“काय गो, भाताचं काय करता तिकडे? आपला उकडा तांदूळ मिळतो का परदेशात?” लंडनहून पहिल्यांदा रत्नागिरीला गेल्यावर एका काकूंनी विचारलं.
“नाही, बासमती मिळतो.” मी त्यांची काळजी दूर करायच्या हेतूने म्हणाले, पण झालं उलटंच!
“मेलीस! रोज तो लांबलांब दाणा खायला लागतो की काय?” त्या ओरडल्या.
कोकणातला तांदूळ लंडनमध्ये मिळत नाही तो नाहीच, वर पोरीला रोज अख्खा बासमती खाऊन दिवस काढावे लागतायत म्हणजे परांजप्यांवर भलताच प्रसंग गुदरलाय असं वाटून काकूंना आमची फार दया आली होती त्यवेळी.
सोळा वर्ष झाली आठवीनंतर ठाण्याहून लंडनला येऊन. लंडनबद्दल कोणीही विचारलेल्या प्रश्नांपैकी माझ्या सगळ्यात आवडत्या प्रश्नाचं अढळपद अजूनही रत्नागिरीच्या काकूंच्या त्या प्रश्नालाच आहे. एकदा एका अनोळखी मुलाने मेसेज करून “हाय डिअर, लंडनबद्दल इन्फो बोल ना” असं म्हंटलं होतं तो मेसेज मी त्याच्या कमालीच्या साहित्यिक दर्जासाठी जपून ठेवलाय – त्याचा नंबर दुसरा म्हणूया. पण बाकीचे “मग इकडे आवडतं की तिकडे?” “लंडनला काय काय केलंस?” “कसे काय सेटल झालात?” असले प्रश्न ऐकून कंटाळा येतो. काय आणि किती मोठं उत्तर अपेक्षित असतं कधी कळतंच नाही मला...
“लंडनबद्दल लिही” हेसुद्धा तसंच काहीसं. २०११ साली एका दिवाळी अंकात लंडनबद्दल पहिल्यांदा बिचकत बाचकत लेख लिहिला होता आणि तेव्हाही असं वाटलं की उगाच कशाला आगाऊपणा? त्यात काय मोठंसं लिहिण्यासारखं? किती जण येऊन लंडन बघून जातात त्यांना आपण शहराबद्दल काय सांगायचं? लंडनचे अनुभव हा काही विषय नव्हे! आपण कोण मोठे रंगो बापूजी लागून गेलोय लंडनचे अनुभव लिहायला? वगैरे वगैरे (रंगो बापूजी कोण हे तुमचं गूगलवर बघून झालं असेल असं धरून मी गोष्ट पुढे चालू ठेवते)... तर त्या दिवाळी अंकाला दिलेली तारीख पाळण्यासाठी एका शहाण्या मुलीने घरच्या अभ्यासाचा निबंध लिहावा तशा मी लंडनला आल्यापासूनच्या गोष्टी हात आखडता घेत दिवाळी अंकासाठी लिहिल्या. तेव्हा माझं समाधान झालं नव्हतं ते आजतागायत झालेलं नाहीये. आजही लंडनबद्दल कधी काही लिहायला बसलं की मला लिटिल विमेन नावाच्या पुस्तकातलं मिस्टर मार्च यांचं वाक्य आठवत रहातं – There is more to you than this, if you have the courage to write it. आठ वर्षांखालचा माझा तो लेख वाचून तर अलिकडे हे वाक्य जास्तच डाचायला लागलं होतं.
दिवाळी अंक आल्यानंतर काही महिन्यांनी मी मायबोली नावाच्या वेबसाइटवर लंडनवरचा तो लेख लावला. मायबोलीवर मी पंधरा वर्षांची असल्यापासून अधूनमधून लिहायचे त्यामुळे तिथली खूप माणसं जिव्हाळ्याने वाचणारी, मी मायबोलीचं शेंडेफळ म्हणून माझं कौतुक करणारी आणि सुधारणा सुचवणारीही होती. त्यात रैना नावाच्या मायबोलीकरांनी, “पण तरुण मुलांकडून विचार करण्याबाबत आणि ते बेधडक मांडण्याबाबत अजून अपेक्षा होती हाँ. आम्ही कधी परदेशी शिकलो नाही. बरंच काही होत असणार, कदाचित रुततही असणार. तरुणपणी जग जसं दिसतं, ते तसं लेखनातूनही दिसायला हवं. योग्य नसलं तरी चालेल. जग कुठे चाललंय हे तुम्हीच तर आम्हाला सांगायचं ना?” अशी प्रतिक्रिया दिली होती. कौतुकाऐवजी टीका वाचून मी हुरळले होते तेव्हा! कारण माझं मला हेच म्हणायचं होतं पण नेमकं म्हणता येत नव्हतं. हेच लिहायचं राहिलं होतं पण नेमकं लिहिता येत नव्हतं.
तिथल्या शाळांबद्दल थोडं लिहिलं. तिथल्या भाषेबद्दल थोडं लिहिलं. कधीतरी तिथल्या भोवतालाबद्दल लिहिलं. आता मित्र-मैत्रिणींना सांगायच्या गोष्टी, जनरल काकू पब्लिकला सांगायच्या गोष्टी, दिवाळी अंकात सांगायच्या गोष्टी, कुण्णा कुण्णाला सांगायच्या नाहीयेत असं ठरवलेल्या गोष्टी, फक्त घरी येऊन बडबडायच्या गोष्टी, असे कधीतरी अनवधानाने झालेले कप्पे आज तरी लिहिताना सहज विस्कटता येतायत का ते बघायचा माझा हा प्रयत्न – हिमनग आणि सोळा वर्षे.
एखादा देश बदलला की झट्कन होणाऱ्या बदलांपैकी भाषा, आहार, मित्रपरिवार, शेजार यांतले बदल डोळ्याला सहज दिसणाऱ्या आणि कानांवर सहज येणाऱ्या बदलांमध्ये मोडतात. त्याखाली काही समजू शकलेल्या आणि काही समजायच्या हुकलेल्या अशा कितीतरी गोष्टी थराथराने घर करून असतात. हाच तो सांस्कृतिक हिमनग. मला भाषेत तरायला फार वेळ लागला नाही; तीत मुरायला मात्र लागला त्याचं कारण या नगात असावं. ‘Forward the light brigade’ कविता पाठ व्हायला वेळ लागला नाही, ती म्हणावीशी वाटायला वर्ष लागली त्याचं कारण हेच असावं. वाटायचं मला गंमत म्हणून दहा दिवस बाहेर पास्ता खाऊन यावंसं, पण संध्याकाळी दमून घरी आल्यावर तांदुळाच्या डब्याऐवजी पास्त्याच्या बरणीकडे हात जायला लागलेला वेळ दहा दिवसांपेक्षा फार मोठा होता त्याचं कारण यातच असावं. इंग्लंडला गेल्यावर खंडीभर पोरींनी वाढदिवसाला बोलावलं तेव्हा आपल्या खूप मैत्रिणी झाल्या असं वाटण्याऐवजी दर वाढदिवसाला आपलं नटून-थटून जाणं आणि त्यांचं मेकप करून येणं यातला फरक, त्यांनी खिदळत गाणी म्हणताना आपल्याला त्यातला एकही शब्द म्हणता सोडा, समजून घेताही न येणं, आणि आपल्यासारखेच केक आणून, अगदी तशाच मेणबत्त्या फुंकूनही नंतरच्या त्यांच्या खेळातला एकही खेळ आपल्याला माहित नसणं या सगळ्यामुळे कित्येक वर्ष त्या गोतावळ्यात राहूनही एकटेपणाच वाटला याचंही कारण या हिमनगातच असावं...
हे सगळं लिहायच्या ओघात कदाचित एखाद्या हळव्या बाजूबद्दल लिहिताना तक्रारीचा सूर लांबलाच तर एक मात्र सांगते. परदेशात जाता यावं म्हणून लोकांना किती रक्त आटवावं लागतं हे मी दररोज बघते. त्यांना भरायला लागणारे फॉर्म बघूनच मी हातपाय गाळते कारण कुठलीही कागदपत्रांची कामं करायची म्हंटलं की माझ्या जीवावर येतं. एस.बी.आयमध्ये साधं खातं उघडायला अर्ध्या दिवसाची रजा घेऊन, स्वतःचे सहा फोटो, पत्रिका आणि उष्टावणाच्या वेळी चाखलेल्या पहिल्या पदार्थाची तपशीलवार माहिती घेऊन शाखेत गेले तरी सातव्या फोटोसाठी म्हणून पुन्हा एकदा बँकेत खेप घालायला लावतात तेव्हा मला “बँक वगैरे सगळं झूठ आहे आणि आपण बाथरूमच्या टाकीमागे पैसे चिकटवून होईल तेवढीच बचत करूया” असं वाटायला लागतं. सांगायचा मतलब असा की, पासपोर्ट-व्हिसा-अर्ज-आर्जवं असे किचकट कष्ट घेऊन परदेशी जाण्याचा खटाटोप मी स्वतःहून कधीच केला नसता. पिअर प्रेशर किंवा अजून कसल्याच प्रेशरमध्ये येऊन परदेशात शिकण्याचा घाट घातला नसता. एवढंच कशाला, ठाणे ते गोवा या पट्ट्याच्या बाहेर धडपडत जाऊन रहावं असं काही आहे यावरही मी कधी विश्वास ठेवला नसता असा आपला माझा अंदाज. त्यामुळे आज लंडनबद्दल लिहिताना एखादी दुखरी नस जरा जास्त कुरवाळली गेली तरीही आई इंग्लंडला आली त्यामुळेच मला यायला मिळालं, इथे आल्यापासून किंवा आल्यामुळे जे जग अनुभवायला मिळालं ते निव्वळ घरच्यांच्या कष्टामुळे आणि माझ्या नशिबाने मला मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्या जगात अनेकांना एका जागेलाही घर म्हणता येत नाही तिथे मला दोन देशांना घर म्हणता येतंय यासरखी सुंदर आणि तरी कातर अशी परिस्थिती नाही, हेही मला मान्य आहे. पण “खूप्पच शिकायला मिळालं, खूप्पच छान मित्रमैत्रिणी झाले आणि खूप्पच मज्जा आली”च्या पलीकडचा एक झरोका उघडायचा हा माझा माझ्याशी प्रयत्न आहे.
मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली त्यालाही आता आठ वर्ष झाली. २०११ चा क्रिकेट विश्वचषक आटपला होता. दोन महिने वैयक्तिक कामं आणि स्वप्न गहाण टाकून सगळी भावनिक ऊर्जा भारताच्या संघात गुंतवून बसले होते. एक दिवस एकदम जिंकलोच आपण आणि सगळे सामने संपलेच अचानक! मग त्या आय.पी.एल बद्दलही प्रेम वाटून घेतलं आणि त्या प्रेमाच्या भरात तिच्यावर लिहून माझ्यापुरता ब्लॉग चालू केला. पुढचं पुढचं लिहिण्याच्या तयारीत आणि विचारात त्या क्रिकेटरहित रिकामपणाची जाणीव लवकर हरवली. ते खूळ आठ वर्षांनंतर चालूच असेल असं जराही वाटलं नव्हतं...
हे पुस्तक नव्हे. जीवनगौरव मिळाल्याच्या थाटात आठवणी लिहून अर्पण करत सुटाव्या इतकं मोठं काही तर अजिबातच नव्हे. तरीही लंडनबद्दल लिहायला सांगणाऱ्या ओळखीच्या अनोळखीच्या सगळ्यांना आणि ज्यांच्या एका वाक्याने बोट धरून मला इथवर आणलं त्या लिटिल विमेनमधल्या मिस्टर मार्च या व्यक्तिरेखेला या मालिकेत लिहिलेला प्रत्येक चांगला आणि वांगला शब्द मी अर्पण करत्ये... There is more to you than this, if you have the courage to write it.
-अर्निका परांजपे
आणि हो, अर्थातच क्रमश:
लवकर येऊ द्या, ग्रीस खूप
लवकर येऊ द्या, ग्रीस खूप आवडलेलं, आता लंडन बघू!
वाह, खूप छान. हिमनग उपमा
वाह, खूप छान. हिमनग उपमा मस्तच.
प्रचंड आवडती लेखिका, खूप छान
प्रचंड आवडती लेखिका, खूप छान लिहितेस अर्निका. तुझा ब्लॉग ही मी वाचते. मालिका सुरेख होईलच यात शंका नाही.
छान लेख.
छान लेख.
गरम गरम भजी खायला सर्वानाच
गरम गरम भजी खायला सर्वानाच आवडते पण करणार एकच जण असे काही वाटते, अर्निका तुझ्या मेहनतीला आणि कौशल्यास प्रणाम, आघाशी वाचक
आधाशी वाचक की आघाशी वाचक?
आधाशी वाचक की आघाशी वाचक?
अरे वा अर्निकाचा धागा आला का
अरे वा अर्निकाचा धागा आला का ....अर्निका, सवडीने वाचते ग .... निदत नोंदवलाय
हाहाहाहा, देवी साहेब, तुमची
हाहाहाहा, देवी साहेब, तुमची प्रतिक्रिया वाचून जाम खूश झाले मी! ताजी भजी तळणं चालू आहे.
हाब, हा ना माझा गोंधळ होत होता. सिनेमात हे वाक्य फ्रीड्रिक म्हणतात ज्यो ला. मला पुस्तकात ते मिस्टर मार्च म्हणतायत असंच आठवत होतं. गल्लत झाली असेल मोठी. आता मी ते लेखात सुधारणार नाही; ती माझी चूक म्हणून राहू देत्ये, पण तळटीप देते थँक यू!
माझं मराठी बरं राहिलं याची कारणं पुढच्या एका भागात लिहीन नक्की. थँक्स मायबोली <3
सुरेख प्रस्तावना!
सुरेख प्रस्तावना!
सांस्कृतिक हिमनग ही संकल्पना आवडली >>> + १
मस्त.
मस्त.
जमल्यास तो रैनाची प्रतिक्रिया असलेल्या लेखाचा पण दुवा दे बरे इथे. रैना मायबोलीवर नसते वाटतं हल्ली.
Pages