घाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं कि कोकण आपले रूप दाखवू लागतं. गर्द हिरवाइतून वळणे घेत जाणारा रस्ता , मधूनच डावीकडे आणि उजवीकडे दिसणार्या डोंगर आणि दर्या.. आणि रंग फक्त दोनच. धरित्रीचा हिरवा आणि आकाषाचा निळा.. आणि हो.. मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खूष आहे इथला कि , तुम्ही कॅमेरा कसाही कुठेही धरून क्लिक करा , येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल.
मधून येणार्या वस्त्या या कॅनवासला आणखीनच चित्रमय करतात. ती तिरकी तांबडी कौलारं , रेखीव खिडक्या , सदाफुली-जास्वंदी आणि इतर रानफुलांच्या वेली धारण केलेली घरांची कुंपणे . त्यातून आकाशाकडे झेपावलेले ताड - माड ! मधूनच धुराड्यातून येणारा हलकासा धूर - मनुष्याच्या अस्तित्वाची चाहूल देणारा.. कानावर येत असतात शांततेला साद घालणारे टिटवी आणि इतर अद्रुष्य पक्ष्यांचे आवाज. मधूनच उमटणारी कोकिळेची हूल.
आपण गाडीच्या खिडकीत बसून अर्धवट झोपेत हे सारं पहात पहात रमून जावं . स्वतःलाही भ्रम पडावा कि हे सत्य का स्वप्न !
एखाद्या टपरीवर थांबावं चहा घेण्यासाठी.. गाडी बंद झाल्यावर त्या शांततेचा नव्याने सुखद अनुभव घ्यावा. भाग्य असेल तर पानग्या खाव्या , तांदळाच्या पापडाच्या साथीने.
परत निघावे निवांतपणाचा अनुभव घेत.
हा निसर्गाशी जुळलेला प्रवास संपूच नये असे वाटत असताना अचानक दूर क्षितिजावर दर्शन घडते ... जो पाहण्यासाठी डोळे व्याकुळलेले असतात , आतुरतेने वाट पाहिलेली असते मागच्या वेळच्या भेटीपासून आतापर्यंत.. तो समुद्र.. तो मधून मधून दूर दिसत रहातो. मधेच एखादा डोंगर आडवा येतो.. परत वाट पहाणे , हे चालू रहाते.
अखेरीस मुक्कामाला पोहोचल्यावर सामान वगैरे बघत न बसता गाडीतून उतरावे आणि थेट समुद्र किनार्यावर जावे.. त्याला कडकडून भेटावे.. वाळूत फिरावे , लाटांमधे शिरावे.. दूरवरपर्यंत त्याचे पसरलेले अस्तित्व त्याच्या आवाजासकट पिऊन घ्यावे. शांत झाल्यावर मग हळूच घरात यावे.
इथून पुढे खरी मैफिल सुरू होते.
लोणचे , बिरड्या , वरण - भात , मोदक असे अस्सल कोकणी जेवण सकाळ संध्याकाळी मनमुराद ताव मारून घ्यावे. हे जर चुलीवर शिजवलेले असेल तर आणखीनच रुचकर. जेवायला बसावे अशा जागी कि खाली सारवलेले अंगण आहे , आजुबाजुला फुलांची रोपे आहेत , कुंपणाच्या पलिकडे गेलेला वळणावळणाचा तांबड्या मातीचा पायवाट वजा रस्ता आहे. तिकडून मधूनच एखदी गाय चालली आहे . मार्च - एप्रिल महिना अस्लेल तर सुपारीच्या फुलाचा दरवळ आसमंतात विखुरलेला आहे.
शेजारी आंब्याची कलमे असलेली मोठी बाग आहे. डिसेंबर जानेवारी असेल तर आंब्याच्या मोहोराचा घमघमाट आहे.
जेवल्यावर तिथेच चटईवर ताणून द्यावी. अगदी उन्हे कलेपर्यंत.. मग मात्र झटकन उठून गुळाचा अर्धा कप चहा घ्यावा आणि परत जावे समुद्रावर. कललेली उन्हे अंगावर घेउन वाळूत बसावे. त्या क्षितिजापलिकडे असलेला किनारा कसा असेल याचे कुतुहल अनुभवावे. मावळणार्या सूर्याला पहात रहावे.
तो अस्ताला गेला कि ओलसरलेल्या वाळूतून चालत निघावे. कर्द्यातून निघालात तर आकाशात चांदण्या उमटेपर्यंत मुरूडला पोहोचावे. बरोबर समुद्र , लाटा , आप्त - मित्र , गप्पा , पार्श्वसंगीतात मदन मोहन , गुलाम अलि , जगजित-चित्रा असे काहितरि असावे.
मग तिथेच जेवण घ्यावे आणि परत चालत मुक्कामाला पोहोचावे.
मग इतर दिवसांसाठी कार्यक्रम आखावेत. सकाळी न्यहारी करून निघावे आणि ठरवलेला प्रवास करून संध्याकाळी याच किंवा नव्या मुक्कामी पोहोचावे.
आमची नेहमी जाण्याची ठिकाणे म्हणजे कोळिसरेला लक्ष्मीकेशव दर्शन , मग पुळे गणपती दर्शन , मालगुंडला मुक्काम .
दुसर्या दिवशी जयगड ते बोटीतून तवसाल , पुढे हेदवी - वेळणेश्वर करून गुहागरला मुक्काम.
गुहागर - वेलदूर - दाभोळ - दापोली मुक्काम.
किंवा दिवे अगार - श्रीवर्धन - हरिहरेश्वर....असा समुद्राकाठचा अविस्मरणीय प्रवास.
कधीतरी कुणकेश्वर - सिधुदुर्ग - तारकरली..हा प्रदेश.
मे महिन्यात गेलात तर मग काही विचारूच नये, आंबे - फणस , जांभळे , ताडगोळे , करवंद , जाम आणि काय काय. खूप चाखूनही “अत्रुप्त” रहावे.
आमचे मित्र प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक दर वर्षी या दिवसात कोकणात चित्रकारितेचे वर्ग घेतात. कधीतरी त्यात सहभागी व्हावे म्हणजे हे सारे सौंदर्य त्याहीपेक्षा आणखीनच खुलून येते त्यांच्या हातातून कॅनवास वर , ते पाहणे हाही एक मोठा सोहळा बनून येतो, रंगीत बावटे ल्यालेली शिडे , होड्या - बोटी , वार्यावर फडकणारी माशांची जाळी , वारा , समुद्र आणि त्यावर उमटणारी बिरंगी माणसे. हे सारे चित्र , चित्रात आणि प्रत्यक्षात आजूबाजूला प्रकट होत रहातात. त्यात तहान - भूक विसरून हरवून जाणे हा ही एक आनंदाचा भाग होतो.
या निसर्गा बरोबर त्याची मनमोहक रूपे टिपण्यासाठी दिवसभर भटकणे पेक्षा भरकटणे हीच खरी इच्छा बाळगून दर वर्षी आम्ही कोकणात जातोच जातो.
प्रथम कोकणात गेलो होतो तेव्हा समुद्र हा सतत आपल्या जवळ आहे ही कल्पनाच फार आनंददायी होती. दिवसच्या विविध प्रहरात समुद्राचे वेगवेगेळे रूप पाहून घ्यावे. पहाटे तो म्हणतो हा पहा आला सूर्य माझ्या सोबतीला , माझा दिवसाचा सांगाती. दुपारी तो या सूर्याचे तेज सामावून घेत रहातो जणू... सहस्त्र लाटामधे ! संध्याकाळी श्रांत होउन सूर्याला निरोप देतो ... आणि रात्री किनार्यावरच्या हिरव्या धरतीशी गूज करण्यात रमतो. आणि घराघरातल्या जीवांच्या पाठीवर लाटांच्या हातांनी थोपटत रहातो..
चंद्रकिरण रात्रीच्या शांततेला मुलायम शीतल शालीत लपेटून घेतात.
हे सारं अनुभवायचं असेल तर त्यासाठी पौर्णिमेच्या आसपास एखाद्या रात्री सवंगड्यांबरोबर रात्रीच्या जेवणानंतर गप्पा मारत निघाव , किनार्यावरून चालत ; आणि मग पोहोचावं छोट्याशा टेकाडावर. माडांच्या झावळ्यातून डोकावणार्या चंद्राला साथीला घेउन . आणि मग झाडाझुडुपातून अचानक समोर ठाकतो नजरेच्याही पलिकडेपर्यंत पसरलेला अथांग समुद्र... त्याचा आवाज थोडा हळुवार येत असतो. धूसर किनार्यावर पोहोचणार्या लाटांचा शुभ्र कडा सतत नवी नक्षी कोरत असतात आणि अंधारात विरून जातात. आपल्या मनातही आठवणींची अशीच लपाछपी सुरू होते. समुद्रावरून येणार्या हलक्याशा वार्याच्या झुळुकी कानात एखादे जुने गाणे गुणगुणत रहातात.
कोकणचा मुक्काम संपवून त्रुप्त होउन परत फिरावे. सामानाबरोबर सुगंध - रंग - सारे भरून घ्यावे . छोटेखानी घाट चढून माथ्यावर आलो कि समुद्राचे - ताडामाडांचे दर्शन साठवून घेण्यासाठी थांबावे कडेला क्षणभर. निरोप घेण्यासाठी , लवकरात लवकर परत येण्याचा मनसुबा मनात धरून !
मला कधी बघायला मिळेल कोकण....
मला कधी बघायला मिळेल कोकण.... खुप ईच्छा आहे
तुम्ही जितक्या लवकर ठरवाल
तुम्ही जितक्या लवकर ठरवाल तेव्हा !
वाह! हा ही भाग सुंदर.
वाह! हा ही भाग सुंदर.
हिच्या घोवाला कोकण दाखवा...
हिच्या घोवाला कोकण दाखवा... हे माझं आवडतं गीत आहे. कोकणी माणूस खूप अगत्यशील व भोळा भाबडा आहे. देशावरच्या पेक्षा कोकणात स्वस्ताई आहे. आताशा व्यापारी वृत्तीच्या लोकांनी कोकणात शिरकाव केला आहे. पुणेकर माणसापेक्षा कोकणी माणूस परखड, तत्त्वाला चिकटून राहणारा आहे. पुणेकर कोकणी माणसाच्या समोर खुजा आहे.
जर का तुमच्या लहानपणी मामा
जर का तुमच्या लहानपणी मामा,मावश्या ,आजीआजोबा नसतील तिकडे कोकणात तर शाळेच्या सुटीत जाऊन उंडारायचं हुकतंच. ते काही पुन्हा मिळत नाही.
मोठेपणी कुठे हाटेलात राहून दोनचार दिवसांत कोकण 'करणे' आणि 'ते' वेगळेच.
*आजीआजोबा नसतील तिकडे कोकणात
*आजीआजोबा नसतील तिकडे कोकणात तर शाळेच्या सुटीत जाऊन उंडारायचं हुकतंच. * +1 . आणि ज्यांचं हें हुकलं नाहीं, त्याना आयुष्यभरची शिदोरीच मिळाली !!
जळला, माझा जीव जळला.
जळला, माझा जीव जळला. अलीबाग, दापोली पाहुन पोट भरलेले नाहीच. नंदनवन खुणावतेय.
पशुपत, मस्त लिहीलय.
<<जर का तुमच्या लहानपणी मामा
<<जर का तुमच्या लहानपणी मामा,मावश्या ,आजीआजोबा नसतील तिकडे कोकणात तर शाळेच्या सुटीत जाऊन उंडारायचं हुकतंच. ते काही पुन्हा मिळत नाही.
Submitted by Srd on 25 January, 2020 - 14:06>>
लहानपणी उंडारायचा आनंद आम्ही पुण्यातील उत्तम ठिकाणांवर भरपूर घेतला...पर्वती टेकडी , हनुमान - वेताळ टेकडी, सारस बाग , पेशवे उद्यान. १९८०-९० च्या काळात पुण्यातही निसर्ग भरपूर रमणीय होता. पण त्या वयात आनंद वेगळ्या गोष्टींमधे वाटतो.
कोकणचे सौंदर्य कळायचे ते वय नव्हे.. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
हरिहर , रश्मी ... धन्यवाद
हरिहर , रश्मी ... धन्यवाद
राजदीप - तुमचा तसा द्रुष्टीकोन असेल कदाचित
भाउ , srd : तुमचे असे कोणी नातेवाइक आहेत का कोकणात ?
पशुपत लॅन्डस्केप मुळीक सरांचे
ओह, सॉरी. शेवटचे चित्र पाहीले नाही त्यामुळे मुळीकसरांविषयी विचारले.
दोन्हीही चित्रे अगदी खासच!
*असे कोणी नातेवाइक आहेत का
*असे कोणी नातेवाइक आहेत का कोकणात ? * - आमचं घर व आजोळ दोन्ही सिंधुदुर्गात.
*कोकणचे सौंदर्य कळायचे ते वय नव्हे.. * - खरंय. त्या वयात निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकण्याचं स्वातंत्र्य , हेंच खरं सुख . ठीकाण दुय्यम .
कोणी नातेवाइक आहेत का कोकणात
कोणी नातेवाइक आहेत का कोकणात ?
नव्हते लहानपणी. पण आता श्रीवर्धन, रेवदंडा, चौल'ला आहेत. मित्रांच्या घरी कुडाळ - वालावल, रत्नागिरी -मालगुंड ,शिरगाव केळशीला जाऊन आलो. उंडारायच्या वयात मामाकडे तासगाव (सांगली जिल्हा).
-----
मुलगी अडीच वर्षांची असताना रायगड अधिक गुहागरला गेलेलो. तिथे रस्त्यात चालताना मांजराचे पिलु दिसले. त्याला धरायला त्याच्या मागे धावत जवळच्याच घरात पार स्वयंपाक घरात गेली. ते लोक बघायला बाहेर आले कोण म्हणून. त्यांनी बसवून घेतले. दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी ' रामफळं मिळतील ' पाटी पाहून विचारलं. त्यांनी विचारपूस करून सर्व घर दाखवलं. आजोबा आजी होते. " आता पारल्याला मुलाकडे असतो. इथे सुटीत येतो. मातीचं कौलारू घर मुद्दामहून तसंच राखलंय." देव्हारा आणि त्यातले टाक ( देवांच्या मूर्ती) दाखवल्या. वाडी दाखवली. मुलीला गुहागर फारच आवडलं. कोकण प्रथमच पाहात होती. तिच्या आनंदात आम्हालाही कोकण अनुभवता आलं.
कोकणात जन्म झाला आणि कोकणात
कोकणात जन्म झाला आणि कोकणात बरंचसं आयुष्य गेलं त्यामुळे खरंच स्वतःला नशीबवान समजते
कोकण पश्चिम महाराष्ट्राला
कोकण पश्चिम महाराष्ट्राला अगदी लागून आहे, पश्चिम महाराष्ट्रात माझा जन्म झाला याचा मला अभिमान वाटतो, कोकण महाराष्ट्र राज्यात आहे हे माझं भाग्य!
खरंय. नागपुरकर, वर्धा,
खरंय. नागपुरकर, वर्धा, खानदेशकडच्या लोकांना खूपच दूर पडतो किनारा. जळगावचे लोक सुरतला गेले तरी गुजरातचा किनारा आणि कोकण किनारा यात खूप फरक आहे. कोकण आणि कर्नाटक किनारा सारखा आहे.
धागा आठवला ....
....
प्रथम कोकणात गेलो होतो तेव्हा
प्रथम कोकणात गेलो होतो तेव्हा समुद्र हा सतत आपल्या जवळ आहे ही कल्पनाच फार आनंददायी होती. >>+ ९९९९
अगदी खरंय ! खूप छान लेख ! कोंकण आणि कोंकणातील माणसे ह्यांना तोड़ नाही !!
फोटो मात्र दिसत नाहीयेत , फोटो असतील तर अजून मजा येईल
व्वा व्वा छान लिहिलंय ! येवा
व्वा व्वा छान लिहिलंय ! येवा येवा कोकण आपलोच आसा