श्रावण महिन्यात सोनचाफा, गुलबाक्षी, अनंत, प्राजक्त, कणेरी, जास्वंद, तगरी , तेरडा, गावठी गुलाबी गुलाब, चमेली, सोनटक्का अश्या अनेक फुलांच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. ही गोष्ट सोनटक्क्याची.
सोनटक्का
पावसाला सुरवात होऊन जरा स्थिरावला की महिना दोन महिन्याने श्रावण महिन्यात मार्केट पडवळ , भेंडी, अळू, दोडका, तांबडा भोपळा अश्या अस्सल देशी भाज्यांनी भरून जातं. फुलवाल्यांकडे ही तऱ्हे तऱ्हेची फुलं ह्या दिवसात विकत मिळत असली तरी तगर, प्राजक्त, गोकर्ण, सदाफुली, एकेरी जास्वंद, गुलबाक्षी , उन्हाळ्यात फुलणारा , पांढरा चाफा अशी अनेक फुल बाजारात विकत मिळत नाहीत. ती घराभोवतीच्या बागेत, गॅलरीत लावली तरच मिळतात.
असंच आणखी एक फुल म्हणजे सोनटक्का. ह्याच्या नावात सोन असलं तरी ह्याचा रंग असतो पांढरा शुभ्र किंवा अगदी क्वचित फिकट पिवळाही असतो. पण सोनेरी पिवळा मात्र कधीच नसतो. मोठ्या दांड्याच्या टोकावर कळ्यांच कणीस येतं. त्यातून लांब डेखाचं साधारण फुलपाखराच्या आकाराच्या तीन पूर्ण उमललेल्या पांढऱ्याशुभ्र पाकळ्या असणारं फुल उमलतं. पाकळ्या लहान बाळाच्या त्वचेसारख्या नाजूक आणि रेशमी पोत असलेल्या असतात. मधोमध पिवळे परागकोश असून त्यातले पिवळे परागकण कधी कधी शुभ्र पाकळ्यांवर ही पडतात जे फारच मोहक दिसतं.जनरली पांढऱ्या रंगाच्या फुलांना कीटक आकर्षित व्हावेत म्हणून निसर्गाने वास जरा सढळ हस्ते बहाल केलेला असतो पण सोनटक्का ह्याला अपवाद आहे. त्याचा वास अगदी मंद असतो. मला वाटतं त्याच्या धवल रंगात आणि पाकळ्यांच्या विशिष्ट रचनेतच कीटकांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे.
हे आल्याच्या जातकुळीतलं झुडूप आहे. मूळं आणि पानं दोन्ही साधारण आल्याच्या झाडासारखीच असतात. पण आल्यापेक्षा थोडं जास्त उंच वाढत. एक कंद लावला की त्यातुन अनेक झाडं निर्माण होतात. म्हणून फुलपाखराच्या आकाराच्या पाकळ्या असलेल्या ह्या फुलाला इंग्लिश लोकांनी “ बटरफ्लाय जिंजर लिली ” अस अत्यंत समर्पक नाव दिल आहे. असो. हे तसं सहज रुजणारं आणि भरपूर पसरणार झाड आहे. पाणी मात्र व्यवस्थित घालावं लागत . श्रावण महिन्यात सोनटक्क्याला खरा बहर येतो . खूप म्हणजे खूपच फुलतो सोनटक्का. फुलं गुलबाक्षीसारखी संध्याकाळी उमलतात आणि ती अतिशय नाजूक असल्याने काढून घरात आणली तर रात्री पर्यंत सुकतात ही. अर्थात फुलं काढायच्या आधी जोरात सर आली पावसाची आणि फुलं ओली झाली तर तेवढी ही टिकत नाहीत.
अतिशय नाजूक पणा मुळेच सोनटक्का बाजारात जास्त दिसत नाही आपल्याला. सोनचाफा, मोगरा, चमेली ह्या सारखी सोनटक्क्याची व्यापारी तत्वावर लागवड होऊ शकत नाही. कधी कधी हिरव्या पानात गुंडाळलेली चार पाच कळ्यांची जुडी दिसते बाजारात पण ताजी फुलच लहानपणी बघितली असल्याने ती अगदीच दीनवाणी वाटते माझ्या नजरेला. त्यामुळे घ्यावीशी नाही वाटत कधी.
माझ्या लहानपणी आमच्याकडे सोनटक्क्याचं नुसतं बन माजलं होतं. भरपूर फुलं येत असत. संध्याकाळी वेणी फणी झाली की सोनटक्क्याची एखाद दोन फुल आई आवर्जून अंबाड्यात खोचत असे. आम्हा मुलींना तर काय वेणीत फुलं हवीच असायची दररोज आणि कोणती ही चालायची. ही फुलं नाजूक असल्याने पिन लावताना हमखास डेख तुटायचं त्यामुळे जनरली ती लांब दांडा नुसताच वेणीत खोचून घातली जायची. कधी कधी त्याचे पिवळे परागकण केसांना ही चिकटायचे तेव्हा तर खूपच मजा वाटायची. गणपतीत संध्याकाळ च्या पूजेच्या तबकात प्राजक्त, गुलबाक्षी आणि सोनटक्का ही फुलंच असत. कोणाकडे मंगळागौर असली तरी संध्याकाळी परडीभर फुलं आई त्या घरी पोचती करत असे. एरवी ही शेजारी पाजारी रोज वाटला जात असेच हा दारचा सोनटक्का.
दर श्रावणी शुक्रवारी आमची आई जवळपास रहाणाऱ्या पाच सहा बायकांना बोलावून छोटंसं हळदी कुंकू करत असे. चैत्रगौरी किंवा संक्रांती सारखं हे हळदी कुंकू मोठं नसायचं. आघाडा आणि सोनटक्क्याचा हार घातलेला असे जिवतीच्या कागदाला. चण्याच्या भट्टीतून आणलेले गरम गरम मूठभर चणे आणि साखर वेलची घातलेलं जेमतेम अर्धी वाटी दूध मिळे प्रसाद म्हणून. चांदीच्या वाटीतून प्यायलेल्या त्या दुधाची आणि त्या गरमागरम चण्यांची आठवण आज ही मनाला सुखावते. अंगणात फुललेल्या सोनटक्क्याची फुलंच देत असू आम्ही बायकांना हळदी कुंकवा बरोबर. ताज्या फुलांनी भरलेली ती परडी फारच सुंदर दिसायची. सोनटक्क्याच्या मंद सुगंधाने घर भरून जात असे.
ह्या सोनटक्क्याची एक करुण आणि कधी ही न विसरता येणारी आठवण ही मनाच्या तळाशी जाऊन बसलेली आहे आणि सोनटक्का म्हटलं की ती नेहमीच वर येते. माझी आई त्या वर्षीच्या मे महिन्यापासूनच आजारी होती. जेष्ठ आषाढ गेले, श्रावण आला तरी तिच्या तब्बेतीला उतार पडला नव्हता.
तुमची मनस्थिती कशी ही असो निसर्ग चक्र चालू राहतच.
श्रावण महिना आला आणि अंगणातील सोनटक्का दर वर्षी सारखाच बहरला. आईला ही फुलं खूप आवडतं असत म्हणून तिला जरा बर वाटेल , दुखण्याचा विसर पडेल ह्या हेतूने मी रोज संध्याकाळी सोनटक्क्याची भरपूर फुलं ग्लासात घालून तिच्या पलंगाजवळ ठेवत असे. पण फुलांची आवड असलेली आई दुखण्याने बेजार झाल्यामुळे त्यांच्याकडे बघत ही नसे. एक दिवस अशीच दोन फुलं मी तिला तिच्या अंबाड्यात घालायला दिली . “ झोपूनच तर आहे ग, काय करू घालून , ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी बघू ” असं म्हणत तिने ती तशीच तिच्या कृश झालेल्या हातात ठेवली. पण दिवसेंदिवस तिचा आजार वाढतच गेला आणि पुढचं वर्ष काही तिने पाहिलं नाही. पुढे थोडेच दिवसात आम्ही ही ते गाव सोडलं, त्यामुळे ते घर , अंगण, बाग सगळंच दुरावलं. मागे राहिल्या फक्त आठवणी.
दरवर्षी श्रावण महिना आला की प्रत्यक्ष बहरलेला सोनटक्का जरी मला बघायला मिळाला नाही तरी माझ्या मनातला आठवणीतला सोनटक्का मात्र बहरतोच आणि मला एकाच वेळी उदास ही वाटत आणि छान ही वाटत.
( फोटो बहिणीच्या बागेतील आहे. )
हेमा वेलणकर
आठवणी आवडल्या. छान लिहिलं आहे
आठवणी आवडल्या. छान लिहिलं आहे.
खूप छान लिहिलंय...तुम्ही
खूप छान लिहिलंय...तुम्ही निसर्गाबद्दल लिहिता तेव्हा मधूमंगेश कर्णीकांची आठवण होते !
सोनटक्क्याला सोलिया असंही नाव ऐकलंय कोकणात...
माझं अतिशय आवडतं फूल. मंद आणि
माझं अतिशय आवडतं फूल. मंद आणि मोहक सुगंध. सोनचाफा सुगंधी असला तरी थोडा उग्र वाटतो. सोनटक्क्याचं तसं नाही. पण भारीच नाजूक. झाडावरून तोडलेलं फूल १५ मिनिटंसुद्धा हातात टवटवीत राहत नाही.
खूप छान आठवणी. हुरहूर
खूप छान आठवणी. हुरहूर लावणाऱ्या आठवणी. पावसाळ्यात सोनटक्याची आठवण हमखास येते. नखाच्या चिमटीत पकडून शुभ्र नाजूक पाकळीवर आम्ही नाव लिहायचो, पारदर्शक नाव उमटत असे.
तेरडा हे माझे पावसाळ्यातील अजून एक आवडते फुल. लाल, गुलाबी, फिक्कट गुलाबी सगळ्या प्रकारचे तेरडे मी माझ्या बागेत लावतो, जुन्या आठवणी जागृत होतात त्या फुलांकडे बघून. आम्ही शाळेत पाटी पुसायला तेरड्याचे देठ वापरायचो.
नाजूक फुलाच्या सुंदर आठवणी.
नाजूक फुलाच्या सुंदर आठवणी.
आजोबांच्या परसात दोन तीनच सोनटक्क्यांची झाडं होती. पावसाळ्यात फुलायची. जागाही जरा अडनिड होती म्हणून मोठी माणसं आम्हांला जाऊ द्यायची नाहीत. पण त्या फुलांची भुरळ इतकी की दिवस कलताना पाऊस नसेल तर एक चक्कर मारणं व्हायचंच. झाडावर एकच झुबा असेल तर मात्र काढायचो नाही.
खूप छान लिहिलंय... फुलाइतकेच
खूप छान लिहिलंय... फुलाइतकेच साधे आणि सुंदर.
धनवन्ती..अगदी. सोनटक्क्याच्या
धनवन्ती..अगदी. सोनटक्क्याच्या फुलासारखाच साधा पण सुगंधी लेख.
आमच्या बागेत मात्र सोनटक्का उन्हाळ्यात फुलायचा. कदाचित माडांना पाणी लावण्यासाठी जो पाट असतो, त्या पाटाला चिकटूनच सोनटक्क्याची झाडं होती आणि त्यामुळे त्यांना सतत पाणी मिळायचं म्हणून असेल. पण फुलायचा खरा. त्या बागेत आम्ही मुलं मुख्यतः उन्हाळ्यातच जायचो त्यामुळे सोनटक्क्याचा वास आला की मला उन्हाळ्याच्या सुरम्य सुट्ट्या आठवतात!
(No subject)
माझे अतिशय आवडते फूल आहे सोनटक्का. त्याच्यावरचा हा सुंदर लेख वाचून मन अगदी प्रसन्न झाले.हा माझ्या घरचा कुंडीत लावलेला सोनटक्का.
सोनटक्क्याच्या फुलासारखाच
सोनटक्क्याच्या फुलासारखाच साधा पण सुगंधी लेख. >> +१
किती सुंदर लेख आहे.
किती सुंदर लेख आहे.
माझं लग्न ठरलं तेंव्हा सासरी
माझं लग्न ठरलं तेंव्हा सासरी घर पाहायला पहिल्यांदा गेलेले तेंव्हा अंगणात सोनटक्का तरारून फुललेला. मी एकदम आईना विचारलं की काकू मी घेऊ का एक फुल आणि त्याही अनावधानाने त्यांच्या बोलण्याच्या सवयी नुसार बोलून गेल्या की घे की तुझंच तर आहे झाड (तेंव्हा लग्न जमलं नव्हतं). आणि नवरा किंवा सासर माझं होण्याआधीच ते झाड माझं होऊन गेलं. त्या वर्षी पासून आजपर्यंत सिजनच पहिलं फुल मलाच काढायला मिळतं. झाडाला कळी आली की आई फोन करतात तुझं फुल आलं गं आणि मलाही त्यानुमारास तिकडे जाण्याचा योग येतो. आई म्हणतात तुझं झाड तुला बोलवून घेतं.
सोनटक्का माझ्या आईला फार फार फार प्रिय आणि त्यामुळे मला सुद्धा .
श्रावणात आईच्या डोक्यात दररोज सोनटक्याचं फुल माळलेलं पाहिलं आहे मी. आमच्याकडे झाड नाही पण सगळ्यांना आईचं सोनटक्याचं प्रेम माहीत आहे त्यामुळे आईची मामी, शाळेतल्या एखाद्या बाई, शिपाई, विद्यार्थी कोणी ना कोणी आईला फुल आणून द्यायच्याच.
मध्ये एखादं वर्ष न टाळता येणारी परिस्थती आली तेवढाच काळ आईला केसात फुल नाही माळता आलं पण तितकंच. माझ्या साबांनी आईला सोनटक्याचा कांदा दिला पण जमिनीत पसरणारं झाड ते कुंडीत किती उगवणार. तरीही ती त्याच्याशी प्रेमाने बोलते आणि म्हणते मला एक तरी फुल दे रे सिजन मध्ये आणि खरंच ते झाड दिवसाला एक मिळेल एवढी का होईना फुलं देतंच.
अशा तर्हेने सोनटक्याशी माझ्या दोन्ही आईच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे ते मला आणखी प्रिय झालंय.
ममो, अवांतरासाठी सॉरी. लेख फारच सुंदर जमलाय हे वेगळे सांगायला नकोच.
मुम्बई मधे याचा खुप छान
मुम्बई मधे याचा खुप छान गुच्छ मिळतो, मला २००९ ला मैत्रिणी ने दिला होता,
तेव्हा पासुन दर पावसाळ्यात माझा नवरा मला दादर फुल मार्केट मधुन आणुन देतो,
९-१० मोठे दान्डे एकत्र बान्धुन देतात, ३-४ दिवस , कळ्या फुलत रहातात.
सगळ्यांच्या आठवणी खूप छान
सगळ्यांच्या आठवणी खूप छान.धन्यवाद ...
ssj फुलं खूप सुंदर दिसतायत.
रिया तुझ्या साठी तर माझ्या सारखाच सोनटक्का म्हणजे अगदीच खास. लिहिलं पण सुंदरच आहेस.
वावे, पाटाच्या पाण्यामुळेच फुलत असेल उन्हाळ्यात.
सोलिया म्हणतात प्रथमच ऐकलं पण आवडलं हे नाव.
९-१० मोठे दान्डे एकत्र बान्धुन देतात, ३-४ दिवस , कळ्या फुलत रहातात. >> meeradha, हे माहीत नाही म्हणजे निशिगंधा सारखा फुलतो का सोनटक्का ही ?
नखाच्या चिमटीत पकडून शुभ्र नाजूक पाकळीवर आम्ही नाव लिहायचो, पारदर्शक नाव उमटत असे. >> आग्या 1990 मस्तच. तेरडा मला ही खूप आवडतो. फुलपुडीत मिळतो पण झाडावरच्याची मजा नाही त्याला.
तुम्ही निसर्गाबद्दल लिहिता तेव्हा मधूमंगेश कर्णीकांची आठवण होते ! >> स्वांतसुखाय, धन्यवाद. हे म्हणजे फारच भारी आहे.
Mazeman, छान आठवण
बोरिवली वेस्ट भाजी
बोरिवली वेस्ट भाजी मार्केटच्या बाहेर बस स्टॉप कडे वसई चे फुलवाले बसतात त्यांच्याकडे पानात गुंडाळून जुडी मिळते सोनटक्क्याची।
ठाण्यातसुद्धा
ठाण्यातसुद्धा कौपिनेश्वराच्या देवळाजवळ सकाळच्या बाजारात मिळतात. सीझनला कवठी चाफा, दवणा, बटणशेवंती वगैरे पण मिळतात.
हो निशिगंधा सारखाच फुलत रहातो
हो निशिगंधा सारखाच फुलत रहातो याचा गुच्छ,
गंमत म्हणजे, २००९ ला Bandra chya Turner Rd ला रहाणार्या सखीने Butterfly lily cha गुच्छ म्हणुन दिला होता,, तिथंले सर्व Florist देतात , It was a pleasant surprise for me
मनिमोहोर, खूप सुंदर लिहिलं
मनिमोहोर, खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. माझ्याही सोनटक्क्याच्या आठवणी माझ्या शालेय जीवनाशी आणि पावसाळी दिवसांशी निगडित आहेत. माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने सोनटक्का लावला आहे कुंडीत. त्यामुळे फुलं मिळत राहतात.
Ajnabi, ssj पूर्वी म्हणजे
Ajnabi, ssj पूर्वी म्हणजे जेव्हा मी ट्रेन ने प्रवास करायचे तेव्हा गाडीत ही अश्या जुड्या विकायला येत असत.
गंमत म्हणजे, २००९ ला Bandra chya Turner Rd ला रहाणार्या सखीने Butterfly lily cha गुच्छ म्हणुन दिला होता,, तिथंले सर्व Florist देतात , It was a pleasant surprise for me बांद्रा भागात मराठमोळा सोनटक्का म्हणजे मोठंच surprise.
माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने सोनटक्का लावला आहे कुंडीत. त्यामुळे फुलं मिळत राहतात. rr38 मस्तच वाटलं हे वाचून.
ममो, बरोबर आहे तुमचे. पूर्वी
ममो, बरोबर आहे तुमचे. पूर्वी ट्रेनमधे सोनटक्क्याच्या जुड्या मिळायच्या. पण आता नाही दिसत. पूर्वी ट्रेनमधे वेगवेगळ्या फुलांचे म्हणजे जुई, चमेली,सायली इत्यादींचे गजरे मिळायचे. आता फक्त मोगराच असतो. फुले केसांत माळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. आणी हल्ली खूप जणींना ही फुले माहितसुद्धा नसतात.
" बांद्रा भागात मराठमोळा
" बांद्रा भागात मराठमोळा सोनटक्का म्हणजे मोठंच surprise."
पूर्वी वांद्र्यात ईस्ट इंडियन क्रिश्चनांची घरे होती. डहाणू वसई ते वांद्र्यापर्यंतचा हा समाज मूळचा शेतकरी. प्रत्येकाच्या घराभोवती निगुतीने राखलेली छोटीशी बाग असायचीच. आता वसई विरार पट्ट्यात दिसणारी अनेक झाडे - फुलांची, फळांची - तिथेही दिसायची. कोरळ, नीर फणस, सोनचाफा, बन केळी, बसराई, वेलची, मोठ्ठ्या पानांची नागवेल, सोन टक्का, सगळं. शिवाय शेतीशी आणि फळाफुलांशी नाते आणि ओळख आपापसातल्या लग्नसंबंधांमुळे टिकून राहिली होती.
Ajnabi, ssj पूर्वी म्हणजे
Ajnabi, ssj पूर्वी म्हणजे जेव्हा मी ट्रेन ने प्रवास करायचे तेव्हा गाडीत ही अश्या जुड्या विकायला येत असत. >>>>कालच कांदिवली स्टेशनला प्लॅटफॉर्मला एका परडीत पाहिली फुलवालीच्या, फोटो काढणार तितक्यात गाडी हलली पुढच्या स्टेशसाठी।
म्हणजे जुई, चमेली,सायली
म्हणजे जुई, चमेली,सायली इत्यादींचे गजरे मिळायचे. आता फक्त मोगराच असतो. >>>>>मोगऱ्याच्या नावाखाली तगरीच्या कळ्यांचा गजरा विकतात
मोगऱ्याच्या नावाखाली तगरीच्या
मोगऱ्याच्या नावाखाली तगरीच्या कळ्यांचा गजरा विकतात >> हो असे पण करतात. खरे तर ज्यांना मोगरा पण ओळखता येत नाही त्यांनी गजरा घ्यायच्या भानगडीत पडूच नये.
हिरा नेहमीप्रमाणे मस्त माहिती
हिरा नेहमीप्रमाणे मस्त माहिती.
होय हल्ली गजरे हल्ली खूप लहान झालेत लांबीला आणि तसं ही घालण्याच प्रमाण अगदीच कमी झालं आहे. केस छोटे असतात मुलींचे, ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर कुठे गजरे घालायचे आहेत अश्या अनेक गोष्टी आहेत.
आमच्या वेळी गजरे घालत बायका आणि एरवी फार घातली नाही तरी वेळी लग्नात / साखरपुड्याला अबोलीची / मोगऱ्याची कलाबूत वैगेरे लावलेली मोठी वेणी अगदी हवीच अस होतं. पुढे मुलीच्या साखरपुड्याला आणली होती मी मुद्दाम पण फक्त दिली तिला. तिने ती घालणं शक्यच नव्हतं हे मला ही पटत होतं. आणखी पुढे काही वर्षांनी सूनबाईंना तर साखर पुड्याला मोगऱ्याचा गजराच दिला हातात. असो.
असा बदल झालाय.
कालच कांदिवली स्टेशनला प्लॅटफॉर्मला एका परडीत पाहिली फुलवालीच्या, फोटो काढणार तितक्यात गाडी हलली पुढच्या स्टेशसाठी >> ajnabi, फोटो मिळाला असता तर मस्तच झालं असत.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
माझी आजी, ह्या फुलांना सोलिया म्हणायची.विस्मृतीत गेलेला शब्द आठवला.
बरेच प्रतिसादही आवडले.
नाजूक सुगंधी फुलासारखाच लेख.
नाजूक सुगंधी फुलासारखाच लेख. हि फुलं हाताळायला भिती वाटावी इतकी नाजुक असतात. सोलिया हा शब्द प्रथमच ऐकला. ह्या फुलाला सोलिया म्हणतात हे माहीत नव्हतं. माझ्या वडिलांना आणि काकांना विचारते त्यांना माहिती आहे का.
म.मो., त्या मोठ्या वेणीला सट
म.मो., त्या मोठ्या वेणीला सट म्हणत असत ना?
हीरा, हो त्या वेणीला सट
हीरा, हो त्या वेणीला सट म्हणतात.
देवकी , धनुडी धन्यवाद.
देवकी , धनुडी धन्यवाद.
होय सट च म्हणत तिला. भरपूर लांब, अगदी स्टिफ, दोन किंवा तीन पदरी, मध्ये मध्ये ठराविक अंतरावर कलाबुत आणि हिरवी झिप्रि घातलेली अशी ती वेणी असे. फुलवालयांकडे खास ऑर्डरच द्यावी लागत असे अश्या वेणीची.
सुंदर फोटो आणि लेख.
सुंदर फोटो आणि लेख.
Pages