`विभक्त कुटुंब पद्धती– परिस्थिती, कारणं आणि उपाय` हे श्री. किरण आचार्य यांचं पुस्तक. याबद्दल थोडंसं!
आज आपल्या आजूबाजूला अनेक एकाकी, मुलांपासून वेगळे/दूर रहात असलेले आणि वृद्ध झालेले किंवा वृद्धत्वाकडे जात असलेले माता-पिता दिसतात. हे माता-पिता ज्या समस्यांचा सामना करत आहेत किंवा ज्या प्रकारच्या समस्या त्यांच्या येत्या काळात त्याच्यापुढे उभ्या ठाकणार आहेत त्यांनी ते चिंतीत आहेत. अर्थात, त्यांची जी मुले स्वतंत्र संसार थाटून बसली आहेत, त्यांचेही सगळे चांगले चालले आहे अशीही परिस्थिती नाही. त्यांच्यासमोर (असं स्वतंत्र/वेगळं राहिल्यामुळे) वेगळ्या स्वरूपाच्या समस्या आहेतच. या आई-वडील व मुलगा-सून वेगवेगळे राहण्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कश्या कमी करता येतील? यावर असा काही उपाय काढता येईल का, की ज्यामुळे निदान आगामी पिढ्या (पालकांच्या आणि मुलांच्याही!) या समस्यांपासून दूर राहू शकतील?
यावर आज समाजात खोलात जाऊन विचार करण्याची गरज असल्याचेच कुणाला वाटत नाही अशी परिस्थिती दिसते. मुलांना नव्या नव्या संसारात स्वतंत्र राहण्याचे आकर्षण वाटतेय अन पालक मंडळीही यावर काही समाधानकारक पर्याय मुलांना देण्याबाबत विचार करताना दिसत नाहीयेत. या परिस्थितीवर विचार झाला पाहिजे, अश्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, या विचारातून किरण आचार्य यांनी हे लेखन केलेलं आहे.
किरणजींचं हे लेखन वाचल्यावर या आजच्या पालकांच्या एकट्या राहण्यामागे, तसंच इतरही (पालक नसलेली) अनेक माणसे समाजात राहूनही एकटी पडण्यामागे किती विविध कारणं असू शकतात याची जाणीव आपल्याला होते. या त्यांच्या लेखनामुळे या समस्येवर विचार करण्याचं पहिलं पाऊल उचललं गेलं आहे, जे पुढील पिढीसाठी काहीतरी उपयुक्त असं घेऊन येत आहे.
आज ज्या ज्या मंडळींवर एकाकी रहायची वेळ येत आहे, त्यामागे किती विविध कारणं असू शकतात त्याची जाणीव हे पुस्तक आपल्याला करून देतं. त्यामुळे आज वृद्धत्व काही किंवा बरीच वर्षे दूर असणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अतिशय आवश्यक असा खबरदारीचा इशारा देत आहे.
या पुस्तकात मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लेखकाने उपायही सुचवले आहेत. पण किरणजी प्रत्यक्ष उपाय सांगण्यापूर्वीच ती ती परिस्थिती सांगत असताना जे विवेचन करतात, आपलं स्वत:चं मत प्रदर्शित करतात, त्यातूनच अशी समस्या आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, वेळेत कोणती पावलं उचलायला पाहिजे याचा विचार वाचकाच्या मनात अगदी आपोआप सुरु होतो. आणि माझ्या मते या लेखनाचं हेच सगळ्यात मोठं यश आहे.
एकदा आयुष्यात एकाकी पडल्यावर आपल्यापुढे येऊ शकणाऱ्या समस्या लक्षात आल्या, की मग पूर्वीच्या काळाप्रमाणे अगदी मोठ्या एकत्र कुटुंबात राहिलं नाही, तरी निदान आपल्या घरात आपल्या मुला-बाळांबरोबर आजी-आजोबाही असावेत, आणि असं एकत्र राहतानाही प्रत्येकाचे (अगदी आजी-आजोबांचेही) वैयक्तिक स्वातंत्र्य, privacy शाबूत राहून प्रत्येक जण आनंदाने कसं राहू शकेल, त्यासाठी प्रत्येकानंच काही आवश्यक बदल, adjustments कश्या करायला हव्यात यावर आपण गांभीर्याने विचार करायला सुरुवात करू. या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय मनमोकळा संवाद संपूर्ण कुटुंबामध्ये असणं मात्र अतिशय आवश्यक असेल. या संवादाचं महत्व किरणजींनीही एका प्रकरणात नमूद केलं आहे.
`सोशल मीडिया` हे प्रकरण या पुस्तकातील सर्वश्रेष्ठ प्रकरण ठरावं असं मला वाटतं. हे प्रकरण आपल्याला (म्हणजे आज चाळीशीच्या पुढे गेलेल्या पिढीला) आपल्या रम्य बालपणात घेऊन जाईल, तेव्हाचे नातेसंबंध, त्यांची जपणूक, प्रेम, माया, ममता यांनी भरलेल्या त्या खरोखरच हव्या हव्याश्या वाटणाऱ्या दिवसांची आठवण आपल्याला करून देईल. पण लगेच लेखक या सुंदर गतजगातून आपल्याला वास्तवात आणतो. केवळ आपणच नव्हे तर आपले पालक, जे आज ज्येष्ठ नागरिक झालेले आहेत, त्यांच्यातही या गेल्या काही (२०-३०) वर्षात जगात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे(?), लागलेल्या विविध शोधांमुळे कसे नको ते बदल झालेले आहेत, त्या बदलांचीही लेखक आपल्याला जाणीव करून देतो.
`मनोरंजनाच्या आणि कुटुंबाबरोबर एकत्र येण्याच्या व्याख्या आता अचानक खूप बदलल्या आहेत. मुक्त आणि भन्नाट आयुष्य जगलेली ही आमचीच पिढी आज आपल्या मुलाबाळांना तसे आयुष्य देताना दिसत नाही,` `गर्दीत देखील माणसाला एकटं करण्याची किमया या सोशल मीडियाने साध्य केली आहे,` यासारखे लेखकाने या लेखात मांडलेले विचार आपल्याला कमालीचे विचारप्रवृत्त करतात. हा लेख वाचकांनी एकापेक्षा अधिक वेळा वाचला तर मला आश्चर्य वाटणार नाही.
`तरुणाई` या लेखातील `शिकून सवरून तुम्ही जर एकलकोंडेपणा निवडलात, तरी पुढे तुमच्या पोटी जो जीव जन्माला येणार आहे, त्याला जर तुम्ही कुटुंबाचे सुख देऊ शकला नाहीत, तर त्या जीवावर तो अन्याय होणार नाही का?` हे लेखकाचे उद्गारही असेच विचार करायला लावणारे.
विभक्त कुटुंबाकडून परत एकत्र कुटुंबाकडे समाज व्यवस्था जाण्यातच आजच्या (आणि यापुढच्याही) प्रचंड स्पर्धेच्या जगात व त्यामुळे सतत ताण-तणावात जगणाऱ्या पिढीचं भलं आहे याबाबत माझ्या मनात काडीचाही संदेह नाही. तसं स्थित्यंतर होण्यासाठी जी पावलं उचलली गेली पाहिजेत, त्यातलं एक महत्वाचं पाऊल किरण आचार्य यांच्या या पुस्तकाच्या स्वरुपात पडत आहे एवढं निश्चित.
या पुस्तकाच्या वाचनाने भविष्यातील समस्यांचा अंदाज येऊन एखाद्या जरी कुटुंबातील सदस्यांनी विचारपूर्वक आणि परस्पर संवादाने आवश्यक ती पाऊले उचलली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याला (मग तो कोणत्याही वयाचा असला तरी) बाकीच्या सदस्यांचा भक्कम आधार निर्माण केला तरी या पुस्तकाच्या लेखनाचा आणि प्रकाशनाचा हेतू सफल झाला असे मी मानेन.
***
वेगळे राहण्याची योग्य वेळ
वेगळे राहण्याची योग्य वेळ कोणती.
>>>
सकाळची. जमल्यास न्याहारी करूनच घराबाहेर पडावे
जेव्हा मला माझे वडिल म्हणाले की वेगळा हो आता तेव्हा मी बॅग भरून चालू लागलो. आई म्हणाली आता एवढ्या रात्रीचे कुठे चाललायस. सकाळी जा. मलाही ते पटले.
Pages