एकदा वाळवंटातील सोन्या उंट फिरत फिरत आनंदवनात आला.
त्याला सगळ्या गोष्टींना नाव ठेवायची वाईट खोड होती.
त्याने या आधी जंगल, प्राणी, पक्षी काहीसुध्दा बघितले नव्हते.
सिंह महाराजांनी त्याचे स्वागत केले आणि आनंदवन बघण्यासाठी बरोबर वाघ्या कुत्रा पाठवला.
खर तर इतकी झाडे, गार हवा बघून त्याला खूप छान वाटतं होते पण कशाला चांगल न म्हणण्याची खोड त्याला शांत बसू देईना.
फिरता फिरता सोन्याला रानगाय दिसली. तिला बघून सोन्या मोठ्याने हसत म्हणाला," तू कोण आहेस? , कोणी का असेना पण किती जाडी आहेस. चालताना पोट बघ कसं हलत आहे."
गाय त्याला काही न म्हणता निघून गेली.
पुढे म्हैस दिसली तिला म्हणाला," ए, तू किती काळी आहेस. अगदी पावसाच्या ढगापेक्षा पण काळी."
हरणाला म्हणाला," तुझे पाय बघ कसे फेंगडे आहेत."
ससेभाऊला म्हणाला, " तू इतका छोटा आहेस की माझ्या पायाखाली चिरडला जाशील."
वाघ्याला सोन्याचा खूप राग येत होता, पण तो आनंदवनाचा पाहुणा असल्याने त्याला कसे सांगावे याचा विचार करु लागला.
त्याला एक युक्ती सुचली आणि तो सोन्याला म्हणाला, "तू आनंदवनात पहिल्यांदाच आला आहेस ना? तुझी ओळख सांग ना."
सोन्या :- "मी सोन्या उंट, वाळवंटात रहातो ."
वाघ्या :- "तुझं नाव सोन्या का बरं आहे ?"
सोन्या :- "कारण माझा रंग तसा आहे ."
वाघ्या :- "मगापासून जो भेटेल त्याला तू नाव ठेवतो आहेस. हसतो आहेस. आता त्या शेजारी वाहत असलेल्या नदीत बघ. आमचा एक मित्र आहे. सांग तो कसा आहे ?"
सोन्याने नदीत वाकून बघितले. त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले पण वाळवंटात इतकी मोठी नदी नसल्यामुळे त्याने ते कधी बघितलेले नव्हते. त्यामुळे तो ओळखू शकला नाही. आणि म्हणला ," किती कुरूप आहे तो प्राणी. त्याचे पाय, पाठ, मान सगळंच वेडावाकड आहे. पाठीवर मोठं कुबड आहे, कोण आहे तो ? "
वाघ्या :- "अरे मित्रा सोन्या, तो तूच आहेस. पाण्यात तुझे प्रतिबिंब दिसते आहे."
सोन्या :- "(आश्चर्याने ) काय मी इतका घाणेरडा दिसतो?"
वाघ्या :- "घाणेरडा नाही फक्त इतरांपेक्षा वेगळा. आपण रहातो त्यानुसार देवबाप्पाने आपल्याला रंग, रुप दिले आहे. इतरांपेक्षा वेगळे बनवले .
गाय, म्हैस जाड असल्यातरी गोड दूध देतात. हरीण ससेभाऊ जोरात पळू शकतात. माझी नजर आणि कान खूप तीक्ष्ण आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले आहे. तुझ्या शरीराच्या आकारामुळे तू वाळवंटात राहू शकतो. वाळूत चालू शकतो. रेतीच्या वादळी वाऱ्याचा सामना करु शकतो. उगाच कशालाही नाव ठेऊ नये."
सोन्याला वाघ्याचे म्हणणे पटले आणि तेव्हापासून त्याने नावे ठेवण्याची वाईट खोड सोडून दिली.
छान!
छान!
आभार
आभार
मस्त गोष्ट आहे. आमच्या
मस्त गोष्ट आहे. आमच्या शेजारच्या किट्टूलाही आवडली.