ती माझ्याबरोबर जास्त बाहेर येत नव्हती. आत्ताच नाही याच्या अगोदरही.
कधीही कुठे ये म्हटलं तर तिचं आपलं, नको घरी जायचं आहे, उशीर होईल, पप्पा काय बोलतील?
अगं कधीतरी हो म्हण!
आणि हो, कंटाळा!
हा तर तिला उपजतच देवाने गिफ्ट म्हणून दिला असावा. मी काहीही ठरवावं आणि हीला कंटाळा आला नाही असं कधी झालंच नाही.
एकदा तिनं क्लासला दांडी मारली होती. मी समोरच्या एका पब्लिक बुथवरुन तिला फोन लावला. चार वेळा रिंग वाजल्यानंतर एकदाचा तिचा पार आळसाटलेला आवाज आला-
“हॅल्लो..”
“हॅलो*** कुठे आहेस?”
“घरी. झोपलेय”
“आत्ता?”
“हो” म्हणत पुन्हा तिचा आवाज क्षीण झाला.
“ए उठ! झोपतेस काय?”
“काय रे! काय काम आहे?”
“क्लासला का नाही आलीस?”
“कंटाळा आला होता”
“हो? म्हणून आता झोपा काढतेस का?”
ती खुदखुदू हसली.
“बरं ऐक- सर्टीफिकेटची चौकशी केली, ती काळी म्हणतेय बोरिवलीला जावून घेऊन या!”
“कोण काळी?”
“क्लासची मॅडम”
“ए मंद! तिला काळी काय बोलतोस?”
“मग काळीला काळी नाहीतर काय गोरी म्हणू? एकतर काही विचारलं तर नीट काही सांगत नाही, त्यात सर्टीफिकेटलाही आपल्यालाच जायला सांगतेय!”
“बरं ठेव फोन”
“ए- ठेव काय?”
“उद्या येतेस का बोरिवलीला- सांग, सर्टीफिकेट आणूया”
“नको रे कंटाळा आलाय”
“आजचं नाही- मी उद्याचं बोलतोय!”
“बरं सांगते, ठेव आता मला झोपायचं आहे”
“अगं- उठ!!! इथं सर्टीफिकेट महत्त्वाचं आहे का झोप?”
“गप रे- मला खूप झोप येतेय, अगोदरच कसंतरी मी या पोरांना झोपायला लावलंय त्यात तू माझी झोपमोड करतोयस!”
“कुठची पोरं?”
“शिकवणीला येतात माझ्याकडे, आज कंटाळा आला म्हणून सगळ्यांना झोपवलं!”
“छान! म्हणजे मास्तरणीच आता त्यांना झोपवायला लागली तर! अगं मुलं शिकायला येतात ना- मग शिकवायचं सोडून झोपवतेस काय त्यांना? की- यासाठी त्यांच्या घरचे तुझ्याकडे मुलं पाठवतात!”
“काहीनाही रे, खूप आगाऊ आहेत सगळे. गप्प बसा म्हटलं तर ऐकत नाहीत. आज दंगा करायला लागले! म्हणून एका-एकाला चांगले रट्टे देऊन देऊन झोपवलं; म्हटलं- ‘झोपा कारट्यांनो झोपा!’”
ती हसायला लागली तसं मलाही तिच्यातल्या खट्याळपणावर हसू येऊ लागलं!
तशी ती कधीच कुठे फिरायला म्हणून यायची नाही, मीच आपला म्हणत असायचो, ‘अगं- गार्डनध्ये चल- पार्कवर चल- सुट्टीला एखाद्या चौपाटीला चल, निदान भाईंदरच्या खाडीवरतरी!
पण नाही.
क्षणभरासाठी कुठे थांबायचं म्हटलं तरी हीच्या पोटात गोळा!
‘नको- घरी कोणाला माहित नाही, कोणी विचारलं तर? कोणी सांगितलं तर? घरचं कुणी बघितलं तर!’
अगं, किती ते दडपण घेऊन वागणार आहेस? तुला स्वत:साठी असं काही वाटतं नाही का?
एकदा तर सरळ बोललो- ‘तू येणार की नाहीस? आज मी खाडीवर तुझी वाट बघतो- मी काहीही ऐकणार नाही- तू यायचं म्हणजे यायचं- बस्स!’
त्यावेळी मात्र ती कशीबशी तयार झाली.
सातला मी तिच्याअगोदर खाडीवर पोहोचलो. (हो- नाहीतर, आला नाही म्हणत पळ काढायची बया)
पावसाचे दिवस होते. कधीही पावसाला सुरवात होण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे मी सोबत मरुन कलरचा रेनकोट आणला होता. फोर आर्मवर गुंडळून तो तसाच हाताच्या घडीत घेतला होता.
सात- म्हणजे काही भरतीची वेळ नव्हती, त्यामुळे बंधार्याजवळ जरा पुढे जाऊन मी शांतपणे उभा राहीलो.
समोर अथांग काळं पाणी पसरलं होतं. रात्रीच्या काळ्याकुट्ट काजळीत बेमालूम मिसळून गेलं होतं. अधेमध्ये किनार्याला डुचमळणार्या लाटा त्याचे अस्तित्त्व दाखवत होत्या. मध्येच खड्क-खड्क खड्क-खड्क करत डाव्या बाजुनं- झगमगत्या दिव्यांत लुकलुकत येणारी लोकल शांततेचा भंग करत होती. पण वार्याच्या दिशेबरोबर तिचाही आवाज दबला जात- कमी जास्त होत होता.
दूरवर कुठेतरी डोगरांसारख्या दिसणार्या माळ टेकडीवर लाल, पिवळ्या, पांढर्या रंगाचे ठिपके लुकलुकत होते. जीवघेण्या- अंधारात गुडूप झालेल्या ओबडधोबड भुताटकी माळरानावर, तेवढीच एक सजीवपणाची चाहूल होती!
-आणि या सगळ्याविरुद्ध बंड पुकारल्यासारखा मी- सगळ्यात पुढे, खाडीवरुन रोंरावत येणार्या वार्याला सामोरे जात, किनार्याच्या पार टोकाला, हाताची घडी घालून त्या शांततेचा अर्क न अर्क स्वत:त शोषून घेत असल्यासारखा स्तब्ध उभा होतो!
एक मन पुढच्या शांततेत गुंग असलं तरी दुसरं उजव्या बाजुनं येणार्या तिच्या वाटेवर भिरभिरत होतं..
मला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. मी आल्यावर साधरणत: दहा एक मिनिटांतच ती तिथे हजर झाली. नेहमीच्या पद्धतीने ती- वार्याने अस्ताव्यस्त होणारी ओढणी नीट करत येत होती.
तिला पाहताच- तळपत्या रखरखीत उन्हात बर्फाचा खडा छातीवर ठेवावा तसं थंड वाटलं. मन एका अनामिक आनंदाने धडधडू लागलं.
मी सामोरं जाताच ती गालातल्या गालात साखरेहून गोड हसली. (हीचं हे हसणं, काळजात नेहमी कळ का उठवतं कुणास ठाऊक)
‘कुठे बसायचं’ म्हणून विचारताच मी तिला- कबुतरखान्याच्या उजव्या बाजुला- खाडीकडे तोंड करुन असलेल्या आडव्या बाकड्याकडे नेलं. ती बसायला जाणार तोच, कोणीतरी तिला आवाज दिला. तिनं चमकून वर बघितलं तर, समोरच्याच एका बाकड्यावर एक मुलगा आणि त्याचा मैत्रीणींचा ग्रुप बसलेला होता. त्याला पाहून मात्र तिच्या चेहर्यावर आश्चर्य दाटलं. ती त्याच्याशी गप्पा मारु लागली. मग तो आपल्या ग्रुपसह निघून गेला. त्याला निरोप देता देता ती माझ्यकडे वळत म्हणाली-
“बघ- म्हणून म्हणत होते मी येत नाही- हा आमच्या शेजारचा मुलगा आहे; आता यानं घरी काय सांगितलं म्हणजे?”
हायला!! ही म्हणजे कमाल आहे मुलांची. याने दोन-दोन पोरींबरोबर, हातात- कमरेत हात घालून मिठ्या मारत फिरलेलं चालतं, पण तेच त्याच्या बाजुला राहणारी मुलगी एका मित्राबरोबर फक्त सोबत दिसली तरी यांच्या पोटात दुखणार?
मला असल्या चमच्या पोरांचा रागच आला-
“काही नाही होणार गं, कशाला घाबरतेस? आणि सांगितलं तरी तू माझं नाव सांग- नाहीतर मी सांगतो माझ्याबरोबर होती म्हणून” मी तिला धीर देत बोललो. त्यावर ती आश्वासन मिळाल्यासारखं मंद हसली.
खाडीवरुन अजुनही थंड वारं येत होतं. आजुबाजुला डोळे भरुन नजर फिरवत तिने, मस्तपैकी थंड हवा छातीत भरुन घेतली. त्या वातावरणाने तिचा मुड जरा फ्रेश झाला. मग केसांचं क्लिप काढत तिनं केस मोकळे केले.
“ह्ं- बोल, कशाला बोलावलंस?” जलपरीसारखी मान मागे घेऊन केस झिडकारुन हलवत, तिने केस सुट्टे करत विचारले.
आता अशा निसर्गाच्या शांत रोमँटीक ठिकाणी तिच्याबरोबर वेळ घालवण्याला कारण हवं का?
“असंच” हसून मी खांदे उडवले.
केस सारखे करता करताच ती दोन भुवयांमध्ये नाजुक आठी पाडत, विचित्रपणे माझ्याकडे बघत लाजरं हसली.
काही क्षण तिच्या डोळ्यात ‘लबाड रे!!’ असे भाव उमटले.
दोन्ही हातांची बोटं केसांत गुंफत तिने तोंडावरच्या बटा मागं सारुन केसं एकसारखे केले. रंभेसारखे मुक्तपणे खांद्यावर रुळवले..
इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिने असे केस माझ्यासमोर मोकळे सोडले होते. नाहीतर आहेतच सारखे क्लिपमध्येच चप्पट बसवलेले!
“कशी दिसते मी?” केसांचा शेपटा उजव्या बाजुनं खांद्यावरुन पुढे घेत तिनं मला विचारलं.
मी नुसता आ वासून तिच्याकडे बघत राहिलो.
खरंतर आत्ता तिच्याएवढी अस्ताव्यस्त अन वेंधळी मुलगी आख्ख्या खाडीभर कोणी दिसली नसती. शोधूनपण! चक्क झोपेतून उठल्यासारखी दिसत होती ती!! नाहीतर आईपुढे- अंगोळीपुर्वी तेल लावायला बसलेल्या मुलीसारखी. किती ते कुरळे न् अस्ताव्यस्त केस?
त्या केसांकडे बघून त्याला हेअरस्टाईलच काय पण साधी फणीही कधी लावल्याचे वाटत नव्हते!
ते कुरळे कर्नाटकी केस तिच्या चेहर्याला मुळीच शोभत नव्हते.
पण तेच माझ्या नजरेनं बघितलं तर-
आत्ता जगातली सगळ्यात मोहक स्त्री दिसत होती ती!
“सांग..?” मुलींना असं स्वत:चं कौतुक करवून घ्यायला खूप आवडतं.
“चांगली”
“नीट सांग ना-”
“..छान दिसतेस..” माझी जीभ आत ओढल्यासारखी झाली. (का?....तिच्यावर माझा हक्क नव्हता म्हणून?)
“अजून..” सुखावत तिनं माझ्याकडे एकटक बघत मधाळ आवाजात विचारलं.
क्षणभर तिच्यात बघत स्वत:ला हरवावसं वाटलं. धुंद होऊन त्यात तासन् तास रमावसं वाटलं. पण आजुबाजुला लोक होते. तिला नंतर त्या नजरांनी ऑक्वर्ड वाटू नये म्हणून मीच स्वत:ला सावरलं.
“जरा वेगळी वाटतेस पण... सुंदरच दिसतेस..” तिच्यापासून नजर चोरत मी विषण्णपणे अथांग काळंशार खाडीकडे बघत म्हणालो.
मनात म्हटलं- ‘तू जर माझी असतीस तर मी तुझ्यात वाहून तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं गं. आपल्यामधलं हे फुटाचं अंतरही कधी ठेवलं नसतं पण..’
मी तिला अजुन काहीही सांगितलं नव्हतं. मी योग्य संधीची वाट पाहत होतो.. योग्य क्षणाची वाट पाहात होतो..
ती कधी येणार काय माहित!
ती लाजरं हसली
“प्रणित, फोटो काढ नं माझा- मलापण बघू दे, मी कशी दिसतेय” लगेच पोझ घेत ती उद्गरली.
मी फोटो काढला आणि अजुनच विचित्र वाटायला लागलं-
“ये- तू.. अशी का दिसतेस? ही तू नाहीसच!!”
“अरे चश्मा नाही ना” ती हसत म्हणाली अन प्रथमच माझ्या लक्षात तो बदल आला.
‘अरे हो. चश्मा काढला नाही का हीने, तरच ही अशी अनोळखी परकी वाटायला लागलेय’
“मम्मीही हेच बोलते- तू चश्मा काढलास की कुणीतरी वेगळीच दिसतेस- परकी असल्यासारखी!”
मी हसलो.
थोड्या वेळानं आम्ही खाडीवर फेर्या मारायला लागलो. नेहमीप्रमाणे याही वेळी शब्दांनी आमची साथ सोडली होती. काय बोलावं तेच सुचेनासं झालं.
बोलायचं खूप होतं- आठवत काहीच नव्हतं.
ठरवलेलं सगळं नि:शब्द होऊन गेलं होतं. सगळा वेळ मग मी भलत्याच गोष्टीवर बडबडू लागलो.
अखेर जाताना मी तिला विचारलं,
“तू इतकी घाबरुन काय गं असतेस? कधीही कुठे जायचं म्हटलं की, नाही- आता खाडीवरपण असंच”
“तसं नाही रे- अलिकडे, रोज संध्याकाळी सहानंतर पप्पा कधीही खाडीवर येतात- फिरायला, नाहीतर ओळखीच्या मित्रांबरोबर तरी. त्यांनी मला असं बघितलं तर त्यांना आवडणार नाही. इथे लगेच बोलून दाखवणार नाहीत ते, पण नंतर त्यांना खुप वाईट वाटेल. म्हणून येत नव्हते. आज नेमके पप्पा उशीरा घरी आलेत. फ्रेश होऊन चहा वगैरे घ्यायला एक तासभर तरी लागेल. तेवढ्या वेळात मी इकडे आले, नंतर कदाचित येणारही नाही” ती स्पष्टीकरण देत बोलली.
मी स्वत:शीच जणू खिन्नपणे हसलो...
म्हणजे हेही खाडीवरचं येणं तिचं शेवटचंच होतं तर!
सुस्कारा टाकत मी शांतपणे तिच्याबरोबर परतीचा रस्ता तुडवू लागलो...
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
पप्पांचा मुद्दा वेगळा ठेवला तरी, खाडीवर ती कशी काय आली ते माझ्यासाठी कोडं होतं. कारण ती माझ्याबरोबर, स्वत:च्या मनाने कधी आलीच नाही. दरवेळी येते येते बोलायची आणि ऐनवेळी माघार घ्यायची. तिच्या या स्वभावाची मला इतकी सवय होऊन गेली होती की, एखादं दिवशी तिने नकार दिला नसता तरच तो माझ्यासाठी जगातला सगळ्यात मोठा धक्का होता!
असंच एकदा कुठेतरी फिरायला जायचं म्हणाली. बोललं चल. तू येतेस तर, मलाही काही प्रॉब्लेम नाही. मग दोन दिवस तिचं जायचं जायचं नाचलं. ऐन दिवशी सकाळी फोन केला, तर बोलली-
‘नाही रे- आत्ता नको नंतर कधीतरी!’
हसून म्हटलं, ‘बर.. राहू दे’
असं एक न अनेक वेळा झालं. ती हो बोलायची, सगळं व्यवस्थित ठरायला आलं- की संध्याकाळपर्यंत तरी तिचा निर्णय नकारात बदललेला असायचा.
अन् हे माहीत असूनही प्रत्येक वेळी मी तिच्याबरोबर जायला वेड्यासारखा उत्सुक असायचो...! (यालाच मृगजळ म्हणतात का?)
तिच्याशी या विषयावर बोलताना ती म्हणाली,
“इथे ओळखीचं कोणी बघेल म्हणून भिती वाटते. फिरायला मलाही आवडतं, पण नेणार कोण?”
त्यावर मग लांब कुठेतरी फिरायला जायचं ठरल. कुठे- तर जुहू चौपाटी. तिला ते आवडलं. म्हणाली,
“खरंच नेशील? मी येते. मस्त फिरु. कधी जायचं ते फक्त सांग”
उत्साहाने सळाळत मीही सगळं ठरवलं. मग? तिच्यासोबत राहण्याची दुर्मिळ संधी कोण घालवणार?
जायच्या आदल्या दिवशी आठवणीनं फोन केला-
“काय गं- जूहूला येणार ना?”
“नाही रे- तूच जा! मला यावेळी जमणार नाही! आपण नंतर कधीतरी जाऊ- नेक्स टाईम!” अगदी ठरल्यासारखा तिने नकार दिला आणि तेव्हाच मी समजून चुकलो-
हीचा वेळ आपल्यासाठी कधी नव्हता... नसणार!
फोन ठेवत असतानाच चेहर्यावर कडवट हास्य पसरलं. उगाचच डोळे वगैरे भरुन यायला लागले......... का? ती येणार नाही हे मला अगोदरच माहीत होतं म्हणून?.....
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आपल्या मनाला सगळं काही कळत असतं. पण कळूनही ते आपल्याला मस्त वेडं बनवत असतं!
ती माझ्याबरोबर येत नाही, किंवा स्वत: वेळ देत नाही, म्हणून मी कधीही तिच्याशी याबाबतीत अडून राहिलो नाही. कि तिचा मनात राग धरुन बसलो नाही. उलट मी जे तिच्याबद्दल फिल करत होतो, ते मला तिला सांगायचे होते- एकदा तिच्याकडे व्यक्त व्हायचे होते. तिचे मत जाणून घ्यायचे होते.
आणि तो क्षण एकदाचा आला..
वेस्टला तिला ट्रीट देण्याचा माझा प्लॅन एकदा फिस्कटला होता, वेस्टची ती ट्रीट खूपच खराब झाली होती. त्यामुळे यावेळी तिला मस्तपैकी मॉलमध्ये सरप्राईज ट्रीट देण्याचं मी ठरवलं. त्यासाठी क्लास सुटल्यावर तिला सरळ बसस्टॉपवर यायला सांगितलं. अर्थात तिला यातली माहीती नव्हती. काहीतरी मी सरप्राईज देणार आहे इतकंच तिला सांगितलं होतं.
ती क्लासवरुन सुटण्याच्या वेळेस मी बसस्टॉपवर अगोदरच थांबलो होतो. ती येताच मी सरळ एका बसमध्ये चढलो. ती बस तिथून सुटतच होती. मला चालत्या बसमध्ये चढलेलं बघताच तिची थोडी चलबिचल झाली. कुठे जायचं आहे म्हणून मला विचारु लागली. पण मी तिला लवकर चल मी सांगतो, असं म्हणत बसमध्ये यायला भाग पाडली. ती चढली आणि बसने वेग पकडला.
दहिसर चेकनाक्याच्या अगोदरच एका स्टॉपवर मी उतरलो. चालत ठाकूर मॉलच्या दिशेने चालायला लागलो. ती सतत काय काम आहे म्हणून विचरतच होती.
“मित्राला भेटायला आलोय” मी थाप ठोकली (अर्थात तिथं मित्र काम करत होता खरा, पण त्याला भेटायला मी नक्कीच आलो नव्हतो!)
ती अविश्वासानं माझ्याकडे बघायला लागली.
“यासाठी मला आणलंस??”
“चल सांगतो-” हसून म्हणत मी तिला आत नेलं.
मला सेकंड फ्लोअरला जायचं होतं. पण जाताजाता मित्र आहे का म्हणून मी मार्केट यार्डमध्ये डोकावून गेलो. तो जागेवर नव्हता. मग मी तिला घेऊन सरळ वर आलो.
“हं बोल काय हवंय तुला?” तिथला एका साईडचा टेबल निवडून बसत मी तिला विचारलं.
ती भोवतालचा नवीन परिसर अन् स्नॅक्स काऊंटरच्या हायफाय किंमती बघण्यात हरवली होती.
“नको- इथे सगळं महाग असेल”
“अगं असू दे- तू बोल काय घेणार?”
तिने अडखळत एक फ्रुटीसारखं काहीतरी मागवलं. बाकी तिनं काही घेतलं नाही.
“आता बोल, कशाला आणलंस?”
“कशाला नाही असंच- अगोदर दिलेली ट्रीट खराब झाली नं- म्हणून म्हटलं तुला इथे ट्रीट द्यावी”
“ह्म्म?!!”
ती कौतुकानं माझ्याकडे बघत हसली.
अगं जास्त पैसेवाला झालो की तुला यापेक्षाही मोठ्या ठिकाणी ट्रीट देईन मी!”
“हो?” ती उद्गरली. पुन्हा आजुबाजुची नवलाई गर्दी न्याहाळू लागली.
“एवढंच काम होतं?” थोड्या वेळानं तिनं विचारलं.
“नाही म्हणजे..”
“बोल ना-”
थोडी चलबिचल झाली. बोलू की नको असं वाटलं. मग खुर्ची मागे सारुन खाजगी बोलत असल्यासारखं पुढे वाकत मी तशाच धडधडत्या अंत:करणाने झटकन बोलून टाकलं-
“*** मी जर तुला आय लव्ह यू म्हटलं तर तुला काय वाटेल!!!!”
“काय??” ती चटकन पॅक खाली ठेवत उद्गरली.
“हो म्हणजे मी तुला आत्ता- या ठिकाणी आय लव्ह यू म्हणालो तर, तुझी रिअॅक्शन काय असेल?”
ती चमत्कारिकपणे माझ्याकडे बघायला लागली. अचानक तिच्या डोळ्यांत एक दुखद छटा झळकल्याचा मला भास झाला. मी झटकन विषय बदलला-
“नाही म्हणजे- माझा एक मित्र आहे. त्याने असंच एका मुलीला प्रपोज केलं आहे. पण मला वाटतं ती वरच्या पोस्टवर असल्याने त्याचं प्रपोजल एक्सेप्ट नाही करणार, तुला काय वाटतं?”
मी कसाबसा सावरुन घेत बडबडलो.
तिनं शांतपणे खाली मान घालत ज्युसचा पॅक साईडला ठेवला!
“तू यासाठी मला इथं बोलावलंस का?” तिचा आवाज कापरा झाला होता. चेहर्यावरचं हसू जाऊन क्षणात तिथे कष्ठी भाव निर्माण झाले होते.
“हे बघ मला..”
“अगं मी नुसतं तुझं मत विचारतोय, इतकं टेन्शन काय घेतेस? जर असाच तिच्या जवळच्या मित्राने तिला प्रपोज केला तर, ती काय विचार करेल?”
“तिचं मी कसं सांगू शकेन? मला का विचारतोयस?”
“अगं जनरली एखाद्या क्लोज फ्रेंडने प्रपोज केला तर एखाद्या मुलीची काय प्रति..”
“--- प्रणित मला आत्ता या क्षणी घरी जायचं आहे!!! येतोस का जाऊ????” झटकन् बॅग उचलून उठत ती निर्वाणीच्या आवाजात म्हणाली.
तिचे ते शब्द समजायलाच माझ्या सुन्न डोक्याला अर्धा मिनिट लागला.....!
========================================================================
क्रमश:
छान, मुख्य म्हणजे पटापट
छान, मुख्य म्हणजे पटापट येतायेत सगळे भाग
खुप छान...पुढच्या भागाच्या
खुप छान...पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
खुप छान पुभाप्र पुलेशु
खुप छान पुभाप्र पुलेशु
“*** मी जर तुला आय लव्ह यू
“*** मी जर तुला आय लव्ह यू म्हटलं तर तुला काय वाटेल!!!!”
“हो म्हणजे मी तुला आत्ता- या ठिकाणी आय लव्ह यू म्हणालो तर, तुझी रिअॅक्शन काय असेल?”
>>
हम्म रोचक
मस्तच पुलेशु
मस्तच
पुलेशु