श्रावण महिन्यात सोनचाफा, गुलबाक्षी, अनंत, प्राजक्त, कणेरी, जास्वंद, तगरी , तेरडा, गावठी गुलाबी गुलाब, चमेली, सोनटक्का अश्या अनेक फुलांच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. ही गोष्ट सोनटक्क्याची.
सोनटक्का
पावसाला सुरवात होऊन जरा स्थिरावला की महिना दोन महिन्याने श्रावण महिन्यात मार्केट पडवळ , भेंडी, अळू, दोडका, तांबडा भोपळा अश्या अस्सल देशी भाज्यांनी भरून जातं. फुलवाल्यांकडे ही तऱ्हे तऱ्हेची फुलं ह्या दिवसात विकत मिळत असली तरी तगर, प्राजक्त, गोकर्ण, सदाफुली, एकेरी जास्वंद, गुलबाक्षी , उन्हाळ्यात फुलणारा , पांढरा चाफा अशी अनेक फुल बाजारात विकत मिळत नाहीत. ती घराभोवतीच्या बागेत, गॅलरीत लावली तरच मिळतात.
असंच आणखी एक फुल म्हणजे सोनटक्का. ह्याच्या नावात सोन असलं तरी ह्याचा रंग असतो पांढरा शुभ्र किंवा अगदी क्वचित फिकट पिवळाही असतो. पण सोनेरी पिवळा मात्र कधीच नसतो. मोठ्या दांड्याच्या टोकावर कळ्यांच कणीस येतं. त्यातून लांब डेखाचं साधारण फुलपाखराच्या आकाराच्या तीन पूर्ण उमललेल्या पांढऱ्याशुभ्र पाकळ्या असणारं फुल उमलतं. पाकळ्या लहान बाळाच्या त्वचेसारख्या नाजूक आणि रेशमी पोत असलेल्या असतात. मधोमध पिवळे परागकोश असून त्यातले पिवळे परागकण कधी कधी शुभ्र पाकळ्यांवर ही पडतात जे फारच मोहक दिसतं.जनरली पांढऱ्या रंगाच्या फुलांना कीटक आकर्षित व्हावेत म्हणून निसर्गाने वास जरा सढळ हस्ते बहाल केलेला असतो पण सोनटक्का ह्याला अपवाद आहे. त्याचा वास अगदी मंद असतो. मला वाटतं त्याच्या धवल रंगात आणि पाकळ्यांच्या विशिष्ट रचनेतच कीटकांना आकर्षित करण्याचं सामर्थ्य आहे.
हे आल्याच्या जातकुळीतलं झुडूप आहे. मूळं आणि पानं दोन्ही साधारण आल्याच्या झाडासारखीच असतात. पण आल्यापेक्षा थोडं जास्त उंच वाढत. एक कंद लावला की त्यातुन अनेक झाडं निर्माण होतात. म्हणून फुलपाखराच्या आकाराच्या पाकळ्या असलेल्या ह्या फुलाला इंग्लिश लोकांनी “ बटरफ्लाय जिंजर लिली ” अस अत्यंत समर्पक नाव दिल आहे. असो. हे तसं सहज रुजणारं आणि भरपूर पसरणार झाड आहे. पाणी मात्र व्यवस्थित घालावं लागत . श्रावण महिन्यात सोनटक्क्याला खरा बहर येतो . खूप म्हणजे खूपच फुलतो सोनटक्का. फुलं गुलबाक्षीसारखी संध्याकाळी उमलतात आणि ती अतिशय नाजूक असल्याने काढून घरात आणली तर रात्री पर्यंत सुकतात ही. अर्थात फुलं काढायच्या आधी जोरात सर आली पावसाची आणि फुलं ओली झाली तर तेवढी ही टिकत नाहीत.
अतिशय नाजूक पणा मुळेच सोनटक्का बाजारात जास्त दिसत नाही आपल्याला. सोनचाफा, मोगरा, चमेली ह्या सारखी सोनटक्क्याची व्यापारी तत्वावर लागवड होऊ शकत नाही. कधी कधी हिरव्या पानात गुंडाळलेली चार पाच कळ्यांची जुडी दिसते बाजारात पण ताजी फुलच लहानपणी बघितली असल्याने ती अगदीच दीनवाणी वाटते माझ्या नजरेला. त्यामुळे घ्यावीशी नाही वाटत कधी.
माझ्या लहानपणी आमच्याकडे सोनटक्क्याचं नुसतं बन माजलं होतं. भरपूर फुलं येत असत. संध्याकाळी वेणी फणी झाली की सोनटक्क्याची एखाद दोन फुल आई आवर्जून अंबाड्यात खोचत असे. आम्हा मुलींना तर काय वेणीत फुलं हवीच असायची दररोज आणि कोणती ही चालायची. ही फुलं नाजूक असल्याने पिन लावताना हमखास डेख तुटायचं त्यामुळे जनरली ती लांब दांडा नुसताच वेणीत खोचून घातली जायची. कधी कधी त्याचे पिवळे परागकण केसांना ही चिकटायचे तेव्हा तर खूपच मजा वाटायची. गणपतीत संध्याकाळ च्या पूजेच्या तबकात प्राजक्त, गुलबाक्षी आणि सोनटक्का ही फुलंच असत. कोणाकडे मंगळागौर असली तरी संध्याकाळी परडीभर फुलं आई त्या घरी पोचती करत असे. एरवी ही शेजारी पाजारी रोज वाटला जात असेच हा दारचा सोनटक्का.
दर श्रावणी शुक्रवारी आमची आई जवळपास रहाणाऱ्या पाच सहा बायकांना बोलावून छोटंसं हळदी कुंकू करत असे. चैत्रगौरी किंवा संक्रांती सारखं हे हळदी कुंकू मोठं नसायचं. आघाडा आणि सोनटक्क्याचा हार घातलेला असे जिवतीच्या कागदाला. चण्याच्या भट्टीतून आणलेले गरम गरम मूठभर चणे आणि साखर वेलची घातलेलं जेमतेम अर्धी वाटी दूध मिळे प्रसाद म्हणून. चांदीच्या वाटीतून प्यायलेल्या त्या दुधाची आणि त्या गरमागरम चण्यांची आठवण आज ही मनाला सुखावते. अंगणात फुललेल्या सोनटक्क्याची फुलंच देत असू आम्ही बायकांना हळदी कुंकवा बरोबर. ताज्या फुलांनी भरलेली ती परडी फारच सुंदर दिसायची. सोनटक्क्याच्या मंद सुगंधाने घर भरून जात असे.
ह्या सोनटक्क्याची एक करुण आणि कधी ही न विसरता येणारी आठवण ही मनाच्या तळाशी जाऊन बसलेली आहे आणि सोनटक्का म्हटलं की ती नेहमीच वर येते. माझी आई त्या वर्षीच्या मे महिन्यापासूनच आजारी होती. जेष्ठ आषाढ गेले, श्रावण आला तरी तिच्या तब्बेतीला उतार पडला नव्हता.
तुमची मनस्थिती कशी ही असो निसर्ग चक्र चालू राहतच.
श्रावण महिना आला आणि अंगणातील सोनटक्का दर वर्षी सारखाच बहरला. आईला ही फुलं खूप आवडतं असत म्हणून तिला जरा बर वाटेल , दुखण्याचा विसर पडेल ह्या हेतूने मी रोज संध्याकाळी सोनटक्क्याची भरपूर फुलं ग्लासात घालून तिच्या पलंगाजवळ ठेवत असे. पण फुलांची आवड असलेली आई दुखण्याने बेजार झाल्यामुळे त्यांच्याकडे बघत ही नसे. एक दिवस अशीच दोन फुलं मी तिला तिच्या अंबाड्यात घालायला दिली . “ झोपूनच तर आहे ग, काय करू घालून , ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी बघू ” असं म्हणत तिने ती तशीच तिच्या कृश झालेल्या हातात ठेवली. पण दिवसेंदिवस तिचा आजार वाढतच गेला आणि पुढचं वर्ष काही तिने पाहिलं नाही. पुढे थोडेच दिवसात आम्ही ही ते गाव सोडलं, त्यामुळे ते घर , अंगण, बाग सगळंच दुरावलं. मागे राहिल्या फक्त आठवणी.
दरवर्षी श्रावण महिना आला की प्रत्यक्ष बहरलेला सोनटक्का जरी मला बघायला मिळाला नाही तरी माझ्या मनातला आठवणीतला सोनटक्का मात्र बहरतोच आणि मला एकाच वेळी उदास ही वाटत आणि छान ही वाटत.
( फोटो बहिणीच्या बागेतील आहे. )
हेमा वेलणकर
देवकी आणि ममो आभार.
देवकी आणि ममो आभार.
मस्त लेख.
मस्त लेख.
सोनटक्का लहानपणी अंगणात होता. पावसाळ्यात भरपूर फुल फुलत असत. काय मस्त वास असायचा!
अमेरिकेत स्मगल करुन कंद नेले होते. मस्त झाड आलं होतं. भरपूर फुलं यायची. कॅनडात येताना ते झाड एका माबोकरणीला दिलं आणि परत एक कंद इकडे स्मगल केला.
कॅनडातही चांगला रुजला. एकवर्षं विंटर मध्ये कुंडी बाहेरच राहिली तरी स्प्रिंग मध्ये परत पानं फुटली म्हणजे चांगला हार्डी आहे हे समजलं. मग दुसर्या वर्षी काय डोक्यात आलं ... ती कुंडी गराज मध्ये आणली आणि गेल्यावर्षीच्या अनुभवावरुन दुर्लक्ष केलं आणि मारला! ढीगभर स्नो मध्ये जगतो पण पाणी न देता थंडीत कसा जगेल. पण हे पश्वातज्ञान. )
तुमचा लेख वाचुन इट्सी वरुन मागवला. पण सेलर नाही पाठवत म्हणाला. कॅनडात हवा तर कायच्या काय शिपिंग लावताहेत. अमेरिकेत चक्कर असेल तेव्हा तिकडेच शिप करेन आता. हा लेख बघुन जीव स्वस्थ बसू देत नाहीये.
देवकी आणि ममो आभार.
प्र का.
हीरा, सटाची वेणी ! अगदी
हीरा, सटाची वेणी ! अगदी लहानपणीच्या आठवणी जागवल्यात. तेव्हा आई , काक्या आणी इतर बायकांमधे फार फेमस होती. घरात काही लग्न वगैरे असेल तर ऑर्डर द्यायची. मी तर साफ विसरून गेले होते.
सटाची वेणीची कडू आठवण आहे.
सटाची वेणीची कडू आठवण आहे. डोहाळजेवणाच्यावेळी आईने माझ्या शेपट्यावर सटाची वेणी खुपसायचा प्रयत्न करून केस आणि डोके दुखवले होते.याउलट माझ्या नणंदेने ,मोगऱ्याचा भरगच्च गजरा आणला होता.त्या कार्यक्रमानंतर माझे नी आईचे वाजले होते.
अमितव, परदेशात सोनटक्का येतो
सि, धन्यवाद.
अमितव, धन्यवाद. परदेशात सोनटक्का येतो हे वाचून पण छान वाटलं. आता एकदा गेलंय झाड पण पुन्हा लवकरच सोनटक्का फुलू दे तुमच्या अंगणात ही सदिच्छा.
होय ती सटाची वेणी खूप जड व्हायची. अंबाडा असेल तर जरा तरी ठीक पण वेणीला तर झेपायचीच नाही.
बहिणीच्या बागेत आज फुललेली फुल. फोटो बघून ही इतकं छान वाटलं.
वरच्या फोटोतला सुगंध जाणवला
वरच्या फोटोतला सुगंध जाणवला अगदी...
मस्त मस्त. अशीच खूप फुलं फुलू
मस्त मस्त. अशीच खूप फुलं फुलू देत तुमच्या बहीणीकडे.
बहरलेला सोनटक्का
बहरलेला सोनटक्का
वा मस्त लेख, खूप आठवणी जाग्या
वा मस्त लेख, खूप आठवणी जाग्या झाल्या ममोजी. सुंदर दिसत आहेत फुलं. आमच्या वाड्यात होता टक्का. ह्याची पाने तिखट असतात, खाल्ली आहेत बरेचदा फारच नाजूक काम. लेखात आघाड्याचा पण उल्लेख आलाय, श्रावणात हा आणून द्यायचं काम चिल्लर पार्टी कडे असे. ह्याच्या पानांच्या मागच्या बाजूला पांढरे ठिपके असतात ना? ती खूण बघून आघाडा आणायचा, आई चार चारदा बजावत असे. आमच्या वाड्याच्या समोर क्रांतिवीर चापेकरांचा वाडा होता, तिथे बखळीत आघाडा आणि अबोली असेच असे शेजारच्या वाड्यात बक्कळ कढीपत्ता होता, कधी अचानक हवा असेल तर 10 / 20 पैशाचा आणायला आई पाठवत असे. त्याच वाडयात चाफा होता पिवळा, ती फुले मात्र एक रुपयाला विकत. आमच्या वाड्यात पांढरा चाफा होता, त्याचा उपयोग फक्त अंगठी करणे इतकाच. आणि पत्री म्हणून पानाचा उपयोग. पण त्या चाफ्याला छान पार केला होता दगडी. एक उत्तम प्रतीच्या शेंगा देणारा शेवगा पण होता. आता झोपताना सगळ्या आठवणी येतील वाड्याच्या
बहरलेला सोनटक्का....
बहरलेला सोनटक्का....
वा, ममो.
लंपन, फुलांची विक्री वाचून मला बसलेला क.शॉ आठवला.4 फुटी गुलाबाचे झाड फुलांनी डवरले होते.माझी नजर वारंवार तिथे जात होती.काकूंनी 1 गुलाबाचे फूल दिले आणि माझ्या आईकडून 4 आणे घेतले होते.आम्ही 6-७ महिन्यांनी चिंचवडला जात असू.
देवकी, ती फुलं फार वर लागत,
देवकी, ती फुलं फार वर लागत, आकडा वापरून काढता येत म्हणून पैसे घ्यायचे. अशीच भारी फुलं बकुळीची, मंगलमुर्ती वाडयात होतं भलं मोठं झाड, पण ती मात्र फुकट होती.
आकडा लागला की पैसे आलेच!
आकडा लागला की पैसे आलेच!
मस्त लिहिले ग ममो, लेख आवडला.
मस्त लिहिले ग ममो, लेख आवडला.
मी वरळीला ऑफिसला जायचे तेव्हा परळ-एल्फिन्स्टन जोड पुलावर कित्येकदा पानात गुंडाळलेले सोन्टक्के घेतलेले आहेत. ऑफिसात जाऊन ग्लासात ठेवायचे. एसीमुळे दिवसभर टिकायचे व सुवास दरवळायचा. कधी आणले नाही तर बाकिचे विचारायचे, आज सुवास नाही का म्हणुन
सोन्टक्क्याचे म्हणुन एक रोप आणुन कुंडीत लावले ते भलतेच निघाले. त्याला लाल पुष्पकोष आले पण फुले नाहीच. शेवटी रान माजल्यावर काढुन टाकले.
कधीतरी बेलापुर तळ्यावर गौरी गणपती विसर्जनाला गेले होते. एका कोळी किंवा आगरी कुटुंबाने त्यांचा गणपती आणलेला आणि त्याला सोनटक्क्याचा भला थोरला टवटवीत हार घातलेला. इतक्या नाजुक फुलांचा हार केला म्हणजे करणार्याचे हात किती ते कुशल… संध्याकाळचा अर्धवट अंधार पडलेला होता त्यात पायाशी निरांजन ठेवलेली गणपतीची उजळलेली मुर्तीआणि गळ्यात तेजस्वी शुभ्र फुलांचा हार हे दृश्य कायमचे मनात कोरले गेलेय.
इथे आता घरात परसदारी, मागे, शेतात सगळीकडे सोनटक्का आहे. यंदा फारसा फुललेला नाही, गेल्या वर्षी रोज फुले आणुन घरात ठेवायचे. इथल्या हवेत दोन दोन दिवस आरामात ताजी राहतात. आणि हो, इथे कोणालाही सोनटक्का माहीत नाही, सगळे सोलियाच म्हणतात. मी सोन्टका म्हटले की कोणाला कळत नाही. शेजार्याच्या बागेत पिवळा सोनटक्का आहे, शेजारी कधी दिसत पण नाही. त्यच्याकडे बाग साफ करणार्या बाईला सोनटक्क्याचे रोप द्या हे लांबुन ओरडुन रोपाकडे हात करुन सांगितले.. बराच वेळ तिला कुठले रोप ते कळेना आणि सोलिया म्हणायला हवे हे माझ्याही लक्षात येईना असे झाले
लेख नेहमीप्रमाणे उत्तमच.
लेख नेहमीप्रमाणे उत्तमच.
त्याला सोनटक्क्याचा भला थोरला टवटवीत हार घातलेला. >>> माझ्या एका चुलत बहिणीला सूताशिवाय हा हार करता यायचा - नुसते देठ गुंफून. तसाच हार ती गुलबक्षीच्या फुलांचाही करायची. आता गुलबक्षी कुठेच दिसत नाही.
चिंचवडच्या मंगलमूर्ती
चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यातली बकुळीची फुलं मी वेचली आहेत एकदा. तसंच शनिवारवाड्यात एक बकुळीचं झाड आहे, तिथली फुलंही खूप वेळा वेचली आहेत. बकुळीची फुलं किती तरी दिवस सुगंधी राहतात. आमच्या गावाला दोन झाडं आहेत बकुळीची. लांब आहेत घरापासून, त्यामुळे तिकडे कधी फिरायला गेलं तरच ती फुलं आणता येतात. पण मला खूप आवडतो बकुळीचा वास.
सोनटक्क्याचा हार कधी बघितला नाही. भारीच! गुलबक्षीची वेणी (केसात घालायला नाही, देवाला वाहायलाच) माझी आई करते, दोरा न वापरता. तशीच वेणी बुचाच्या फुलांचीही छान होते. देठ लांब असलेल्या कुठल्याही फुलांची होईल.
अशी वेणी मधुमळतीची ही छान
अशी वेणी मधुमालतीची ही छान होते.
हो हो, मधुमालतीचीही छान होते.
हो हो, मधुमालतीचीही छान होते.
(आपण जिला मधुमालती म्हणतो, ती खरी मधुमालती नाही म्हणे. ती बाहेरून आपल्याकडे आलेली वनस्पती आहे. मूळ मधुमालती वेगळी असते)
वा.. सगळ्या आठवणी वाचायला मजा
वा.. सगळ्या आठवणी वाचायला मजा आली!
वावे > शनिवारवाड्यात सुट्टीत जायचे ते फिरायला आणि मग बकुळीची फुले पहायलाच! दुपारी झाडाच्या सावलीत अनेक लोक झोपलेले असत. घर जवळ असल्याने सुट्टी लागली की आम्ही आमचेच जात असू. नंतर तिकीट लावल्याचे वाचून खुप नवल वाटलेले
सोनटक्क्याची वेणी कशी असते ? मला शेवंतीची माहीत आहे.
मूळ मधुमालती वेगळी असते >>
मूळ मधुमालती वेगळी असते >> कशी असते मूळ मधुमालती. उत्सुकता आहे.
Ok वावे. हे माहित नव्हतं.
Ok वावे. हे माहित नव्हतं.
Ok वावे. हे माहित नव्हतं.
Ok वावे. हे माहित नव्हतं.
वावेचे दोनही प्रतिसाद सुरेख
वावेचे दोनही प्रतिसाद सुरेख आहेत.
मस्त प्रतिसाद सगळेच.
थॅंक्यु सगळ्यांना . मस्त प्रतिसाद सगळेच.
लंपन मस्त आठवणी.
पुष्कळ जण दारच्या शेगटाच्या शेंगा, लिंब, फुलं , कढीलिंब वैगेरे किरकोळ वस्तू ही विकतात. फुकट वाटलं तर तुमच्याकडे संपत नाहीये म्हणून देताय असा ही संदेश जात असेल एखाद वेळेस. असो.
आकडा लागला की पैसे आलेच! Proud > अमितव हा हा हा
साधना , ती गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर आली. किती छान लिहिलं आहेस. सोलिया नाव इथेच कळलं मला , आणि सोनटक्का ह्या नावापेक्षा खूपच आवडलं आहे , आता सोलियाच म्हणणारे मी ही.
माधव बुचाची करतात तशी ह्याची वेणी ही किती सुंदर दिसेल, भरगच्च आणि पांढरीशुभ्र. तेवढी फुलं मिळायला हवीत पण.
वावे मला ही उत्सुकता आहे मूळ मधुमालती कशी असते ह्याची , जमलं तर फोटो तरी दाखव.
आमच्याकडे कोकणात आमचं एक अफाट मोठं बकुळीच झाड आहे म्हणजे आमचं असलं तरी आहे ते रस्त्याच्या कडेलाच. पण कोकणात ही सुगंधी बकुळ तशी बदनामच आहे ,अगदी देवळाच्या अंगणात वैगेरे असली तरी. अमावस्या पौर्णिमेला तिन्हीसांजेला किंवा टळटळीत दुपारी ही बकुळीच्या झाडाजवळ जाण्याचं कोणी डेअरिंग करत नाही. वर्षातून एका ठराविक दिवशी ( दिवस कोणता ते लक्षात नाहीये ) बकुळी ची पूजा करतात आणि तिथे नैवेद्य वैगेरे ही ठेवला जातो.
(No subject)
हा मधुमालतीचा फोटो माझ्या एका बहिणीने पुण्यात काढलेला आहे.
मधुमालती म्हणजे रंगून क्रीपर
मधुमालती म्हणजे रंगून क्रीपर ( Combretum Indicum) हीच ना? की वेगळी असते ही वेल?
वावे, फोटोतील वेल माधवीलता
वावे, फोटोतील वेल माधवीलता आहे. मधुमालती व माधवीलता वेगळ्या. दोघीही आशिया खंडातील आहेत. मधुमालती भारताशिवाय पाकिस्तान श्रीलन्का देशातही आहे. आता जगभर पसरली असावी. रंगुन क्रीपर नावावरुन भारताबाहेरची वाटली तरी आशियायी वनस्पती भारतात परदेशी समजल्या जात नाहीत.
आपण एरवी मधुमालती म्हणतो ती
आपण एरवी मधुमालती म्हणतो ती रंगून क्रीपर.
साधना, मला फारशी माहिती नाही. बहिणीने हे पूर्वी एकदा सांगितलं होतं म्हणून इथे लिहिलं. फोटोही आज तिच्याकडूनच घेऊन इथे टाकला. श्रीकांत इंगळहळ्ळीकर सरांच्या फार्ममधला हा फोटो आहे.
एका नवीन फुलाची ओळख आणी
एका नवीन फुलाची ओळख आणी माहिती मिळाली. कधी पाहिले आणी ऐकले पण नव्हते माधवीलताचे फूल.
ओके वावे. त्या निमित्ताने
ओके वावे. त्या निमित्ताने चर्चा तरी झाली. मुळ मधुमालती असे काही नसते कारण मधुमालती हे नाव देशी आहे, प्रांतानुसार बदलणारे आहे. इथे आमच्या गावी ही भरपुर आहे पण इथे नाव वेगळे आहे. कलाबुत का कलावतीण असे काहीतरी म्हणतात, विचारावे लागेल. केरळात गेलो तर तिथेही असणारच पण नाव तिथल्या भाषेतील असेल, तेच बंगालात गेलो तर तिथल्या भाषेत. फ्लॉवर्सऑफइन्डिया वेबसाईटवर पाहिले तर आसामिया भाषेत हिला माधवीलता हे नाव आहे
मधुमालतीचे शास्त्रिय नाव Combretum indicum. हे आधी वेगळे होते, नंतर बदलले. माधवीलता म्हणजे Hiptage benghalensis. मधुमालती खुप पसरते. एका जागी लावली तर तिची मुळे सर्वदुर पसरुन त्या मुळांमधुन नवी रोपे येऊन वेल
पसरतो. तरीही ती वेलच आहे. माधवीलता महावेल आहे. वेलापेक्षाही प्रचंड मोठी. सहसा दिसत नाही. मी अजुन पाहिली नाही असे वाटतेय. कदाचित कुलाबा बागेत बघितली होती असे वाटतेय पण नक्की आठवत नाहीये. सहज न दिसणारा महावेल आहे माधवीलता.
आता आठवले ते लिहिते परत. माधवीलता स्मरणात होती पण का ते आठवत नव्हते. तिची फळे बघितल्यावर आठवले. तिच्या फळांना तिन पंख असतात आणि त्यामुळे वार्यावर सहज उडु शकते. मी कुलाबा बागेत माधवीलता पाहिली तेव्हा तिच्यावर फुले नव्हती तर फळे होती फळांवरुन हिला हेलिकॉप्टर फ्लॉवर हेही नाव आहे
फोटो मिळाला तर टाकेन.
Pages