पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता विषय निघालाच आहे तर विचारून घेते-
गोष्टीतलं पात्र विदर्भातलं असेल आणि त्याच्या तोंडी तसे संवाद असतील तर ठीक आहे पण कथेचा भाग असतो तिथे प्रमाण मराठी वापरायला काय हरकत आहे?

Exactly. बाकी पूर्ण कथेमध्ये जळगाव-नाशिक बोलीभाषेचा लवलेशही नसतो. म्हणून ते जास्त खटकतं.

कथेत जरी अमेरिका असली तरी लिहिणारा नाशिक जळगावचा असल्याने तो करेल, जाईल व. व.

तरी ठिक आहे. लेखक तसेच बोलतो म्हणुन माफ के‘ल्या’ जाईलही Happy

माझे डोके दुखते वाचुन पण तरी माफ करता येते.

पण आता सर्रास ‘तो’ व्यक्ती लिहिले/बोलले जाते त्याचे काय???
मराठीतला व्यस्त व हिंदीतला व्यस्त हे वेगवेगळे अर्थ असलेले शब्द आहेत त्याचे काय??

माझा संताप होतो ‘तो’ व व्यस्त ऐकुन.

मी आजकाल लोकांची भाषा ऐकून त्रास न करुन घेण्यापर्यंत पोहचले आहे.
अशीच तिडिक पूर्वी मला वस्तू भेटली, मग मी बोललो ऐकून होत असे. आता शांती शिकले.

अमेरिकेत गेलेला नाशिककर यूअर ला यॉर म्हणायला शिकतो पण करेल, जाईल बदलत नाही.

अरे, संताप, त्रास करून घेणे वगैरे काय! Proud

अमेरिकेत अमेरिकेतील प्रमाण भाषा चुकवणारे अमेरिकन बोली भाषिक भेटले तर?

>>अमेरिकेत गेलेला नाशिककर यूअर ला यॉर म्हणायला शिकतो पण करेल, जाईल बदलत नाही.>> कारण इंग्रजी त्या व्यक्तीची सेकंड लँग्वेज आहे. सहजपणे विचार न करता बोलली जाणारी मातृभाषा नाही.

म्हणुनच मी सोडुन देते…

पण तो व्यक्ती, व्यग्र च्या जागी व्यस्त हे चुकीचे मराठी आहे जे वारंवार कानावर पडल्यामुळे आता लोकांना बरोबर वाटायला लागलेय.

साधना,
शब्द किंवा व्याकरण चुकीचे वापरले तर सरळ मी तसे सांगते कारण मराठी बोलताना प्रांतानुसार वैविध्य म्हणून असलेला फरक वेगळा आणि शब्दच चुकीच्या अर्थाचे वापरणे वेगळे.

"तो व्यक्ती" कालच्याच वर्तमानपत्रात होते. मी लष्कराच्या भाकऱ्या धाग्यात पोस्ट करणार होतो, पण राहुन गेले.

the number you have dialled is not answering चे भाषांतर आपण ज्या व्यक्तीला संपर्क करू इच्छिता
तो व्यक्ती उत्तर देत नाहीये असे फोनवर ऐकायला मिळते Uhoh

या फोनमुळेच तर तो व्यक्ती मराठीत धिंगाणा घालण्यात व्यस्त झालाय..

स्वाती, हल्ली प्रांताभिमान वाढलाय ज्यात मला काही वावगे वाटत नाही पण चुकीचे मराठी दुरुस्त केले तरी चुकीचेच रेटतात आणि त्यातही प्रांताभिमान आणतात.

मला सुस्वागतम् हा शब्द खटकतो. त्याची फोड कशी होते पहा - सु + सु + आ + गम् -> कभुधावि (गत). एक सु पुरेसा असून त्यानेच स्वागतम् शब्द तयार झाला आहे. सुसु कशाला करायला पाहिजे? प्रमाण संस्कृतप्रचुर बोलणारेही असल्या चुका करतात.

मला कोणती ही भाषा फार खटकत नाही. भाषेला फार प्रमाण असायला हवं आणि तेच बोललं जावं अस ही मला वाटत नाही. भाषा प्रवाहीच असायला हवी. ज्ञानेश्वरांची मराठी कुठे कळते नीट आपल्याला ? बदल झालच आहे ना इतक्या वर्षात ...

भाषा आणि बोलणे याबाबत खटकण्याचे गणित फार विचित्र असते. म्हणजे मला जे खटकेल ते इतर व्यक्तीस खटकेलच असे नाही. "बोलले जाते" "केले जाते" याऐवजी "बोलल्या जाते" "केल्या जाते" हे मला खटकते. "बोलल्या जाते काय? बोलल्या गेलेल्या, असे हवे ना?" वगैरे विचार मनात येतात. परंतु भाषा हि वडापाव सारखी असते. कोल्हापूर पासून मुंबई पर्यंत प्रत्येकाला आपल्या भागातलाच वडापाव चविष्ट वाटतो.

>> सुस्वागतम् हा शब्द खटकतो

हरपा Lol मला याच्याआधी ते "आगतम स्वागतम" जोडतात ते, खटकत जरी नसले तरी ऐकायला फार विचित्र वाटते.

हल्ली बोली भाषेवरून त्रास करून घेणं सोडलंय.जर बोलणाऱ्याला तसं बोलून आपल्या प्रांताची लिंक, नॉस्टॅल्जिया जपला असं वाटत असेल, कम्फर्टेबल वाटत असेल तर तसं.
फक्त लिखित स्वरूपात भाषा ही कोणतातरी एक स्टॅंडर्ड पकडून सर्व प्रांतात तशीच लिहिली जावी.तसं नाही झालं तर मुलांचे मार्क नक्की कोणत्या चुकांवर कापायचे यात गोंधळ होईल.सगळे सगळ्या प्रकारे लिहिलेल्या कोणत्याही टेक्स्ट ला बरोबर म्हणतील. किंवा बोलीभाषा लिखित मध्येही तशीच लिहायला हो म्हटले तर पेपर तपासणारे शिक्षक सर्व बोलीभाषा व्हेरियन्त चे ज्ञानी घ्यावे लागतील.

(यात खूप इंग्लिश शब्द वापरले आहेत.नाक वर करून प्रमाण भाषेवर लिहायचं आणि स्वतः पोह्यांवर शेव टाकल्यासारखे सढळ इंग्लिश शब्द पेरायचे यालाही अर्थ नाही.त्याबद्दल आगाऊ माफी.)

मला बोलीभाषा खूप खटकत नाही (खाल्ल्या जातं, केल्या जातं वगैरे). इकडे मायबोलीवर आल्यावरच वेगळ्या भागातली लोकं कसं वेगळं बोलतात हे लक्षात आलं आहे. त्यापूर्वी अजिबात एक्स्पोजर नव्हतं. काय खटकतं तर मराठीत घुसलेलं आणि बोकाळलेलं हिंदी. आज हे ‘बनवलं’, खूप ‘सारं’ इत्यादी. पण त्याबद्दल काही बोलता उपयोगी नाही. बरीच लोकं तशीच बोलत असतात.
रीया, तुला एक सांगू का? तू लिहिताना जे ‘होईला’ (व्हायला ऐवजी) लिहीतेस ते चुकीचं आहे.

"आगतम स्वागतम" >> अगदी अगदी Lol

मी माझं जुनं लिखाण आता काढून बघितलं तर माझं मलाच ते खटकतं. कदाचित हे असले माझे प्रतिसाद पण पाच एक वर्षांनी मला खटकतील. अश्या प्रकारे संपूर्ण आयुष्य खटकण्यातच चाललं आहे.

रीया, तुला एक सांगू का? तू लिहिताना जे ‘होईला’ (व्हायला ऐवजी) लिहीतेस ते चुकीचं आहे.
>>
हो गं! शाळेत पण त्यावरून मार्क्स कापले जायचे माझे पण somehow माझ्या मेंदूत चुकीचा शब्द कुठला नि बरोबर कुठला ते रजिस्टरच होत नाही. लक्षात ठेवायचा प्रयत्न करते. (असा आणखी एक शब्द आहे. आत्ता आठवत नाहिये)

मनीमोहोर +१.
चुकीचं बरोबर जे रुळेल ती भाषा. व्यग्र आणि व्यस्त यातला भेद व्यस्त प्रमाणात धूसर झाला आणि ते तसं लाख होऊ नये वाटलं तरी आपण प्रवाहपतित का पतीत. आणि तसच असायला हवं हे मी लाख वेळा मनाला बजावत असतो. शुद्धतेचा आग्रह धरावा त्याचा वापर ही करावा पण त्याचा त्रास होणे हे स्वतःला लै शाणा समजून रायल्याच लक्षणे.

हा हिडन ब्रेन चा माझा एक आवडता भाग ( एपिसोड) आहे, जरूर ऐका.
खूप वेळ नसेल तर ३० व्या मिनिटापासून चालू करा.

Pages