कार्तिकातलं कौतुक ... बहरलेला बूच

Submitted by मनीमोहोर on 27 November, 2021 - 11:36
बुचाचे झाड ,   बुचाची फुलं,  गोकर्ण

दिवाळी झाली की कार्तिक महिन्यात दिवस लहान होऊ लागतात. सावल्या दुपारीच लांब होऊ लागतात. उन्हाचा ताप कमी होऊ लागतो. हवा थोडी थंड होऊ लागते. अश्या दिवसात ठाण्याला आमच्याकडे बूचाचा महोत्सव साजरा होत असतो. कोकणपट्टीतील दमट हवेपेक्षा देशावरची थंड कोरडी हवा बुचाच्या झाडाला जास्त मानवते असं माझं निरीक्षण आहे .पण आमच्या सोसायटीच्या गेटवर दुशीकडे एक एक अशी दोन बुचाची खूप मोठी झाडं आहेत. ह्यांची मूळ जमिनीत फार खोलवर जात नसल्याने रोपटी असताना पावसात एकदा उन्मळून पडली ही होती पण नशिबाने रुजली पुन्हा छान. बुचाची गगनजाई किंवा आकाश मोगरा ही नावं ही सुंदरच आहेत पण मला जरा ती पुस्तकी थाटाची वाटतात. खर तर इतक्या सुगंधी सुंदर फुलाचं बुच हे नाव तसं रुक्षच आहे पण मला तेच जास्त आवडत.

ह्या दिवसात त्या एरवी नेहमी हिरवंगार असणाऱ्या झाडावर कळ्यांचे घोस लटकू लागतात सहज नजर टाकली बाहेर तरी झाड हिरव्या ऐवजी पांढरं दिसत इतके घोस लटकत असतात फुलांचे. जमिनीकडे झुकलेली पांढरी किंवा क्वचित गुलबट झाक असलेली लांब दांड्याची आणि आपल्या मंद सुगंधाने जीव शांतवणारी फुल आपसूक जमिनीवर पडू लागतात. सोसायटीत शिरताना ह्या फुलांच्या जणू पायघड्याच अंथरलेल्या असतात झाडाने आपल्या स्वागतासाठी. फुलांवर पाय न देता तिथून चालणं म्हणजे कसरतच असते. अर्थात सुगंधी आणि हवी हवी
अशी वाटणारी.रात्री कधी कधी वाऱ्याच्या झुळके बरोबर घरात ही येतो वास फुलांचा तेव्हा फारच छान वाटत.

लहानपणीच्या रम्य आठवणीं पैकी काही बुचाच्या फुलांच्या निश्चितच आहेत. त्या शाळकरी वयात फुल वेचता वेचता मैत्रणींबरोबर गप्पा फार रंगत असत. त्या लांब दांड्यातला मध चोखणे हा ही आवडता उद्योग होता त्या काळी. बुचाची फुल एकमेकांत गुंफून त्याची बिना सुई दोऱ्याची सुंदर वेणी करतात. परन्तु तिची वीण काहीशी सैल असते आणि लांब केली तर फुलभाराने ती मध्येच तुटते ही . पण लहानपणी आम्हा सगळ्याच मुलींना वेणी करण्याचा आणि हौशीने ती वेणीत घालण्याचा फार सोस होता. एखाद दिवशी खूप जास्त फुलं मिळाली तर आजी घरातल्या देवीला ही घालत असे त्याची वेणी. त्या दिवशी देव्हाऱ्यात दिवसभर सुगंध दरवळत असे बुच फुलांचा.

ही वेणी
20211126_120544.jpg
खाली जाऊन मी रोज फुलं वेचून आणते. ह्या वयात खाली वाकून एकेक फुल वेचण ही कठीणच आहे तसं, पण मोह आवरत नाही. फुलं वेचताना कधी कधी एखाद दुसरं फुल डायरेक्ट आपल्या डोक्यावरच पडत तेव्हा एकदम भारी वाटतं . ☺️ ह्या फुलात भरपूर मध असते त्यामुळे त्यात मुंग्या ही असतात . फुलं वेचताना त्यांचा प्रसाद ही मिळतो कधी कधी पण हातात असणाऱ्या सुगंधी वैभवापुढे त्याच काही वाटत नाही.

ती फुल घरात ठेवली की हॉल मध्ये रोज त्याचा मंद सुगंध दिवसभर मन प्रसन्न ठेवतो. विशेषतः सकाळी उठलं की खोल श्वास घेऊन तो सुगंधित वास मनात भरून घेताना फारच मस्त वाटत. मागच्या आठवड्यात रात्री पाऊस पडल्यामुळे रात्रीच खूप पडली होती फुलं खाली. सकाळ पर्यंत ओल्या जमिनीवर कदाचित खराब होऊन जातील म्हणून रात्रीच वेचून आणली .

तो हा फोटो.
IMG_20191115_094823.jpg

सध्या बहिणीने दिलेला गोकर्णाचा वेल गॅलरीत बहरला आहे. तो कोपरा मस्त हिरवागार दिसतोय. त्यावरची गायीच्या कानासारखी दिसणारी, आपलं गोकर्ण हे नाव सार्थ करणारी एका पाकळीची निळीशार फुलं गॅलरीचं वैभव वाढवतायत.

20211025_125203~2.jpg

तर घरची गोकर्ण आणि दारची बुचाची फुल मिळून सजलेला हा दिवा.

20211122_233621.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या एका मैत्रिणीला प्रचंड आवडतात ही फुले. तिचं ते अक्षरशः लहान मुलागत हरखून जाताना पाहिले एकदा आणि मग मलाही ही फुले आवडू लागली. आता कुठेही दिसलं की थांबतो, कुणाची पर्वा न करता गाडी बाजूला लावून खाली पडलेल्या कळ्या फुले वेचतो

आता तर कुठेकुठे आहेत ही झाडे याचा पक्का ठावठिकाणा माहिती आहे

काय सुरेख लेख आणि फुलं. मला ह्याचं नाव माहिती नव्हतं. मी बुचाची फुलं म्हणजे पिवळी, मोठी समजत होते.
नाही नाही, ती बहूतेक बिट्टी ची फुलं ( पिवळी मोठी. ती सुवासिक नसतात)

सुरेख! कातील फोटोज्!!

गोकर्णीच्या फुलाचा चहा करताना त्याचे पुंकेसर घ्यायचे नाहीत. सोपा मार्ग म्हणजे अख्खी फुलं न घेता फक्त पाकळ्या खुडून पाण्यात घालायच्या. खूपच सुरेख रंग येतो!>> होय... आणि त्यात लिंबू पिळले की जांभळा..

सुंदर लेख.

आमच्या प्राथमिक शाळेत बुचाचं झाड होतं. मी तेव्हा बुचाच्या फुलांच्या वेण्या करायला शिकले होते. त्यानंतर कधी केल्या नाहीत त्यामुळे आता आठवत नाही. माझे केस लांब नव्हते त्यामुळे वेण्या कधी केसात घातल्या नाहीत पण तरीही वेण्या करायला मला फार आवडायचं!!

मस्त प्रतिसाद सगळे. सर्वांना धन्यवाद.

बोकलत मस्त फोटो. बिट्टी बघून लहानपणात गेले. ह्यात एक पिवळी ही जात असते. आमच्या आजीला आम्ही आणून देत होतो पूजेसाठी.
ह्या बिट्ट्या आम्ही सागरगोट्या ऐवजी ही वापरायचो.

गोकर्णीचा चहा लवकरच करीन असं वाटतंय केला की फोटो दाखवते इथे.

धन्यवाद ब्लॅककॅट, बरोबर बिट्टी ची फुलं हीच. माझा गोंधळ झाला होता.
ममो फुलांची वेणी पण किती नाजूक केली आहेस. तुला गुलबक्षीची वेणी पण नक्की येत असणार. मधूमालतीचीसुध्दा छान होते.

लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. मला देखील बुचाची फुलं प्रचंड आवडतात. सिंगापुरमध्ये कधी दिसली नाहीत पण दोन वर्षांपूर्वी थायलंडला गेलो होतो तेंव्हा आमच्या हॉटेल मध्ये बुचाचं झाड होतं. काय आनंद झाला होता, अनेक वर्षांनी जेंव्हा हि फुलं मिळाली तेंव्हा.
मग मी पण रूम मध्ये फुलं आणणे पाण्यात ठेवणे हे सगळे प्रकार केले होते.
थँक यु ममो ताई. सकाळी सकाळी छान वाटलं.

नेहमीप्रमाणे सुंदर लेख. ममो तुमच्या कलाकौशल्य व साजूक शैलीमुळे लेखात फुलांचं नाजूकपण अलगदपणे उतरलंय.

अज्ञान बालक, फारच सुंदर ... किती सडा पडलाय फुलांचा खाली... त्या रस्त्यावरून मी चालते आहे असं इमॅजिन करताना ही एकदम छान वाटल. जस्ट विचारतेय, कुठला आहे फोटो हा ?

खूप छान ! कार्तिक कनेक्शन सुंदर टिपलेत तुम्ही.
वैशाखात आम्रमंजिरी, चैत्रात मोगरा तसे मालती आणि बूच कार्तिकेत.

शुभ्र फुलांच्या दैवी सुगंधाबद्दल अमांचे observation एकदम बरोबर. देवतांना भूल पडते तिथे आपण तर मानव.

ह्या फुलांचा सुवास खूप आवडतो. आसपास ३ मोठी बुचाची झाडे सध्या फुलांनी लगडलेली आहेत, रोजच्या वॉकला जातांना पायाखाली ही फुले येतात ते मात्र वाईट वाटते.

एकदम छान वाटल. जस्ट विचारतेय, कुठला आहे फोटो हा ?
Submitted by मनीमोहोर on 9 November, 2023 - 12:24

ममो ताई हे फोटो नाशिक, लेखानगर ते राजीवनगर (रुंगठा टाऊनशिप) मार्गावरील आहे.
सध्या सगळी झाडं पूर्ण बहरात आहेत.

सुरेख वेणी.. दिवे.. गोकर्ण, आणि लेख.
गावाला एक काळे आजी होत्या, त्यांनी काही वेळेला ही अशी वेणी कशी बनवायची ते शिकवले, पण मला कधी नीट जमले नव्हते. त्याची नेहेमी रुख रुखं वाटे. लेख वाचताना ते सर्व आठवले.

अनिंद्य, छन्दिफन्दि धन्यवाद. छान आहेत दोन्ही प्रतिसाद.
नाशिक का, देशावर असेल कुठेतरी अस वाटल होत, कारण कोकणात त्या मानाने कमी दिसतात बुचाची झाडं

सुगंधी फुले म्हटले की सहसा कुणाला बुच आठवत नाही. त्याची झाडेही जास्त नसतात. पण त्या एका फुलाचा वासही खूप सुंदर असतो. आणि जेंव्हा थोडी जास्त झाडे असतील आणि त्यावर बहर आला असेल तर मग - अहाहा ! सप्तपर्णी आणि बकुळीचाही असाच घमघमाट असतो पण तो काहीसा उग्र असतो. जास्त वेळ नाही घेववत. पण बुचाचा सुगंध संपूच नये असे वाटत राहते.

बदामीवरून येताना हॉस्पेटला थांबलो होतो. गाडी यायला अवकाश होता म्हणून तिथल्या धरणाच्या बाजूला असलेल्या बागेत चक्कर मारली. तिथे ५-६ बहरलेली बुचाची झाडे होति. तो अनुभव अजुनही मनात आहेच.

हेमाताई, ती फुलांची वेणी अप्रतिम झाली आहे. अशा काही गुंफणीमधून देठांचेही सौंदर्य खुलून येते. इतर वेळेला फुल म्हटले की पाकळ्या आणि परागच आठवतात.

माधव खुप धन्यवाद, किती सुंदर प्रतिसाद लिहायला आहे.
देठांच सौंदर्य तुम्हाला जाणवलं आणि तुम्ही ते लिहिलं ही म्हणून पुन्हा धन्यवाद.
Actually, एकमेकांत गुंफलेली ती रसरशीत देठं ही खुप सुंदर दिसत होती म्हणूनच मी ती त्या प्लेट च्या थोडी पुढे घेऊन दिसतील अशी ठेवली होती. असो.
सामो, धन्यवाद

Pages