंगात तर एवढा किडा आढळला की ते गूडनाईटवरच जाऊन जाऊन बसत होते.
खूप हसले.
>>>>>>>>>आपण एकटेच वेड्यासारखे रॅकेट फिरवतोय आणि मच्छर टेनिसचा खेळ बघितल्यासारखे एंजॉय करत आहेत
हाहाहा

@ सामो,
ओडोमास म्हणजे ते अंगावर चोळायचे ना?
मुले लहान असताना मी त्यांना घेऊन गार्डनमध्ये जायचो तेव्हा मच्छर चावू नये यासाठी बायको त्यांच्या कपड्यावर एक सुगंधी स्टिकर लावायची. त्या वासाने मच्छर येत नाहीत म्हणे. पण मला एक समजत नाही की एवढा छान वास मच्छरांना का नको असतो? म्हणजे गाढवाला गुळाची चव काय म्हणतात तसे मच्छरांना अत्तराचा वास काय म्हणू शकतो का..

लेखाबाबत म्हणाल तर वेदनेला विनोदाची झालर द्यावी. त्या झेलायची शक्ती वाढते.

@ पियू,
सासुरवाडी रॅकेट ट्रायल म्हणून उधार घेणे हा छान पर्याय आहे. पण जसे वर काही प्रतिसाद आले की दोन चार शे रुपयाच्या वस्तूला काय तो इतका रिसर्च तसेच त्यांच्या घरचे सुद्धा म्हणाले की दोन चार शे रुपयाच्या वस्तूची काय एवढी ट्रायल, घेऊन टाका जावैबापू स्वतःच विकत. हवे तर आम्ही पैसे देतो.... मग काय इज्जत राहिली माझी.

Pages