पाणी फाउंडेशन : दुष्काळाला हरविण्याचे आव्हान पेलताना आमीर खान

Submitted by घायल on 15 April, 2016 - 22:49

महाराष्ट्राच्या दुष्काळावर कसा मार्ग काढावा याबद्दल अद्याप म्हणावी तशी चर्चा सुरू झालेली दिसत नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे असलेला इच्छाशक्तीचा अभाव, तज्ञांच्या इशा-यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वारेमाप उधळपट्टी आणि बेपर्वा वृत्ती यामुळे संकट गडद होत चाललेले आहे.

फडणवीस सरकारने जलतरण तलाव, गाड्या धुण्याला या उन्हाळ्याच्या तोंडावर बंदी घातलेली आहे. हे राज्याचं पाणीधोरण पूर्वीपासून आहे. त्या पलिकडे उपायांची मजल जात नाही. विलासराव देशमुख असताना त्यांनी त्यांच्या शहरासाठी रेल्वेने पाणी आणण्याची योजना आखली होती. पण रेल्वेने पाणी आणण्याची वेळ काही आली नाही. त्यासाठी लागणारे खड्डे, व्हॉल्व्हज, तात्पुरती विहीर हे रेल्वेस्टेशनच्या बाहेर उभारले गेले होते. गेली तीन वर्षे पाऊस पडल्याने या वेळी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवतेय. या प्राश्वभूमीवर पंचवीस लाख लोकसंख्येच्या या शहराला आठवड्यातून दोनदा पाच लाख लीटर पाणी घेऊन येणारी आगगाडी ही उपाययोजना तुटपुंजी असली तरी बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे आवश्यकच आहे.

लातूरचे हे उदाहरण प्रातिनिधिक आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर पोलीस बंदोबस्तात सुरू आहेत. पाणी खूप लांबून येते. टँकर आला की हाणामारी सुरू होते. काही वर्षांपूर्वी टँकरचं पाणी घेण्यावरून एका दलिताला जिवंत जाळण्याचा प्रकारही घडला होता. सकाळ मधे पाणी पेटले असा अग्रलेख आलेला होता. या परिस्थितीतही माणूस जात विसरत नाही हे पाहून सुन्न व्हायला होतं. लातूर परिसरातील सेलूजवळच्या खेड्यात एका मित्राची विहीर आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीत पाणी नसताना याच्या घरच्या विहीरीला पाणी असते. हा दलित आहे. ज्याला लहानपणी पाणी नाकारले, विहीर बाटवली म्हणून ज्याला गाव मारायला आलेले तो आता पूर्ण गावाला पाणी देतो. ही गरजच अशी आहे की दलिताच्या घरी पाणी भरायला जावे लागतेय. या वर्षी शासनाने विहीर ताब्यात घेतली आहे. असे अनेक पाण्याचे साठे ताब्यात घेतलेले आहेत. पाणीवाटप प्रशासनाने हाती घेतले आहे.

परिस्थिती इतकी भीषण असताना हिवरेबाजार आणि राळेगण सिद्धी या ठिकाणी पाणी आहे. हा ही भाग दुष्काळी म्हणूनच प्रसिद्ध होता. हिवरेबाजारने राळेगण सिद्धीतून प्रेरणा घेत गावाचा कायापालट घडवला. मग हे लोण इतर ठिकाणी का गेलं नाही ? माझा मित्र नीलेश हेडा गावोगावी फिरून दुष्काळ, श्रममहात्म्य यासंबंधी काम करत असतो. ही एक चळवळ जोम धरू पाहतेय. पण या सर्वांपेक्षा प्रभावी असं काहीतरी काम व्हायला हवं होतं. प्रभावी कामासाठी प्रसिद्ध व्यक्ती, माध्यमं यांची शक्ती वादातीत असते.

आमीरखानने त्याच्या सत्यमेव जयते मार्फत दुष्काळाचं आव्हान पेलण्याचे ठरवले. काही वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशनची स्थापना केली गेली. सत्यमेव जयतेच्या वैशिष्ट्याप्रमाणे दुष्काळी भागात फिरून उपलब्ध जलसाठे, पावसाचे प्रमाण इत्यादी आवश्यक माहिती गोळा केली गेली. त्यानंतर दुष्काळाला हरवण्याचा प्लान बनवण्यात आला.

पण या कामासाठी शासकीय परवानग्या आणि मदतीची गरज होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सत्यमेव जयतेने संपर्क साधला. स्वतः आमीर मुख्यमंत्र्यांना योजना समजावून सांगण्यासाठी गेला. योजना ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परवानगी तर दिलीच पण जी मदत हवी त्यासाठी पूर्ण मदतीची हमी दिली.

काय आहे ही योजना ?
खूप साधी योजना आहे. नीलेश गावोगावी फिरून सांगतो त्याप्रमाणे पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र आहे. आमीरच्या टीमने राळेगण सिद्धी, हिवरेबाजार येथील योजनांचा सखोल अभ्यास केला. त्यानुसार महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातले काही पॉकेट्स निश्चित केले. त्या ठिकाणी पाणी फाउंडेशन सुरू केले. या केंद्रातून गावातील लोकांना पाणी अडवण्याचे उपाय समजावून सांगितले जातात. त्यासाठी मॉडेल्स तयार केलेले आहेत. पाणी कसं अडवायचं हे सांगण्यासाठी प्रेझेंटेशन मटेरियल्स बनवले गेलेले आहेत. स्वाभाविक रचना समजावून सांगताना मॉडेलद्वारे सांगितल्याने ती लगेच कळते आणि पटते.

याला जोड हवी ती मार्केटिंगची. त्यासाठी आयपीएलच च्या धर्तीवर वॉटर कप ची कल्पना राबवली जातेय. सत्यमेव जयतेच्या माध्यमातुन वॉटर कप मधे सहभागी होत असलेल्या टीम्सची माहिती सगळीकडे पोहोचेल. त्यानंतर अनेक टीम्स यात सहभाग नोंदवतील. ठराविक उद्दीष्ट पूर्ण करणे ही अट असेल. अर्थात वॉटर कप जिंकणे यापेक्षा या योजनेचं मार्केटिंग करणे हे महत्वाचे असेल. गावक-यांनाही कप जिंकण्यापेक्षा पाणी मिळणे महत्वाचे असेल. पण स्पर्धेमुळे जिद्द तयार होईल हे महत्वाचे. आठ मार्च या अंतिम मुदतीपर्यंत ज्या टीम्स सत्यमेव जयते वॉटर कप मधे सहभागी झालेल्या आहेत त्याबद्दलचा कार्यक्रम सत्यमेव जयतेच्या या मोसमात पहायला मिळेल.

हा वेगळा प्रयत्न आहे. रेन हार्वेस्टिंगच्या माहितीचं मार्केटिंग होऊन गावागावात वातावरण तयार होणं हे खूप महत्वाचं आहे. शंभर टक्के गावातून दुष्काळ हटला नाही , अगदी चाळीस टक्के गावातून पाणी उपल्ब्ध झाले तरीही शासनावरचा केव्हढा मोठा भार यामुळे हलका होईल हे लातूरच्या रेल्वेवरून लक्षात येईल .

या उपक्रमाबद्द्ल अधिक जाणून घ्यायचे असल्यास आज दि. १६.४.२०१६ रोजी सायं सात वाजता एबीपी माझा वर आमीर खानकडून जाणून घेता येईल.

http://www.hindustantimes.com/bollywood/aamir-khan-s-paani-foundation-to...

--------------------------------------------------------------------------------------------------------------
१८ एप्रिल रोजीचा अपडेट
एबीपी माझा चा हा व्हिडीओ वाचकांसाठी
https://www.facebook.com/abpmajha/videos/10156860571850271/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Great!

चांगला उपक्रम, इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रभावी कामासाठी प्रसिद्ध व्यक्ती, माध्यमं यांची शक्ती वादातीत असते.>>>>>>+१

जास्तीत जास्त सेलिब्रेटीज ने पुढे येऊन समाजकार्यामधे हातभार लावणे हे खूप उपयोगी आहे. नाना, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार आणि अमीर खान....

बरेचसे उद्योजक, मोठ्या कंपन्या पण त्यांच्या उत्पन्नाचा ठराविक भाग सामाजिक कार्यासाठी देतात, त्यांचे सुद्धा योगदान अतिशय महत्वाचे आहे.

अतरंगी
पैशाची मदत ही मलमपट्टी आहे. दुष्काळ पडू नये असे प्रयत्न करणे हे मूलगामी उपाय आहेत असं नाही का वाटत ?
अण्णांनी याच एका विषयाला वाहून घेतलं असत तर खूप मोठं काम उभं राहीलं असतं. आजही या क्षेत्रातला त्यांचा अधिकार सर्वांना मान्य आहे. अनेक लोक आपापल्या परीने दुष्काळाशी लढा देण्यासाठी कार्यरत आहेत. पण त्यांची ओळख होऊन त्यांना समाजाने गांभीर्याने घेणे, त्यांच्या कार्यात तन, मन, धन देणे याला अवकाश आहे.

दुष्काळ पडू नये असे प्रयत्न करणे हे मूलगामी उपाय आहेत असं नाही का वाटत ?>>>
हो बरोबर आहे.

पण जे लोक (सेलिब्रेटीज) निदान मलमपट्टी करत आहेत ते पण काहीच न करणाऱ्यांपेक्षा बरे, नाही का?

मलमपट्टी, मूलगामी उपाय, समाज प्रबोधन, अर्थसहाय्य उभे करण्यासाठी मदत असे काही ना काही करत आहेत हे ही महत्वाचे. या ना त्या प्रकारे जाणीव होत आहे, सहभाग वाढत आहे.

ज्याला ज्या प्रकारे जमेल/वाटेल/पटेल/आवडेल त्या प्रकारे मदत करत आहेत. मला ते सुद्धा समाधानकारक वाटते.

छान माहिती.. या दोन गावात काही अमानवीय वा दैवी चमत्कार घडला नव्हता. मानवाच्या सामुहिक प्रयत्नानेच हे साध्य झालेय. त्याचा प्रचार सगळीकडे झाला तर तो चांगलाच आहे. हस्तिदंती मनोर्‍यात बसून रहायचे दिवस गेले, हे सर्वच कलाकारांना समजले पाहिजे आता.

Sarvajanik Jalyukta Latur Vyavasthapan Samiti Khup changale kam karit ahet , Sadhya latur madhil Manjara nadiche Patra Rund V khol karnyache kam chalu ahe pan He Kam RSS va Shri Shri Ravishanka Karat aslyane Tyas Prashidi Nahi

महेंद्र ढवाण
जलयुक्त शिवार समित्या अनेक ठिकाणी काम करत आहेत. जालन्याला काम चालू होतं. लोकसहभागातूनच. लातूरच्या कामाबद्दल दुस-या धाग्यावर लिहीणार होतो. कारण हा धागा या आगळ्या वेगळ्या संकल्पनेसाठीचत्राहू द्यावा असे वाटते. काम श्रेष्ठच आहे. पण आजच व्हॉट्स अप आणि फेसबुक वर जी माहिती एका संघटनेच्या माध्यमातून आली त्यात एकाच संघटनेची माहिती दिलेली होती. खरं तर अनेक संघटना त्यात आहेत. बातमी देताना अमूक एक संघटना + त्यांची उपसंघटना आणि अन्य असे दिले गेले आहे. शिवशक्ती प्रतिष्ठान, व्यापारी महासंघ आणि बाकीच्या संघटनांचा उल्लेखही नाही. हे सर्व लोक त्या प्रकल्पात सहभागी आहेत. या प्रकाराने व्यथित झालो. या विषयावर अधिक संभाषण करायचे असल्यास अन्य धाग्यावर किंवा विपूत बोलूयात.

ज्वलन्त विषय आहे...

<<दुष्काळ पडू नये असे प्रयत्न करणे हे मूलगामी उपाय आहेत असं नाही का वाटत ?>>
------ या बाबत आपण सर्वसामान्य व्यक्ती (भारतात रहाणारी असेल वा बाहेर रहाणारी) काय मदत करु शकतो? पाण्याची काटकसर करणे, ते कमी प्रमाणात वाया जाईल असा प्रयत्न करणे हे आपण करतच असतो... पण अजुन काही उपाय सुचतात का?

धागा धावता आहे हे ३० प्रतिसादानंतर कळतं ना ? आताच कसं काय कळालं ? कृपया कळवावे ही विनंती, म्हणजे अ‍ॅडमिनकडे संपर्क साधायला बरं..

एबीपी माझाचा सत्यमेव जयतेच्या वॉटर कपची माहिती देणारा व्हिडीओ हेडर मधे समाविष्ट केला आहे. एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर आमीर खान आणि सत्यजित भटकळ यांची घेतलेली मुलाखत संबंधित व्हिडीओ उपलब्ध झाल्यावर हेडर मधे समाविष्ट करता येईल.

त्यात विचारलेले काही प्रश्न अतिशय महत्वाचे होते.

उदा. हिवरे बाजार किंवा राळेगण सिद्धी इथे पाणी अडवण्यासाठी स्वाभाविक रचना (उंच सखल बशीसारखा आकार ) तशी होती . पण अनेक ठिकाणी पाणी अडवण्यासाठी उंचवटे आणि खोलगट भाग नसेल तर तुम्ही पाणी साठवणार कसे ?

याला उत्तर देताना सत्यजित भटकळने या भागाचा आम्ही विचार केलेला आहे. या ठिकाणी पूर्वी वॉटर कॉन्झर्व्हेशन होत होतं पण पीक काढण्याच्या चुकीच्या पद्धती, भरमसाट उपसा यामुळे भूजल पातळी खालावलेली आहे. तिचे पुनर्भरण एक ते दिड वर्षात होईल असे उत्तर दिले.

भूजल पातळीचे पुनर्भरणन कसे करतात याची माहिती अन्य एका धाग्यावर दिलेली आहे. अनेकांना ते माहीतही असेल. या स्पर्धेत त्याचा समावेश आहे किंवा कसे हे कळाले नाही. पण सकारात्मक पाऊल म्हणूनच या प्रयोगाकडे पाहीले पाहीजे याबाबत दुमत नसावे.

उदय,

इथे तुम्हाला काही उपाय सापडतील.

http://www.maayboli.com/node/55466

शिवाय तुम्हाला शोषखड्डयाविषयी माहिती आहे का ? मागे माबोच्याच एका बीबी वर आली होती. तो पण चांगला आणि परिणामकारक उपाय आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल तुम्हाला माहीत असेल बहुदा.

कोपचेजी,

जिथे लोकांचा सहभाग येतो तिथे सरकार एकटे काहीच करु शकत नाही हा इतिहास फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे म्हणुनच एनजीओज महत्वाचे स्थान संपादन करुन आहेत. खर्‍या खुर्‍या एनजीओज किंवा सरकारी मदती शिवाय चालणार्‍या एनजीओज ची संख्या वाढेल आणि तज्ञ मंड्ळीचा अभ्यास वाढुन सरकार आणि एनजीओज तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील तिथे जे काम लोकांच्या सहभागाने होणार आहे ते चांगले होईल.

जिथे शासन पातळीवर काम चालणे अपेक्षीत आहे जसे तात्पुरते उपाय करणे. शासनाच्या अधिकाराचा उपयोग करुन काम करणे त्या ठिकाणी शासन एकटे काम करणे अपेक्षीत असेल.

एक दु:ख अजुनही आहे,

लोक नुसते बोलतात. प्रत्यक्ष सहभाग तर सोडाच, काऴजी पण घेत नाही.
आजही पाणी रस्तावरुन धो धो वाहते, खुप ठि़काणी पाईप लाईन नागरिकांनी फोडलेल्या आहे, राजकारण्यांचा त्याला पाठींबा असतो, सार्वज्ञिक विज सर्रास चोरली जाते.
पाण्यात मोठे मोठे भ्रष्टाचार , अवाच्या सव्वा टँकरच्या किंमती. कणव दाखवायची अन लुट करायची याला काय अर्थ.
सगळे चोर असतात पण एखाद्याला दाखवुन सगळेच त्याला ठोकतात.

पाणी फौंडेशन तर्फे जलमित्र म्हणून मी इतक्यातच म्हणजे १ मे रोजी श्रमदान करण्याकरता पुरंदर तालुक्यातील सासवड जवळील वाघापूर येथे गेलो होतो.

सकाळी साधारण पणे सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत श्रमदान केले. CCT म्हणजे contineuous countour trench करता खोदकाम केले.

असे कित्येक स्त्री पुरुष मुले होती ज्यांनी आयुष्यात प्रथमच कुदळ फावडे टिकाव हाती घेतले असेल. पांढरपेशा मध्यमवर्गीय शहरी नागरिकांना प्रत्यक्ष काम करायला, इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र जमलेले पाहूनच डोळ्याचे पारणे फिटले.

काम करताना खूप मजा मजा आली, अतीव समाधान मिळाले.

सांगण्याकरता इतके काही आहे की एक वेगळा लेखच लिहून होईल. पण तुर्तास इतकेच