Drawing by Hana Kruzikova
दर सुट्टीत भारतातून निघतेवेळी आजी आईला बाजूला घेऊन दबल्या आवाजात आमच्याबद्दल काहीतरी सांगत असे. मीही मुद्दाम कारण काढून तिथेच घुटमळत रहायचे. तीन-चार वर्ष त्या बोलण्यात “अडनिडं वय”, “जपायला हवं” असं काहीसं ऐकू यायचं. अडनिडं. इतका तिटकारा होता मला त्या शब्दाचा... अवघडल्यासारखं व्हायचं स्वत:च्या बाबतीत असं काहीतरी ऐकून. “माझ्याबद्दल बोलू नकोस. आजार नाहीये मला कुठला. जपायला का सांगत्येस?” असं म्हणून मी वैतागून खोलीतून बाहेर निघून जायचे.
अडनिडं म्हणजे काय हे निश्चित ठाऊक नसलं तरी ते काहीतरी विचित्र आहे हे जाणवत होतं. आठवी संपताना मराठीच्या बाईंनी बालभारतीची पुस्तकं संपल्याचं जाहीर केलं तेव्हाही असंच विचित्र वाटलं होतं. नववीपासून कुमारभारती सुरू होणार होतं म्हणे. का, तर आम्ही आता बाल नसू. समजत्या वयातली मुलं असू पण अजून जग न पाहिलेली असू. जसं आमचं मन या स्थित्यंतरातून जात असेल तसं शरीरही जात असेल म्हणे (शी! वर्गात सगळ्यांसमोर काहीही काय सांगत होत्या बाई? हेही वाटून गेलंच). “ना धड लहान, ना धड मोठे”. बाई त्याला कुमारवय म्हणायच्या आणि आजी अडनिडं. पण ते दोन्ही एकच. विचित्र वाटायला लावणारं. आपल्या अस्तित्त्वाचा भलताच गिअर पडलाय अशी काहीतरी जाणीव करून देणारं. तेव्हा चीड आणणारं, पण ते तंतोतंत खरं होतं हे आज कबूल करायला लावणारं.
तर अशा त्या अडनिड्या वयात, चौदा पुरी व्हायच्या चार महिने आधी मी ठाण्याहून लंडनला आले. माझा भाऊ विवस्वान अकरा वर्षांचा होता. किमान पाचवीपर्यंत दोघांचं शिक्षण मराठीतच व्हायला हवं म्हणून त्याआधीची तीन वर्ष आई लंडनला एकटी राहिली; आई-बाबा ये-जा करून एकमेकांना भेटायचे; आम्ही दर आठावड्यात आईशी बोलायचो आणि दरमहा एकदा आईची आठवण साचून धाय मोकलून रडणं वगळता आम्हा भावंडांचं उत्तम चाललं होतं. आम्ही आमच्या प्रेमाच्या माणसांत असल्याने आणि लवचिक मनाच्या वयाचे असल्याने आम्हाला भ्रांत म्हणावी अशी काही नव्हती. दर आठ दिवसांनी फोनवर बोलताना माझ्या वयातला आणि वागण्या-बोलण्यातला, पायरी-पायरीने माझ्या आवडीनिवडीतला, आणि आमच्या विषयांतला फरक आईला मात्र हमखास जाणवत असणार.
मी वह्यांना कव्हरं घालणं थांबवलं. हेअरबँडचे काळे-पांढरे रंग जाऊन कानातल्यांना मॅचिंग असलेल्या हेअरबँडची मागणी व्हायला लागली. आईला वर्गातल्या गमती सांगताना ठकी, सखी, सोनी आणि चंपीच्या नावांबरोबर एखादा गोट्या नि एखादा सदू अवतरायला लागला. जिभेची गाडी “गधडा”, “नालायक” आणि “च्यायला” स्टेशनं ओलांडून पुढे जायला लागली. तोंड पसरून असलेलं हसू जरा बुजरं झालं आणि भोकाड पसरून रडणं टिपं गाळण्यात बदललं. कधी कसलं वाईट वाटेल, कधी कसला राग येईल, कधी अचानक लाजच वाटेल नि कधी निर्लज्जपणाची तल्लफ येईल याला कणाचं म्हणून लॉजिक उरलं नाही. पूर्वी हातात पडेल ते वाचून व्हायचं, आता लेखक अवडते-नावडते झाले. पूर्वी सगळ्या वर्गांतल्या सगळ्यांशी मिळून-मिसळून वागणं फॅशनेबल होतं, आता शाळेत आपली ओळख हवी म्हणजे ८–१० जणांच्या गटात असणं गरजेचं झालं. कथकसाठी तयार करून घेतलेल्या पोशाखात मी त्या अमकीसारखी छान दिसत नाही म्हणून नाच सोडून द्यायचं खूळही डोक्यात आलं मधूनच. बाहुल्या बाजूला पडल्या आणि रातोरात कबड्डी महत्त्वाची झाली. चार जण जातात म्हणून त्यांच्यासारखा गणिताच्या क्लासला जायचा हट्ट झाला आणि चार जण इंग्लिश शिकतायत तर त्यांच्यासारखंच कशाला, मला वेगळं शिकायचंय, म्हणून फ्रेंचचं पुस्तक मागवून घेतलं. भांडणांचे विषय बदलले. रुसवे-फुगवे अंमळ जास्तच टिकायला लागले. पोहायला जायचं तर आता मला तारखा बघून जाणं भाग पडायला लागलं. नकाशावही विसरली तरी चालेल, पण त्या तमकीसारखं एक राखीव सॅनिटरी पॅड दप्तरात ठेवायचं विसरायला नको असं वाटायला लागलं. अडनिड्या वयातला आलेख अपेक्षित वाटेने चालला होता. त्या खडबडीत रेशेवर तीन वर्षांनी गाडी रुळणार इतक्यात ठाण्यातून गाशा गुंडाळून आम्ही थेट लंडनला! सरस्वती सेकंडरी आठवी अ मधून Blackfen School for Girlsमध्ये इयत्ता दहावी तुकडी फ.
मुलामुलींना ठाण्याच्या शाळेत पहिलीपासून वेगळं बसवायचे. सहावी-सातवीपासून तर आपापसात बोलायचीही खोटी, लगेच चिडवाचिडवी सुरू व्हायची. हे सगळं मला त्या वयातही विचित्र वाटायचं, आणि इंग्लंडमध्ये तर मला कन्याशाळेत प्रवेश मिळाला होता! इतकं uncool जगात काही नसेल असं वाटून मी मनातल्या मनात आकांडतांडव केला. पण कन्याशाळेत असूनही मुलांशी बोलणं बरं चालायचं की त्या मुलींचं!
गुडघ्यापर्यंत असलेल्या स्कर्टची पुंगळी करत करत शाळा सुटल्यावर तो मांड्यांवरूनही वर घेत मुली बसस्टॉपवर जायच्या. लिप बाम, फाउंडेशन, सोनेरी पापण्यांना करडा मस्कारा आणि ऋषीमुनींसारखे केसांचे उंचच उंच अंबाडे. मग जवळच्या boys’ schoolची मुलंही यायची. कधी नुसत्याच गप्पा, कधी एकमेकांच्या मांडीवर बसून थोड्या पाप्या वगैरे, कधी हातात हात घेऊन घरी जाणं आणि कधीतरी, म्हणजे एकीचा बॉयफ्रेंड दुसरीला आवडायला लागला की, खडाजंगी. यातल्या एका कशावर आक्षेप घ्यावा असं नव्हतं. फक्त ते एकूण वागणंबोलणं मला माहित असलेल्या ‘व्यक्त’ होण्यापेक्षा वेगळंच होतं. आपण त्यात कुठे बसतो असं वाटलं नाही आणि बसावंसं त्याहून वाटलं नाही. शेजारच्या फळकुटावर बसून दुपारचा डबा खायचा आणि त्या लीलांमधून कोणाला वेळ मिळाला तर त्यांना गणितं सोडवायला मदत करायची एवढीच माझी भूमिका.
मीही काही धुतल्या तांदुळासारखी नव्हते. माझ्या वयाला साजेशी शिंग मला फुटलेली होती. आठवीत शाळेतल्या ज्या ‘क्ष’ मुलीला एका ‘ढ’ मुलावरून चिडवायचे तिचा शर्ट बगलेत उसवला तेव्हा मी “तुझ्याच मंगळसूत्राला सेफ्टी पिन असेल ती घे” असा जोक मारून गडगडाटी लाफ्टर मिळवला होता. आपण अगदीच ‘हे’ जोक मारल्याच्या आनंदात होते मी त्यादिवशी. पण इंग्लंडला कसलं आलंय चिडवणं? जे काही होतं ते अगदी डोळ्यासमोर घडत होतं. माझ्या मैत्रिणी सुट्टीसाठी बॉयफ्रेंडच्या आईवडिलांबरोबर परदेशीही जाऊन आल्या होत्या.
इकडे शाळेत स्नेहसंमेलनाच्या गाण्यात “साजणा” शब्द आलाय असा गैरसमज झाल्याने आमच्या वर्गाने गाणं बदलावं असा तगादा लावला होता शिक्षकांनी. तिकडे बाई आमच्या दहावीच्या वर्गाला रोमिओ-ज्युलिएटवर आधारित एकविसाव्या शतकातला रोमँटिक सीन लिहायला शिकवत होत्या.
इकडे व्हिस्परवाले सॅनिटरी पॅड आणि एकूणच मासिक पाळीबद्दल सांगायला ठाण्याच्या शाळेत आले होते तेव्हा सबंध वर्गात केवढी खसखस पिकली होती. त्यानंतर मोजून सहा महिन्यांत इंग्लंडच्या शाळेतल्या Life Skills या विषयाच्या वर्गात प्रत्येक बाकावर एका लिंगाची लाकडी प्रतिकृती ठेवलेली होती त्याला सगळ्यांनी काँडोम घालून दाखवायचा होता. वरखर्चाचे पैसे कमावण्यासाठी बऱ्याच मुली लहान मुलांना सांभाळत असंत. त्यांना सवय व्हावी म्हणून पुढच्या आठवड्यात बाळांना बांधायची, टोपरं घालायची शिकवण Life Skills मध्ये चालू होती. वर्गातल्या मुली बाईंना म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात आम्ही काँडोम एकदम व्यवस्थित चढवला होता लाकडावर, त्यामुळे बाळा-बिळांना टोपरं घालायची वेळ यायचीच नाही आमच्यावर!”
परीक्षा झाल्यावर एक दिवस माझी मैत्रीण एमिली घरी आली. शांत-शांत होती. आम्ही मुलींनी चौकशी केली तर म्हणाली, “अर्निका, काय तोडगा काढायचा यावर? काल मी आणि निक ने पहिल्यांदा सेक्स करून पाहिला. सगळं झाल्यावर तो म्हणाला की काय हे? यासाठी मी माझी आवडती सीरिअल चुकवली?”
आता मी तरी काय तोडगा सांगणार (दहावीत सेक्स करून झाला याबद्दल आश्चर्य वाटायला वेळच नव्हता मला; इकडे थेट तोडगा सुचवायचा होता). प्रयोगवही, अडलेले शब्द, मित्रांशी भांडणं, चिडवाचिडवीकडे दुर्लक्ष करणं हे सगळे माझे विषय आहेत. सेक्स म्हणजे काय ते अलिकडेच समजलंय आणि त्यात काय चूक आणि काय बरोबर हे मी एमिलीला काय सांगणार? पण ते कोडं आपोआप उकललं म्हणे त्यांना दोन महिन्यांत. खोकला गेला बरं झालं. सुंठ कुठून आणणार होते मी?!
सावकाश बोललं की मला इंग्लिश समजतं असं कळल्यावर एकदा शाळेतल्या चार भक्कम मुली माझ्याभोवती बसून गप्पा मारायला लागल्या. बसस्टॉपवरचा कुठला मुलगा मला सगळ्यात हॉट वाटतो? माझ्या भारतातल्या बॉयफ्रेंडची मला आठवण येते का? भारतातली शाळा कन्याशाळा नव्हती तर मग मी आणि माझा बॉयफ्रेंड भुगोलाच्या तासाला टेबलाखाली हातात हात घेऊन बसायचो का? प्रेम अनावर होऊन मी किती मुलांच्या ‘प्रदीर्घ पाप्या’ घेतल्या आहेत? महिला मंडळीला खूप प्रश्न होते. माझी सगळीच उत्तरं त्यांना निरस आणि निराशाजनक वाटली. दुसऱ्या दिवशी पोरींनी मधल्या सुट्टीत माझ्याबरोबर डबा खायचं थांबवलं. ब्याद टळली, पण ती दोन दिवसासाठीच! अर्निकाने वयाच्या उभ्या-आडव्या चौदा वर्षांत कुठल्याच मुलाचा हात धरून प्रदीर्घ पापी घेतलेली नसल्यामुळे ती लेस्बियन आहे असं पसरलं शाळेत! ठाण्याच्या शाळेत कुठल्या मुलावरून चिडवलं तर कसं आमच्यात काहीच नाहीये हे सिद्ध करताना नाकी नऊ यायचे; इकडे कोणीच बॉयफ्रेंड झालेला नव्हता म्हणून मला लेस्बियन आहेस का विचारायला लागले.
मी अज्ञानात सुखी असलेली शूरवीर! मला वाटायचं यांचा भूगोल आणि इंग्लिश दोन्ही कच्चं असल्यामुळे या पोरींना मी लेबनीज़ मुलगी वाटत्ये आणि त्या चुकून लेबनीज़ऐवजी लेस्बियन म्हणतायत. त्या सगळ्यांना मी अजिबात न डगमगता “No, I’m not a lesbian. I’m an Indian” असं सांगायचे. बिचाऱ्या उत्तर ऐकून इतक्या गोंधळात पडायच्या की पुढे काही बोलायला सुचायचंच नाही त्यांना. त्यांच्या गॉसिपमधला सगळा दंशच निघून गेला. त्यांना काय म्हणायचंय मला कळेना आणि मी काय अर्थ काढलाय ते त्यांना कळेना. “I’m not a lesbian. I’m an Indian” असं ऐकायला बसस्टॉपवर तीन तीन शाळांची पोरं गोळा व्हायला लागली. मीसुद्धा “मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफलं उचलणार नाही”च्या टोनमध्ये खणखणीत आवाजात माझी विनिंग लाईन सादर करायला लागले.
दोन महिने सुखात गेले. सप्टेंबरमध्ये Religious Education विषयाच्या घरच्या अभ्यासात बाईंनी निबंध लिहून आणायला सांगितला. Religion and homosexuality. एव्हाना अर्निकाताईंचा आत्मविश्वास काहीच्याकाही बळावलेला होता. आपल्याला यातलं सगळं समजलंय हे गृहित धरून मला फरड्या वाटणाऱ्या इंग्लिशमध्ये मी पानभर निबंध लिहिला. कठीण काही नव्हतंच म्हणा त्यात! मी लिहिलं, homosexuals म्हणजे people who have sex at home. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, सगळ्यांचे देव आणि धर्मगुरू आपापल्या अनुयायांना पोरं जन्माला घालायला सांगतात, मग त्यासाठी आवश्यक कृती घरातच केलेली बरी. त्यामुळे सगळ्या धर्मांना homosexuality मान्य आहे. विषय संपला.
काल आपण पानभर इंग्लिश कोणाच्याही मदतीशिवाय लिहिलं या आनंदात मी सकाळी उठून चार घास जास्त खाल्ले. शाळेत जाऊन पुस्तक उघडलं आणि माझ्या निबंधातली स्पेलिंगं तपासायला लागले, तर पुस्तकात homosexualityच्या धड्यात दोन पुरुष एकमेकांच्या मिठीत दाखवले होते. ही व्याहीभेट जरा जास्तच जवळची वाटत्ये म्हणून मी धडा वाचायला घेतला (हे जरा आधीच करायला हवं होतं, नै?) आणि दोन परिच्छेदात homosexuality म्हणजे काय ते समजल्यावर मी वर्गात रडायलाच लागले. दोन महिन्यांपूर्वी आपण लेस्बियन असल्याची बातमी पसरल्याचं आठवून; जगात असं काहीतरी असतं आणि आपल्याला ते आजवर माहितीच नव्हतं म्हणून; या शाळेत, या भाषेत आपल्याला कधीच काहीच करायला जमणार नाही या भावनेने; आणि निबंध साफ चुकला म्हणूनही. दहा-पंधरा मिनिटं झाली तरी रडू थांबेना. बाईंनी निबंध अजून गोळा केले नव्हते. मी मुदत वाढवून मागितली आणि माझा एकंदर अवतार बघून त्यांनी ती दिलीसुद्धा. तसंच रडकं तोंड घेऊन मी इंग्लिशच्या वर्गात गेले. नक्की काय झालं ते कोणालाच समजलं नव्हतं. इंग्लिशच्या मिसेस नोबलनी बाकी वर्गाला नाटकातला प्रवेश वाचायला सांगत मला वर्गाबाहेर नेलं आणि प्रेमाने विचारपूस केली. त्यांनी गोष्ट ऐकून फार प्रयत्नाने हसू दाबलं आणि आधी माझा निबंध वाचला. त्यातल्या इंग्लिशचं, माझ्या व्याकरणाचं कौतुक केलं. Disciples, forbidden अशा शब्दांचा योग्य वापर केल्याबद्दल मला शाबासकी दिली आणि म्हणाल्या, “The world would be a better place if it saw homosexuality with such innocence. And Arnika, you will be fine. Just you watch how wonderfully you do in life”.
तीन ओळी बारा हत्तींचं बळ देऊन गेल्या. जगातली सगळी कौतुकं एकीकडे आणि तोंडघाशी पडल्यावरही मिसेस नोबलनी दिलेली उभारी एकीकडे.
या अचानक बदललेल्या जगात आपण कोण? योग्य काय? मित्रमैत्रिणींच्या आणि आपल्या विचारात अंतर असलं तर ते चालेल की नाही? मुलं आवडली, त्यांचा सहवास आवडला तरी आपली धाव कुठपर्यंत? हे सगळं समजेपर्यंतची माझी वाढ माझ्या वयाच्या, माझ्यासारखे विचार असलेल्या मुलामुलींपासून खूप खूप लांब झाली. समवयस्क मित्रमैत्रिणींच्या सोबतीतला गारवा दुसरीकडे कुठे मिळणं शक्यच नव्हतं. ही सगळी मानसिकदृष्ट्या एकटं पाडणारी द्वंद्व होती, कारण “आपल्याकडे असं नसतं त्यामुळे आपण असे नसलो तरी चालेल” हे ठासून म्हणावं तर चार वर्षांत इकडचे मित्रमैत्रिणीही कुमारवय ओलांडून पुढे गेले होते...
जमेची बाजू म्हणजे घरची. आई-बाबा, मामा, मावशी या कोणाहीपाशी कुठलेही विषय बोलायला कधी मज्जाव नव्हता. बोलू शकत नाही म्हणून कोंडी झाली असं कधीच झालं नाही. काही गोष्टी घरी सांगाव्याशा वाटायच्या आणि काही नाही वाटायच्या. खरं तर शाळेतली भांडणं, प्रसंगी रडारड, एकटेपणा किंवा विचारांतला फरक हे मी आणि विवस्वानने आपापल्या परीने निस्तरलं; त्यासाठी आईबाबांनी शाळेचं फाटक कधी गाठलं नाही, पण आम्ही uncool किंवा चुकीचे नाही, फक्त वेगळे आहोत आणि बाकीच्यांना बोअरिंग वाटली तरी आमची वाटही तितकीच सुंदर आहे हा विश्वास द्यायला घरचे होते. पावलोपावली होते. ते सगळीकडे पुरे पडू शकत नाहीत याची त्यांना कायम जाण होती. आमचं प्रत्येक रडू, प्रत्येक चिडचिड, आमच्या जगातली प्रत्येक गोष्ट समजत असल्याचा आव त्यांनी कधीच आणला नाही. “आम्ही जसं तुम्हाला प्रोटेक्ट करतो तसं तुम्ही मुलंही जगातल्या अनेक गोष्टींपासून आम्हाला प्रोटेक्ट करत असता हे आम्हाला माहित्ये” असं मात्र आई नेहमी म्हणायची, आणि माझ्यासाठी ते त्यावेळी पुरेसं होतं.
माझ्या शाळेत झालं ते सगळ्या शाळांमध्ये होईल असं नाही, पण होणारच नाही याची खात्री देता येत नाही.
असल्या ‘अडनिड्या’ वयाची मुलं इंग्लंडमध्ये घेऊन आलेल्या आईबाबांना अशा सगळ्या गोष्टींबद्दल बरेच प्रश्न असतात. खुलून विचारणं त्यांना अप्रस्तुत वाटत असावं. मग त्याऐवजी ते “इकडे संस्कार नसतात ना?”, “तू कायकाय ट्राय केलंस?”, “मुलांनी डेटिंगचा विषय घरात आणू नये म्हणून काय करायचं?” असले आगोचर किंवा गंमतशीर प्रश्न विचारतात. अडनिड्या वयातलं हे त्रांगडं समजायला माझी मलाच इतकी वर्ष द्यावी लागली, तर मी अजून कोणाला काय सांगू? यावर सर्वव्यापी किंवा रामबाण काहीच उपाय नसावा. फक्त जिवाचा आटापिटा करणारच असाल तर तो मुलांनी अमुक एक विषय घरात आणू नये यासाठी नसू दे, आणावा म्हणून करा! बाकीचं सगळं ज्याचं त्यालाच शिकावं लागतं हेच खरं. आपापल्या खास आंबट चुका करत...
-अर्निका परांजपे.
“मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी
“मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी टरफलं उचलणार नाही”च्या टोनमध्ये खणखणीत आवाजात माझी विनिंग लाईन सादर>>>>>>>>>>>>> देवा!
खुप छान आणी प्रामाणिक लिहिलंय. आवडलं.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
लेख चांगला आहे.
लेख चांगला आहे.
> कारण “आपल्याकडे असं नसतं त्यामुळे आपण असे नसलो तरी चालेल” हे ठासून म्हणावं तर चार वर्षांत इकडचे मित्रमैत्रिणीही कुमारवय ओलांडून पुढे गेले होते... > आपल्याकडे अजूनही ५०% स्त्रियांची लग्न १८- वयाची असताना होतात. त्यामुळे लैंगिक सक्रिय होण्याचं वय स्त्रीसाठी तिकडच्याच जवळपास आहे म्हणलं तरी चालेल. फक्त ते स्वतः निवड करून नसते.
इकडचे मित्रमैत्रिणीही पुढे गेल्या होत्या म्हणताय म्हणजे आजकालची शहरातील, पांढरपेशा समाजातील, शिकणारी मुलंमुली १८+ च्या आसपास लैंगिक सक्रिय होत असावीत. शहरातील, अशिक्षीत आईवडलांची, शाळेत जाणारी मुलंदेखील नववी-दहावीत असताना कॉन्डोम विकत घ्यायला मेडिकलमधे जातात हे ऐकलं आहे.
मला तिकडेच जन्मलेल्या, वाढलेल्या भारतीय मुलांबद्दल जाणून घ्यायचंय. तीदेखील इतरांसारखी १०-१२ चे असताना किसींग, १४-१५ वयात सेक्स चालू करतात का? त्यांचे भारतात वाढलेले पालक याबद्दल ओके असतात का?
छान लेख. तुझी शैली ग्रेटच
छान लेख. तुझी शैली ग्रेटच नेहमी प्रमाणे.
अर्निका , तुझ प्रांंजळ लिखाण
अर्निका , तुझ प्रांंजळ लिखाण फार आवडतं
सुरुवातीचे स्केच सुरेख
सुरुवातीचे स्केच सुरेख
हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, सगळ्यांचे देव आणि धर्मगुरू आपापल्या अनुयायांना पोरं जन्माला घालायला सांगतात, मग त्यासाठी आवश्यक कृती घरातच केलेली बरी. >> खो खो हसले मी इंग्रजी शिकतांना कुणी 'सरनेम' विचारले की सांगायचे, 'आम्हांला सर नाही, बाई आहेत.'
I’m an Indian” >> किती निरागस
ह्या वयातले प्रश्न वेगळेच असतात, तुला तर वातावरण बदलामुळे अजून जास्त समस्या समोर आल्या.
सुंदर! नेहमीप्रमाणेच काळजाला
सुंदर! नेहमीप्रमाणेच काळजाला भिडणारं लिखाण. तू लिहिलेल्या बर्याच गोष्टी वाचताना 'अगदी अगदी' असं होतं. पण ते इतक्या वेळा होण्याचं कारण कदाचित हे असावं, की त्या तरल भावना आणि क्षण शब्दात व्यक्त करणं आत्तापर्यंत मला जमलं नाही, पण तुझी मात्र ती हातोटी आहे. त्यामुळे ते वाचताना, 'अरे हो! अगदी अस्संच वाटलं होतं खरं त्या वयात, किंवा अमुक एका प्रसंगी' हे ओठावर येतंच येतं. तुझ्या ह्या कौशल्याचं कौतुक आहे. आता लेखनशैली आणि ते कौशल्य या पलिकडे जाऊन तुझ्या अनुभवांमधून समृद्ध झालेलं तुझं विचारधनही अगदी सोप्या शब्दात मांडतेस, हे देखिल अफलातून आहे. लिहित रहा (ते मी कोण सांगणारा म्हणा!), आम्ही वाचत राहू.
प्रामाणिक मोकळंढाकळं लिखाण
प्रामाणिक मोकळंढाकळं लिखाण अतिशय आवडलं!
वरच्या सगळ्या प्रतिसादांना मम!
आठवी संपताना मराठीच्या बाईंनी
आठवी संपताना मराठीच्या बाईंनी बालभारतीची पुस्तकं संपल्याचं जाहीर केलं तेव्हाही असंच विचित्र वाटलं होतं. नववीपासून कुमारभारती सुरू होणार होतं म्हणे.>>>>>खुप छान
हाबंचा प्रतिसाद खूप आवडला.
हाबंचा प्रतिसाद खूप आवडला.
अगं अॅमी , "आपल्याकडे असं
अगं अॅमी , "आपल्याकडे असं नसतं" ही माझी १३ वर्षांतली ठाण्याच्या शाळेतली समजूत होती. माझ्या आसपास मी खरोखर यातलं काहीच बघितलं नव्हतं; या विषयांपर्यंत आम्ही वर्षा-दोन वर्षात पोचलो असतो यात वादच नाही, पण तेच सावकाश होणारं ट्रांझिशन मला मिळालं नाही. 'कुछ कुछ होता है' सारखी प्रेमाची संकल्पना माहित असताना भसकन ब्लू व्हॅलेंटाइन बघायला मिळाल्यासारखं झालं!
तिकडे जन्मलेल्या भारतीय मुलांबद्दल पुढे लिहितेच आहे, पण त्यांच्यात सरसकट अशी काही पद्धत आहे असं वाटलं नाही मला. कुठल्याही वयातला आपला पार्टनर आपापल्या धर्माचाच असावा हे मात्र पुष्कळ पाहिलं मी. शिवाय ते हे सगळं काही पालकांना सांगून करत नाहीतच!
हाब, तुम्ही म्हणालात तसं शाळेत लैंगिक शिक्षण देण्याचा हा प्रकार इंग्लंडला १९६०चं दशक संपता संपता सुरू झाल्या. जुजबी माहिती आधीही द्यायचे पण साठचं दशक संपता संपता अजून खोलात जायची गरज निर्माण झाली सामाजिक परिस्थितीमुळे. ती कोणती, हे नंतरच्या काही भागांत लिहिते आहे
इथले सगळे प्रतिसाद खूप सुंदर आहेत. अनेक आभार
वा. सुंदर. वाचुन जाणवलं की
वा. सुंदर. वाचुन जाणवलं की आम्ही मैत्रीणी समान विचारांच्या होतो म्हणुन आमच्या आमच्यातच राहिलो. कुमार गोष्टींबाबत चर्चा झडल्याच नाहीत कधी. अशा चर्चा होऊ शकतात हे ही ध्यानीमनी नव्हते. त्यामुळे असा इतका मोठा संस्कृती बदल कसा घेतला असला काय माहिती. की पाण्यात पडल्यावर पोहायला येतं तसं झालं असतं माहिती. पण खूप अवघड असणार हे लेखातुन जाणवतंय.
निखळ मैत्री असा प्रकार अनुभवायला मिळाला का? म्हणजे शरीरापलिकडे मैत्री, चर्चा वगैरे? त्यांचे इंग्लीश, उच्चार वगैरे समजायचा सराव कसा केलात?
तुझ्याकडे लेखासाठी लागणारी वैचारिक ताकद इतकी जास्त आहे की तुला लिहायला भाषेची अडचण आली नसेलच.
खुप सुंदर लिहिलं आहेस! अशीच
खुप सुंदर लिहिलं आहेस! अशीच लिहीत रहा! तुझ्या पुढील लेखाच्या प्रतिक्षेत!
अतिशय सुंदर लेख
अतिशय सुंदर लेख
मस्त लेखन !!! (Y)
मस्त लेखन !!! (Y)
खुसखुशीत लेखन आणि विषयाची
खुसखुशीत लेखन आणि विषयाची प्रगल्भ हाताळणी.
आवडले.
Pages