साठ-सत्तरच्या दशकात (किंवा कदाचित त्याच्या आधीही असेल. ५० च्या दशकातले चित्रपट पाहायची माझी मानसिक तयारी अजून तरी झालेली नाही) बर्याच हिंदी चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांना परदेशदर्शन घडवलं. मग तो अॅन इव्हिनिंग इन पॅरिस असो, नाईट इन लंडन असो, द ग्रेट गॅम्बलर (कैरो, लिस्बन, व्हेनिस, रोम) असो की हरे रामा हरे कृष्णा (नेपाळ) असो. अर्थात हेही केवळ हिरो-हिरॉईनला गात बागडायला रमणीय बॅकड्रॉप हवा म्हणून नव्हे तर कथानक परदेशात घडतं म्हणून. ह्याच पठडीतला एक रोमँटिक सिनेमा म्हणजे '६६ साली आलेला लव्ह इन टोकियो. जॉय मुकर्जीच्या 'Love In’ ह्या trilogy अंतर्गत आलेला हा दुसरा चित्रपट अशी माहिती विकिवर मिळते. ह्या मालिकेतला पहिला 'लव्ह इन सिमला' (१९६०) आणि तिसरा 'लव्ह इन बॉम्बे' (१९७४). पैकी 'लव्ह इन सिमला' मध्ये त्याच्यासोबत साधना होती तर 'लव्ह इन बॉम्बे' मध्ये वहिदा.
तर आधी चित्रपटाची बोटभर कथा. अशोकचं लग्न सरितासोबत ठरलेलं असतं. पण त्याला ती फारशी पसंत नसते. त्यात सरिताच्या १७ व्या वाढदिवसाच्या पार्टीत तिचे वडिल 'आता लग्न करून टाकू' असा धोशा लावतात तेव्हा तर अशोकला आपल्या मित्राची, महेशची, मदत घेऊन चक्क पार्टीतून धूम ठोकावी लागते. घरी त्याच्या करारी, शिस्तप्रिय, बाणेदार वगैरे (थोडक्यात, नवऱ्याच्या मागे पोरांना वाढवणाऱ्या बायका जश्या असण्याची पध्दत हिंदी सिनेमात आहे तश्या असलेल्या) आईजवळ, म्हणजे गायत्रीदेवींजवळ, त्यांचे वकिल एक चिठ्ठी घेऊन येतात. गायत्रीदेवींचा मोठा मुलगा काही वर्षांपासून जपानमध्ये स्थायिक झालेला असतो. त्याने आईच्या इच्छेविरुध्द एका जपानी पोरीशी लग्न केल्यामुळे गायत्रीदेवींने त्याच्याशी सर्व संबंध तोडलेले असतात. त्याचा मृत्यू झाल्याचं कळूनही त्यांच्या निर्णयात काही बदल झालेला नसतो. वकिलांनी आणलेली चिठ्ठी त्यांच्या जपानी सुनेने मरण्यापूर्वी लिहिलेली असते (भारतीय सून काय लिहील एव्हढं आतडं पिळवटून टाकणारी ती चिठ्ठी कोणी जपानी लिहील असं मला तरी वाटत नाही. पण ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला की हे असं होतं असावं) . आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला अनाथालयात जावं लागू नये म्हणून नातू म्हणून नव्हे तर निदान एका निराधार महिलेचा मुलगा म्हणून तरी त्याला सांभाळा अशी विनंती तिने केलेली असते. वंशाच्या दिव्याबद्दल ऐकताच गायत्रीदेवी (अर्थातच!) हळव्या होतात. आणि नातवाला आणायला अशोकने त्वरित जपानला जावं असं फर्मान काढतात. सरिता लगेच त्याच्याबरोबर जायचा मनोदय व्यक्त करते. पण अशोक भारतीय संस्कृती, बायकांचं अदबशीर वागणं वगैरेवर एक छोटेखानी भाषण देऊन तिचा बेत हाणून पाडतो. आणि एकटाच जपानला जातो.
महेशचं शीला नामक मुलीवर प्रेम असतं पण तिचे वडिल ह्या लग्नाच्या विरोधात असल्याने तिला भारतातून थेट जपानमध्ये घेऊन जातात. विमानात अशोकची गाठ ह्या दोघांशी पडते तेव्हा शीलाचे वडिल 'टोकियोत काही मदत लागली तर मला कळव' असं म्हणतात ( ते Amway वाले नसतात बरं का!)
सर्व भारतीय आईबापांना आपल्या मर्जीने मुलाचं-मुलीचं लग्न लावून द्यायची सवय असते (जी आजतागायत कायम आहे!) त्यानुसार आशाचे काका तिचं लग्न प्राणशी लावून देणार असतात. ह्याला आशाच्या स्वर्गवासी पिताश्रींची संमती असते. आणि हे लग्न झाल्यावरच त्यांचा वकिल आशाच्या वडिलांनी मरायच्या आधी तिच्यासाठी ठेवलेलं एक पत्र तिला देणार असतो. (तेव्हाच्या काळात कुटुंबाचे वकिल आणि लग्नाचे मुहूर्त काढून देणारे गुरुजी हे गरज पडायच्या आधीच हाताशी असायचे!). अर्थात काका आणि प्राण दोघांचा आशाच्या गडगंज संपत्तीवर डोळा असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. पण आशाला प्राण अजिबात पसंत नसतो. त्यामुळे ती साखरपुड्याच्या दिवशीच टोकियोतल्या आपल्या घरातून पळून जाते. तिला शोधायला काका ५००० डॉलर्सचं इनाम जाहीर करतात (हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!).
दरम्यान अशोक टोकियोला पोचून आपल्या पुतण्याला, चिकूला, भेटतो खरा पण चिकू त्याच्याबरोबर भारतात यायला साफ नकार देतो. आशाच्या काकांनी तिला शोधून आणणाऱ्यांना इनाम जाहीर केल्याची बातमी तो टीव्हीवर पाहतो आणि घरातून पळून जातो. अर्थात कोणीतरी म्हटल्याप्रमाणे It’s a small world. पुन्हा निदान तेव्हाच्या काळात तरी जपानमध्ये फार गर्दी दिसत नव्हती (इथे आमच्या रानडे रोडला तेव्हाही कोणी गणपतीच्या किंवा दसरा-दिवाळीच्या दिवसांत हरवला तर एकदम ख्रिसमसलाच सापडत असेल ह्याची मला खात्री आहे!). तेव्हा चिकू नेमका आशाला जाऊन धडकतो. मग आशाला शोधायला निघालेला प्राण आणि चिकूला शोधायला निघालेला अशोक ह्या दोघांना गुंगारा देत देत आशा आणि चिकू टी-हाउस, शीलाच्या बापाचं दुकान असा त्रिखंडात संचार करत, वेषांतर करत पळत राहतात. पण शेवटी प्राणच्या हातावर तुरी देऊन अशोक, आशा आणि चिकू ह्या तीन ओंडक्यांची सागरात भेट होते. आशाने कोणी ओळखू नये म्हणून सरदारजीचा वेश धारण केलेला असतो. आणि अशोक पुरता माठ असल्याने 'ही बाई आहे' हे काही त्याच्या ध्यानात येत नाही. ह्या सगळ्या पळापळीत चिकूने हात फ्रॅक्चर करून घेतलेला असतो. त्याला सरदारजीचा उर्फ आशाचा लळा असल्याने अशोक तिलाही चिकूला सांभाळायला टोकियोतल्या आपल्या भावाच्या घरी घेऊन येतो. अर्थात त्यांचं भारतात येणं लांबणीवर पडतं. दरम्यान शीलाच्या जाण्याने अस्वस्थ झालेला महेश 'अशोकची टोकियोमध्ये एका जपानी मुलीसोबत जवळीक वाढलेय' अशी लोणकढी गायत्रीदेवींना मारून आपली जपानला जायची सोय करून घेतो. मग अशोक-महेश भेट, आशा बाई आहे हे अशोकला कळणं, दोघांचं एकमेकावर प्रेम बसणं, प्राणने आशाला किडनॅप करणं, शीला-महेशने तिला सोडवणं वगैरे गोष्टी यथासांग पार पडतात.
आता एव्हढं सगळं चांगलं चाललंय म्हणजे माशीला सर्दी होणारच. म्हणजे माशी शिंकणारच हो. सरिताचे वडील गायत्रीदेवींचे कान भरून त्यांना आणि सरिताला घेऊन टोकियोत येतात. (तेव्हाच्या काळात मुंबईहून शिवनेरी किंवा नीता व्हॉल्वो पकडून पुण्याला जावं अश्या सहजतेने मंडळी घाऊक गर्दी करून भारतातून जपानला जाताना पाहून मला तर भरून आलं). आईसाहेब आशाला त्वरित नापसंत करतात. मग चित्रपटाचा शेवट जवळ आला नसतानाही हिंदी सिनेमातली सुप्रसिध्द मॅरेथॉन सुरु होते, त्या पळापळीत प्राण अशोकला गाडीने उडवतो आणि अशोकची दृष्टी जाते. तेव्हा आईसाहेबांना सरिता आणि आशा दोघीतल्या फरकाची जाणीव होते. यथावकाश अशोकला दृष्टी परत मिळते (टीव्ही चॅनेलवर चित्रपटाच्या प्रायोजकांनी त्यांच्या पाइल्सच्या औषधाची जाहिरात २०-२५ मिनिटं दाखवल्याने चित्रपट कापला. त्यामुळे हा चिमीत्कार कसा झाला हे माहित नाही!) . सरिता आणि तिचे वडिल दोघांना हाकलून लावण्यात येतं. गायत्रीदेवी नातवाला स्वीकारतात. अशोक आणि आशा शुभविवाह ठरतो. पण.......
पण, किंतु, परंतु......बंधू.....आणि भगिनींनो.....ह्या 'पण'च्या पुढे काय आहे हे कळण्यासाठी चित्रपट पहा असं म्हणायला माझी जीव धजावत नाही. कारण चित्रपटाची गाणी पाहून-ऐकून हा रोमँटिक चित्रपट आहे अशी समजूत होते खरी. पण प्रत्यक्षात तो रोमान्स तोंडी लावण्याइतकाही नाही. महेश-शीला-शीलाचे वडिल ह्यांचा आचरटपणा मात्र चित्रपट भरून वर दशांगुळे उरला आहे. फक्त तो सहन करायची तयारी असल्यासच चित्रपट पाहावा.
चित्रपटाच्या नायकाची भूमिका जॉय मुकर्जीने केली आहे म्हणजे तो अशोक. मला स्वत:ला जॉय मुकर्जी आवडतो. बंगाली नायकांच्या मानाने सणसणीत उंची, देहयष्टी आणि बर्यापैकी देखणा (आणि तरीही बायकी न दिसणारा!) चेहेरा हे तिन्ही त्याच्याकडे आहेत. रोमँटिक हिरो म्हणजे शेवटच्या काही रिळांत पोलिस यायच्या आधी व्हिलनला ३-४ चापट्या, थोडे बुक्के, काही गुद्दे मारणे, त्याचा गळा धरणे, थोडीफार लाथाळी करणे ह्यापलीकडे फायटिंग स्किल्स लागत नाहीत. बाकी राहिली गाणी अन हसणं-रागावणं-आश्चर्य-संभ्रम वगैरे प्रेमात पडलेली मंडळी करतात त्या लीला. त्यामुळे 'मागणी तसा पुरवठा' ह्या न्यायाने त्याने भूमिका बर्यापैकी वठवली आहे. आशाच्या भूमिकेत आशा पारेख आहे. तिचं थोडं लाडिक बोलणं (ह्या बाबतीत शर्मिला चार पावलं पुढे आहे म्हणा!) सोडलं तर तीही हिंदी नायकप्रधान (म्हणजे जवळपास सर्वच!) चित्रपटात नायिकेकडून असणाऱ्या ज्या काही अपेक्षा असतात त्या बर्यापैकी पूर्ण करते. फक्त गायत्रीदेवी उगाचच तिच्या कानाखाली जाळ काढतात तेव्हा ती मुळूमुळू रडते ते मात्र मला अजिबात आवडलं नाही. तिने ठणकावून सांगायला हवं होतं की "हे बघा आईसाहेब, माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे पण म्हणून मी वाटेल ते अजिबात सहन करणार नाही. तेव्हा परत हात उचलायचा नाही. काय समजलेत?”. असो. प्राणच्या भूमिकेत प्राण सिकंद नेहमीप्रमाणेच शोभला आहे. मदन पुरीने आशाच्या काकांची भूमिका केली आहे तर ललिता पवारने गायत्रीदेवी साकारल्या आहेत. महेश म्हणजे महमूद हे एव्हाना लक्षात आलं असेल. त्यामुळे शीलाची भूमिका शुभा खोटेने केली आहे हेही ओघाने आलंच.
बाकी भूमिकांत धुमाळ (शीलाचे वडील), मुराद (गायत्रीदेवींचे वकिल), मोहन चोटी (शीलाच्या वडिलांचा सहाय्यक), असित सेन (शीलाचं लग्न तिच्या वडिलांनी ह्याच्याशी ठरवलेलं असतं) आणि तरुण बोस (अशोकचे डोळे जातात तेव्हा त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर) ही मंडळी दिसतात.
चित्रपट गाण्यांच्या बाबतीत मात्र अजिबात निराश करत नाही. हसरत जयपुरीचे शब्द, शंकर-जयकिशनचं संगीत आणि लता मंगेशकर-मोहम्मद रफी-मन्नाडे ह्यांचे आवाज. सायोनारा, ओ मेरे हे शाहे-खुबा, ले गयी दिल गुडीया जापानकी, आ जा रे आ जरा, कोई मतवाला आया मेरे द्वारे आणि मुझे तुम मिल गये हमदम (पाइल्सवाल्यांनी हे गाणंही कापायला लावलं. त्याबद्दल त्यांना आधी रौरव आणि मग कुंभीपाक!) पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच.
टीचभर कथेचा दोन-अडीच तासांचा चित्रपट करताना त्याचं जे होतं तेच ह्या चित्रपटाचं झालं आहे. विनोदाच्या नावाखाली आचरटपणा, थिल्लरपणा आणि पाचकळपणा ह्यांचा अतिरेक झाला असल्याचं आधी म्हटलंच आहे. गेईश्याच्या नाचाच्या वेळी महमूदने जे काही हावभाव केलेत ते जपानी संस्कृतीची टर उडवणारे, अनादर करणारे वाटतात. अशोकचे डोळे जातात तेव्हा गायत्रीदेवी आणि आशा 'माझे डोळे घ्या' चा जो काही धोशा लावतात तो पाहून हसावं का रडावं तेच कळत नाही. त्यात तो डॉक्टर भारतीय असतो म्हणून हा वेडेपणा खपवून घेतो. एखादा जपानी असता तर त्याने 'एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीचा मेंदू काढून ह्या दोघींच्या डोक्यात त्याचा अर्धा-अर्धा भाग बसवावा काय' असा विचार केला असता. :रागः आणि हो, मिशन इम्पॉसिबल मध्ये मास्क वापरण्याआधी ह्या लोकांनी त्याचा शोध लावला होता. आहात कुठे?
थोडक्यात काय तर हा चित्रपट तेव्हा जपानमध्ये दाखवला असता तर '६६ मध्ये ते नक्की आपल्यावर चाल करून आले असते.
ता.क. चित्रपटात आशा पारेखने तिचा पोनीटेल बांधायला वापरलेल्या क्लिपवरून तश्या हेअरक्लिप्सना पुढे 'लव्ह इन टोकियो' असं म्हणायला लागले हे विकीवरून कळलं.
चित्रपट बघितलेला नाही पण आईचे
चित्रपट बघितलेला नाही पण आईचे वर्णन वाचून ललिता पवारच डोळ्यासमोर आल्या आणि अर्थातच हिरोचा मित्र महमूदच! त्या काळी महमूद हिरोपेक्षा जास्त पैसे घेत असं ऐकलय.
ते 'सायोनारा' साँग यातच आहे ना?(लहानपणची अंताक्षरी ची आठवण) :p
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
पिक्चर बघते.
अवांतर: इथला लेख वाचून पटकन गुमनाम पाहिला.मुलीलाही आवडला.काल तिने परीक्षा संपल्याच्या खुशीत परत गुमनाम पाहिला ☺️☺️
ह्या पिक्चरमध्ये गिंझाच्या
ह्या पिक्चरमध्ये गिंझाच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हिंदीत बोलायला सुरुवात करतात हे बघून वैताग आला होता. जसं काही शूटींगच्या आधी तिथल्या लोकांकरता बेसिक हिंदीचा क्लास लावला होता![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
Farach mast ! Ganyamsathi ani
Farach mast ! Ganyamsathi ani sunder Japan sathi ha picture sahan kela hota.
पायस यांच वाक्य आठवले - लव्ह
पायस यांच वाक्य आठवले - लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्या प्रमोद चक्रवर्तीने..... लोल
गाण्यांसाठी आणि जपानी सिन
आशाचं ते चिरक्या आवाजात चीकू..चीकू..ओरडणे मात्र सहन होत नाही....
आणि जपानी दाखविल्याने डोईवर केसांचं मोठ्ठं घरटं ठेवायची आपसूकच मुभा मिळालेली.....
हा चित्रपट बघितला नाही. बघेन
हा चित्रपट बघितला नाही. बघेन असेदेखील वाटत नाही.
'मुझे तुम मिल गये हमदम' गाणं मला आत्ता दोनेक वर्षांपूर्वी माहित झालं. तेच बेस्ट आहे सगळ्या गाण्यांत.
सणसणीत उंची, देहयष्टी असली तरीही जॉय मुखर्जी आवडत नाही. फारच चपटा चेहरा आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
===![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
> महेशचं शीला नामक मुलीवर प्रेम असतं पण तिचा बाप ह्या लग्नाच्या विरोधात असल्याने तिला भारतातून थेट जपानमध्ये घेऊन जातो. विमानात अशोकची गाठ ह्या दोघांशी पडते तेव्हा शीलाचे वडिल 'टोकियोत काही मदत लागली तर मला कळव' असं म्हणतात. > हा परिच्छेड थोडा गोंधळात पडणारा होता. मला आधी वाटलं महेश-शीला जपानला पळून जातायत
छान लिहिलंय. जॉय मुखर्जी
छान लिहिलंय. जॉय मुखर्जी मलाही आवडतो. (मला तर विश्वजित पण आवडतो.
)
ह्या चित्रपटातली गाणी सगळीच छान आहेत.
स्वप्ना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ही तु खुप छान सिरीज सुरु केली आहेस.
ह्यामधे तु लिहिलेल्या सगळ्या चित्रपटांबद्दल वाचलं. तुझं मिश्कील लिखाण नेहमीच आवडतं.
लिहित रहा.
मस्तच! जॉय मुर्खजी (ह्यात
मस्तच! जॉय मुर्खजी (ह्यात टायपो नाही) मला फारसा आवडत नाही पण म्हणून त्याचा पिक्चर बघणार नाही असे काही नाही
शेवटी हिंदी सिनेमा बघणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि हा लेख वाचल्यावर तर पिक्चर नक्कि बघणार.
सस्मित ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, ही सिरिज खुपच छान आहे आणि इतक्या भागांनंतरही लिखाणातला टवटवीतपणा टिकवून ठेवल्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. असेच लिहित रहा.. पु. ले.शु.
मला आवडलेला पिक्चर आहे.
मला आवडलेला पिक्चर आहे. लहानपणी पाहिलेला त्यामुळे ते सायोनारा गाणे आणि मेहेमुद ची कॉमेडी खुप आवडलेली
बाकी शेवटची मारामारी अगदीच लुटुपुटु ची आहे
मुळात प्राण इतक्या हँडसम
मुळात प्राण इतक्या हँडसम माणसाचा पर्याय असताना, तो केवळ सिगरेट ओढतो आणी त्याला अधिक श्रीमंत व्हायचय ह्या सो कॉल्ड दुर्गुणांसाठी, डायरेक्ट जॉय मुकर्जी?? काय हे अधःपतन!
पूर्व-पुण्याई जबर असल्यामुळे सिनेमात आले आणी रफी च्या सुरांचा स्पर्श लाभल्यामुळे गाजले ह्या कॅटेगरीतला जॉय मुकर्जी हा आणखीन एक नट.
त्या काळातल्या हिरोज च्या
त्या काळातल्या हिरोज च्या मानाने जॉय मुखर्जी ची बॉडी बरीच बरी होती.
बरीच बडी होती.
बरीच बडी होती.
बडीच बरी.
बडीच बरी.
का त्या जॉ मु ला बोलताय सगळे.
का त्या जॉ मु ला बोलताय सगळे. छान होता तो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या वयात सगळंच छान वाटयचं. रोमॅन्टिक असेल ते आवडायचं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या टीनेजात मी बरेच पिच्चर पाहिले दुरदर्शनवर.
त्या वयात सगळंच छान वाटायचं. आणि काही खटकायला तेवढी समज नव्हती.
तेव्हा जॉय मुखर्जीचे शागिर्द, एक मुसाफिर एक हसीना, फिर वही दिल लाया हु, लव इन टोक्यो वैगेरे सिमेने बघितलेले.
वो है जरा खफा खफा, बहुत शुक्रिया बडी मेहरबानी, मुझे तुम मिल गये हमदम, बंदा परवर थामलो जिगर वैगेर गाण्यातला जॉ मु खुप आवडलेला. अजुनही आवडतो.
तेच विश्वजितंच. लाखो है यहा दिलवाले, कजरा मोहब्बत्वाला, ना झटको जुल्फसे पानी, जाइये आप कहा जायेंगे, पुकारता चला हु मै वैगेरे गाणी असलेले सिमेने पाहिले. एकंदर जॉमु, विश्वजित वैगेरे चॉकलेट हिरो होते.
तीच कथा राजेंद्र कुमार वैगेंरेंची. झुक गया आसमान, संगम, साथी, काला गोरा, गीत, आरजु, आयी मिलन की बेला वैगेरे सिनेमे.
त्या हिरोइणी पण आवडाय्च्या. माला सिन्हा, सायरा, साधना वैगेरे.
अभिनयाची बोंब, ठोकळा हिरो, नाटकी हिरोईन वैगेरे हे नंतर-मोठं झाल्यावर कळायला लागलं.
सस्मित शी अगदीच सहमत....
सस्मित शी अगदीच सहमत.... ह्या तिरकस कॉमेन्ट करायची संवय परीक्शणे वाचून लागली नाहीतर आम्हाला बॉलीवूड आणि बॉलीवूडला आम्ही व्यवस्थित सहन करीत होतो....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्हाला बॉलीवूड आणि बॉलीवूडला
आम्हाला बॉलीवूड आणि बॉलीवूडला आम्ही व्यवस्थित सहन करीत होतो...>>>>>>>>> हो बाबा कामदेव. अजुनही सहन करतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही अजूनही सहन करतो व
आम्ही अजूनही सहन करतो व यापुढेही सहन करणारोत. शहरात जाऊन शिकल्यावर खेड्यातल्या आईबाबांचा त्याग करणारया टिपिकल फिल्मी मुलांसारखे आम्ही करणार नाही.
स्वप्ना, छान लिहिलेयस. मला कथा आठवत नव्हती फारशी.
जॉय मुकरजीचे नशीब चांगले होते, घरचाच स्टुडिओ असल्याने तो हिरो म्हणून चमकला. बाकी अभिनय म्हटला तर तुम्ही त्याची तुलना कुणाशी करता त्यावर सर्व काही अवलंबून आहे. भारत भूषणशी तुलना करता जॉमुचा अभिनय ऑस्करपातळीवरचाच म्हणायला हवे. तुम्ही दिलीप कुमारशी तुलना कराल तर दोष तुमचा आहे, जॉमुचा नाही. तुम्हाला कळायला हवे कुणाची तुलना कुणाशी करावी. अर्थात जॉमुचे अभिनयगुण कायम झाकून राहिले. त्याच्या चित्रपटात त्याला गुणदर्शनाच्या संधी कमी मिळाल्या. चांगली गाणी , चांगली लोकेशन्स ऐकण्यात व बघण्यात प्रेक्षक गुंतवून ठेवला की बस... अशी तेव्हा स्थिती होती.
लव्ह इन... त्रिलॉजी होती माहीत नव्हते. लव्ह इन सिमला व टोकियो मी पाहिला, बॉम्बे नाही पाहिला. सिमला नंतर टोकियोला गेल्यावर परत बॉम्बे का कळले नाही.
जॉमुच्या फिजिकबद्दल सहमत. चेहरा मात्र कायम आईस्क्रीम दुकानात प्रवेश केलेल्या मुलासारखा असायचा.
त्या काळात असं झालं तरच
त्या काळात असं झालं तरच मुलाला/ मुलीला संपत्ती मिळेल . तस झालं तरच संपत्ती असं बरच काय काय लिहून बाप मरत असत. मग ते मृत्युपत्र हिरोला / हिरवीणीला मान्य नाही . हिरवीणीच्या संपत्तीवर व्हिलन चा डोळा . ती मिळ्वण्याकरता व्हिलन चे तमाशे . त्यातून हिरवींण सारखी पळत राहणार . तिच्या मागे व्हिलन अशा प्रकारची कथानक बरीच असायची . या सगळ्या मृत्युपत्रामध्ये वकिलाची भूमिका एकदम ठणठणीत असायची आणि इफ्तेकार सारखा पोलीस इन्स्पेक्टर पण लागायचाच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या काळात परदेशात चित्रीकरण झालेला राज कपूरचा संगम होता आणि अराउंड द वर्ल्ड पण होता . स्वप्ना तू मात्र लिहीत राहा . हि तुझी परीक्षण वाचूनच बरेचसे सिनेमे यु ट्यूब वर बघितले जात आहेत नाहीतर मला नाही वाटत मी कधी बघितले असते
सर्वांचे मनापासून आभार! खरं
सर्वांचे मनापासून आभार! खरं तर ह्या सिरिजला म्हणावा तितका प्रतिसाद नसल्याने प्रत्येक लेख लिहिताना आपण वेळ फुकट तर घालवत नाही ना असं वाटत राहायचं. तुमचे प्रतिसाद पाहून मस्त वाटलं.
निदान काही लोक तरी हे लेख वाचून हे चित्रपट पहात आहेत म्हणजे लेख लिहिल्याचं सार्थक झालं! mi_anu, सस्मित, चौकट राजा, सुजा You made my day ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅमी, धन्यवाद! बदल केलाय.
साधना, दिलिपकुमार हा महान अॅक्टर आहे अशी माझीही समजूत होती. मुगल-ए-आजम रंगीत झाल्यावर उत्सुकतेने पाहिला आणि जाम पस्तावले. सुजा, हो अराउन्ड द वर्ल्ड लिस्टमध्ये टाकायचा राहिला. संगममध्ये परदेशचित्रण आहे हे माहित नव्हते.
बाकी वरच्या पोस्टरमध्ये तो डोक्यावर बुचडा बांधलेला बाबा कोण आहे ते कळलं नाही.
हां आता कळतंय नीट!
हां आता कळतंय नीट!
===
> बाकी वरच्या पोस्टरमध्ये तो डोक्यावर बुचडा बांधलेला बाबा कोण आहे ते कळलं नाही. > मेहमूद असेल.
पण ती आशा पारेख न वाटता सायरा बानो वाटतेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि जॉमु तिचे केस विंचरून
आणि जॉमु तिचे केस विंचरून देतोय असं वाटतंय.
पोस्टर साफ गंडलेय, प्राण
पोस्टर साफ गंडलेय, प्राण सुनील दत्त चा भाऊ वाटतोय.
मला तर प्राण थोडा काशीनाथ
अॅमी, तो महमूद असू शकतो. पण त्याच्या डोळ्यांत थोडे समुराईसारखे खूंख्वार भाव आहेत. आणि मला तर प्राण थोडा काशीनाथ घाणेकरांसारखा दिसतोय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सपना, संजीव कुमार च्या कतल
स्वप्ना, संजीव कुमार च्या कतल(मोबाईल वर त ला ल वालं जोडाक्षर येत नाहीये) आणि संजय खान च्या एक पहेली आणि इंतकाम बद्दल लिही एकदा जमले तर.
mi_anu धन्यवाद! अश्या माहित
mi_anu धन्यवाद! अश्या माहित नसलेल्या चित्रपटांची माहिती मिळवणं आणि ते पाहून इतरांना माहित करून देणं हे ह्या मालिकेमागचं कारण आहे
संजय खान माझ्या आवडत्या हिरोजपैकी. अभिनयाचा महामेरू वगैरे नाहिये माहित आहे. पण मला त्याचा चेहेरा आवडतो. आणि फिरोज खानपेक्षा तो बरीच बरी अॅक्टींग करतो
पण सहज म्हणून विकीवर चेक केलं तर 'एक पहेली' मध्ये फिरोज खान दिसतोय. असू देत.....थ्रिलर ड्रामा आहे ना मग आपुनके लिये काफी है. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग तो संजय खान वाला पिक्चर
मग तो संजय खान वाला पिक्चर कोणता ज्यात तो सारखा कोणत्या तरी रहस्यात अडकत असतो? त्याच्या खोलीत एका मुलीचा खून होतो?
बहुतेक या नावात कोणतीतरी रात असण्याची शक्यता आहे.
संजय खान म्हणजे टिपू सुलतान
संजय खान म्हणजे टिपू सुलतान ना? हृतिक चा सासरा?
हो, तो तरुण होता तेव्हा एकदम
हो, तो तरुण होता तेव्हा एकदम आय कॅण्डी होता. मी खूप पिक्चर पाहिलेत त्याचे.
संजय खानचा वादिया मेरा दामन
संजय खानचा वादिया मेरा दामन वाला आणि धुंद शिवाय एकही पिच्चर आठ्वेना मला.
Pages