रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मंदार. तुम्ही म्हणताय तसं लहाणपणीच्या माधव, छाया अन दत्ताचा काळ जरा विस्तृतपणे दाखवायला हवा होता. लहान छाया फारच डँबिस होती Proud

२९ ऑगस्ट ला संपतेय राखेचा२. आता दाखवण्यासारखं काही उरलंच नाही. हिच्या जागी "देवमाणुस"अशी नवीन सिरियल लागेल म्हणा पण आता त्राण उरले नाहीत नव्याने लागणार्‍या सिरियल साठी रात्री १०.३० वाजता वाट बघत बसण्याचे. राखेचा१ पेक्षा राखेचा२ खुपच भारी होती. मला फार आवडली. मन लाऊन बघितली अगदी Bw

ब्रेक मधे ज्यावेळेस 'देवमाणुस' चा रात्री १०.३० च्या स्लॉटचा प्रोमो पाहिला तसं अगदी काळीज हललं हो Proud

*********************

कालच्या पुर्ण भागात कॅमेर्‍याचा अँगल बदलला होता. शेवटच्या स्टेशनाकडे येताना गाडीचा ड्रायव्हर बदलल्यामुळे प्रवाशांच्या मनात जी चलबिचल व्हावी अशी काहिशी परिस्थिती पुर्ण भाग पाहताना झाली होती. काल आण्णा दवाखान्यातुन परत येतो तोच वाढलेली दाढी, डोळ्या भोवती काळी वर्तुळे, रया गेलेले शरीर अशा अवस्थेत. मग दत्ता, माई, छाया त्याच्याकडे काळजीत पहात असतात. आपली काय अवस्था झाली हे आण्णाला बघवत नाही. आण्णा नाईकाचा रुबाब कुठे गेला म्हणुन तो खचुन जातो. दत्ता, माई त्याला तुम्ही पुन्हा पहिल्या सारखे व्हाल म्हणत धीर देतात (कपाटातल्या तीर्थाचे दोन घुटके दिले तरी तो एका झटक्यात पहिल्यासारखा होईल हे या बिचार्‍या मायलेकांना कसे कळत नाही हे देव जाणॅ..!). मग आण्णाची दाढी करावी म्हणुन नाथा जामानिमा करुन (एका प्लेट मधे वस्तरा, जुन्या पद्धतीचा घोड्याचे केस असलेला ब्रश, जुन्या पद्धतीचा निळ्या डबीत असणारा पामोलिव चा सफेद दाढी साबण, पाण्याचं फुलपात्र हे सगळं भारी दाखवलंय..!) माडीवर येतो अन पहिल्याच वस्तर्‍याला घात होतो. आण्णाला घाबरत घाबरत दाढी करताना वस्तरा गालाला लागतो अन रक्ताची रेघ आण्णाच्या गाली उमटते. मग आण्णाला पाटणकरीण, पाटणकर, छाया दिसु लागतात अन त्याला नाथा तुझा अंत करायला आलाय असं सांगत दात काढु लागतात Proud . त्यांचं दात काढणं बघुन आण्णा चिडतो अन नाथाचा हात पकडुन तो वस्तारा त्याच्या गळ्याला लावतो. घाबरलेला नाथा सोडा सोडा करु लागतो तसं माई, दत्ता आण्णाला काबुत आणुन त्याच्या हातातुन वस्तारा खेचुन घेतात.

मग दत्ता स्वत: आण्णाची दाढी अगदी सफाईदारपणे करतो (याने गावात सलुन टाकलं असतं तर एवढं मानहानीकरक जीवन जगावंच लागलं नसतं Biggrin ). आपल्या बापाशीचा असा अवतार झाला म्हणान त्याक वाईट वाटता. माई मात्र सगळं धीराने घेते अन छाया, नाथाला घेऊन खाली जाते. दाढी करुन झाल्यावर दत्ता आण्णाच्या चेहर्‍यावरुन टॉवेल फिरवतो अन दुसर्‍याच शॉट मधे तोच टॉवेल स्वतःच्या चेहर्‍यावरचा घाम पुसत खाली जातो Uhoh

त्यानंतर आण्णा कॉटवरुन उठत कपाटाच्या दारावर असणार्‍या आरशाकडे जातो अन स्वतःचे दाढी केल्यावर उजळलेले रुप न्याहाळात उभा असतो. नेमकं त्याच वेळी माई वर येते अन त्याला सांगते के ४-८ दिवसात तुम्ही पुन्हा पहिल्या सारखे व्हाल. आज दत्ताच्या मुलाचं बारसं आहे असं सांगितल्यावर आण्णाच्या चेहर्‍यावर अचानक आनंद येतो. आपल्याला नातु झाला म्हणुन तो खुश होतो. नातवाला स्वतःच्या हाताने दागिना घालणार असं तो माईला सांगतो अन ते ऐकुन माईला फार समाधान वाटतं. माई त्याला सांगते की ती खाली जाऊन नातवाला दाखवायला वर आणते अन तिथुन निघते. तेवढ्यात आण्णाला पटणकरणीचं भुत दिसतं अन ते विचारतं की तु आजोबा झालास Proud . तुझ्या उरावर बसायला आता कुणी जन्म घेतलाय..? Proud ते ऐकुन आण्णा पुन्हा पहिल्या सारखा सुड सुड चेहरा करुन बसतो.

खाली माई नातवाला घेऊन वर माडीवर निघणार तेवढ्यात सरिता तिला अडवते अन ती काही झालं तरी आण्णाच्या खोलीत बाळाला नेऊ देणार नाही असं सांगते. मग माई तिला समजुतीचे ४ शब्द ऐकवुन नातवाला वर आण्णाला दाखवायला आणते. मागोमाग सरिताही येते. तिच्या चेहर्‍यावर मणभर काळाजी अन भिती. आण्णा आनंदाने माईच्या हातुन नातवाला घेतो पण त्याला लगेच जाणीव करुन द्यायला भुतं हजर..! भुतं म्हणजे कोण कोण तर वर सांगितलेली पाटणकर, पाटणकरीण अन शोभा..! (भिवरी, सदा, पोष्ट्या, चोंट्या यांचा पर डे चुकवण्यासाठी फक्त ३ च भुतं पार्ट टाईम ठेवलेली दिसतायत..! Uhoh ). भुतांनी आण्णाला हा नवा वाटेकरी आला म्हणुन वात पेटवुन दिली तसा आण्णाचा नुर पालटतो. तो त्या पोराला काहीतरी करणार असं लक्षात येताच माई, सरिता चपापतात अन सरिता झेप घेऊन पोराला ताब्यात घेते अन आरडत ओरडात खाली जाते. माईपण तिच्या मागे अगो अगो करत खाली जाते अन नवर्‍याची बाजु घेऊन सारवासारव करु लागते तशी सरिता तिला वास्तवाचं भान करुन देते. संध्याकाळी बारशाला आण्णा आलेले तिला खपणार नाही असंही सुनावते. Uhoh

संध्याकाळी बारशाची तयारी झालेली असते. दिवाणखाण्यातील भुईवरची नक्षी तर आजवर कधिही एवढी पांढरी नव्हती इतकं सगळ्या वाड्याला सजावट झालेली असते. नेहमीच्या सवाष्ण सुद्धा आलेल्या असतात (त्यातली एक चांगलीच टुमटुमीत झालीली दिसली..!). बारशाला सरिताचे आई-वडील पण आलेले असतात अन वडील विचारतात की आण्णा कुठं आहेत म्हणुन. मग त्यांच्या सांगण्यावरुन माई आण्णाला आणायला वर जाते.

आजच्या भागात माई ओसरीत येऊन झाडांकडे बघत ठणकाऊन सांगते, "तुम्ही कोणीही असा... माझ्या घराकडे वाकड्या नजरेन बघशान तर तुम्हाला वठणीवर नाय आणला तर इंदुमती हरी नाईक नाव लावणार नाय"

छ्या... अण्णाला चांगली शिक्षा मिळते आपल्या कर्मांची असे वाटले होते. मागे त्याने खुद्द पोलिसांसमोर आपल्या काळ्या कृत्यांची कबुली दिली तरी काय तर म्हणे दवाखान्यात पाठवले. आणि बाबा ४-८ दिवसात घरी. तरी भुतांचं भासचक्र सुरू होतं कालपर्यंत. आता तर कधी नव्हे ते इंदूताईनी अण्णाला जुन्या रुबाबासकट पुन्हा उभा करण्याचा विडा उचलला आहे. आणि precap मध्ये पण अण्णा पूर्वीसारखा दिसतोय. मी उगाचच अण्णाला त्याच्या कृत्यांची काय शिक्षा मिळते याकडे डोळे लावून होते sad:
एवढे खून पाडुनही हा बाबा असाच सुटलेला दाखवला याबद्दल तीव्र णिषेध...
पाटणकर बाईच्या बलिदानाला काही अर्थच नाही उरला.

हो सान्वी. आण्णा असा सुखासुखी मेलेला आवडणार नाही. निदान वच्छीने तरी त्याचा बदला घेतला असं दाखवलं असतं तर निदान शोभा, काशी अन चोंट्याचा तरी हिशोब चुकता झाला असता Uhoh
-------------------------------------------------------------------

परवाचा भाग खुपच प्रवाही झाला.. सरिता अन माईची जुगलबंदी बर्‍याच दिवसांनी बघायला मिळाली Proud

आण्णा बारशासाठी दिवाणखाण्यात येऊन बसतो अन बारसं सुरु होतं. आण्णा खाली आला हेच मुळी सरिताला रुचलेलं नसतं. ती कसनुसं तोंड करत सोपस्कर पार पाडत असते. दोन सवाष्णं कुणी गोपाळ घ्या कुणी मुकुंद घ्या करत पाळण्या खालुन देवाण-घेवाण करत असतात. तेवढ्यात आण्णाला भुतांचे आवाज उचकवतात अन तो त्या सवाष्णांनी पाळण्यात ठेवलेला बाळकृष्ण उचलुन आदळातो. ते बघुन सवाष्ण चांगलेच हादरतात, माई, सरिताचे आई वडील, छाया, दत्ता यांचं धाबं दणाणतं तर सरिता चिडुन आण्णाला सर्वांसमोर वाट्टेल तसं बोलु लागते. आण्णा पण ऐकुन घेत असतो अन दत्ता तिला थांब थांब असं सांगत असतो. (सरिता वचावचा बोलायची थांबली तर मग काय तो सुदीन.. Proud ) सरिता मग आण्णा या घरात राहिलेले तिला चालणार नाही असंही म्हणते.. आण्णांमुळॅ आक्ख्या घराची वाताहत झाली वगैरे वगैरे सांगत जी सुसाट सुटते ते पार आण्णाची सर्वांसमोर बेअब्रु करुन ठेवते .. ते ऐकुन माईच्या अंगात ४ माहिष्मती संचारतात अन फुरफुरत ती सरिताची चांगलीच कान उघाडणी करते अन आण्णांमुळे घराला घरपण आहे, सुख-सुविधा आहेत, त्यांच्यामुळे मुलेबाळे आहेत, त्यांच्यामुळॅ सरिता सुन म्हणुन या घरात आली हे विसरली काय वगैरे वगैरे एकेक हिशोब चुकते करते.. Biggrin अगदी तिच्या आई-वडिलांची सर्वांच्या साक्षीने पुर्ण उतरवुन ठेवते (हा प्रसंग काय जमलाय... आहा..!! अशी कधीच कुठल्या सासुने कुठल्याही सुनेची उतरवली नसेल Biggrin ). मग सरिता तिची आणि केविलवाणी तोंडं करुन बसलेल्या (ती तर नेहमीच असतात पण आज पोरिच्या अगोचरपणाने उतरवल्यामुळे जरा जास्तच..! Biggrin ) आई-बापाची बाजु सावरायला उठते पण तिला आडवत तिचे आई-वडील तिला ४ समजुतीच्या गोष्टी सांगुन त्यांच्या ऐपतीला झेपेल असं गिफ्ट (अंगडी-तोपडी) बाळाला देत घरातुन निघुन जातात. त्यांच्या मागोमाग सवाष्ण पण जातात. Uhoh ते बघुन सरिताला धक्का बसतो पण तरिही माईला थोडं बोलण्याचं सुख ती पुरेपुर घेते (पण बुंद से गयी वो हौद से नही आती मड्डम..! Proud ). तिचं ते हौद भरुन उलटं बोलणं आपल्या डोक्यात जातं अगदी तसंच दत्ताच्या डोक्यात जातं अन तो सरिताच्या गालावर सण्सणीतपणे पाच पांडव उठवतो. Biggrin

मग थोडी ड्रामेबाजी होत सरिता तिच्या पोराला घेऊन बावीकडे जाते अन ती बातमी घेऊन पांडबा दिवाणखाण्यात येतात. मग माई मट्कन खालीच बसते (एखादी आरडत विहिरीकडे पळाली असती..! Wink ) अन छाया, दत्ता लगबगीने बावीकडे जाऊन सरिताची समजुन घालुन दिवाणखान्यात आणतात. मग छाया तिला बाळ पाळाण्यात घालुन नाव ठेवण्याचा प्रोग्रॅम पार पाडायला सांगते तर पडलं तरी नाक उंच या अविर्भावात सरिता अट घालते की ती बारसं झाल्या झाल्या ती बाळाला घेऊन घरातुन निघुन जाईल. हे असलं त्रांगडं होऊन बसलेलं बघुन मग माई सर्वांना निक्षुन सांगते की ती यापुढे आण्णांची बेइज्जती खपवुन घेणार नाही. त्यांना त्यांचं पुर्वीचं आण्णा हरी नाईक हे व्यक्तीमत्व मिळवुन देइल. त्यांच्याकडुन घरातील इतर कुणाला कसलाही त्रास होऊ नये म्हणुन ती आण्णांना सर्वांपुढे येऊ देणार नाही (अन वर खोलियेत आण्णाला कोंडुन ठेवते). तेवढ्यात कोंडलेला आण्णा भुतांचे आवाज ऐकुन सैर्भैर होतो अन माईला "इंदो-इंदो वाचव" म्हणुन साद घालु लागतो. ते ऐकुन माई दिवाणाखाण्याचा दरवाजा बाहेरुन बंद करुन ओसरीत येते अन आता १० माहिष्मती अंगात संचारल्याप्रमाणे नाक, गाल फुगवुन फुरफुरत घरासमोरील सर्व झाडांवर नजर रोखत (भुतांना उद्देशुन) दम भरते की नाय ह्या वाड्याच्या मालकाला त्याचो गतवैभव पुन्हा मिळवुन देशात तर इंदुमती हरी नाईक नाव लावणार नाय".

त्यानंतर मग बहुतेक खुप दिवस-महिने उलटलेले दिसतात अन आण्णाच्या कानात भिकबाळी आलेली दाखवली आहे, त्याचे केस गेलेले दाखवलेत, अंगात काळा कोट अन डोक्यावर काळी टोपी असा नवा (अन शेवटचा लुक) अवतार घेऊन आण्णा आपल्यासमोर ओसरीतल्या झोपाळ्यावर झुलताना दिसतो.

त्याच्या नव्या अवताराची चर्चा होत असताना प्रीकॅप बघायचा राहुन जातो.. कुणी पहिला असल्यास सांगा Bw

----------------------------------------------------------------------------

आण्णा नाईक या व्यक्तीरेखेच्या कानात भिकबाळी कशी, काळा कोट अन काळी टोपी कशी हे गणित मला काही सुटलं नाही. कोकणातील समाज जीवन माहित नसल्यामुळे मला थोडा अचंबा वाटला. पण कुणाला कोकणात नाईक मंडळी भिकबाळी आणि काळे कोट्/काळी टोपी घालताना दिसले आहेत का..???

मला स्वतःला राखेचा १ जास्त आवडली होती. लॉकडाऊननंतर सिरियल परत सुरु झाली तेव्हा रोज बघायचा पेशन्स आणि उत्साह अजिबात उरला नाही. DJ.. , धन्यवाद अपडेटस दिल्याबद्दल. अण्णा हॉस्पिटलमध्ये कसा पोचला ते कळलं नाही. जमलं तर ते थोडक्यात सांगा प्लीज.

दत्ताने सरिताच्या कानाखाली आवाज काढल्याचं वाचून बरं वाटलं. हे आधी करायला हवं होतं. तिला बहुतेक आपला नवरा माईचा मुलगा नाही हे माहित नाहिये. ते कळलं तर तिच्या फुग्यातली हवा जाईल.

सीझन १ मध्ये दाखवल्याप्रमाणे भूत-बित काही नसतं, हे सगळे अण्णाच्या मनाचे खेळ असतात ना मग मध्ये एका एपिसोडमध्ये अंगणातून घरात आत गेलेले चिखलाचे पाय वगैरे दाखवण्यात काही अर्थच नव्हता. असो.

एकूणात सिझन १ मधली सरिता दिसायला लागली आहे तर. आता छायाच्या वागणुकीतला बदलही दाखवतील का? मोठा अभिराम आणि त्याच्या लग्नापर्यंत येऊन अण्णाचा मृत्यू दाखवून सिरियल संपेल असं दिसतंय.

अण्णा हॉस्पिटलमध्ये कसा पोचला ते कळलं नाही. जमलं तर ते थोडक्यात सांगा प्लीज. >> त्या दिवशी (म्हणजे मागील आठवड्यात आण्णा पाटणकरणीच्या घरी उताणा पडला होता अन त्याला सणकुन ताप भरला होता.. त्यानंतर त्याला हॉस्पिटलात भरती केले.

मग मध्ये एका एपिसोडमध्ये अंगणातून घरात आत गेलेले चिखलाचे पाय वगैरे दाखवण्यात काही अर्थच नव्हता. असो.>> ते पाय आपल्या पांडबाचे असणार यात काहीच शंका नाही Proud

बाकी, अभिरामच्या लग्नाच्या दिवशी सिरियल संपेल असं मलाही वाटतंय पण पांडबाने इंस्टा वर माईच्या भीमादेवी थाटातील शपथेचा विडीओ दाखवुन त्याखाली "म्हटलं तर शेवट अन म्हटलं तर सुरुवात" असं लिहिलंय Uhoh

कालच्या भागात सरिता दत्ताशी त्यांच्या खोलीत वाद घालत असते. वादाचं कारण काय तर आण्णा बरे झालेत हे माधवला सांगायला निघालेल्या दत्ताला मोडता घालु पहाणार्‍या सरिताची वचवच (परवाच हिच्या गालफाडावर पाच पांडव उठले तरी आज पहिले पाढे पंचवन्नच..!! Uhoh ) . मग दत्ता काही सांगणार तोच आण्णा नवीन रुपड्यात ओसरितल्या झुल्यात झुलत असतात अन त्याचा करकरण्याचा आवाज आतमधे सरिता अन दत्ताला येतो. ते दोघे, छाया बाहेर ओसरीत येऊन बघतात तर आण्णा - माई तिथं आधिच बोलत असतात. आण्णा झुल्यावर झुलत असतात अन त्यांच्या बाजुला गिफ्ट च्या पिशव्या. मग ते एकेकाला एकेक गिफ्ट देतात अन दत्ताला त्याच्या मुलाबद्दल (गणेशाबद्दल) अन मुलीबद्दल विचारतात. दत्ताची मुलगी कॉलेजात गेली असं सांगुन सरिता गणेशाबद्द्ल खोटं खोटं सांगु लागते अन मग तिला दाबत कसातरी विषय बदलत दत्ता तिला घेऊन आत जातो. माईला सुद्धा आण्णांनी नवीन साडी घेतलेली असते. छाया, माई, दत्ता-सरिता आपापले गिफ्ट घेऊन आत गेल्यावर आण्णा उठुन ओसरीच्या ग्रिल पर्यंत येतो अन समोर्च्या झाडाकडे लक्ष जाऊन चांगलाच चपापतो. त्याच्या मनात काहीतरी येते अन तो नाथाला हाक मारतो. नाथा आल्यावर त्याच्या हातात चांगले ३-४ हजार रुपये कोंबुन त्याच्यासाठी अन सुषमासाठी काहीतरी घ्यायला सांगत तिथुन पिटळतो (म्हणजे सुषमा बद्दल याच्या मनात कणव आहे तर..!).

आत गेल्यावर सरिता नेहमीप्रमाणे हिशोबात मग्न असणार्‍या दत्ताला उचकावत नवीन साडी कशी दिसते म्हणुन विचारत असते अन मुंबईच्या जाऊबाई पेक्षा तीच कशी घराची कर्ती सुन आहे अन म्हणुन आण्णांनी हिलाच कशी साडी आणली वगैरे टिमकी वाजवत असते. दत्ताला तिने मघाशी गणेशाबद्दल आण्णांना खोटं सांगितलेले पटलेलं नसतं म्हण्नुन तो तिला तसं स्पष्ट सांगतो तर ती त्याला म्हणते मग आपला पोरगा आपल्या हाताबाहेर गेला आहे अन त्याला बाहेर गुरु मिळाला आहे असं खरं सांगितलं असतं तर आण्णांनी गिफ्ट्स दिले असते का? (कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं...! Proud ). मग ती माईला मदत करायला म्हणुन स्वयपाक घरात जाते अन दत्ता माधवला फोन लावतो (आला बाबा एकदाचा यांच्याकडे मोबाईल..!)

स्वयपाक घरात माई दूध तापवत असते तेव्हाच सरिता तिथं येऊन तिच्याशी बोलु लागते की तीचं कसं चुकलं आण्णांना, माईला अन घरातील कुणालाच तिने कसं कधीच समजुन घेतलं नाही वगैरे वगैरे फकान ती बोलत असते अन माई तिला सरिताची कशी काहीच चुक नाही अन सगळं कसं चांगलं झालं असं समाधानाने सांगत असते. आज गोडाचा स्वयंपाक करु असं म्हणते. बोलता बोलता आज माई देवळात जाणार आहे असं कळल्यावर सरिता पण सोबत येणार असं सांगते. पण माई तिला सांगते की दत्ताक पण वांगडा घे.. उगाच तीन तिगाड होउक नको (म्हणजे देवळात आण्णा आणि माई जोडीने जाणार असतात हे सरिताच्या टाळक्यात थोडं उशीराच लक्षात येतं.. ). तेवढ्यात मागे गॅसवर तापायला ठेवलेले दूध उतु जाते अन सरिता माईला गॅस बंद करा म्हणुन सांगत असताना माई समाधानाने तिला म्हणते की घरात दूध उतु गेलं हे फार चांगलं झालं अन तेवढ्यात आण्णा माईला "आवरलं का.. चला लवकर उशीर होतो" असं सांगितल्याचा आवाज येतो तशी माई चुटकन उठते अन उठता उठता सरिताला गॅसवर उतु गेलेल्या दुधाची साफसफाई कर म्हणुन सांगते Biggrin

बाहेर दिवाणखाण्यात माई येताच समोर दत्त म्हणुन छाया उभी. कुठं चालली असं विचारल्यावर आण्णांवांगडा देवळात जातलंय हे माईकडुन जेव्हा तिला कळते तेव्हा तिला जोराची उबळ येते अन तिचा असह्य खोकला पाहुन माई तिच्यासाठी पाणी आणायला स्वयंपाक घरात पळते. तेवढ्यात सरिता तिथं येऊन छायासोबत माईकडे बघुन हसु दाबत बसतात. इतक्यात दत्ता फोन घेऊन तिथं येतो अन माधवला आण्णांशी बोलायचं आहे असं माईला सांगतो. ते ऐकुन माईच्या चेहर्‍यावर काळजी दाटुन येते अन आण्णांना आत बोलावुन माधवशी थोडं बोला अशी शपथ घालते. मग आण्णा माधवशी बोलतात अन त्याला त्याच्या झीलाक घेऊन गावाकडे यायला सांगतात ते बघुन सर्वांच्या चेहर्‍यावर (सरिताला सोडुन.. Proud ) आनंद पसरतो तर खोटं खोटं आनंदी झाल्याचा आव आणत आपलं केवीलवाणं तोंड लपवण्याचा सरिता आटोकाट प्रयत्न करते.

माई अन आण्णा सोबत घराबाहेर पडताना छायाला आण्णांची मस्करी करण्याची लहर येते अन ती त्यांना कानात अत्तराचो फाया घालायला विसरले याची आठवण करुन देते ते ऐकुन आण्णा थोडे वरमतात अन माईला छायाचा फार राग येतो Biggrin . मग हसु दाबत उभ्या राहिलेल्या छायाकडे पहात दत्ता पण कसनुसं तोंड करत जरा गप्प रहा असं सुचवतो. Proud

माई-आण्णा ओसरीतुन खाली उतरणार तेवढ्यात पांडबा तिथं येतो त्याच्याकडे बघुन आण्णा हसतात ते बघुन पांडबास भारी अचंबा वाटतो. दत्ताकडे बघुन पांडु सांगतो की आण्णा हसले.. अण्णा हसले Biggrin . मग दत्ता, छाया, माई सगळेच सुखावतात अन माई पांडबाला विचारते की त्याला काय व्हया ते सांग आण्णा त्येका आणुन देशात. पांडबाच्या सरिता वैनीक-छाया ताईक आण्णांनी साडी घेतलंय, दत्ता भाऊक शर्ट घेतल्यान असं सांगुन पांडबाक काय व्हया ते सांग म्हणुन विचारत असते तर पांडु काही नको काही नको असं म्हणतो. मग माईच त्याला म्हणते की ठीक आहे ती त्याच्यासाठी देवळातुन येताना खाजा घेऊन येइल. पण पांडु ख्वाजा नको म्हणुन सांगतो अन पेढो व्हयो म्हणतो. ते ऐकुन आण्णाला पांडुच्या वडीलांनी त्याच्यासाठी पेढे आणलेले असताना आपण त्यांचा खून केला हे आठवुन खजील व्हायला होतं. ते बघुन माई सावरुन घेतात अन पांडु साठी पेढे आणण्याचं अश्वासन देत आण्णांसोबत पायात चप्पल सरकवुन बाहेर निघते तेवढ्यात गेटपाशी त्यांच्या पायात झाडावरुन पक्षाचं घरटं पडतं Uhoh (आणि त्या घरट्यात कोंबडीच्या अंड्याएवढं एक अंडं फुटलेलं असतं.. Proud ) हे बघुन माईच्या पायाखालचं अंगणच सरकतं अन ती हा अपशकुन आहे.. घरात चला म्हणुन आण्णांना सांगु लागते. आण्णा यावर विश्वास ठेवायला तयार होत नाहीत अन ते तिला देवळाकडे चल म्हणुन सांगु लागतात त्याच वेळी घरातुन डबे आदळण्याचा आवाज येतो.

तो आवाज ऐकुन सगळे स्वयंपाक घरात धावत येतात तर समोर रिकाम्या डब्यांचा थर लाऊन सरिता भयचकीत झालेली असते (कारण काय तर सगळे डबे रिकामे Uhoh ). सगळे डबे रिकामे कसे याचा तर्क लावत बसलेल्या सर्वांना पांडबा सांगत येतो की बावीच्या कठड्यावर धान्य आहे. मग सगळे मिळुन बावीकडे जातात अन बघतात तर वाटाणे, चवळी, गहु, तांदुळ हे सर्व बावीच्या कट्ट्यावर गोल गोल मांडुन ठेवलेले असतात. हे कसे नी काय याचा तर्क लावत असतानाच एपिसोड संपतो.

आता प्रीकॅप बघायचा रसच संपला आहे.. उद्या काय होणार हे बघुच वाटत नाही.. सिरियल संपणार याची हुरहुर मनात दाटुन येते Uhoh

लॉकडाऊननंतर ही मालिका पहिलीच नव्हती.आज ह्या धाग्यावर आले तेव्हा 92 नवीन प्रतिसाद अस दाखवलं . पूर्ण वाचले.
डीजे मस्त लिहिलेय तुम्ही . पूर्ण मालिकाच डोळ्यासमोर आली. एकदम डिटेलवर तरीही कंटाळा येऊ न देता खुसखुशीत शैलीत लिहिलेलं आहे. उगाच करायची म्हणून टीका न करता काय आवडलं / काय नाही आवडल ते लिहिलेत ते ही आवडलं ( उदाहरण : आकेरी वर्णन , ड्रोनच चित्रीकरण , सारिताच गोंधळ )
एकदम डोळयांसमोर सगळं तरळून गेले.
लिहीत रहा .

धन्यवाद जाई. Bw

काल या सिरियलचं शेवटचं शुटिंग संपलं. शोभाने तिच्या इंस्टावर मांगरातल्या घराचा फोटो लावुन खाली कॅप्शन दिली आहे की बाकी सगळे अण्णा नाईकांच्या वाड्याचे फोटो डकवतील पण ज्या वच्छीच्या घराने तिला घराघरात पोचवलं त्या घरापुढंचा फोटो तिने डकवला आहे.

DJ.. , अपडेटबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद. अण्णा भलतेच बदललेले दिसताहेत. हे नक्की ओरिजिनल अण्णाच आहेत ना? का खरे गेले शेवंतासोबत? Happy हा एव्हढा बदल कसा झाला ते मुद्दाम दाखवलं नाहीये बहुतेक हे 'पण पांडबाने इंस्टा वर माईच्या भीमादेवी थाटातील शपथेचा विडीओ दाखवुन त्याखाली "म्हटलं तर शेवट अन म्हटलं तर सुरुवात" असं लिहिलंय' ह्यावरून दिसतंय. पुढला सीझन ह्यावर येईल का? अर्थात ही सिरियल पुन्हा बघायचं धाडस आता नाही. बदललेले आण्णा पहायला हा एव्हढा एपिसोड बघेन म्हणते. निदान उतारवयात तरी अण्णा माईबरोबर माणसासारखं वागत आहेत हे बरंय. तरी बूंदसे गयी सो हौदसे नही आती. असो.

रच्याकने, हे धान्य बावीवर ठेवायचं कांड सुषमाने केलेलं दिसतंय. नाईकांची टरकवायला. दत्ताला मांगराची जमिन का दिली ह्याचा उलगडा जाता जाता केला तरी बरं.

धन्यवाद डीजे.. लॉकडाऊन नंतरचे सगळे भाग वाचून काढले Happy

मी मालिका पहात नाही पण तुमच्या शैलीत वाचायला आवडते..

आज खूप दिवसांनी आले इथे आणि पहिला हा धागा वाचून काढला Lol

@ स्वप्ना_राज, नीलाक्षी धन्यवाद Bw
---------------------------------------------------------------------------------

कालच्या भागाची सुरुवात होते तेच बावीच्या कडेला सगळे चिंतेत उभे असताना. बावीच्या काठावर धान्य कसं आलं हे दत्ता पांडबाला विचारत असतो अन तो इसारलंय म्हणुन मोकळा होतो Proud . तरिही त्याच्या उलटतपासणीतुन हे असं काम करणारा घरातलोच असां हे दत्ताच्या लक्षात येतं आणि तो दुसरा तिसरा कोणी नसुन त्याचा मुलगा गणेशाच आहे हेही तो ताडतो. पण त्याचं म्हणणं साफ झिडकारत हे सर्व ती लावसाटीन (पाटणकरीण) करतेय आणि तिच्या कर्तुकीचं खापर हिच्या पोरावर (गणेशावर) फोडुन मोकळ्या झालेल्या दत्तावर नजर रोखत सरिताची चिडचिड होते अन आपल्याच मुलावर असे आरोप करुन काय साध्य झालं वगैरे विचारत ती तणतणत घरात जाते. मागोमाग दत्ता अन छाया पण जातात. माई अन आण्णा चिंतित चेहर्‍याने मागे राहतात. आण्णा बावीत वाकुन बघत ती २० पुरुष खोल ( वास्तवीक ३ पुरुष सुद्धा खोल नसेल ती बाव Proud ) आहे ना असं माईला विचारतो तशी ती चपापुन त्याला घरात घेऊन जाते (तिथं एवढा पाऊस झालाय की त्यांच्या मागे असणार्‍या नारळाचं खोड हिरवंगार लुसलुशीत मॉस ने अगदी भरून गेलंय..! आणि हो, बाव तर पाण्याने एवढी गच्च भरली आहे की बस्स..!! ).

मग खोलियेत आल्यावर सरिता अन दत्ताचं पुन्हा भांडण. मुलाच्या चुका सुधारण्या ऐवजी ती त्याला पाठीशी का घालते असा त्याचा सवाल तर तो स्वतःच्या मुलाला समजाऊन का सांगत नाही असा तिचा सवाल Uhoh . मग त्या वाया गेलेल्या गणेशाचं खापर एकमेकांवर फोडुन दोघेही मोकळे होतात. तिकडे माई स्वयंपाक घरात गरम गरम पोह्यांसोबत चहाचा बेत करत असतानाच दत्ता तिथं जातो अन माई त्याला एक नारळ देऊन घरावरुन उतरुन बावीत टाकायला सांगते. तसा तो नारळ घेऊन बावीत टाकायला जातो अन त्याचा कानोसा घेत आण्णा हे सर्व माडीवरुन बघतो. नारळ बावीत टाकल्यावर दत्ता नाथाला हाक मारुन ते सर्व धान्य गोळा करायला सांगतो. तेवढ्यात माईचे चहा-पोहे तयार होतात अन ती ते घेऊन माडीवर पोचते तर आण्णा तिथं नसतात. चपापलेली माई गॅलरीत येऊन बघते तर आण्णोबा खाली पाटणकरणीने टांगुन घेतलेल्या झाडाच्या पारावर हाताच्या बोटाने काहीतरी कोडी सोडवल्या सारखं करत बसलेले असतात. त्याला तिथं अशा पद्धतीने बसलेला बघुन माई पळतच जिना उतरते अन दिवाणखाण्यात पोचता पोचता शेवटच्या २-३ पायर्‍या घसरुन मुख्य दारात आपटता आपटता वाचते (आता जिन्यावरुन पडुन हात-पाय मोडुन घ्यायला आणि आजारपण काढायला वेळच उरला नही Wink ). सरिता तिला अहो अहो करेपर्यंत माई झप्प्कन डावीकडे वळत दारातुन ओसरीत येते अन पळतच पारावर पोचते. आण्णा तिथं गणित सोडवत तंद्रीत बसलेला असतो. माई त्याला हाक मारते तेव्हा तो तंद्रीतुन बाहेर येतो अन माईला एवढी धाप का लागली म्हणुन विचारतो तशी ती त्याला चहा अन पोहे खायला घरात चला म्हणते. आण्णा तिला ते चहा पोहे तिथेच झाडाच्या पारावर आणुन द्यायला सांगतो आणि तिथं बसल्यावर त्याला खुप बरं वाटतं (हो का..! Wink ) असही बोलुन जातो. ते ऐकुन माईच्या पायाखालचं अंगण पुन्हा एकदा सरकतं ( Uhoh ) अन ती आण्णाला घेऊन घरात यायला लागते (हा सर्व प्रकार सरिता ओसरीतुन चोरुन बघत असते..).

तोपर्यंत नेने वकील तिथं पोचतात अन आण्णा सोबत काहीतरी बोलु लागतात. कागदपत्र, जमीनी, हिशोब असलं बोलणं कानावर पडताच सरिता सावरुन ऐकु लागते अन मग खोलियेत जाऊन हिशोब बघत बसलेल्या दत्ताला सगळं सांगते. नेने वकील अन आण्णा काय महत्त्वाचं बोल तात ते ऐकण्यासाठी त्यांच्या सोबत बसा असंही फर्मावते. ते ऐकुन हिशोबात बुडालेला दत्ता तिला म्हणतो की त्याला यात काडीचाही इंटरेस्ट नाही तर सरिता पुन्हा त्याचा पाणउतारा करत जन्मभर हिशोबच ठेवत बसा अन दोन्ही शिकलेले भाऊ सगळा कारभार बघतील असं सांगते तेव्हा नाईलाजाने दत्ता महाराज उठुन नेने वकील अन आण्णांचं बोलणं ऐकण्यासाठी माडीवर जातो. तिथं नेने वकिलांनी आण्णाला जमिनीच्या कागदपत्रांचं बाड दाखवायला आणालेलं असतं अन आण्णा ते बघत कॉटवर बसलेले असतात. आण्णाच्या आजारपणामुळं झालेलं नुकसान आणि त्याने कुणाकुणाला किती पैसे दिले याबद्दल बोलत असताना नेने वकील सगळं घर न्याहाळात असतो. तितक्यात दत्ता तिथं चहा घेऊन पोचतो पण त्याला ताकास तूर लागु न देता वकील काका चहा पिऊन बाड घेऊन निघुन जातात. मग माई येऊन आण्णांना पोहे खा म्हणुन सांगते पण ते पोहे नको फक्त चहाच पितो असं बोलुन चहाचा कप हातात घेतात. नेने वकील घरातुन बाहेर जाताना नाथा अंगणात पावसाने नासधुस झालेल्या अंगणाची मरम्मत करत असताना त्याच्याशी थोडं बोलतात अन नेमकं ते दरवाजातुन बघते ( पण काहीच ऐकु येत नाही म्हातारीला Proud ). नेने निघुन गेल्यावर माई नाथाला बोलावुन वकील काय म्हणत होते असं विचारते तेव्हा सुसल्याबद्दल विचारपुस करत होते असं नाथा सांगतो. ते ऐकुन माई रागाने नाथाला सुनावते की त्या पोरिचं नाव ह्या घरातच काय घराच्या आवारात पण घ्यायचं नाही.

मग रात्र होते अन निजानिज व्हायच्या वेळेला आण्णा माडीवर झोपलेले असतात. मग कॅमेर्‍याचा अँगल अगदी वाशातुन माडीची खोली दाखवत असतो त्यावेळेस वाशाला किड लागलेली दिसते (कदाचीत घराची वाताहत सुरु झाली असा त्याचा अर्थ असावा..! Uhoh ). त्याच वेळेस आण्णाला मांजर ओरडण्याचा आवाज येतो अन ते खाडकन झोपेतुन जागे होऊन उठुन खिडक्यांतुन खाली बघु लागतात. त्यांना काहीच दिसत नाही म्हणुन्ते झोपण्यासाठी पुन्हा मागे वळतात त्याच वेळी पाठीमागुन एक फोटोफ्रेम आण्णांच्या पायात येऊन पडते अन चपापलेले आण्णोबा ती फ्रेम उचलुन बघतात तर त्यात पाटणकराचा फोटॉ असतो. तो फोटॉ बघुन आण्णा संभ्रमात पडतो. अगदी त्याच्या चेहर्‍यावर लालभडक प्रकाश पडुन आपल्यालाही भिती वाटत असते तेव्हाच एपिसोड संपतो. (हा फोटो कुणी टाकला असावा..? मला तर तो सुसल्याने किंवा नाथाच्या बायकोने किंवा रघुकाकाने टाकला असावा असं वाटतंय..!)

तो फोटो वर टांगलेला असतो ना. बाहेरून कोणी दगड फेकल्यासारखा फोटो फ्रेम कसा फेकू शकतो. आज अण्णाला पाटणकर भेटतो आणि अण्णा सहकुटुंब त्याला जेवणाचं निमंत्रण देतो ते बघून मी जाम टरकले Uhoh अण्णा अगदी रात्र होईपर्यंत त्या पाटणकरशी काय बोलत असतात. दोन बायका भेटल्या आणि बोलता बोलता रात्र झाली तर एकवेळ समजू शकतो Wink
जास्त तूप घातलेली नारळाची खीर आणि बटाट्याची भाजी बनते की नाही ते उद्या समजेल. अण्णा नक्की किती वर्ष आजारी होता. पंधरा वर्ष तर नक्कीच झाली असतील.

तो फोटो वर टांगलेला असतो ना. बाहेरून कोणी दगड फेकल्यासारखा फोटो फ्रेम कसा फेकू शकतो>> हो. पाटणकराचा फोटो नाईकांच्या घरात टांगण्याचे काहीच प्रयोजन नाही. त्यामुळे तो बाहेरुन पडला असावा असं वाटतं. मागे परवाच्या भागात आण्णा माईपुढं पक्षांचं घरटं झाडवरुन पडायला हवं होतं पण ते बाजुनं कुणीतरी फेकलेलं वाटलं होतं Bw
--------------------------------------------------------------------------------------------------

कालचा भाग सुरु होतो तोच मुळी वाड्याचं रांगडं रुप अगदी समोरच्या अ‍ॅंगलने दाखवत. माडीवर आण्णा डोकं (टक्कल पडलेलं) हाताने दाबत कॉटवर बसलेले असतात अन माई त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. काय होतंय असं विचारुन ती काळाजीने त्यांना डॉक्टरकडे जाउया म्हणते पण आण्णा नकार देऊन हसण्यावारी उडवुन देतात. मग माई त्यांना काढो करुन देते असं म्हणत चहाचा कप तसाच खाली नेऊ लागते तर आण्णा तिला आडवुन चहाचा कप मागुन घेतात Proud तर त्यांना स्वतःचा शर्ट खांद्यावर फाटलेला दिसतो (दारिद्र्य आल्याचं लक्षण..! Uhoh ) अन माई त्यांना नवीन शर्ट घालायला देते.

खाली स्वयंपाक घरात आल्यावर माई बघते तर सरिताबाई सुपात तांदुळ निसत बसलेल्या असतात (ह्या सरिताला कधी चुलीपुढे रांधताना पाहिले नाही.. नुसती वरकामे करत बसलेली असते. असो.. छायासारखं ऐतखाऊ असती तर माईचे हाल आज कुत्रं खात नसतं हेही खरंच..! Biggrin ). मग आण्णांना डोकेदुखीचा त्रास होतो हे तिला माईकडुन कळतं अन काढो करयला घेतलेल्या माईला ती त्यात दालचिनी घाला असं अगोचरपणे सांगते (हिलाच तेवढं सगळं कळतं.. बाकी सगळे मट्ठ आहेत..! Angry ). माईपण तिचं ऐकल्यासारखं दाखवत दालचिनी काढ्यात टाकते अन तोवर सरिता तिचे चांगलेच कान भरते. आज अमवस्या आहे (आणि काल आपल्या इथे होती Bw ) अन ह्या असं दुखणं असलेल्या माणासाला अमावस्या - पोर्णिमेला जास्त त्रास होऊ शकतो हे सांगत काळजीत पडलेल्या माईला अजुन भिती घालते. बाजुला रचुन ठेवलेल्या कळशांतली एक कळशी खाली जमिनीवर कलंडते अन माईला घोर चिंता लागुन ती काढो घेऊन बाहेर जाऊ लागते अन जाता जाता सरिताला ते सांडलेलं पाणी पुसुन घ्यायला सांगते Biggrin (इथेही कॅमेरा पुर्ण कळशांच्या मागे भिंतीला लाऊन नवीनच अँगल घेतला होता.. त्या कॅमेर्‍याचा धक्का लागल्यानेच कळशी पडली असावी Proud )

इकडे खोलियेत हिशोब करण्यात गुंतलेल्या दत्ताला (ह्याला कामधंदा काहीच नाही पण एवढे हिशोब कशाचे ठेवत असतो काय माहित Proud ) त्याच्या(!) मोबाईलवर नेने वकिलांचा फोन येतो अन आण्णाला महत्त्वाया कामासाठी त्यांच्या ऑफिसला पाठवुन द्यायला सांगतो. त्यावर दत्ता त्यांना कसलं महत्त्वाचं काम आहे हे खोदुन विचारु लागतो तसा नेने वकिल फोन आण्णांना नेऊन द्यायला सांगतो. वर माडीवर आण्ण्णांना फोन दिल्यावर नेने त्यांना एकटेच ऑफिसला या म्हणुन सांगतो अन फोन ठेवतो. आण्णा पण मग लगेच नेनेंकडे जायला निघतात. दत्ता त्यांना सोबत येण्याची विनवणी करतो पण आण्णा हसत हसत ती धुडकावुन लावत निघुन जातात. जाता जाता दत्ता काळजीने त्यांना छत्री देतो. तोवर स्वयंपाक घरात घडलेला प्रसंग आटोपुन माई काढो घेऊन माडीवर निघालेली असते तिला अडवत दत्ता आण्णा नेनेंकडे गेले असं सांगुन तिच्या काळजीत अजुनच भर घालतो Uhoh .

मग आण्णा घरातुन बाहेर पडल्यावर भातांच्या खाचरांतुन जाणार्‍या नागमोडी रस्त्यावरुन मस्त रमतगमत निघालेले असतात अन आजुबाजुचा हिरवागार परिसर उन्हामधे न्हाऊन निघालेला असतो. आण्णांचं नवीन रुप आणि आनंदी मुद्रा सभोवतालच्या वातावरणाशी एकरुप झालेली दाखवता दाखवता ड्रोन कॅमेरा आपणाला उचलुन आकाशात झेपावत संपुर्ण परिसर एकवार पुन्हा दाखवतो तोवर समोरुन रघुकाका (नवीन लुक मधे Wink ) येताना दिसतात. त्यांची मिशी आणि उरलेले कानामागचे केस पुर्ण पांढरे झालेले असतात. त्यांना समोर बघुन आण्णांची कळी एकदम खुलते आणि तब्ब्येतीची चौकशी करत आज आमावस्या आहे असं म्हणत रघुकाका आण्णाला काळजी घ्यायला सांगतात. आण्णा नेने वकिलांकडे निघाला हे कळल्यावर रघुकाकाच्या चेहर्‍यावर बेरकीपणाची छटा उमटत दोघे आपापल्या मार्गाने मार्गस्थ होतात (अन तेही आपण ड्रोनच्या कृपेने हवेत उंच जाऊन बघतो Bw ). मग पुढे गेल्यावर आण्णांना कोणीतरी भेटते कारण जे कोणी भेटले ते स्वतः कॅमेरा बनुन भेटते अन त्याच्याशी बोलत असतानाच सीन कट होतो.

बराच वेळ होतो तरी आण्णा काही परतत नाही. त्यांनी जाताना काहीही खाल्लेलं नाही या काळजीने माई कासावीस होते अन दत्ताला नेने वकिलांना फोन करायला लावते तर नेने वकील म्हणतात आण्णा त्यांच्याकडे आलेच नाहीत म्हणुन Uhoh . ते ऐकुन इकडे दोघांचिही काळजी वाढते अन माईची दिवसभर तगमग तगमग सुरु होते.

तिन्हीसांजेला ती देवघरात जाते तर तिथं २ पेटलेल्या वाती जमिनीवर पडलेल्या दिसतात. घाबरलेली माई सरिताकडे बघते अन सरिता त्या वाती उंदराने खेचल्या असतील असं अगाध ज्ञान पाजळते (तो उंदीर नक्की कोण असेल याची आपणालाही कल्पना येते..! Proud ). मग माई नवीन वाती वळुन उदबत्तीच्या काडीने दिव्यात खोचते अन दिवा पेटवुन देवाला नमस्कार करते. बाहेर येऊन रात्र झाली तरी अजुन आण्णा कसे आले नाहीत म्हणुन त्यांना शोधायला दत्ताला पाठवते. काहीवेळाने दत्ता परत येतो पण एकटाच. खुप शोधलं तरी आण्णा सापडले नाहीत असं तो माईला सांगत असतानाच दोघांनाही आण्णा घराकडे येताना दिसतात अन त्यांचा जीव भांड्यात पडतो. दोघेही काळजीने त्यांची ओसरीतुनच चौकशी करु लागतात तसं अंगणात उभे असलेले आण्णोबा हसत हसत त्यांना इथेच चौकशी करत बसणार की जेवायला आत येऊ देणार असं विचारतात अन तिघेही समाधानाने घरात येतात.

माजघरात सगळे जेवायला बसलेले असताना सरिताचा आगोचरपणा पुन्हा सुरु होतो. दत्ताकडे दातओठ खात ती खुणेनेच आण्णांना ते कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी गेलेले ते विचारा म्हणुन खुणवत असते. मग बायकोचा बैल नुसता "आण्णा.." एवढंच बोलतो तोवर आण्णांना जे उचक्या लागतात (असल्या उचक्या ऐकुन काय बोलावे तेच सुचेनासं होतं..! Proud ) की त्यानंतरची १-२ मिनिटं माईने त्यांना पाणी-लोणी करण्यातच जातात. तेवढ्यात सरिताची पुन्हा तडफड सुरु होते. दत्ताने आण्णांना ते कोणत्या कामासाठी गेले होते हे विचारावे म्हणुन ती हातातल्या बांगड्या खणाखणा वाजवू लागते. ते बघुन दत्ताची पुन्हा एकदा पंचाईत होते अन हा सर्व प्रकार चाणाक्ष छाया नजरेच्या कोनातुन बरोब्बर हेरते. आपलं बिंग फुटु नये म्हणुन सरिताही लगेच वाजणार्‍या बांगड्या या तिच्या हाताला खाज आली म्हणुन वाजताहेत असं दाखवण्यासाठी खरुज झाल्याप्रमाणे खराखरा हात खाजवुन दाखवते Biggrin . दत्ता जीव खाऊन शेवटी आण्णांना विचारतोच की ते नेने वकिलांकडे न जाता इतका वेळ कुठं गेले होते (अन मग सरिताची तडफड बंद होते) . त्यावर आण्णा सांगतात की त्यांना वाटेत पि.डब्ल्यु.डी. चा साहेब भेटला त्याच्यासोबत बोलत बसले. त्यावर दत्ता पि.डब्ल्यु.डी. चा साहेब म्हणजे कोण ते करमण्कर (की कायसे) का? असं विचारतो त्यावर आण्णा "पाटणकर साहेब" Uhoh असं उत्तर देतो अन ते ऐकुन दत्ता, पाणी-लोणी करुन जरा कुठं शांत झालेली माई, हातातला घास हातात अन तोंडातला घास तोंडात असलेली छाया अन नुकतीच तडफड बंद झालेली सरिता सर्वांचे अचानक एअर ब्रेक्स लागतात अन एकाचवेळी सर्वजण चपापतात. हे सर्व आण्णाच्या गावीही नसतं अन तो पाटणकर साहेबाचं गुणगाण करुन त्यांना आठवत असलेलं पाटणकरासोबतचं संभाषण ऐकवु लागतात (आपल्याला ते दिसुही लागतं..! Wink ). आण्णा पाटणकर साहेबाला रस्त्यात भेटतात अन अगदी चांगल्या माणसाप्रमाणे तोंडभरुन चौकशी करतात. पाटणकर पण खुप आगत्याने बोलतो. आण्णा त्यांना आणि पाटणकरणीला उद्या जेवायला घरी बोलावतात. त्यांचं असं बोलणं बघायला आपणाला फार छान वाटतं पण लगेच भानावर येत "हे कसं शक्य आहे...?? Uhoh " असे विचार आपल्या डोक्यात येतात तसेच ते माई, दत्ता, सरिता अन छायाच्याही डोक्यात येतात अन सगळे घनघोर विचारात पडतात.

प्रीकॅप मधे आण्णा बर्‍याच दिवसांनी स्वयंपाक घरात येतात अन माईला भरपूर तूप घातलेली खीर अन सरिताला बटाट्याची भाजी करायला सांगतात. आज पाटणकर जोड जेवायला येणार आहेत असं हसत हसत आण्णा सर्वांना सांगतो अन सगळेच काळवंडलेल्या चेहर्‍याने आज काय होणार असा विचार करत राहतात.

आण्णा सुधारले का म्हणजे ? दत्त्ताची मुलं मोठी झाली , म्हणजे बराच काळ गेलेला दाखव्लाय मध्ये. नाना आणि वच्छी , तिचा नवरा दाखवले आहेत का

@ रावी : हो.. आण्णा सुधारले. दत्ताची मुलं मोठीही झाली अन त्यातला दिवटा वाईट संगतीलाही लागला. बराच काळ लोटला मधे हे तर ओघाने आलेच.

बाकी वच्छी अन तिचा नवरा (आबा) दोघांनी मिळुन कड्यावरुन नदीत उडी टाकली होती ते काही परत दाखवले नाहीत.. निदान मला तरी वच्छी जिवंत असेल आणि ती परत येऊन आण्णाचा बदला घेइल असं वाटत होतं

नाना कुठं गायब आहेत कळालं नाही.. पांडबा इसारला तर नाही ना..?? Proud

बाकी आण्णा ठिक झाल्यापासुन माईच्या आंबाड्यात सोनचाफ्याचं टप्पोरं फुल रोज डोकावतंय हे कुणाच्या लक्षात आलं का..?? Bw

मागे एका एपिसोड मध्ये पाटणकर बाई नेने ला फोन करते मोबाईल वर. नेने कडे स्मार्ट फोन दाखवलाय. मध्ये 17 एक वर्षाचा लीप धरला तरी 2003 मध्ये नेनेकडे स्मार्ट फोन होता असा अर्थ होईल:)

कालचा भाग सुरु होतो तो ही पुन्हा वाड्याचं रुप दाखवतच. स्वयंपाक घरात कॅमेरा अगदी झूम करुन माई कपात (फुलपात्र जाऊन नवीन कप आले बरं का..!) चहा गाळत असते सरिता चवळीच्या शेंगा विळीवर चिरत असते अन दत्ता चहा साठी कळशांच्या उतरंडीला पाठ करुन भुइवर बसकण मारुन असतो. तिघेही कालच्या पाटणकर जोडप्याला जेवायला बोलावण्याच्या धक्क्यातुन थोडे सावरलेले असतात आणि आज आण्णा हे सर्व विसरले असणार अशी मनाशी खुणगाठ बांधुन असतात. तेवढ्यात आण्णोबाच तिथं येतात अन माईस भरपुर खोबरं अन तूप घातलेली खीर तर सरितास बटाट्याची भाजी करण्यास सांगतात. पाटणकर जोड कोंबो खाउचा नाय म्हणान शाकाहारीच जेवण बनवुक लागतला असं हसत हसत सांगुन बाहेर जातात तसा नेहमीप्रमाणे सरिताच्या डोक्यास शॉट लागुन ती वचवच करु लागते. आण्णांना खूळ लागलं असं बोलते तोवर दत्ता तिला रागे भरतो. मग काय तिला कारणच सापडते अन उरलेल्या शेंगा चिरण्याचं काम मधेच सोडुन देत ती तरातरा तिच्या खोलियेत निघुन जाते.. पाठोपाठ बायकोचा बैल पण जातो Uhoh . मग माई चुलीपुढनं उठुन विळीवर बसते अन डोक्यावर हात मारुन उरलेल्या शेंगा कापायला घेते.

इकडे दत्ता-सरिताच्या खोलियेत सरिताची पुन्हा वचवच सुरु होते. दत्ताचा अक्षरशः पाणौतारा करुन मेलेल्या मढ्यांसाठी जेवण रांधुक तिचं कायोक खेटर आडला नाय असं बोलते. एक भाऊ मुंबईत अन एक भाऊ तालुक्याच्या ठिकाणी बसुन प्रगती करताहा अन दत्ता इथे गावात बसुन मढ्यांसाठी जेवण बनवुक सांगताहा असं बोलुन त्या मढ्यांसाठी आण्णांनाच जेवण रांधुन सांगा असं ठणकावते तसा दत्ता मग नाईकांचे पुरुष चुलीपुढं रांधत नाहीत असा बचाव करतो पण सरिताची गाडी जे सुसाट सुटते ती आवरणे त्याला मुश्कील होते.

मग नंतर माई तिचं काम उरकल्यावर दिवाणखाण्यात येऊन स्फुंदत असताना दत्ता तिला तिने सगळ्या घरासाठी एवढं कष्ट उपसले, सर्वांची काळजी घेतली अन अडचणीच्या काळात खंबीर पणॅ उभी रवली मगे आता डोळे का गळाते असं विचारल्यावर ती त्याला दुजोरा देत आण्णांनी तिला कधीही काही विचारलं नाही तरी काल नवीन साडी घेतली, देवळात यायला तयार झाले असं सगळं चांगलं सुरु असताना कुणाची नजर लागली घराला म्हणान रघुकाकांना बोलवायला नाथाला पाठवायला सांगते. रघुकाका येतात अन दिवाणखान्यात गादीवर बसतात. चहा विचारला तर नको म्हणतात. आण्णा वर माडीवर आहे याची खात्री करुन आज आमावस्या आहे अन भुतं या दिवशी घरात यायला बघताहा असं सांगुन दता-माईला अजुनच काळजीत टाकतात. त्यांना उपाय विचारेपर्यंत आण्णोबा खाली येतात अन हसत हसत रघुकाकांची चौकशी करुन आज रात्री जेवायला थांबण्याचा अतिशय आग्रह करतात. ते बघुन रघुकाकाची जी भंबेरी उडते की काही विचारु नका Proud . तो कसाबसा तिथुन पोबारा करतो अन त्याला अडवायला दत्ता पाठीमागुन धावत सुटतो. म्हातारं दत्ताला हिरव्यागार भात खाचरांमधुन जाणार्‍या नागमोडी रस्त्यानं चांगलंच पळवतं अन शेवटी दमुन एका कच्च्या रस्त्याच्या कडेला थांबतं. तिथं दत्ता त्यांना गाठतो अन उपाय विचारतो तर रघुकाका काहिही झालं तरी आण्णाला थांबवण्यासाठी लिंबु-मिरचीचा उतारा सांगतात.

इकडे माईला सरिता पुन्हा शाणपत्ती शिकवत बसलेली असते तेवढ्यात आण्णाही येतात अन हसर्‍या चेहर्‍याने स्वयंपाक घरात जाऊन गॅसवरच्या पातेल्यांत काय काय आहे ते बघु लागतात. अजुन काहीच तयारी का झाली नाही असं माई अन सरिताला विचारु लागतात तसं माई सांभाळुन घ्यायचं म्हणुन करतोय तयारी असं सांगत असतानाच सरिता अद्वतद्वा बोलु लागते अन मग माई तिला हाताला धरुन बाहेर दिवाणखान्यात आणुन रडवेल्या चेहर्‍याने तिचं संतापाच्या भरातलं विखारी बोलणं ऐकुन घेऊ लागतात तेवढ्यात दत्ता तिथं पोचतो अन त्याच्या समोरच सरिता आण्णांना खुळ लागलं आहे असं म्हणत ते खुळ आण्णा (कायमचे) जातील तेंव्हाच त्यांच्यासोबत कायमचं जाईल असं भोचकपणे बोलुन जाते तसा संतापातिरेकाने दत्ताचा हात उठतो (पण पडत नाही.. लाथों के भुत हातों से नही मानते.. ह्या सरिताला सिरियल संपायच्या आत दत्ताने एकदा चांगली लाथाडलेली बघायला आवडेल असं क्षणभर वाटुन जातं..! Biggrin ) तेवढ्यात स्वयंपाक घरातुन काहीतरी आवाज येऊ लागतो अन माई, सरिता अन दत्ता स्वयंपाक घरात जाउन बघतात तर आण्णा विळीवर नारळाच्या रिकाम्या करवंट्या किसत बसलेले असतात अन त्यातुन ताटामधे फक्त नारळाच्या करवंटीची खरवड पडत असते तेवढ्यात एपिसोड संपतो.

प्रीकॅप मधे आण्णांच्या हाताला लागलेले असते (विळीच लागली असणार..!) अन त्यावर हळद घालताना ते छायाला चांगली साडी नेसायला सांगतात अन ती तिच्या आजच्या अवताराला आण्णाच जबाब्दार आहेत आणि तेच आता चांगली साडी नेस म्हणत आहे बघुन आश्चर्यचकीत होते. आण्णा सर्वांसमोर तिची हात जोडुन माफी मागु लागतात आणि तिच्या ह्या दशेबद्दल क्षमा कर म्हणातात. वर पाटणकरांना सांगुन तिच्या लग्नासाठी स्थळ शोधायला सांगु असंही बोलतात.

सरिता आधी अशी नसते.
त्या घरातील परिस्तिति मुळे तशी वागायला सुरु करते.
पण अन्ना इतके वाईट वागले असून ही आयुष्य मजेत चालले आहे की...

पाटणकर प्रकरण सुरु झाल्यापासून धमाल येते बघायला. काल अण्णा रिकाम्या करवंट्या खवत होते, त्यांना खरंच खूळ लागलेलं दिसतंय. रघुकाका बरेच लांब पळत गेले की किंवा असंही असू शकतं की दत्ता त्यांच्या मागे धावू शकला नाही कारण किलोकिलोने वाढलाय तो Lol

@ अनिश्का. : हो.. आधी अशी नसते म्हणा सरिता पण या सर्वाला आण्णांचें बेफिकीरी आणि माईचं आस्ते कदम वागणं कारणीभुत आहे हे कितीही लक्शात घेतलं तरी आता सरिता २ मुलांची आई झाली थोडं मॅच्युअर वागणं अपेक्षीत आहे Uhoh

@ चंपा : हो.. दत्ता खरेच पायलीभर तरी वाढलेला आहे हे दिसतंय Biggrin

सरिताने सतत चोंबडेपणा करण्यापेक्षा ..गणेशकडे लक्ष दिले असते तर बरे झाले असते..सतत कांगावा.. माई सरिताची लायकी काढते ते बरेच झाले.. नुसताच आरडाओरडा..

हो तर काय श्रवु... सरिताच्या गुणामुळेच गणेशा वाया गेला असणार यात शंका नाही. फारच आक्रस्ताळी दाखवली आहे सरिता. वच्छी सारखी खमकी सासु मिळाली असती म्हणजे वठणीवर आली असती ही. सगळं आयतं मिळालं की अशी दुर्बुद्धी सुचते.

आख्या सिझन मधे कामं तर काय होती हिला..? कुठं भाजी चिरुन दे तर कुठं तांदुळ निवड तर कुठं कपडे धु तर कुठं २ बादल्या पाणी शेंद तर कधी सुकलेल्या कपड्यांच्या घड्या कर. काय केले काय हिने तेव्हा एवढे रोज उठुन तमाशा करते..? नाही म्हणायला लग्न झाल्यावर यांच्या घरी कोंबडीचं गावजेवण असतं तेव्हा ते कोंबडीचं मटण कापण्यासाठी चुकुन खाज्याचं लाकुड वापरलं गेलं म्हणुन सगळा चिकन रस्सा विषारी झाला त्यावेळेस हिने लगेच पुढं होऊन काहीतरी रस्सा बनवला अन गावजेवण शिस्तीत पार पडलं (अन् काशीला विषारी चिकन खायला देऊन अर्धमेला केलं ते जाऊदे म्हणा Wink ) काय ते सांगण्यासारखं कार्य...!

बाकी माई सारखी सुगरण सासु मिळुन सुद्धा कधी ही तिच्याकडुन बोंबिल कसे करायचे ते शिकली की कधी हिने बांगडे कसे तळायचे ते बघितलं की हळदीच्या पानातल्या पातोळ्या शिकली की कोंबडी वडे कसे करायचे ते शिकली की काळ्या वाटाण्याचो सांबार करून बघितलं की ओल्या नारळाचं सार केलं की कधी घावनं कशी करायची ते शिकून घेतलं..?? आक्खं आयुष्य सासुच्या हातचं आयतं गिळण्यात घालवलं अन वर तिच्याच डोक्यावर मिरे वाटते ही बाई... Angry

Screenshot_20200821-212252_Chrome.jpg

बापरे DJ, किती ते बारकाईने निरीक्षण ! लिहिण्याच्या ओघात बऱ्याच कोकणी डेलिकसीज आल्या आहेत बाकी...

त्या सरिताला कोणीतरी एकदा सांगायला हवं की बाई ग, तुझा नवरा माईचा पोटचा मुलगा नाही. त्यामुळे तू खर्‍या अर्थाने ह्या घरची सून नाहीस. अर्थात माईचं दत्तावर प्रेम असल्याने ती असं वागू शकणार नाही. छायानेच हे उदात्त कार्य पार पाडायला हवं. म्हणजे सरिताचं तोंड बंद होईल. :रागः गणेश असा उपजला ह्यात सरिताचा पूर्ण दोष नसेल. कारण ती मुलगी, पूर्वा ना तिचं नाव, ती समजूतदार दाखवली आहे. बहुतेक बापावर गेली असेल.

>>काळ्या वाटाण्याचो सांबार करून बघितलं की ओल्या नारळाचं सार

ह्या दोन्हीच्या रेसिपीज कोणी देता काय? कोणाचं काय तर कोणाचं काय Proud

हो.. पूर्वाच ती.

काळया वाताण्याचो सार केलेलं मी यांचं बघून. काळे वाटाणे डी मार्ट मधून आणून रात्री भिजत ठेवले अन् सकाळी चांगल्या ६-७ शिट्ट्या देऊन शिजवून घेतले. त्यातले थोडे वाटाणे काढून चांगले रगडून पूर्ण करून घेतलं. तापलेल्या पातेल्यात तेल तापवून मोहरी तडतडली की जिरे अन् हिंग, हळद, मालवणी मसाला ( जो मी अकेरीहून येताना सावंतवाडीत घेतला होता) टाकून त्यात रगडलेले वाटाणे चांगले परतून वर शिजलेले अख्खे वाटाणे अन् त्याचं पाणी टाकून मंद शेगडीवर शिजू द्यावं. तोवर भाजून वाटलेल्या कांदा, खोबरं अन् कोथिंबीर वाटण अन् चिंचेचा थोडा कोळ त्या उकळलेल्या रश्श्यात टाकून दाटपणा आणावा. थोडावेळ उकळून गरमागरम चपाती सोबत हाणावे.

नारळाचं सार कसं केलेलं माइने ते दाखवलं च नाही.. नुसतं ती केलेलं सार किटली मध्ये ओतून त्यासोबत घावने पिशवीत ठेऊन माधवला देते अन् अभिरमाला हॉस्टेल मध्ये देऊन ये म्हणून सांगते तर माधव तो डबा पाटणकरणीला नेऊन देतो an सुषमा सोबत ती पण ते सार - घावन यथेच्छ हादडून वाड्यात येऊन माई ला पोचपावती देते.. अन् ह्या प्रकाराने माधवला माईची सणसणीत कानाफड बसते. असं आहे ते सार माहात्म्य.. कसं केलं ते रवळनाथ जाणो

कालच्या भागात चांगलीच खळबळ माजली. नेहमीप्रमाणे वाड्याचं दर्शन देत कॅमेरा आपणाला आत नेतो अन थेट स्वयंपाक घरात आण्णा विळीवर खोबर्‍याची करवंटी खोवत बसलेले दिसतात. त्यांच्याकडे आश्चर्याने बघत माई, सरिता अन दत्ता आता काय करावे या गहन प्रश्नात पडलेले असतात. दत्ता त्यांना विचारतो की ते काय करत आहेत तर त्यावर ते प्रसन्न चेहर्‍याने करवंटी खोवत खोवत च उत्तर देतात की खिरीसाठी नारळ खोवत आहेत. तयारी करुची असा ना.. पाटणकर येणार आहेत (हे ऐकुन सरिताची पुन्हा सटकणार असं वाटत असताना ती गप्प राहिली याचं समाधान चाटुन जातं Proud ). तेवढ्यात सरिताला विळीच्या खाली असलेल्या ताटात रक्त ठिबकत असलेलं दिसतं अन ती ओरडुन माईला ती विळी काढा असं सांगते. मग सगळ्यांचीच तारांबळ उडते अन दत्ता कसाबसा आण्णांना उठवुन दिवाणखाण्यात नेतो अन मागोमाग माई. जाता जाता ती सरिताला उघडी विळी बंद करण्याचं सांगायला विसरत नाही Wink .

मग बाहेर दिवाणखाण्यात आण्णा-माईंच्या तसविरीखाली ठेवलेल्या खुर्चीवर आण्णांना बसवलं जातं अन माईने सांगितल्याबरहुकुम सरिता आतुन हळद अन पाणी घेऊन येते (आज बरा चांगलं वागण्याचा मुड आला हिला..! असं आपणाला दुसर्‍यांदा वाटुन जातं Proud ). मग आण्णांच्या जखमेवर हळद लावली जाते अन ते वेदनेने ओरडु लागतात. तेवढ्यात छाया तिथं येते अन एवढ्या जणांच्या नरडीचा घोट घेतलेल्या माणसाला स्वतःचं एवढंसं रक्त आलेलं पाहुन इतके का ओरडत आहेत याच नवल वाटते. ती त्याबद्दल प्रश्नही विचारत रहाते. तिला माई खुणेनेच गप्प करते तोवर तिच्याकडे बघत आण्णा तिला जरा बरी साडी घाल म्हणुन सांगतात. स्वतःच्या या अवताराला आण्णाच जबाबदार असताना आता ते तिला चांगली साडी घालायला सांगत आहेत याचा धक्का बसुन ती पुन्हा त्याबद्दल आण्णांना जाब विचारु लागते तसं आण्णा तिची हात जोडुन माफी मागतात अन तिला आता लग्न करायचे असेल तर अभिरामाच्या लग्नात त्याच मांडवात तिचंही लग्न लाउन देतो असं बोलतात त्यासाठी पाटणकरांना सांगुन चांगलं स्थळ शोधायला सांगतो असंही बोलतात. ते ऐकुन भांबावलेली छाया झाड बनते. Wink

मग आण्णांचं असं असंबंध वागणं बघुन माईचा थरकाप होतो अन ती संतापाने स्वयंपाक घरात जाऊन एका नारळाच्या झावळीच्या खोबणीत लालबुंद निखारे घेऊन येते अन दारात उभा असलेल्या सरितास बाजुक रव म्हणात थेट ओसरीत अन तिथुन थेट पाटणकरणीच्या घराकडे कूच करते. ते बघुन दत्ता-सरिता आये आये करत मागोमाग येऊ लागतात अन जोरदार पावसाने वाताहत झालेल्या अंगणातुन हातात निखारे घेऊन अनवाणी पायाने माई स्लो मोशन मधे पाटणकरणीच्या घराकडे येऊ लागते. निखार्‍यांच्या मागे ऊब घेत आपणही स्लो मोशन मधे पाटणकरणीच्या अंगणात पोचतो अन तिच्या घराची झालेली दुर्दशा पाहुन चुकचुकतो. पाटणकरणीच्या घरावर जंगली वेल वाढलेले असतात. अंगण पुर्ण झाडोर्‍याने गच्च झालेलं असतं अन त्या तसल्या घरावर दात ओठ खात, शिव्या शाप देत माई ते जळते निखारे टाकते अन मागोमाग आलेले सरिता दत्ता माईला समजावु लागतात अन तिला परत मागे वाड्यात घेऊन येतात. दिवाणखाण्यातल्या गादीवर बसवुन सरिता अगदी आज्ञाधारक असलेल्या सुने सारखी माईची समजुत काढु लागते अन तेवढ्यात मघाशी खुर्चीत बसलेले आण्णा कुठं गेले असं त्या तिघांनाही वाटतं. कदाचीत वर माडीवर असतील असा कयास लावुन दत्ता रघुकाकांनी सांगितलेलो उपाय करुक जातो तर स्वयंपाक घरात ठेवलेली लिंबु-मिरच्यांची पिशवी गायब Uhoh सरिता पण सगळीकडे शोधते अन तिथं आलेल्या छायाची पण साक्ष निघते पण पिशवीचा कायोक पत्तो लागात नाही. त्या लिंबांचा रस जमिनीवर न सांडता तोरण करायचं असं रघुकाकांनी सांगितलेलं आहे असं दत्ता सांगत असतो.

नेमकं त्याचवेळी परसदारी असलेल्या खोलियेत (किती महिन्यांनी या खोलीत शुटींग झालं..!) रसरशीत लिंबात दाभण टोचुन त्याचा रस जमीनीवर सांडताना आपणाला दिसतं अन ती लिंबं ओवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसुन आपला पांडबा असतो. आण्णांसोबत तो तिथं बसुन लिंबु अन मिरच्या सुतळीत ओवत असतो. बाहेर सर्वांची शोधाशोध सुरु असताना हे दोघे ते तोरण घेऊन दिवाणखाण्यात येतात अन त्यांना बघुन सारेच चपापतात. माई "अवो.. अवो.. " अन दत्ता "ए खुळ्या.. ए खुळ्या.. " करत असतानाही आण्णा अन पांडबा ते तोरण बाहेर ओसरीतल्या खांबाला मोठ्या मुश्किलीने बांधतात. रात्र झाली तरी पाटणकर जोड अजुन कसा आला नाही या चिंतेत आण्णा असतात अन ते छत्री घेऊन त्यांना आणायला अंधारात बाहेर पडतात. माई पुन्हा "अवो..अवो" करत अंगणातल्या चिखलात त्यांच्या मागेपुढे करुन घरात येते अन दत्ताला त्यांना परत आणायला पाठवते. या कारणास्तव सरिता पचकणार तेवढ्यात दत्ता तिला वेसण घालतो (हुश्श.. आजचा भाग तरी हिच्या वचवचीविना पार पडणार हे बघुन आपणाला हायसं वाटतं..! Biggrin ) अन बापाशीक शोधायला तो पण बाहेर पडतो.

तिकडे आण्णा पाटणकरांच्या घरी (जुन्या) पोचतात अन त्या घरला कुलुप लावलेले असते (बर्‍याच महिन्यांनी त्या घराच्या अंगणात येऊन आपणालाही बरं वाटतं.. बहुतेक ही त्या घराची शेवटचीच फ्रेम..!) अन ते बघुन गहन विचारात बुडालेले आण्णा तसेच अंधारात मागे फिरतात. येता येता त्यांना गावातील कोणीतरी माणुस भेटतो अन तो त्यांची आस्थेने चौकशी करतो. इतक्या रात्री कुठे फिरता असं विचारल्यावर आण्णोबा त्याला सांगतत की ते पाटणकरांकडे आलेले पण ते तिथं नाहीत म्हणान तर तो माणुस जाम चपापतो. आण्णांना तो विचारतो की त्यांच्या स्वतःच्या घरी सोडुन येऊ का तर आण्णा नकार देत त्या माणासाला "भला माणुस" असं म्हणत त्याचे पाय धरु लागतात तसा तो चपापलेला माणुस लगेच नौ-दो-ग्यारह होतो Biggrin .. आण्णोबा पुढं चालु लागतात.

पुढे गेल्यावर त्यांना पाटणकर आणि पाटणकरीण दोघेही जोडीने भेटतात (त्या दोघांना बघुन क्षणभर आपणालाही बरं वाटतं.. जणु काय आत्ताच सुरुवात झाली असा भ्रम होतो..!) आण्णा त्यांना ते आत्ता त्यांच्या घरुनच जाऊन आलेत असं सांगितल्यावर ते दोघेही आता तिथे रहात नाहीत असं सांगतात. मग ते दोघे सद्ध्या कुठं रहातात असं विचारल्यावर पाटणकरीण सांगते की ते असेच आसरा शोधत फिरत आहेत म्हणुन. ते ऐकुन आण्णा त्यांना आमचं घर असताना तुम्ही असं फिरलेलं बरं दिसत नाही असं म्हणत पाटणकरणीची ट्रंक स्वतःच्या डोक्यावर घेतो (ही तीच ट्रंक असते ज्यात शोभाचं मढं भरुन विल्हेवाट लावायला नेलेलं असतं Uhoh ). ती ट्रंक आण्णांच्या डोक्यावर देत पाटणकर अन पाटणकरीण त्यांना बजावतात की जपुन हं ती एका माणासाच्या वजनाएवढी जड आहे म्हणून Uhoh (हे ऐकुन आपल्याला कसंसंच होतं) पण आण्णा मात्र ती जडशीळ ट्रंक कसोशीने डोक्यावरुन वहात दोघांनाही पाठिमागुन या असं फर्मावत घराकडे येऊ लागतात.

इकडे वाड्यात आण्णा अजुन कसे आले नाहीत म्हणान दिवाणखाण्यात बसलेल्या माईच्या अन दत्ता साठी सरिताच्या चेहर्‍यावर काळजी असताना पांडु "आण्णा ईलंय.. आण्णा ईलंय.." असं सांगुन ते चौघेही (छायासहित Wink ) मुख्य दारातुन बाहेर बघु लागतात. आण्णा डोक्यावर काहीतरी जड सामान घेतलेल्या अविर्भावात आणि मागुन कुणालातरी या या असं सांगत अंगणात पोचतात पण वास्तवात त्यांच्या डोक्यावरही काही नसते अन मागुनही कोणी येत नसते. अशा भासमय अवस्थेत आण्णा येताना पांडबाला मात्र प्रश्न पडतो की हे नक्की काय आणत आहेत आणि त्यांच्या मागेही कोणी नाही. (न) आणालेलं ओझं उतरवण्यासाठी आण्णा पांडुला मदतीसाठी बोलवतात अन तोही त्यांना ते (न दिसलेलं) ओझं घरात आणायला मदत करु लागतो. घरात येऊन आण्णा ते ओझं उतरवतात. दिवाणखाण्यात उतरवलं गेलेलं न दिसणारं सामान बघुन माई, सरिता अन छायाच्या चेहर्‍यावर भयंकर काळजी दाटुन येत एपिसोड संपतो.

प्रीकॅप मधे रघुकाकांना घेऊन दत्ता वाड्यात शिरणार तेवढ्यात त्यांना तिथं तोरण तुटुन पसरलेली लिंबे-मिरच्या दिसतात अन "ह्या भयंकर असा... त्यांनी डाव साधलाहा... ता घरात येतले.." असलं भितीदायक काहीतरी बोलतात. बघुया आता आज पुढं काय होतं ते..!

कालच्या भागातही जरा बरीच धावाधाव झाली सर्वांची. आण्णा घरात न दिसणारं सामान आणि न दिसणारे पाटणकर-पाटणकरीण यांना घेऊन आल्यावर ओसरीत लावलेले लिंबु मिरच्यांचे तोरण तुटुन सगळीकडे पसरले जाते ते बघुन माईसहित छाया अन सरिताचे जबडे उघडेच रहातात. पाटणकर जोड्यासाठी या-बसा केल्यावर माईस पाणी आणण्याचं फर्मान सोडले जाते. त्याबरहुकुम माई स्वयंपाक घरात जाऊन एका पितळी पेल्यात पाणी आणते म्हणा पण न दिसणार्‍या पाटणकर जोडप्याला ते कसे द्यायचे या विचारात तळ्यात-मळ्यात करत असतानाच तिच्या हातुन तो पेला निसट्तो अन भुईवर सांडतो. पाटणकरांच्या कपड्यांवर पेला पडता पडता वाचला असं बोलुन आण्णा स्वत:च्या धोतराच्या सोद्याने भुईवर सांडलेलं पाणी पुसु लागतात. माई अन सरितास जेवणाचं बघा तोवर या दोघांना त्यांच्या खोलियेत सोडुन येतो म्हणत ते तिथुन अदृश्य जोडप्यास या या करुन आत नेतात.

इकडे बाहेर दत्ता रघुकाकांना घेऊन येतो खरा पण ओसरीची पायरीही न चढता ते दोघे ओसरीत तोरण सुटुन अस्ताव्यस्त पडलेली लिंबु मिरच्या पहात उभे रहातात. भुतांनी डाव साधल्यान अन ती दोघं (पाटणकर जोड) घरात घुसलीहा असं सांगत "ह्या फार भयंकर असा... अमुशा संपुची वाट बघुक लागताहा" असं म्हणुन रघुकाका आल्या पावली निघुन जातात. सैरभैर झालेला दत्ता दिवाणखाण्यात येऊन जेवणाच्या कोड्यात पडलेल्या माई सरितास ह्या प्रकारापुढे रघुकाकांनी पण हात टेकले असं सांगुन टाकतो. आता अमुशा संपेपर्यंत कायोक करता येउचा नाय असं रघुकाकांनी सांगितलं आहे हेही सांगुन टाकतो. पाटणकर दांपत्य आता घरात आलेलं आहे अन जे काय होइत ते बघत रवायचं असं त्याने सांगितल्यावर मात्र माई मघाशी आण्णा जिकडे गेले तिकडे आत जाते (त्यावेळी तिच्या आंबाड्यात सोनचाफ्याचं फुल नसतं हं..!) .

आत माईच्या खोलियेत आण्णा त्या पाटणकर जोडप्यासाठी व्यवस्था लावत असतात. त्यासाठी माईचं सामान तिथुन काढुन घेत ते पिशवीत भरु लागतात. तेवढ्यात माई तिथं पोचते (यावेळेस मात्र तिच्या आंबाड्यात सोनचाफ्याचं फुल डोकवू लागतं Proud ) तर आण्णा तिला पाटणकरांसाठी ती खोली सोडुन छायाच्या खोलियेत जा असं सांगतात. ते ऐकुन माई दु:खी अंतकरणाने पिशवी घेऊन दिवाणखाण्यात येते अन तिची अवस्था बघुन छाया तिला म्हणते की हिचो सवत मेल्यावर पण हिचो पाठ सोडणा नाय Uhoh तेवढ्यात आण्णा अदृश्य पाटणकर बाईला घेऊन माडीवरची खोली अन गॅलरी बघायला घेऊन जातात. तिथं त्यांचा थोडा संवाद होऊन ते गॅलरीत आलेले असतात तेव्हा पाटणकरीण (ती फक्त आण्णा एकटे असतानाच आपणाला दिसत असते.. दुसरं कोण आलं की ती गायब Wink ) समोरच्या जांभळीच्या झाडाकडे (ज्यास तिने टांगुन घेतलेले असते) बघत असते ते पाहुन आण्णा त्या झाडाचा इतिहास आणि वर्तमान तिला सांगु लागतात. तेवढ्यात दत्ता त्यांना जेवायला बोलवण्यासाठी तिथं येतो अन मग न दिसणार्‍या पाटणकरणीला घेऊन ते दोघं माजघरात जेवायला येतात. तिथं दोन समांतर अशा सतरंजीच्या घड्या बसण्यासाठी अंथरलेल्या असतात. माई दारासमोर टोपलं, भाजी, खिरिचे टोप घेऊन बसलेली असते तर तिच्या उजव्या बाजुला सरिता ताटं वाढत असते. सरिताच्या उजव्या बाजुच्या सतरंजीवर छाया अन माईच्या डाव्या बाजुच्या सतरंजीवर दत्ता ताट वाढुन जेवायला बसतात. आण्णा मात्र त्या अदृश्य पाटणकरांना दत्ता शेजारी अन पाटणकरणीस छाया शेजारी बसवून माई अन ते स्वतः नंतर जेवु असं सांगुन जेवणास सुरुवात करा असं सांगतात. माईच्या हातच्या जेवणाची अन सरिताच्या हातच्या भाजीची तारीफ करुन पोटभर जेवा असं म्हणत ते त्या दोघांना वाढलेल्या ताटात अजुन भात अन भाजी वाढुन ठेवतात. ते बघुन सगळे त्यांना अन्न वाया जईल असं म्हणत असताना आण्णा मात्र सर्वांकडे हसुन दुर्लक्ष करुन पाटणकरांचे यथोचित आदरातिथ्य करुन त्यांना झोपायच्या (माईच्या) खोलियेत पाठवतात.

ह्या प्रकारामुळे सरिता, छाया, दत्ताचं डोकं सटकतं अन छाया पाठोपाठ दत्ताही न जेवता उठुन दिवाणाखाण्यात येतो. माईही येते. छाया अद्वातद्वा बोलु लागते की ह्या माणासाने जन्मभर नीट जेऊ दिलं नाही.. याला खुळ लागलं वगैरे वगैरे अन तेवढ्यात तिथं आण्णा येतात. ते तिला पाहुण्यांबद्दल असं बोलु नको म्हणतात तसा तिचा स्क्रू सटकतो अन ती आण्णांना जाब विचारु लागते की कुठं आहेत पाटणकर जोडपे..? अन ती आण्णांच्या हाताला धरुन रागा वैतागात पुन्हा माजघरात आणते (पाठोपाठ उरलेले तिघंही येतात Proud ) अन पाटणकर कुठं आहेत असं आण्णांना बोलु लागते. त्यांना खुळ लागलं आहे हे सांगुन ती त्यांना गदागदा हलवते. मग आण्णा जरा शांत होऊन छायाला म्हणतात की ते बाप म्हणुन तिच्याशी ते कधीच चांगलं वागले नाही. जर त्यांनी तिचं लग्न चांगल्या ठिकाणी लावुन दिलं असतं तर आज ती ४ दिवस आई-बापांकडे येऊन नवर्‍याचं गुणगाण करुन पुन्हा सासरी गेलेली बघायला मिळाली असती वगैरे वगैरे (बहुतेक उरलेले सर्व दिवस एकेका पात्रा बद्दल प्रेक्षकांना सॉफ्ट कॉर्नर वाटावा म्हणुन असे काळीज पिळवटणारे प्रसंग टाकु लागले आहेत असं वाटुन जातं... सरिता पण नाही का काल पासुन गुडीगुडी सुन व्हायचा प्रयत्न करतेय..! Angry ) पण ते आता तिच्याशी चांगलं वागतील फक्त पाटणकरांना काही बोलु नकोस अन मग तिचे पाय धरुन माफी मागु लागतात अन माई, दत्ता, सरितासहीत आपणही आचंबीत होत एपिसोड संपतो.. Uhoh

प्रीकॅप मधे छाया माई अन सरितापुढे धाय मोकलुन रडत असते अन आण्णांनी तिचे पाय धरुन माफी मागावी असं तिला आजिबात वाटत नव्हतं फक्त त्यांनी लहाणपणापासुन पोरांना प्रेम दिलं असतं अन प्रत्येकाला समजुन घेतलं असतं तर आज तिची स्वतःची ही आणि आण्णांची अशी (पोरिच्या पाया पडण्याची) दशा झाली नसती असं म्हणत असते.

Pages