कॅनडा गीजच्या सहवासात एक तास
इथे यांचे फोटो पहा
http://www.maayboli.com/node/48171
( हा लेख मेनका मासिकात पूर्वप्रकाशित. त्यांनी इथे अपलोड करायला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.)
मुक्काम पोस्ट वॉशिन्गट्न डीसी, USA
आत्तापर्यंत अमेरिकेतल्या स्प्रिंग आणि समरचाच अनुभव घेतला होता.
पण या वेळी इथे विंटरमधेच आल्याने इथल्या थन्डीची बरीच वेगवेगळी रूपं अनुभववली.
कधी जबरदस्त हिम वर्षाव, कधी भर दुपारी बारा वाजता कडक उन्हात हाडं गोठवणारी थंडी. कधी डोक्यावर कडक ऊन, तरीही बोचऱ्या वाऱ्यामुळे आणखीच बोचरी झालेली थंडी.
कधी भरपूर पाऊस आणि ढगाळ वातावरण! संध्याकाळी पाच वाजताच अंधारलेला दिवस!
७ जानेवारी २०१४ हा दिवस १९९६ पासूनचा इथला सर्वात थंड दिवस होता.
अशी थंडीची विविध रूपं अनुभवतानाच एका अनोख्या अनुभवाला सामोरं जाण्याची संधी मिळाली.
इथल्या आमच्या घरासमोर एक विस्तीर्ण असा दोन्ही बाजूला खोलगट होता गेलेला मैदानी भाग आहे. या मैदानाला दुभागून कापत पुढे जाणारा एका निरुंद, डांबरीच पण कच्चा रस्ता आहे.
हा रस्ता मैदानाच्या या टोकापासून निघून थेट दुसऱ्या टोकाशी आडव्या पसरलेल्या मेट्रो स्टेशनाच्या मुख्य दरवाज्याशी संपतो. म्हणजेच या मैदानाच्या दुसऱ्या टोकाशी आडवं पसरलेलं असं मेट्रो स्टेशन आहे.
असाच दोन तीन दिवस पाऊस पडून गेलेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उतारावरून
पावसाचं पाणी वाहून, दोन्ही बाजूच्या विस्तीर्ण मैदानांचं उथळ अश्या पाणथळ जागेत तात्पुरतं रूपांतर झालेलं होतं.
रस्त्याच्या दोन्ही बाजूचे मैदानाचे विस्तीर्ण तुकडे चमकदार पिवळसर गवताने आच्छादले गेलेले. जणु मैदानाने पिवळी दुलई पांघरलेली!
अजूनही हवामान ढगाळच. धूसर मंद सूर्यप्रकाशामुळे या सम्पूर्ण दृश्यावर एका झिरझिरित तलम असा राखाडी पडदा सोडल्यासारखा दिसत होता.
सकाळी ८ वाजता याच रस्त्यावरून येत असताना अचानक लांबूनच लक्षात आलं की या मैदानावर असंख्य ...म्हणजे अक्षरश: शेकड्यांच्या संख्येने ....पक्षी दिसताहेत. खरं म्हणजे ते पक्षी दृष्टीस पडण्याआधीच, वातावरणात भिनलेला कसलासा कोलाहल जाणवला होता.
मग लक्षात आलं की हे स्थलांतारित कॅनडा गीज आहेत. हा कोलाहल म्हणजे या पक्ष्यांचं समूहगान!
अगदी तार स्वरातलं समूहगान! चहूबाजूंनी यांचे हाकारे (Honking) ऐकू येत होते.
एरवी अस्ताव्यस्तपणे सुस्त पडून असलेल्या या विस्तीर्ण गवताळ मैदानाला जणू अचानकच जाग आलेली!
आपल्याकडेही एरवी रिकाम्या असलेल्या विस्तीर्ण माळरानात भटक्या जमातीतल्या लोकांची पालं पडली की कशी त्या परिसराला अचानकच जाग येते…….तसाच एरवी चिडिचुप असलेला हा भाग अगदी गजबजलेला वाटायला लागला. परिसरातली लगबग अगदी जाणवत होती.
अचानक समोर आलेले पक्षी बघून एकदम जाणवलं ........आपल्याजवळ आत्ता नेमकं आय पॅड नाही. भराभरा पावलं उचलली, घरी येऊन आय पॅड घेऊन पुन्हा तिथेच परत आले.
पाहिलं तर सगळं जिथल्या तिथेच होतं.
मैदानावर छोटे छोटे गट करून सगळे पक्षी मनसोक्त चरत होते. माना खाली घालून चोचीने गवताची पाती अगदी मुळापासून उपटून खादाडी चालू होती. त्यामुळे चरण्याचा अगदी छान कुरूकुरू आवाजही ऐकायला येत होता.
कॅनडा गीज हे बदकासारखे दिसणारे पक्षी , कॅनडातल्या अति थंडीमुळे उत्तर अमेरिकेत स्थलांतर करतात. काही काही अगदी मेक्सिकोपर्यंतही जातात.
तसेच हे इथे , या प्रदेशात आले होते.
इथे काही गट दिसत होते आणि काही जोड्याही!
या पक्ष्यांमध्ये शक्यतो जोड्या एकमेकांना धरून असतात. शास्त्रज्ञ गमतीने म्हणतात की यांच्यात घटस्फोटाचं प्रमाण अत्यल्प आहे.
म्हणजेच हे पक्षी शक्यतोवर आयुष्यभर एकपत्नी व्रत अंगीकारतात आणि कुटुंब संस्थेला खूप महत्व देतात. हे पक्षी आपापले जोडीदारही अगदी शोभेलसेच निवडतात. मोठ्या आकाराच्या गूजची जोडीदारही मोठीच असते आणि अर्थातच छोट्याची छोटी!
हे गीज विविध प्रकारच्या बेरीज (ज्युनिपर बेरीज, ब्लू बेरीज इ.इ. ) यावरच आपला उदरनिर्वाह करतात, ज्या इथे ऐन थंडीतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. यातल्या काही लाल आणि काही फिकट निळसर रंगाच्या......इथल्या रस्त्यावरून फेरफटका मारताना रस्त्याकडेच्या झुडुपांवर लगडलेल्या दिसल्या.
थोडे अवांतर ……. यातल्या निळसर ज्युनिपर बेरीजपासून उत्तम प्रतीची वाइन बनते, ही नंतर पडलेली सामन्यद्न्यानातली भर!
या गीजना बेरीज तर आवडतातच. पण यांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे करून वनस्पती आणि गवत यावरच होतो. (herbivorous). म्हणूनच जेव्हा कॅनडामध्ये अतिरिक्त थंडीमुळे आणि हिमवर्षावामुळे गवताळ प्रदेश संपूर्णपणे झाकले जातात, सगळीकडच्या वनस्पती आणि गवत गोठून जातं, तेव्हा हे गीज अधिक उबदार ठिकाणी, अन्नाच्या शोधात कूच करतात. उत्तर अमेरिकेत जिथे समुद्राला नदी मिळते, तिथल्या सुपीक तटवर्ती प्रदेशातल्या अन्नधान्याच्या मुबलकतेमुळे हे गीज हिवाळ्यात हमखास इकडे स्थलांतर करतात.
पण हिवाळा संपला की हे पक्षी नंतर परत पुन्हा आपल्या जन्मगावी परत जातात. जिथे त्यांनी घरटी केलेली असतात.
हे गीज उडताना इंग्रजी v च्या आकाराचा कळप करून उडतात. त्यामागचं कारणही मला खूपच इंटरेस्टिन्ग वाटलं.
असा आकार बनवून उडल्याने त्यांचं एकमेकात कम्युनिकेशन सुलभ होता असावं, आणि इंग्रजी v चा आकार एअरोडायनेमिक असल्याने उडणं सुलभ होतं आणि गतीही वाढते!
हे गीज तसे माणसाला आजिबातच घाबरत नाहीत. त्यामुळे मी त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे फोटो घेत होते तरी त्यांचा काही आक्षेप नव्हता. मात्र माझ्यापासून काही ३/४ फ़ुटांचं अंतर मात्र ते राखत होते.
मात्र त्याहूनही जरा जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते एकमेकात माझ्याबद्दल काही तरी नापसंतीचे नाराजीचे उद्गार काढत होते........ हो… म्हणजे असं मला वाटलं.
कारण लगेच त्यांचा कर्कश्य गलबला आणि त्यांची गति …… दोन्हीमध्ये अचानक वाढ झालेली मला जाणवलं!
का कुणास ठाऊक…… पण त्यांची थोडीशी फेंगडी चाल पाहून मला खूप मजा वाटंत होती. होडीच्या वल्ह्याच्या आकाराची, आपली निळसर मोरपंखी छटा असलेली सुंदर पावलं लगबगीने उचलून आपला सगळा पसारा त्या पावलांवर तोलून, डुलत डुलत चालत, चोच पुढे काढून……अगदी अधिकार वाणीने गप्पा छाटत, त्या सर्वांची मस्त खादाडीही चालू होती. फार गोड दृश्य वाटलं मला ते!
हो......हे गीज दिवसातले बारा तास चरू शकतात …… नव्हे…चरतात.
स्थलांतर सुरू करण्याच्या आधीचा काळ ते आपला आहार वाढवतात. आणि स्थलांतर करताना उडण्यासाठी लागणारी ऊर्जा शरिरात साठवून ठेवतात.
कारण लांब अंतराचे पल्ले एका दमात गाठायचे असतात ना! शास्त्रद्न्यांनी माग काढलेल्या गीजनी एका दिवसात १००० कि.मि. चा पल्ला गाठलेला आहे.
तसे हे आकाराने बऱ्यापैकी मोठे असतात. आणि जोपर्यंत त्यांना आपल्यापासून काही धोका जाणवत नाही, तोपर्यत ते तुमच्याकडे ढूंकूनही बघणार नाहीत.
हे गीज एकमेकात खरंच खूप छान सुसंवाद साधतात. हे शास्त्र्द्न्यांनी सिद्ध केलं आहे. सर्व सामान्य माणसाला गीज म्हटलं की त्यांचा "हॉन्कीन्ग कॉल" एवढंच माहिती असतं. पण शास्त्राद्न्यांनी या गीज चे १३ प्रकारचे कॉल शोधून काढले आहेत.…नव्हे त्यांचा विश्वास आहे की हे गीज या १३ प्रकारच्या कॉल्समधून धोक्याची सूचना
एकमेकांचे स्वागत, आनंद असे अनेक संकेत, अनेक भावना एकमेकांपर्यंत पोचवतात.
माझ्यासमोर आत्ता या पक्ष्यांची एकमेकात जी काही विचारांची देवाण घेवाण, जो काही एकमेकात परिसंवाद, चर्चा चालू होती त्यावरून तरी मलाही शास्त्रज्ञांचं मत अगदी १०० टक्के पटलं.
या पक्ष्यांचा एकमेकात खूप छान संवाद असतो हे अगदी आत्ताच्या त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करतानाच जाणवलं होतं. या सर्वांनी बहुतेक कामाची आणि गवताळ प्रदेशाची आपसात विचारविनिमयाने विभागणी केली होती.
एक गंमत आहे मात्र…. काहीही करताना सगळे मिळून चर्चा जरूर करतात. असं वाटलं , जणू इथे प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
आता इथेच पहा ना ..... एका गटाचं मैदानाच्या एका बाजूचं खाद्य खाऊन झाल्यावर त्या गटात पुन्हा एकदा विचार विनिमय झाला. आणि सर्वानुमते मैदानाच्या पलीकडे जाण्याचं ठरलं.
मग त्या गटातले सर्वजण एकामागे एका ओळीत उभे राहिले आणि त्यांनी अगदी शिस्तीत ओळीतच रस्ता क्रॉस केला.
ते इतकं गोड दृश्य माझ्या मन:पटलावर कोरलं गेलं आहे. आणि हो...त्याच दृश्याची व्हिडीओ क्लिप माझ्या आय पॅडमध्येही आहे.
इथे तास दीड तास कसा गेला कळलंच नाही. वाटत होतं अजून थोडा वेळ यांच्या बरोबर काढावा!
पण शेवटी मनाला आवरलं आणि जड पावलांनी घरी गेले. त्यांचे हाकारे घरातही ऐकायला येत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुन्हा त्याच रस्त्यावरून जायची वेळा आली, तर ते गवताळ मैदान अगदी निपचित पडल्यासारखं भासलं. तिथली शांतता अगदी नकोशी वाटत होती.
पण रस्त्यावर आणि परिसरात बऱ्याच ठिकाणी काहीतरी पडलेलं दिसलं. नीट पाहिलं तर आधी वाटलं गायीम्हशींचं शेण आहे की काय? नंतर लगेचच लक्षात आलं आपण अमेरिकेत आहोत.
इथे कुठल्या मोकाट फिरणाऱ्या गायी म्हशी?
मग "ते" कुणाचं ? हा प्रश्न उरतोच! कुत्र्यांचही नसणारच! कारण त्याचीही इथे परवानगी नाही. म्हणजे फिरायला नेलेल्या कुत्र्याच्या मागे "त्या"च्यावर लक्ष ठेऊन, हातात कॅरी बॅग घेऊनच आणि ग्लव्ज घातलेला मालक असतो! आणि मोकाट कुत्री इथे नाहीतच!
मग ट्यूब अचानक पेटली. म्हणजे मनात शंका आली! हे त्या कालच्या गीजचं तर नाही?
कारण "त्या"चा रंग गवतासारखाच होता. आणि हे गीज दिवसभर गवतच खात होते.
मग "गुगल" देवाला पुन्हा एकदा शरण गेले. तेव्हा कळलं की हे गीज दिवसात २ ते ३ पौंड गवत खातात. आणि १ ते २ पौंड बाहेर टाकतात(विष्ठा).
मग पुन्हा काही दिवसांनी घरातच त्यांचे हाकारे ऐकू आले. मग लगेच आय पॅड घेतलं आणि दोन मिनिटातच त्या मेट्रोजवळच्या मैदानावर जाऊन पोचले. आदल्याच दिवशीच्या हिमवर्षावाने रस्ते निसरडे झालेले, त्यामुळे जरा काळजीपूर्वक, आणि बेतानेच चालावं लागत होतं.
परत तशीच मोठी कॅनडा गीजची झुंड त्या तश्या बर्फ़ातही चोची खुपसून कलकल करत फिरताना दिसली.
याचाच अर्थ हे सगळे पक्षी याच परिसरात कुठे तरी स्थिरावले होते.
त्यानंतरही कित्येक वेळा हे संपूर्ण शहरातही कुठे कुठे अचानकच भेटत राहिले. आणि मग मात्र अगदी ओळखीचेच वाटायला लागले.
वा, किती सुंदर लिखाण.
वा, किती सुंदर लिखाण.
मस्तं लेख.
मस्तं लेख.
लेख मस्तच !!!
लेख मस्तच !!!
सुंदर झालाय लेख.
सुंदर झालाय लेख.
मस्तच लिहिलंय ......
मस्तच लिहिलंय ......
वाह्,किती सुंदर लेख!!!!
वाह्,किती सुंदर लेख!!!!
सुरेख लेख...फोटो पण बघायला
सुरेख लेख...फोटो पण बघायला आवडतील!!
ममो.....प्रथम प्रतिसादाबद्दल
ममो.....प्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पद्मावती आशुतोष भुईकमळ शशांक वर्षू कुसुमिता धन्यवाद!
कुसुमिता......याच लेखात सुरवातीला फोटोची लिंक आहे. तिथे फोटो दिसतील.
वा! सुन्दर लेख!! पूर्वी फोटो
वा! सुन्दर लेख!! पूर्वी फोटो पाहिले होते, पण आता लेख वाचताना खूप मजा वाटली !
मानुषि ताई,
मानुषि ताई, --------/\--------, काय सुरेख वर्णन, काही शब्दच सुचत नाही...
फक्त एकच म्हणेन, लेख वाचल्यावर खुप शांत आणि वेगळाच आनंद अनुभवते आहे...
सुंदर लेख, फोटो असते तर आणखी
सुंदर लेख,
फोटो असते तर आणखी चारचांद लागले असते लेखाला.
सायु ...गोड प्रतिसादाबद्दल
सायु ...गोड प्रतिसादाबद्दल धन्यवाद गं बायो!
विजय आंग्रे...धन्यवाद. लेखाच्या सुरवातीला फोटोची लिंक आहे. तिथे आहेत फोटो.
हे गीझ पिले झाल्यानंतर,
हे गीझ, पिले झाल्यानंतर, प्रचंड आक्रमक होतात. पिल्लांचे रक्षण करत अंगावर धाउन येतात.
>>>>जणू इथे प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आता इथेच पहा ना ..... एका गटाचं मैदानाच्या एका बाजूचं खाद्य खाऊन झाल्यावर त्या गटात पुन्हा एकदा विचार विनिमय झाला. आणि सर्वानुमते मैदानाच्या पलीकडे जाण्याचं ठरलं.मग त्या गटातले सर्वजण एकामागे एका ओळीत उभे राहिले आणि त्यांनी अगदी शिस्तीत ओळीतच रस्ता क्रॉस केला.
हाहाहा
कॅनडाचे गीज म्हटले की सगळ्यात
कॅनडाचे गीज म्हटले की सगळ्यात पहिले Miracle on the Hudson आठवते.