मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाला सिनेमाभर स्क्रीनवर किंचित अंधार आहे असे जाणवले का? पूर्ण व्यवस्थित उजेड फार म्हणजे फार कमी ठिकाणी आहे.
>>
ग्रीन स्क्रीन वालं शूटिंग असलं की होतं असं...

पाणी सत्यकथा आहे. ज्यांच्यावर आहे त्यांची मध्ये मुलाखत बघितलेली म्हणजे चित्रपटाचं प्रमोशन होतं ते पण ओरिजनल लोकं हजर होती, मूळ गाव वगैरे दाखवलं आणि त्यांनी कसं पाणी नव्हतं आणि आणलं, आता ते गाव, बऱ्याच आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवते. आदिनाथ कोठारेनेच introduce केलेलं मूळ खऱ्या नायकाला. ग्रेट कामगिरी वाटली त्या नायकाची आणि त्याला साथ देणाऱ्या सर्वांची.

पाणी चित्रपट बघितला. खूप आवडला. इथे रेको आला नसता तर कदाचित लक्षातही आले नसते. माझ्या नांदेड (मला मिरवायचे किंवा लाजायचे- दोन्ही नसते, 'जे आहे ते आहे' असाच अप्रोच असतो) जिल्ह्यातली लोहा तालुक्यातील नादरगाव नावाच्या खेड्यात घडणारी कथा आहे. हनुमंत केंद्रेे नामक युवक पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतो. त्यासाठी एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या गावकऱ्यांवा व खास करून भजनी मंडळ व बचत गटाच्या क्लृप्त्या वापरून गावातील स्त्रियांना एकत्र आणतो. संपूर्ण गावाच्या सहकार्याने व श्रमदानाने गावाला पाण्याच्या सोयीसाठी स्वयंपूर्ण करतो. लग्नासाठी सांगून आलेली मुलगी फक्त गावात पाण्याची सोय नाही म्हणून जेव्हा तिचे वडील नकार देतात तेवढं निमित्त हनुमंताला ह्या कार्यासाठी प्रेरणा देणारं ठरतं.

यातील प्रत्येक गाव माझ्या ओळखीचे आहे, लोहा व जिथे सुबोध भावेे भाषण देतो तो कंधार तालुका, माळाकोळी हे सगळेच मी ऐकलेले व बघितलेले आहे. पाणी टँकरने आणून विकणे, लोकांच्या रांगा, धुणं धुताना कपडे भिजवलेले पाणी भांड्याला वापरणे, कोरड्या पडलेल्या विहिरी- नद्या, कितीही खोल खणून- खंदून फेल गेलेले बोअरचे अपयशी प्रयत्न, आटलेले ओढे, पाण्याचा टिपूसही न येणारे हापसे, घागरी घेऊन उन्हातान्हाचे कोसकोस चालत जाणाऱ्या बायका ही प्रत्येक गोष्ट मी बघितली व कमी तीव्रतेने क्वचित अनुभवलीही आहे. किल्लारीचा भूकंप हा माझ्या शाळकरी वयातला पहिला धक्कादायक अनुभव होता. माझे आजोळ तेथून फक्त तीस किलोमीटरवर असलेले खेडे आहे. तेथे भूकंपानंतर जमिनीतले पाणी आटून, गाव काही वर्ष अत्यंत दुर्भिक्षात होते. जो माझ्या अननुभवी जगातला पर्यावरणाच्या असमतोलाचा पहिला अनुभव होता. ती पाणी टंचाई मी कधीही विसरू शकणार नाही. फक्त नादरगावाची नसून संपूर्ण मराठवाड्याचीच ही कथा आहे.

औरंगाबादच्या पुढे गेल्याशिवाय खरा मराठवाडा दिसत नाही. खेड्यात पाणी नाही, वीज नाही, रोजगार नाही. सगळीकडे उडणारी कोरडी धूळ, बाभळीची झाडे, भेगा पडलेल्या जमिनी प्रचंड उन्हाळा आणि रूक्ष गवत. अत्यंत वाईट रस्ते, 'न भूतो न भविष्यति' असे कमरेचे टाके ढिले होऊन जातात. एक बाई उन्हातानात पायपीट करून घागरभर पाणी आणताना चक्कर येऊन पडते व जीव गमावते. काही जणं तिला उचलून नेतात तेव्हा दुसरी बाई तिच्या घागरीतले पाणी आपल्या घागरीत ओतून घेते हा प्रसंग बोलका आणि काळजाला हात घालणारा वाटला. सुरवात यानेच होते. छोट्याछोट्या प्रसंगातून पाणी टंचाई चांगली दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर गावाचा नेता किशोर कदम पाण्याच्या सोयीसाठी हनुमंत मदतीची विनवणी करत असताना जोरात चूळ भरतो तो प्रसंगही बोलका आहे. पाण्याच्या अनुषंगाने येणारे सूचक प्रसंग जागोजागी येतात. चित्रपट विचारपूर्वक बनवला आहे. डॉक्युमेंटरीच्या अंगाने जात व्यवस्थित माहिती देऊन मनोरंजनातही कमी पडत नाही. कथा बऱ्यापैकी लिनिअर आहे.

सगळं शूटींग तिथलंच आहे. चित्रपट व्यवस्थित अभ्यास करून बनवला आहे. भाषा अगदी मूळची मराठवाड्याच्या नांदेड जवळच्या खेड्यातलीच आहे. बसायलो, खायलो, करायलास, वगैरे पर्फेक्ट जमले आहे. आदिनाथचे बेअरिंग कुठेही सुटत नाही. सुबोध भावेचे मात्र काहीही होऊ शकत नाही. तो कायम पुणेरीच वाटतो. सुवर्णा आणि हनुमंतची लव्हस्टोरी सुद्धा गोड आहे. पुणेरी लोक भाषणं देऊन जातात तेही चपखल आहे. अभिनय सर्वांचाच चांगला आहे. बायकांचा विशेष आवडला, सहज वाटला. कपडेपटही मला त्या गावाप्रमाणे चपखल वाटला.

शेवटी खणताखणता जेव्हा पहार दगडावर बसून जमिनीला पाझर फुटतो, त्यांच्यासोबत प्रेक्षकांनाही शापमुक्त झाल्यासारखे वाटते. निष्ठा, जिद्द व ध्यासाची गोष्ट आहे, एकट्या माणसाची वाटली तरी संपूर्ण गावाची गोष्ट आहे. एका गावाची वाटली तरी संपूर्ण मराठवाड्याचीच गोष्ट आहे. दुर्भिक्षाने सुरू होऊनही तृप्ततेकडे नेणारी गोष्ट आहे. साधीसरळ तरीही मोठं काहीतरी करून जाणारी साध्या माणसांची गोष्ट आहे. नक्की बघा. Happy

छान पोस्ट अस्मिता

सुबोध भावे पुणेरीच वाटत होता हे अगदी खरे. त्याला बघूनच अरे हा कुठे आला यात असे झाले. आणि त्याने निराश केले नाही.

अस्मिता किती सुरेख लिहिलं आहेस गं… आजच्या काळात इतका अभ्यास करुन बनवलेला चित्रपट दुर्मिळ म्हणायचा.

मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त राहिलाय का ठेवलाय… अशा ठिकाणचे भयाण वास्तव लोकांसमोर यायलाच हवे कारण पाण्याच्या बाबतीत मराठवाडा जात्यावर दळुन पिसला असेल तर बाकी महाराष्ट्र आता जात्यात जातोय. आजचे मराठवाड्याचे वास्तव उद्याच्या पुर्ण महाराष्ट्राचे आहे.

(ही अतीशयोक्ती वाटत असेल तर मे महिन्यात आंबोलीत या. अतिवृष्टीचे भारतातील एक स्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या, पश्चिम घाटातील महत्वाचा हॉटस्पॉट असलेल्या या गावात मे महिन्यात विहीरी आटतात, नदीही आटते आणि तिचे काही जागी फक्त डबके उरते ज्यात बायका कपडे धुतात.)

प्राजक्ता प्राजक्ताच वाटते फुलवंती नाही वाटत..>>>>

एकदम सही पकडे है..मला हेच नेमक्या शब्दात मांडता येत नव्हत..
सिनेमातील भाषा, नाच, वेशभूषा.... यांनी फारच भ्रमनिरास केला आहे..

पाणी बघितला - खूप आवडला. अमित, रेको करता धन्यवाद. नाहीतर आदिनाथ कोठारेचा सिनेमा बघितलाच नसता. काहीसा ठोकळाच वाटायचा तो पण या सिनेमात मात्र कमाल केली आहे त्याने.

खरं तर सगळ्याच टीमचे कौतुक केले पाहिजे. गाव, गावातली माणसे, नायक नायिका सगळेच अस्सल वाटले आहे. हवी तितकीच नाट्यमयता ठेऊन सिनेमा कंटाळवाणा होउ दिलेला नाही.

आदिनाथने लाजरा प्रेमी, तडफदार नेता आणि सहृदयी माणूस हे तिन्ही अतिशय सुंदर दाखवले आहे. ग्लॅमरची पर्वा न करता नायक उभा करण्याकरता जे जे काही लागेल ते सर्व केले आहे. रापलेला चेहरा, राठ झालेले केस, मळकट कपडे - हणमंता पर्फेक्ट जमलाय त्याचा.एका प्रसंगात पहारीने दगड फोडताना चेहर्‍यावरची एक्स्प्रेशन्स अफलातून आहेत.

@अस्मिता, सुंदर लिहिले आहे. त्या मेलेल्या बाईच्या घागरीतले पाणी घेण्याचा प्रसंगाकरता +१००.
पण "डॉक्युमेंटरीच्या अंगाने जात" या तीन शब्दांना तिव्र विरोध. चुकूनही माहिती देण्याचा आव जाणवला नाही - कुठेच.

पण "डॉक्युमेंटरीच्या अंगाने जात" या तीन शब्दांना तिव्र विरोध. >>> Happy बरं. अगदी व्यावसायिक चित्रपटासारखा वाटला नाही म्हणून ते शब्द वापरावे लागले होते. विरोध समजू शकते, चित्रपट मनोरंजन करण्यात मात्र कुठेही कमी पडत नाही हे ही खरेच. Happy
धन्यवाद माधव, हर्पा, साधना ताई, आबा Happy

अशा ठिकाणचे भयाण वास्तव लोकांसमोर यायलाच हवे कारण पाण्याच्या बाबतीत मराठवाडा जात्यावर दळुन पिसला असेल तर बाकी महाराष्ट्र आता जात्यात जातोय. आजचे मराठवाड्याचे वास्तव उद्याच्या पुर्ण महाराष्ट्राचे आहे.>>> अनुमोदन.

पाणी विषयी छान लिहिलंय अस्मिताने देखील

कमी पाउस पडणारा प्रदेश आहे।
त्या अनुषंगानेच तिथले developement प्लान व्हायला हवे होते. ते न झाल्याने खूप अडचणी.
कॅनॉल ने पाणी आणले की आमदार खासदार ह्यांची साखर कारखाना काढायची घाई आणि लोकांना उस लावायची घाई.
तरी पाणी फौंडेशन आणि नाम फौंडेशन ह्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत असे ऐकून आहे.

>>>>>>जो माझ्या अननुभवी जगातला पर्यावरणाच्या असमतोलाचा पहिला अनुभव होता. ती पाणी टंचाई मी कधीही विसरू शकणार नाही. फक्त नादरगावाची नसून संपूर्ण मराठवाड्याचीच ही कथा आहे.
Sad
खूप सुंदर लिहीलयस. प्रत्येकाचे अनुभवविश्व किती वेगवेगळे असते. त्याला दिला गेलेला त्या त्या व्यक्तीचा, रिस्पॉन्स वेगळा असतो. आपापले अनुभवविश्व शेअर करुन, समृद्ध होता येते. असे शब्दात मांडता येणे - हे ब्लेसिंग असते.

हो, माझ्या आजोळी शेतकरी आहेत सगळे. त्यांच्या बोलण्यात बोअर फेल गेले, सत्तर फूट खंदूनही फेल गेले. जमिनीतले झरे आटलेत, भूकंपाचा परिणाम झाला आहे, शेतावर काम करायला कोणी नाही, अवकाळी पाऊस पडून तूरी नष्ट झाल्या, मोहोर जळाला , गडीमाणसं शहराकडे मजूरी शोधायला निघून गेले, अजून मोठा सबमर्सिबल पंप का काही तरी आणावा का वगैरे कायम ऐकलेली वाक्य आहेत. भूकंपग्रस्तांना टेन्ट केले होते, एक दिवाळी शेतात/ पत्र्यात साजरी केली आहे.

माझ्या काकू आजी कडे एक परटीण मावशी यायच्या, दर सुट्टीत त्या तशाच दिसायच्या. वय तितकेच दिसायचे. त्या दोघींचा ठरलेला संवाद असायचा. वैनी आजी ' गंगू मावशी, लुगडं स्वच्छ निघालं नै बगा '. परटीण मावशी "काय करू वैनी, पाणीच नै'. हे 'काय करू वैनी, पाणीच नै' आम्ही एकमेकांना नकला करून दाखवयचो. गांभीर्याने घ्यायचे वय नव्हते, रोजचेच वाटायचे.

असे शब्दात मांडता येणे - हे ब्लेसिंग असते.>>> हो, त्याशिवाय इतरांपर्यंत पोचवता आलं नसतं. Happy

धन्यवाद झकासराव आणि सामो. Happy
पाणी फाऊंडेशन व नाम फाऊंडेशन बद्दल मीही ऐकलेय.

मलाही डॉक्युमेंटरी अंगाने जाणारा नाही वाटला. प्रिची पण नाही वाटला. मनोरंजन करणारा आणि वास्तव दाखवणारा असाच आहे. डॉक्युमेंटरी म्हटलं की मला, ' हा पहा राजू. तंबाखू मुळे.... ' असलं काही डोळ्यापुढे येतं. Wink

"हा पहा अमित, तेच तीन शब्द घेऊन बसला आहे. चला, आपण याला मराठवाड्याचे 'पाणी' दाखवू" Proud
जमलं का? Wink

अस्मिता - फार सुंदर लिहीले आहेस. यातले काही अनुभव जवळून पाहिलेल्या/अनुभवलेल्या व्यक्तीने अस्सलपणाची पावती देणे म्हणजे परिक्षणात ५ स्टार देण्यासारखे आहे. पिक्चरमधे जे दाखवले त्याबद्दल लिहीताना तेथील परिस्थितीचे सुसंगत वर्णन आल्यामुळे तो आख्खा रिव्यू अतिशय वाचनीय झाला आहे. ती नंतरची पोस्टही भारी आहे.

माधव यांची पोस्टही आवडली.

मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्ष्याबद्दल ऐकले आहे. मी पुण्याजवळच्या खेड्यांत अधूनमधून राहिलो आहे. तेथे काही ठिकाणी पुण्याच्या मानाने पाणी बरेच कमी असे. पण तेथे "पाणी कमी आहे" म्हणजे जे चित्र बघितले आहे त्यापेक्षा हे बरेच भीषण आहे.

हा पहा अमित, तेच तीन शब्द घेऊन बसला आहे. चला, आपण याला मराठवाड्याचे 'पाणी' दाखवू >>> Lol

एखादा चित्रपट, पुस्तक स्थानिकांना अस्सल वाटणे ही एक सर्वोच्च पावती असावी. नाहीतर लोक काहीतरी सुपरफिशियल बनवतात, ज्यांना स्थानिक परिस्थितीचे आकलन नसते त्यांना धक्का बसल्यासारखे काहीतरी दिसल्याने ते चित्रण लांबून पाहताना भारी वाटते पण स्थानिक लोकांना त्यातील फोलपणा लगेच दिसतो.

सुंदर लिहिलं आहेस, अस्मिता. इथला रेको वाचून सिनेमा पाहिला आणि आवडला. Happy
(असं क्वचितच होतं. Proud )
अगदी तीटच लावायची तर त्याच्या ‘मोहिमेची’ सुरुवात बायकांच्या बचत गटापासून होते तो प्रसंग आणखी इफेक्टिव व्हायला हवा होता असं वाटलं, जरा सिंप्लिस्टिक आहे तो.
पण बाकी सुंदर! ती मुलगीपण गोड आहे एकदम.

वर उल्लेख आल्याप्रमाणे लहान लहान दृश्यांतून ते दुर्भिक्ष, ती हतबलता, डोळ्यांवर आणि मनावर घाव घालत जाते. किशोर कदमच्या पात्राला शाल श्रीफळ देण्याचा प्रसंग मजेशीर आहे.

मलाही आदिनाथ कोठारे ठोकळा वाटायचा, पण या सिनेमात लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, गीतलेखन असं बरंच काही त्याचं आहे - अगदी मनापासून काढला आहे सिनेमा. हॅट्स ऑफ!

>>> हा पहा अमित, तेच तीन शब्द घेऊन बसला आहे. चला, आपण याला मराठवाड्याचे 'पाणी' दाखवू
Lol

>>> एखादा चित्रपट, पुस्तक स्थानिकांना अस्सल वाटणे ही एक सर्वोच्च पावती असावी

अगदी! Happy

आदिनाथने माझा छकुला मध्ये बालकलाकार म्हणून चांगले काम केले होते. म्हणजे अभिनयाची समज होती त्याला लहानपणापासून. पण बरेचदा नंतर साजेश्या भूमिका मिळत नाही, ना हिरो बनले जाते ना सपोरटींग चरित्र अभिनेता, यात नेमकी वाट सापडत नाही. हिंदीत कुणाल खेमू या बालकलाकाराचे पुढे असेच झाले.

आदिनाथने माझा छकुला मध्ये बालकलाकार म्हणून चांगले काम केले होते. म्हणजे अभिनयाची समज होती त्याला लहानपणापासून. पण बरेचदा नंतर साजेश्या भूमिका मिळत नाही, ना हिरो बनले जाते ना सपोरटींग चरित्र अभिनेता, यात नेमकी वाट सापडत नाही. हिंदीत कुणाल खेमू या बालकलाकाराचे पुढे असेच झाले.

Pages