आठवणींतील काही : सुरस आणि चमत्कारिक

Submitted by कुमार१ on 5 November, 2020 - 01:09

बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.

अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.

सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:

“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”

तर या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्‍यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.

ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.

एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.

अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:

“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”

लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. एका कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.

आपल्या देशाच्या इतिहासात एकमेव आणीबाणी 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादली होती. ती प्रत्यक्ष लादाण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.

रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.

सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.

शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:

“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “

शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.

...
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान २० वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

25 जून 1975 : इंदिरा गांधीकृत राजकीय आणीबाणी लादल्याचा दिवस
आणीबाणीची मूळ संकल्पना कोणाची - सिद्धार्थ शंकर रे की खुद्द इंदिरा गांधी ??

काही क्षणचित्रे आणि महत्त्वाच्या घडामोडी इथे :
https://www.lokmat.com/photos/national/history-of-emergency-what-happene...

मी शाळेत असताना बातमी नव्हे पण एक जाहिरात वाचली होती तिचा आशय सांगतो,
येत्या काही वर्षात परमपिता अबक महाराज कलियुग संपवून सत्ययुगाची स्थापना करणार आहेत तरी या सत्ययुगात प्रवेश मिळवण्यासाठी अमुक अमुक सोसायटीच्या मागे असलेल्या आमच्या ऑफिस मध्ये येऊन 500 रुपयांत अगाऊ बुकिंग करा. .
इतकी भारी ऑफर आपण त्यावेळी हातची घालवली याचे आता वैषम्य वाटते.

जग बुडायला लागले की (हे २०१२ पासुन मेले बुडतेयच) आपला जीव सुरक्षीत ठेवण्यासाठी आफ्रिकेतल्या उंच डोंगरांवरच्या गुहेत वर्ष दोन वर्षे काढण्यासाठीचे बुकिंग काही वेबसाईट्स्वर मिळत होते.

जगबुडी आली की तिथवर कसे पोचायचे याचेही मार्गदर्शन होते. फी डॉलर्स मध्ये असल्यामध्ये माझा निरुपाय झाला.

१. येझदी >>>
* या गाडीच्या बऱ्याच आठवणी आहेत. माझ्याकडे ती नव्हती पण मी थोडीशी चालवून पाहिलेली होती. इंजिनच्या दोन्ही बाजूंना yezdi हे नाव विशिष्ट सुलेखानात लिहिलेले असायचे. परंतु काही शौकीन ती नावाची पट्टी बरोबर उलटी बसवून घ्यायचे आणि मग ती अक्षरे ipzah अशी दिसायची. अशा साधारण डझनभर गाड्या मी पाहिल्यात.

* त्या गाडीची किक उलटी फिरवली की ते गिअर टाकायचे साधन असायचे. कदाचित त्या काळची ती अशी एकमेव मोटरसायकल असावी.

* माझा एक मित्र येझदीचा भक्त होता, त्याने मला सांगितले होते, की या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे उत्पादक त्याची सहसा जाहिरात करत नाहीत कारण त्यांना खात्री आहे की येझदीप्रेमी ही गाडी घेतातच.
. .
२.
हे २०१२ पासुन मेले बुडतेयच >>>> अ ग दी Happy

येझदी मीही चालवलीय. किक मारून तिच्या वरचा पाय लगेच काढुन घेतला की किक बूमरँग करून रपदिशी लागायची पायाला.

* रपदिशी लागायची पायाला >>> अ ग दी !!
किक व गिअर दांडा एकच असल्यामुळे गिअर बॉक्स लवकर खराब व्हायची असे काही जण तेव्हा म्हणायचे.
खरे खोटे माहीत नाही

परंतु काही शौकीन ती नावाची पट्टी बरोबर उलटी बसवून घ्यायचे आणि मग ती अक्षरे ipzah अशी दिसायची.
माझ्या काकांकडे आहे अद्याप गाडीच्या नावाची उलटी पट्टी केलेली गाडी. अंदाजे १९७७/७८ चे मॉडेल असेल. येझदी गाडीचे गियर आणि किक जावा मोटारसायकलसारखेच एकत्रीत आहेत.
येझदी गाडीचा टर्न फार मोठा असल्याने अरुंद जागेत वळवायला कष्ट पडायचे, त्यामुळे ती गाडी मला कधी आवडली नाही. २५० cc च्यामानाने पीकअप फार काही चांगला नव्हता. दोन सायलेन्सर आणि मोठा आवाज ह्यामुळे ती इतर मोटारसायकलींपेक्षा वेगळी होती.

दोन सायलेन्सर आणि मोठा आवाज >>> +१
यावरून आमच्या घरातच घडलेला किस्सा मजेशीर आहे.

माझ्या काकांची ती आवडती गाडी होती. एकदा काका व काकू बाहेर जाण्यासाठी म्हणून निघाले आणि गाडीपाशी आले. काकांना बऱ्याच किक्स् माराव्या लागल्या आणि शेवटी गाडी चालू झाली. मग त्यांनी एक्सलरेटर बरेच बूम बूम केलं आणि खटकन गिअर टाकून निघून गेले. जवळपास दोन-तीन किलोमीटर गेल्यावर त्यांनी मागे न बघता काकूस काहीतरी विचारले आणि मग लक्षात आले, की अरे मागे काकू नाहीच आहे. तर काकू घरीच राहिली होती Happy

हो असेच माझ्या पत्नीच्याबाबतीत येझदी गाडीवर झाले होते येझदी प्रेमी गाडीला मागे कॅरिअर लावत नसत, त्यामुळे मागे बसनाऱ्या महिलेला एकतर चालवणाऱ्याच्या कमरेला पकडावे लागायचे, ते शक्य नसेल तर पडण्याची हमखास खात्री. स्टार्टींग ट्रबल तर ह्या गाडीच्या पाचवीला पुजलेला.

आपल्याकडे 100cc च्या मोटरसायकली येण्यापूर्वी येझदी आणि बुलेट या दोन गाड्या जोरात होत्या. दोन्ही जड होत्या. नंतर राजदूतने येझदी पेक्षा हलकी गाडी काढली होती पण तिचे स्पार्क प्लग सारखे शॉर्ट व्हायचे.

* राजदूत >>> आठवली ही. चालवून पाहिली होती. बहुतेक 175 सीसी होती

100cc गाड्या ही 1990 च्या दशकातील क्रांती म्हणता येईल. त्याच्यानंतर 10-15 वर्षातच मोटरसायकलींनी स्कूटरच्या संख्येला मागे टाकलं होतं. माझ्याकडे यामाहा आर एक्स हंड्रेड होती; त्यांचे राजदूतबरोबरच तांत्रिक सहकार्य होते.
इंड सुझुकी, हिरो होंडा आणि यामाहा या तिघींमध्ये यामाहाचा बीएचपी सगळ्यात जास्त होता त्यामुळे तिचा एक ‘माज’ असायचा आणि Yamaha stays ahead हे ब्रीद ती सार्थ करायची.

पण यामाहा राजदूत ३५० सीसी फार काही चालली नाही.

आमच्याकडे माझ्या बाबांची राजदूत होती. त्यांनी ती पस्तीस-चाळीस वर्षं अत्यंत आवडीने आणि प्रेमाने भरपूर चालवली Happy शंभर किलोमीटरच्या आतलं अंतर असेल तर ते क्वचितच एसटीने कधी गेले असतील.

राजदूत शालीन गाडी वाटायची. स्पार्क प्लगचा प्रॉब्लेम होता, परंतु गाडी मेन्टेन करायला सोपी होती. कॉर्बोरेटर काढून साफ करणे आणि ऍडजस्ट करणे सहज शक्य होते. पॉइंट सेट करणेही सोपे होते.

1980 च्या दशकात माझे एक वरिष्ठ डॉ ग्रामीण आरोग्य केंद्रात अधिकारी होते आणि त्यांना वारंवार उपकेंद्रांना भेटी द्यायलाही जावे लागे. तेव्हा त्यांनी त्यांच्या येझदीला पुढे स्टेपनी चाक बसवायची रचना करून घेतली होती. त्या काळी तरी असे जादा चाक गाडीवर लावायची सोय मोटरसायकलींत फक्त येझदीलाच होती. त्यामुळे त्यांचे त्या गाडीवर प्रेम होते.

राजदूत... वॉव! आमच्याकडे होती राजदूत. मी दहावीत असेपर्यंत होती. मी झाले त्याच दरम्यान कधीतरी घेतली होती बहुतेक. १६ वर्षं वापरली! पण मी ८-९ वर्षांची असताना त्याच गाडीवरून आम्ही जात होतो तेव्हा आमचा मोठा अपघात झाला. एका ड्रंक रिक्षावाल्याने उलट बाजूने येऊन आमची गाडी उडवली. नशिबाने जीव वाचला पण बाबांचा पाय फ्रॅक्चर झाला. तरीही पुढची ७-८ वर्षं वापरली पण पन्नाशीनंतर त्याच पायाने किक मारणं बाबांना जड जायला लागलं. कायमस्वरूप स्क्रू होता पायाच्या घोट्यात त्यामुळे खूप दुखायचा पाय. मग ती राजदूत काढून कावासाकी घेतली. तीपण जाम मजबूत होती. मी तीच मोटरसायकल शिकले.

जगभरातील वाणिज्य उद्योगात दैनंदिन व्यवहारात महत्त्व असलेल्या बारकोडच्या प्रत्यक्ष वापराला (scan) यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
(१९७४ - २०२४ )
barcode.png

आज जगभरात दररोज दहा अब्जांहून अधिक बारकोडचा वापर केला जातो.

दुसऱ्या एका धाग्यावर मार्लेक्स प्रेशर कुकरची आठवण निघाली आहे, त्यावरून हे आठवलं.
तिथे आणखी अवांतर नको , म्हणून आणि सुरस आहे म्हणून इथे लिहितो

आमची आणि आजूबाजूच्या हाउसिंग सोसायट्या १९७३-७४ मध्ये वसल्या. त्यांचं वर्षी तिथे एक दिवस मार्लेक्स प्रेशर कुकर वाले टेंपो घेऊन आले. तोवर कुकर इतके सर्रास वापरात नव्हते. लोकांनी टेंपोशी जाऊन कुकर घेतले. त्यांनी emi ची सोयही दिली होती. माझ्या बाबांनी emi वर कुकर घेतला. तो जवळ जवळ ३० वर्षे चालला. आणखीही चालला असता.
पण आमचे ऑफिस दर वर्षी दिवाळीला आम्हांला गृहोपयोगी, त्यातही स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू देई. त्यात प्रेस्टीजचा कुकर मिळाला. मग जुना कुकर काढला. त्यातले डबे अजूनही आहेत.
प्रेस्टीजचा कुकर काही तितकी वर्षे चालला नाही.

emi वर कुकर हे आता नवल वाटेल.

स्टेनलेस स्टील ची भांडीही असत ई एम आय वर. अवंतर ; मध्यंतरी लग्न कार्यात मिल्क कूकर भेट द्यायची लाट आली होती.

छान !
आम्ही पहिल्यापासून हॉकिन्सचे शौकीन.
1970 च्या दशकात कुकर ही नवलाई होती. सुरुवातीला त्याचे प्रात्यक्षिक दाखवल्यावर बराच काळ घराघरातून त्यावर चर्चा चालायच्या.

अन्न शिजवताना कुकरच्या शिट्ट्यांच्या संख्येबाबत आजही बरेच मतभेद आढळतात.

15 ऑगस्ट 1947 या ऐतिहासिक दिनाच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या अंकाच्या पहिल्या पानाचा खास फोटो कोणाला हवा असेल तर तो इथे विकत मिळेल
https://timescontent.timesgroup.com/photo/infographics/independence-day-...

किंमत फक्त 999 रुपये !

जुन्या जमान्यातली असले अन साठीची म्हणून काय झालं ? . . .

अजूनही मी दिमाखदार आहे . . . आणि हा

रस्त्यावर पण येतेय अजून !
..
..
fiat rev.jpgFiat 1100 D
fiat 2rev.jpg

सहीच. बाबा प्रीमियर कंपनी, कुर्ला इथे नोकरीला होते त्यामुळे इमोशनल अटॅचमेंट आहे. प्रीमियर पद्मिनी, फियाट या गाड्यांशी.

अरे वा छानच !
1100 D नंतर पद्मिनी किंवा प्रेसिडेंट असे दोन पर्याय असायचे.
आता प्रीमियरचे नाव सुद्धा ऐकू येत नाही.

वाह! किती छान चकाकती ठेवलीये.
ही, मारूती ८००, फियाट सगळ्यांशी अंजू म्हणते तशी इमोशल अटॅचमेंट आहे. आमच्याकडे काही कार नव्हती कधीच पण जेव्हा कधी कोणा नातेवाईंकांच्या कार मधे बसायला मिळायचं कोण अप्रुप त्याचं. कारच्या आत येणारा एक टीपिकल वास, आता कशी काय गाणी वाजतात याचं कौतुक, कर्र्कर्र करत उघडणारे दरवाजे मज्जाच वाटायची सगळी.
ती सरकत्या दरवाज्यांची एक मारुती कार कोणते मॉडेल आठवत नाही पण ती बहुतेक किडनॅपिंग साठी वापरायचे सिनेमात त्याची थोडी भितीच वाटायची. अवांतर - किडनॅपिंग हा शब्द मुलांना पळवून नेणे (झोपेत) असं काही आहे का?

* ही, मारूती ८००, फियाट सगळ्यांशी अंजू म्हणते तशी इमोशल अटॅचमेंट >>>> +११
.....
* . अवांतर - किडनॅपिंग हा शब्द >>>
kid = "child" and
nap (v.) = snatch away, ( nap <<<< nab = गचकन पकडणे)
https://www.etymonline.com/search?q=kidnap

Pages