।।मेलेलं कोंबडं।।। (भाग ३)

Submitted by mi manasi on 20 August, 2020 - 03:54

।।मेलेलं कोंबडं।।
भाग ३

आठ महिन्यापूर्वीचा तो दिवस तिच्या डोळ्यात उतरला...

त्या दिवशी निलेशने सुहासला स्वतः तिच्या मोबाईलवरून फोन करून चार वाजता घरी भेटायला बोलावलं होतं. पण सुहास सहा वाजले तरी आला नाही. तेव्हाच जुईच्या काळजाचा ठोका चुकला होता. वहिनी आधीच आरोहीला-त्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली होती. कदाचित निलेशने तिला मुद्धामच पाठवलं होतं...

निलेशचा पारा चढलेला होता. गेली पाच वर्षं जुई सुहासला भेटत होती आणि त्याला मात्र ते आत्ता कळलं होतं... तेही लोकांकडून...

सुहास आला. त्याचा घाबरलेला चेहराच सांगत होता की तो यायचं म्हणून आलाय. जुई समजली... आता सगळी लढाई तिची होती...

या बसा नाही. चहापाणी नाही. सुहास आत येऊन बसताच निलेशने थेट प्रश्न केला...

"कधी लग्न करतोयस हिच्याशी?"

"ना..नाही..म्हणजे.." बचावाच्या आशेने सुहासने जुईकडे पाहिलं...

निलेश जुईजवळच उभा होता…घाबरून जुई म्हणाली…

"त्याला...नोकरी नाहीय…म्हणून..."
फाडकन मुस्काटात बसली आणि जुईच्या तोंडातून पुढचे शब्द आलेच नाहीत.

"अगं अशीच वापरतोय तो तुला... स्वतःच्या करमणुकीसाठी” निलेश किंचाळला. आणि सुहास घाबरून पटकन उठून निघून गेला.

"पाहिलंस...पाहिलंस...गेला तो. तुला ना आता…" म्हणत निलेशने तिला लाथाबुक्क्यांनी यथेच्छ तुडवली. आणि शेवटी घराबाहेर ढकलून दिली. दार लावण्याआधी त्याचं शेवटचं वाक्य होतं...

"आता इथेच, गँलरीत राहायचं…नाहीतर त्याच्याकडॆ जायचं.”…

जुईला ओरडून सांगावस वाटत होतं..."अरे हे घर जेवढं तुझं आहे तेवढंच माझंही आहे." पण ती गप्प बसली...तिला माहित होतं. तिच्या बोलण्याने यापूर्वीही काही बदललं नव्हतं. आणि आताही बदलणार नव्हतं...

गिरगावातलं घर, तिच्या आणि माईच्या नावावरच्या वीस लाखांच्या एफडी, एवढंच काय दोघींचं सगळं सोनंसुद्धा हे घर घेण्यासाठी काढून घेतलं होतं निलेशने. तेव्हासुद्धा किती तमाशा केला होता...

निलेशचं वाक्य म्हणजे जुईच्या कपाळीचा दैवलेख होता. आणि तो बदलणं केवळ त्यालाच शक्य होतं...

रात्री कधीतरी दार उघडून निलेशने तिचं अंथरून ग्यालरीत टाकलं आणि दार लावलं. जुईने रडून ओरडून दारावर थापा मारल्या... निलेशने दार उघडलं नाही...

शेजाऱ्यांनी दारं उघडली आणि लावली. फक्त सुमाआजीने आपलं दार लावलं नाही. निलेश घरात घेतो का याची वाट बघून शेवटी रात्री तिला आपल्या घरात बोलावून घेतलं. तोंड काळंनिळं झालं होतं. सुमाआजींनी तिला शेकायला गरम पाणी दिलं. रात्रभर रडणाऱ्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या…त्या दिवसापासून तिचं हे आत्ताचं ग्यालरीतलं आणि सुमाआजीच्या घरातलं असं दुहेरी आयुष्य सुरु झालं होतं...

विचारातून बाहेर येत जुईने पुढे पाहिलं. मेनरोडवर सुहास थांबलेला दिसला..जुई जवळ पोहचताच त्याने तिथे त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि जुईच्या पाठीवर हात ठेवून तिला म्हणाला...

"चल."

"कुठे?" जुई रागात होतीच त्यात सुहास असा एकदम टँक्सी का करतोय हे न कळल्याने तिने विचारलं होतं...

"घरी" म्हणत सुहासने तिला आत ढकलायचा प्रयत्न केला. आणि त्याचवेळी त्याने वाकून टॅक्सीवाल्याला सांगितलं…"खार जाना है!"…जसं जुईचा प्रश्न त्याच्यासाठी अजिबात महत्वाचा नव्हता.

जुई दोन पावलं मागे झाली…तिला माहित असलेलं त्याचं घर तर बँन्ड्राला होतं. मग खारला?...लगेच जुईच्या कपाळावर आठ्या पडल्या..जागचं जराही न हलता तिने प्रश्न केला...

"कोणाच्या घरी?"

"आपल्या" म्हणून सुहासने तोंडावर बोट ठेवलं आणि हाताने तिला आत बसायचा इशारा केला...

'आपल्या' या शब्दाने जुई क्षणभर जागीच थरथरली...कोणीतरी अर्धवट फुललेल्या फुलावर हळूच फुंकर घातल्यावर त्याच्या पाकळ्या कशा थरथरतात तशी…आणि मग सहज टॅक्सीत बसली...रस्ता पळत होता आणि जुईचं मन त्याच्याही खुप पुढे जायला बघत होतं…

म्हणजे सुहासने घर घेतलं...म्हणजे सुहासला नोकरी लागली...म्हणजे म्हणून तो एकदम आठ महिन्यांनी आला...म्हणजे म्हणून आज सुहासने हक्काने माझा हात पकडत होता… मनातल्या उत्तरांच्या दाटीत जुईच्या मनांतले सगळे प्रश्न पार गुदमरून गेले....

जुईचं शरीर मन फुलून हलकं झालं होतं. ती सैलावली. सुखावून निर्धास्त मागे रेलली. नजरेने तिच्यातला बदल टिपणाऱ्या सुहासने पाठीमागून अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणि जुईने तो तसाच राहू दिला...

मागे जाणाऱ्या रस्त्याबरोबर जुईचं मन भूतकाळात गेलं... ती अगदी पहिल्यांदा टॅक्सीत बसली होती ती निलेश तिला आणि माईला टॅक्सीने भांडुपला, काकूच्या घरी सोडायला घेऊन गेला होता तेव्हा... कारण निलेशने हे आताचं घर घ्यायचं ठरवलं होतं म्हणून त्याने त्यांची गिरगावातली खोली विकली होती....

त्यानंतर चार वर्षं ती आणि माई काकूकडेच होत्या. निलेशने त्यांना नेलंच नाही. तिकडे फिरकला सुद्धा नाही. माई आजारी असतांना किती वेळा फोन केला. मरेपर्यंत दाराकडे डोळे लावून होती. खूप लाडका होता तो तिचा. नाही आला. गेल्यावर सुद्धा फोन करून करून कळवल्यावर खूप उशीरा आला आणि लगेच गेला. नंतर वर्षभरात कधीतरी परस्पर रजिस्टर्ड लग्न करून मोकळा झाला.

काकू बिचारी तशीही नवऱ्याच्या मागे लहान मुलासाठी कशीतरी जगत होतीच. दोघी एकमेकींच्या आधाराने राहिल्या. काकांची पेंशन होती. जुई जवळच्या कपड्याच्या दुकानात जात होती. तिचा कसला भार नव्हताच.उलट आधारच होता.

काकू टीबीने आजारी झाली. आणि काही झेपेना तेव्हा तिचा भाऊ येऊन तिला आणि तिच्या मुलाला गावाला घेऊन गेला. आणि मग नाईलाजाने जुईला निलेशकडेच यावं लागलं होतं…

तेव्हा ती टॅक्सी तिला स्वतःच्या हक्काच्या घरापासून दूर घेऊन गेली होती…आणि आता दुसऱ्यांदा ती सुहासबरोबर टॅक्सीत बसत होती. जुईच्या मनात आलं…आता आज ही टॅक्सी कुठे नेतेय काय माहित?

"ये गलीके अंदर लेना"…सुहास ड्रायव्हरला सांगत होता...

विचारातून जागं होत जुईने कुठे आलोय म्हणून खिडकीतून पाहिलं...ती सगळी झोपड्यांची वस्ती होती. ती हिरमुसली…इथे? इथे घर घेतलंय सुहासने?... पण लगेच तिने मनाला दटावलं... सुहासबरोबर कुठेही राहायची तयारी होती ना?...

"अंदर नही जायेगा मै. आप इधरही उतरो... एकसोसाठ रुपया हुवा." ड्रॉयव्हरने मीटर बघत सांगितलं आणि थोड्याशा नाराजीने त्याला पैसे देऊन सुहास जुईला घेऊन उतरला...

जुई सुहासच्या मागेमागे चालत राहिली. वळणं वळणं घेत सुहास एका घराजवळ थांबला. ती अगदी साधी पत्र्याची झोपडी होती. आणि दाराला कुलूप नव्हतं.बाहेरून फक्त कडी लावलेली होती. जुईला मनांत खटकलं, पण ती गप्प बसली...

कडी काढून सुहास आत गेला तशी त्याच्या पाठोपाठ जुई गेली. खोली एकदम रिकामी होती.फक्त एक कॉट होती. जुई विचारात पडली... सुहासने ही खोली दाखवायला आणलीय कि घेतलीय?...

दार लावून सुहास वळला...

क्रमशः

मी मानसी...

मेलेलं कोंबडं भाग -१
https://www.maayboli.com/node/76062
मेलेलं कोंबडं भाग-२
https://www.maayboli.com/node/76069

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम प्रतिसादाला उत्तर द्यायला उशीर झाला त्यासाठी क्षमस्व!
पुढचा भाग लवकर पूर्ण व्हावा म्हणून इकडे वेळ दिला नाही...
माऊमैया
Mrunal samad
एविता
वावे
मोहिनी १२३
Chasmish
King_of_net
किल्ली
रूपाली विशे-पाटील
धनवन्ती
Peacefully 2025
हाडळीचा आशिक
सगळ्यांना धन्यवाद!
तुम्ही उत्सुकता दाखवलीत म्हणून पुढचा भाग लवकर लिहावा असं वाटलं...प्रतिसाद हे कलाकाराला नशा देणारे असतात. काम अधिक चांगलं करुन दाखवायला प्रवृत्त करीत असतात. म्हणूनच तुमच्या हव्याहव्याशा प्रतिसादासाठी आभारी आहे.
धन्यवाद!