।।मेलेलं कोंबडं।।।। (भाग ४)

Submitted by mi manasi on 21 August, 2020 - 01:28

।।मेलेलं कोंबडं।।
(भाग ४)

दार लावून सुहास वळला. त्याने खांद्याला धरून जुईला कॉटवर बसवलं. आणि तिचे दोन्ही हात हातात घेत म्हटलं ...

"जुई डोळे बंद कर!"...जुई पुन्हा एकदा थरथरली...

"हं! आता उघड!"...

जुईने डोळे उघडले. सुहासने तिच्या हातावर पाचशेच्या बऱ्याचशा नोटा ठेवलेल्या होत्या...जुईने अंदाज बांधला... पंचवीस-तीस हजार असतील...

"हा माझा पहिला पगार जुई! हुं!.. पण आता कदाचित शेवटचाही ठरू शकतो”...सुहासने भावूक निवेदन करून पाहिलं...

पण आता जुईचा चेहरा एकदम कोरा झाला होता.. म्हणजे ह्याला झाल्यागेल्याचा जराही अपराधबोध नाही… जुईला हे सहनच झालं नाही की आठ महिन्याआधी जे झालं त्याचा सुहासला साधा उल्लेखही करावासा वाटला नाही?... तिच्या डोक्यात सणक गेली होती. तरीही मुद्यामच तिने नाराजी न दाखवता त्या सगळ्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या आणि त्याच्याकडे रोखून पहात शब्दांवर जोर देत विचारलं...

"म्हणजे? तुला नोकरी लागली होती तर!"

"लागली म्हणजे, घ्यावीच लागली. खरंतर एका शिक्षकाने अर्धा पगार मिळत असतांना पूर्ण पगाराच्या रकमेवर सही करावी हे पटत नाही मला”...सुहासने नकारार्थी मान हलवून निषेध व्यक्त केला ...तो आपल्याच धुंदीत बोलत होता...

“पण काय करणार? आता सहा महिन्यांनी पप्पा रिटायर्ड होतील. प्रीतीचं कॉलेजचं हे शेवटचं वर्ष. मग ती कुठेतरी लागेलच! पण तोपर्यंत तरी मला काहीतरी करायला हवं ना? मोठा मुलगा आहे मी! शेवटी माझी जबाबदारीच आहे ती!"

सुहास फुशारकी मारत होता. जुई आता त्रयस्थपणे त्याला निरखित होती. तिला कळत होतं... सुहास आपल्याच जगात आहे... त्याला तिच्या प्रश्न विचारण्याचा आणि तिच्या नजरेचा रोख अजिबात कळणार नव्हता...

जुईच्या उमललेल्या पाकळ्या एका क्षणात मिटल्या...म्हणजे सुहासला आपल्या ह्या आजच्या परिस्थितीबद्धल काहीच वाटत नाहीय. त्याच्यावरच्या जबाबदारीच्या यादीत आपलं नांव कधीच नव्हतं. उलट जी त्याची माणसं कधी त्याला आपल्यातला मानायला तयार नव्हती; तीच आज त्याची आपली माणसं होती...

एकदा तिला वाटलं, त्याला त्या प्रसंगाची आठवण करुन द्यावी... पण तिने तसं केलं नाही. कारण आता तिच्या मनाला खात्री वाटत होती की तेव्हा त्यालाही तेच अपेक्षित असावं. म्हणून तो गप्प होता...

कारण कदाचित तसं झालं असतं तर त्याचं आयुष्य बदललं असतं... कदाचित?...

बिच्चरी काकू! तिला वाटलं त्याला नोकरी नाही तर घरी कसा म्हणेल, माझं लग्न करा! आपणच एकदा त्याच्या घरच्यांना सांगून बघावं. की एकमेकांवर प्रेम आहे दोघांचं. तसं नोकरीचं होईतो वय वाढत जाईल. तर आपण दोघांच साधसं लग्न लावून देऊया. काय सांगावं! उद्या कदाचित संसाराची जबाबदारी पडतेय म्हटल्यावर सुहास नोकरीचं मनावर घेईलही...

पण झालं वेगळंच...काकू जेव्हा लग्नासाठी विचारायला सुहासच्या घरी गेली होती तेव्हा सुहास घरीच होता.त्याच्यासमोर त्याची आई म्हणाली होती...

"त्यांनी आपल्या जबाबदारीवर खुशाल त्याना हवा तसा आपला वेगळा संसार मांडावा. आमची ना नाही. पण आम्ही काही त्या फंदात पडणार नाही. तो घरी आला तर त्याला जेवायला घालू. नाही आला तर शोधायला जाणार नाही. ह्यात काय ते समजा." ...

सुहास खाली मान घालून बसला होता. काही बोलला नाही...

नंतर काकू जुईला म्हणाली होती...
"जुई, आता सुहासमध्ये गुंतून नको राहूस बाई! फुकट आयुष्यभर गुंता सोडवत बसशील."

आणि तसंच झालं..

जुई वर्तमानात आली... सुहास घरचं बरंच काहीबाही सांगत होता. जुईचं जराही लक्ष नव्हतं. जीवाचा संताप होत होता. शेवटी वैतागून त्याला मधेच थांबवत दुखावलेल्या सुरात तिने स्पष्टच विचारलं...

"नोकरी लागल्याबरोबर लगेच मला सांगावं असं तुला नाही वाटलं सुहास?..."

सुहास चमकला …आता त्याला जुईच्या बोलण्याचा रोख समजला होता. तो लगेच सावरला. साळसुदपणे समाजावणीच्या सुरात हळूवारपणे तिच्या हातावर थोपटत म्हणाला...

"असं कसं होईल जुई! रोज वाटत होतं. पण घाबरत होतो ग! नोकरी लागली म्हणून तुला सांगून बसेन आणि अचानक त्यांनी... तुम्ही उद्यापासून येऊ नका...असं सांगितलं तर... तसं त्यांनी रायटींगमध्ये काहीच दिलेलं नाही ना! सहा महीन्यांनी देऊ असं म्हणाले होते... अपेक्षाभंग मला नवीन नाही ना!.."

सुहास प्रतिक्रियेसाठी थांबला... त्याच्या त्या बोलण्याने जुईचं समाधान झालं नव्हतं. पण जुई गप्प होती..

जुई गप्प बसलीय ...म्हणजे तिला आता आपलं म्हणणं पटलंय...असं समजून सुहास उठून तिच्या शेजारी बसला आणि लाडाने तिला जवळ घेत विषय बदलत म्हणाला...

"जाऊदे ना जुई! हे नेहमीचंच आहे सगळं! आज तरी ते नको… समज आता तुझ्यामाझ्या आयुष्याची नवी सुरुवात होतेय ती अशी नको!...”

जुई निर्विकारपणे त्याच्याकडे बघत राहिली. आता तिला सुहास आपला वाटत नव्हता…हा असाच कोणीतरी होता. ज्याचा तिच्या आयुष्यात झालेल्या उलथापालथीशी काहीही संबंध नव्हता...पण सुहास आता थांबायला बिलकुल तयार नव्हता...

सुहास तिच्या आणखीनच जवळ, लगटून बसला..दोन्ही हात तिच्या गळ्यात घालून, नजर चेहऱ्यावर रोखून हळूवार, आश्वासक आवाजात बोलू लागला...

“जुई! मला समजतंय. किती वर्षं तू आपल्या सहवासाचं स्वप्न बघतेयस आणि मी मात्र ते टाळत आलो. पण आज मला ते पूर्ण करायचंय जुई! काय सांगू! मीही रोज रात्री तुझ्या आठवणी कुरवाळीत झोपतो.आणि सकाळी उठतो तेव्हा तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो! रोज मनाला किती वाटतं, खरीखुरी तू सोबत असावीस... "

हा सुहास जुईला एकदम अनोळखी वाटला. तिने अंग आक्रसून घेतलं..

सुहास तसाच बोलत राहिला...

"जुई! आता पुढे काय माहीत काय होतंय. पण इतक्या वर्षांनी आज पहिल्यांदा आपल्याला असा एकांत मिळालाय. मला आज आपल्या संसाराची नवी सुरुवात करायचीय जुई! आज मला तुझ्या हक्काचं सगळं सुख तुला द्यायचंय...मला आज तुझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण करायचीय जुई! बघ! मी तुला हवं होतं ते द्यायला तयार झालोय.”

क्षणभर जुई भांबावली...डोक्यात त्याच्या बोलण्यातले सगळे संदर्भ गोळा करू
लागली... काय बोलतोय हा? ह्याला तेच म्हणायचंय जे आत्ता मला कळतंय?...

जुई सावध झाली. संतापली. तिला जवळ ओढू पाहणाऱ्या सुहासला दूर ढकलून ताडकन उठून उभी राहिली. त्या अनपेक्षित धक्क्याने सुहास काँटवर आडवा पडला.तो धडपडून उठू लागला. पण जुईने त्याला उठू दिलं नाही. रागाने त्याला पुन्हा पुन्हा ढकलत म्हणाली...

“शी! हे कसल्या सुखाबद्धल बोलतोयस तू सुहास? आणि इच्छा माझी कि तुझी? मी आजवर कधी तुझ्याकडे काय मागितलं? तू हात धरलास...धरू दिला. कधीतरी जवळ घेतलंस…घेऊ दिलं. म्हणून तू आज थेट बाजारात बसवायला निघालास मला? खरंच
भिकारी होतास ना तेच बरं होतं. खिशात चार पैसे काय आले, माझी बोली लावायला निघालास? तू काय देणार मला? कधी एक फूल तरी घेतलंस स्वतःच्या पैशाने आजवर माझ्यासाठी? आता पहिला पगार घेऊनसुद्धा तसा रिकाम्या हातानेच आलास... स्वार्थी! निलेश म्हणाला ते खरं केलंस तू शेवटी सुहास!"

संतापलेली जुई झटक्यात पर्स घेऊन जायला निघाली…पण पुन्हा वळून मागे येवून म्हणाली...

“खरंतर आज येणारच नव्हते मी तुझ्याबरोबर. शेवटचं म्हणालास म्हणून आले. पण बरं झालं! आता मनाला समजवायला नको!...

जुईच्या नव्या अवताराने अचंबित झालेल्या सुहासला हे सगळं काय होतंय ते कळून तो सावरायच्या आंत जुई निघून गेली होती.

‘माहीम’ सांगून टॅक्सीत बसतांना जुई मनांत म्हणत होती…”आता हा आणखी फुकट दोनशे रुपयांचा भुर्दंड पडला.डोकं उठलंय. उतरल्यावर चहा घ्यावाच लागेल”...

एकदम तिच्या लक्षात आलं…असं कसं? इतकं सगळं होऊनही आता आंत काही तुटल्यासारखं कसं झालं नाही? बस्स! जसं कधी रस्ता क्रॉस करतांना गाडी अंगावर आली तर दचकुन मागे होतो, तेवढंच तसंच वाटलं…कि आपलं मन सगळ्या धक्क्यांना सरावलंय आता? ती स्वतःशीच बोलली..." हुं! कोंबडं मेलंय जुई!"

फॅक्टरीजवळ उतरून जुईने चहा घेतला आणि घरी जायला निघाली.चालत चालत ती सुपरमार्केटजवळ आली तर माणसांची प्रचंड गर्दी उसळलेली होती. वाटेत कानावर आलं...“अब कलसे लॉकडाऊन हो जायेगा, तो दो-तीन महिना कुछ नही मिलेगा."

ही खरेदी लॉकडाऊनपूर्वीची चाललीय की दिवाळीपूर्वीची, अशी शंका यावी असा जो तो सामानाच्या ओझ्याने लादलेला बाहेर पडत होता. जुईला वाटलं, एवढ्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग झाला तर, असं मनातही येत नाही यांच्या?...जगणं कठीण झालं की मरणाचं कसलं भय!..शेवटी 'मेलेलं कोंबडं...

जुई बिल्डिंगजवळ आली तर तिला कंपाऊंडमध्ये ओला टॅक्सी उभी असलेली दिसली.

क्रमशः
मी मानसी...

मेलेलं कोंबडं भाग -१
https://www.maayboli.com/node/76062
मेलेलं कोंबडं भाग-२
https://www.maayboli.com/node/76069
मेलेलं कोंबडं भाग-३
https://www.maayboli.com/node/76080

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचे भाग वेगाने टाकताय याबद्दल कौतुक. आधीच्या व नंतरच्या भागांच्या links देत चला.
छान चालू आहे कथा. लेखनशैली आवडली.

वावे
मी चिन्मयी
Bhakti Salunkhe
खुप खुप धन्यवाद!

मंजूताई
अनघा
Mrunal samad
धन्यवाद!
छान प्रतिसाद...आभार!

https://www.maayboli.com/node/76092

ही तुमची ह्या कथेची लिंक..
प्रत्येक भागाची ब्राऊजर मधली लिंक Copy करा आणि योग्य जागी Paste करा..

Pudhacha bhag taka lavkar.. khup chhan link lagliye.. mast lihitay.. shubhechhya!!

छान लिहिताय.
फक्त वेग असाच ठेवा.
शक्यतो कथा अर्धवट राहणार नाही हे पाहा.
कथा अर्धवट वाचली की अर्धवट जेवल्याचा फील येतो.

मोहिनी १२३
निरु...Thank u very much...
आता सगळ्या लिंक देतेय.
Chasmish
माऊमैया
नयाहयवह
मास्टरमाईंड..पुढचा भाग शेवटचा आहे.
तो आता टाकतेय.

धन्यवाद!
आपण सगळ्यांनी कथा वाचली. तुमच्याकडून खुप छान प्रतिसाद मिळाले. आभारी आहे.