शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

Submitted by कुमार१ on 22 June, 2017 - 22:44

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालाबादप्रमाणे दोन मोठ्या इंग्रजी शब्दकोशांनी त्यांचे २०१९ चे मानाचे शब्द जाहीर केले आहेत.

१. Oxford चा शब्द आहे:
Climate emergency :

अर्थ अगदी स्पष्ट आहे - पर्यावरणातील घातक बदल खरोखर गंभीर पातळीवर पोचले आहेत; आपण तातडीने काही उपाय न योजल्यास ते अतिगंभीर होतील.
…...

२. Dictionary.com चा शब्द आहे:
Existential :
हा शब्द "आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे किंवा पणाला लागल्याचे" सुचवतो. यंदाच्या जागतिक पातळीवरील ३ प्रकारच्या घटना यात अभिप्रेत आहेत:

अ) पर्यावरणातील घातक बदल
ब) बेछूट गोळीबाराच्या घटना
क) काही देशांत लोकशाहीचे अस्तित्व

आज अपडेट्स च्या निमित्ताने हा लेख वाचनात आला. खरोखर मनोरंजक माहिती अन प्रतिसादांमुळे ज्ञानात भर पडली.
आणखी एक प्रसिद्ध शब्दकोश Merriam Webster यांनी त्यांचा वर्षाचा शब्द प्रकाशित केला..

Merriam Webster Names 'They' as Its Word of the Year for 2019.

स्रोत : https://time.com/5746516/merriam-webster-word-of-the-year-2019/

धन्यवाद डॉ आणि बुन्नु. छान माहिती.

ऑक्सफर्ड आणि डिक्शनरी डॉट कॉम च्या शब्दांत समान आशय जाणवतो आहे.

बुन्नु,
धन्यवाद. त्या ' they' चे वैशिष्ट्य म्हणजे ते एकवचनी सर्वनाम आहे.

साद +१

डॉ. बिरबल झा हे दिल्लीस्थित इंग्लीश भाषातद्न्य आहेत. नुकताच त्यांनी Healthsake हा नवा शब्द तयार केला. हा शब्द Collins इंग्लीश शब्दकोशाने स्वीकारला आहे.
अभिनंदन !

‘ No handshake for healthsake ', असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे.

१ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित >>> मस्त बातमी. शब्दकोष तयार करणं किती कठीण काम असेल.

यावरून जरा गुगललं तर ही माहिती मिळाली : The English Dictionary
First, let’s look at how many words are in the Dictionary. The Second Edition of the 20-volume Oxford English Dictionary contains full entries for 171,476 words in current use (and 47,156 obsolete words). Webster's Third New International Dictionary, Unabridged, together with its 1993 Addenda Section, includes some 470,000 entries. But, the number of words in the Oxford and Webster Dictionaries are not the same as the number of words in English.

या मराठी शब्दकोषातही एकूण शब्दसंख्या जरा कमीच वाटतेय. मराठीत यापेक्षा नक्कीच जास्त शब्द असतील. काय वाटतं? जर शब्दकोषातले शब्द = आधुनिक काळातील वापरातले शब्द असं असेल तर याव्यतिरिक्त जुने वगैरे कितीतरी असतील. बोलीभाषेत तर अजूनच असतील.

मामी,
धन्यवाद.

माझ्याकडे १९८९चा शब्दरत्नाकर आहे. त्याच्या प्रस्तावनेत आपटे लिहितात की :
१. मराठीची शब्दसंख्या सुमारे पाऊण लाख, आणि
२. इंग्लिशची ५ लाख.

हे पाहता वरील १,६८,००० ही वाढच दिसते.
शब्दकोषातले शब्द = आधुनिक काळातील वापरातले शब्द >>>>
यातही तथ्य असावे.

आपला देश पहिल्यापासून कॄषीप्रधान असल्याने शेतीविषयक शब्दसंपदा अमाप असणार आपल्याकडे. असा काही कृषीक्षेत्राशी संबंधित शब्दांचा वेगळा शब्दकोष तयार केला आहे का? करायला हवा खरंतर. कारण शेतीची पद्धत झपाट्यानं बदलत आहे, गावातली व्यवस्थाही बदलत आहे आणि त्यामुळे अनेक शब्द वापरातून निघून जात आहेत. ते सगळे साठवले जातील.

बातमी वाचली. छान.
हा कोश म्हणजे मराठी प्रेमींना महाराष्ट्र दिनाची उत्तम भेट आहे.

जाई,
कोशकार तुमचे परिचित आहेत हे वाचून आनंद झाला.
पुन्हा अभिनंदन !

सा द +१

Dictionary.com ने काही भारतीय इंग्लिश वाक्य अथवा शब्दांची विशेष दखल घेतली आहे ते असे आहेत :

Do the needful
Timepass
Mugging
My teacher is sitting on my head !
My friend is eating my brain !
Do one thing
Kindly adjust

…. संबंधित लेखात असेही म्हटले आहे, की आपण (म्हणजे अमेरिकीनी) सुद्धा हे शब्द /वाक्य वापरून बघायला हरकत नसावी !

मराठी शब्दकोशाचा आणखी एका प्रकारे वापर आपण करू शकतो. खूपच परिचयाच्या अशा एखाद्या शब्दाचे लेखन चुकीच्या पद्धतीने रूढ होताना दिसते तेव्हा आपण शब्दकोशातून त्याचे योग्य लेखन नक्की करून आपला संभ्रम नाहीसा करू शकतो. उदा. सहस्र ऐवजी सहस्त्र, तज्ज्ञ ऐवजी तज्ञ ह्या चुका कळू लागतात. शब्दांची लिंगे, वचनेसुद्धा निश्चित करता येतात. उदा. गूळ, लसूण, कूट (दाणे वगैरेचे),अळू, लिंबू, ऋण, धाबे, कोंकण इत्यादि.

धन्यवाद हीरा, आपले लेखन चूक का बरोबर हे बघायला काही online मदत आहे का ? र्हस्व दीर्घ आणि व्याकरण (र्हस्व चूक आहे टाईप करता येत नाही).

हीरा,
अगदी बरोबर. छान उदाहरणे.
परवा मला अजून एक शब्द असा बारकाईने शिकायला मिळाला. ‘वाताहत’ असा मूळ शब्द आहे. परंतु ‘वाताहात’ हा त्याचा अपभ्रंश झाला आणि कालांतराने तोही भाषेत रूढ झाला. त्यामुळे शब्दकोश आता दोन्ही शब्द देतो.

युक्तिक आणि संयुक्तिक यांचे तसेच काहीसे झाले आहे.

अस्मिता, अगदी बरोबर.
अशीच एक ढोबळ चूक बहुतेक वेळा पसायदान म्हणताना केली जाते. त्यातील एक वाक्य दुरिताचें तिमिर जावो असे आहे. बहुसंख्य शाळांमध्ये ते दुरितांचे असे चुकीचे म्हटले जाते. ही चूक रूढ व्हायला एक नाटक कारणीभूत ठरले. त्याचे नाव ‘दुरितांचे तिमिर...’ होते !

विकिपीडियावर मात्र अगदी शुद्ध (दुरिताचें) टंकले आहे.
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4...

आमच्या शाळेनेही 'दुरितांचे' असेच पाठ करून घेतले होते. असं चूक पाठ वगैरे झाल्यावर तर जीभेला/बोटांना योग्य उच्चारासाठी वळण लावणे अजून कठीण.
मला लक्षात आले आहे की आपण स्वतः च्या लेखनाबाबत आग्रही राहून स्वतःत सातत्याने सुधारणा करू शकतो. १००% सुयोग्य लिखाण नेहमीच दूर असणार आहे Happy ! पण प्रयत्न चालू ठेवावेत.
धन्यवाद कुमार सर.

अस्मिता , +१
पसायदान गाताना लताबाईंनी पण अगदी शुद्ध उच्चार केलेला आहे. बारकाईने ऐकल्यावर कळते.
जरूर ऐका ! Bw

सर्वांना धन्यवाद !

सध्या दैनिक सकाळ मध्ये अशोक श्री. रानडे यांची शब्दयात्रा ही लघुलेखमाला चालू आहे.
त्यात निवडक शब्दांचे सुंदर विश्लेषण आणि उपयोग दिलेला असतो.
इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा.

सहज हे गुगल केले अन खालील मराठी भाषांतर वाचून हहपुवा !!! Bw

trade off
(phrasal verb of trade)

Translate trade off to मराठी

व्यापार बंद

Pages