श्री. सुभाष पाळेकर गुरुजींचे एक नैसर्गिक शेतीविषयक शिबीर नुकतेच पनवेल येथे पार पडले. शिबिरात बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला. पण माझ्या ह्या लेखाचा तो विषय नाही.
पाळेकर गुरुजींबद्दल मी प्रथम ऐकले निसर्गाच्या गप्पा ह्या मायबोली धाग्याच्या व्हाट्सअप्प गृपवर. जागुने गेल्या वर्षी श्री. तुषार देसाईना ग्रुपमध्ये घेतले. त्यांनी गुरुजींच्या शून्य बजेट नैसर्गिक शेतीबद्दल अधून मधून बोलायला सुरवात केली. शेतीविषयक म्हटल्यावर मी कान टवकारले पण फक्त देशी गायीचेच शेण हवे वगैरे ऐकून मला वाटले हे नवे काहीतरी फॅड असणार. शेण हे शेण आहे. मग ती देशी गाय असो वा विदेशी. बैल असो वा म्हैस. काय फरक पडतो विशिष्ट शेणाने? हे काहीतरीच सांगतात असा विचार करून मी त्या विषयाकडे दुर्लक्ष केले. नंतर देसाईंच्या फार्मला भेट दिली तिथे त्यांची पत्नी विद्याही देशी गायच हवी म्हणायला लागली. नाहीतर म्हणे रिझल्ट्स मिळत नाहीत. मी तिला उलटसुलट विचारून बघितले पण देशी गाय हवीच यावर ती ठाम होती. ते ऐकून संधी मिळाली तर म्हशीचे शेण वापरून बघायचे हे मी मनातल्या मनात ठरवून टाकले.
माझा शेतीतला रस पाहून मी गुरुजींच्या शिबिराला हजेरी लावावी यासाठी तुषार आग्रह करायचे. मलाही उत्सुकता होती. तशा दोन संधी आल्याही. पण दोन्ही वेळेस वैयक्तिक दुर्घटनांमुळे मला जाता आले नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात पुण्याला गुरुजींचे दोन दिवसांचे एक शिबीर आयोजित केले गेले होते. त्या शिबिराला मला घेऊन जाण्यात तुषार यशस्वी झाले. शिबिरात देशी गायच का हा विषय गुरुजींनी समजावल्यावर देशी गायीचे महत्व लक्षात यायला लागले. गुरुजींची सगळी पुस्तके विकत घेतली. देशी गायीवरचे पुस्तक वाचले, त्यात दिलेल्या शोधनिबंधांचे संदर्भ नेटवर शोधले व लक्षात आले की गुरुजी जे बोलतात त्याला गुरुजींनी स्वतः केलेल्या प्रयोगांचे अथवा प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांचे संदर्भ आहेत. उगीच स्वतःला सोयीचे ते हवेत ठोकून दिले असे गुरुजी करत नाहीत. माझा विश्वास बसू लागला.
त्या शिबिरात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले व सुभाष पाळेकर तंत्र वापरणारे खूप शेतकरी भेटले. त्या सगळ्यांचे अनुभव ऐकल्यावर व गुरुजींची पुस्तके वाचल्यावर शेतकऱ्यांनी स्वतःला जगवायचे असेल, आत्महत्यांपासून स्वतःला रोखायचे असेल तर सुभाष पाळेकर शेतीला पर्याय नाही हे डोक्यात फिट झाले. पुर्णपणे रासायनिक खतांवर पोसलेला शेतीमाल खाऊन कर्करोग, मधुमेह, निकामी मूत्रपिंडे वगैरे रोगांना बळी पडणे अपल्याला थांबवायचे तर झिरो बजेट शेतीला पर्याय नाही हे डोक्यात फिट झाले. इतर सर्व शेतीपद्धती जसे ऑरगॅनिक, गांडूळखत वगैरे ह्या रासायनिक इतक्याच घातक व निसर्गाची हानी करणाऱ्या आहेत हे डोक्यात फिट झाले. झिरो बजेट, ज्याचे आता सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती असे नामकरण करण्यात आले आहे, जी विषमुक्त अन्न पुरवू शकते तीच एकमेव अशी पद्धत आहे जी शेती, शेतकरी व खाणारे सामान्य यांना तारू शकते हे डोक्यात फिट झाले.
तर आता हा धागा मी का काढला त्याकडे वळते. पनवेलच्या शिबिरात गुरुजींनी छतशेती या विषयाला तीन तास दिले.
नीती आयोगाने सगळ्या राज्यांनी सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीपद्धती अंगिकारावी असे निर्देश दिले असले तरी भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश व झारखंड ह्या राज्यानीच ती पद्धती स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अजून लक्ष दिलेले नाही. महाराष्ट्रात सुभाष पाळेकर पद्धतीचे शेतकरी आता वाढत असले तरी इतर राज्यांच्या तुलनेत ते कमी आहेत. त्यामुळे आज मुंबईत विषमुक्त भाजीपाला खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शहरात ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी स्वतःपुरता भाजीपाला पिकवला तर निदान तेव्हढेतरी विषमुक्त अन्न त्यांना खायला मिळेल हा विचार करून शहरातील शिबिरात छतशेतीचा प्रचार गुरुजी करतात. शहरात छतावर जागा असते, लागेल तेवढे ऊन असते, मुबलक पाणी असते. मग हे सगळे वाया का घालवायचे? का नाही आपण आपले अन्न स्वतःच पिकवू शकत? हाही एक विचार यामागे आहे. याशिवाय लोकांना विषमुक्त शेतमाल ही कल्पना समजायला व भविष्यात विषमुक्त अन्न विकणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हायला याचा उपयोग होईल हे वेगळे.
तर मला शिबिरात जी माहिती मिळाली ती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोचवावी व ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःचे विषमुक्त अन्न स्वतःच पिकवायचा आनंद घ्यावा हा या धाग्याचा हेतू आहे.
ज्यांच्याकडे जागा आहे व दिवसाचे 6-7 तास थेट ऊन मिळते त्यांनी जागेचे नियोजन, भाजीचे नियोजन व जीवामृताचे नियोजन कसे करावे हे खाली दिले आहे.
छतावरील शेती तीन गटात विभागली आहे. तुमच्या जागा उपलब्धतेनुसार व तुमच्या गरजेनुसार या तीन गटातील कुठलाही एक गट अथवा एकापेक्षा जास्त गट किंवा सर्व गट निवडून तुम्ही छतशेती करू शकता.
छतशेती सुरू करण्याआधी बाजारातून एक उत्तम प्रतीची, शेततळ्यात वापरली जाणारी प्लास्टिक शीट विकत घ्या व पूर्ण छतावर किंवा ज्या भागात शेती करणार तिथे पसरा. यामुळे पाणीगळतीचा त्रास होणार नाही. तसेच छत किती मजबूत आहे याचा अंदाज घ्या. छतशेतीमुळे छतावर जास्त भार येत नाही कारण माती जास्त वापरली जात नाही, वाळलेली पाने जास्त वापरली जातात. तरीही ओल्या मातीचे वजन सुकलेल्या मातीच्या दुप्पट होते हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे छताची सक्षमता ठरवा.
छतशेतीसाठी सजीव जिवाणूमाती: चुनखडी व चिकणमाती सोडून इतर कुठल्याही प्रकारची लाल अथवा काळी माती घ्या. बारीक मुरूम असला तरी चालेल. मातीच्या १० ते २५ टक्के घनजीवामृत त्यावर टाका. त्यावर नैसर्गिकरित्या सुकलेला पालापाचोळा टाका. आता त्यावर जीवामृताचे जाडसर मिश्रण टाका, फावड्याने सर्व नीट एकत्र करा आणि त्याचा सावलीत ढीग करून ठेवा. ४८ तासांमध्ये सजीव माती तयार होते. ही माती आपल्याला वापरायची आहे.
गट पहिला: सर्व प्रकारच्या पालेभाज्या व कंद.
पालेभाजीत सर्व पालेभाज्या जसे मेथी, पालक, चुका, चाकवत, अंबाडी, कोथिंबीर, माठ, तांदुळजा वगैरे.
कंदभाजीत कांदे, लसूण, गाजर, मुळा, बिट, सलगम, नवलकोल वगैरे. यात बटाटे लावता येणार नाही, त्यांना जास्त जागा लागते.
प्लास्टिक शीटवर सहा फूट लांब व तीन फूट रुंद आयत आखून घ्या व त्याच्या चारही बाजूला एक एक वीट आडवी ठेवा. म्हणजे तुम्हाला ६' X ३' X विटेची उंची असा आयताकार खड्डा मिळेल. विटेची उंची साधारण साडेसहा ते नऊ सेंटीमीटर असते. विटा एकाला एक लागून ठेवा पण पाणी ओघळून जाईल इतकी लहान 3-4 मिमी फट ठेवा.
छतावर असे एकावर एक विटा रचून खड्डे बनवताना दोन खड्ड्यांच्या मध्ये पाणी/जिवामृत द्यायला, भाजी तोडायला तुम्हाला फिरता यावे यासाठी 2 फूट अंतर ठेवा.
खड्डे तयार झाले की वरून दोन बोटे जागा सोडून खड्ड्यात सजीव माती भरा. त्यावर जीवामृत शिंपडा.
सहा फूट लांबीला समांतर अशा साडेचार इंच अंतरावर रेघा पाडा व त्यात बीजामृत संस्कार केलेल्या पालेभाजीच्या बिया पेरा. बियांवर माती झाका व मातीवर वाळलेले गवत/पाने इत्यादींचे आच्छादन टाका. बिया रुजून वर अंकुर दिसायला लागला की ताबडतोब आच्छादन काढून घ्या. आच्छादन टाकल्याने बिया रुजायला आवश्यक ते वातावरण तिथे तयार होते. बिया रुजून आल्यावर आच्छादन काढले नाही तर आच्छादनात रोपे गुरफटायचा धोका आहे.
रोपांना नियमित मग अथवा कपाने थोडे थोडे पाणी द्या, विटांखालून बाहेर येणार नाही इतपत.
पाण्याचा पाईप हाती घेऊन पाणी देऊ नका.
महिन्यातून दोन तीनदा दोन ओळींच्या मध्ये कप किंवा मगाने जीवामृत हलक्याने ओता.
दर अमावास्या/ पौर्णिमेला कीडनिवारणार्थ ब्रम्हास्त्राची फवारणी करा. 300 मिली ब्रम्हास्त्र + 10 लिटर पाणी.
दर अष्टमीला जिवामृताची फवारणी करा. 10 लिटर पाणी + 750 मिली जीवामृत + 250 मिली आंबट ताक.
तुम्हाला अमावस्या/पौर्णिमा/अष्टमी कळत नसेल तर कॅलेंडरवर तारखा मार्क करून ठेवा व त्याप्रमाणे फवारणी द्या. शक्यतो तारखा चुकवू नका.
जीवामृत बनवताना किती खड्डे बनवले त्याप्रमाणे द्रावण कमीजास्त करा.
जीवामृताची फवारणी नियमित केली तर ब्रम्हास्त्राची फवारणी करायची वेळ येत नाही. पानांची नियमित तपासणी करा. पानाच्या मागच्या बाजूला उन्हात चमकणारी अंडी अथवा बारीक किडी आढळल्या तरच ब्रम्हास्त्र फवारावे. पानावर छोटासा लाल/पिवळा/काळा डाग दिसला तर बुरशीनाशक फवारा.
भाज्या कधीही मुळापासून उपटू नयेत, पाने खुडून घ्यावीत. त्यामुळे सतत नवे फुटवे येऊन दीर्घकाळ भाजी मिळत राहते.
गट क्रमांक 2 : सर्व प्रकारच्या फळभाज्या.
यात मिरची, टोमॅटो, फुल/पत्ताकोबी, ब्रोकोली, गवार, भेंडी, वाल, चवळी, मूग, वाटाणा वगैरे फळभाज्या येतात. यात बटाटे लावता येतील.
प्लास्टिक शीटवर ६' X ३' आकाराचे, दोन विटा एकमेकांवर रचून खड्डे बनवा. दोन खड्ड्यात 2 फूट अंतर ठेवा, तुम्हाला मधून फिरता यावे यासाठी. विटा रचताना अशा रचा की खालच्या दोन विटांच्या जॉईंटवर वरची वीट येईल. जास्तीचे पाणी जाण्यासाठी खालच्या दोन विटात थोडेसे अंतर ठेवा.
वरून दोन बोटे सोडून सजीव माती भरा.
सहा फुटाच्या बाजूला विटेपासून सहा इंच अंतर सोडून आडवी रेघ मारा, विरुद्ध दुसऱ्या बाजूलाही तशीच रेघ मारा. त्यावर मध्ये थोडे थोडे अंतर सोडून फळभाजी लावा.
मध्ये 2 फूट जागा मोकळी राहील. त्याच्या मध्यभागी आडवी रेघ मारून त्यावर कडधान्ये लावा.
फळभाज्या - मिरची, टोमॅटो, कोबी, ब्रोकोली, गवार, भेंडी वगैरे.
कडधान्ये - मटार, चवळी, उडीद वगैरे द्विदल प्रकार.
ऋतू बघून त्या ऋतूत येणारी कडधान्ये व भाज्या पेरा.
कडधान्ये उगवून आल्यानंतर दोन्ही कोपऱ्यात दोन व मध्ये एक असे झेंडू लावा.
कडधान्ये जमिनित नायट्रोजन फिक्स करतात, तो फळभाज्यांना मिळतो. कडधान्य रोपांची पाने सतत गळून पडतात, त्यामुळे आच्छादन मिळते. यावर मित्रकिडी येतात ज्या फळभाज्यांवरील शत्रूकिडींचा बंदोबस्त करतात.
झेंडूच्या मुळांमध्ये फळभाज्यांच्या मुळांच्या गाठीत निवास करणाऱ्या सूत्रकृमीचे (नीमॅटोड) नियंत्रण करणारे औषधी तत्व असते. झेंडूवर भरपूर मित्रकिडी व मधमाशा आकर्षित होतात. मित्रकिडी फळभाज्यांवरच्या शत्रूकिडींचा नाश करतात. मधमाशा फळभाज्यांचे परागीभवन करण्यास मदत करतात.
मिरची, वांगी वगैरे फळभाजीचे उत्पादन निघाल्यावर जोडफांद्या छाटून जीवामृत शिंपडावे व खाली आच्छादन करावे. परत नव्या फांद्या फुटतात व उत्पन्न मिळते. फुल/पत्ता कोबी कापून घ्यायचा, रोप उपटायचे नाही. नवे फुल येते. उत्तम दर्जासाठी जीवामृत फवारणी नियमित करत राहावी.
गट 2 चे पाणी व जीवामृत व्यवस्थापन गट 1 प्रमाणे करावे.
गट क्रमांक 3 : फळझाडे व इतर.
यात ऊस, तूर, पपई, केळी, मोहरी, डाळिंब, सीताफळ, कढीपत्ता, दालचिनी, पेरू, शेवगा, हादगा इत्यादींचा समावेश होतो.
यासाठी ६' X ३' चा खड्डा तिहेरी विटा रचून बनवावा.
तूर, ऊस, पपई, केळी लावायची असतील तर ६' X ३' चा खड्डा पुरेसा आहे.
डाळिंब, सीताफळ, कढीपत्ता लावायचा असेल तर ६' X ६' चा खड्डा तयार करा.
आपण मध्यम उंचीची झाडे लावणार आहोत हे लक्षात घ्या.
सर्वप्रथम जे फळझाड लावणार त्याचे कलम रोपवाटिकेतून आणून, त्यावरील प्लास्टिक पिशवी फाडून ती तयार खड्ड्याच्या मधोमध ठेवा व नंतर वरून सहा बोटे राहतील इतकी जागा सोडून खड्ड्यात माती भरा. त्यावर पालापाचोळा आच्छादा व जीवामृत शिंपडा.
एका खड्ड्यात एकच फळझाड आपण लावणार आहोत हे लक्षात घ्या.
खरीप हंगाम असेल तर तूर व रब्बी असेल तर मोहरी विटेपासून सहा इंच अंतरावर चार कोपऱ्यात लावा.
चारही बाजूंना विटांपासून 1 फूट अंतर सोडून एक चौकोन आखून त्यावर फळभाज्या लावा. ६' X ६' चा खड्डा असेल तर आत अजून एक चौकोन फळभाज्यांचा घेता येईल. याच्या आतली मुख्य फळझाडाभोवतीची सगळी जागा आच्छादनाने भरा.
सहा इंच जागा सोडली तिथे कडधान्ये व झेंडू लावा.
बाकी कुठे रिकामी जागा दिसली तर तिथे पालेभाज्या लावा.
पाणी व जीवामृताचे व्यवस्थापन आधी लिहिल्याप्रमाणे करा. जितके शक्य तितके जीवामृत देत राहिले व मित्रकिडींचा बंदोबस्त करणारी झाडे असली तर फारसा काही त्रास न होता उत्पन्न मिळते.
पालेभाज्या 1 फूट बाय 9 इंच उंच कुंडीतही वाढवता येतात. तिसऱ्या गटातील फळझाडे 500 लिटरच्या प्लास्टिक पिंपात वाढवता येतात. पिंपाचा तळ व झाकण कापून टाकावे. पिंप मधून कापावे म्हणजे आपल्याला दोन बसकी पिंपे मिळतात, त्यात फळझाडे लावता येतात.
गच्चीवर 200 लिटर पाण्याची पिंपे ठेऊन ती पावसाळ्यात भरायची. भरली की त्यावर गच्च झाकणे लावून वर भरपूर गवत पसरायचे. आपण कमीत कमी पाणी वापरणार असल्याने पिंपात भरून ठेवलेले पाणी पुरते.
तर वर लिहिल्या प्रमाणे तीन गटात विभागून छतशेती करता येईल.
यात मेहनत भरपूर आहे. जीवामृत वापरायच्या तारखा चुकवून चालत नाही. जीवामृत आज वापरायचे तर तीन चार दिवस आधी ते बनवायला घ्यावे लागते. त्यामुळे नीट वेळापत्रक बनवून ते काटेकोरपणे पाळावे लागते. हयगय, कंटाळा केला की अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. पण अनुभव असा आहे की सुरवातीला ही मेहनत केली की नंतर आपोआप तिथे एक इकोसिस्टीम तयार होते व ती स्वतःचे नियोजन स्वतःच करायला लागते.
गांडूळखत वर्मीकंपोस्ट
गांडूळे जमिनीखाली राहणारे कृमी आहेत. जमिनीत ते खाली वर फिरत राहतात, जमिनीच्या आत त्यांच्या फिरण्याने पोकळ्या तयार होतात. यामुळे जमीन सैल होते, मुळांना वाढायला वाव मिळतो. गांडूळे सहसा प्रकाशात येत नाहीत, जमिनीखाली राहतात, तिथेच मिळणारे कुजलेले वनस्पतींचे भाग खातात व विष्ठा टाकतात. या विष्ठेतून झाडांच्या वाढीला आवश्यक मूलद्रव्ये खालच्या थरातून वर येतात व मुळांना मिळतात. गांडूळांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात ते यासाठी.
गांडुळात तीन प्रकार आहेत. पहिला जमिनीच्या पृष्ठभागावर राहून तिथले कुजलेले वनस्पतीभाग खाणारा, दुसरा जमिनीच्या खाली 10 ते 30 सेमी खाली राहून, जमिनीला समांतर बोगदे करणारा, माती खाणारा व तिसरा खोल जमिनीत राहून उभे बोगदे करून वर येऊन पाने खाणारा.
भारतात आढळणारे बहुसंख्य गांडूळ दुसऱ्या प्रकारात मोडतात. ते जमिनीच्या खाली 10 ते 30 सेमी राहतात व तिथेच आडवे तिडवे बोगदे करतात. माती खाऊन त्यातली मूलद्रव्ये मुळांना उपलब्ध करतात.
गांडूळखतात वापरतात तो ऐसेनीया फीटीडा हा पहिल्या प्रकारात मोडणारा गांडूळ आहे. तो जमिनीच्या पृष्ठभागाजवळ राहतो व तिथला कुजलेला वनस्पतिभाग खातो. यामुळे पृष्ठभागावर असलेला ह्युमस नाहीसा होतो. ह्युमसचे आवरण जमिनीवर असणे खूप गरजेचे आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये विघटित करणारे लाखो सूक्ष्मजीव व बुरशी ह्या ह्युमसखाली वावरत असतात. रासायनिक शेतीने हा ह्युमस संपवला आहे. तो ह्युमस परत निर्माण करण्याचे प्रयत्न नैसर्गिक शेतीद्वारे सुरू असताना फिटिडा गांडूळ शेतात वापरले तर ते तयार होणारा ह्युमस खात राहणार, ह्युमस निर्माण होणार नाही. शिवाय गांडूळांना खाण्यासाठी शेतात सतत कुजलेला पालापाचोळा टाकावा लागणार. ही शेती मग फायद्याची होणार कशी? पाळेकर गुरुजींचा गांडूळशेतीला विरोध आहे तो या कारणांसाठी.
माझे मत: जिथे खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीयल व ऑरगॅनिक वेस्ट गोळा होते, जसे शहरातील कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंडस, तिथे हे गांडूळ वापरून खत बनवता येईल. हे खत बाल्कनी व टेरेस गार्डनिंग करणाऱ्या ग्रुप्सना वापरता येईल. मी कुंडीत गांडूळे वापरून झाडे लावलेली आहेत. आपण कुंडीत किंवा खड्ड्यात घरातील ऑरगॅनिक वेस्ट वापरून गांडूळखत बनवतो तेव्हा फिटीडा गांडूळांना लागणारे खाद्य आपण पुरवतो व त्या खाद्यापासून खत मिळवतो. आपल्यासाठी हे फायद्याचे ठरते. शेतात ही पद्धती वापरली तर कित्येक एकर शेतात पसरण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ऑरगॅनिक वेस्ट लागेल.
बीजसंस्कार : कुठल्याही पिकाच्या बिया पेरताना बियाणातून रोगांचे बिजाणूही पेरले जातात, रोप जन्मतःच रोगग्रस्त होते. यावर उपाय म्हणून बियांना बाविस्टिन लावून मग बी पेरा असे कृषी विद्यापीठ सांगते. पण बाविस्टीनमुळे अपायकारक बीजाणू व बुरशीसोबत उपकारक बुरशी सुध्दा नाश पावते. म्हणून देशी गाईपासून बिजामृत वापरून बीजसंस्कार करावा. आपण कुंडीत लावायला म्हणून जे बीज बाजारातून विकत घेतो त्यालाही विषारी औषध चोळलेले असते. पाकिटावर तसा उल्लेख असतो.
बिजामृत : पाणी 20 लिटर, शेण 1 किलो, गोमूत्र किंवा मानवी मूत्र 1 लिटर, दूध 100 मिली, माती मूठभर, कळीचा चुना 50 ग्राम. हे सगळे एकत्र करून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी बियांवर शिंपडून हलक्या हाताने किंवा काठीने फिरवून घ्यावे. सावलीत बिया वाळवून नंतर पेरायच्या. रोपे तयार करून घेतली असतील तर त्याची मुळे बिजामृतात बुडवून काढायची व मग लावायची.
ऑरगॅनिक शेती दूरगामी विचार करता फायद्याची का नाही हे खालील वेब साईटवर दिलेय. ब्रम्हास्त्र, जीवामृत वगैरे कसे बनवायचे हे देखील या साईटवर दिलेय. इच्छुकांनी वाचावे.
http://www.palekarzerobudgetspiritualfarming.org/home.aspx
हा धागा काढायचा उद्देश 'शहरी शेती करू इच्छिणाऱ्या लोकांना अजून एक मॉडेल' हा आहे. शहरी शेती करणारे वर्मीकंपोस्ट, घरातील ओरर्गनिक वेस्ट कंपोस्ट इत्यादी पद्धती वापरत आहेत. मराठी विज्ञान संघ दाभोलकर प्रणित शहरी शेतीचा प्रसार करतात. त्यावरही मी एक धागा काढलेला आहे.
https://www.maayboli.com/node/52986
तुम्हाला जसे जमेल तसे करा. तुम्ही स्वतः पेरलेल्या बियातून भाजी उगवून ती खाताना किती गोड लागते याचा अनुभव स्वतः घ्या. कदाचित हा अनुभव घेत असताना शेतीत किती कष्ट आहेत याची जाणीव तुम्हाला होईल. ते कष्ट कळले तर आपल्या हातून कळत नकळत अन्नाची जी हानी होतेय तिला आळा बसेल.
हा धागा काढण्याचा उद्देश हा आहे. कोणाचा प्रचार करण्यासाठी हा धागा काढलेला नाही. वर दिलेल्या पद्धतीने छतशेती करताना मला जे बरेवाईट अनुभव येतील ते यापुढे लिहीन.
पुण्याला बरेच जण छतशेती करतात. त्यापैकी तीन चार जणांच्या शेतीला मी भेट दिलीय. बहुतेक लोक गेले पंधरा ते वीस वर्षे शेती करत आहेत. ते सगळेच गुरुजींच्या पद्धतीने करताहेत असे नाही. ट्रायल एरर मेथडने किंवा ज्ञात पद्धतींनी त्यांनी सुरवात केली. आजूबाजूचा सुकलेला पालापाचोळा, घरातील भाजीपाल्याचा कचरा वगैरे वापरून त्यांनी छतशेती केलेली आहे. तुम्ही पुण्यात असाल व भेट द्यायची इच्छा असेल तर मी पत्ते व फोन नंबर देईन.
खालील फोटो वेगवेगळ्या ठिकाणच्या छतशेतीचे आहेत. वर लिहिल्याप्रमाणे ह्या सगळ्या छतशेती पाळेकर पद्धतीने होतात असे नाही. केवळ छतशेती किती यशस्वी रित्या करता येते व यात काय प्रकारची पिके घेता येतात याची कल्पना यावी म्हणून मी फोटो दिलेत.
फोटो नं. 1:
फोटो नं. 2
दुधी सुकवून त्यात लावलेले रोप
फोटो नं 3:
गच्चीत लावलेले अंजीर, चिकू, पेरू. चिकू ड्रमात लावलाय.
इतका मोठा होता:
चिकूचा मोसम नव्हता, त्यामुळे फार थोडे चिकू होते.
झाड मोडून पडेल इतके पेरू लागले होते
डालडाच्या डब्यातली तुळस.
डालडाच्या डब्यातली तुळस.
Zbnf techniqueइस्राएलने
Zbnf techniqueइस्राएलने स्विकारले आहे का. आफ्रिकेत देशी गाई आहेत काय. सेंद्रिय शेतीमालाच्या नावाखाली काही भामटे पैसा कमावत आहेत त्यांना कसे रोखणार. माल शंभर टक्के सेंद्रिय आहे हे ग्राहकांना कसे समजणार.
वर कित्येकांना ज्या शंका
वर कित्येकांना ज्या शंका किंवा प्रश्न पडले आहेत ते सोडवून घेNयासाठी वर दिलेल्या नंबर्सवर कोणी फोन केला का हे जाणून घ्यायला आवडेल. संपर्क झाला की नाही, झाल्यास काही माहिती मिळाली का हे जरूर लिहा.
मायबोलीकरांना खरेच शेतीत रस आहे, नवे तंत्र समजून घ्यायचे आहे की नेटवर वायफळांचे मळे फुलवणे हीच माबोकरांची शेतीची कल्पना आहे हे जाणून घ्यायला आवडेल
दिक्षित पद्धतीवर भागवतकाकांनी
दिक्षित पद्धतीवर भागवतकाकांनी काढलेल्या धाग्याची आठवण आली...
थेट फोन करुन विचारा म्हणणारे असे भले मोठे प्रचारकी मळे फुलवण्यापेक्षा संबंधितांचे फोन नंबर आनि दोन ओळीत माहिती लिहून 'गरज असल्यास संपर्क करा' असे धागे का काढत नसावेत हे जाणून घ्यायला आवडेल
साधना जी मी स्वतः शेतकऱ्याचा
साधना जी मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमची जिरायती शेती बागायती करण्यासाठी आई-वडिलांनी केलेले कष्ट, लावलेले भांडवल , अनेक तडजोडी लहानपणापासून पाहिल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे माझे मत झाले आहे. जोपर्यंत शेतमालाला सध्याच्या भावाच्या चौपट भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या होतच राहतील. पिकवण्याचे सर्व ज्ञान शेतकऱ्यांकडे आहे. फक्त योग्य भाव मिळत नाही.
मळे फुलवण्यापेक्षा
मळे फुलवण्यापेक्षा संबंधितांचे फोन नंबर आनि दोन ओळीत माहिती लिहून 'गरज असल्यास संपर्क करा' असे धागे का काढत नसावेत हे जाणून घ्यायला आवडेल>>>>>>
माझ्याकडे जितकी माहिती आहे तितकी लिहिली. तुम्हाला त्या माहितीत रस नाही. तुम्हाला जी माहिती हवीय ती माझ्याकडे नाही. ती माहिती ज्यांच्याकडे मिळेल असे मला वाटले त्यांचे नंबर्स मी दिले. आता तुम्ही त्यांना विचारा. जमले तर त्या माहितीवर इथे धागा काढा.
अजून काय करायला हवे? आता फोनही मीच करून तुम्हाला हवी ती माहिती गोळा करून इथे लिहायची इतके महत्वाचे तुम्ही मला वाटत नाही.
पिकवण्याचे सर्व ज्ञान
पिकवण्याचे सर्व ज्ञान शेतकऱ्यांकडे आहे. फक्त योग्य भाव मिळत नाही.>>>
मग संगठित व्हा, भाव कसा मिळेल याचे मार्ग शोधा व भाव मिळवा. कुणीतरी दुसरा शेतकऱ्यांचे कल्याण करणार हा भ्रम अजून किती वर्षे बाळगणार?
बरोब्बर. ज्यांचे प्रचारकी मळे
बरोब्बर. ज्यांचे प्रचारकी मळे इथे फुकटात जाहिरात करुन फुलवत आहात ते लोक महत्त्वाचे असावेत. हमकू क्या?
तुम्ही धाग्यावर तुमची महिती मांडा, आम्ही आमची माहिती मांडून सामान्य वाचकांना (आमच्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत) निर्णयाची समान संधी मिळावी अशी अपेक्षा करतो.
साधनाजी, तुमच्याशी वैयक्तिक काही नाही. मला पाळेकरांची बुवाबाजी पटत नाही एवढेच. ह्या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद.
शशिराम. आता पिढिजात शेतकर्
शशिराम. आता पिढिजात शेतकर्यांनी गच्चिच्या कोपर्यात चार झाडं फुलवणार्यांकडून शिकायचे दिवस आलेत. आहात कुठे?
ह्या धाग्यावर हा शेवटचा
ज्यांचे प्रचारकी मळे इथे फुकटात जाहिरात करुन फुलवत आहात ते लोक महत्त्वाचे असावेत>>>
असावेत नाही, आहेत.
ह्या धाग्यावर हा शेवटचा प्रतिसाद.>>
धन्यवाद.
शशिराम. आता पिढिजात शेतकर्यांनी गच्चिच्या कोपर्यात चार झाडं फुलवणार्यांकडून शिकायचे दिवस आलेत. आहात कुठे?>>>>
काय करणार? शेतकरी कायम शेतकार्याच्याच भूमिकेत राहिले, जे पिकवले ते विकायची जबाबदारी त्यांनी कधीही घेतली नाही. ती जबाबदारी दुसऱ्या लोकांनी घेतली व विकून पैसे खिशात टाकून ते गब्बर झाले. शेतकऱ्यांनी स्वतःच स्वतःला ह्या स्थितीत आणल्यावर कुणीही ऐरा गैरा त्यांना हसून वर सल्ले देणारच ना....
प्रोसीजर बरीच किचकट दिसतेय.
प्रोसीजर बरीच किचकट दिसतेय. बंगल्याभोवती किंवा गच्चीवर अंमलात आणणे सोपे जावे. लेबर-इन्टेन्सिव वाटतेय. अर्थात यामागील तत्त्वे माहीत असली तरी मी स्वतः ही पद्धत पडताळलेली नाही, तशी( शेतीतून किंवा गच्चीबागेतून नफ्याची) आवश्यकताही वाटली नाही. त्यामुळे ठाम मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. हौस म्हणून 'होऊ दे खर्च' ठीक वाटला.
छोट्याश्या बागेतला अनुभव असा की चिमण्या टिटव्या वगैरे छोटे पक्षी कोवळी पाने, अंकुर खातात. अगदी दिवस उजाडण्यापूर्वी त्यांची लगबग सुरू होते. तुरू तुरू चालत छोट्या फांद्यांवरून उड्या मारत चाललेले त्यांचे खाणे चोरून पाहाताना मजा येते. जरा चाहूल लागली की अथवा कॅमेरा दिसला किंवा बाहेरचा दिवा लावला की भुर्र्कन उडून जातात. मिरची, गुलबक्शी, पुदिना, जाई, कोंबडा, कुरडू, कशाचेही कोवळे तुरे चालतात त्यांना. कदाचित पानांवरची बारीक कीड खात असतील. मध्यंतरी मावा पडला होता तेव्हा मात्र त्या पानांना चोचही लावत नव्हते. कडुनिम्बाचे कीटकनाशक वापरतो. कीटकनाशकाला कीड जुमानत नाही. मग 'खाऊ दे पाखरांना' म्हणून पहाटे उठून त्यांची ढकलाढकली पाहात बसतो. संध्याकाळी घरट्यांत परतताना आमच्याकडे पाण्यासाठी 'हॉल्ट' असतो. प्लास्टिकच्या वाडग्यातले पाणी उगीचच गर्दी करून पितात. एक एक करून रांग लावावी की नाही! कावळेसुद्धा घुसाघुशी करतात. कधीकधी वाडगा लवंडतो. मग कलकलाट. 'तूच तूच' म्हणून एकमेकांकडे चंचुनिर्देश करतात. मजा असते. नवरात्रातील नऊ धान्यांचे 'रुजवण' शेवटी मातीत न गाडता बाहेर मातीतच रुजू देतो. रोपे वाढतात. कणसे येतात. पक्ष्यांची चंगळ होते. आयते 'पोंक' (हुरडा) मिळते. असो. विषयांतर झाले.
आम्ही आमची माहिती मांडून
आम्ही आमची माहिती मांडून सामान्य वाचकांना (आमच्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत) निर्णयाची समान संधी मिळावी अशी अपेक्षा करतो.>>>>
ही माहिती तुम्ही अवश्य मांडा, पण ती स्वतः मिळवून मांडा, व्हाट्सअप्प फोरवर्ड मधून आली म्हणजे ती खरीच असणार म्हणून मांडू नका ही विनंती.
हा विषय असा आहे की तुम्ही स्वतः प्रयोग करून पाहू शकत नाही (खरे तर पाहू शकता पण तितका वेळ व साधनांची उपलब्धता हवी)… जे करताहेत ते जर उपलब्ध असतील तर त्यांच्याशी बोलून त्यांची बाजू समजून घ्या. मग तुमचा तर्क मांडा.
विरोध करणाऱ्यांचे अजेंडे काय असतात हे माहीत नाही. गुरुजी सरसकट रासायनिक खत कंपन्यांवर हल्ले चढवतात, त्यांनी प्रचंड नुकसान केलेय, त्यांची दुकाने बंद व्हायला हवीत म्हणून सांगतात. अशा वेळी ज्यांची दुकाने बंद पडली/पडतील असे दुकानदारांना वाटते ते प्रतिहल्ले करणारच.
रासायनिक शेतीची बाजू सगळ्यांनी पाहिलीय, नैसर्गिक शेतीची बाजूही स्वतः पहा आणि स्वतः ठरवा काय योग्य ते. केवळ प्रचाराला बळी पडू नका ही विनंती.
तुमच्या बहुमूल्य वेळेबद्दल मनापासून आभार.
या विषयावर अजून काही लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही.
सोलापूर शिवारफेरीसाठी ट्रेन तिकिटे तर काढलीयेत. शिवारफेरी घडली तर इथे फोटोंसकट वृत्तांत द्यायला परत येईन.
हीरा, छान वाटले वाचून. जो माणूस निसर्गात रमतो त्याला वेळ कसा घालवावा ही चिंता उरत नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=clVc032YN_I
व्हिडीओ पूर्ण शेवटपर्यंत शांतपणे बघून घ्या.
दीक्षित धाग्यावर जे झाले तेच तुम्हीही इथे म्हणत आहात. तिकडे इतर डॉक्टर आणि फार्मा कंपन्यांचे नुकसान होईल म्हणून दीक्षित विरोधी प्रचार करतात असा सूर आहे. इकडे तुम्हीही तोच सूर लावलाय. तुम्ही सूर तर अगदी प्रामाणिकपणे लावला पण सत्य मात्र तुम्हाला अजिबात माहिती नाही हेच त्यातून दिसून आले.
whatsapp फोरवर्ड वर गच्चीवाले हौशी शेतकरी उडउड करतात. खरे शेतकरी स्वत: अनुभव घेऊनच बोलतात. पण तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला वाटते तुमच्याशिवाय आनी तुमच्या बाबापाळेकरशिवाय जगात कुणालाच काही शष्प समजत नाही. जिथे ज्ञान कमी असते तिथेच अहंकार फुत्कार टाकत असतो. इथेहि तसेच दिसुन आले.
कृषि विद्यापीठांच्या शिफारशी
कृषि विद्यापीठांच्या शिफारशी प्रमाणे प्रत्येक पिकाला मशागतीच्या वेळेस fym, compost, हिरवळीचे खते अंतर्भाव करणे आवश्यक आहे. जिथे टनात गरज आहे तिथे पाळेकर गुरुजी प्रमाणे एका गाईच्या काही किलो शेणाने कसे भागेल? उलट आहे तो सेंद्रिय कर्ब नष्ट होईल.
पाळेकर गुरुजी द्राक्षावरील भुरी, केवडा रोग नियंत्रण करू शकतील असे मला वाटत नाही. नैसर्गिक पद्धतीने कीड रोगाशी लढून पिकाने अपेक्षित उत्पादन द्यावे हे शक्यच नाही.
पाळेकर बुवांनी काही हजार हेक्टर क्षेत्रावर विद्यापिठांप्रमाणे trials घ्याव्यात. व cost of cultivation. Profit/loss. पिकनिहाय शिफारशीत करावे. आयते दुसऱ्या लोकांच्या शेतावर शिवारफैऱ्या काढू नये.
आपण मध्ययुगातूनआधुनिक युगात
आपण मध्ययुगातूनआधुनिक युगात पुढे जात आहोत. मागे नाही.
हीरा, छान वाटले वाचून. >>>>
हीरा, छान वाटले वाचून. >>>> +१.
प्रतिसाद वाचून डोळ्यासमोर सारे दृश्य उभे राहिले.
कमीतकमी बाहेरच्या वस्तू शेतात
कमीतकमी बाहेरच्या वस्तू शेतात घालून शेती करणे ही आदर्श स्थिती आहे.
----
कोणत्याही शेतीप्रधान तालुक्याच्या बाजारात गेलो तर दोनचार रासायनिक फवारे, किटकनाशके खते विकणारी दुकाने ठासून भरलेली सापडतात. त्यांची महिन्याची विक्री ( रुपयांत नव्हे, मालाच्या वजनात ) पाहता एवढं सगळं विष दहा वीस किमी परिसरात शेतीत सतत पसरत आहे.
हे कमी झाले पाहिजे. दोनचार हौशी बागायतकारांनी/ छांदिष्ट लोकांनी रसायनं वापरली का नाही हे फारसं महत्त्वाचं नाही.
हिरा, किती गोड प्रतिसाद आहे
हिरा, किती गोड प्रतिसाद आहे
हिरा, किती गोड प्रतिसाद आहे.
हिरा, किती गोड प्रतिसाद आहे.
+१०१
मारुती चितमपल्ली यांच्या मुलीने लिहीलेली माझी पाखरांची शाळा अशी कुठली तरी खूप सुंदर गोष्टीची आठवण करून देणारा प्रतिसाद.
पाळेकर बुवांनी काही हजार
पाळेकर बुवांनी काही हजार हेक्टर क्षेत्रावर विद्यापिठांप्रमाणे trials घ्याव्यात>>>>
आणि ही हजार हेक्टर जमीन ते आणणार कुठून?
त्यांच्या अनुयायांनी विकत
त्यांच्या अनुयायांनी विकत घेऊन द्यावी. अकोला अमरावती भागात भाडेपट्याने घ्यावी. झोप झाली वाटतं.
झोप आता घेणार हो, आत्ता कुठे
झोप आता घेणार हो, आत्ता कुठे भरपेट गोडाचे जेवण झालेय.
अनुयायीच स्वतःच्या शेतात पाळेकर पद्धतीने शेती करताहेत. त्यांना रिझल्ट्स मिळताहेत. इतर लोक त्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन घेताहेत.. ज्यांना इतकी कटकट करायचा कंटाळा ते पद्धती अर्धवट सोडून शिव्या घालत फिरताहेत. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
तुम्ही एकदा पब्लिक डोमेनमध्ये स्वतःला आणले की विनाकारण पायावर डोके ठेवणारे भेटणार तसेच विनाकारण लाथा मारणारेपण भेटणार. या दोन्ही लोकांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतः शेतात राबून परिणाम बघा हेच गुरुजींचे सांगणे असते.
गुर्जींना आम्रेकीला धाडा झेगू
गुर्जींना आम्रेकीला धाडा झेगू कुळातल्या गाया घेवून. रेड इंडियन लोकांना मदत करा मनावं.
बरे.
बरे.
धन्यवाद साधना जी.
धन्यवाद साधना जी.
पुर्णपणे नैसर्गिक शेती करूनही
पुर्णपणे नैसर्गिक शेती करूनही फायद्यामध्ये असणारे शेतकरी पाहीले आहेत. एक म्हणजे माझे आजोबा. त्यांनी शेणखत आणि मल्चिंगचा उपयोग करून बागा आणि शेती फुलवली. आजुबाजूंच्या गावात एक यशस्वी शेतकरी म्हणून त्यांचे नाव होते. आणि हो.. गच्चीवर शेती करत नव्हते ते.
ते गेल्यानंतर पुढच्या पिढीमध्ये शेतीची आवड नसल्याने शेतीत काह्ही फायदा नाही ही रडारड चालू आहे.
आणि भारतात सगळेच आनंदात पोट
आणि भारतात सगळेच आनंदात पोट भर खात होते ब्रिटिश यायच्या आधी
ब्रिटिशांनी नगदी पिकं घ्यायला भाग पाडून वाट लावली आपल्या शेतीची
आणि आपली सरकारं पण तेच धोरण पुढे नेताहेत
आणि भारतात सगळेच आनंदात पोट
आणि भारतात सगळेच आनंदात पोट भर खात होते ब्रिटिश यायच्या आधी
ब्रिटिशांनी नगदी पिकं घ्यायला भाग पाडून वाट लावली आपल्या शेतीची
आणि आपली सरकारं पण तेच धोरण पुढे नेताहेत
-- प्रतिज्ञा जी पण नकदी पिकांवर आधारित खूप मोठी औद्योगिक इंडस्ट्री उभी आहे व कोट्यावधी लोकांना रोजगार मिळाला आहे. ऊसासारखे पिक घेणे शेतकऱ्यांनाही सोयीचे आहे. साखर व इतर उत्पादने खूप भांडवल निर्माण करतात.
मुख्य समस्या शेतकऱ्यांच्या सर्व खर्चावर, मजूरीवर नफा धरुन भाव मिळाला पाहिजे. डॉ. स्वामीनाथन यांच्या सुचना कोणतंच सरकार अमलात आणत नाही.
ऊसासारखे पिक घेणे
ऊसासारखे पिक घेणे शेतकऱ्यांनाही सोयीचे आहे>>> आणि मातीच्या किंवा शेत जमिनीच्या गैर सोईचे आहे.
निव्वळ पैशाच्या मागे लागून जुन्या काळी होत असलेली पिकांची फेर पलट आता होत नाही आणि एकच पिक वारंवार घेवून जमीन पडिक बनायला आली की शेतीत फायदा नाही अशी ओरड सुरु असते.
पाळेकर टेक्निक असो की अन्य कुठलीही असो ... पण ते स्वताचे डोके वापरून शेतकऱ्यांनी करावे अन्यथा बळीराजासह ग्राहकराजालाही खरेच खुप बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.
ऊसासारखे पिक घेणे
ऊसासारखे पिक घेणे शेतकऱ्यांनाही सोयीचे आहे. >> एकाच जागी तेच तेच पीक घेऊन जमीन नापीक होते. मग ते सोयीचे कसे?? मी माझ्या आजोबांचे उदाहरण दिले आहे. माझा मामासुद्धा एकटा शेती करतोय आणि बर्यापैकी नफा मिळवतोय. माहीतीमधील बरेच लोक नैसर्गिक शेती करत आहेत. पहील्यांदा तीन चार वर्षे तोटा होतो कारण रसायनांमुळे मातीला उपयुक्त असे जीवजंतु सुद्धा नष्ट होतात. तो कस भरून यायला वेळ लागतो. त्यासाठी मेहनत, संयम आणि आवड असावी लागते.
Pages