सत्यभयकथा - स्वप्नकल्लोळ

Submitted by झम्पू दामलू on 6 December, 2023 - 15:06

माझा मित्र अनिल. दापोलीला महाविद्यालयीन शिक्षणावेळचा माझा वर्गमित्र. तेंव्हा पासूनच तो काहीसा अबोल आणि अतीसंवेदनशील वगैरे. चार मित्रांच्या घोळक्यात फार न बोलता कडेला उभा राहून विनोदांची मजा घेणारा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला ठाण्याला एका स्थानिक वृत्तपत्रात नोकरी मिळाली.
नोकरी लागल्यावर अनिलचे लग्न झाले. पण काही दिवसातच घटस्फोट देखील झाला. नक्की कारण त्याने काही सांगितले नाही पण घाटस्फोटानंतर त्याची प्रचंड मानसिक, सामाजिक आणि आर्थिक घसरण झाली. पत्नीने त्याच्यावर नाही नाही ते आरोप केले. कोर्टाच्या वाऱ्या, वकिलाच्या महागड्या फिया, पोटगी ह्यामध्ये तो पूर्णपणे पिळवटून निघाला. जवळच्या नातेवाईकांनीच नाही तर घरातल्या लोकांनी देखील पाठ फिरवली. ह्या सर्व क्लेशदायक प्रसंगांना तो एकट्याने सामोरा गेला. ह्या काळात तो प्रचंड नैराश्याग्रस्त होता. तो मित्रांचे फोन देखील टाळायचा. पूर्ण सामाजिक अलगीकरण. त्याचे नोकरीतले काम देखील कारकुनी पद्धतीचे असल्याने कामाच्या ठिकाणी देखील त्याचा फार लोकांशी संपर्क येत नसे. कामाच्या ठिकाणी त्याला मनोर जवळच्या एका खेड्यात बदली घेण्याचे सुचवत होते. त्यालाही त्याने नकार दिला.
आशा हताश काळात तो एकदा आजारी पडला. ऑफिस मध्येच कणकण आल्यासारखी वाटल्याने तो लवकर घरी आला. त्याकाळी तो ठाण्याला एकटा छोट्या ब्लॉक मध्ये राहायचा. घरीच असलेल्या थोड्याफार औषधाच्या गोळ्या घेऊन तो झोपी गेला. त्याला एक स्वप्न पडलं.
स्वप्नात तो एका जुन्या लाकडी घरात बसला आहे. घर अनोळखी आहे. समोर त्याची लहान बहीण आहे. बहिणीसोबत त्याचे संभाषण चालू आहे. तो बहिणीला म्हणत आहे की - तू चल माझ्या सोबत मी समजावतो त्याला. घाबरतीस कशाला. मी आहे ना.
बहीण मग रडायला लागते. तो बहिणीला हाताला धरून घराबाहेर आणतो. घर थोडे निर्जन ठिकाणीच आहे. आजूबाजूला फार वस्ती नाही. संध्याकाळ आणि रात्रीच्या मधली काहीशी फसवी वेळ. इतक्यात तिथे रिक्षा येते आणि दोघे रिक्षात बसून निघतात. रिक्षा एका कच्च्या रस्त्याने जात आहे. आजूबाजूला बाभळीची झाडी आहे. त्याला दिसते की थोडे पुढे एक नदीवर पूल आहे आणि पूल ओलांडल्यावर रस्ता पुन्हा आल्या त्या दिशेने जात आहे. U असल्यासारखा. इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवतो आणि म्हणतो -
"आईला, हाच की तो पूल."
"कसला पूल?"
"साहेब, हा पूल चांगला नाही. तुम्ही इथेच उतरा आणि मला जाऊ द्या. मी पुढे येणार नाही."
अनिल म्हणतो - " हे बघ..आम्हाला पालिकडे जाणे फार फार महत्वाचे आहे. तू घाबरू नकोस.तू चालव रिक्षा काही नाही होत"
आढेवेढे घेत शेवटी रिक्षावाला रिक्षा सुरू करतो आणि जोरात पुलाच्या दिशेने निघतो. इकडे बहीण रामनामाचा जप सुरू करते. अनिल पण जोरजोरात तिचे अनुकरण करतो. उत्तर संध्याकाळची ती वेळ असते. रिक्षा पूल ओलांडते आणि काठाच्या चढाईच्या रस्त्याला लागते. अनिल रिक्षावाल्याला म्हणतो -
"बघ. मी म्हणत होतो ना काही नाही होत."
रिक्षावाला रिक्षा थांबवतो आणि म्हणतो "साहेब एकदा पुलाकडे बघा."
अनिल रिक्षातून खाली उतरतो आणि पुलाकडे पाहतो. अंधारात नीट दिसत नसते पण पुलाच्या अगदी मध्य भागी कठड्याला खेटून एक काळी आकृती उभी असते. पुरुषाची आकृती. अनिलला जाणवते की आकृती त्याच्याकडेच पाहत आहे. आकृती थोडी मागे जाते आणि त्याच्या डोळ्यादेखत काठड्यावरून नदीत उडी घेते. मागून रिक्षावाल्यालाचा आवाज येतो - "मी म्हणालो नव्हतो? पूल घातकी हाय"
ह्या स्वप्नानंतर अनिलला जाग आली. त्याचे सर्व अंग घमाने भिजले होते. तो नखशिखांत घाबरला होता.
पुढे काही महिन्यांनी तो थोडा थोडा नैराश्येच्या गर्तेतून बाहेर येऊ लागला. आम्हा मित्रांना देखिल भेटायला लागला. एका अशाच भेटीच्या संध्याकाळी त्याने त्याची पूर्वकहानी (पडलेल्या स्वप्नासहित) मित्रांना सांगितली. पुढे आम्हा मित्रांनी त्याला बराच मानसिक आणि आर्थिक आधार दिला. मित्रांच्या आग्रहाखातर तज्ञांकडून समुपदेशन देखील घेतले. त्याला ह्या गर्तेतून बाहेर काढायचा जणू आम्ही चंगच बांधला होता. आम्ही ह्या प्रयत्नात यशस्वी देखील होत होतो. आम्ही नियमितपणे भेटत होतो असे नाही. पण परत तो त्या मानसिक नैराश्यात अडकणार नाही ह्याच्यावर नजर ठेवून होतो. त्याच्या बाबतीत सर्व काही ठीक होईल असे वाटत असताना अचानक ती घटना घडली आणि सारेच फिसकटले.
एके दिवशी रात्री जेवण करून मी कुटुंबासोबत टीव्ही पाहत बसलो होतो. १०:३० च्या सुमारास फोन खणखणला. पाहिले तर अनिलचा फोन. एवढ्या रात्री का फोन केला असेल ह्या विचारात मी फोन घेतला. पुढचे संभाषण असे -
अनिल - " रफीक...रफीक..रफ्या..अरे"
"बोल अनिल. काय म्हणतोस?
"रफ्या अरे..."
त्याच्या आवाजावरून जाणवले की तो प्रचंड अस्वस्थ आहे.
"बोल अनिल. काय झाले? सगळं ठीक आहे ना? कुठे आहेस तू?"
"रफ्या अरे... मला तो पूल दिसला रे"
मी - "कोणता पूल अन्या? कुठे आहेस तू. मला नीट सांग बरे"
"तो पूल रे. मला स्वप्नात दिसलेला. तुला नाही का मी सांगितलेलं?तोच पूल रे. तीच बाभळीची झाडी. तोच कठडा"
दोन क्षण मला काहीच सुचलं नाही. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. तो कोणत्या पुलाबाबत बोलत आहे त्याचा संदर्भ लागला आणि पाया खालची वाळू सरकली.
"अन्या तू कुठे आहेस? मला सांग. मी अत्ता निघतो आहे. मला लगेच पत्ता सांग"
एव्हाना मी पायात चप्पल अडकवून गाडीची किल्ली शोधत होतो. वाढलेला माझा आवाज आणि घालमेल पाहता पत्नीला देखील कळत होतं की काही तरी भीषण घडत आहे.
"रफ्या मी पुलावरच उभा आहे रे. आणि तुला माहीत आहे का...."
काही क्षण जीवघेण्या शांततेत गेल्यावर तो बोलला.
"ती पुलावर मला दिसलेली काळी आकृती... तो मीच होतो रे. तो मीच होतो"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉल करणारे भूत !
शेवटचा ट्विस्ट जाम आवडला, साध्यासोप्या शब्दातली फाडू भयकथा !

झंपूूजी, छान लिहिली आहे कथा. शेवटचा ट्वीस्ट तर अप्रतिम आहे! कथा खरी आहे कि...?
>>>> मेल्यावर कुणी कॉल करतं का? काहीही हं श्री !!

हल्ली भुताला पण सिम इशू करतात. भुताळी मोबाईल वापरून भूतं कॉल करतात.
जाउद्यात.
मला एव्हढेच म्हणायचे होते कि ही सत्यकथा आहे कि कपोलकल्पित.

आजारपणात माझ्या स्वप्नात जी बाई यायची, जी की माझ्याकरता थांबून राहीलेली असे (कशाकरता थांबलेली असे काय माहीत Sad ), आणि मला वाटे - आपली बुद्धी भ्रष्ट तर झालेली नव्हती ना जेव्हा या बाईला भेटण्याचे वचन दिले? ती बाई अगदी होमलेस दिसे पण माझ्यासारखी दिसे.

आजही मला ईश्वर भक्ती म्हणा नामस्मरण करण्यामागे त्या स्वप्नाचा सिंहाचा वाटा आहे. होमलेसनेस ची भीती आहे जी की माझ्या मनात लहानपणापणापासून आहे. पण त्या भीतीमुळे मी रामाचे आज नाव आवर्जुन घेते.

तेव्हा सिव्हिअर मेंटल इश्युजमध्ये हे होउ शकत असावे. जेव्हा व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा तिचा मानसिक तोल ढळलेलाच असतो. प्रत्येक दिवस खायला उठलेला असतो. आपलाच मेंदू आपला शत्रू बनलेला असतो. तेव्हा मित्राला मेंटल इश्यु आहे हे नक्की.
-------------------------------------------------------------------------------------------
ही कथा खरी आहे की कपोलकल्पित याविषयी संभ्रम निर्माण होणे - हेच या कथेचे यश आहे नाहीतर भडक भयकथा पैशाला पासरी आहेत.

मला एव्हढेच म्हणायचे होते कि ही सत्यकथा आहे कि कपोलकल्पित.
,,.,
कथेत देव असेल तर त्यावर श्रद्धेने विश्वास ठेवला जातोही
पण भूत किंवा अमानवीय काही आले की ते काल्पनिक समजले जाते.
त्यामुळे तुमच्या प्रश्नावर घेतलेला आक्षेप योग्य आहे Happy

सिव्हिअर मेंटल इश्युजमध्ये हे होउ शकत असावे. >>> तो आत्महत्येच्या विचारात असताना त्याने मित्रा ला कॉल केलाय असे मला वाटले. उडी घेण्या पुर्वी..तळ्यात मळ्यात असताना. भूत बनल्या वर नाही.

>>>>तो आत्महत्येच्या विचारात असताना त्याने मित्रा ला कॉल केलाय असे मला वाटले. उडी घेण्या पुर्वी..तळ्यात मळ्यात असताना. भूत बनल्या वर नाही.
अगदी बरोबर. भयकथा आहे. भूतकथा नाही.

सर्वांचे आभार _/\_

आत्महत्येच्या विचारात असताना त्याने मित्रा ला कॉल केलाय असे मला वाटले>>
हो बरोबर.

छान

हो बरोबर.

Submitted by झम्पू दामलू on 13 December, 2023 - 11:07>>> नाही पटलं....जसं काय भूत बनणं न बनणं त्याच्याच हातात आहे.....मला तर वाटतयं त्याला तो पूल दिसल्याने त्याच्या सबकॉन्शियस मांईंड मधल्या प्रतिमा जिवंत होऊन त्याला हॅलुसिनेशन्स होत आहेत.....नागवं होऊन दगडं मारीत फिरणार बहुतेक... Biggrin