माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
"uppity" was a term racist
"uppity" was a term racist southerners used for black people who didn't know their place.
मध्यंतरी सहा अक्षरी
मध्यंतरी सहा अक्षरी वर्डलमध्ये co * * ar या शब्दाने फार छळले. ज्याम येईना !
शेवटी उत्तर निघाले cougar
त्याचे दोन अर्थ आहेत:
१. जंगली अमेरिकी मांजर
२. ( अनौपचरिक ) : पस्तिशी ओलांडलेली अशी स्त्री जी तरुण पुरुषाकडून शरीरसुखाची अपेक्षा करते .
moonlighting
moonlighting
हा एक मजेदार अनौपचारिक शब्दप्रयोग आहे.
१८८२ पासून त्याचा अर्थ "रात्रीच्या वेळेस गुन्हे करणे" हा होता.
पुढे कालौघात 1954 पासून त्याला खासगी उद्योग क्षेत्रात वेगळा अर्थ प्राप्त झाला. तो म्हणजे :
एका ठिकाणी नोकरी करत असताना तिथल्या मालकाला न सांगता (चोरुन) संध्याकाळी किंवा रात्री दुसऱ्या ठिकाणीसुद्धा नोकरी करणे.
माफ करा. इंग्लिशमध्ये लिहितो
माफ करा. इंग्लिशमध्ये लिहितो आहे. खर तर कोट करतो आहे.
In chemistry, word usage leaps from ambiguity to incomprehension. Here is a quote from E.Kasner and J.Newman:
In chemistry, substances no more complicated than sugar, starch, or alcohol have names like this: Methylpropenylenedihydroxicinnamenylacryc acid, or, 0-anhydrosulfaminobenzoine, or, protocatechuicaldehydemethylene. It would be inconvenient if we had to use such terms in everyday conversation. We could imagine even the aristocrat of science at the breakfast table asking, "Please pass the 0-anhydrosulfaminobenzoic acid," when all he wanted was sugar for his coffee?
Methylpropenylenedihydroxicin
Methylpropenylenedihydroxicinnamenylacryc acid, !!!

सामान्य रसायनांना IUPAC
सामान्य रसायनांना IUPAC प्रणालीनुसार दिलेली नावे हातभर लांब असतात.
अशी काही नावे तर लेखनातील अख्खी ओळ व्यापतात. - विशेषता enzymes ची नावे.
..................................
Titin या प्रथिनाच्या "शास्त्रीय" नावात म्हणे चक्क 189,819 अक्षरे आहेत !! अर्थात हा आचरटपणा आहे. अधिकृत शब्द नाही.
(https://en.wikipedia.org/wiki/Longest_word_in_English)
विकी चा संदर्भ भन्नाट आहे.
विकी चा संदर्भ भन्नाट आहे. जाता जाता बाणभट्ट ह्या महान लेखकाच्या कादंबरी ह्या रचनेतील एक वाक्य जवळपास चार पाने इतके लांबलचक आहे.
केशवकूल, दोन्ही प्रतिसाद धमाल
केशवकूल, दोन्ही प्रतिसाद धमाल आहेत.
अजून काही गमती जमती
अजून काही गमती जमती
Why call it a building if it's already been built?
When a package is sent by car it is called shipping, when it is sent by ship it is called cargo.
Time flies like an arrow and fruit flies like an orange.
'ब्लाईंडनेस'- ज्युझे सारामागो ह्या पुस्तकाचा परिचयात https://www.maayboli.com/node/82532
>>आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही विरामचिन्हे नाहीत. स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक, प्रश्नार्थक इ. सगळी चिन्हे कुठेच नाहीत.<< ok
आता ही वाक्ये पहा,
A woman, without her man, is nothing.
A woman: without her, man is nothing.
रोको मत, जाने दो.
रोको, मत जाने दो.
स्वल्पविरामांची जागा
स्वल्पविरामांची जागा बदलल्याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो
--------
श्री सारामागो यांनी विरामचिन्हे न वापरताही घटनांचे योग्य अर्थ , तीव्रता व आशय वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचवला आहे असे परिचय वाचून लक्षात आलेय, त्यामुळे मी खरंच प्रभावित झालेय.
yoni व lingam हे संस्कृत
छानच !
.................
yoni व lingam हे संस्कृत शब्द इंग्लिश शब्दकोशांमध्ये फार पूर्वीच स्वीकारलेले आहेत.
( ब्रिटिश इंग्लिश)
https://www.collinsdictionary.com/dictionary/english/yoni
https://www.collinsdictionary.com/dictionary/english/lingam
Moonlighting साठी मराठी शब्द
Moonlighting साठी मराठी शब्द जोडनोकरी असा सुचतो. चोरनोकरी(चोरखिसाच्या धर्तीवर) हा आणखी एक.
वरील दोन्ही योग्य आहेत.
वरील दोन्ही योग्य आहेत.
आधी कोणी ह्याबद्दल लिहिले आहे
आधी कोणी ह्याबद्दल लिहिले आहे कि नाही. मला कल्पना नाही. पण ही एक टग इन चीक सर्कास्टिक
डिक्शनरी
THE DEVIL'S DICTIONARY - by AMBROSE BIERCE
जरूर वाचावी अशी.
गटेनबर्ग प्रोजेक्ट्सवर मिळेल. किंवा
https://xroads.virginia.edu/~Hyper/Bierce/bierce.html इथे online वाचा
पण जरूर वाचा.
वा ! छान सुचवणी
वा ! छान सुचवणी
निवांतपणे तिथे डोके घालण्यात येईल......
Overton window असा एक
Overton window असा एक शब्दप्रयोग वाचनात आला. त्याला आपण समाजमनाची चौकट असे म्हणू शकू.
प्रत्येक काळात समाजाचे एकंदरीत विचार हे ठराविक चौकटीत किंवा परिघातच असतात. त्या पलीकडचे विचार समाजाला झेपत नाहीत. अमेरिकेतील Overton या नावाच्या धोरणकर्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने हा शब्दप्रयोग रूढ आहे.
याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या शे-दोनशे वर्षांपूर्वी समलैंगिकता ही कल्पनाच त्याज्य /निषिद्ध/ गुन्ह्यास पात्र होती. आज ती खुलेपणाने स्वीकारली जाते.
कालानुरूप ‘विंडो’ किंवा चौकट विस्तारत जाते. परंतु काही विषयांबाबत ती आक्रसताना देखील दिसते ! याची काही उदाहरणे आपल्या आसपास आहेतच.
इथे विन्डोचे सुरेख चित्र आहे :
https://en.wikipedia.org/wiki/Overton_window
Levy हा शब्द नेहमीच्या
Levy हा शब्द नेहमीच्या परिचयातला.
परंतु, levee (= पूरबांध) हा शब्द वर्डलमध्ये आल्यानंतर उडालोच; प्रथमच ऐकला.
आता गंमत पहा. या दोन्ही शब्दांचा उच्चार जवळजवळ सारखाच आणि उगमही एकाच कुळातील :
(latin >>> Fr>>>>Eng):
Levis >>> levare>>>> lever>>>>> levee>>>> levy
>>>
>>>
levee>>>> levy>>> भारीच. आवडले.
मी रोज quordle सोडवतो आणि
मी रोज quordle सोडवतो आणि त्यांचे प्रॅक्टिस गेम्सही.
तिथे आलेला parka हा शब्द लक्षात राहिला.
अमेरिकन आणि ब्रिटिश उच्चार वेगवेगळे आहेत.
शब्दकोश जर अमेरिकन उच्चार वेगळे म्हणून स्वीकारतात तर इतर देशांतले उच्चारही स्वीकारले जायला हवेत.
एक सुंदर संयोगशब्द
एक सुंदर संयोगशब्द :
Shrinkflation = shrink + inflation
महागाई वाढत गेली की काही वस्तूंचा खप कमी होऊ शकतो. मग तो सावरण्यासाठी उत्पादक युक्ती करतात. वस्तूची किंमत तीच ठेवून तिचे वजन/आकारमान कमी करायचे.
अनेक चित्रे इथे :
https://www.google.com/search?q=shrinkflation+images+&tbm=isch&ved=2ahUK...
पार्ले जी हेच करत आलंय.
पार्ले जी हेच करत आलंय. आठवले काजू मोदक सुद्धा.
Parka >>> छान आहे !
Parka >>> छान आहे !
+१
.........................
पार्ले जी हेच करत आलंय. आठवले काजू मोदक >>>
बहुतेक "खाऊ" गटातील सगळेच !
बऱ्याच पॅकबंद खाद्यपदार्थांनी
बऱ्याच पॅकबंद खाद्यपदार्थांनी मागे पाव किलो ऐवजी 200 ग्रॅमची पुडकी चालू केली होती. त्याविरुद्ध ग्राहक मंचात खटला झालेला होता. त्याचा निकाल ग्राहकांच्या बाजूने लागला होता. निकालपत्रात स्पष्ट म्हटले होते की एक किलोच्या एक चतुर्थांश पटीतच असा माल विकता येईल.
परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे असे वाटत नाही. कदाचित, नंतर उत्पादक वरिष्ठ न्यायालयात गेले असल्यास कल्पना नाही.
>>>>>एक सुंदर संयोगशब्द :
>>>>>एक सुंदर संयोगशब्द :
Shrinkflation >>>> खूप छाने शब्द !
आता आर्थिक तंगीमंगीने हा प्रकार वाढेल.
>>>>>एक सुंदर संयोगशब्द :
.
roach ची गंमत पहा :
roach ची गंमत पहा :
१. ब्रिटीश cockroach चे अमेरिकी लघुरूप
२. अमली पदार्थाच्या सिगारेटचे थोटूक करायला जो कागद वापरतात तो.
इंग्लिश 'sir' चा उहापोह पान १
इंग्लिश 'sir' चा उहापोह पान १ वर झालाय.
आता मराठी 'सर' ची मजा पाहू.
मूळ [फा. सर्] = मुख्य.
सर हा प्रत्यय नावाआधी लावून :
सरदेशपांडे , सरदेशमुख, सरमुकादम , सरकारकून...
असे अनेक जोडशब्द झालेत.
सरपंत = मुख्य न्यायाधीश.
forty winks हा एक मजेशीर
forty winks हा एक मजेशीर वाक्प्रचार. याचा अर्थ:
दिवसा बसल्याजागी घेतलेली अत्यल्प झोप (डुलकी). डोळ्याची पापणी एकदा उघडझाप करायला सेकंदाचा अगदी कमी अंश लागतो. म्हणून चाळीस वेळा उघडझाप करायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ काढलेली डुलकी !
शब्दाचा उगम काहीसा गूढ आहे. १८२१ मध्ये Dr. William Kitchiner यांनी तो प्रथम वापरला असे काहींचे म्हणणे आहे. मग 40 अंकच का निवडला ?
त्याचे उत्तर, बायबल मध्ये असलेले 40 या अंकाचे महत्व.
या वाक्प्रचाराचा दुसरा एक भेद म्हणजे twenty winks .
अर्थ उघड आहे. ४० पेक्षा निम्मा वेळ घेतलेली डुलकी. अर्थात हा वाक्प्रचार अनौपचारीक संदर्भांमध्ये मिळतो.
ज्यांनी नुकताच मिष्टान्नावर
ज्यांनी नुकताच मिष्टान्नावर ताव मारून जेवण केले आहे त्यांनी कृपा करून हा प्रतिसाद वाचू नये.
नुकताच हा शब्द वाचनात आला.
vomitorium A vomitorium is a passage situated below or behind a tier of seats in an amphitheatre or a stadium, through which big crowds can exit rapidly at the end of an event.
म्हणजे ऑडीटोरीअम चा जवळचा नातलगाच की!
आता हाच शब्द गुगल करून बघा.
तुम्हाला ओकारी येईल अशा गोष्टी वाचायला मिळतील!
थोडक्यात सांगतो. पूर्वीच्या रोमन साम्राज्यात रोमन नागरिक जोरदार मेजवान्या झोडत. पोटभर जेवण झाल्यावर मग vomitorium नावाच्या खोलीत जाऊन ओकारी करून ताजेतवाने होऊन पुन्हा पंक्तीत जेवायला तयार!
ख.खो.दे.जा.
vomitorium नावाच्या खोलीत
vomitorium नावाच्या खोलीत जाऊन ओकारी करून ताजेतवाने होऊन पुन्हा पंक्तीत जेवायला तयार!
>>>
ही गैरसमजूत आहे असे दोन संदर्भ म्हणताहेत. मलाही तसेच वाटते.
हे लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असावे.
आपण अशा मार्गांना कटण्याचे मार्ग असे म्हणू शकू.
यावरून मला मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधील शंभर वर्षांहून जुने व्याख्यानगृह आठवले. ते थिएटर पद्धतीचे आहे.
त्याला पुढचे मुख्य दार तसेच मागच्या उंच बाजूला दोन्ही कोपऱ्यातून दोन दारे आहेत.
त्यांचा हेतू उघड आहे. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांनी तिथून आत यावे, तसेच व्याख्यान कंटाळवाणे वाटत असलेल्या विद्यार्थ्यांनी तिथून कटले तरी चालेल असा असावा !
Pages