भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अकिंचन (निकिंचन हा पण पर्याय )
= अतिशय गरीब; जवळ काही एक नाही असा
(किंचन = काहीही)

बैरागी व्यक्तीसाठी हे विशेषण वापरता येते.

महागणेशपञ्चरत्नस्तोत्रात हा शब्द वाचला होता. अकिञ्चनार्तिमार्जनम् - असं ते (आदि शङ्कराचार्य?) गणपतीचं वर्णन करतात. अकिञ्चन (इथे गरीब हा अर्थ आहे की बैरागी, बघायला पाहिजे; गरीबच असेल) लोकांच्या दु:खांचा (आर्ति) नाश (मार्जन) करणारा.

अकिञ्चन >>>>
ओ ! म्हणजे हे त्याचे मूळ शुद्धलेखन दिसते आहे.
इथे टंकता येते की नकलून घ्यावे लागते ? Happy

मराठीत त्याचा अनुस्वार होत असावा, त्यामुळे हलन्त लिहायची गरज नाही. लिहायचे झाल्यास इथे माबोच्या वेब व्हर्जनमध्ये लिहिता येते (गमभन सुविधा) akiYchana असं टंकल्यास.

धन्यवाद !
गमभन सुविधा माझ्याकडे नाही.

तुमच्याकडे असण्याची गरज नाही, ती वेब व्हर्जनवर आहे. तुम्ही वेब ब्राउझरमधून मायबोली संकेतस्थळ वापरलेत (संगणकावर) तर ती वापरता येते.

… आर्ति - नाश (मार्जन) करणारा.…

आर्ति आधी कधीतरी वाचलेला शब्द. अर्थ आज समजला Happy

आर्ति, आर्त, आर्तता यांचा संबंध असेल का ?

शत जन्म शोधितांना | शत आर्ति व्यर्थ झाल्या
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या

यात आर्तिचा अर्थ काय?

आर्ति (स्त्री. नाम ) = दुःख; पीडा; उपद्रव.

आर्त ( विशेषण )= दुःखित; पीडित; त्रस्त.
..
आर्त, आर्ति ( दोन्ही स्त्री. नाम ) )= उत्कट इच्छा
..
आर्तता ?? हा कोशात नाही.

आर्ति = दुःख

आर्ति= उत्कट इच्छा

How prophetic !!!!

'अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति'चा उल्लेख इरावतीबाईंच्या 'युगान्त'मध्ये येतो असं आठवतंय. राजसूय इ. यज्ञांनंतर मिळालेली सर्व संपत्ती दान करून सम्राटाने अकिञ्चन व्हायचे असते.

निष्कांचन

मला प्रश्न पडलाय-
क़र्जबाजारी झाला तर सोनार “निष्कांचन” होईल का ?

How prophetic >> Happy
क़र्जबाजारी सोनार “निष्कांचन” होईल का ? >> Happy
दोन्ही प्रतिसाद आवडले.

एक नवीन मुद्दा विस्तृतपणे लिहितो.

आपण पु, स्त्री, नपुं लिंगात भेद करताना भाषेत ३ प्रकारची सर्वनामे वापरतो. त्यांचं एकवचन आणि अनेकवचन अशी जोडी खालीलप्रमाणे -
पु : तो - ते (तो आंबा - ते आंबे, तो फळा - ते फळे, तो राजा - ते राजे इत्यादी)
स्त्री : ती - त्या (ती नदी - त्या नद्या, ती वही - त्या वह्या, ती बोली - त्या (अनेक) बोली इत्यादी)
नपुं : ते - ती (ते फळ - ती फळे, ते पुस्तक - ती पुस्तके, इत्यादी)

आता 'मुलगा' हा शब्द घ्या. त्याचे अनेकवचन काय होईल? तो मुलगा - ते मुलगे. 'ती मुले' असेही अनेकवचन केले जाते, पण 'मुले' ह्या शब्दाचा मूळ शब्द 'मूल' (ते मूल - नपुं एकवचनी) आहे. शिवाय ते-ती जोडीमुळे 'ती मुले' हे ही नपुं अनेकवचनी आहे. त्यामुळे ह्या शब्दाची सर्वच रूपे - मुलांना, मुलांसाठी, मुलांच्या वगैरे - नपुंसकलिंगी होतील. पुल्लिंगी शब्द मुलगा असल्यामुळे मुलग्यांना, मुलग्यांसाठी असे (विचित्र वाटणारे) शब्द हवे होते खरे तर, पण तसे ते नाहीत. थोडक्यात मुलगा ह्या शब्दाच्या इतर विभक्ती करताना आपण मूळ पुल्लिंगी शब्द सोडून मूल ह्या नपुंसकलिंगी शब्दाची रूपे वापरतो.

आता आणखी गंमत तर पुढे आहे. मुलगी ह्या शब्दाचे अनेकवचन काय? मुलगा - मुलगे ह्या न्यायाने मुलगी - मुलग्या असे व्हायला पाहिजे. पण आपण 'मुली' असे रूप वापरतो. जसे 'मुले' ह्या शब्दाचे मूळ एकवचनी रूप 'मूल' आहे, तसे 'मुली' ह्या शब्दाचे एकवचनी रूप काय आहे? मुलगी - मुली अशीच जर जोडी असेल तर त्यातला 'ग' का बरे लोप पावला?

'ती मुलगी - त्या मुली' इथे सर्वनामे तरी दोन्ही स्त्रीलिंगीच आहेत. 'तो मुलगा - ती मुले' इथे मात्र पहिले सर्वनाम पुल्लिंगी एकवचन आणि दुसरे सर्वनाम नपुंसकलिंगी अनेकवचनी आहे.

मोल्सवर्थ काकांचे म्हणणे आहे की, <<'मूल is a mere child, denoting the individual or person; मुलगा (गी-गें) is the child of, denoting relation or appertainment (to the parent)>>. पण मग आपण एखाद्या मुलग्याबद्दल, जर तो 'the child of, denoting relation or appertainment (to the parent) असेल, तर, उदा. 'मी माझ्या मित्राच्या छोट्या मुलग्याला खेळणे आणले' असे का नाही वापरत?

रोजच्या वापरातलेच शब्द, पण हाय कि नाई मज्जा?

आहे खरं इंटरेस्टिंग.
हल्ली स्त्रीवादी किंवा स्त्रीपुरुष समतावादी लेखनात जिथे मुलग्यांवर जोर असतो, तिथे मुलग्यांना असा शब्दप्रयोग केल्याचे पाहिले आहे. मीही करतो. उदा: मुलग्यांनाही घरकामाची सवय लावली पाहिजे.

मूल म्हणजे कोणतेंहि लहान मूल व मुलगा म्हणजे पुत्र; कोणाचा तरी लेक ; हे मात्र माहीत नव्हते.

मूल म्हणजे मुलगाच का? मुलांना ..आपण सहसा एक मुलगी - एक मुलगा असेल तरी वापरतो ना?
मुलांना माहेरीच ठेवले आहे सध्या...!

पोर शब्दाची तर अजूनच गंमत आहे. हा स्त्रीलिंगी जास्ती वापरतात असे दिसते.
ती पोर घाबरून गेली.
पण अनेक वाचनात मात्र तो पुल्लिंगी होतो..
बिल्डिंग मधली पोरं एकत्र जमली.
पोरांनी जमवलं बुआ कुठून तरी....!

पोरं जमली हे नपुंसकलिंगी आहे. इंग्रजीत जसं कॉमन जेंडर आहे, तसं मराठीत नाही. मूल, पोर यांना कॉमन जेंडर म्हणायला हवं.

मला कालच समजलं की तेलुगूमधे स्त्रीलिंगच नाही. पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. वस्तू आणि स्त्रिया यांना व्याकरणात सारखंच समजतात म्हणे. ( Objectification of women ? Wink )

पोरं जमली हे नपुंसकलिंगी आहे. इंग्रजीत जसं कॉमन जेंडर आहे, तसं मराठीत नाही. मूल, पोर यांना कॉमन जेंडर म्हणायला हवं. >> +१. ते पोर - ती पोरे (पोरं) - नपुं. लाडाची पोर - असं स्त्रीलिंगी एकवचनी वाचलेलं आठवतंय. किंवा 'अरे पोरा' असं पुल्लिंगी संबोधन एकवचनही ऐकलं आहे. पण मुळात ते नपुं आहे.

मुलगा - मुलगी - मूल >> इथे मुलगा - मुले, मुलगी - मुली अशी जी गडबड आहे, तीच
पोरगा - पोरगी - पोर >> पोरगा - पोरे, पोरगी - पोरी इथे आहे.

तेलुगूमधे स्त्रीलिंगच नाही. >>>
कन्नडमध्ये सुद्धा काही बाबतीत लिंगांचा घोळ ( की फरक ? ) वाटतो.
माझ्या एक द्वैभाषिक डॉक्टर सहकारी बाई, मराठी बोलताना "मी येतो, मी जातो" असे म्हणायच्या.
भाषेच्या दृष्टीने नक्की मला माहित नाही.

त्यातून असे फरक मराठी-कन्नड द्वैभाषिकांमध्ये जास्त दिसतात

कन्नडमधे घोळ वगैरे नाहीये. प्रथम पुरुषी कर्ता असेल तर क्रियापद स्त्री आणि पुरुष दोघांना सारखंच असतं म्हणून त्या बाईंचा मराठीत बोलताना गोंधळ होत असेल.
आपण मराठीत जसं वस्तूंनाही स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग बहाल करतो (ती बस, तो सोफा) तसं कन्नडमधे करत नाहीत. सरसकट सगळ्या वस्तू नपुंसकलिंगी असतात, इंग्रजीत असतात तशा.

इन्टरेस्टिंग चर्चा! Happy

अमेरिकन इंग्रजीत सहसा unpredictable/chaotic/uncontrollable गोष्टींची नामं स्त्रीलिंगी असतात असा ठोकताळा पाहिला आहे.
यात storms, hurricanes, nature (निसर्ग या अर्थी) यांबरोबरच infant, baby इत्यादींचा समावेश दिसतो.
म्हणजे कोणा स्पेसिफिक बेबीबद्दल - ज्यांचं जेन्डर माहीत आहे - बोलत असाल तर त्यांचं जेन्डर 'बेबी' नामाला लागू होईल, पण सरसकट विधान, जसं 'if you smile at a baby, she will smile back at you' असं वाचनात येतं.

प्रथम पुरुषी कर्ता असेल तर ... महाराष्ट्रातील (निदान काही) ग्रामीण भागातही स्त्रीया "मी आलो / गेलो" म्हणतात, ती मात्र आली/गेली.

Pages