छतशेती - सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तन्त्राने.

Submitted by साधना on 29 December, 2018 - 04:02
terrace farming

श्री. सुभाष पाळेकर गुरुजींचे एक नैसर्गिक शेतीविषयक शिबीर नुकतेच पनवेल येथे पार पडले. शिबिरात बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला. पण माझ्या ह्या लेखाचा तो विषय नाही.

पाळेकर गुरुजींबद्दल मी प्रथम ऐकले निसर्गाच्या गप्पा ह्या मायबोली धाग्याच्या व्हाट्सअप्प गृपवर. जागुने गेल्या वर्षी श्री. तुषार देसाईना ग्रुपमध्ये घेतले. त्यांनी गुरुजींच्या शून्य बजेट नैसर्गिक शेतीबद्दल अधून मधून बोलायला सुरवात केली. शेतीविषयक म्हटल्यावर मी कान टवकारले पण फक्त देशी गायीचेच शेण हवे वगैरे ऐकून मला वाटले हे नवे काहीतरी फॅड असणार. शेण हे शेण आहे. मग ती देशी गाय असो वा विदेशी. बैल असो वा म्हैस. काय फरक पडतो विशिष्ट शेणाने? हे काहीतरीच सांगतात असा विचार करून मी त्या विषयाकडे दुर्लक्ष केले. नंतर देसाईंच्या फार्मला भेट दिली तिथे त्यांची पत्नी विद्याही देशी गायच हवी म्हणायला लागली. नाहीतर म्हणे रिझल्ट्स मिळत नाहीत. मी तिला उलटसुलट विचारून बघितले पण देशी गाय हवीच यावर ती ठाम होती. ते ऐकून संधी मिळाली तर म्हशीचे शेण वापरून बघायचे हे मी मनातल्या मनात ठरवून टाकले.

माझा शेतीतला रस पाहून मी गुरुजींच्या शिबिराला हजेरी लावावी यासाठी तुषार आग्रह करायचे. मलाही उत्सुकता होती. तशा दोन संधी आल्याही. पण दोन्ही वेळेस वैयक्तिक दुर्घटनांमुळे मला जाता आले नाही.

गेल्या वर्षी नोव्हेंबरात पुण्याला गुरुजींचे दोन दिवसांचे एक शिबीर आयोजित केले गेले होते. त्या शिबिराला मला घेऊन जाण्यात तुषार यशस्वी झाले. शिबिरात देशी गायच का हा विषय गुरुजींनी समजावल्यावर देशी गायीचे महत्व लक्षात यायला लागले. गुरुजींची सगळी पुस्तके विकत घेतली. देशी गायीवरचे पुस्तक वाचले, त्यात दिलेल्या शोधनिबंधांचे संदर्भ नेटवर शोधले व लक्षात आले की गुरुजी जे बोलतात त्याला गुरुजींनी स्वतः केलेल्या प्रयोगांचे अथवा प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांचे संदर्भ आहेत. उगीच स्वतःला सोयीचे ते हवेत ठोकून दिले असे गुरुजी करत नाहीत. माझा विश्वास बसू लागला.

त्या शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले व सुभाष पाळेकर तंत्र वापरणारे खूप शेतकरी भेटले. त्या सगळ्यांचे अनुभव ऐकल्यावर व गुरुजींची पुस्तके वाचल्यावर शेतकऱ्यांनी स्वतःला जगवायचे असेल, आत्महत्यांपासून स्वतःला रोखायचे असेल तर सुभाष पाळेकर शेतीला पर्याय नाही हे डोक्यात फिट झाले. पुर्णपणे रासायनिक खतांवर पोसलेला शेतीमाल खाऊन कर्करोग, मधुमेह, निकामी मूत्रपिंडे वगैरे रोगांना बळी पडणे अपल्याला थांबवायचे तर झिरो बजेट शेतीला पर्याय नाही हे डोक्यात फिट झाले. इतर सर्व शेतीपद्धती जसे ऑरगॅनिक, गांडूळखत वगैरे ह्या रासायनिक इतक्याच घातक व निसर्गाची हानी करणाऱ्या आहेत हे डोक्यात फिट झाले. झिरो बजेट, ज्याचे आता सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नामकरण करण्यात आले आहे, जी विषमुक्त अन्न पुरवू शकते तीच एकमेव अशी पद्धत आहे जी शेती, शेतकरी व खाणारे सामान्य यांना तारू शकते हे डोक्यात फिट झाले.

तर आता हा धागा मी का काढला त्याकडे वळते. पनवेलच्या शिबिरात गुरुजींनी छतशेती या विषयाला तीन तास दिले.

नीती आयोगाने सगळ्या राज्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीपद्धती अंगिकारावी असे निर्देश दिले असले तरी भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश व झारखंड ह्या राज्यानीच ती पद्धती स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अजून लक्ष दिलेले नाही. महाराष्ट्रात सुभाष पाळेकर पद्धतीचे शेतकरी आता वाढत असले तरी इतर राज्यांच्या तुलनेत ते कमी आहेत. त्यामुळे आज मुंबईत विषमुक्त भाजीपाला खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शहरात ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी स्वतःपुरता भाजीपाला पिकवला तर निदान तेव्हढेतरी विषमुक्त अन्न त्यांना खायला मिळेल हा विचार करून शहरातील शिबिरात छतशेतीचा प्रचार गुरुजी करतात. शहरात छतावर जागा असते, लागेल तेवढे ऊन असते, मुबलक पाणी असते. मग हे सगळे वाया का घालवायचे? का नाही आपण आपले अन्न स्वतःच पिकवू शकत? हाही एक विचार यामागे आहे. याशिवाय लोकांना विषमुक्त शेतमाल ही कल्पना समजायला व भविष्यात विषमुक्त अन्न विकणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हायला याचा उपयोग होईल हे वेगळे.

तर मला शिबिरात जी माहिती मिळाली ती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवावी व ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःचे विषमुक्त अन्न स्वतःच पिकवायचा आनंद घ्यावा हा या धाग्याचा हेतू आहे.

ज्यांच्याकडे जागा आहे व दिवसाचे 6-7 तास थेट ऊन मिळते त्यांनी जागेचे नियोजन, भाजीचे नियोजन व जीवामृताचे नियोजन कसे करावे हे खाली दिले आहे.

छतावरील शेती तीन गटात विभागली आहे. तुमच्या जागा उपलब्धतेनुसार व तुमच्या गरजेनुसार या तीन गटातील कुठलाही एक गट अथवा एकापेक्षा जास्त गट किंवा सर्व गट निवडून तुम्ही छतशेती करू शकता.

छतशेती सुरू करण्याआधी बाजारातून एक उत्तम प्रतीची, शेततळ्यात वापरली जाणारी प्लास्टिक शीट विकत घ्या व पूर्ण छतावर किंवा ज्या भागात शेती करणार तिथे पसरा. यामुळे पाणीगळतीचा त्रास होणार नाही. तसेच छत किती मजबूत आहे याचा अंदाज घ्या. छतशेतीमुळे छतावर जास्त भार येत नाही कारण माती जास्त वापरली जात नाही, वाळलेली पाने जास्त वापरली जातात. तरीही ओल्या मातीचे वजन सुकलेल्या मातीच्या दुप्पट होते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे छताची सक्षमता ठरवा.

छतशेतीसाठी सजीव जिवाणूमाती: चुनखडी व चिकणमाती सोडून इतर कुठल्याही प्रकारची लाल अथवा काळी माती घ्या. बारीक मुरूम असला तरी चालेल. मातीच्या १० ते २५ टक्के घनजीवामृत त्यावर टाका. त्यावर नैसर्गिकरित्या सुकलेला पालापाचोळा टाका. आता त्यावर जीवामृताचे जाडसर मिश्रण टाका, फावड्याने सर्व नीट एकत्र करा आणि त्याचा सावलीत ढीग करून ठेवा. ४८ तासांमध्ये सजीव माती तयार होते. ही माती आपल्याला वापरायची आहे.

गट पहिला: सर्व प्रकारच्या पालेभाज्या व कंद.

पालेभाजीत सर्व पालेभाज्या जसे मेथी, पालक, चुका, चाकवत, अंबाडी, कोथिंबीर, माठ, तांदुळजा वगैरे.

कंदभाजीत कांदे, लसूण, गाजर, मुळा, बिट, सलगम, नवलकोल वगैरे. यात बटाटे लावता येणार नाही, त्यांना जास्त जागा लागते.

प्लास्टिक शीटवर सहा फूट लांब व तीन फूट रुंद आयत आखून घ्या व त्याच्या चारही बाजूला एक एक वीट आडवी ठेवा. म्हणजे तुम्हाला ६' X ३' X विटेची उंची असा आयताकार खड्डा मिळेल. विटेची उंची साधारण साडेसहा ते नऊ सेंटीमीटर असते. विटा एकाला एक लागून ठेवा पण पाणी ओघळून जाईल इतकी लहान 3-4 मिमी फट ठेवा.

IMG_20171210_103150734_HDR~01_0.jpg

छतावर असे एकावर एक विटा रचून खड्डे बनवताना दोन खड्ड्यांच्या मध्ये पाणी/जिवामृत द्यायला, भाजी तोडायला तुम्हाला फिरता यावे यासाठी 2 फूट अंतर ठेवा.

IMG_20171210_103233362~01.jpg

खड्डे तयार झाले की वरून दोन बोटे जागा सोडून खड्ड्यात सजीव माती भरा. त्यावर जीवामृत शिंपडा.

सहा फूट लांबीला समांतर अशा साडेचार इंच अंतरावर रेघा पाडा व त्यात बीजामृत संस्कार केलेल्या पालेभाजीच्या बिया पेरा. बियांवर माती झाका व मातीवर वाळलेले गवत/पाने इत्यादींचे आच्छादन टाका. बिया रुजून वर अंकुर दिसायला लागला की ताबडतोब आच्छादन काढून घ्या. आच्छादन टाकल्याने बिया रुजायला आवश्यक ते वातावरण तिथे तयार होते. बिया रुजून आल्यावर आच्छादन काढले नाही तर आच्छादनात रोपे गुरफटायचा धोका आहे.

रोपांना नियमित मग अथवा कपाने थोडे थोडे पाणी द्या, विटांखालून बाहेर येणार नाही इतपत.

पाण्याचा पाईप हाती घेऊन पाणी देऊ नका.

महिन्यातून दोन तीनदा दोन ओळींच्या मध्ये कप किंवा मगाने जीवामृत हलक्याने ओता.

दर अमावास्या/ पौर्णिमेला कीडनिवारणार्थ ब्रम्हास्त्राची फवारणी करा. 300 मिली ब्रम्हास्त्र + 10 लिटर पाणी.

दर अष्टमीला जिवामृताची फवारणी करा. 10 लिटर पाणी + 750 मिली जीवामृत + 250 मिली आंबट ताक.

तुम्हाला अमावस्या/पौर्णिमा/अष्टमी कळत नसेल तर कॅलेंडरवर तारखा मार्क करून ठेवा व त्याप्रमाणे फवारणी द्या. शक्यतो तारखा चुकवू नका.

जीवामृत बनवताना किती खड्डे बनवले त्याप्रमाणे द्रावण कमीजास्त करा.

जीवामृताची फवारणी नियमित केली तर ब्रम्हास्त्राची फवारणी करायची वेळ येत नाही. पानांची नियमित तपासणी करा. पानाच्या मागच्या बाजूला उन्हात चमकणारी अंडी अथवा बारीक किडी आढळल्या तरच ब्रम्हास्त्र फवारावे. पानावर छोटासा लाल/पिवळा/काळा डाग दिसला तर बुरशीनाशक फवारा.

भाज्या कधीही मुळापासून उपटू नयेत, पाने खुडून घ्यावीत. त्यामुळे सतत नवे फुटवे येऊन दीर्घकाळ भाजी मिळत राहते.

गट क्रमांक 2 : सर्व प्रकारच्या फळभाज्या.

यात मिरची, टोमॅटो, फुल/पत्ताकोबी, ब्रोकोली, गवार, भेंडी, वाल, चवळी, मूग, वाटाणा वगैरे फळभाज्या येतात. यात बटाटे लावता येतील.

प्लास्टिक शीटवर ६' X ३' आकाराचे, दोन विटा एकमेकांवर रचून खड्डे बनवा. दोन खड्ड्यात 2 फूट अंतर ठेवा, तुम्हाला मधून फिरता यावे यासाठी. विटा रचताना अशा रचा की खालच्या दोन विटांच्या जॉईंटवर वरची वीट येईल. जास्तीचे पाणी जाण्यासाठी खालच्या दोन विटात थोडेसे अंतर ठेवा.

IMG_20171210_103157865_HDR~01.jpg

वरून दोन बोटे सोडून सजीव माती भरा.

सहा फुटाच्या बाजूला विटेपासून सहा इंच अंतर सोडून आडवी रेघ मारा, विरुद्ध दुसऱ्या बाजूलाही तशीच रेघ मारा. त्यावर मध्ये थोडे थोडे अंतर सोडून फळभाजी लावा.

मध्ये 2 फूट जागा मोकळी राहील. त्याच्या मध्यभागी आडवी रेघ मारून त्यावर कडधान्ये लावा.

फळभाज्या - मिरची, टोमॅटो, कोबी, ब्रोकोली, गवार, भेंडी वगैरे.

कडधान्ये - मटार, चवळी, उडीद वगैरे द्विदल प्रकार.

ऋतू बघून त्या ऋतूत येणारी कडधान्ये व भाज्या पेरा.

कडधान्ये उगवून आल्यानंतर दोन्ही कोपऱ्यात दोन व मध्ये एक असे झेंडू लावा.

कडधान्ये जमिनित नायट्रोजन फिक्स करतात, तो फळभाज्यांना मिळतो. कडधान्य रोपांची पाने सतत गळून पडतात, त्यामुळे आच्छादन मिळते. यावर मित्रकिडी येतात ज्या फळभाज्यांवरील शत्रूकिडींचा बंदोबस्त करतात.

झेंडूच्या मुळांमध्ये फळभाज्यांच्या मुळांच्या गाठीत निवास करणाऱ्या सूत्रकृमीचे (नीमॅटोड) नियंत्रण करणारे औषधी तत्व असते. झेंडूवर भरपूर मित्रकिडी व मधमाशा आकर्षित होतात. मित्रकिडी फळभाज्यांवरच्या शत्रूकिडींचा नाश करतात. मधमाशा फळभाज्यांचे परागीभवन करण्यास मदत करतात.

मिरची, वांगी वगैरे फळभाजीचे उत्पादन निघाल्यावर जोडफांद्या छाटून जीवामृत शिंपडावे व खाली आच्छादन करावे. परत नव्या फांद्या फुटतात व उत्पन्न मिळते. फुल/पत्ता कोबी कापून घ्यायचा, रोप उपटायचे नाही. नवे फुल येते. उत्तम दर्जासाठी जीवामृत फवारणी नियमित करत राहावी.

गट 2 चे पाणी व जीवामृत व्यवस्थापन गट 1 प्रमाणे करावे.

गट क्रमांक 3 : फळझाडे व इतर.

यात ऊस, तूर, पपई, केळी, मोहरी, डाळिंब, सीताफळ, कढीपत्ता, दालचिनी, पेरू, शेवगा, हादगा इत्यादींचा समावेश होतो.

यासाठी ६' X ३' चा खड्डा तिहेरी विटा रचून बनवावा.

तूर, ऊस, पपई, केळी लावायची असतील तर ६' X ३' चा खड्डा पुरेसा आहे.

डाळिंब, सीताफळ, कढीपत्ता लावायचा असेल तर ६' X ६' चा खड्डा तयार करा.

आपण मध्यम उंचीची झाडे लावणार आहोत हे लक्षात घ्या.

सर्वप्रथम जे फळझाड लावणार त्याचे कलम रोपवाटिकेतून आणून, त्यावरील प्लास्टिक पिशवी फाडून ती तयार खड्ड्याच्या मधोमध ठेवा व नंतर वरून सहा बोटे राहतील इतकी जागा सोडून खड्ड्यात माती भरा. त्यावर पालापाचोळा आच्छादा व जीवामृत शिंपडा.

एका खड्ड्यात एकच फळझाड आपण लावणार आहोत हे लक्षात घ्या.

खरीप हंगाम असेल तर तूर व रब्बी असेल तर मोहरी विटेपासून सहा इंच अंतरावर चार कोपऱ्यात लावा.

चारही बाजूंना विटांपासून 1 फूट अंतर सोडून एक चौकोन आखून त्यावर फळभाज्या लावा. ६' X ६' चा खड्डा असेल तर आत अजून एक चौकोन फळभाज्यांचा घेता येईल. याच्या आतली मुख्य फळझाडाभोवतीची सगळी जागा आच्छादनाने भरा.

सहा इंच जागा सोडली तिथे कडधान्ये व झेंडू लावा.

बाकी कुठे रिकामी जागा दिसली तर तिथे पालेभाज्या लावा.

पाणी व जीवामृताचे व्यवस्थापन आधी लिहिल्याप्रमाणे करा. जितके शक्य तितके जीवामृत देत राहिले व मित्रकिडींचा बंदोबस्त करणारी झाडे असली तर फारसा काही त्रास न होता उत्पन्न मिळते.

पालेभाज्या 1 फूट बाय 9 इंच उंच कुंडीतही वाढवता येतात. तिसऱ्या गटातील फळझाडे 500 लिटरच्या प्लास्टिक पिंपात वाढवता येतात. पिंपाचा तळ व झाकण कापून टाकावे. पिंप मधून कापावे म्हणजे आपल्याला दोन बसकी पिंपे मिळतात, त्यात फळझाडे लावता येतात.

गच्चीवर 200 लिटर पाण्याची पिंपे ठेऊन ती पावसाळ्यात भरायची. भरली की त्यावर गच्च झाकणे लावून वर भरपूर गवत पसरायचे. आपण कमीत कमी पाणी वापरणार असल्याने पिंपात भरून ठेवलेले पाणी पुरते.

तर वर लिहिल्या प्रमाणे तीन गटात विभागून छतशेती करता येईल.

यात मेहनत भरपूर आहे. जीवामृत वापरायच्या तारखा चुकवून चालत नाही. जीवामृत आज वापरायचे तर तीन चार दिवस आधी ते बनवायला घ्यावे लागते. त्यामुळे नीट वेळापत्रक बनवून ते काटेकोरपणे पाळावे लागते. हयगय, कंटाळा केला की अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण अनुभव असा आहे की सुरवातीला ही मेहनत केली की नंतर आपोआप तिथे एक इकोसिस्टीम तयार होते व ती स्वतःचे नियोजन स्वतःच करायला लागते.

गांडूळखत वर्मीकंपोस्ट

गांडूळे जमिनीखाली राहणारे कृमी आहेत. जमिनीत ते खाली वर फिरत राहतात, जमिनीच्या आत त्यांच्या फिरण्याने पोकळ्या तयार होतात. यामुळे जमीन सैल होते, मुळांना वाढायला वाव मिळतो. गांडूळे सहसा प्रकाशात येत नाहीत, जमिनीखाली राहतात, तिथेच मिळणारे कुजलेले वनस्पतींचे भाग खातात व विष्ठा टाकतात. या विष्ठेतून झाडांच्या वाढीला आवश्यक मूलद्रव्ये खालच्या थरातून वर येतात व मुळांना मिळतात. गांडूळांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात ते यासाठी.

गांडुळात तीन प्रकार आहेत. पहिला जमिनीच्या पृष्ठभागावर राहून तिथले कुजलेले वनस्पतीभाग खाणारा, दुसरा जमिनीच्या खाली 10 ते 30 सेमी खाली राहून, जमिनीला समांतर बोगदे करणारा, माती खाणारा व तिसरा खोल जमिनीत राहून उभे बोगदे करून वर येऊन पाने खाणारा.

भारतात आढळणारे बहुसंख्य गांडूळ दुसऱ्या प्रकारात मोडतात. ते जमिनीच्या खाली 10 ते 30 सेमी राहतात व तिथेच आडवे तिडवे बोगदे करतात. माती खाऊन त्यातली मूलद्रव्ये मुळांना उपलब्ध करतात.

गांडूळखतात वापरतात तो ऐसेनीया फीटीडा हा पहिल्या प्रकारात मोडणारा गांडूळ आहे. तो जमिनीच्या पृष्ठभागाजवळ राहतो व तिथला कुजलेला वनस्पतिभाग खातो. यामुळे पृष्ठभागावर असलेला ह्युमस नाहीसा होतो. ह्युमसचे आवरण जमिनीवर असणे खूप गरजेचे आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये विघटित करणारे लाखो सूक्ष्मजीव व बुरशी ह्या ह्युमसखाली वावरत असतात. रासायनिक शेतीने हा ह्युमस संपवला आहे. तो ह्युमस परत निर्माण करण्याचे प्रयत्न नैसर्गिक शेतीद्वारे सुरू असताना फिटिडा गांडूळ शेतात वापरले तर ते तयार होणारा ह्युमस खात राहणार, ह्युमस निर्माण होणार नाही. शिवाय गांडूळांना खाण्यासाठी शेतात सतत कुजलेला पालापाचोळा टाकावा लागणार. ही शेती मग फायद्याची होणार कशी? पाळेकर गुरुजींचा गांडूळशेतीला विरोध आहे तो या कारणांसाठी.

माझे मत: जिथे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल व ऑरगॅनिक वेस्ट गोळा होते, जसे शहरातील कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंडस, तिथे हे गांडूळ वापरून खत बनवता येईल. हे खत बाल्कनी व टेरेस गार्डनिंग करणाऱ्या ग्रुप्सना वापरता येईल. मी कुंडीत गांडूळे वापरून झाडे लावलेली आहेत. आपण कुंडीत किंवा खड्ड्यात घरातील ऑरगॅनिक वेस्ट वापरून गांडूळखत बनवतो तेव्हा फिटीडा गांडूळांना लागणारे खाद्य आपण पुरवतो व त्या खाद्यापासून खत मिळवतो. आपल्यासाठी हे फायद्याचे ठरते. शेतात ही पद्धती वापरली तर कित्येक एकर शेतात पसरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ऑरगॅनिक वेस्ट लागेल.

बीजसंस्कार : कुठल्याही पिकाच्या बिया पेरताना बियाणातून रोगांचे बिजाणूही पेरले जातात, रोप जन्मतःच रोगग्रस्त होते. यावर उपाय म्हणून बियांना बाविस्टिन लावून मग बी पेरा असे कृषी विद्यापीठ सांगते. पण बाविस्टीनमुळे अपायकारक बीजाणू व बुरशीसोबत उपकारक बुरशी सुध्दा नाश पावते. म्हणून देशी गाईपासून बिजामृत वापरून बीजसंस्कार करावा. आपण कुंडीत लावायला म्हणून जे बीज बाजारातून विकत घेतो त्यालाही विषारी औषध चोळलेले असते. पाकिटावर तसा उल्लेख असतो.

बिजामृत : पाणी 20 लिटर, शेण 1 किलो, गोमूत्र किंवा मानवी मूत्र 1 लिटर, दूध 100 मिली, माती मूठभर, कळीचा चुना 50 ग्राम. हे सगळे एकत्र करून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी बियांवर शिंपडून हलक्या हाताने किंवा काठीने फिरवून घ्यावे. सावलीत बिया वाळवून नंतर पेरायच्या. रोपे तयार करून घेतली असतील तर त्याची मुळे बिजामृतात बुडवून काढायची व मग लावायची.

ऑरगॅनिक शेती दूरगामी विचार करता फायद्याची का नाही हे खालील वेब साईटवर दिलेय. ब्रम्हास्त्र, जीवामृत वगैरे कसे बनवायचे हे देखील या साईटवर दिलेय. इच्छुकांनी वाचावे.

http://www.palekarzerobudgetspiritualfarming.org/home.aspx

हा धागा काढायचा उद्देश 'शहरी शेती करू इच्छिणाऱ्या लोकांना अजून एक मॉडेल' हा आहे. शहरी शेती करणारे वर्मीकंपोस्ट, घरातील ओरर्गनिक वेस्ट कंपोस्ट इत्यादी पद्धती वापरत आहेत. मराठी विज्ञान संघ दाभोलकर प्रणित शहरी शेतीचा प्रसार करतात. त्यावरही मी एक धागा काढलेला आहे.

https://www.maayboli.com/node/52986

तुम्हाला जसे जमेल तसे करा. तुम्ही स्वतः पेरलेल्या बियातून भाजी उगवून ती खाताना किती गोड लागते याचा अनुभव स्वतः घ्या. कदाचित हा अनुभव घेत असताना शेतीत किती कष्ट आहेत याची जाणीव तुम्हाला होईल. ते कष्ट कळले तर आपल्या हातून कळत नकळत अन्नाची जी हानी होतेय तिला आळा बसेल.

हा धागा काढण्याचा उद्देश हा आहे. कोणाचा प्रचार करण्यासाठी हा धागा काढलेला नाही. वर दिलेल्या पद्धतीने छतशेती करताना मला जे बरेवाईट अनुभव येतील ते यापुढे लिहीन.

पुण्याला बरेच जण छतशेती करतात. त्यापैकी तीन चार जणांच्या शेतीला मी भेट दिलीय. बहुतेक लोक गेले पंधरा ते वीस वर्षे शेती करत आहेत. ते सगळेच गुरुजींच्या पद्धतीने करताहेत असे नाही. ट्रायल एरर मेथडने किंवा ज्ञात पद्धतींनी त्यांनी सुरवात केली. आजूबाजूचा सुकलेला पालापाचोळा, घरातील भाजीपाल्याचा कचरा वगैरे वापरून त्यांनी छतशेती केलेली आहे. तुम्ही पुण्यात असाल व भेट द्यायची इच्छा असेल तर मी पत्ते व फोन नंबर देईन.

खालील फोटो वेगवेगळ्या ठिकाणच्या छतशेतीचे आहेत. वर लिहिल्याप्रमाणे ह्या सगळ्या छतशेती पाळेकर पद्धतीने होतात असे नाही. केवळ छतशेती किती यशस्वी रित्या करता येते व यात काय प्रकारची पिके घेता येतात याची कल्पना यावी म्हणून मी फोटो दिलेत.

फोटो नं. 1:

IMG_20171210_103208261_HDR~01.jpg

फोटो नं. 2

दुधी सुकवून त्यात लावलेले रोप

IMG_20171210_115641625.jpg

फोटो नं 3:

गच्चीत लावलेले अंजीर, चिकू, पेरू. चिकू ड्रमात लावलाय.

IMG_20171210_121453771_HDR~01.jpg

इतका मोठा होता:

IMG_20171210_121458198_HDR~01_0.jpg

चिकूचा मोसम नव्हता, त्यामुळे फार थोडे चिकू होते.

IMG_20171210_121509157_HDR~01.jpg

झाड मोडून पडेल इतके पेरू लागले होते

IMG_20171210_115852299_HDR~01.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वर्षानुवर्षे एकाच वावरात ऊस करा असे कुठे म्हणालो. पाच एकर जमीन असेल तर दोन एकरात ऊस करा. दर दोन तीन वर्षांनी जागा बदलून लावा. ऊसातही आंतरपिके घेता येतात.

छतशेतीचा धागा /लेख आहे आणि ती व्यवस्था असणाऱ्या लोकांना जर बागकाम करावेसे वाटले तर उपयुक्त माहिती नक्कीच आहे.

Sadhana, good info.
A few of my colleagues and a few others i know are doing zbnf with mixed results. ( it worked in their home town, but they faced huge challenges in some other place).
So they are trying to find way/more observations and experiments etc.
They are also helping farmers to do zbnf and also sell their products.

साधना जी फेबु वर प्रकाश म्हणून आहेत. त्यांचे हायड्रोपोनिक्स/ अॅक्वापोनिक्सचे प्रयोग आवर्जून पहा.

प्रतिज्ञा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. शेती ही इतर उद्योगधंद्यासारखी नाही, तिथे माणसाच्या हाताबाहेरच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे पिकांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मेहनत व संयम तर हवाच पण सोबत आवडही असल्यास प्रयोगशील राहता येते.

शशिराम, नक्की पाहीन. प्रत्येकजण स्वतःच्या परीने प्रयत्न करतोय विषमुक्त अन्न पिकवण्याचा.

Nanba, spnf मध्ये कष्ट आहेत आणि चिकाटीही हवी. तरीही काही ठिकाणी ही पद्धती अवलंबलायला अडथळे येताहेत. शिवारफेरी, व्हाट्सएप ग्रुप्स वगैरेच्या माध्यमातून या प्रश्नांवर चर्चा होऊन मार्ग शोधले जातात. शेतकऱ्यांनी बाह्य मदतीवर अवलंबून न राहता स्वतःची कम्युनिटी बनवून शेती व विक्री बघावी ही अपेक्षा आहे. आणि हे घडतेय खूप ठिकाणी. जो ग्राहक एकदा विषमुक्त भाजी/फळे खातो त्याला रासायनिक शेती व विषमुक्त शेतीमधल्या उत्पादनात किती फरक आहे हे लक्षात येते व तो परत रासायनिक उत्पादनाकडे वळत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या सिझनमध्ये मला विषमुक्त द्राक्षे खायची संधी दोन तीनदा मिळाली. त्यानंतर मी नेहमीची द्राक्षे खाऊ शकले नाही, खाल्लेले द्राक्ष थुंकून टाकले.

हा एक चांगला विडिओ. ज्यांना घरीच शेती करणे शक्य आहे त्यांच्यासाठी.

श्री. सुधाकर पाटील यांनी घर बांधतानाच छतावर शेती करायची हे ठरवून तसे घर बांधले. पाटील spnf चे धडाडीचे कार्यकर्ते आहेत.

https://youtu.be/7YKfOPkK8RU

Pages