
दिवाळी झाली की कार्तिक महिन्यात दिवस लहान होऊ लागतात. सावल्या दुपारीच लांब होऊ लागतात. उन्हाचा ताप कमी होऊ लागतो. हवा थोडी थंड होऊ लागते. अश्या दिवसात ठाण्याला आमच्याकडे बूचाचा महोत्सव साजरा होत असतो. कोकणपट्टीतील दमट हवेपेक्षा देशावरची थंड कोरडी हवा बुचाच्या झाडाला जास्त मानवते असं माझं निरीक्षण आहे .पण आमच्या सोसायटीच्या गेटवर दुशीकडे एक एक अशी दोन बुचाची खूप मोठी झाडं आहेत. ह्यांची मूळ जमिनीत फार खोलवर जात नसल्याने रोपटी असताना पावसात एकदा उन्मळून पडली ही होती पण नशिबाने रुजली पुन्हा छान. बुचाची गगनजाई किंवा आकाश मोगरा ही नावं ही सुंदरच आहेत पण मला जरा ती पुस्तकी थाटाची वाटतात. खर तर इतक्या सुगंधी सुंदर फुलाचं बुच हे नाव तसं रुक्षच आहे पण मला तेच जास्त आवडत.
ह्या दिवसात त्या एरवी नेहमी हिरवंगार असणाऱ्या झाडावर कळ्यांचे घोस लटकू लागतात सहज नजर टाकली बाहेर तरी झाड हिरव्या ऐवजी पांढरं दिसत इतके घोस लटकत असतात फुलांचे. जमिनीकडे झुकलेली पांढरी किंवा क्वचित गुलबट झाक असलेली लांब दांड्याची आणि आपल्या मंद सुगंधाने जीव शांतवणारी फुल आपसूक जमिनीवर पडू लागतात. सोसायटीत शिरताना ह्या फुलांच्या जणू पायघड्याच अंथरलेल्या असतात झाडाने आपल्या स्वागतासाठी. फुलांवर पाय न देता तिथून चालणं म्हणजे कसरतच असते. अर्थात सुगंधी आणि हवी हवी
अशी वाटणारी.रात्री कधी कधी वाऱ्याच्या झुळके बरोबर घरात ही येतो वास फुलांचा तेव्हा फारच छान वाटत.
लहानपणीच्या रम्य आठवणीं पैकी काही बुचाच्या फुलांच्या निश्चितच आहेत. त्या शाळकरी वयात फुल वेचता वेचता मैत्रणींबरोबर गप्पा फार रंगत असत. त्या लांब दांड्यातला मध चोखणे हा ही आवडता उद्योग होता त्या काळी. बुचाची फुल एकमेकांत गुंफून त्याची बिना सुई दोऱ्याची सुंदर वेणी करतात. परन्तु तिची वीण काहीशी सैल असते आणि लांब केली तर फुलभाराने ती मध्येच तुटते ही . पण लहानपणी आम्हा सगळ्याच मुलींना वेणी करण्याचा आणि हौशीने ती वेणीत घालण्याचा फार सोस होता. एखाद दिवशी खूप जास्त फुलं मिळाली तर आजी घरातल्या देवीला ही घालत असे त्याची वेणी. त्या दिवशी देव्हाऱ्यात दिवसभर सुगंध दरवळत असे बुच फुलांचा.
ही वेणी
खाली जाऊन मी रोज फुलं वेचून आणते. ह्या वयात खाली वाकून एकेक फुल वेचण ही कठीणच आहे तसं, पण मोह आवरत नाही. फुलं वेचताना कधी कधी एखाद दुसरं फुल डायरेक्ट आपल्या डोक्यावरच पडत तेव्हा एकदम भारी वाटतं . ☺️ ह्या फुलात भरपूर मध असते त्यामुळे त्यात मुंग्या ही असतात . फुलं वेचताना त्यांचा प्रसाद ही मिळतो कधी कधी पण हातात असणाऱ्या सुगंधी वैभवापुढे त्याच काही वाटत नाही.
ती फुल घरात ठेवली की हॉल मध्ये रोज त्याचा मंद सुगंध दिवसभर मन प्रसन्न ठेवतो. विशेषतः सकाळी उठलं की खोल श्वास घेऊन तो सुगंधित वास मनात भरून घेताना फारच मस्त वाटत. मागच्या आठवड्यात रात्री पाऊस पडल्यामुळे रात्रीच खूप पडली होती फुलं खाली. सकाळ पर्यंत ओल्या जमिनीवर कदाचित खराब होऊन जातील म्हणून रात्रीच वेचून आणली .
तो हा फोटो.
सध्या बहिणीने दिलेला गोकर्णाचा वेल गॅलरीत बहरला आहे. तो कोपरा मस्त हिरवागार दिसतोय. त्यावरची गायीच्या कानासारखी दिसणारी, आपलं गोकर्ण हे नाव सार्थ करणारी एका पाकळीची निळीशार फुलं गॅलरीचं वैभव वाढवतायत.
तर घरची गोकर्ण आणि दारची बुचाची फुल मिळून सजलेला हा दिवा.
छान लेख! सुंदर फोटो आहेत.
छान लेख! सुंदर फोटो आहेत. बूचाचा सुगंध आठवला.
आहाहा!!! शाळेत, म्हणजे
आहाहा!!! शाळेत, म्हणजे हुजूरपागेत, बूचाची फुलं म्हणजे मुलींची झिम्मड असायची. गोल गिरक्या घेत येणारं ताजं फूल. वाह मस्त दिवस.
ममो, खूप छान लिहीलंयस.
ममो, खूप छान लिहीलंयस.
पुण्याला, टिळक रोडवर वनिता समाज नावाची प्राथमिक शाळा होती. तिथे बूचाची झाडं होती.
घरी जाताना फुलं वेचायची. आणि दुसर्या दिवशी शाळेत, आईनी माळलेल्या वेण्या घालायच्या, असा कार्यक्रम असे.
इथे हे फूल फार मिस करते मी.
तुझ्या लेखामुळे शाळा आणि आई अशा दोन्ही मर्मबंधातल्या आठवणी दाट्ल्या. धन्यवाद.
गोकरणाची फुले घालून निळा भात
गोकरणाची फुले घालून निळा भात करतात
https://youtu.be/s_cORcu_w1o
बुचाचे झाड ठिसूळ असते, लगेच मोडते
सुंदर!
सुंदर!
इथे आमच्या गॅलरीसमोर बुचाचं झाड होतं. या दिवसांत सतत घरात मंद सुगंध दरवळत असायचा. किती तरी विविध प्रकारचे पक्षीही दिसायचे. तीनचार वर्षांपूर्वी ते झाड तोडलं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं.
आत्ता काही दिवस पुण्यात होते. तेव्हा जवळच्या बागेत चालायला गेल्यावर बुचाच्या फुलांचा सडा पडलेला दिसायचा. भरपूर फुलं गोळा करून आणली काही दिवस.
(कन्नडमधे याला आकाशमल्लिगे म्हणतात. मल्लिगे म्हणजे मोगराच)
वाह! माझ्या ताईच्या घरासमोर
वाह! माझ्या ताईच्या घरासमोर आहे हे झाड. तिच्याकडे या दिवसांत गेलं की असा मंद सुगंध येतो मधूनच.
दोन्ही वेण्या किती सुरेख! यांचे स्टेप बाय स्टेप फोटो काढून वेण्या कशा घालायच्या ते पहायला आवडेल!
छानच...
छानच...
वेण्या खूप सुंदर दिसतायेत...
वेण्या मस्त, फोटो मस्त, लेख
वेण्या मस्त, फोटो मस्त, लेख मस्तच मस्त !
मला या फुलांचा वास अतिशय आवडतो. ऑफिसमध्ये लेडीज रिझर्व्हड पार्किंग मध्ये याची दोन झाडं आहेत. ऑफिसमध्ये शिरताना 2-3 फुलं नेऊन टेबलवर ठेवली की मन शांत रहातं (मी याला बाख फ्लॉवर रेमिडी म्हणते ). संध्याकाळी फुलं उचलायला वेळ आणि उत्साह नसतो, पण कारवर पडलेलं एखादं चुकार फुल वायपरमधे अडकुन घरी बरोबर आलं की संध्याकाळ पण प्रसन्न होते.
वा सुरेख लेख! ती वेणी तर अगदी
वा सुरेख लेख! ती वेणी तर अगदी खासच.
हाही लेख छान. आता फुलां
हाही लेख छान. आता फुलां इतकेच असे लेखनही दुर्मिळ होत चाल ले आहे. पुण्यात आमच्या प्राथमि क शाळेत नवीन मराठी शा ळा इथे अशी दोन झाडॅ होती त्यामुळे एल के जी ते चौथी रोज दप्तरात कंपासपेटीत हातात गळ्यात केसात ही असायचीच. कोणी ताई वेणी बनवत. ह्या बरोबरीने अबोली, गुलबक्षीच्या पण नाजूक वेण्या होत.
मग पुणे मागे गेले हैद्राबादेत आंध्रात हे फूल दिसले नाही. ( ते सुतार पक्षी टोक टोक कर्तात तो आवाजही आंध्रात येत नाही.) मग २५ वर्शानी मुंबईस आले व हपीसच्या गेट मध्येच हे झाड आहे. मन हरखुन गेले. व ते टोक टोक पण ऐकले यस. आय वॉज मिसिन्ग धिस ओन्ली.
पांढर्या फुलाना निसर्गाने उत्तम व काँप्लेक्स सुगंधांचे वरदान दिलेले आहे. आमच्या मेनगेटच्या तिथे एक टपोरी ट्युबरोज ची फुललेली छडी होती एक दिवस कुंडीत. कार्ड पंच करायच्या आधी एक मिनिट थांबून त्या कळीचा सुवास घेतला. नेक्स्ट डे एक तरुणीने पण तसेच केलेले बघून छान वाटले. कोणी परफ्युमर असावी.
मोगरा जाई जुई सायली बूच, व्हाइट चाफा अजून काही व्हाइट फुले आहेत प्रत्येकाचा उत्तम सुवास आहे. तो आमच्याकडे बाटली बंद पण उपलब्ध असतो. ह्या फुलांची तेले function at() { [native code] } फारच महाग म्हणजे लाखो रु प्रतिकिलो असतात.
आकाश मोगरी हे नाव सुद्धा कथांमध्ये वाचले आहे.
मी फुलं बघीतली नाही कधी पण
मी फुलं बघीतली नाही कधी पण लेख वाचताना सुगंध दरवळला जणू ....किती छान आहे वेणी आणि लेखन ही ..
न रत्नैर्न सुवर्णेन न वित्तेन
न रत्नैर्न सुवर्णेन न वित्तेन च भूरिणा
तथा प्रसादमायाति यथा पुष्पैर्जनार्दन।
देवता रत्न, र्स्वण, द्रव्य, व्रत, तपस्या या अन्य किसी वस्तु से उतने प्रसन्न नहीं होते, जितना पुष्प चढ़ाने से होते हैं
VA blackcat!
VA blackcat!
सुंदर भाव ब्लॅककॅटजी .....
सुंदर भाव ब्लॅककॅटजी .....
धन्यवाद अमा शुगोल , वावे ,
धन्यवाद अमा शुगोल , वावे , जि मीरा , सामो sonalisl, blackcat, पिहू, देवकी, लावण्या धन्यवाद .
Blackcat , गोकर्णीच्या फुलांचा भात प्रथमच पाहिला , रंग मस्तच आलाय निळसर जांभळा. चहा पाहिलाय त्याचा आणि करावासा ही वाटतोय पण घरची फुलं उकळत्या पाण्यात टाकायचं डेअरिंग होत नाहीये. केला तर इथे नक्की फोटो दाखवीन. तुम्ही लिहिलेला श्लोक ही छान अर्थपूर्ण आणि फुलांची महती सांगणारा आहे.
अमा, शुगोल ,वावे ,जि, मीरा ,सामो मस्त आठवणी.
अमा ती तेलं खूप च महाग असतील कल्पना आहे. आम्ही बरेच वर्षांपूर्वी चंदनाच आणलं होतं ते असच खूप महाग होत अस वाटलं होतं.
जि फोटो काढते वेणी करताना किंवा व्हिडीओ ही काढीन जमलं तर.
वावे बंगलोर ला ही खूप च पाहिलेली आठवतायत. तिथे सोन चाफ्याची ही आहेत ना रस्त्यावर ही ?
पिहू बघितली नाहीयेस ही फुलं म्हणजे नवल आहे तशी कॉमन आहेत .
मला वाटते याच फुलावर इथे अजून
मला वाटते याच फुलावर इथे अजून एक लेख आहे की काय
https://www.maayboli.com/node/75289
आहे
मी सकाळी फिरायला गेले की
मी सकाळी फिरायला गेले की येताना फूले वेचून आणायचे नागपूरला. पाण्यात घालून ठेवली की दोन तीन दिवस ताजीतवानी राहतात. पुण्यात ही होतं एक झाडं विकासासाठी आहूती दिली. फार वाईट वाटलं. विवेकानंद पुरम कन्याकुमारी ला फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये बहरलेली असतात झाडं.
लेख आवडलाच हेवेसांन!
लेख तर छानच.. शेवटचा फोटो खूप
लेख तर छानच.. शेवटचा फोटो खूप खूप छान..
मस्त लेख आहे हेमाताई!! ती
मस्त लेख आहे हेमाताई!! ती वेचलेली फुलं किती नाजूक पण टपोरी दिसतायत :भुरळ पडलेली बाहुली: वेणी तर क्लासच!
या फुलांची अशी वेणी करता येईल असं वाटलंच नाही. मी सायंकाळीच्या फुलांची किंवा मधुमालतीच्या फुलांची केली आहे पुष्कळ वेळा. श्रावणात मिळेल तेव्हा आणि गणपतीसाठी सायंकाळीच्या फुलांची रोज असे आईकडे असताना. आता सायंकाळीच्या बिया आणण्यापासून तयारी.
गोकर्णीच्या फुलाचा चहा करताना
गोकर्णीच्या फुलाचा चहा करताना त्याचे पुंकेसर घ्यायचे नाहीत. सोपा मार्ग म्हणजे अख्खी फुलं न घेता फक्त पाकळ्या खुडून पाण्यात घालायच्या. खूपच सुरेख रंग येतो!
हो ना, इतकी सुंदर फुल अजून
हो ना, इतकी सुंदर फुल अजून नाही दिसलीच कुठे शोध घ्यावा लागेल , नाशिक मधे.....
पिहू ताई , नाशिकमध्ये
पिहू ताई , नाशिकमध्ये राजीवनगर झोपडपट्टीच्या मागे (लेखानगर जवळ) रुंगठा टाऊनशिप पाण्याच्या टाकीजवळ एक जुनाट अर्धवट बांधलेली बिल्डिंग आहे, तेथे २/३ बुचाची झाडे आहेत.
तेथील गूढ वातावरण आणि उलटी लटकलेली फुले पाहून मी त्यांना "भुताची फुले" च म्हणतो.
पुण्यात वाकड ला आमच्या
पुण्यात वाकड ला आमच्या सोसायटीत आहे बुचाचे झाड. आमच्या
बिल्डींग जवळ. इतका छान सुगंध येतो, बहर असला की. चित्र पाहून मन पुण्यात गेले.
मला ही फुलांची वेणी बनवता येते पण इतकी सुबक नाही येत.
छान सुरेख सजावट. या
छान सुरेख सजावट. या फुलांमध्ये मध असते हे नवीनच समजले. धन्यवाद. कल्याणमध्ये काही तुरळक ठिकाणी आहेत ही बुचझाडे. छान सुगंध दरवळत असतो सभोवतालच्या परिसरात.
धन्यवाद अ बा
धन्यवाद अ बा
किती सुंदर वेणी बनवलीए ममोताई
किती सुंदर वेणी बनवलीए ममोताई.लेखही सुरेख.
आमच्या इकडे पण मिळतात हि धुंद करणारी सुगंधी फुलं.
सुंदर लेख. माझी खूपच आवडती
सुंदर लेख. माझी खूपच आवडती फुलं. ठाण्यात अजून तुरळक आहेत ही झाडं. कुठेही झाड दिसले की एखादे तरी फूल मिळते का शोधते. तुमची एवढी फुले पाहून वेडं व्हायला झालं. वेणी पण छानच.
सुरेख, सुंगधाने परिपूर्ण व
सुरेख, सुंगधाने परिपूर्ण व प्रसन्न लेखन, वेण्याही सुरेख !
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
प्रज्ञा , गुलबक्षीच सायंकाळी हे नाव प्रथमच ऐकलं आणि ते फार म्हणजे फारच आवडलं आहे. सायंकाळी फुलते ती सायंकाळी.
विवेकानंद पुरम कन्याकुमारी ला फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये बहरलेली असतात झाडं. >> आपल्या कडे एकदाच येतो बहर ,
तेथील गूढ वातावरण आणि उलटी लटकलेली फुले पाहून मी त्यांना "भुताची फुले" च म्हणतो. >> भुताची फुलं ..इतक्या स्वर्गीय फुलांना हे नाव ☺️
पिहू तू नाशिक मध्ये असलीस तर तुला नक्की दिसतील. आता फोटो पाहिला आहेस तर पटकन strike ही होईल. अ बा नी सांगितलं आहे तिथे चक्कर मार ह्या दिवसात.
सोपा मार्ग म्हणजे अख्खी फुलं न घेता फक्त पाकळ्या खुडून पाण्यात घालायच्या. खूपच सुरेख रंग येतो! >> जि ,लक्षात ठेवते. फोटो पाहिलाय ह्या चहाचा , अफाट सुंदर रंग आहे म्हणूनच करावासा वाटतोय.
तुमची एवढी फुले पाहून वेडं व्हायला झालं. वेणी पण छानच. >> ही फुलं बघितली की वेडच व्हायला होतं.
वेणीचा मुद्दाम च दाखवला फोटो , आणि आवडली सांगितलंत म्हणून खूप छान वाटलं।
छान लिहिलंय . सोसायटीच्या जवळ
छान लिहिलंय . सोसायटीच्या जवळ 2/3 झाडे आहेत . आम्ही याला लटक चमेली ची फुले म्हणतो . फुलांच्या सड्याबद्दल अगदी अगदी झाले . त्या फुलांवर पाय द्यायचे अगदी जीवावर येते .
Pages