भन्सालीची रत्नं : अर्थात हीरामंडी !

Submitted by दीपांजली on 2 May, 2024 - 23:08

तर भन्सालीची स्लो कुक्ड लाहोरी बिर्याणी नेटफ्लिक्स वर वाढली आहे, त्यातल्या कोंबड्या आणि इतरांची पिसे काढायला हा सेपरेट धागा हवाच्ग !
स्पॉयलर्सने भरलेला धागा आहे त्यामुळे आपापल्या जवाबदारीने वाचा Wink
पिसं काढण्या आधी काय आवडले तेही लिहिते :
भन्सालीला साजेशा सुंदर फ्रेम्स, सेट्स, दागिने, कपडे, एपिसोड काहीतरी करून बघायला एन्गेज ठेवेल असा ड्रामा, गाणी, कोरिओग्राफी सगळे भन्सालीच्या मुव्हीज सारखे !
मनिषा कोईरालाचा अभिनय , स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्तं आहे, तिचे गरारे,शरारे सुंदर आहेतच पण साड्या , ज्युलरी पण आवडली.
20240501_203034.jpeg20240502_215348.jpeg20240501_203039.jpeg
संजिदा शेख , आदिती राव हैदरी, सैमाचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस, उस्तादचा रोल करणारा अ‍ॅक्टर सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय.
पहिले २-३ एपिसोड्स ग्रिपिंग आहेत.
सकल बन, हमे देखनी है आझादी गाणी आवडली, इतरही ठुमरी गाणीही चांगली आहेत .
लज्जोच्या अकाली मृत्यु नंतर जे ‘हमे देखनी है आझादी ‘गाणं पहिल्यांदा येते तो सीन आणि ‘रुदाली’ स्टाइल कोरिओग्राफी, मनिषा कोइरालाचा नशेत नाचणे सीन मस्तं घेतलाय, टिपिकल भन्साली स्टाइल !
गोल्डन बेज भन्सालीच्या पॅलेट मधला आवडता कलर आहेच, तो रंग दिसतोच पण त्याचा अजुन एक आवडता ‘चान्द छुपा बादलमे मधला, देवदास मधल्या ‘मोरे पिया’, मधला लॅव्हेन्डर कलरही येतो,
20240502_222716.jpeg20240502_222645.jpegआता खराखुरा रिव्ह्यु :
*तो नवाब ताज मुशायरा चालु असताना लांबूनच एक पोरगी आवडली कि डायरेक्ट तिच्या आंगचोटीला जाऊन रोमान्सयुक्त फ्लर्टिंग सुरु करतो, मुलीचे नावही माहित नसताना आणि ती मुलगी (आलम) पण लगेच त्याला रिस्पॉन्स द्यायला सुरवात करते , काहीच ऑफेन्सिव वाटत नाही तिला.. एरवी हे दोघेही तवायफ-नवाब कल्चरच्या विरुद्ध असतात, पण पोरगी दिसली बसी कि गळ्यात पडला, ट्रिटिंग हर लाइक अ प्रॉस्टिट्युट !
*ताजची आज्जी संस्कार वर्गासाठी नातवाला हिरामंडीत जायची शिकवण देते.
*अधयन सुमन आणि शेखर सुमन अगदीच यक्स नवाब आहेत,.
नवाब कितीही रंगेल असले तरी अध्ययन होणार्‍या बायको समोरच कोठेवाली ठेवल्याचा खुल ए आम गर्व करतो.
* ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे उर्दु बोलणारे विनोदी गोरे ऑफिसर्स
* स्वातंत्र्यलढा लढणारे क्रांतिवीर सगळे पुरावे कोणालाही सपडतील, रादर सापडावे असे पुरावे टेबलवर पसरून ठेवतात
* पाण्यातून इकडे तिकडे करणार्‍या, जिन्यावरून पळणार्या, उगीच खिदळणार्या बायका
* इतर सुंदर सेट्स असताना मधेच* अ‍ॅनिमेटेड गंगुबाई रिसायकल्ड सेट्स येतात.
*जिला भरपूर स्क्रीन टाइम मिळालाय ती 'आलम' एकदमच बथ्थड निर्विकार, दगडी चेहर्‍याची बाई आहे
* सोनाक्शी सिन्हा, अजिबात त्या काळातली तवायफ वाटत नाही, एक नंबरची टपोरी साउथ इंडियन मुव्ही मधली आयटेम गर्ल दिसते, रिचा चढ्ढा सुद्धा मुळीच त्या काळातली दिसत नाही, तिला अजिबात नाचता येत नसून सोलो क्लासिक्॑ल डान्स असलेला मुजरा दिलाय तिला, कोरीओग्राफी चांगली असून डान्सर अशी असेल तर मीठाचा खडा पडतोच !
एक अदिती राव हैदरी सोडून कोणामधेही मुजर्‍याच्या अदाए/ग्रेस नाही पण आदिती सुद्धा आता अशा रोल्स महे टाइपकास्ट होतेय !
* ही जरा जास्तं आपेक्षा झाली पण १९२० च्या आसपास अशी बारीक कोनने काढलेली नाजुक मेहन्दी डिझाइन्स नसायची, बरेचदा आत्ता सार्॑खी डिटेल्स असलेली डिझाइन्स येतात सिरीज मधे.
Screenshot_20240502_215539_Gallery.jpeg
* तो ताज अजुन एक दगड, ना त्याला आलम वर प्रेम ना देश्॑प्रेम नीट दाखवता येत !
* सोनाक्षी अचानक मनिषा कोईरालाचा बदला घ्यायचा विसरून आझादीकी जंग मधे सामील होते , शेवट अगदीच गुंडळला.
तरीही भन्सालीला धन्यवाद : मनिषाच्या जागी माधुरीला घेतले नाही यबद्दल थँक्स अ टन.. कलंक मधे सेम हिरामंडी विष्॑य होता, त्यातली मधुरी इतकी खोटी आणि सुमार अभिनय , डॉयलॉग्ज मारते, तिचा विचार न केल्याबद्दल मंडळ आभारी आहे Proud

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा - बर्‍याच दिवसांनी?

र.आ - Happy तौलनिक अभ्यास भारी आहे

त्यात पण च्यूक्क असा नुसता आवाजच मॅनेज केला आहे सो फार >>> मै Lol हो. भीषण सीन आहे तो. च्यूक्क उच्चार अगदी चपखल आहे. पुणे-५२ मधे असता तर तेथे प्रोटॅगॉनिस्ट लोक चूक करत आहेत हे ही तो सीन दर्शवतो असाही अर्थ कोणीतरी साक्षेपी ई समीक्षकांनी काढला असता. वास्तविक त्या पिक्चर मधे आता नवीन प्रतिकांना जागाच नाही. पण मुंबईत सकाळच्या ८ च्या लोकलचा डबा कितीही भरला असला तरी एखादा पंटर त्यातही घुसतो तसे हे प्रतीक घुसवले असते लोकानी.

काही करायला गेलं यांचा 'पुणे ५२' होतो. मराठी माणसाचे संन्यस्त जीवन >>> Lol

प्रियत्तमा दे मला एक 'व्हॉटेव्हर'- >>> Lol हे तर सर्वात भारी आहे. It shows interest and lack of interest at the same time.

परत थोडी सिरीज बघायचा प्रयत्न केला. तिसरा एपिसोड - सोनाक्षी सिन्हा इतरांच्या मधे कडमडायचा प्रयत्न करते तो. मधे एक "पिंजरा" सारखा सीन येउन गेला. तिच्यावर सगळी संपत्ती उधळून कफल्लक झालेला एक नवाब वगैरे. पण पुढे फारच पकाऊ झाले.

अशा रीतीने धागा आता हिरामण्डी, लाहोर येथून निघून, चौफुला मार्गे पनवेल डान्स बार वर पोचला आहे >>> संलीभाला पुढच्या दोन प्रोजेक्ट्सचे विषय मिळाले.

चौफुला वरच्या सिनेमात सांवरिया सारखा सेट लावून आणखी एक निळा /सोनेरी /किरमिजी / सोनसळी चित्रपट बनवता येईल.
download (2)_0.png

सगळीकडे कारंजी, आखीव रेखीव नद्या, ज्यांचे काठ किचन सिंकच्या संगमरवरी / ग्रेनाईट / एमडीएल बोर्ड प्रमाणे चकचकीत असून त्यातून वाहणारे पाणी कधीही वर येत नाही किंवा ते गढूळ होत नाही. त्यात कचरा वाहून येत नाही. अगदी फिल्टर्ड पाण्याच्या नद्या. त्यावर हेमामालिनीची आर ओ सिस्टीमची जाहीरात लावून उत्पन्न सुद्धा मिळवता येईल.

tamashiya2_0.png
या अशा नद्यांच्या मधे जागा मिळेल तसे रस्ते वाट काढत असतात आणि त्यांनी एकमेकांना डिझाईनर कोनात छेदत एक चौफुला बनवलेला असतो. या चौकात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे असून तिथे एका सईद जाफ्री टाईप बोलणार्‍या अंकलचे फुलांचे दुकान आहे. सोलापूर रस्त्यावरच्या पाटस गावाजवळचा चौफुला नेमका कुठे आहे हे संलिभच्या चित्रपटात कधीच न उलगडणारे कोडे असल्याने हे अंकल सरदारजी पण असू शकतात. ते शेरो शायरी किंवा कबीराच्या दोह्यांचे चे दिवाने असून ते कथेचे सूत्रधार देखील आहे. त्यांच्या फुलांच्या दुकानामुळे चौफुलाचा उल्लेख सगळे चहुफुला असा करतात.
narrator.png

अंकल जावेदच्या शब्दात काव्यात्मक पद्धतीने कथेचं नरेशन करत असतात. त्यामुळे आपोआपच सिनेमा एका वेगळ्या तरल दुनियेत प्रवेश करतो. एव्हढी सजावट झाल्यावर एक कथा सुद्धा पाहीजे. मग दोन महागड्या फडांमधली स्पर्धा आणि त्यात नाचणार्‍या मेरलीन मन्रो , मधुबाला यांना कॉम्प्लेक्स देणार्‍या, मनीष मल्होत्री पोषाखात वावरणार्‍या तमासगिरणींच्या करूण कथा गाण्यातून उलगडत जाणार.
कुणाचीही कथा सांगताना सगळ्या नाचर्‍या बाहुल्या चौकात येणार.
( चहुफुलातला हाच तो चौक )
tam3.png
मग एखादी तान लावणारी सुरूवात करून देणार. गाण्यात वाक्यावाक्याला कारूण्य सांडवत त्या त्या ओळीवर नृत्याभिनय करत चित्रपट उपोदघात करणार.

तो शेवटपर्यंत कथा बिल्ड न करता उपोद्घातच करणार आणि आता बजेट संपलं म्हणता अचानकच उपसंहार अशी पाटी झळकल्याने शेवटपर्यंत थांबलेला एखादा प्रेक्षक जायचं कि कसं या विचारात चुळबूळ करत राहणार.

पहिल्या दहा मिनिटात उठून गेलेले, अर्ध्या तासाने उठून गेलेले, मध्यंतरात उठून गेलेले आणि मध्यंतरानंतर उठून गेलेले यापैकी जास्त चाणाक्ष प्रेक्षक कोण यावर स्पर्धा भरतील. जे गेलेच नाहीत त्यांचे काय अशी अन्यायग्रस्त पत्रे सकाळ मधे येतील. सोमिवर पोस्टी फिरतील....

स्वतः संलीभ खुलासा करतील कि स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी त्यात भाग घेतला पाहीजे. त्यामुळे अजिबातच न पाहिलेल्यांना अ‍ॅवॉर्ड मिळणार नाही.

मात्र या चित्रपटाचे प्रोमोज पाहून चौफुला नावाचे इतके देखणे गाव पुण्यानजीक आहे हे कळल्याने तिथल्या जागांचे भाव गगनाला भिडतील आणि चहुफुल्यातील फडचालकांना मालकाने जागा खाली करायला लावल्याने आपले दुकान दूर कुठे तरी दुष्काळी भागात हलवावे लागेल.

च्यूक Lol Lol या सीनसाठी चाळिशीतले चोर बघावे लागेल का? की युट्यूबवर मिळून जाईल?

र आ >>> संलीभला अशा कल्पना सुचवू नका हो. त्यानेच मराठीत ‘लाल इश्क’ नामक पिक्चर आणलेला ना? तसाही ‘चंद्रमुखी’ जवळपास जाईल की याच्या Happy आणि अमृता खानविलकर डिझायनर तमासगिरीण म्हणून झोपेतपण करेल रोल. पण सईद जाफ्री सारखा क्रीपी न वाटणारा आशिकमिजाज मराठीत कोण आहे? रविंद्र महाजनी चालले असते कदाचित.

माझे मन
सईद जाफ्रीची अडचण पटली. माझ्या डोळ्यासमोर वेलणकर ( दृश्यम मधले) होते , पण ते सईद जाफ्री प्रमाणे खुशमिजाज न वाटता बोचरे विनोद करत राहिले असते. त्यामुळे नरेटर मधे बदल केला.

मराठी टच द्यायला वारकरी काका घेऊया का? म्हणजे समेवर ‘जयहरी विठ्ठल’चा घोष, संत कान्होपात्रा उदाहरणे वगैरे टाकता येतील. प्लस कोणाच्या तरी भावना दुखावून फुकट प्रसिद्धीची सोयही करता येईल. भन्साळीला सेन्स आलाच तर अजय अतुलचं संगीत आणि नाहीच आला तर इस्माईल दरबारच्या कॉप्या मारतो तसं माऊलीचं डीजे वर्जन वगैरे टाकता येईल, ढोल वाजवायची पण सोय होईल. रिंगणाचा अश्व उधळला व तो नदीवर पाणी भरायला आलेल्या हिरॉईनीच्या दिशेने भरधाव चाललाय वगैरे प्रसंग टाकून ६ पॅक हिरोची (अंकित मोहन इ.) एन्ट्री करता येईल. वारकऱ्यांचे पांढरे कपडे, अबीर-गुलालाची उधळण, फुगडी यामुळे एका डान्सची सोय होईल. लगे हाथ ‘यु नो रिंगान? इटस् अ मिस्टिकल एक्सपिरीअन्स’, ‘फुगडी इज सच्च अ गुड बॉडी एँड माईंड एक्झरसाईझ. बेटर दॅन झुंबा, यु नो.’ वगैरे मुलाखती देता येतील.
इतकं सुंदर गाव असल्याने त्यावर ब्रिटीशांचा डोळा आहे, ते तमासगिरांना हटवू इच्छितात, असा (कलंक बाय केजो टाईप) देशभक्ती एँगल पण टाकता येईल.

भन्साळीच्या सिनेमातला मराठी वारकरी सौदेंडियन किंवा पंजाबी अ‍ॅक्सेण्टचं मराठी बोलू शकतो. त्याच्या सिनेमात पाटसला एका बाजूला हिमालय, मधे झील आणि टोकाला समुद्र सुद्धा असू शकेल.

वारकऱ्याच्या भुमिकेत गिकु चालेल. ग्रामिण ऍक्सेंट आणता येईल त्याला.
मेन हिरो मठ्ठ असल्याने कुठेतरी उपेंद्र लिमये घुसवून अभिनयाचा कोटा पूर्ण करता येईल.
मेन हिरो इंग्रजांच्या विरोधात लढणारा संस्थानिकाचा मुलगा जो तमासगिर आईकडून हिरावून घेतलाय व संस्थानिकाच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा इंग्रजांना सामिल असा फॅमिली ड्रामा करता येईल.
दोन्ही हिरॉईन्सना एकच हिरो आवडतोय असा प्रेम त्रिकोण करता येईल. जिचं प्रेम हिरो धुडकावतो ती व्हिलनच्या बाजूने जाते/व्यसनी होते व फायनल संघर्षात उपरती होऊन हिरोचा प्राण वाचवण्याच्या नादात स्वतःचा जीव देते/सेवाग्रामला जाते असंही दाखवता येईल.
मेन हिरो देशभक्त असल्याने त्याचे आईबाप सात्विक असणे अपेक्षित. रविंद्र मंकणी व मृणाल कुलकर्णी एकदम फिट या रोलमध्ये. तिला नववारी नेसायची व उसासे टाकायची सवयही आहेच. संस्थानिकाची दुसरी बायको म्हणून सुचित्रा बांदेकर/किशोरी शहाणे चालतील. इंग्रजांना सामिल एखादा ठरकी सावकार म्हणून महेश मांजरेकरशिवाय कोण? तो आल्यामुळे २ मिन्टाच्या रोलमधे सल्लू येईल ज्याचा गाजावाजा तो मेन हिरो असल्यासारखा करता येईल. तोही माझी आई मराठी म्हणून मी वारकरी परंपरेशी कसा जुडलेला आहे हे सांगून लोकांच्या तोंडाला फेस आणेल. ममामुळे गौरी इंगवले आली तर तिला विरुद्ध फडात टाकून तिच्या डान्सची सोय करता येईल. ‘डुगना लगान देना पडेगा’ टाईप संवांदांसाठी आता फक्त लुक केनीच उरलाय, तो चालवून घेऊ आपण.

पनवेल डान्सबारसाठी आपण गुंठामंत्री, राजकारणी, कॉंट्रॅक्टर नेक्सस, पर्यावरण वादी-विरोधी संघर्ष ठेवू.
इथे ममाला बारबालांच्या जीवावर जगणारा बारमालक ही भुमिका शोभेल. त्याच्या भुमिकेला रुपेरी किनार द्यायची असेल तर एखाद्या बारबालेच्या मनाविरुद्ध सलगी करणाऱ्या पोर्शेमालकाच्या तो सणसणीत कानाखाली देतो असा शॉट घेता येईल. गौरी इंगवलेला कॉलेजची फी भरण्यासाठी नाईलाजाने डान्सबारमधे काम करावं लागतंय असं दाखवता येईल.

चालेल. या बार्समुळे जीव मुठीत धरून राहणाऱ्या सामान्यांच्या चाळीवर बिल्डरचा डोळा आहे आणि बारमालकाशी संगनमत करून तो किंमत पाडून चाळ विकत घ्यायला बघतोय असा सबप्लॉट करू.
तिथे तो आणू इच्छिणाऱ्या स्कीममुळे पर्यावरणाचा नाश होईल म्हणून पर्यावरणवादी त्याला विरोध करताहेत, त्या दरम्यान एखादा ऑडीधारक पर्यावरणवादी हिरो चाळीतल्या तडफदार मुलीच्या प्रेमात पडलाय हा वर्गसंघर्षपण दाखवता येईल. तिच्या तिरसट बापाच्या भुमिकेत अर्थातच शरद पोंक्षे.

अरे पण भन्साळी मराठी पिक्चर नाही बनवत. Lol
एव्हढे सगळे मराठी कलाकार फक्त रोहित शेट्टीच्या पिक्चर मधे असतात.

बारघम नावाने पिक्चर काढेल तो. अजय देवगण, रणवीर सिंह मेन कलाकार. हिरविनी रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रियदर्शनी.
प्रसाद. समीर इ इ. सर्वांना बक्कल नंबर पोलीस म्हणून संधी मिळेल.

भन्सालीच्या कुठल्याही कामात कसलं डोम्बलाचं लॉजिक शोधता वा बोध घ्ययाचा?
गाणी चांगली आहेत.

आधीचा जेवढा काही इतिहास वाचलाय , तो हि काही मेळ खात नाही.
फार पुर्वी गणिका ह्या कलांचे प्रदर्शन करत. त्या शरीरविक्री करत नसत. त्यांना मान असे. गणिककडे जाणे किंवा गणिका पाळणे पण उच्च समजत.
ब्रिटिशांनी आपली करमणूक करण्यासाठी, शरीरविक्री करायला भाग पाडले गणिकांची संपत्ती लूटून आपल्या ताब्यात घेवून. मग ते रेड लाईट अरीया झाला वगैरे कसलाच उल्लेख नाही की पाश्वभुमी नाही.

अचानक मग त्या सर्व बायांचे जागलेले देशप्रेम पाहून हसायला येते.
माधुरीला नाही घेतले हि कृपाच केली संलीभा ने स्वतःवर्झ Proud

आणि मराठीत करायचा असेल तर, अमृखा नकोच.
मग त्याबरोबर तो आशिष पाटी ल येइल.
मग ती नवीन सोकु येइल.
आलीच तर मानसी नाईक ( रीकामीच आहे).
मग ती क्रांती रेडकर आहेच

एक लावणी डान्सर म्हणून आहे.

बाकी , ग्लोरीफीकेशन विषय चालूच आहे, तर संजय दत्त सिनेमाविषयी पण येवु द्या.
२५६ मैत्रीणी, ड्रग्स वगैरे…

एकंदरीत ह्या मूवीनंतर, बरेच लोक संजय दत्तला “बिचारा आईविना लेकरू“ कॅटेगरीत टाकून प्रेमात पडलेले; अगदी चांगले शिकलेले सुद्धा.
आणि सहानभुती वाढलेले दिसले.
त्याचा फायदा संद ला झाला.

इतर सिनेमे कसे वाईट गोष्टी/प्रथा ग्लोरीफाय करतात यावर ढिगभर पोस्ट्स आल्या आहेत पण
….अजुनही अमिताभचे ७० च्या दशकातले आयकॉनिक सिनेमे मुंबई माफियाचे ग्लोरीफिकेशन करणारे का नाहीत याचे उत्तर मिळाले नाहीये.
एन्टरटेन्मेन्ट म्हणून ते एन्जॉय केले असतील तर बाकी कुठल्या सिनेमां मधल्या ग्लोरीफिकेशन बद्दल तक्रार करणे म्हणजे मज्जाच मग Happy

अजुनही अमिताभचे ७० च्या दशकातले आयकॉनिक सिनेमे मुंबई माफियाचे ग्लोरीफिकेशन करणारे का नाहीत याचे उत्तर मिळाले नाहीये. >>>

डीजे - मी ते तवायफ व एकूणच जुन्या काळातील प्रथांचे ग्लोरिफिकेशन का आवडत नाही हे वरती (आता २-३ पाने मागे गेले) लिहीले आहे.

माफियाचे किंवा इन जनरल गुन्हेगारांचे ग्लोरिफिकेशनही मला आवडत नाही. पण ते वरच्यापेक्षा वेगळे आहे. हीरामंडी, उंच माझा झोका हे "गुन्हेगारांचे" ग्लोरिफिकेशन नाही. ज्या प्रथा/समाजव्यवस्था अन्यायकारक होत्या त्यात काहीतरी भारी, संस्कृतीपूर्ण वगैरे असल्यासारखे दाखवणे हे मला आवडत नाही.

दीवार बद्दलः दीवार रिलीज झाल्यावर हिट झाला तो एक पूर्ण कमर्शियल पिक्चर म्हणून. तो "मुंबईतील स्मगलिंगच्या सिस्टीमवर आधारित" वगैरे नव्हता. लोकांनीही तो त्या संदर्भाने पाहिला नाही. त्यातही सलीम-जावेदने अगदी चलाखीने विजय चे पात्र उभे केले आहे. तो निरपराध लोकांना त्रास देत नाही. त्यामुळे त्याने सुरूवातीला अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे आणि नंतर त्यात अडकत जाउन तो ही स्मगलिंग मधे सामील होणे याला आपली सहानुभूती मिळते. मुळात तो ७०ज मधल्या स्मगलिंग मधले लोक किंवा मुंबईमधे वाढत असलेल्या "माफिया"चे प्रतिनिधित्व वगैरे करत नाही. त्याच्या कथेचे हाजी मस्तानशी साम्य आहे वगैरे माहिती बरीच नंतर आली. आणि ते ही सुरूवातीला बाँबे डॉकवर काम व नंतर स्मगलिंग यापुरतेच आहे. बाकी सगळा कमर्शियल मसाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजय जे करत आहे ते चूक आहे हे ठसवण्याची कोणतीही संधी सलीम-जावेद पटकथेत सोडत नाहीत. शशी कपूर, निरूपा रॉय पासून ते ए के हंगलपर्यंतच्या प्रसंगातून.

कॉपीराइट >> Lol

फारएण्ड , खालची (म्हणजे वरची) पोस्ट आवडली.
दीवार मधला नायक ननायक आहे. त्याने हा रस्ता स्वतःहून निवडलेला आहे. तवायफ किंवा तत्सम व्यवसायायात स्वमर्जीने कुणी जात असेल तर ( कायद्याचा मुद्दा बाजूला ठेवून) ग्लोरिफिकेशन वगैरे गौण ठरते. मात्र जिथे आपले करीयर काय असावे हे समजण्याच्या आधीच अशा व्यवसायाचा शिक्का माथ्यावर बसलेला असेल आणि त्यामुळे इतर स्त्रिया सुरक्षित राहतात असा डिफेन्स प्रचलित होत असेल तर अशा व्यवसायांचे ग्लोरिफिकेशन हे त्या व्यवसायाच्या गुलामांना त्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी सामाजिक / मानसिक बळ पुरवणार नाहीत.

माझे मन,
पनवेल डान्स बार वर मराठी वाल्यांनी पिक्चर काढायला पाहिजे.
प्रयत्नांती भन्साळी !

गंगूबाई, हिरामंडी नंतर भन्साळी वर शिक्का बसू नये म्हणून त्याला इंटरस्टेलार सारखा चित्रपट बनवायची बुद्धी व्हावी.
पण जर त्याने इंटरस्टेलार प्रमाणे जाणार्‍या यानात हिरो हिरविनीचा प्रणय दाखवला, यानात कारंजी, महाल, पडदे दाखवले आणि नव्या ग्रहावर पोहोचल्यावर नायकाला समजते कि नायिका पृथ्वीवर असताना गणिका होती. नव्या ग्रहावर सर्वात आधी गणिकांना पाठवलेले असल्याने नायकाला ही मागे राहिलेली गणिका असेल असा संशय येत नाही.

नायक रुसून जातो. रंगपंचमी येते. नायिकेला तो आल्याचे भास होतात.
ये किसकी है दस्तक , यहा कौन आया सारखे एखादे गाणे इथे सुरू होते.

तिकडे नायक यानातलं पेट्रोल संपत आल्याने सीएनजी किंवा केरोसीन चालेल असं मॉडिफिकेशन करायची खटपट करत असतो (सायन्स फिक्शन असल्याने थोडंसं सायन्स दाखवावे लागते). इतक्यात एक म्हातारा त्याला त्याच्याकडचे पंचांग मांडून यान जर राहू आणि केतूच्या जवळुन गेले तर त्यांच्या गुरूत्वाकर्षण बलांमुळे ते इंधन न वापरता सूर्यमालेच्या चुंबकीय क्षेत्रात जाईल असे सांगतो. पण अट एकच असते कि यानाची पूजा एका पवित्र गणिकेच्या हातून झाली पाहिजे.

अशी पवित्र गणिका शोधायच्या कामाला नायक लागतो.
इकडे गणिका नायिका पल्लेदार शेरो शायरी करत दु:ख उगाळत राहते. शेवटी नायकाला गणिकेचं महत्व समजतं. तसेच ती "पवित्र" आहे हे ही कळतं.
आणि अशा रितीने पूजेचा क्लायमॅक्स सुरू होतो. नायिकेवर शंका घेणारे लोक एका बाजूला, क्षणाक्षणाला ड्रामा. मग नायक बुचकळ्यात पडतो. आपल्याला कार शोरूम कंडीशन मिळणार कि ओएलएक्स वरून ? या शंकेने त्याची मनःस्थिती दोलायमान होते.
पण नव्या ग्रहावरचे एक पाद्री कम मौलाना कम पुजारी कम न्यायाधीश निर्वाळा देतात कि नाही नाही गणिका खरंच पवित्र आहे. ते तिला धरणीमातेला कुशीत घेण्याची विनंती करतात. आणि काय आश्चर्य हा नवा ग्रह दुभंग पावू लागतो. मग पळापळ. यानात बसण्याची घाई.
नवग्रहस्तोत्र सुरू होतं, त्याच्या चालीवर शेवटचं गाणं सुरू राहतं. धरती फटतच राहते.
शेवटी स्लो मोशन मधे नायक नायिका यानाचं दार बंद होत असताना पळत जाऊन यानात चढतात. आता ग्रहाचे दोन तुकडे होतच असताना यानाचा धूर निघून ते आकाशात झेपावतं.....

एकूणच नायिका पवित्र असयाने त्यामुळे शास्त्रज्ञ असलेला नायक खूष होतो, प्रेक्षकही नि:श्वास सोडतात कि चला याला शोरूम मधूनच कार मिळणार आहे आणि द एण्डची पाटी येते.

चौफुला काढला तर भन्साळी ची फड मालिकीण माधुरी बाय यूस गावकरीन असेल नक्की. आणि नवीन नृत्यागना शरर्मिन बाय धोंडेकरीन असणार. धोंडेकरीन म्हणणार मी सवाल जबाब लिहीन, नाचणार नाय म्हणजे नाय, मी शाहिराच्या प्रेमात हाय म्हणजे हाय. हवं असलं तर मला स्टेज वर झाडाचा कट आऊट धरून उभ करा मी शाहिराच्या डोक्याव प्रेमाची सावली धरीन. नाहीतर मला स्टेजवर दगडाचा रोल द्या त्यावर शाहीर डोकं आपटून जीव देईल. पण मला नाचवू नका

नंतर कहाणी मे ट्विष्ट येणार धोंडेकरीन अदाकारित धोंडा असण्याचं रहस्य. तिच खून तमाशावाल नसून १२वित नापास होऊन नंतर यम पी यस सी करून, सिलेक्ट झाल्यावर लफडी केलेल्या धोंडेकर सायबाच असणार. म्हणून ती सारखं सवाल जबाब लिहिते म्हणत असणार. खून का असर

दगड बनली तरी ती म्हणेल....
एक बार देख लिजिए, दगडोबा बना दिजीए |
(उप्प्स!) पैलेसे दगडीच है हम, कपाळमोक्ष कर दीजिए ||

Pages