माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!
सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.
महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.
मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.
बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.
एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.
आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.
‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.
गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.
आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:
१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.
मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.
आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!
शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!
आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?
एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
***********************************************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
https://en.oxforddictionaries
https://en.oxforddictionaries.com/definition/sir
इथे जे काळे /जोशी सर चूक
इथे जे काळे /जोशी सर चूक म्हणता ते पटण्यासारखं नाही. मराठी आणि इं ची वाक्यरचना वेगळी असते.
"त्याला उन्हात फिरताना फिट आली" या वाक्याचा अर्थ कळला तरी तसे भाषांतर इंग्रजीत होत नसते.
मी इथे थोडासा विरोधी विचार व्यक्त करतो. फक्त शब्दकोश पाहून भाषा समजली तरी चांगली लिहिता बोलता येईलच असं नाही. ती त्यांच्या पद्धतीनेच आत्मसात करावी लागते.
आवडलं. वाचायला मजा आली.
आवडलं. वाचायला मजा आली.
(निरंजन घाटेंच्या 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' पुस्तकातही शब्दकोशांवर एक आख्खं प्रकरण आहे. त्यात त्यांनी शब्दकोशांचे किती विविध प्रकार वाचल्याचं सांगितलंय.)
'सर आणि मॅडम'बद्दल चिनूक्स
'सर आणि मॅडम'बद्दल चिनूक्स यांचं म्हणणं पटलं.
आधी काय आलं? सर हे आदरार्थी संबोधन की सर हा किताब?
इंग्रजी पत्रांत मायना डियर सर लिहितात, तोही चूक का मग?
मराठीत आपण आदरार्थी संबोधन नावानंतर लावतो. जसं काळेकाका, त्याप्रमाणेच सर किंवा मॅडम हे शब्द नावानंतर येतील.
पूर्वी आदर दर्शवायला संभाषणातही 'साहेब' जोडलं जायचं. त्याची जागा 'सर'ने अलीकडेच घेतलीय - ही इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांची देणगी (किंवा त्यांनी घुसडलेली गोष्ट) असावी.
महिलांना आदरासाठी ताई/बाई पुरायचं.
सर्वांनी उदाहरणादाखल 'काळे'
सर्वांनी उदाहरणादाखल 'काळे' आडनाव घेऊन आमच्या 'काळे' आडनावाला जी प्रसिद्धी दिलीत, त्याकरिता मी आपणां सर्वांचा आभारी आहे.
ललिता, आभार !'वाचत सुटलो
ललिता, आभार !
'वाचत सुटलो त्याची गोष्ट' वाचायची उत्सुकता आहे.
सचिन, ज्यांच्याशी मैत्री करावी असे मनापासून वाटते अशांपैकी तुम्ही एक आहात. तेव्हा तुमचे आड नाव हक्काने वापरताना आनंद वाटतो.
मस्त. माहितीपूर्ण तरीही रंजक
मस्त. माहितीपूर्ण तरीही रंजक झालाय लेख.
@ कुमार१, आपण मला आपले मानलेत
@ कुमार१, आपण मला आपले मानलेत याचा मला फार आनंद आहे. आपले फार फार आभार!
भरत,
भरत,
वाक्य कसं आहे मराठीत त्याप्रमाणे सर शब्द वापरावा लागेल असं मला म्हणायचं आहे.
१) मी काळे सरांना भेटलो.
२) सर आइझॅक न्युटन नावाजलेले गणिती होते.
इंग्रजी वाक्यात असं काही होणार नाही.
कारण काळे सर हे आपण काळे गुरुजी अशा संदर्भाने म्हणतो
Srd, मी आणि तुम्ही एकच
Srd, मी आणि तुम्ही एकच म्हणतोय.
<तेव्हा जोशी सर असे नावानंतर लावणे मला चूक वाटते> असं आधीच्या पानावरच्या एका प्रतिसादात आहे, त्यासंदर्भात मी लिहिलं आहे.
ललिता, आभार !
ललिता, आभार !
'वाचत सुटलो त्याची गोष्ट' वाचायची उत्सुकता आहे.>>>>+१
मोहना, आभार. वाचकांनी त्यांना
मोहना, आभार. वाचकांनी त्यांना वाटलेल्या कोशातील रंजक गोष्टी इथे जरूर लिहाव्यात. शब्दकोश अशा गोष्टींचा खरोखर खजिना आहे.
'gymnasium' (म्हणजे आपले 'जिम
'gymnasium' (म्हणजे आपले 'जिम') शब्द तसा रंजक आहे. 'gymnos' म्हणजे नग्न .
आता हा शब्द कसा आला ? तर प्राचीन olympics मध्ये अॅथलिट्स हे नग्नावस्थेत व्यामप्रकार करीत.
त्यामुळे 'gymnasium' = नग्नावस्थेतील व्यायामाची शाळा !
भरत, ओके.
भरत, ओके.
'gymnasium' = नग्नावस्थेतील
'gymnasium' = नग्नावस्थेतील व्यायामाची शाळा ! >>>> एकदम सही ! त्यामुळे 'जिम' चे व्यायाम तोकड्या कपड्यातच करावेत !
लेख आवडला.
लेख आवडला.
monsieur हा शब्द वापरतो. म्हणजे my sir. उच्चार - मसिय. >> धन्यवाद. उच्चार आत्ता कळला. मी आतापर्यंत मॉनसीअर म्हणत होते
अॅमी, प्रतिसादाबद्दल आभार.
अॅमी, प्रतिसादाबद्दल आभार.
आता थोडी 'punch' शब्दाची गंमत
आता थोडी 'punch' शब्दाची गंमत बघा. त्याचा नेहमीच्या वापरातील अर्थ 'ठोसा' आपल्याला अगदी परिचित.
त्याचे अन्य काही अर्थही आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'फळांच्या रसात वाइन घालून बनवलेले पेय'. या अर्थाची व्युत्पत्ती चक्क आपल्या संस्कृत मधून आहे! 'पंच', म्हणजेच 'पाच' हे त्याचे मूळ रुप. जसे आपले 'पंचामृत' तसा त्यांचा 'फळांचा पंच' !
कुमार, तुमचा हा 'पंच' मस्त
कुमार, तुमचा हा 'पंच' मस्त बसलेला आहे !
तशीही आज शनिवार रात्र आहे. मस्तपैकी 'पंच' घेऊन बसावेसे वाटतेय.......
इंग्लिशमध्ये नावाआधी लावायची
इंग्लिशमध्ये नावाआधी लावायची जी आदरार्थी संबोधने आहेत त्यापैकी Mr, Mrs & Ms ही सर्वांनाच परिचित आहेत. गेल्या काही वर्षात या यादीत अजून एकाची भर पडली आह. ते संबोधन आहे Mx.
आता Mxचा वापर दोन ठिकाणी करता येतो:
१. तृतीयपंथी व्यक्तीच्या नावाआधी किंवा
२. जेव्हा आपल्याला एखाद्याच्या नाव/ आडनावावरून त्याच्या लिंगाबद्दल काहीच कल्पना येत नाही तेव्हा. अशी अडचण विशेषतः परदेशी व्यक्तीना पत्र लिहिताना येते.
गेल्या काही वर्षात तृतीयपंथीयांचे सामाजिक स्थान उंचावत आहे. तसेच त्यांना समाजव्यवहारात जबाबदारीची पदेही दिली जात आहेत. तेव्हा अशा वेळेस Mx चा वापर वाढता राहील.
गेल्या काही वर्षात या यादीत
गेल्या काही वर्षात या यादीत अजून एकाची भर पडली आह. ते संबोधन आहे Mx. >>> माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपण जेव्हा समाजाची आर्थिक
आपण जेव्हा समाजाची आर्थिक परिस्थितीनुसार दोन ढोबळ गटांत विभागणी करतो तेव्हा त्या गटांना 'आहेरे' व 'नाहीरे' असे शब्द वापरतो. इंग्लिश् मध्ये त्यांना 'haves' & 'have-nots' असे म्हणतात.
यातील 'haves' ला एक मजेशीर समानार्थी शब्द अमेरिकन इंग्लिशमध्ये आहे तो म्हणजे 'fat cats'.
जास्ती करून हा शब्द राजकीय पक्षांना मदत करणार्या धनदांडग्यांना उद्देशून वापरतात.
नाट्य क्षेत्रातील एक इंग्लिश
नाट्य क्षेत्रातील एक इंग्लिश 'संयोग शब्द' वाचनात आला:
Romance + comedy = romedy
छान लेख ! मराठीत उत्कृष्ट
छान लेख ! मराठीत उत्कृष्ट शब्दकोश कोणता ? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे चार खंड डाउनलोड केले पण ते परिपूर्ण वाटत नाहीत .
दत्तात्रय, आभार
दत्तात्रय, आभार
प्र न जोशींचा चांगला आहे असे ऐकतो
माझ्याकडे आपटे- शब्द रत्नाकर आहे
दत्तात्रय साळुंखे, कोणत्या
दत्तात्रय साळुंखे, कोणत्या अर्थाने परिपूर्ण नाहीत? पूर्ण नाहीत. न पर्यंतच आहे. पुढच्या अक्षरांचे खंड तिथे दिसले नाहीत. शिवाय मला तिथे शोध सुविधाही वापरता आली नाही.
पण जो दिलाय तेवढा भाग इतर अनेक शब्दकोशांपेक्षा चांगला वाटला.
@ कुमार १ खूप धन्यवाद . मी
@ कुमार १ खूप धन्यवाद . मी सुचविलेला संग्रह विकत घेइल ....
@ भरतजी आपल्या मताशी मी सहमत आहे . मी सुध्दा याच समस्या अनुभवल्या . धन्यवाद ...
दर वर्षाखेरीस Oxford तर्फे
दर वर्षाखेरीस Oxford तर्फे त्या वर्षीचा मानाचा शब्द जाहीर होतो.
2017 चा हा शब्द आहे : youthquake. त्याचा अर्थ आहे
'युवकांच्या कृतीतून घडणारा महत्वाचा सांस्कृतिक, राजकीय वा सामाजिक बदल'. ८ शब्दांच्या स्पर्धेतून याने बाजी मारली.
मुळात हा शब्द 1965 मध्ये प्रथम वापरला गेला होता- year of youthquake - या संदर्भात.
दर वर्षाखेरीस त्या वर्षीचा
दर वर्षाखेरीस त्या वर्षीचा मानाचा शब्द जाहीर करणारा अजून एक कोश आहे dictionary.com.
त्यांचा 2017 चा शब्द आहे complicit. म्हणजे एखाद्या बेकायदा वा वाईट कृत्यात सहभागी असणे.
हा शब्द निवडीची दोन कारणे होती:
१. जास्तीत जास्त लोकांनी त्या वर्षात त्याचा कोशात शोध घेतला
२. जगभरात अनेकांनी complicit होण्याचे नाकारून त्या विरोधात आंदोलने केली.
सालाबादप्रमाणे दोन मोठ्या
सालाबादप्रमाणे दोन मोठ्या इंग्रजी शब्दकोशांनी त्यांचे २०१८ चे मानाचे शब्द जाहीर केले आहेत.
१. Oxford चा शब्द आहे ‘toxic’.
नेहमी हा शब्द रसायने आणि हवेच्या संदर्भात परिचित आहे. यंदा तो याव्यतिरिक्त खालील संदर्भात बराच वापरला गेला:
कामाच्या ठिकाणाचे वातावरण
माणसांतले संबंध
राजकारणी व्यक्तींचे वर्णन
पौरुषत्व
.........
२. Dictionary.com चा शब्द आहे ‘misinformation’.
म्हणजेच ‘दिशाभूल करणारी माहिती’. हे पसरवण्यामागे दिशाभूल करण्याचा हेतू असू वा नसूही शकतो. विशेषतः सध्या सोशल मिडियात जे ‘संदेश पुढे ढकलणे’ हा प्रकार चालतो त्याला उद्देशून हा शब्द आहे. काही जण जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवतात तर बरेच साधेभोळे लोक त्यांना आलेली अशी माहिती विचार न करता निव्वळ पुढे ढकलतात.
Pages