रायगड वारी… (भाग पहीला) !!!

Submitted by MallinathK on 22 July, 2016 - 03:58

रायगड वारी… !!!

जगदीश्वर !!! बाहेरून कसंही असो, मंदीर, मस्जिद. पण आतून? फक्त आणि फक्त जगदीश्वर !!! मी उंबरठा ओलांडुन आत आलोय, पण असं वाटतय की सर्व काही मागेच ठेऊन आलोय. जगाच्या कोलाहला पासून कुठेतरी दुर, एकांतवासात. हे मानसीक वैगेरे असेल का? असु दे. पण एकदम हलकं हलकं वाटायला लागलंय. इतकं हलकं की इथली थंड शांतता शरीरातून आरपार जातेय. आहाहाहा…. थंड शांतता. एका उंबरठ्यामुळे वातावरणात एवढा फरक असू शकतो हे इथे आल्यावर नेहमी जाणवतं. वातावरणात की विचारांत? अरेच्चा, पाऊल गाभाऱ्याकडे कधी वळली आणि मी गाभाऱ्यात पोहचलो सुद्धा. आहाहाहा…. थंड शांतता. एवढी शांतता की स्वत:च्या श्वासांचा आवाज सुद्धा गोंधळ केल्या सारखा वाटायला लागलाय.    

-------------------------------------------------------------------------------------------------------------

अरे आज ग्रुप वरच्या गप्पा पुन्हा ओसांडून वाहत आहेत. मेळाव्याचं बोलतायेत वाटतं. बघुया तरी.… वॉव, मनोज या विकेंडला रायगड प्लान करतोय वाटतंय, तेही एका दिवसात? श्या, रायगडाला तीन दिवस तर पाहिजेत राव.… असुदे, तेवढं तरी पहायला मिळेल. यावेळेस रुद्राक्षलाही घेऊन जाऊ त्यालाही आवडेल. खुप दिवसा पासून कंपनी शोधतोय रायगडासाठी. तेवढीच लॉंग ड्राईव सुद्धा होइल. ;) याला विचारुन पाहु तरी. 

"मनोज, मलाही आपलं म्हण. मी येईन रे"

 पुण्यातून कोणी आलं तर बरं होईल, येताना रुद्राक्ष झोपेल गाडीवर. 

"चँप, येतोस का रे तुही?" 

श्या, याला सुट्टी नाहीय तर. पंकज येतो म्हणतोय, आला तर बरं होइल. विकेंडला अजून वेळ आहे. बघू तो पर्यंत काय काय ठरतंय. पण काही असो, यावेळेस जायचंच. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------

"हॅलो, बोल रे पंकज."

"अरे उद्याचं काय ठरलं?"

"तुझं फायनल असेल तर माझं नक्की आहे. कारण मला कंपनी पाहिजेय. येताना रुद्राक्ष झोपेल गाडीवर, कोणीतरी सोबत पाहिजेच रे"

"माझं फायनल आहे. मनोज गाडीने येणार नाहीय, बस ने येईल म्हणतोय. किंवा कँसल होईल म्हणे."

"मी, बोलून पाहतो आणि तुला फोने करतो लगेच."

"ओके "

"हॅलो मनोज."

"हा बोल मल्ल्या"

"पंकज म्हणत होता तुझं उद्याचं कँसल झालंय."

"अरे नाही, मी तुम्ही लोक येणार असाल तर बस ने येईन. तुमचं ठरवून सांगा. मी रात्री निघेन इकडून."

"माझं नक्की आहे. कारण मला कंपनी पाहिजे आणि सोबत पंकज आहे. येताना रुद्राक्ष झोपेल गाडीवर, कोणीतरी सोबत पाहिजे."

"ओके, मी येईन बस नी इकडुन. पाचाडला भेटु. ८ वाजे पर्यंत पोहचेन मी." 

"ओके, मी ४ ला वगैरे निघेन आणि ८-८:३० पर्यंत पोहचू."

"डन"

"हॅलो पंकज, मनोज येतोय बसने. आपण ठरल्या प्रमाणे गाडीवर जाउ. ४ ला निघुयात. ८:३० पर्यंत पोचता येईल निवांत" 

"अरे ३:३० ला निघू की."

"एवढ्या लवकर जाउन काय करणारेस?" 

"बर"

चला ठरलं एकदाचं. १० मिनिटापूर्वी काहीच नक्की नव्हतं. जायचं की नाही हेही ठरत नव्हतं. चला ही गुडन्यूज रुद्राक्षला देऊ.

"हॅलो विनी, उद्या रायगडला जातोय. :)"

"हं"

"हं?"

"हं काय हं? माहितेय, तुमचं नक्की नाहीय म्हणत म्हणत नक्की झालेलं असतंय, नेहमीचंच आहे."

"हं. पिल्लुला सांगुन ठेव. बॅग भरेल तो."

"त्याला न्यायचं नाही. कॅलेंडर मध्ये नोटिस आलीय की सोमवारी टेस्ट आहे"

"राहुदे की, रविवार आहे मध्ये." 

"तरी नाही, तुम्हाला जायचं असेल तर जा, नाही तर तुम्हीही गप घरी बसा. त्याला सोडुन गेला तर तो माझा जीव खाईल" 

श्या, माझंही कँसल होईल अश्याने. 

"ठिके, माझं मी जाउन येईन. सकाळी ४ ला निघणारे आणि ८ पर्यंत येईन."
"हम्म, म्हणजे रात्री १२-१ वाजणार तर."
"अरे नाही, ८ पर्यंत."
"नेहमी असंच सांगुन जाता. कधी आलात म्हणून आता येणार आहात?"
"हमम."

     

श्या… पिल्लू मिस करणार सगळं. Sad बघू नेक्स्ट टाईम घेऊन जाईन.

उद्या रायगडला जायचंय या विचारानेच दिवसभरात कामे पटापटा उरकली. आत्ता ११:३० वाजलेत, सकाळचा ३:३० चा अलार्म  लाउ. तसं माझं बायोक्लॉक मला वेळे आधी उठवेलंच. पण तरी लाऊच. पंकजला फोन करून उठवता येईल. 

श्या… वाटलंच मला ३ वाजले असनार. बायोक्लोक वेळे आधीच जागं करतं. थोडावेळ लोळुन पंकजला फोन करु.

सकाळची कामे भल्या पाहटेच उरकुन घेतली तरी अजून ३:३५च झालेत. पंकज २० मि. मध्ये येतोय म्हंटलाय म्हणजे अजून ४५ मि. आहेत आपल्याकडे. काय करावं बरं? तसं पाहीलं तर आवरायला १० मि लागतील. आत्ताच आवरून घेऊ म्हणजे हा आला की निघता येइल. मनोज म्हणत होता की निजामपुर जवळचा शॉर्टकट रोड छान झालाय. यावेळेस तिकडुन जाउ. ३०-३५ किमी. वाचतील आणि वेळही वाचेल. माझ्या माहीती प्रमाणे, तो रोड खुपच खराब आहे. पण मनोज म्हणतोय म्हणजे ठिक झालाही असेल. नाहीतरी येताना माणगाव वरुनच येऊ मग.

पंकजने आल्यावर फोन केला तसा लगेच निघालो पण गडबडीत स्वेट्शर्ट घ्यायचं विसरलो. हे आत्ता गाडीवर बसल्यावर लक्षात आलं. पौड रोडला धुकं असेल आणि भयान थंडी वाजणार आता. मागच्या वेळे सारखं ताम्हीणी घाटात वाट लागु नये म्हणजे झालं. प्रतापगड करून परतत असताना पावसाने मला ताम्हिणी घाटातच गाठले होते. त्या दिवशी कळलेलं की कपडे घालून सुध्दा पाणी शरीरावर कुठे कुठे फिरू शकतं. शरीराचा एक कोपरा असा नव्हता की जिथे पाणी पोचलं नाही. कानाकोपारा भिजला होता. अंगावरचे कपडे सुद्धा ओझे वाटत होते. नशीब त्या दिवशी उपटसुंभा सारखा गेलेलो ट्रेकला, पाठीवर सॅक वगैरे काही नव्हतं. आणि त्याहुन विशेष म्हणजे माझ्या गाडीने काहीच त्रास दिला नाही.    

पंकज सोबत गप्पा मारत कधी पुण्याच्या बाहेर पडलो कळालंच नाही. नेहमी ड्रायव्हिंग सिटवर असणारा आज पहिल्यांदाच मागे बसलोय. मस्तपैकी हात लांब करून पहाटेची थंडी अंगावर घेण्यातली मजाच वेगळी. गाडी कुठे जातेय, खड्डा येईल, ब्रेक मारावा लागेल, कोणी तरी आडवं येईल अश्या सर्व गोष्टीचा विचार सोडुन मस्त गारवा अनुभवतोय. या पिक्चर वाल्यांनी ना मागे बसून हात लांब करून वारा अनुभवायचा ठेका नुसता हिरोईन्सना देऊन ठेवलाय. श्या, स्वत:चच हसू येतंय. Happy असं वाटतंय सिमेंटच्या जंगलात अडखळत, धडपडत, ठेचकाळत धावणारा रस्ता आता या रानावनात मुक्तपणे बागडतोय आणि त्याच्या मागे आमची गाडी धावतेय. हा घाट म्हणजे तर पाठशिवणीचा खेळच. रस्त्यालाही चेव आलाय, नुसता पळ पळवतोय आम्हाला. एवढ्या अंधुकश्या प्रकाशात पंकज सुद्धा नेटाने त्याचा पाठलाग करतोय. मध्येच एखादं गाव आलं की रस्ता कुठेतरी लपून बसतो, तेवढं गाव मागे पडलं की पुन्हा आमच्या समोर हजर. पुन्हा खेळ सुरु.

मजल दर मजल करत, गप्पांच्या ओघात तांबडं फुटलंय कळलंच नाही. पंकजने गाडी साईडला घेऊन उभी केलीय, पण आमच्या तोंडाचा पट्टा चालुच आहे. रेंज नाहीय त्यामुळे मनोज ला फोने वगैरे लागण्याचा प्रश्नच नाहीय. आत्ताच्या स्पीडने गेलो तरी ८-३० पर्यंत पोहचु. इथेच कुठे तरी पुढे प्लस वॅली आहे म्हणतोय पंकज.  २-४ वेळा ताम्हिणी केलाय, पण माझ्या लक्षात आलं नाही. आणि येणार तरी कसं, पंकजने सांगे पर्यंत इथे प्लस वॅली आहे हे तरी कुठे माहीत होते का ?

आता ताम्हीणी उतरायला चालू केली आणि एकदाची प्लस वॅली दिसली. निघाल्या पासुन हा आमचा दुसरा स्टॉप.  पंकज ने इथे एक दोन वेळा आपले बस्तान मांडलंय, क्लायम्बिंग वगैरे केलंय म्हणे. अश्या गोष्टी आम्हालाच जगाच्या सगळ्यात शेवटी कळतात असं वाटून गेलं उगीच. पंकजचा सेल्फिचा कार्यक्रम उरकला कि आम्ही निघू लगेच. हे सेल्फिचं प्रकरण आयुष्यात जमणार नाही आपल्याला. आपलं थोबाड आधीच एवढं सुरेख आहे, त्यात अजून वेडे वाकडे हावभाव करून, दात ओठ बाहेर काढुन अश्या झाडा झुडूपात सेल्फी काढला तर माकडे सुद्धा सेल्फी काढु शकतात वगैरे न्यूज पुन्हा एकदा प्रखर प्रकाशात येईल. असो, वॅलीचे फोटोज घेतले, चला निघूया आता.

पुन्हा गप्पा, निसर्ग आणि हि घसरणारी सीट. श्या, पंकज ला आता पर्यंत ५० वेळा शिव्या देऊन झाल्यात. त्याने ब्रेक मारलं की पुढे घसरतोय. घसरू नये म्हणुन जोर लाऊन लाऊन पायाच्या पोटऱ्या दुखायला लागल्या. त्यात ताम्हिणीचा उतार. आता पर्यंतची सगळी मजा उतरवतेय. पंकज मनातल्या मनात म्हणत असेल, मल्ल्या ऐवजी मागे गर्लफ्रेंड बसली असती तर मजा आली असती.

संपला एकदाचा घाट. या टपरी वजा हॉटेलात दोन चार पारले पोटात टाकले तसं थोडं फ्रेश वाटायला लागलंय. ताम्हिणीच्या इकडे धुकं जाणवतंय. अरे हे काय, धुकं इकडंच सरकत आहे की. मस्त, धुक्यातुन जायला मिळावं. ड्राईवला मस्त मज्जा येईल. अरे हा माणुस भिजून आलाय की. पाउस पडतोय वाटतंय. "पंक्या, मस्त पाउस आहे वाटतं तिकडे." "हं".  ह्याचं लक्ष गाडीच्या टायर कडे, हवा कमी दिसतेय. "भरून घे रे इथेच" "हं". ह्याने पटकन आवरावं, नाही तर ते धुकं जाईल.

हुश्श… निघालो एकदाचे, आता धुक्यात जातोय… वॉव … धुकं… नुसतं धुकंच धुकं. पंक्या गाडी हळु चालव, मला फोटो घ्यायचेत. आणी असही तुला दिसत नाहिय. काय हे… फोटो आलेत कि नाहीत हे सुद्धा दिसण्या इतपत व्हिजीबीलिटी नाहीय. श्या, आज पुन्हा चष्म्याला वायपर असायला हवे होते असं वाटतंय. चष्म्याच्या काचेवर, हेल्मेटच्या काचेवर आणि फोनच्या स्क्रीन वर सुद्धा पाणी. फोन गप आत ठेवलेलं बरं, नाही तर लेन्सला सुध्दा पाणी लागेल. एवढं धुकं.… पंकज ने हेड लाईट लाऊन सुध्दा काही दिसत नाहीय. अश्याने निजामपूर येउन गेलेलं सुद्धा कळणार नाही. लक्ष ठेवायला हवं. धुकं आता कमी होतंय. समोरचं गाव निजामपूर असावं. इथेच कुठे तरी डावीकडे वळुन पाचाडला रस्ता जातो. मनोज ने म्हंटलय खरं की रस्ता छान असेल, पण शंकाच आहे. चला बघु तरी. पंकज ला शंका आहे की हाच रस्ता आहे की नाही. कोणालातरी विचारुन कन्फर्म करावं.

"काका पाचाडला…"
"हो, जा जा… "

गुगल ला अश्याच लोकांनी इन्स्पिरेशन दिले असेल. वाक्य पुर्ण होउच देत नाहीत. असो, शॉर्टकटच्या मार्गी तरी लागलोयना बस. इकडे पुन्हा धुकं…  सही….  पण रस्ता खुपच लहान आहे, त्यात धुकं आणि एवढा वळणावळणाचा आहे की पंकजला रोड बद्दल आणखीनच शंका येऊ लागलीय. मलाही हुकल्या सारखं वाटतंय. पण विचारायचं कोणाला ? पंकजला म्हंटलं कोणी दिसे पर्यंत चालत राहण्या शिवाय पर्याय नाही. ह्या सर्वांमध्ये दोघांबद्दल स्वत:लाच नवल वाटतंय, दोघांच्या अखंड बडबडीमुळे. अरे, समोर एक गाव दिसतंय, पाहु पाटी वगैरे दिसतंय का? मी पाहीपर्यंत "रायगड दुर्ग" वाचून पंकजने गाडी वळवली सुद्धा. असंही दुसरा मार्गही नाहीय चुकायला. काहीही म्हणा, पंकजची कंपनी एक मस्त मिळाली. पण रुद्राक्षला आणायला हवं  होतं असं राहून राहून वाटतंय. धुकं तरी पाहीलं असतं पोराने. पप्पा केवढं धूर केवढं धूर म्हणुन ओरडला असता कितक्यांदा. Happy

ही उभ्या राहीलेल्या मुली शाळेला जाण्यासाठी बसची वाट पाहतायेत वाटतं. विचारावं का यांना? अरे थांब थांब, एक फाटा गेला.  श्या, आता माघारी जावं लागेल विचारायला.
" तू थांब, मी विचारुन येतो".
आधी डोक्यावरचं हेल्मेट काढू, उगाच मुलींना बिथरल्या सारखं वाटेल. आधीच घाबरलेल्या नजरेनं पाहतायेत, विचारवं की  नको? अरे, एक आजी बाई आहे,  बरं झालं. तिलाच विचारु.
"आजी रायगडाला जाय…"
"हं हिकडुन…"
बरं झालं विचारलं ते. आणि बरं झालं आजी होती ती, पोरीं आधीच घाबरल्या सारख्या वाटत होत्या.  हा नवीन रोड अजुनच लहान वाटतोय. या मनोज च्या तर. त्याने तर सांगितलंय की शेवटचे ५ किमी खराब आहे. इथे तर सुरवाती पासुनच रस्ता खराब आहे. त्याची माहीती कशी काय चुकली. पंकज सुद्धा आता मनोज च्या नावाने लाखोली वाहतोय. दर खड्ड्याला मनोज आठवतोय त्याला.

अरे फोन वाजतोय. पंकजला रेजं आहे? आमचं ऐर्टेल नेहमीच गंडलेलं. मनोजला बस नाही मिळाली, सांदोशी ला येतोय तिथून पिक करा असं काहीसं कळालं अन फोनच्या रेंजने प्राण सोडला. जणु तेवढाच मेसेज पोचवायला आलेला तो. पिक्चर मधला हिरोचा मित्र जसा हीरोला हिरोईनला कोणी पळवून नेलंय ते सांगुन मरतो ना अगदी तस्स. अजून आत्ता बस मिळालीय म्हणजे जरा हळु गेलो तरी चालेल. तसा पुढचा रस्ता तर चांगला दिसतोय, डांबरीकरण झालंय कि चालु आहे? मला वाटतं, मनोजला कोणी तरी उलटी माहीती दिलीय. शेवटचे ५ किमी खराब नाही तर, चांगला आहे. बाकी रोड खराब आहे.  या इथे फाट्याला थांबायचं का विचार करे पर्यंत पंकज ने गाडी साईडला घेतलीय.

"सांदोशी ४ किमी. पाचाड ५ किमी." असं लिहिलेल्या दगडा शेजारी बसलोय. म्हणजे आता या आडवाटेनं सांदोशी ला जाउन पाचाड ला जावं लागणारे तर. टेका थोडावेळ मग. हे काय काढलं पंकजने ? ओ, चला थोडी पोटपुजा करून घेऊ मग.… खात खात पंक्याला पुन्हा सिटा बद्दल फुलं वाहून झाली. बिचार्या त्याच्यापरीनं तो समजाउन सांगतोय, पण त्रास मला होतोय ना. चला उठा, निघायला हवं, गप्पांमध्ये अर्धा तास कसा गेला कळालं नाही. त्यात पुन्हा सांदोशीचा रोड कसा असेल माहीत नाही. या मनोजची तर टांगच. भेटुदे, टंगतोच.

पुन्हा एक फाटा, आता कोणाला विचारायचं. जाउदे, उजवीकडचा रोड छान वाटतोय चल तिकडं. पंकजने सुद्धा मनोभावे गाडी वळवलीय. बिचारा कधीच कुरकुरला नाही आता पर्यंत. पण बरोबर चाललोय का ? नाही तर फिरून निजामपूर ला जाउ. इथे एक झोपडी वजा घर दिस्तंय. आजूबाजूला कोणीच नाहीय, चालत आतवर जावं लागेल असं दिसतंय. समोरून कोणी तरी येतंय, त्यालाच विचारु.

"दादा सांदो…"
"हा हा हाच रस्ता धरायचा"

छ्या, लग्न झाल्या पासून पूर्ण प्रश्न विचारायची संधीच मिळाली नाही कधी मला. ही तर शाळा वाटते. बाहेरून पाहीलं तर नुसतं छोट्याश्या घरासारखी दिसली. त्यांच्या कपड्यांवरुन ते मास्तर असावेत. असो. चलो पंकज, हाच रोड आहे.

आयला, आधी छान वाटणारा रस्ता एवढा खराब? हे म्हणजे दिसायला सुंदर आहे म्हणुन मुलीला नाव विचारलं तर पुरुषी आवाजात उत्तर मिळावं असं झालं. हा विचार पंकजला नको सांगायला, अजून एक कोटी मारेल तो परत. रस्त्याच्या स्लोप काय? ५०-६० अंश? पंकज, तुझी करिज्मा नाहीय बरंय, नाहीतर पुढचा ब्रेक मारल्यावर मी डायरेक्ट पुढच्या चाकाखालीच आलो असतो. त्यालाही पटलं वाटतं, तोही हसतोय. अश्या रोडवर दोनच गाड्या निट धावू शकतात, एक डंपर आणि दुसरी आपली लाल डब्बा :)

इथे सांदोशी ला पोहचायला जेवढा वेळ लागला त्यावरून ४ किमी असेल असं वाटत नाही. कितीका असुदे, आता लाल डब्बा येईपर्यंत इथेच वाट पहाचंय. ही बसलेली चार लोकसुद्धा बसचीच वाट पाहतायेत वाटतं. आणि हे घर आहे की टपरी? टपरी वजा होटेल आहे वाटतं. पंकज म्हणतोय, समोरचं तीन टोक असलेली कडा म्हणजे वारंगी. शेजारची सिंगापूर नाळ. पण त्यालाही कन्फर्म नाहीय. या मावशींना विचारू, तेवढच अधिकची माहिती मिळेल. हा पंकज सुद्धा भारी प्रकरण आहे. हेल्मेटला सुद्धा सर्विसिंग करून मिळते हे एक नवीन कळालं त्याच्यामुळे. आणि आता इथे बसून इथल्या डोंगर रांगा कळतील. त्यातले किती नावे मला लक्षात राहतील ते मलाच माहीत नाही.

मावशीला एक प्रश्न विचारला, आणि मावशीने इतिहासाचा निबंधच ऐकवला. समोर दिसतोय तो तीन टोकाचा वारंगी आहे हे कन्फर्म झालं, पण शिंगापुर नाळ शेजारी नसून पलीकडे आहे हेही कळालं. आता कोणी जात नाही तिकडे, पण मावशीचा भाव मात्र एकटाच सामान सुमान घेऊन जायचा म्हने आधी तिकडे. दोघं जण कोणी तरी पडून मेलं की तंगडं तोडुन घेतलं ते नीट नाही कळालं. बस बद्दल विचारल्यावर कळालं की हाच लास्ट स्टॉप आहे, आणि गाडी पाचाड वरुनच येणारे. हा मनोज काय वेडा आहे का? इकडे का यायला सांगीतलंय? पण मला वाटतंय तो पाचाडलाच उतरेल, शेवटी ट्रेकर आहे तो. पंकजलाही पटलेलं दिसतय. पण पंकज म्हणतोय इथे आलाच तर आल्या बसने परत पाठवू, पाचाडला. भारी आयडीया, आणि असंही ट्रिपल सीट जाण्यासारखा हा रोड नाहीय.

बांधावरून उतरून येणारी माणसं पाहून शेजारच्या काकांनी सांगितलं कि बस आलीय.…

क्रमश:

इथे पुर्वप्रकाशीत.

- मल्लिनाथ करकंटी

अंतिम भाग...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मल्या एकदम भारिच लेख.
जाम आवड्ला क्रमश नको पुढचा भाग लवकर टाक.

छ्या, लग्न झाल्या पासून पूर्ण प्रश्न विचारायची संधीच मिळाली नाही कधी मला.>>> हे भारिच Lol

आपलं थोबाड आधीच एवढं सुरेख आहे, त्यात अजून वेडे वाकडे हावभाव करून, दात ओठ बाहेर काढुन अश्या झाडा झुडूपात सेल्फी काढला तर माकडे सुद्धा सेल्फी काढु शकतात वगैरे न्यूज पुन्हा एकदा प्रखर प्रकाशात येईल. >>>.:हाहा: क्र्मशः पाहुन इवलीशी निराशा झाली, पण असू द्या. पुढच्या भागासाठी प्रतिक्षेत आहोत.