निसर्गातले भाग्यक्षण...

Submitted by पुरंदरे शशांक on 15 October, 2015 - 05:53

निसर्गातले भाग्यक्षण .....

पहाटेसच जाग आली. मुख्य फाटकाचे कुलुप उघडण्यासाठी दिवा लावला आणि अंगणात पाऊल टाकताच लक्षात आलं कि दिव्याची आज अजिबात गरज नाहीये - किंबहुना दिवा नसण्यातच आज खूप मजा आहे. दिवा बंद करुन अंगणात येऊन पाहिलं तर आकाश अगदी निरभ्र. चांदोबा बिचारे चेहरा मुडपून आकाशात स्थिरावलेले - बहुतेक वद्य अष्टमी-नवमी असणार आज. चांदोबासारखा नटसम्राटच मवाळल्याने बाकीचे तारे -तारका आज भाव खात होते - मृगशीर्ष, व्याध नेमके डोक्यावर चमकताना दिसत होते. कृत्तिकेचा तारकापुंजही नीट ओळखू येत होता, वृषभ राशीचा तो मोठासा तारा पण उठून दिसत होता.

ही पहाटेची वेळ कशी -अति तरल. कधी संपून जाते कळतही नाही - अशा विचारात जाणवला एक छान सुखद गारवा. शिरशिरी आणत नव्हता पण हवाहवासा असा गारवा. झोप उडवून लावणारा गारवा - चैतन्य जागृत करणारा गारवा.

सगळं कसं नीरव, स्तब्ध वातावरण - वारं नावालाही नाही. पाऊस थांबून बराच काळ लोटल्यानं माती चांगलीच कोरडी झालेली - आणि अशा मातीवर दंव पडल्यामुळे एक जादूभरा माहोल तयार झाला होता. या दंवामुळे एक मस्तसा गंध वातावरणात भरून राहिला होता. हा गंध मातीचाही आणि ओलसर पानांचाही - सगळंच एक अद्भुत मिश्रण असलेला गंध. उरात साठवून घ्यावा असा- निसर्गगंध. हा गंध किती आगळावेगळा आणि किती भारुन टाकणारा, केवळ वेड लावणारा!!

काही दिवस आधी अगदी भरभरुन फुललेला बागेतला झेंडू अजूनही काही मोजकी फुले अंगावर बाळगत दिमाखात उभा होता. पूर्वेला झुंजुमुंजू होतंय आणि वर मवारलेला चंद्रप्रकाश - अशा गूढ वातावरणात त्याची केशरी-पिवळी सतेज कांती आज अगदी विशेष खुलून दिसत होती.

पांढर्‍या जास्वंदीच्या कळ्या आता लवकरच उमलतील अशा छान टपोर्‍या दिसत होत्या, शुभ्र रंगामुळे नजर वेधून घेत होत्या.

लालभडक इक्झोराही हिरव्यागार पानांमधून आपले डोके उंचावत मी इथे असे दाखवत होता. घुमटाकार असलेली त्याची लालीलाल फुले; याचा कसा एक नैसर्गिक पुष्पगुच्छ तयार झालेला.

तुळसाबाईंचा एक मिरमिरीत गंध अगदी त्या रोपट्याच्या आसपासच - त्या पानांना, मंजिर्‍यांना लगटूनसा राहिलेला. नाक अगदी रोपट्याच्या जवळ नेलं तरंच हा गंध जाणवतोय, जरा बाजूला गेलो तर पुन्हा तो मदभरा निसर्गगंध जाणवतोय.

आणि हा रानजाईचा पोपटी वेल, कालच जरा दोरी लावून याला वर चढायला मदत केली तर केवढा तजेलदार दिसतोय आज ! याला फुले आली की एक विशिष्ट रान-सुवास दरवळत रहातो मग.

जॅकोबिनियाचा फिकट गुलाबी तुरा दिमाखाने उभा आहे.

गाल्फिमिया हळदुल्या फुलांना छान सांभाळून उभा आहे. हिरव्या पानातून डोकावणारे याचे पिवळे तुरे - एक अस्सल देशी रंगसंगंती दाखवून देतंय.

कारनेशिअमची कडा कातरलेली पांढरीस्वच्छ फुले व त्यावरली कोरल्यासारखी नक्षी - झळकतीये अगदी.

मुसेंडाची फिकट पिवळी पाने आणि इवलीशी पिवळी फुले स्वत:त मग्नशी उभी.

अबोलीची सदासतेज फुले हिरव्यागार पानातून डोकावताहेत.

आणि ही जांभळी जादू !! हो, या कोरांटीने तर कमालच केलीये - ही नाजूक जांभळी फुले काय उठून दिसताहेत पानापानातून ..

आणि एकदम एक अनामिक सुवास जाणवला. अरेच्चा हे कोण एवढ्या पहाटेच उमललंय बरं ? सुगंध तर पार वेडावून टाकणारा, पण फुलं अजिबात दिसत कशी नाहीयेत !!! जरा नीट निरखल्यावर लक्षात आले - कामिनीची (कुंती) पांढरीशुभ्र फुलं डोकावत होती - हिरव्यागार पानातून. कसा विलक्षण सुवास होता तो !! इतकी नाजुक छोटी फुलं आणि सुवास असा की मनाला पार मोहिनी पडत होती. मग अगदी अचानकच माऊलींची एक ओवी समोर ठाकली - तेणें कारणें मी बोलेन| बोलीं अरूपाचें रूप दावीन| अतींद्रिय परी भोगवीन| इंद्रियांकरवीं || अ. ६||

कुंतीचे एक साधेसे फुल -पण त्याचे देखणेपण, त्याचा सुगंध असे काही होते की ते "अरुप" जणू इथे प्रत्यक्ष साकारले होते, तो अतिंद्रिय अनुभव पण इथे तो सुगंधामुळे अनुभवाला येत होता. तना-मनाला मोहवून केवळ सुखाचा वर्षाव करणारे ते सानुले आईच्या कुशीत सुखाने पहुडणारे एखादे निरागस बाळ असावे तसे भासत होते ...

शांत वातावरणात निसर्गासोबत जो असा अलगद ह्रदबंध निर्माण होतो त्याचे वर्णन करता येणे केवळ अशक्य. तो तर केवळ एक शब्दातीत अनुभव - असा विलक्षण अनुभव ह्रदयाच्या आत आत साठवून ठेवणे यासारखे सुख नाही...

या झाडाझुडुपांच्या अंतरंगात, या पानाफुलांच्या आतमधे जी एक सहज निर्मळता, प्रसन्नता आणि प्रगाढ शांति भरुन राहिली आहे ती या अशा भाग्यक्षणी अंतरंगात अशी काही थेट उतरत जाते की जणू ये ह्रदयीचे ते ह्रदयी घातले .... मग मी मीपणाने उरु शकत नाही... या देहालाच वेटाळून बसलेला हा क्षुद्र, अल्प मी अचानकच या व्यापक सृष्टीचा एक भागच बनून जातो आणि मग अनुभवाला येते एक अथांग नि:शब्दता, असीम शांति ....

---------------------------------------------------------------------------------------------------------

१] तुळस

05MP_TULSI_PLANT_1259486g.jpg

२] अबोली

a.JPG

३] कार्नेशिअम -

ca.JPG

४] गाल्फिमिया -

g.JPG

५] पांढरी जास्वंद
hibiscusalbus1111.jpg

६] इक्झोरा

ixo.JPG

७] जॅकोबिनीया

j.JPG

८] कुंती / कामिनी

k.JPG

९] कोरांटी

ko.JPG

१०] झेंडू -

marigolds.jpg

११] मुसेंडा -

musenda.jpg

१२] रानजाई -

ranjai.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंशाक अरे छानच लिहिलेस Happy

मवारलेला चंद्रप्रकाश>> मवारलेला म्हणजे नक्की काय? नवीन आहे शब्द मला.

वा ! प्रसन्न लेखन !

तुम्ही ज्या आत्मियतेने संत वाङमयावर निरुपण करता, तितक्याच तन्मयतेने निसर्गाचीही दखल घेता. 'कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी' , या ओवीप्रमाणे जणू आपणांसही अवती-भवतीच्या निसर्गात 'तो सावळाच" दॄष्यमान होत असावा.

लेख तर आवडलाच, पण पहाटेच्या वर्णनाने त्याला 'चार चांद' लावलेत.

'इक्झोरा' - हे नाव आताच कळलं याचं मराठी नाव माहीत आहे का? असल्यास जरुर सांगावे.

आमच्या घराच्या अंगणात हे 'इक्झोरा'चं झाड आहे, कैक वर्षांपासून, नियमितपणे अशीच गोल गरगरीत जुडी केल्यासारखी लाल्-चुटुक फुलं देत आलंय ते. विशेष म्हणजे आमच्या घरातील कुणीही लावलं नाहीये ते, बरंच मोठं आहे, तुमच्या फोटोतल्या झाडापेक्षाही. आमचे मूळ घर पाडून नवे बांधत असतांना सर्वांना चुटपुट लागली होती की ते झाड आता तोडावं लागणार. पण गंमत म्हणजे हे झाड आमच्या कॉन्ट्रॅक्टरलाही आवडलं अन ते न तोडताच त्याने सारं बांधकाम केलं, त्यामुळे आजही ते झाड तिथेच दिमाखात उभं आहे.

अवांतराबद्दल क्षमस्व !

अप्रतिम लिखाण... दरवळला सुवास,पहाटेचा!!! ... आणी फुलं किती प्रसन्न, नाजूक.. वाह!!!!!
शशांक, खूप सुंदर्,तरल वर्णन

आहाहा, किती तरल, ओघवतं लिखाण.

आता इथल्या हिटमधे हे लिखाण वाचून आणि फोटो बघुन मनाला आणि डोळ्यांना गारवा मिळाला.

खुप लकी आहात तुम्ही शशांकजी, हा अनुभव तुम्हाला घेता आला. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर वर्णन... सबजा पण लावाच.. त्याच्याही पानांना असाच वेडावणारा गंध असतो.

इक्झोराला, मराठीत रुक्मिणी म्हणतात.

किती तरल लिहितोस शशांक! आणि फोटोही मस्तच!
आणि हो...मुसेन्डाची फुलं काय सुरेख आहेत. असं लोकरीसारखं काहीतरी टेक्स्चर वाटतंय त्याचं.आणि त्याची पानं अशीच पांढरी असतात की ते पांढरं पान दुसर्‍या कशाचं आहे?

मस्तच वर्णिलं आहे शशांक..
फुलझाडं सुद्धा मस्त आहेत तुमच्याकडले..
घरची रानतुळस बहरलिए मस्त Happy

वा काय सुरेख पहाट.. आणि वर्णन ही... वाचुनच खरच सुखद अनुभुती आली..
अगदी ताजीग आली.. शशांकजी कमालीची लेखन शैली..अगदी काळजाला भिडणारी...:)
आणि तुमची बाग तर क्या केहेने..

Pages