वर्गात येताच आधी झापड मारणे हा माझा शिरस्ता आहे. त्या प्रमाणे मी वर्गात येताच पहिल्या बाकावरच्या एका विद्यार्थ्याला खणsकन काना खाली ठेवून दिली. या कृती मुळे दोन फायदे प्रामुख्याने होतात एक तर आपला शाळेतील दरारा वाढत जातो आणि मुख्य म्हणजे कुठलीही मुले वात्रट शंका विचारत नाहीत.
वर्गात चिडीचूप झाल्यावर मग मी शांतपणे मराठीचे पुस्तक काढले वाकून खिडकीतून तंबाखूची पिंक मारली आणि ओठाच्या कडा टिपीत कविता शिकविण्या साठी पुस्तक उघडले. नुकतेच पाठयपुस्तक महामंडळाने माझी चुकून एका रद्दी मासिकात छापून आलेली कविता "फेसबुक चे बालगीत" ही दहावीच्या अभ्यासक्रमात घेतली होती.
ते मासिक शिक्षण मंत्र्याच्या साडूचे असल्याने आणि हा साडू माझा दारू दोस्त असल्याने हा अजब चमत्कार घडला होता. त्या मुळे अर्थातच अनेक जातिवंत कवी वगैरे माझ्या वर खार खाऊन होते. काहीका असेना पण माझी कविता अभ्यासक्रमाला लागल्यामुळे मला शाळेत आणि एकूणच समाजात विशेष स्थान प्राप्त झाले होते.
(अर्थात असे माझेच स्वतःचे नम्र मत होते.)
आज तीच महान कविता १० ड च्या 'ढ' विद्यार्थ्यांना शिकविण्याचे माझे प्रयोजन होते. घसा साफ करत मी माझ्या खर्ज स्वरात म्हणालो:
"तर`मूर्ख मुलांनो आणि तितक्याच मूर्ख मुलींनो, सांगा तुमच्या पैकी किती जणांना फेसबुक माहिती आहे?" ताबडतोब सर्वानीच हात वर केला.
"सर हा गोप्या मला सारख्या फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो." - उफाड्याची लग्नाच्या वयात आलेली गंगी म्हणाली.
"हो का? कारे बदमाशा... " असे म्हणत मी व्हिलन सारखा गोप्याच्या पाठीत एक बुक्का घातला. त्यांच्या तोंडातून "बक्क" असा आवाज आला त्या मुळे मलाच हसू आले.
"अजून कोण कोण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो गंगे तुला?" मी टेचात विचारले.
"सर तुमची बी आल्ती." मूर्ख गंगी म्हणाली मी दचकलोच पण मग सराईतपणे भामट्याप्रमाणे तिच्या वादग्रस्त विधानाकडे साफ दुर्लक्ष करून पुढचा प्रश्न विचारला. मुला मुलींनो सांगा फेसबुकचे आद्य संस्थापक कोण आहेत?
एका पोरांनी हात केला केला. मी त्याच्या जवळ जाऊन त्याला एक बुक्का मारला तसे पोरगे बोंबलले "आये काहून मारले मास्तर? मी तर उत्तर बी नाही दिले"
"मला माहितीये तू चूकच उत्तर देशील, म्हणून तुला ऍडव्हान्स हाणला .... हा अजून कोण सांगतंय?" एका बारक्या पोरांनी भीत भीत हात वर केला तसा मी म्हणालो
"हा तू सांग रे अमिताभ बच्चन"
तसे ते पोरगे चिरक्या आवाजात म्हणाले "मास्तर तेचे नाव हाये कुकर-बघ"
"काय? कु-क-र बघ?" मी ओरडलोच. पोरे फिदी फिदी हसू लागली.
त्या वात्रट पोट्ट्याने चार बुक्क्या खाऊन झाल्यावर मी म्हणालो
"अरे मुर्खा कुकर बघ असं काय आडनाव असतंय का इंग्रजांचे?" त्याचे आडनाव आहे "झुकरबर्ग." झू झुरळांचा समजले?" पूर्ण नाव मार्क ई. झुकरबर्ग.
"पण सर ई म्हणजे काय? त्याच्या वडिलांचे नाव सांग ना ?"
एका पोट्ट्याने नको तो प्रश्न विचारलाच. आता तुम्हाला कळले असेलच मी का आल्या आल्या पोट्ट्यानां ठोकून काढतो ते? हे बदमाश पोट्टे असे काय पण प्रश्न विचारतात. आता काय करायचंय याला मार्क च्या बापाचं नाव काय आहे त्या बद्दल? पण नाही उगाच खाजवून शंका विचारायच्या.
मी डोके खाजवले पण मला ई पासून एखाद्या बाप्याचे मराठी नाव लौकर काही लक्षात येईना मग मी दिले ठोकून "ईगळाबाई!"
"आं इंगळाबाई!?" पोरे दचकलीच.
"येस्स, आपले मारकोबा आपल्या मातेचे नाव वडिलांच्या जागी लावतात समजले?" मी दिले ठोकून
सगळ्या पोरांनी माना डोलावल्या तसे मी सलगीने म्हणालो:
"आता तुम्ही म्हणाल मला कसं माहिती तर मूर्खांनो मार्क म्हणजे प्रेमानं ज्याला मी लहानपणा पासून मारक्या म्हणतो तो माझा बाल मित्र आहे.
लक्षात घ्या मित्रहो आज याची इतिहासात नोंद नाही पण तुम्ही साक्ष आहेत मार्कोबानी पहिली फ्रेंड रिक्वेस्ट मला या बोकडे मास्तरला पाठवली होती. पण तेव्हा गरीब
परीस्थिती मुळे आमच्या घरी कलर टीव्ही तर होता पण कॉम्पुटर नव्हता ...." बोलताना माझे डोळे भरून आले... "त्या मुळे मला ती रिक्वेस्ट स्वीकारता नाही आली ... मित्रो... त्याची जखम माझ्या काळजात आजही आहे ...." कसे बसे मी माझ्या भावना आवरून मुलांना म्हणालो.
"तर त्या मुळेच मी "फेसबुक चे बालगीत" ही अजरामर कविता माझ्या लाडक्या मार्क्याला अर्पण केली आहे."
मी आणि मार्क मित्र म्हंटल्यावर काही मुले माझ्या कडे अभिमानाने पाहू लागली तर उरलेली संशयाने.
"सर तुमचा मित्र वा वा ...कसा आहे तो?"
"अरे कसा म्हणजे अगदी गोरा गोरा कापसा सारखा"
"म्हणजे तुमच्या अगदी उलट म्हणा की सर " एक सत्यवादी व्रात्य कार्टे म्हणाले पण आता मारून हात दुखत असल्याने मी त्याला डोळ्यानेच दाब दिला.
"तर मुलांनो चला आपण आज "फेसबुक चे बालगीत" ही कविता वाचू आणि तिचे रसग्रहणही करू. तुम्ही सगळेचजण सक्काळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत फेसबुक वर पडीक असता ही फार फार कौतुकाची बाब आहे. असता की नाही?"
सगळे जण जोरात "होs सर म्हणाले"
"शाब्बास ही गोष्ट मीं मार्कला भेटल्यावर नक्कीच सांगेन! आता असा प्रसंग डोळ्या समोर आणा की बबडी नावाची दहावी-बारावीतील एक मुलगी आहे आणि तिला तिच्या दुष्ट आई बापानी परीक्षा जवळ आल्याने अभ्यास करायला सांगितला आहे परंतु ती फेसबुकवर साहजिकच जास्त रममाण असल्याने तिला शालेय पाठ्यपुस्तक बेचव वाटते आणि त्याचाच आपण मागोवा या बालगीतात घेतला आहे.
असे बोलून मी कवितेचे पहिले कडवे म्हंटले.
तर नीट एका आपल्या बबडीस वडील विचारतात बबडे दुपारी एक ते दोन का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
दुपारचा वाजला एs क
पोस्ट केला जोs क
कॉमेंट्स वाचण्यात
एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांना हे लगेच पटले. मी म्हणालो बबडीचे बरोबरच नाही का? पोस्ट आणि कॉमेंट्स या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या मुळे मी तर म्हणतो की केवळ एकाच तासात बबडीने हा कार्यक्रम आटोक्यात आणला या वरून तिचे टाइम मॅनेजमेंटचे कौशल्य दिसून येते. आता आपण पुढे दोन वाजता काय झाले ते बघू .
मग वडील विचारतात बबडे किमान दुपारी दोन ते तीन का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
दुपारचे वाजले दोs न
ऑनलाइन आहे कोs णं ?
कोण आहे बघण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
खऱ्या फ्रेंड्सने एकमेकांची साथ सोडायची नसते हेच मला या कडव्यातून सांगायचे आहे. कोणी ऑनलाईन असो की नसो एखाद्या जातिवन्त राखणदार कुत्र्याप्रमाणे आपण सदैव लॉगिन होऊन फेसबुकवर नजर ठेवायलाच हवी. काय बरोबरना? लगेच सगळ्या पोरा पोरींनी माना डोलावल्या. आता बघू तीन वाजता काय होते ते.
वडील विचारतात बबडे दुपारी तीन ते चार का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
दुपारचे वाजले तीs न
लिंक्स दिसल्या नवीs न
क्लिक क्लिक करण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
फेसबुक हे ज्ञान वाढविण्याचे साधन विविध लिंक्स क्लिक क्लिक करून आपण ज्ञानार्जन करू शकतात. जे आम्हाला फर्स्ट इयरला चोरून मल्याळम सिनेमे पाहून कळले ते तुम्हाला फेसबुकवर पाचवी सहावीतच कळाले. याला म्हणतात बाल ज्ञान मंदिर. शालेय अभ्यासक्रमात खरे ज्ञान मिळतच नसते असे थोर लोक नेहमीच सांगतात. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमभाव संवर्धन मित्रानो एखाद्याची पोष्ट कितीही फालतू असली तरी त्या पोस्ट ला आपण लाईक ची घंटा वाजवायलाच हवी. आज जर तुम्ही दुसऱ्याला चांगले म्हणाल तर उद्या लोक देखील तुमच्या काळ्याबेंद्र्य फोटोला किंवा कवितेला छानच म्हणतील असे मला स्वअनुभवा वरून आपणास सांगायचे आहे. बरोबर ना? मुलांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. तर याच मुळे बबडी आपला तिच्या अज्ञानी वडिलांना संगतीये की नाही बाबा नाही झाला माझा पाठयपुस्तकीय अभ्यास तीन ते चार च्या दरम्यान.
मग वडील विचारतात बबडे दुपारी चार ते पाच का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
दुपारचे वाजले चाs र
मेसेजेस आले फाs र
उत्तर देण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
बबडीही एक सुंदर मुलगी असल्याने आणि तिने आपल्या ऐवजी दीपिका पदुकोणचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून लावल्याने तिला अर्थातच ओळखी अनोळखी लोकांचे मेसेजेस येणारच आणि आलेल्या मेसेजेस डिटेल उत्तर देणे हा सभ्यपणा आहे. एव्हढेतरी का तिच्या बाबाना कळू नये का? पालक नकळत आपल्या पाल्यावर अन्याय करतात तो असा.
मग रागावलेले वडील विचारतात बबडे पाच ते सहा का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
संध्याकाळचे वाजले पाs च
पोष्टा वाचल्या जुन्याs च
पोष्टा वाचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
जी व्यक्ती इतिहासाकडून काहीच धडे घेत नाही तिला भविष्य माफ करत नसते असेच मला या कडव्यात म्हणायचे होते. थोडक्यात जर काहीच नवीन नसेल तर फेसबुक वर झालेली भांडणे आणि वाद विवाद हे पुन्हा पुन्हा वाचणे मनोरंजक ठरते. कधी कधी संपलेले वाद देखील एखादी खोचक पोस्ट टाकून पुन्हा नव्याने उफाळून आणता येतात.
मग त्रासलेले वडील विचारतात बबडे सायंकाळी सात ते आठ का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
संध्याकाळचे वाजले साs त
स्पेशल माझा दही भाs त
रेसिपी पोस्ट करण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
बबडीला स्वैपाका मध्ये उत्तम गती असून तिला दहीभात करता येतो हेच मला या कडव्या वरून सूचित करायचे आहे. या अशा प्रकारच्या पोस्टना साधारण पणे, wow, कधी येऊ खायला? अग मला कृती पाठव ना. असे संदेश येतात हे इथे नमूद करणे जरुरी आहे. या मध्ये मुली पेक्षा मुलांच्या लाईक्स जास्त असतात कारण इतर जळकुकड्या मुली एकमेकींना प्रायव्हेट मेसेजेस पाठवून अग बबडीची पोष्ट पाहिलीस का? काय तर म्हणे दहीभात!! असे कुत्सित संदेश पाठवून बबडीस पाठीमागे वाकुल्या दाखविण्यात कार्यमग्न असतात. दुसरे म्हणजे आपल्या मुलीला सुंदर दहीभात येतो याचे कौतुक न वाटता तिला जाब विचारणाऱ्या तिच्या वडिलांची तुलना मला चंगेज खानाशी करावीशी वाटतिये. असो. आता पुढे:
मग झोपाळलेले वडील जांभई देत विचारतात बबडे अग किमान रात्री अकरा ते बारा तरी का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
रात्रीचे वाजले अकs रा
बाब्याला झाला छोकs रा
फोटो पाहण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
मी हे कडवे म्हणतात एकच कोलाहल झाला. एक चतुर मुलगा म्हणाला पण सर सात वरून डायरेक्ट अकरा कसे वाजले? मी म्हणालो उत्तम प्रश्न अरे बाळा रात्री आठला जी लाईट गेली ती डायरेक्ट अकराला आली समजले. मुलांना ते चांगलेच पटले.
तर मुलांनो... कवी म्हणजे मी म्हणतो...
रात्रीचे वाजले अकs रा
बाब्याला झाला छोकs रा
जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशीच मानवाला मुले होतात हे एक वैज्ञानिक सत्य आहे. तसेच बाब्या नावाच्या फेसबुक वरील सदस्याला बाळ झाले आणि झाल्या झाल्या बाळाची नाळ कापण्या आधीच स्वतः डॉक्टरीण बाईंनीच स्वतःसह बाळाचा फोटो डिलिव्हरी रूम मधूनच फेसबुकवर पोस्ट केला आणि बाब्याला टॅग केले. आयुष्यातील काही क्षण कितीपण पवित्र आणि खाजगी का असेना त्याचे सार्वत्रीकरण करण्यास फेसबुक मोठा हातभार लावते. त्या मुळे लोक नुसतेच आपल्या मुलांचे नव्हे तर इतराही भयावह पशु पक्षी, कुत्री, मांजरे आणि नवरे यांचे विविध अवस्थेतील फोटो फेसबुकवर कायम टाकतात आणि किती आपल्या पोस्टला लाईक्स मिळाल्या याचा अंदाज घेत बसतात.
आता पुढे....
आता कंटाळून अर्धवट झोपलेले बाबा झोपेतच प्रश्न विचारतात बबडे रात्री बारा ते एक तरी का बरे अभ्यास केला नाहीस? तेव्हा कुमारी बबडाबाई म्हणते बाबा:
रात्रीचे वाजले बाs रा
बर्थडे नोटीफीकेशन तेs रा
शुभेच्छा घेण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला....
तर मुलांनो आपल्या लक्षात आलेच असेल की १२ वाजून एक मिनिटांनी बबडीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येण्यास सुरुवात झाली आणि तिच्या फेसबुकच्या वॉल वर एव्हढ्या शुभेच्छा आणि फुलांचे फोटो टांगले गेले की मित्रहो ती जर खरीखुरी वॉल म्हणजे दगड विटांची भिंत असती तर कधीच खचली असती. केवळ ती फेसबुकाची वॉल होती म्हणून टिकली.
आणि इथेच मित्रानो ही कविता संपते कारण या पुढे बबडीचे बाबा घोरायला लागले म्हणून बबडी देखील झोपायला जाते. मी असे म्हणायला आणि शाळेचा टोल पडायला एकच गाठ पडली. मी भराभर पुस्तके गोळा केली.
आता मी पुढच्या तासा साठी १० क च्या वर्गात आलो आहे आहे आणि नुकतीच पहिल्या बाकावरच्या एका विद्यार्थ्याला खणsकन काना खाली ठेवून दिली आहे..... वर्गात चिडीचूप झाल्यावर मग मी शांतपणे मराठीचे पुस्तक काढले वाकून खिडकीतून तंबाखूची पिंक मारली आणि ओठाच्या कडा टिपीत कविता शिकविण्या साठी पुस्तक उघडले.
सखाजी,तुमच्या कल्पनाशक्तीची
सखाजी,तुमच्या कल्पनाशक्तीची तारिफ करावी तेवढी कमीच !
मस्त आहे..
मस्त आहे..
ही कविता तशी फार फार जुनी आहे.(लोकगीताप्रमाणे) पण तुम्ही तिच्यात फेसबूक रुपी बदल जे केले ते एकदम नाविन्यपुर्ण वाटले.
मस्त
मस्त
लय भारी .
लय भारी .
(No subject)
(No subject)
(No subject)
धन्य आहे
धन्य आहे
छान
छान
(No subject)
धन्य आहात तुम्ही.... दंडवत
धन्य आहात तुम्ही.... दंडवत महान शिक्षका...
धन्य आहात तुम्ही.... दंडवत
धन्य आहात तुम्ही.... दंडवत महान शिक्षका...>>
हे गाणं आम्ही शाळेत म्हणायचो
हे गाणं आम्ही शाळेत म्हणायचो
तुम्ही केलेले बदल अगदी चपखल आहेत. आवडले
धन्यवाद!
धन्यवाद!
धमाल पंचेस मूळ कवितेचे
धमाल पंचेस मूळ कवितेचे फेसबुकीय स्वरूप लैच भारी .. आणि इगळाबाई, कुकर बघ नी खो खो हसवले.
लेखाची लिंक माझ्या फेसबुक वॉल वर शेअर करते आहे
लेखाची लिंक माझ्या फेसबुक वॉल
लेखाची लिंक माझ्या फेसबुक वॉल वर शेअर करते आहे>> धन्यवाद सानी आपल्या फेसबुकच्या कॉमेंट्स जरूर शेअर करा!
लॉल मस्त आहे हे
लॉल मस्त आहे हे