तीन शतशब्दकथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 14 March, 2017 - 08:09

१. शुभ्रक्रांती

“शुभ्रक्रांतीच्या रूपाने कृष्णवर्णियांच्या जिवनात नवीन सूर्य उगवलाय. मला आठवतोय तो दिवस जेव्हा गोऱ्यांनी आपल्यावर वांशिक हल्ला केला होता. पण यावेळी आपण संघटीत होतो. एकूणएक गोऱ्याला चिरडून टाकलं आपण, नामोनिशान मिटवून टाकलं त्यांचं या भूमीवरून. जॉनसारखे अनुयायी मिळाले म्हणून हे शक्य झालं.”

“शुभ्रक्रांती जिंदाबाद, जॉन स्मिथ जिंदाबाद” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला.

मध्यरात्रीच्या सुमारास थकलाभागला जॉन घरी आला. हॉटेलमधून आणलेलं जेवण त्याने ताटात वाढलं. शुभ्रक्रांती ध्वजांच्या ढिगाऱ्यांतून मार्ग काढत तो अडगळीच्या खोलीत आला. अंधुक उजेडात अंगाचं मुटकुळं करून ती बसलेली होती. त्याने तिचा थरथरणारा हात हातात घेतला,

“घाबरू नकोस, मी तुला काहीच होऊ देणार नाही.”
अन ती गोरीपान तरूणी खुदकन हसली.

------------------------------------------------------------

२. प्राणीसंग्रहालय

“तो कशाचा पिंजरा आहे?” पाहुण्यांनी एका लोखंडी पिंजऱ्याकडे बोट दाखवत विचारलं.

“ती तर आमच्या प्राणिसंग्रहालयाची शान आहे. चला दाखवतो.”

सगळेजण पिंजऱ्याजवळ गेले.

“गेल्यावर्षीचं युद्ध जिंकल्यावर आम्ही तिथून या माकडांना पकडून आणलं होतं. फारच दुर्मिळ प्राणी आहे हा.”

“अरे वा! जवळ जाऊन बघतो.”

पाहुणे पिंजऱ्याजवळ गेले तळहातावर चणे घेऊन हात पुढे केला. लगेचच एका प्राण्याने त्यांचा हात आत ओढला. सगळेजण पुढे धावले अन पाहुण्यांची कशीबशी सुटका करून घेतली. पण ओरखड्यांमुळे हातांवर जखमा झाल्याच.

पाहुणे भयंकर चिडले.
“मॅनेजर कुठेय? चांगली अद्दल घडवतो या माकडांना.”

“नक्कीच. पण आधी आपण डॉक्टरकडे जाऊ.”

जाताजाता पाहुण्यांनी आपल्या सहा डोळ्यांनी बघितलं. पिंजऱ्याच्या पाटीवर लिहलेलं होतं-

‘मनुष्यप्राणी, पृथ्वी.’

-----------------------------------------------------------
३. डॅमेज पीस

गणेशोत्सवानिमित्त सगळी दुकानं सजली होती. सुबक, सुंदर, चकचकीत मूर्तींनी इंचनइंच व्यापला होता. लोक आनंदाने अन भक्तिभावाने बाप्पांच्या मूर्ती खरेदी करत होते.

त्या परिपूर्ण मूर्तींपासून जरा बाजूला सोंड तुटलेली एक मूर्ती ठेवलेली होती. दुकानभर भिरभिरणाऱ्या नजरा त्या मुर्तीवर पडण्याअगोदर सोंडेवर पडायच्या अन लगेचच दुसरीकडे वळायच्या.
बऱ्याच वेळाने –

“ही मूर्ती कितीला दिलीत?”

“साहेब, ती नका घेऊ. डॅमेज पीस आहे तो.”

“मला हीच हवीये. किंमत सांगा.”

“तशी शंभर रुपये आहे पण ही डॅमेज असल्यामुळे पन्नासच द्या.”

ग्राहकाने शंभरची नोट काढून दुकानदाराच्या हातावर ठेवली.
“शंभरच घ्या. पन्नास परत देऊ नका.”

दुकानदार ती मूर्ती घेऊन लंगडत चालणाऱ्या धडधाकट डोक्याच्या ग्राहकाकडे बराचवेळ भारावलेल्या नजरेने बघत राहिला.
-----------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
पहिली स्टोरीतील शब्द संख्या मोजली ...खरच १०० शब्द आहेत.. Happy

Happy

कथा चागल्या आहेत. पण हा शब्दसंख्येचा आटापिटा नक्की कशासाठी सुरु आहे? मागच्या पण तुमच्या एका धाग्यात "कमी शब्दात मोठी कथा" साठी "मेंदूला खुराक" नावाखाली तुमची आणि इतरांची ससेहोलपट सुरु होती. नक्की काय साधायचे आहे यातून?

माफ करा पण मला हे सगळे पोरखेळ वाटत आहेत. वैचारिक अपरिपक्वता. जेवताना घास आणि लिहिताना शब्द मोजू नयेत. पोट भरेल इतपत खा आणि भावना पोचतील इतपत लिहा/बोला. ओघवती भाषा, अर्थपूर्ण संवाद आणि नेमके वर्णन यातून उत्तम कथा जन्माला येते. तिकडे लक्ष द्या. मग शब्दसंख्या कितीही असुदे. एक किंवा शंभर. काय फरक पडतो?

खरा कथाकार तोच ज्याचे लिखाण वाचकाकडून वारंवार वाचले जाते. आणि शब्दसंख्येसाठी कोणीही वारंवार वाचत नाही.

@ इनामदार साहेब. सर्वप्रथम तुमच्या स्पष्ट आणि रोखठोक अभिप्रायाबद्दल धन्यवाद Happy

कमी शब्दांत कथा लिहण्याची दोन साधी कारणं आहेत- एकतर challenge म्हणून अन दुसरं म्हणजे मुळातच काही कल्पनांचा जीव छोटा असतो.

लिहताना शब्द मोजू नये

>> बरोबर. माझं ८० टक्के लिखाण मी याच पद्धतीने करत असतो. २० टक्क्यांमध्ये शब्दसंख्येचे काही इतर लिखाणप्रयोग करतो. लेखक म्हणून यातून मला भरपूर शिकायला मिळतं.

भावना पोहोचतील इतपत लिहा.

>> हेही बरोबर. कमी शब्दांत भावना पोहचवता आल्या तर जास्त शब्द का लिहायचे.

कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ मांडणे ही खुप अवघड गोष्ट असते. लेखक म्हणून मला एकाच पारंपारिक चौकटीत अडकून पडायला आवडत नाही म्हणून वेगवेगळे खटाटोप करत असतो, लिखाणाची शैली, मांडणी, शब्दसंख्या, लिखाणविषय याबाबतीतही प्रयोग करत असतो. कथा शंभरच शब्दांत असावी असं बंधन मीच स्वतःला घालून घेतलं होतं. अशी शिर्षकं वाचकांसाठी नसून लेखक म्हणून माझ्यासाठी आहेत.

शिवाय माझ्या सर्वच कथा शब्दसंख्येत बांधलेल्या नाहीत. ज्या कथेचा जेवढा जीव असतो तशी ती आकार घेतेच.

साहित्यपंढरीत वावरणारा मी अजून पोरच आहे त्यामुळे हे पोरखेळ वाटू शकतात पण कमी शब्दांतल्या कथा लिहणं वैचारिक अपरिपक्वता आहे असं मी मानत नाही. उलट कथा जेवढी लहान तेवढी लिहायला अवघड आणि अर्थ-शक्यतांचे पदर जास्त. हे माझं वैयक्तिक मत नसून बऱ्याच दिग्गज साहित्यिकांचे मत आहे ( विशेषत: अमेरिका आणि युरोपमधील) गेल्या दहा वर्षांतील इंग्रजी साहित्यावर कमी शब्दांतील कथांनी बराच प्रभाव टाकलेला आहे. आपल्याकडे सुद्धा वि. स. खांडेकरांसारख्या लेखकांनी रूपक कथा लिहलेल्या आहेत.

English writing forums, writers blog, literature websites यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सुक्ष्मकथा, वेगवेगळ्या शब्दमर्यादेंच्या कथा लिहल्या जात असतात. Readers digest, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांच्या साहित्यसंस्था शतशब्दकथा, सुक्ष्मकथा, विविध शब्दमर्यादेच्या कथास्पर्धा ठेवत असतात. यासंबंधी कार्यशाळा घेत असतात. आफ्रिकन भाषांमध्ये गेल्या दोन वर्षांत काही शतशब्दकथा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत ( यात रिओमधील दोन संस्था आहेत)

Reader Digest ने म्हटल्याप्रमाणे उत्तम लेखकाला कमी शब्दांमध्येदेखील तितक्याच प्रभावीपणे व्यक्त होता यायला पाहिजे. दरवर्षी उत्तमोत्तम कादंबऱ्यांचे संग्रह छापणारी Readers Digest असं म्हणते यात सगळं आलं. ं

ऍट्रॉनोत + 100

.. हा प्रकार चांगला आहे..पुलेशु
उगाच पाल्हाळ कशाला लावायचा..

लेखक म्हणून मला एकाच पारंपारिक चौकटीत अडकून पडायला आवडत नाही म्हणून वेगवेगळे खटाटोप करत असतो

>> अभिव्यक्ती नैसर्गिक प्रवृत्तीला धरून होत असते. ती तशी होणेच योग्य असते. कुसुमाग्रजांनी त्यांना त्यांच्या खास पद्धतीच्या कवितांच्या "पारंपारिक चौकटीत अडकून पडायला आवडत नाही" म्हणून तमाशाचे वग लिहायला घेतले असते तर काय झाले असते? किंवा आता बस्स झाले म्हणून त्यांनी चारोळ्या लिहायला सुरवात केलीय असे कधी झालेय का? कारण कोणत्याही नैसर्गिक अभिव्यक्तीला स्वत:च्या पद्धतीने व्यक्त होणे कधीच "चौकट" वाटत नाही. वाटत असेल तर ते नैसर्गिक नव्हे इतकाच त्याचा अर्थ आहे.

कमी शब्दांतल्या कथा लिहणं वैचारिक अपरिपक्वता आहे असं मी मानत नाही

>> तुम्हाला माझा मुद्दाच कळलेला नाही. कारण तसं मी हि मानत नाही. पण "चला आता आपण कमी शब्दात लिहायला बसू" किंवा "अमुक एका शब्दमर्यादेत लिहू" म्हणून लोकांना कौतुक दाखवण्यासाठी काहीही लिहिणे हि नक्कीच वैचारिक अपरिपक्वता आहे. केवळ चार रेघात चारशे ओळींना सुद्धा लाजवेल असे चित्र काढून तोच संदेश देता येतो. अरे पण ते नैसर्गिकरित्या तुमच्यातून यायला हवे ना. मग जे काय निर्माण होते त्यात कदाचित चार रेघा असतील पाच असतील किंवा साडेतीन सुद्धा असतील. हू केअर्स? पण "आज काही झाले तरी साडेतीन पेक्षा जास्त नाही" असले काहीतरी ठरवून कुंचला हातात धरून बसले तर ती परिणामकारकता येईल का? हा प्रश्न आहे.

केवळ इंग्लिश लोक करतात किंवा कोणी फलाणे डिमके करतात म्हणून चला आपणही करू हा युक्तिवाद कोणत्या परिपक्वतेचे लक्षण आहे? ते कच्चे बीफ खातात. पण म्हणून पचवायची ताकद नसताना आपणही ते खावे का? कि तशी नैसर्गिक उर्मी आणि पचनशक्तीची क्षमता असेल तरच खावे?

केवळ इंग्लिश लोक करतात किंवा कोणी फलाणे डिमके करतात म्हणून चला आपणही करू हा युक्तिवाद कोणत्या परिपक्वतेचे लक्षण आहे?

>> एक गंमत सांगतो. फ्लॅश फिक्शन ( खासकरून १०० ते ५०० शब्दांतल्या कथा) हे परकीय प्रकार नसून या प्रकारांचं मुळ मराठी मातीत आहे. एकनाथी भारुडाने जगातील पहिली फ्लॅश फिक्शन कथा सांगितली. ( Washington Post चा की अजून कुठल्यातरी वर्तमानपत्रातील लेखात असं वाचल्याचं स्मरतं)

खंत ही आहे की आपलेच साहित्यप्रकार आणि कलाप्रकार आपल्याला टिकवता आले नाहीत.

विनय दादा,
तुझ्या आणि रवींद्रनाथ टागोरांच्या कथांमध्ये एक साम्य आहे... या कथा अखेरीस विचार करायला लावतात.
मला शतशब्दकथा हा प्रकार आवडला. अशा आणखी कथा वाचायला आवडतील.

मागच्या महिन्यात मिसळपाव वेबसाईटवर (http://www.misalpav.com/) शतशब्द कथा स्पर्धा घेण्यात आली,बरोबर शंभर शब्दात कथा लिहायची होती, विनय यांनी या कथा त्या स्पर्धेसाठी लिहिल्या असाव्यात.

>>>तमाशाचे वग लिहायला घेतले असते तर काय झाले असते?
तमाशाचे वग लिहिणे सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट आहे.

मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते,

वृत्त:
वृत्तात अक्षरांच्या संख्येचे बंधन असते इतकेच नव्हे त्यांचा लगक्रमही निश्चित असतो , यास वृत्त म्हणावे.

अधिक माहितीसाठी: https://mr.wikipedia.org/s/zz

मला वाटते पद्यलेखनात जो "वृत्त" प्रकार आहे, तसाच प्रकार गद्यलेखनात करण्याचा विनय यांचा प्रयत्न वाखाण्याजोगा आहे.

तमाशाचे वग लिहिणे सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट आहे.

>> काय सोपे काय अवघड याचा काय संबंध या चर्चेशी? नैसर्गिक अभिव्यक्ती जी ज्याची आहे ती त्याने अवलंबावी हा मुद्दा आहे.

पद्यलेखनात जो "वृत्त" प्रकार आहे, तसाच प्रकार गद्यलेखनात करण्याचा...

>> हे तुम्हाला कुणी सांगितले? कारण मूळ धाग्यात तर असा कोणताही उल्लेख नाही. असो. थोडा वेळ तसे मानून चालले तरी काही वैशिष्ट्ये/नियम त्या त्या कलाकृतीलाच शोभून दिसतात. गद्यलेखनात वृत्ताचे नियम म्हणजे "आज चहा मटणाच्या पद्धतीने केलाय" असे म्हटल्यासारखे झाले.

फ्लॅश फिक्शन ( खासकरून १०० ते ५०० शब्दांतल्या कथा) ... एकनाथी भारुडाने जगातील पहिली फ्लॅश फिक्शन कथा सांगितली.

>> चुकीचा निष्कर्ष. एकनाथांनी त्यांच्या सहज प्रतिभेला जे सुचले ते लिहिले. म्हणून ते लोकांना भावले. शंभर पाचशे वगैरे आकडे डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी लिहिले असेल, ओढून ताणून टार्गेट पूर्ण केले असेल, असे तुम्हाला वाटते का? आधी लिहिले. त्याचे पृथ्थकरण करणाऱ्याला नंतर ते आकडे वगैरे दिसून आलेत. उलट नव्हे. हे लक्षात येते का पहा.

तात्पर्य: तुमची नैसर्गिक प्रतिभा मुळातच कमी शब्दात परिणामकारक व्यक्त करण्याची वगैरे असेल तर तुमच्या प्रत्येक लिखाणातून ते आपसूकच दिसून येते. एकीकडे इतर कथा इतक्या सपक आणि चऱ्हाट लावून लिहायच्या कि वाचाव्याही वाटणार नाहीत. आणि दुसरीकडे मात्र चौकटीत अडकून पडू नये वगैरे सबबीखाली कमी शब्दात, तीन शब्दात, शंभर शब्दात करत "मराठी साहित्यात नवीन प्रकाराची भर घातल्याचा" वगैरे आव आणायचा. अरे? कुणी सांगितलेय इतका आटापिटा करायला. जे निसर्गाने तुमच्या ठायी दिले आहे तेच सुंदर होऊन उतरू द्या शब्दातून. बस्स. बाकी काही लागत नाही. अभिजात कलेसाठी आकड्यांची बंधने आणि नियमांच्या कसरती आवश्यक नसतात.

असो. मला जे सांगायचे ते सांगून झालेय. म्हणून, या धाग्यावर हा माझा शेवटचा प्रतिसाद. बाकी चालू द्या.

तमाशाचे वग लिहिणे सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट आहे.
>> खरी गोष्ट आहे. ग्रामीण भागाशी पक्की नाळ जोडलेली असल्याशिवाय आणि विनोदाची उत्तम जाण असल्याशिवाय वग लिहता येत नाही. दादा कोंडके यांनी आपल्या यशाचं श्रेय तमाशात घालवलेल्या वर्षांना दिलं आहे.

माझा एक मित्र आहे - परीक्षित गुप्ता नावाचा. तो IIT B. Tech करून नंतर National School Of Drama Delhi मध्ये शिकला. सध्या तो मुंबई विद्यापिठाच्या लोककला विभागातून एका विषयावर Phd करतोय. विषय आहे : Vag, (वग) The Most flexible literature in the world.

विनय यांनी या कथा त्या स्पर्धेसाठी लिहिल्या असाव्यात.
>> त्या स्पर्धेतसुद्धा मी भाग घेतला आहे पण स्पर्धेसाठी पाठवलेली कथा वेगळी आहे. अजून निकाल लागलेला नसल्यामुळे कोणती कथा लिहली ते उघड करता येणार नाही.

Pages