सोनटक्का

Submitted by मनीमोहोर on 21 August, 2022 - 04:33

श्रावण महिन्यात सोनचाफा, गुलबाक्षी, अनंत, प्राजक्त, कणेरी, जास्वंद, तगरी , तेरडा, गावठी गुलाबी गुलाब, चमेली, सोनटक्का अश्या अनेक फुलांच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. ही गोष्ट सोनटक्क्याची.

सोनटक्का

पावसाला सुरवात होऊन जरा स्थिरावला की महिना दोन महिन्याने श्रावण महिन्यात मार्केट पडवळ , भेंडी, अळू, दोडका, तांबडा भोपळा अश्या अस्सल देशी भाज्यांनी भरून जातं. फुलवाल्यांकडे ही तऱ्हे तऱ्हेची फुलं ह्या दिवसात विकत मिळत असली तरी तगर, प्राजक्त, गोकर्ण, सदाफुली, एकेरी जास्वंद, गुलबाक्षी , उन्हाळ्यात फुलणारा , पांढरा चाफा अशी अनेक फुल बाजारात विकत मिळत नाहीत. ती घराभोवतीच्या बागेत, गॅलरीत लावली तरच मिळतात.

असंच आणखी एक फुल म्हणजे सोनटक्का. ह्याच्या नावात सोन असलं तरी ह्याचा रंग असतो पांढरा शुभ्र किंवा अगदी क्वचित फिकट पिवळाही असतो. पण सोनेरी पिवळा मात्र कधीच नसतो. मोठ्या दांड्याच्या टोकावर कळ्यांच कणीस येतं. त्यातून लांब डेखाचं साधारण फुलपाखराच्या आकाराच्या तीन पूर्ण उमललेल्या पांढऱ्याशुभ्र पाकळ्या असणारं फुल उमलतं. पाकळ्या लहान बाळाच्या त्वचेसारख्या नाजूक आणि रेशमी पोत असलेल्या असतात. मधोमध पिवळे परागकोश असून त्यातले पिवळे परागकण कधी कधी शुभ्र पाकळ्यांवर ही पडतात जे फारच मोहक दिसतं.जनरली पांढऱ्या रंगाच्या फुलांना कीटक आकर्षित व्हावेत म्हणून निसर्गाने वास जरा सढळ हस्ते बहाल केलेला असतो पण सोनटक्का ह्याला अपवाद आहे. त्याचा वास अगदी मंद असतो. मला वाटतं त्याच्या धवल रंगात आणि पाकळ्यांच्या विशिष्ट रचनेतच कीटकांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे.

हे आल्याच्या जातकुळीतलं झुडूप आहे. मूळं आणि पानं दोन्ही साधारण आल्याच्या झाडासारखीच असतात. पण आल्यापेक्षा थोडं जास्त उंच वाढत. एक कंद लावला की त्यातुन अनेक झाडं निर्माण होतात. म्हणून फुलपाखराच्या आकाराच्या पाकळ्या असलेल्या ह्या फुलाला इंग्लिश लोकांनी “ बटरफ्लाय जिंजर लिली ” अस अत्यंत समर्पक नाव दिल आहे. असो. हे तसं सहज रुजणारं आणि भरपूर पसरणार झाड आहे. पाणी मात्र व्यवस्थित घालावं लागत . श्रावण महिन्यात सोनटक्क्याला खरा बहर येतो . खूप म्हणजे खूपच फुलतो सोनटक्का. फुलं गुलबाक्षीसारखी संध्याकाळी उमलतात आणि ती अतिशय नाजूक असल्याने काढून घरात आणली तर रात्री पर्यंत सुकतात ही. अर्थात फुलं काढायच्या आधी जोरात सर आली पावसाची आणि फुलं ओली झाली तर तेवढी ही टिकत नाहीत.

अतिशय नाजूक पणा मुळेच सोनटक्का बाजारात जास्त दिसत नाही आपल्याला. सोनचाफा, मोगरा, चमेली ह्या सारखी सोनटक्क्याची व्यापारी तत्वावर लागवड होऊ शकत नाही. कधी कधी हिरव्या पानात गुंडाळलेली चार पाच कळ्यांची जुडी दिसते बाजारात पण ताजी फुलच लहानपणी बघितली असल्याने ती अगदीच दीनवाणी वाटते माझ्या नजरेला. त्यामुळे घ्यावीशी नाही वाटत कधी.

माझ्या लहानपणी आमच्याकडे सोनटक्क्याचं नुसतं बन माजलं होतं. भरपूर फुलं येत असत. संध्याकाळी वेणी फणी झाली की सोनटक्क्याची एखाद दोन फुल आई आवर्जून अंबाड्यात खोचत असे. आम्हा मुलींना तर काय वेणीत फुलं हवीच असायची दररोज आणि कोणती ही चालायची. ही फुलं नाजूक असल्याने पिन लावताना हमखास डेख तुटायचं त्यामुळे जनरली ती लांब दांडा नुसताच वेणीत खोचून घातली जायची. कधी कधी त्याचे पिवळे परागकण केसांना ही चिकटायचे तेव्हा तर खूपच मजा वाटायची. गणपतीत संध्याकाळ च्या पूजेच्या तबकात प्राजक्त, गुलबाक्षी आणि सोनटक्का ही फुलंच असत. कोणाकडे मंगळागौर असली तरी संध्याकाळी परडीभर फुलं आई त्या घरी पोचती करत असे. एरवी ही शेजारी पाजारी रोज वाटला जात असेच हा दारचा सोनटक्का.

दर श्रावणी शुक्रवारी आमची आई जवळपास रहाणाऱ्या पाच सहा बायकांना बोलावून छोटंसं हळदी कुंकू करत असे. चैत्रगौरी किंवा संक्रांती सारखं हे हळदी कुंकू मोठं नसायचं. आघाडा आणि सोनटक्क्याचा हार घातलेला असे जिवतीच्या कागदाला. चण्याच्या भट्टीतून आणलेले गरम गरम मूठभर चणे आणि साखर वेलची घातलेलं जेमतेम अर्धी वाटी दूध मिळे प्रसाद म्हणून. चांदीच्या वाटीतून प्यायलेल्या त्या दुधाची आणि त्या गरमागरम चण्यांची आठवण आज ही मनाला सुखावते. अंगणात फुललेल्या सोनटक्क्याची फुलंच देत असू आम्ही बायकांना हळदी कुंकवा बरोबर. ताज्या फुलांनी भरलेली ती परडी फारच सुंदर दिसायची. सोनटक्क्याच्या मंद सुगंधाने घर भरून जात असे.

ह्या सोनटक्क्याची एक करुण आणि कधी ही न विसरता येणारी आठवण ही मनाच्या तळाशी जाऊन बसलेली आहे आणि सोनटक्का म्हटलं की ती नेहमीच वर येते. माझी आई त्या वर्षीच्या मे महिन्यापासूनच आजारी होती. जेष्ठ आषाढ गेले, श्रावण आला तरी तिच्या तब्बेतीला उतार पडला नव्हता.

तुमची मनस्थिती कशी ही असो निसर्ग चक्र चालू राहतच.
श्रावण महिना आला आणि अंगणातील सोनटक्का दर वर्षी सारखाच बहरला. आईला ही फुलं खूप आवडतं असत म्हणून तिला जरा बर वाटेल , दुखण्याचा विसर पडेल ह्या हेतूने मी रोज संध्याकाळी सोनटक्क्याची भरपूर फुलं ग्लासात घालून तिच्या पलंगाजवळ ठेवत असे. पण फुलांची आवड असलेली आई दुखण्याने बेजार झाल्यामुळे त्यांच्याकडे बघत ही नसे. एक दिवस अशीच दोन फुलं मी तिला तिच्या अंबाड्यात घालायला दिली . “ झोपूनच तर आहे ग, काय करू घालून , ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी बघू ” असं म्हणत तिने ती तशीच तिच्या कृश झालेल्या हातात ठेवली. पण दिवसेंदिवस तिचा आजार वाढतच गेला आणि पुढचं वर्ष काही तिने पाहिलं नाही. पुढे थोडेच दिवसात आम्ही ही ते गाव सोडलं, त्यामुळे ते घर , अंगण, बाग सगळंच दुरावलं. मागे राहिल्या फक्त आठवणी.

दरवर्षी श्रावण महिना आला की प्रत्यक्ष बहरलेला सोनटक्का जरी मला बघायला मिळाला नाही तरी माझ्या मनातला आठवणीतला सोनटक्का मात्र बहरतोच आणि मला एकाच वेळी उदास ही वाटत आणि छान ही वाटत.

20210211_091935_0.jpg

( फोटो बहिणीच्या बागेतील आहे. )

हेमा वेलणकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोगन विलियाला कलावंतीण म्हणतात. नुसती कागदी सुंदर फुले. आकर्षक रंगांत. पण वास नाही. खरी फुले नव्हेत. पानांचे modification, bracts. खरी फुले आत असतात. छोटीशी,सफेद.

Pages